आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

छत्रपती राजाराम म.चरित्र भाग ९, (४१ ते ४५)
अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ४१.
मीरला संताजींच्या वधाची बातमी कळल्यावर तीला अतोनात दुःख झाले. स्वराज्यातील एक निस्सीमसेवक आपसांतील यादवीस बळी पडुन गफलतीने मारल्या गेला.नागोजी मान्या, हे काय केलेस? बादशहाचा मोठा शत्रू मारल्यामुळे खुष होऊन दक्षिणेची सुभेदारी नक्की देईल या खात्रीने घरी न जातां तात्काळ बादशहाच्या भेटीस ब्रम्हपुरीस संताजीचे शिर घेऊन आल्याची बातमी सार्या छावणीत वार्या सारखी पसरली.येसूबाईंना कळल्यावर त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. पण व्यक्त करतां येत नव्हते.
दरबारात नागोजीने बादशहाला कुर्निसात करुन वस्रात गुंडाळलेले संताजींचे शिर तख्ताजवळ ठेवुन, बादशहाचा दुष्मण कसा मारला याची फुशारकी करुं लागला.बादशहा आपला बहुमान करेल ही खात्री त्याला तसेच दरबारांतील इतर सरदारांही होती. बादशहाने तख्ताजवळ ठेवलेल्या संताजींच्या शिराकडे पाहत म्हणाला, नागोजी!तूं हे काय केलेस?याला मारुन बादशाहीचा केवढा मोठा अपराध केलास केवढे नुकसान केलेस?हे ऐकुन सर्वी सभा स्तंभित झाली.तरी एका वयोवृध्द सरदाराने धीर एकवटुन,कारण विचारले वर,बादशहा म्हणाला,मी अनेक युक्त्या लढवुन संताजी धनाजी मधे कलह पेटवला.हे दोघे मराठेशाहीचे वीर आपसांत भांडुन नाश पावले असते व स्वराज्यात दुफळी माजली असती,पण या नागोजीने एकट्या संताजीस मारल्या मुळे धनाजी ईर्षेने बादशाहीवर तुटुन पडेल.हे केवढं नुकसान झालं?क्षणांत दरबाराचे वातावरण बदलले आणि नागोजीची सर्व मनोराज्ये ढासळुन पडली.तुझ्या या गुन्ह्याबद्दल मोठी शिक्षा द्यायला पाहिजे,तुझी सरदारी काढुन घ्यायला पाहिजे पण…पुढील हुकुमा पर्यंत तुला दरबार बंद!
बर! हा मराठ्यांचा बलाढ्य वीर योध्दा,जिथे माझे मोठमोठे सरदार फत्तुल खान,फिरोजजंग,नसरतजंग,सुजायत खान,झुल्फिकारखान यांना त्यानं दाद दिली नाही,तो तुझ्या हाती कसा सांपडला?नागोजीने खाली मान घालुन, आपण वेढा देऊन कशी पाळत ठेवली, झर्यावर आल्यावर संताजीने आपले चिलखत,शिरस्राण,हत्यारेाओढ्याकाठी ठेवुन तो पाण्यात उतरल्यावर,बेसावध संताजीवर मागुन जाऊन कसा वार केला हे सांगीतल्यावर,तूं बादशहाचा सरदार असून शत्रूशी दोन हात न करतां नामर्द पणे वध केलास हे बादशाहीला लांच्छना स्पद आहे.तसेही तुम्ही मराठे विश्वास घाताने एकमेकांचा गळा कापण्यात पटाईतच आहांत.
मानमरातब वाढण्याऐवजी भर दरबारांत अपमान झाल्याने नागोजी मरणप्राय स्थितीत खालमानेने खजील झालेला व बादशहावर चिडुन दरबारांतुन बाहेर आला.कुणाकडेही न पाहतां घोड्याच्या रिकिबीत पाय न घालतां एकदम घोड्या च्या पाठीवर उडी घेतल्याने घोडा बिचकला व नागोजी धाडकन आदळला.
पण कसाबसा पुन्हा घोड्यावर स्वार होऊन दोन दिवसांनी आपल्या गढीत पोहचला.त्याचा आराम झाल्यावर सुभानजीने मीराला त्याच्या समोर आणल्यावर तिचे सौंदर्य पाहुन स्तंभित झाला,पण क्षणभरच!तिला प्राप्त करण्या साठी वाटेल तसा बरळु लागल्यावर,मीरा ने त्याची चांगलीच कानउघाडणी केली.व जवळच्या दिव्य औषधीच्या प्रयोगाने सुभानजीची झालेली दशा पाहुन तो घाबरला.आधीच बादशहाने केलेल्या निर्भत्सना व मीराने केलेल्या कान उघाडणीने त्याच्या मनावर कल्पांतीत परिणाम झाला.मीराला शरण जाऊन तिच्या पायावर हात ठेवुन शपथ घेतली. आजपर्यंत लालूचीने बादशहाला खुष करण्यासाठी मी स्वकियांची खूप अधोगती केली.पण आतां नाही.आतां या नागोजी मानेची तलवार फक्त स्वराज्या साठी,नेकजात मराठ्यांनी रणांगणावर उभारलेल्या भगव्या झेंड्यासाठीच असेल
आणि दोघांमधे बहिण भावाचे खर्या मनाने नाते प्रस्थापित झाले.सुभानजी चुपचाप कोणालाही न सांगतां गढीतुन निघुन गेला.
पण मीरा!महाराजांचा माझ्यावर विश्वास बसेल कां?मी चंदीला जाऊन महाराजांकडुन तुमच्यासाठी अभयपत्र घेऊन येते.मीराने क्षणांत ही जी क्रांती घडविली ती खरोखरच लोकोत्तर होती.
दुसर्या दिवशी मीराबरोबर ५० स्वार देऊन,महाराजांकडुन अभयपत्र आणण्यास तीची चंदीकडे रवानगी झाली पण तिचे दुर्दैव अजुन संपले नव्हते.वाटेत सुभानजी,बाजी व कोंडोभटाची भेट झाली.तिघांनीही कपट कारस्थान रचुन त्रिवेणी संगमावर अरुणाचलला असलेल्या तरबियतखान सुभेदाराला भेटुन,मीराची लालूच व विशाळगडावरुन खंडोबल्लाळ येत असल्याची माहिती दिली.हा सुभेदार शत्रू मराठ्यांना पकडुन त्यांची सुंता करुन मुसलमान बनवित असे.मीरा चंदीला जात असतांना तिच्या बरोबरच्या स्वारांचा पडाव करुन मीरा व विशाळगडावरुन चिटणीस खडो बल्लाळ जिवाजीसह येत असतांना त्यांना तबियतखाना च्या सैन्याने कैद केले.चिटणीसांची सुंता करण्याचे ठरवुन त्यांच्या हातापायात बेड्या व गळ्यात मोठे साखळदंड घालुन कैदेत ठेवले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ४-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ४२.
खंडो बल्लाळ चिटणीसांना कैद झाल्याचे किंवा पुढे येणार्या संकटाला मुळीच घाबरले नव्हते,तर अश्या संकट समयी महाराजांच्या कामी येऊ शकत नाही याचे दुःख होते.सुदैवाने त्यांच्या पहार्यावर मराठा जामदार होता.तो जरी यवनाचा ताबेदार असला तरी मराठ्यां विषयी त्याच्या मनांत आपुलकी होती. नेमकी हीच गोष्ट बुध्दीवान चिटणीसांनी हेरुन आपल्या मिठास बोलण्याने त्याचे मन वळविले.आपल्या ऐवजी तशाच अंग काठीचा,मिळताजुळता तोंडवळा असलेला मनुष्य मिळाला तर,त्यांच्या जागी त्याला ठेवुन चिटणीसांची सुटका करण्यास तयार झाला.त्यांना आपला मुलगा बहिरबची आठवण झाली.तो आनंदाने हे जिवावरचे कठीण काम अंगावर घेईल याची खात्री असल्याने, जिवाजी त्या जमादाराच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारांत तटाच्या भिंतीवरुन उडी टाकुन कशाचीही पर्वा न करता अविरत धावत जाऊन पहाटेच्या सुमारास चिटणीसांच्या घरी पोहचला. जिवाजी हा किरकोळ कैदी असल्यामुळे कांही काळ गायब झाला तरी कोणाच्या लक्षात येण्यासारखे नव्हते.म्हणुनच जमादाराने एवढी मोठी जोखीम पत्करली होती.चिटणीस मागाहुन येत आहेत असे सांगुन बहीरवला बाजुला नेऊन त्याच्या वडिलांची योजना सांगीतल्यावर तो तात्काळ आनंदाने तयार झाला.दोघेही लपतछपत मध्यरात्री अरुणाचलास पोहोचले.जीव मुठीत घेऊन जमादार त्यांची वाटच बघत होता.
जसा पाहिजे तसा मनुष्य कारकुन जिवाजीने आणलेला पाहुन,त्यांना बंदोबस्ताने आंत नेले.पितापुत्राची भेट झाली.आपल्या वडिलांची बेड्या,साखळ दंडातील अवस्था पाहुन बहिरबला गहिवरुन आले.चिटणीसांनी योजना सांगुन म्हणाले,खरं म्हणजे तुला मृत्युच्या दाढेत टाकुन जात आहे,पण स्वामीकार्य शेवटास नेण्यास हे बलिदान करणे भाग आहे.बेटा माफ कर या अभागी पित्याला आप्पा असे म्हणुं नका.हा तुमचाच पुत्र आहे.स्वामीकार्यासाठी बलिदानासारखे दुसरे कोणते भाग्य?विजातीय होण्याचा प्रसंग आलाच तर धर्मभ्रष्ट होण्याऐवजी ही हिरकणी खाऊन आत्मघात करीन. पित्याने अभिमानाने मुलाला छातीशी कवटाळले.कदाचित ही भेट शेवटचीच असेल.पितृभक्ती आणि स्वामीभक्तीची ती शेवटचीच भेट होती.सलाम त्या अद्वितिय स्वामीभक्तीला!!
खंडो बल्लाळ मनांतील दुःखाचे कढ व डोळ्यातील अश्रू दडवुन झटकन तिथून जिवाजीसह बाहेर पडुन तटावरुन दोघांनीही उड्या टाकल्या.पण दुर्देवाने चिटणीसांची उडी चुकली व दगडावर आदळले.पायाला दुखापत झाली तरी कसतरी एकएक पाऊल टाकत छावणी पासुन लवकरात लवकर दूर जाण्याचा प्रयत्न करुं लागले.
इकडे मीराने दिव्य वनौषधीचा प्रयोग करुन स्वतःची सुटका करुन सावधगिरीने हळुहळु पुढे निघाली असतां एका बंद खोलीतुन बारीकशी उजेडाची तिरीप दिसल्यावर ती डोकावली असतां तिला आश्चर्य वाटले.कैद्याच्या रुपात चिटणीसांचा मुलगा बहिरव दिसला. त्याला सोडवण्याचा प्रयत्न करण्या आधीच त्याने हिरकणी खाल्लेली होती. अंतिम क्षणी म्हणाला,आप्पाच्या पोटी जन्म घेतल्याचे सार्थक झाले.स्वामी कार्यासाठी हा देह कामी येत आहे या पेक्षा सुदैव ते कोणते?असं म्हणुन त्याची प्राणज्योत मावळली.धन्य ते पिता! धन्य तो पुत्र!एकाने स्वराज्यकामी स्वतःच्या पुत्राचा बळी दिला,व एकाने हसत हसत आपले प्राण त्यागले.मीरा चुपचाप तटभिंतीवरुन उडी टाकुन चंदीच्या रस्त्याला लागली.
चिटणीसांचा पाय दुखावल्यामुळे त्यांना चालणे अशक्य झाले.आणि चंदीला वेढा घातलेल्या झुल्फिकारखाना च्या जमादाराने बाजीच्या सांगण्यावरुन त्यांना कैद केले.झुल्फिकारखानला कळतांच तात्काळ चिटणीसांना बोलावुन त्यांची क्षमायाचना करुं लागला.बादशहा च्या फौजेत हा एकच असा यवन सरदार होता की,त्याला कपटाने वागणे आवडत नव्हते.चिटणीस कांही वर्षापुर्वी तुम्ही लिहिलेला गौरवपुर्ण आभाराचा खलिता अद्याप आमच्या स्मरणात आहे.त्याने चिटणीसांच्या पायाला औषधोपचार करण्याची व्यवस्था केली.
खानसाहेब आपला मोकळा व दिलदार स्वभाव पाहुन आपल्याशी राजकारण करावेसे वाटते.क्षणभर विचार करुन चिटणीस म्हणाले,खान साहेब!बर्याच वर्षापासुन आपण आमच्या महाराजांना वेढा देऊन बसलात,चंदी अजिंक्य आहे हे जाणतांच,जोपर्यंत महाराज किल्ल्यात आहेत,आम्ही किल्ला शर्थीने लढवुच!चंदी हस्तगत होत नाही म्हणुन बादशहा आपल्याला ठपका देत आहे.मला असे सुचवावेसे वाटते की, आपण राजाराम महाराजांना चंदीतुन सुरक्षितपणे जाऊ द्यावे म्हणजे किल्ला हस्तगत करतां येईल.
वास्तविक खानही त्रस्त झाला होता.चंदी काबिज केल्याशिवाय त्याची सुटका नव्हती.खान क्षणभर विचारमग्न झाला.म्हणाला माझी तयारी आहे पण एक मोठी अडचण आहे.मी महाराजांना असेच सरळ जाऊ दिले व बादशहाला कळले तर….शिर्के व मोहिते हे दोन मराठे सरदार खानाकडे होते.शिर्केला वळवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवुन, प्रथम महाराजांना सुचित करण्यासाठी चिटणीस चंदीकडे रवाना झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ४३.
वास्तविक चिटणीसांवर केवढा दुःखाचा डोंगर कोसळला होता.आदल्या रात्रीच त्यांना खबर मिळाली की,त्यांचा कर्ता सवरता मुलगा मृत्यु पावला.या दारुण दुःखाने त्यांनी खचुन जायला पाहिजे होते,पण चुकुनही बहिरवचा विचार मनात येऊ न देतां,खान सह्याय्यास तयार झाला ही आनंदवार्ता महाराजांच्या कानावर घालण्यास आतूर झाले होते.स्वामीकार्यापुढे प्रत्यक्ष पुत्र वियोगाच्या दुःखाची दिक्कत वाटली नाही.तो आत्मयज्ञ करुन मेला,देहाचे सार्थक झाले ही मनाची समजुत करुन दुःखाचा विचारच मनातुन काढुन टाकला किती अलोट मनोधैर्य!केवढी निस्सीम स्वामीभक्ती!!
इतक्या महिन्यांनी चिटणीस दृष्टीस पडताच राजारामांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.चिटणीसांनी सर्व हकिकत सांगीतल्यावर महाराजांना खानाशी केलेली मसलत पसंत पडली परंतु शिर्के मदत करतील?दादासाहेबांनी या शिर्के विरुध्द शस्र धरले होते,तो दंश त्याच्या मनी अद्याप जागृत आहे.ही गोष्ट जाणुन मुद्दामच खानाने शिर्क्याचं नांव पुढे केलं असावं,कारण खानाला जाणीव होती की आपल्यावर सूड उगवायचा असल्यामुळे शिर्के कधीच फितूर होणार नाही.
महाराज!प्रयत्न करायला काय हरकत आहे?त्याच्या थेट गोटात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न करतो.अहो चिटणीस!आज तुमच्यावर आभाळ कोसळलं!केवळ माझ्याकरिता मुलाला गमावुन बसलात,अशावेळी जायला कसं सांगु?महाराज!माझा बहिरव स्वामी कार्यास्तव शहीद झाला.थोरल्या महाराजांजवळ शपथ घेतली होती, आमच्या कुटुंबातील व्यक्ती स्वामीसेवेतच देह झिजविल!त्यांची प्रतिज्ञापालन करतांना माझ्या मुलाने देह ठेवला याची मला धन्यता वाटते.
बहिरववच्या मृत्युची बातमी कळतांच चिटणीसांच्या घरी आकांत उडला.चिटणीसांनी तिकडे लक्ष न देतां, राजारामांची आज्ञा घेऊन पुढच्या उद्योगाला लागले.पुत्रशोक करायलाही त्यांना अवसर नव्हता.हाती घेतलेले काम जोखमीचे होते.शिर्के जरी राजारामांचे मामा होते तरी,त्यांचा राग होता.संभाजी राजेंनी शिर्केची माणसे ठार केले होते. म्हणुन शिर्केनी भोसल्यांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करुन बादशहाचा आश्रय स्विकारला होता.
शिर्के लष्करानिशी कोणत्या बाजुला आहेत हा शोध घेण्यास हेरांना पाठवले.हरप्रयत्नाने शिर्क्यांना वळवले तरच स्वराज्य टिकेल व महाराजांवरचे संकट टळेल अन्यथा सर्वनाशच आहे. सायंकाळी हेरांनी शिर्के उत्तरेच्या बाजुस खंदकाच्या तोंडाशी तळ असल्याची बातमी आणली.खंदक ८०-८५ पुरुष खोल असल्यामुळे चिटणीसांनी पाळण्या द्वारे खाली उतरण्याचे ठरविले.या स्वराज्यसेवकाची ही कसोटीची वेळ होती.जागा अत्यंत भयाण होती.अशा बिकट मार्गाने कोणी येऊ शकेल ही कल्पना शिर्क्यानी स्वप्नातही केली नव्हती मोर्चे लावुन इतके वर्ष ते तिष्ठत होते. तोफा डागल्या तर गोळे इतक्या उंचीवर पोहचत नसत.उलट केव्हा केव्हा किल्ल्यावरुन दगडांचा वर्षाव झाला की, मोर्चे लावलेल्या सैन्याची त्रेधा उडत असे.
सर्व झाडींमधे लहान मोठ्या राहुट्या,बिचोवे,तंबु उभारलेले असून एका उंच जागेवर राणोजी शिर्क्यांचा मोठा डेरा होता.या शिर्के घराण्याशी शिवाजी महाराजांची सोयरीक होती.खुद्द राणोजीची चुलत बहिण सोयराशी शिवाजी महाराजांचा विवाह झाला होता. त्यांची मुलगी राजकुंवर,राणोजीचा पुतण्या गणोजीस दिली होती.आणि त्याची बहिण राणी येसूबाईचा विवाह संभाजीराजेंबरोबर झाला होता.केवळ राजकारण साधण्यासाठीच थोरल्या महाराजांनी हा सोईरसंबंध जुळवला होता.
राणोजी आपल्या डेर्यात बसले असतांना,नागोजी मानेला भाऊ मानल्या वर मीरा त्यांच्यासाठी अभयपत्र आणायला चंदीला जात असतांना सुभानजीने तीला पकडुन राणोजीकडे आणले.ती निर्भयपणे म्हणाली,ही मीरा आपली धर्मकन्या समजुन रक्षण करावे. नंतर तीने गेल्या नऊ वर्षात सुभानजी व बाजीने मिळुन तिला दिलेल्या त्रासाचे वर्णन केल्यावर सुभानजीला ५० आसुडाच्या फटक्यांची सजा फर्मावली.
मीरा राणोजीला म्हणाली,तुमची मी मुलगी या नात्याने कांही बोलण्याचा हक्क आहे का?जर माझी पायरी सुटुन
चुकुन कांही बोलल्या गेले तर राग नाही ना माणणार? बोल मुली,निःसंकोच बोल सरदारसाहेब!ही परतंत्रता आपल्याला सहन होते?मीरा!आम्ही ही परतंत्रता कां स्विकारली?या मराठेशाहीत अमच्या कुळाचा घात झाला,अपमान झाला. आमचं सर्वस्व गेलं.आपण म्हणतां तसं झालंही असेल,म्हणुन त्याची भरपाई पारतंत्र्याने होते कां?हा हिंदुस्थान हिंदुचाच ना?येथील हिंदुंचं स्वातंत्र्य हिंदुंना फसवुन जबरदस्तीने या परकी सत्तेने आपल्या ताब्यात घेतले.एका व्यक्तीच्या कृत्याने संतप्त होऊन शत्रूचं दास्य पत्करुन आपल्याच मायभूमीवर शस्र उगारणे कितपत योग्य आहे?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ४-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ४४.
राणोजी शिर्केसोबत मीराचे बोलणे सुरु असतांनाच एक मेणा त्यांच्या डेर्यासमोर आला.एवढ्या रात्री कोण होते मेण्यात?कोणी खान भेटीस आला असेलसे वाटुन मीराला आंत जायला सांगीतले.कोण खडो बल्लाळ चिटणीस? तुम्ही?होय!आलो आपल्या भेटीला.नंतर राणोजीचे सारे बोलणे चिटणीसांनी शांत पणे ऐकुन घेतले.सरदार साहेब!झाल्या गोष्टीची उजळणी करण्यात काय गम्य? संभाजीराजेंनी तुमचं शिरकान केलं,तसं आमचही नाही कां केलं?तुमच्या कुटुंबातील दोन माणसं मारलीत.परंतु आमच्या कुटुंबातील प्रत्यक्ष बाप,चुलता भाऊ यांना हत्तीच्या पायी दिले हे विसरलात का?आपण प्रतिज्ञा करुन अविंध्याची नोकरी पत्करली तसं करणं आम्हास अशक्य होतं का?परंतु आमच्या पुर्वजांनी थोरल्या महाराजांजवळ स्वराज्य रक्षणाची शपथ घेतली होती. सरदार साहेब!मराठेशाहीचं संरक्षण करणे आपलं सर्वाचच काम नाही कां? मुसलमानांनी सगळीकडे भ्रष्टाचार, अन्याय,अत्याचार मांडला.आपल्या कुलवंत आयाबहिणी नासवत आहे, हिंदुना जबरदस्तीने बाटवत आहे.हे उघड्या डोळ्याने बघावे कां? आपल्या स्वजातीय राजाची सेवा करण्याचे सोडुन मुसलमानांचे गुलाम बननं,त्यांचं अन्न खाऊन आपल्याच बांधवांचे गळे कापणं कितपत योग्य आहे?आपण महाराजांचे आप्त आहात.आपल्या भाच्याचं राज्य मातुलभाव स्मरुन सर्वांचे प्राण वाचवावे. जर भाच्याचा नाशच इच्छित असाल तर, आपल्याकडे महाराजांना घेऊन येतो.मग त्यांचं नी आमचं काय करायचं ते करा.
मोगलांचे दास म्हणवुन राजारामां चा सूड घेण्यापेक्षा,भाच्याला घरी बोलावुन खाजगीत त्यांना देहान्त प्रायश्चित देणं काय वाईट?उलट या संकट समयी योग्य उपाय योजुन कुटुंबा सह सुरक्षित बाहेर काढल्यास आपल्या मनाचा थोरपणा व स्वराज्यावर उपकार होतील.नुकत्याच मीराच्या बोलण्याचा किंचित परिणाम होत असतां,तेवढ्यात चिटणीस येऊन बोलल्याने राणोजीच्या मनावर चांगलाच परिणाम झाला.पण तो मानी,अहंकारी माणुस येवढ्यात हार पत्करायला तयार नव्हता.आम्ही जर तुम्हाला मदत करावीसी वाटत असेल तर,थोरल्या महाराजांनी आमचं दाभोळचं जे वतन तुम्हाला दिलं होतं ते आमच्या नांवे करावं.क्षणाचाही विलंब न करतां चिटणीस तात्काळ तयार झाले. केवढा हा स्वार्थत्याग?
तेवढ्यात कनातीचा पडदा सारुन मीरा बाहेर आली.तिने बहिरवजीच्या मृत्युची खबर दिली,जी त्यांना आधीच माहित होती.राणोजी आवाक झाले, त्यांची स्वामी निष्ठा बघुन.येवढा दुःखाचा डोंगर कोसळला असतांना हा माणुस इथे राजकारण करतोय!मनोमन त्यांना प्रणाम केला.राणोजी म्हणाले या कटात मोहित्यांनाही सामील करुन घ्यावं लागेल त्यासाठी राजारामांना सांगुन कुटेर गांव त्यांना दिल्यास सर्व जुळुन येईल.सगळी मसलत जुळल्यावर,सकाळच्या आंत वतनाच्या सनदा घेऊन येतो असे सांगुन चिटणीस बाहेर पडले.मीरा त्यांच्याबरोबर जायला निघाली.आप्पा!तुम्ही जसं शिर्क्यांना स्वराज्यरक्षणार्थ तयार केलं, तसच मी नागोजी मानेंना तयार केले असून महाराजांकडुन त्यांच्यासाठी अभयपत्र घेण्यासाठी येत असतांना तिच्यावर बेतलेली परिस्थिती सांगीतली.
संकेताप्रमाणे पाळण्याजवळ आल्यावर आधी तीला पाळण्यांत बसवले.खुण केल्याबरोबर पाळणा तटावर आला.तेथे राजाराम,पंतप्रधान, खंडेराव,दाभाडे, ही मंडळी चिटणीसांची वाट बघत होती.पाळणा वर येताच प्रथम मीराने राजारामांना मुजरा करुन म्हणाली चिटणीस मागाहुन येताहेत.शिर्के मदत करण्यास राजी झाले.गदगद होऊन राजाराम म्हणाले,मराठेशाही खंडो बल्लाळांचे उपकार कधीच विसरणार नाही.
थोड्याच वेळांत चिटणीस वर आले आणि महाराजांना सविस्तर वृत्त निवेदन केले.थोरल्या महाराजांनी,त्यांच्या अलोट कामगिरीबद्दल दाभोळचे वंशपरपरांगत दिलेले वतन केवळ आपल्या सुटकेसाठी दिलेले पाहुन राजारामांना गहिवरुन आले
नंतर सनदा,व पत्रे,तसेच नागोजीचे अभय पत्र तयार करुन राजचिन्हे उमटवली.शिर्के आणि मोहित्यांच्या सनदा व पत्रे घेऊन चिटणीस शिर्केच्या छावणीत जाण्यास निघाले.मीरा चिटणीसांच्या कबिल्यासोबत जाऊन जातांना नागोजीचे अभयपत्र देणार होती
चंदीहुन सुखरुप महाराज सातार्या च्या किल्ल्यात पोहोचले.सातारा ही स्वराज्याची राजधानी केली.सातारा किल्ला हा विशाळगड,पन्हाळगड, सिंहगड इत्यादी मजबूत किल्ल्यांच्या मध्यभागी असून कोकण प्रांतावरही दाब ठेवता येत होता.संकटसमयी ज्यांनी जीव धोक्यात घालुन स्वराज्याचे रक्षण केले त्या सर्वांचा यथा योग्य गौरव केला.खंडो बल्लाळ चिटणीसांनी केलेल्या अलौकिक स्वार्थत्यागाबद्दल त्यांना चौल प्रांती वतानाचे इनामपत्रे दिली.तसेच परशुराम त्र्यंबक,शंकरजी नारायण, आटोळे,दाभाडे,बडगर,पवार,पाटणकर, भोसले,महाडी अशा मोठ्या सरदारांचा मोठा सन्मान केला.आणि मीराच्या इच्छे नुसार तिच्या गांवी तुळापुरला सशस्र हेटकर्यांबरोर रहायला गेली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
अंतिम भाग – ४५.
महाराज चंदीवरुन सातार्यास आल्यावर,मराठेशाहीची सातारा गादी म्हणुन जाहीर केल्यावर राज्यकारभारा ला सुरुवात होताच राज्यातील अव्यवस्था राजारामांच्या लक्षात आली. त्यांनी चंदीला असतांना वतने व जमीनी जहागिर्या वाटल्यामुळे गोंधळ उडाला होता.यामुळे त्यांनी नवीन फर्मान काढुन नवीन दिलेली वतने रद्द केली.फक्त थोरल्या महाराजांच्या वेळचीच सुरु असलेली वतने तेवढी कायम ठेवलीत. आतांपर्यत राजाराम चंदीला असल्यामुळे त्यांना शत्रूबरोबर युध्दप्रसंग करण्याची संधी मिळाली नव्हती,पण आतां सर्व थरातील सरदारांना जमवुन मोगलांशी लढण्याचे ठरवल्याने मराठ्यांमधे उत्साह निर्माण झाला.संभाजीराजेंच्या वधा पासुन शत्रूला सतावुन जोखता आले. राजारामांनी सातार्याला गादी स्थापतांच एकापेक्षा एक पराक्रमी मराठे मोगलांशी लढण्यास अहमहमिकेने पुढे सरसावले.
संताजी दिवंगत झाल्यावर रुपाजी, बाबाजीनी स्वतःच्या जोखीमीवर मुलूख गिरी करुन आमराणान्त स्वराज्यसेवा करण्याचे ठरविले.संताजींचा कबिला नारोजींनी सुरक्षित कापशीला पोहचविला.संताजींचे पुत्र राणोजी व पिराजी स्वतंत्रपणे मुलूखगिर्या करुं लागले.महाराज स्वतः मुलूखगिरीवर निघत असल्याचे कळतांच हे सर्वजण तसेच परसोजी भोसले,हैबतराव निंबाळकर,नेमाजी शिंदे,आटोळे या सर्व सरदारांनी प्रथम बादशहावर हल्ला करुन बाळराजे शिवाजींना सोडवण्याचा प्रयत्न केला,परंतु ते बेगमच्या गोटात असल्या मुळे स्वाधीन झाले नाही.तेथुन महाराज गंगथडीस निघाले,तेथे चौथाई आणि सरदेशमुखी वतनं घेतली.वर्हाडात परसोजी भोसले,खानदेशला नेमाजी शिंदे,बागलणात खंडेराव दाभाडे आणि गंगथडीस हैबतरावांना वसूली गोळा करण्यासाठी नेमुन दिले.तिथुन येतांना जालना शहर लुटीत असतां,एकाएकी मोगल फौज अंगावर आल्यामुळे लूट तशीच सोडुन परत फिरावं लागलं.वाटेत एकाएकी महाराजांची प्रकृती बिघडली. अंगात ज्वर भरल्यामुळे तातडीने त्यांना सिंहगडावर नेण्यांत आले.
तुळापुरला मीरा संभाजीराजेंच्या समाधीजवळ राजाराम महाराजांच्या प्रकृतीस आराम मिळण्यासाठी प्रार्थना करीत असतां,तेवढ्यात सुभानजी व बाजी कदम येऊन तिच्याशी असभ्य वर्तन करीत असलेले पाहुन,तिच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन हेटकर्यांचे बाण दोघांच्या छातीत घुसुन त्यांचा अंत झाला.कोंडोभटाला तर खुद्द महाराजांनी च आजन्म अंधारकोठडीची सजा दिलेली होती.अशा तर्हेने मीरेच्या मार्गातील शत्रूंचे पारिपत्य झाल्यावर मीरावरची संकट परंपरा संपली.पुढे तिने शेवटपर्यंत समाधीच्या सानिध्यात दिवस घालवले.
राजाराम महाराजांना सिंहगडला नेल्यावर त्यांच्या छातीत विकार होऊन उलट्या सुरु झाल्या व नंतर नवज्वर होऊन त्यांचा अंत झाला.राजारामाच्या निधनाची बातमी विशाळगडी पोहताच त्यांची तिसरी पत्नी अंबिकाबाई सती गेल्या.राजाराम महाराजांची छत्री सिंहगडला असून थोरल्या महाराजांचा नित्य पुजेच्या बाणाची पण स्थापना सिंहगडलाच केली.
त्यावेळच्या परिस्थितीत मराठे सरदारांच्या अंगची हिंमत,दरारा जो जगा पुढे निदर्शनास आला त्याचा मूळ उगम राजारामांच्या वेळेसच झाला होता.त्या वेळची परिस्थिती जरी तशी होती तरी कांही अंशी राजारामांचे गुणही पुष्कळ अंशी कारणीभूत झाले.वास्तविक पाहतां राजारामांची कारकिर्द म्हणजे कर्ती माणसे निपजविण्याची उत्तम खाण, स्वराष्र्टाभिमान शिकवण्याची उत्तम शाळा,आणि पराक्रम व किर्ती गाजवण्या ची उत्तम रंगभूमी असेच म्हटले पाहिजे. राजाराम महाराजांनी त्यावेळी स्वराज्य बचावाकरितां जी सरंजाम पध्दत सुरु केली होती व त्यामुळे स्वराज्यात बेबंदशाही माजली होती, परंतु त्यावेळी ती काळाची गरज होती,त्याशिवाय पर्यायच नव्हता.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं,त्या स्वराज्यावर संभाजी राजेंनी कळस चढवला,त्यानंतर भयंकर आपत्ती कोसळली असूनही राजारामांनी स्वराज्याचे परिवर्तन केले.आणि त्याच पराक्रमामुळे आज मराठ्यांचे नांव इतिहासात गाजत आहे.
अशा या तिसर्या छत्रपती राजाराम महाराजांना कोटी कोटी प्रणाम!!!
!! समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. ४-६-२०२१









