आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग ११, (५१ ते ५४)
कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ५१.
अतिशय दुःखी अंतःकरणाने कृष्णा ला म्हणाला,म्हणजे तूं आपला अवतार संपवणार?अरे!आजपर्यंत क्षणभरही तुझे चरण सोडुन दूर झालो नाही.तुझ्या सर्व मंगलकारक लिला प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहुन,कानांनी ऐकुन तृप्त झालो.तुझा ‘वियोग” ही कल्पनाही करवत नाही रे… अरे!तुझ्याशी एवढा तदृप,एकजीव झालो की,तुझ्यावाचुन क्षणभरही जिवंत राहु शकणार नाही.परमेश्वरा! तुला थोडीही दया येत नाही का रे? तूं दयाळु होऊन मलाही सोबत ने रे!तूं खरच कां सोडुन जाणार? अवतार संपवणार?
उध्ववा!शांत हो!आणि मी जे कांही सांगतो ते लक्षपुर्वक ऐक.असे म्हणुन श्रीकृष्णाने त्याला ब्रम्हज्ञानाचा उपदेश केला.ऊध्ववा!मी सर्व भूतांच्या ठीकाणी अंतर्बाह्य भरुन आहे हे समजुन स्वतःच्या अंतःकरणांत माझे स्वरुप ओळखाण्याचा प्रयत्न कर! हे महाप्रज्ञा उध्ववा!अखिल भूतांच्या ठायी माझी भावना करुन सम दृष्टीने वागल्यास ज्ञानरुपी दृष्टी प्राप्त होऊन समतेने वागण्याचा प्रयत्न कर,या मुळे परब्रम्हाचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्या वर,संशयाचा निचरा होऊन सर्व जग ब्रम्हमय भासु लागेल.क्षणभंगूर देहाने,नित्य, अव्यय अशी माझी प्राप्ती करुन घेणेच या धर्माचे मुख्य उद्दीष्ट आहे.
ऊध्ववा! तुला ब्रम्हविद्येचा सर्व मतितार्थ सांगीतला आहे.तेव्हा तुझ्या अंतःकरणातला शोक,मोह विकार दूर झाले असावेत.उध्ववा हा उपदेश फक्त जो सच्छिल,पवित्र व ज्याची माझ्यावर निष्ठा,श्रध्दा आहे त्यालाच सांग!उध्ववाने श्रीकृष्णाच्या चरणांवर नतमस्तक होऊन अनन्य भक्तीभावाने म्हणाला,हे यदुश्रेष्ठा! माझा मोह अंधकार पुर्णपणे नाहिसा झालाय!मी तुला शरण आलो.माझ्यावर फक्त एकच अनुग्रह कर,एक शेवटची विनंती की,तुझ्या चरणकमळाची भक्ती सतत लाभावी!तथास्तू….तु बद्रीकाश्रमी जाऊन लोकांना बोध मिळावा या हेतूने, सर्व सुखाचा त्याग व निःस्पृह,सद्वर्तन व इंद्रियदमन करुन शांती धारण कर!बुध्दी स्थिर करुन ज्ञान विज्ञानाचा विचार करुन,आजपर्यंत जे कांही माझ्याकडुन शिकलास त्याचे एकांतात परिशिलन करुन लोकांपर्यंत पोहोचव.हेच “भागवत” किंवा ऊध्वगीता म्हणुन प्रसिध्द होईल. उध्ववाने भगवान श्रीकृष्णाच्या पायावर अश्रुंचा अभिषेक केला.पण लगेच स्वतःला आवरुन उठुन उभा राहिला. श्रीकृष्णाला सोडुन जाववेना.अखेर त्याच्या पादुका छातीशी कवटाळुन सरळ बद्रीकाश्रमाचा रस्ता धरला.
इकडे दुर्वास ऋषींच्या शापानुसार दुसरे दिवशी सांबाला खरोखरच मुसळ झाले.सर्व यादव घाबरले,पण श्रीकृष्णा कडे जाण्याचे धाडस कुणालाच नसल्या मुळे,त्यांनी ही वार्ता वासुदेवाला सांगीत ल्यावर,त्या मुसळाचे चुर्ण करुन समुद्रात फेकण्यास सांगीतले.त्याचवेळी अनेक उत्पात घडु लागले.यादवांचे मदिरापान, अनाचार,स्वच्छंद वर्तन वाढु लागले.स्रीया ही बहकल्यात.यादवांच्या आणि स्रीयांच्या अनाचाराने श्रीकृष्ण उद्गिन्न झाला. पण हे सर्व अनर्थ त्यानेच उत्पन्न केले असल्यामुळे त्यांना प्रतिकार करणे अशक्य होते.
वृध्दांना व मुलांना शंखोद्वारास व बाकी सर्व श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार प्रयासतिर्थी जायचे ठरले.दुसरे दिवशी (कार्तिक वद्य) अमावस्या व सूर्यग्रहण होते.शहरांत होणारे उत्पाद व हा कुयोग मनांत आणुनच श्रीकृष्णाने सर्वासह प्रभासतीर्थी जाण्याचा सल्ला दिला होता. सर्व यादव सरस्वती नदी समुद्राला मिळते त्या प्रभासतीर्थावर पोहोचले.तिथे सर्वांनी पर्वस्नान केले.ब्राम्हणांना विपुल दान केले नाना तर्हेचे भक्ष्ये,मेजवानी,नाचगायन, मद्यपान सुरु झाले.द्वारकेत जरी मद्याला बंदी असली तरी इथे नव्हती.मैश्यक मद्य अतिशय उत्तेजित असल्यामुळे सर्वांच्या बुध्दीवरचे कंट्रोल जाऊन ते इतके उन्मत्त बेभान झाले की,त्यांना कशाचेही भान न राहिल्याने एकमेकांचे जुने उखाळे पाखळे काढु लागले. सात्यकी व कृतवर्मा ची चांगलीच जुंपली.व त्या भांडणांत दोन्ही कडच्या लोकांचे व त्या दोघांचाही वध झाला.चोहोकडे आसपास काटाकाटी सुरु झाली.नशेत ना बंधु,ना मित्र पाहिले.हजारो यादव-भोज एकमेकाशी लढुन मरण पावले.त्यांच्या जवळची शस्रे संपल्यावर समुद्र किनारी ऊगवले ल्या लव्हाळ्यांनी एकमेकांवर वार करुं लागले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ५२.
ते उगवलेले लव्हाळे म्हणजे,सांबा ला झालेल्या मुसळाचे जे चुर्ण समुद्रात फेकले होते,त्यापासुन लव्हाळ्याच्या रुपात शस्र तयार झाले.त्या वज्रासारख्या लव्हाळ्यांच्या आघाताने शेकडो यादव गतप्राण झाले.उरलेल्या लोकांना कृष्णाने ऊपदेश करुन समजावण्याचा बराच प्रयत्न केला,पण मद्यांध आततायी लोकां नी या दोन भावांनाच शत्रु समजुन त्यांना ठार मारण्यास प्रवृत्त झाले.ब्रम्हपाशाने व श्रीकृष्णाच्या मायाजालाने मोहित झालेले त्या लोहयुक्त लव्हाळ्याने आपपसांत मारामारी करुन,पांच लक्ष यादव,भोज, वृष्णी,अंधक वीर मरण पावले.श्रीकृष्णा ने स्वतःच स्वतःच्या यादव कुळाचा पृथ्वी वरचा भार कमी केला.आणि पृथ्वीला दिलेले वचन पुर्ण केले.
आतां अवतार समाप्तीला कुठलेही अवधान,प्रत्यावय राहिला नाही.भगवान म्हणुन श्रीकृष्ण पृथ्वीच्या वचनातुन मुक्त झाला,पण मानव देहातील कृष्ण अत्यंत उद्गिन्न झाला होता. त्याने त्याचा सारथी दारुकाला बोलावुन,ही घडलेली हकिकत हस्तिनापुरला पांडवांना कळविण्यास सांगीतले.तसेच अर्जुनाने इथे येऊन यादव स्रीया व मुलांना हस्तिनापुरास घेऊन जावे.दारुकाने श्रीकृष्णाला जड मनाने नमस्कार करुन आज्ञेनुसार,आयु ष्यात प्रथमच श्रीकृष्णाविना रिकामा रथ घेऊन हस्तिनापुरच्या मार्गाला लागला.
इकडे श्रीकृष्णाने प्रभासक्षेत्री जिवंत राहिलेल्या यादवांच्या स्रीया,मुले गोळा करुन द्वारकेला पाठवले.बलराम सह तो ही द्वारकेकडे निघाला.पण बलराम शहरांत न जातां जंगलाकडे निघाला,जातांना श्रीकृष्णाला म्हणाला,मी वनांत जाऊन योगबळाने प्राण अवरोध करुन हा लोक सोडणार आहे.जा…दादा जा…मी ही मात्यापित्यांचा निरोप घेऊन तिकडेच येतो व याच पध्दतीने या मानवी देहाचा त्याग करतो.दोघांचेही आपले इथले कार्य पुर्ण झाले आहे.अति वृध्दावस्था व पयारीवश झालेले,अद्यापही जिवंत असलेल्या आपल्या वृध्द मातापिता वासुदेव-देककी महालात जाऊन कृष्णाने दोघांच्याही चरणांवर मस्तक ठेवले.अर्जुना बोलवायला दारुक गेला आहे.तो येई स्तोवर जिवंत राहिलेल्या स्रीया व मुलांचे रक्षण करा.बलरामदादा वनात जाऊन योगबलाने प्राणावरोध करीत आहे.मी ही त्याच मार्गाने जाऊन हा लोक सोडतोय, एवढे बोलुन परत नतमस्तक होऊन,मागे वळुनही न पाहतां तडक वनाच्या दिशेने निघुन गेला.त्यावेळी घरांघरांतुन रडण्या च्या,हुंदक्यांच्या आवाजाने सर्व शहर शोकग्रस्त झाले होते.पण आतां तो या सर्वाच्या पलिकडे गेलेला निश्चल मनाने बलरामाच्या दिशेकडे गेला.बलरामाचे निर्वाण बघुन मनातुन थोडा खिन्न झाला, पण क्षणभरच….
नंतर श्रीकृष्ण भालका तीर्थावरच्या अरण्यात एका अश्वत्थ(पिंपळ) वृक्षा खाली परधामाला जाण्याचा निश्चय आणि गांधारीने दिलेला शाप खरा ठरविण्यासाठी… इंद्रिय,वाणी व मनाला सर्वथा बंध घालुन ब्रम्हासानात डोळे मिटुन शांतपणे बसला असतांना त्याच्याच प्रेरणेने मृगयासाठी हिंडणार्या एका जरा नावाच्या व्याध्याने,भिल्लाने दुरुन दिसणार्या त्याच्या पायाचा तळवा मृगाचे तोंड समजुन,नेम धरुन मारलेला बाण त्या लालसर नाजुक सुंदर तळव्यात घुसल्या ने रक्त ओघळु लागले.शिकारी जवळ आल्यावर त्याने श्रीकृष्णाला ओळखले. हाय हाय हे काय विपरीत घडले?भगवान भगवान….म्हणुन शोकाकुल होऊन मटकण खालीच बसला.त्याचा विलाप एकुन श्रीकृष्णाने डोळे उघडुन,हसुन म्हणाला,अरे, एकलव्या! अरे यादव हे यादवाच्या हातुनच मरणार हे विधिलिखित आहे.मी यादव व तुही यादव,तू माझा चुलत भाऊ आहेस.देवा! हे कसं बरं शक्य आहे?
श्रीकृष्ण म्हणाला,माझ्या एका चुलत्याला अनेक मुलगे होते.चुलत्याचा एक जिवलग हिरण्यगर्भ नांवाचा निषाद मित्राला जन्मतःच एक मुलगा दिला होता तोच तू…एकलव्य…अचुक बाणाने वेध करणारा म्हणुन द्रोणांनी तुझा अंगठा मागीतल्यावर क्षणाचाही विलंब न लावतां गुरुदक्षिणा म्हणुन देणारा,पण जगाला अज्ञात असणारी पण द्रोणांना व मलाच माहित असलेली गोष्ट म्हणजे तुं बाण सोडतांना अंगठ्याचा उपयोग न करतां चार बोटांनीच बाण मारणारा तो तूं एकलव्य आहेस…,
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ५३.
एकलव्या! आज तूं मुक्त झालास.. सदेही स्वर्गात जाण्याचा त्याला आशिर्वाद दिला.तो गेल्यावर,श्रीकृष्णाने मनासहित निरोध करुन समाधिस्त झाला आणि क्षणांत त्याचा आत्मा देहत्यागुन अनंतात विलिन झाला.यादवांची यादवी संहाराची आणि बलराम-श्रीकृष्णाच्या निधन वार्ता दारुकाकडुन पांडवांना कळल्यावर त्यांना अतिव दुःख झाले.श्रीकृष्ण सखा अर्जुन द्वारकेला पोहोचल्यावर,आतांपर्यत आवरुन धरलेला शोकावेग अर्जुनाला पाहुन अनावर झाला.कठोर काळजाच्याही व्यक्तीचे पाणी व्हावे असा तोआक्रोशावेग पाहुन अर्जुनाचे ह्रदय शतशः विदिर्ण झाले.दुःखावेगाने श्रीकृष्ण…श्रीकृष्ण म्हणत मूर्च्छा येऊन पडला.
थोड्या वेळाने सावध झाल्यावर कसेबसे उठुन मामा-मामीं अत्यंत वृध्द व पुत्र शोकाने गलितात्र होऊन खिळलेल्या वासुदेव देवकीच्या भेटीला गेल्यावर त्यांची गलितात्र अवस्था पाहुन अर्जुनाचे ह्रदय गलबलुन गेले.त्याने वासुदेवाचे पायावर मस्तक ठेवल्यावर,आशिर्वाद देत म्हणाला,ज्यांनी हजारो शत्रु जिंकले,ते सर्व वृष्णीवीर,यादव,पुत्र,पौत्र,मित्र,ज्ञाती, बंधु सर्वांच्या निधनानंतर श्रीकृष्ण इथे येऊन म्हणाला,अर्जुन म्हणजे मीच असे समजावे.तो इथे येऊन तुमची व्यवस्था लावुन देईल.अरे! अर्जुना,माझ्या प्रिय, लाडक्या पुत्राचे,योगेश्वर,पुरीषश्रेष्ठाच्या स्वर्गारोहनाची वार्ता ऐकुनही मी अद्याप जिवंत आहो हे आश्चर्य नाही का?
बरेच दिवसांपासुन अन्न वर्ज्य करुन तुझ्या आगमनाची वाट बघत होतो.आतां एखाद्या दिवसाचाच सोबती आहे.या शून्य नगरीत क्षणभरही राहवत नाही. श्रीकृष्णपुत्र अनिवृध्दाचा पुत्र व्रज यास यादवांच्या राज्यावर बसवुन तुम्हा सर्वांना इंद्रप्रस्थाला नेऊन तीथे तुमची व्यवस्था करतो.येत्या सात दिवसांत सर्व तयारीनिशी आपण निघणार आहोत.रात्र भर अर्जुनाला झोप नाही आली.श्रीकृष्ण व त्याच्या जीवनातले सर्व गोष्टी त्याच्या नजरेसमोर चलचित्राप्रमाणे सरकु लागले.त्यालाही पृथ्वीवरचे जीवन लवकर संपवुन त्याच्या भेटीला जाण्याची त्याला घाई झाली.
पहाटेच्या सुमारास पुत्रशोकाने वासुदेवाने या जगाचा निरोप घेतला. द्वारकेतील उरलेले प्रजाजन अंत्ययात्रेला सामील झाले.वासुदेवाचा मृतदेह रत्न जडीत ठेवलेल्या शिबिकेच्या मागुन देवकी,भद्रा,रोहिणी,मंदिरा त्यांच्या सुना व इतर स्रीया चालत होत्या.वासुदेवाला अत्यंत प्रिय असलेल्या स्थळी अग्नि संस्कार झाला.त्यांच्या चारही राण्यांनी सहगमन केले.लव्हाळ्याची मुसळे बनुन जिथे एवढा घोर विनाश,नरसंहार झाला, ब्रम्हपाशाचा येवढा भयंकर परिणाम झाला,भोज,अंधक,यादव, आपापसात लढुन विनाश पावले त्याठीकाणी अर्जुना ने त्या सर्वांच्याच योग्यतेनुसार अग्नी संस्कार केल्यावर,बलराम,श्रीकृष्णाचा देह जिथे होता तिथे गेल्यावर,योगमग्नाव स्थेतील बलरामाचा पार्थिव देह दिसला. थोड्याच अंतरावर एका अश्वस्थ वृक्षा खाली, अर्जुनाचा सखा,सकल तत्वनेता योगाचा प्रणेता महायोग निद्रेत,शरीरा वरचे तेज,मुखावरची अलौकिक कांती विलसत असलेला अर्जुनाचा सर्वस्व असलेला श्रीकृष्ण,व्याधाने मारलेला बाण त्याच्या सुकुमार नाजुक पाऊलात तसाच रुतुन बसलेल्या अवस्थेत पाहुन त्याचा धरबंध सुटला व अतिशय शोकमग्न झाला असतां त्याच्या कानी आवाज गुंजला,अरे पार्था! कशासाठी हा शोक?अरे!मी कोण? व तूं कोण हे जाणतोस ना?ज्या कार्यासाठी आपण पृथ्वी वर अवतलो होतो ते कार्य आतां संपले आहे.
“यदा यदा हि भर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्यानम् धर्मस्य तादात्मानं सृजाम्यहम्।” तू ही आतां लवकरच येशील.अर्जुन भानावर आला.राम-कृष्णा च्या आत्याकरवी त्यांच्या देहाचा अंतिम अग्निसंस्कार केला.रुख्मिणी,शैल्या, हेमवती व जांबवंती यांनी सहगमन केले. सत्यभामा व दुसर्या स्रीया तपश्चर्ये करितां वनांत निघुन गेल्यात.
सातव्या दिवशी सर्व शोकाकुल स्रिया,मुले व उरलेले लोकं संपत्तीसह हस्तीनापुराकडे रवाना झाले.मार्गात पंच नद नामक समृध्द देश लागला.तिथे पार्था सहित सर्वांनी थोडावेळ मुक्काम केला. पण…..
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!!
!!! श्रीकृष्ण !!! अंतिम भाग – ५४.
दैवच फिरले होते.तिथे आभीर नामक रानटी लोकांची वस्ती होती. एवढ्या मोठ्या संख्येत असणार्या स्रियांच्या रक्षणार्थ एकटा अर्जुनाला पाहुन,त्या जमातीने स्रीयांचे हरण सुरु केले.पार्थाने जे गांडीव धनुष्य आजपर्यंत सहजतेने पेलत होता, ते धनुष्य विलक्षण जड झाले बाहुतले सामर्थ्य एकाऐकी नष्ट होऊन निर्जिव झाले.एकही अस्र आठवेना. सोबतचे यादव त्या दस्युशी लढत होते, पण त्यांचा टिकाव लागेना.अनेक यादव स्रीयांना दस्युंनी हरण करुन नेले.
आपले बाहु ऐनवेळी निर्जिव झाले. हा सर्व दैवाचा खेळ-दुर्विलास आहे हे त्याच्या लक्षात आले.उरलेल्या स्रीया व यादवांना संपत्तीसह एकदाचा अर्जुन कुरु क्षेत्री पोहोचला.तिथल्या मर्तिकावत नगरा तील हर्दीक्याच्या मुलाला राज्यावर बसवुन उरलेल्या भोज स्रीयांना तिथे ठेवले.मग वृध्द,बालक आणि बाकीच्या स्रीयांना तो राजप्रस्थाला आला.सात्यकी चा पुत्र योयुपादीला सरस्वतीकाठच्या प्रदेशाचा अधिकारी बनवुन त्याच्या आप्तांना त्याच्या सुपुर्द केले.
श्रीकृष्णाचा नातु ब्रजला इंद्रप्रस्थाचे राज्य देऊन द्वारकेहुन आणलेले प्रजाजन त्याच्या स्वाधिन केले.ही सर्व व्यवस्था लावल्यावर गंगातीरी असलेल्या व्यासांकडे जाऊन,घडलेला सर्व वृतांत कथन करुन,अर्जुनाने आपल्या मनातील शंका, पंचनद प्रदेशात अनपेक्षीत,अघटीत घटना माझे बाबतीत कां घडली असे विचारले असतां,महर्षी व्यास म्हणाले, पार्था शांत हो!जे घडले ते भवितव्य होते. विधिलिखित तसेच होते.
तुझा जिवलग सखा,श्रीकृष्ण साक्षात नारायण होता.पृथ्वीवरचा भार उतरवल्यावर त्याचे अवतार कार्य पुर्ण झाले.आणि मानवी देहाचा त्याग करुन स्वस्थानी निघुन गेला.तुम्ही सर्व बंधु ज्या कार्यासाठी अवतरले होतात ते कर्म संप ल्यामुळे तुमचे सामर्थ्य क्षीण झाले.अस्रां ची गरज संपल्यामुळे त्यातील शक्ती निघुन गेली.महर्षी व्यासांनी केलेला खुलासा व उपदेश ऐकुन त्याच्या मनांती ल शंका निमाल्या,मन शांत झाले.वंदन करुन तो हस्तिनापुरास परत आला.
इकडे युधिष्ठीर,पांडवादींना यादव विनाशाची व श्रीकृष्णाच्या परमधाम गमनाची बातमी कळली तेव्हा त्यांच्या शोकाला पारावार राहिला नाही.त्यांनी सुध्दा अभिमन्यु पुत्र परिक्षिताला गादीवर बसवुन,धृतरष्र्टपुत्र युयुत्सूला त्याच्या सेवे साठी नियुक्त करुन सर्वांनी हिमालयाकडे प्रस्थान केले.हिमालय ओलांडुन मेरु पर्वताकडे जात असतांना मार्गातच क्रमशः द्रौपदी,सहदेव,नकुल,अर्जुन आणि भीम आयुष्याची दोरी तुटल्याने मृत्युमुखी पडले.एकटे धर्मराज आपल्या श्वानासह सदेह स्वर्गात पोहोचले.
श्रीकृष्ण कोण होता,हे जन्मदात्री देवकीला,पिता वासुदेवाला,जन्मभर साथ करणार्या बलभद्राला,ज्यांना गुरु मानले त्या सांदीपानी,घोर अंगिरस,ज्याला जलतत्वाचे पुरुष मानले त्या पितामह भीष्मास,आणि दानवीर कौंतेय कर्णाला, ज्यांनी पालनपोषण केलेल्या चित्रसेन आजोबा,यशोदा,नंद, एवढच कशाला आत्या कुंती या सार्यांना तरी कळला का? खरेच कौरवमाता गांधारीच्या कठोर शापाने श्रीकृष्ण संपणार होता कां?ज्यांना त्याने सखे आणि सख्या मानले त्यांना तरी नेमका कृष्ण कोण हे कळले का?ज्या पांडवांना सतत पाठीशी घातले त्यांना तरी श्रीकृष्ण कोण कळले कां? इतरांच राहु देत,पण! ज्याला एवढी समृध्द गीता एकवली,आपल्या लौकीका चा परमप्रिय सखा म्हणुन गौरवले त्या धनुर्धारी अर्जुनाला तरी त्याच्या जीवना च्या आयामाचं नीट दर्शन झालं का?एवढंच कशाला, गेली तीन तप पडेल ती अखंड सेवा करणार्या उध्दवाला तरी नीट कळला कां? थोडंफार कळलं असेल ते फक्त रुख्मिणीलाच… ज्यावेळी ज्याला कुणाला थोडा तरी समजेल तो आर्यवर्ता चाच नव्हे तर,सर्व विश्वातील तो दिवस सोन्याचा असेल.
हेच श्रीकृष्णाचे खरे स्वरुप आहे. त्याच्या चरणी शरणागत होऊन निश्चल प्रिती असणार्यांना मिळणारे सुमधुर फळ आहे.श्रीकृष्ण नित्य आहे.आजही तो आपल्या भक्तांना दर्शन देऊन,त्यांच्या बरोबर क्रीडा खेळुन आनंद देतो.
आपणसुध्दा इच्छिले तर,त्याच्या अभयचरणी शरणागत होऊन सदैव निर्भय होऊ शकतो
!!श्रीकृष्णार्पणमस्तु।ॐश्रीपरमात्मने नमः!!
!! समाप्त !!
मिनाक्षी देशमुख.













