आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भागः-3 पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)
पितामह भीष्माचार्यः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण २५ भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या ५ भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography
पितामह भीष्म संपूर्ण चरित्र
भीष्म
भागः-११
पांडुराजाने दिग्विजय करुन आणलेले धन धृतराष्टाच्या सल्ल्याने भीष्म, सत्यवती व विदुर यांच्यात वाटुन टाकले. सत्यवतीने आपलं धन भीष्मांना दिले, भीष्मांनी ते आणि स्वतःजवळचं सर्व धन तिर्थयात्रिकांच्या व्यवस्थेसाठी पाठवुन देऊन या निमित्याने रिक्त होऊन साधनेत निमग्न झाले. त्यांनी जेष्ठ बंधु व्यासांची आठवण काढल्याबरोबर ते हस्तीनापुरात प्रगट झाले. भीष्म आणि व्यासांची प्रारब्ध, संचित, संकल्प माया या विषयावर दीर्घ चर्चा झाल्यावर एकाकी जीवन कंठणार्या भीष्मांना थोडं चैतन्य आल्यासारखे वाटले. नंतर व्यास गांधारीला भेटायला गेले असतां तीच्या इच्छेनुसार १०० पुत्रांचा आशिर्वाद दिला.
पांडुराजा कुंती, माद्रिसह शिकारीला वनात गेल्याचे कळल्यावर त्या दिव्य पुरुषाचं मुखारविंद काळं पडलं. त्यांना चिंतेने ग्रासलं. कोणाशी कांही न बोलता तडक निघुन गेले.
पांडू शिकार शोधत असतां त्यांनी मैथुनमग्न हरणांच्या युगलांची शिकार केली. पण ती हरणं नव्हती तर महायोगी किंदम ऋषी होते. त्यांचे सुख हिरावल्यामुळे संतप्त होऊन “तु जेव्हा स्रीसंग करायचे मनात आणशील त्या क्षणी काळ तुझी शिकार करेल” असा शाप देऊन गतप्राण झाले. ही गौष्ट महद्गतीने भीष्मांना कळल्यावर त्यांचे अवसानच गेलं.
काम किती प्रभावी असते याचं जिवंत उदाहरण म्हणजे पिता शंतनू, पुर्वजन्मीचे इक्ष्वाकु कुलोत्पन्न नरेश ! त्यांनी शत अश्वमेध यज्ञ करुन इंद्रलोक प्राप्त झालेले, पण वासनेनं त्यांना खाली आणलं. नंतर सत्यवतीशी विवाह, विचित्रविर्याच विषयाकर्षन, महर्षी विश्वामित्र-मेनका, त्याना झालेली मुलगी शकुंतला ! शकुंतला भरतकुलाची आदिमाया पण राजा दुष्यतांनी केलेला त्याग असे उदाहरणं भीष्मांच्या नजरेसमोरुन तरळुन गेले.
निर्विकल्प समाधीचा आनंद घेणार्या योग्याला ब्रम्हरंघ्रातल्या दिव्यरसामुळे भुकेवर विजय मिळवता येत असेल पण कामतृष्णेवर नाही !
पांडु शापदग्ध झालेवर कुंती माद्रीसह त्यांनी वनवास पत्करल्यामुळे धृतराष्ट्र भरतकुलाच्या सिंहासनावर बसले. अशातच गांधारी गर्भवती झाल्याचे कळल्यावर तर धृतराष्टांना गगन ठेंगणे झाले, पण त्यांचा आनंद टिकला नाही. कारण पांडुना पुत्ररत्न झाल्याचे कळल्यावर आनंदावर विरजण पडले. इकडे गांधारी कक्षात येऊन बेभान होऊन संतापाने पोटावर हाताने ताडण करु लागली. अति रक्तस्राव होऊन मांसाचा गोळा बाहेर आला. ती तो गोळा बाहेर फेकणार एवढ्यात तीथे व्यास प्रगटले. त्यांनी कमंडलुतुन अभिमंत्रीत जल हातात घेऊन सृष्टीनिर्मात्या ब्रह्माच स्मरण करीत मासाच्या गोळ्यावर शिंपडल्याबरोबर त्याचे १०० भाग झालेत. उरलेल्या मासांचा शेष भाग एकत्र करुन १०१ भाग धृताने भरलेल्या वेगवेगळ्या कुंभामधे ठेवले.
व्यासांच्या आशिर्वादाने गांधारीला १०० पुत्र व एक कन्या झाली. परंतु कुंतीपुत्र जेष्ठ असल्यामुळे सिंहासनावर त्याचाच हक्क असेल म्हणुन धृतराष्ट व गांधारी खिन्न झाले. पहिल्या कुंभातुन आलेला बालक गर्दभाच्या स्वरात ओरडु लागला. कुत्री, भेकरं भयानक आवाज करु लागले. हा अपशकुन पाहुन विदुरांनी निर्भयतेने या मुलाचा त्याग करण्याचा धृतराष्ट गांधारीला सल्ला दिला. पण त्यांचे प्रथम अपत्य असल्यामुळे पुत्रमोह आवरुं शकले नाही.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भागः-१२
दुर्यौधन आणि भीम एकाच दिवशी जन्मास आलेत. घटका आणि ग्रह भिन्न होत्या. दोघांच्या पत्रिकेत एकमेकांच्या ग्रहांचं खडाष्टक होत ! इकडे कुंतीपुत्र व माद्रीपुत्र एकोप्याने खेळत बागडत मोठे होत होते. एका वयोवृध्द योग्याने अलौकीक ग्रहयोजनेवर पांचही पांडु पुत्रांना वेददिक्षा दिली. शेवटी व्हायचं तेच घडलं. कामविकाराने किंदम ऋषीच्या शापाने पांडु इहलोक सोडुन गेले. माद्री सती गेली. कुंतीने सर्व प्रसंग संयमाने घेतला. पांचही पुत्रांना व अस्थी घेऊन हस्तीनापुरला परतली. सोबत ते वयोवृध्द योगी व त्यांचे शिष्यगणही होते, त्यांनी सर्व पांडवाचं यथार्थ वर्णन केलं. त्यांनी सपिंडी व पितृयज्ञाची आज्ञा केली. ते योगी कारण देहाने आलेले किंदमऋषी होते. पांडु-माद्रीचा अंत्यसंस्कार उरकला.
एका शुभदिनी भगवान व्यासांचं आगमण झालंं. दुर्वासांची सेवाव्रती बालिका, कर्णाची असहाय्य माता, पांडुची सुशील महाराणी, माद्रीची स्नेहशील जेष्ठ भगीनी, पांडुला संयमीत ठेवणारी दक्षा, आपली मंत्रशक्ती माद्रीला बहाल करणारी त्यागी, वैध्यवाचं कठोर पालन करणारी, हिमालय ते हस्तीनापुर पर्यतचा मार्ग सहज चालणारी आणि पांडु माद्रीला और्ध्वदेहिक झाल्यावर भीष्माकडे पाहुन टाहो फोडणार्या कुंतीच्या भेटीला तीच्या दालनात आलेत. तीचे पांच पुत्र तिथे होते. व्यासांनी सर्वांचं भविष्य एकाच दृष्टीक्षेपात वाचुन सांगीतले, तुमच्यासाठी संघर्ष हा मंत्र आहे.
व्यास भीष्मांच्या कक्षेत प्रविष्टले. कृष्णाने घेतलेल्या अवताराबद्दल आणि कर्णाचे जन्म रहस्य व्यासांनी भीष्मांना सांगुन हे रहस्य गुप्त ठेवून वर्तमान बुध्दीने कार्य करण्यास सांगीतले. दोघांची तत्वज्ञान चर्चा सुरु असतांना ते म्हणाले सत्यवतीकडुन अनेक चुका झाल्यावरही तीला सन्मानाने सांभाळुन धर्माचरणाची काळजी घेऊन पुण्यशील कार्य करवुन घेतलेत. येणारा काळ परीक्षेचा आणि लज्जा आणणारा असेल. धृतराष्ट आणि त्याच्या पुत्रांची अंध महत्वकांक्षा पोखरुन टाकले. हे चित्र सत्यवतीने पाहू नये म्हणुन तीने आता वनात जावं हे सुचविण्यासाठी आलो आहे.
सत्यवती अंबा, अंबालिकासह वनात जाण्यासाठी धृतराष्टाची आज्ञा घेऊन अत्यंत रुक्षतेने बाहेर पडल्या. काही दिवसांनी १०६ राजकुमांरांचे यज्ञोपवीत संस्कार धारणाचा कार्यक्रम झाला. पांडव, भीष्म ब्राह्मणाबरोबर आरोह-अवरोहसह वेदोच्चार ऐकुन सर्वजण थक्क झाले.
कुरु युवराज मोठे होत होते, त्यांचा आडदांडपना वाढला होता. दुर्योधनाच्या मनात द्वेषभावना जागृत होत होती. मुलं अस्र, शस्र, दिव्यास्र विद्या शिकू लागले.
एकदा मुलं विटी दांडुचा खेळ खेळत असतां विटी कोरड्या विहिरीत पडली. खेळाचा रंगभंग झाल्यामुळे मुलांची विरस झाला, एवढ्यात धवलवस्रधारी छातीवर यज्ञोपवीत रुळत असलेले एक जेष्ठ समोर आले आणि स्वतःची अंगठी पण विहिरीत टाकली. काटक्यांची रज्जु तयार करुन विहिरीतुन विटी व अंगठी अलगद बाहेर काढली.
ही घटना भीष्मांना कळल्यावर ते द्रोणाचार्य असल्याचे जाणले. त्यांना सन्मानाने प्रासादात आणले. राजपुत्रांना अनुग्रहित करण्यासाठी सर्वश्रेष्ठ शस्र विद्यापीठाची स्थापना करण्याचे आयोजन केले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भाग-१३
गुप्तहेर शंभुकरांशी बोलतांना भीष्म म्हणाले व्यासांचे वेद अफाट आहेत. वेदांच्या शाखा आणि शाखा प्रमुखांची व्रतनिष्ठा तपासणं हे कठीणकर्म कार्य करीत आहेत. नवीन आश्रम तसंच शिष्यांमधे इर्षा येऊ न देणं ही वेगळी परीक्षा आहे. तरीही व्यास पांडवांसाठी वेळ काढतात. नक्कीच त्या वैराग्यशील पुरुषाचा कांही हेतु असावा. अन्यथा श्रीकृष्णही पांडवांच्या विवाहास आला नसता ! यदुवीरांचं पाठबळ आणि बलरामाचा अनुग्रह त्यांना आणायचा होता त्यामुळे व्यास आणि कृष्णाच्या कार्यतर्काला अनुसरुन निर्णय घ्यावे लागतील. व्यास जगद्मान्य ऋषी आणि श्रीकृष्ण विमुक्त पुरुष ! त्याला धर्माचीही बंधन नाहीत. भीष्म म्हणाले, “मी अशा संघर्षात आहे की, प्रचलीत धर्माचा त्यागही करु शकत नाही !”
स्वयंवरातील सर्व राजांचे प्रयत्न फसल्यावर ब्राम्हण वेशातील अर्जुनाने मत्स्यभेद करुन पणात द्रौपदीला जिंकुन घरी आणले. भिक्षा आणली आहे असे बाहेरुन मातेला सांगीतल्यावर कुंतीने न पाहतां आतुनच सर्वानी समान वाटुन घेण्याचा आदेश दिला. व्यासांच्या आज्ञेने द्रौपदीचा विवाह पांच पांडवांशी झाला. पांडव द्रौपदी, कुंतीसह हस्तीनापुरकडे निघाले.
राच्या दिवशी सभामंडपात योग्यतेनुसार सर्वांनी आसन ग्रहण केले. दृपदाचा जेष्ठ पुत्र शिखंडी जो पुर्वजन्मीची अंबा, तीने तप साधनेने भीष्माचा प्रतिशोध घेण्यासाठी दृपदाकडे जन्म घेतला, तो अस्वस्थपणे आतुरतेने भीष्माची प्रतिक्षा करीत होता. दुष्टद्युमने अस्वस्थेतेचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, “ही प्रतिशोधाची माला जन्मजन्मांतरीची आहे.”
दुर्योधन कसंही करुन पांडवांचा काटा काढायचा तर कर्णाचं धोरण सरळ युध्द करणे, याला धृतराष्टाचा पाठींबा आणि गुरु द्रोण आणि भीष्मांचा कडाडुन विरोध असेल ! यावर उपाय म्हणजे राज्याची वाटणी. राज्य युधीष्ठीराचं आहे. पण एकाच घरांत भाऊबंदकीपेक्षा विभागणी बरी. प्रश्न धर्माचा नाही न्यायाचा आहे आणि या कृतीला अनुमोदन असेल तर कृष्ण इथे निश्चीतच येईल.
पांडवांसह कुंती हस्तीनापुरला प्रवेशल्यावर त्यांचे स्वागत झाले. कलह नको म्हणुन अर्ध राज्य खांडववनाचा परिसर दिला. व्यासांसारख्या त्रिकालदर्शी पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली युधीष्ठराकरवी अतृप्त आत्मे तृप्त व्हावे म्हणुन तर्पन, श्राध्द आणि महालय विधि करवुन घेतले. नागलोकांनीही मांडलेला उच्छाद नष्ट व्हावा म्हणुन होम हवन केले. त्यानंतर तीथे इंद्रप्रस्थ नांवाची नगरी बसवली. बाजार पेठा, उद्योग धंदे सुरु केले. अलौकीक मयसभा बांधली.
नारद भेटीला आले असतां त्यांनी युधीष्ठीराला म्हणाले, “पर्यटन केल्याशिवाय विविध राजवंशाच्या राज्यातुन गेल्याशिवाय माहिती होत नाही. तिर्थस्थळीची दानकर्म करण्याचे निमित्य करुन मुमुक्षांना तिर्थस्थळी न्यायला हवं !” त्यांनी पांचही भावांना द्रौपदीशी एकांताचे नियम बांधुन दिले. त्यात चुक झाल्यास १२ वर्षे तिर्थयात्रेला जायचे. ध्यानीमनी नसतांना अर्जुनला शिक्षा म्हणुन तिर्थयात्रेला जावे लागले.
विदुर भीष्मांना म्हणाले हा घडुन आणलेला प्रकार कृष्णाशिवाय कोण करणार ? या बारा वर्षाच्या काळात अर्जुनांचे तीन विवाह झालेत. बभ्रुवाहन नावाचा पुत्र लाभला.
इंद्रप्रस्थ ही पांडवांची कर्मभुमी पण श्रीकृष्णाच्या विश्वराज्याच्या नियोजनांचे ते अधिष्ठान होतं !
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भाग-१४
इंद्रप्रस्थास नारदाचं पुनः आगमन झाले. त्यांच परत येणं हेच महान कृतीला प्रशस्तीपत्र होते. एकांतात युधीष्ठीराशी चर्चा करतांना म्हणाले ही चर्चा “कच्विप्रश्न” म्हणुन अमर होईल. तु कुरुनंदन भीष्माप्रमाणे धर्मशील, विदुराप्रमाणे नितिसंपन्न धर्मराज होशील. पितृलोकात पांडुराजाला भेटले असतां त्यांना हरिश्चंद्राप्रमाणे मोक्ष मिळण्यासाठी तु राजसुययज्ञ करावा ही इच्छा प्रगट केली.
राजसूय यज्ञाच्या इच्छेने त्यांना कृष्णाची तिव्रतेने आठवण झाली. दुसर्याच दिवशी कृष्ण इंद्रप्रस्थास आला. दोघांच्या चर्चेतुन राजसूय यज्ञापुर्वी नरमेध करणार्या जरासंधाला यमसदनी पाठवल्याशिवाय यज्ञ बेगडी ठरेल. हा यज्ञ असा व्हावा की, पृथ्वीवरच सर्व सार्वमत, आदराने न मागता सत्ताधीशांच्या देणग्या ससन्मान याव्यात. सर्व नृपतींचे सीमाप्रश्न सुटण्यासाठी जरासंधाचा संघ नामशेष झाला पाहिजे. त्यासाठी तीनच लोक त्याला मारु शकतात कृष्ण, भीष्म आणि अर्जुन !
भीष्माला कळले की, मगधच्या अजिंक्य नगरीत कृष्ण, भीम आणि अर्जुन शिरुन भीमाकरवी अहोरात्र तेरा दिवस द्वंद करुन जरासंधाचा वध झाला. भीष्मांच्या नेत्रात पांडवांबद्दल अभिमान दिसु लागला. जरासंधाला संपवणं अशक्य होतं. त्यांना पांडवांच कौतुक करावसं वाटत होत पण भावना आवराव्या लागल्या. पांडव तरी समजुन घेतील पण धृतराष्टाचा गैरसमज होईल. या राज्याचा महामंत्री असुनही राजसिंहाच्या अनुमती शिवाय कांही करु शकत नव्हते. पांडवांच्या दिग्विजयाच्या वार्ता येत राहिल्या.
यज्ञ हे श्रेष्ठ व धनिकांचं स्नेहसंम्मेलनच ! यज्ञ वैदिकांचा प्राण आहे. यज्ञ हा विश्वकल्याणासाठी असतो, पण धृतराष्टाचा यज्ञ म्हणजे धगधगता यज्ञकुंड !
इंद्रप्रस्थामधे राजसूय यज्ञासाठी देशोदेशीचे राजे तसेच भीष्मासह कुरुपरिवार येऊन पोहचला. भीष्मांनी यज्ञातील कामाची विभागणी करुन प्रत्येकाला कामाची जबाबदारी सोपवली. संपुर्ण कार्यक्रमाकडे लक्ष ठेवण्याचं उत्तरदायीत्व भीष्माकडे आलं. मयसभेतील चकवाचकवीचा आनंद सर्वजण घेत होते. मयसभेत दुर्योधनाच्या झालेल्या फजीतिला द्रौपदी हसल्याने त्याला फार अपमानकारक वाटले.
भीष्म सभेला उद्देशुन बोलु लागले, श्रेष्ठतेला सीमा असतात ! या सीमेपलीकडे एक पुरुषोत्तम आहे ! त्यांच्या सारखा युध्दनिपुण, दुरदर्शी, कल्पक, ज्ञानी आणि विनम्र, सामाजिक क्रांतीवीर, राजश्री असा ज्याने कंस वधला, ज्यानं नरकासुराच्या बंदीशाळेतुन सोळा सहस्र कुमारीकांना सोडवलं, ज्याच्या बुध्दीचातुर्याने जरासंध संपला, धर्म आणि व्यवहारांत जो निपुण आहे अशा *श्रीकृष्णाला* प्रथम पाद्यपुजा आणि अतिथी सत्कार करुन त्याला अग्रपुजेचा मान दिला. यावर शिशुपालाने हरकत घेऊन श्रीकृष्णाची निंदा नालस्ती आरंभली. शेवटी त्याचे १०० अपराध झाल्यावर श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र सोडुन त्याचा वध केला. हा धर्मयुध्दाचा शंखनाद होता.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भीष्म
भाग-१५
राजसूय यज्ञ यथासांग पार पडला. पांडवांचे वैभव पाहुन दुर्योधन द्वेषाने, असुयेने पेटुन उठला. मामा शकुनीच्या सल्ल्याने इच्छेविरुध्द राजाज्ञा म्हणुन विदुराहस्ते युधीष्ठीराला द्युत खेळण्यास आमंत्रीत केले.
धृतराष्टासह दुर्योधन, कर्ण, शकुनी यांनी हेतु गुप्त ठेवून द्युत खेळण्यास आरंभ केला. शकुनी जवळचे फासे जरासंधांच्या हाडापासुन बनविले असल्यामुळे व हुकमी असल्याने तो प्रत्येक डाव जिंकत गेला. युधीष्ठीर प्रत्येक हरत्या डावावर, राज्य, सैन्य, बंधु, स्वतः व शेवटी द्रौपदी सर्व हरवुन बसला. पांडव प्रत्येक डावागणिक नग्न होत होते.
धृतराष्टांना सत्यर्म कळत होता, पण कुरुंच्या सभेत धर्म तुडवला जात होता. संस्कृतीवर मृत्युचं सावट येत होतं. ज्या राजसभेवर भीष्मांनी पुर्ण आयुष्य पणाला लावलं, प्रतिज्ञाबध्द होऊन कुरुराज्याचं भलं केलं त्याच भीष्मांच्या समोर द्रौपदीची विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहतांना त्यांना किती क्लेश, कीती घालमेल होत असेल ही कल्पनाच करवत नाही. ते सिंहासनाच्या आज्ञेने बांधील होते. शेवटी द्रौपदीच्या करुन आर्त हाकेने श्रीकृष्णाने तीचे लज्जारक्षण केले.
विदुरांनी धृतराष्टाची कान उघाडणी केल्यावर द्रौपदीला वर मागायला सांगीतल्यावर तीने फक्त दास्यातुन पतींची मुक्तता मागीतली पण उदार होऊन धृतराष्टाने पांडवांचे राज्य, संपती सर्व परत करुन इंद्रप्रस्थास जाण्याची अनुमती दिली.
भीष्मांच्या कक्षाचे दार बंद होते. कुरुंच दैदिप्यमान निशाण अविरत फडकत राखण्याची विजिगीषा बाळगणारा थोर सेनानी हतबध्द झाला होता. हस्तीनापुर राज्यात शत्रुदेशाची मुंगीही प्रवेश करुं शकणार नाही असा दरारा असलेला वीर आपल्या सुनेचं वस्रहरण होत असतांना उघड्या डोळ्यांनी पाहत स्वस्थ बसले होते. धिक्कार असो या शस्रविद्येचा ! खचितच या भूमीतलं पावित्र्य संपलय म्हणुन कां अशी दुर्बुध्दी झाली ? कां वानप्रस्थ स्विकारले नाही ? कां कर्णाचा वध केला नाही ? कां दुर्योधन, शकुनी, दुशाःसनावर शस्र उचलले नाही ? कुठला धर्म पाळला भीष्मांनी ? त्यांना अगदी भडभडुन आलं ! प्रदिर्घ जीवनाची घृणा वाटु लागली.
ज्या राज्यातील स्रीच्या निरीला परपुरुषाचा हात लागतो आणि त्याला शासन होत नाही, प्रजा मुग गिळुन बसते, तेव्हा तिथली संस्कृति नागवी होते. ते क्षोमग्रस्त होऊन संताप संताप होत होता.
पांडवपुत्र द्रौपदीसह इंद्रप्रस्थाला निघाले असतां अर्ध्या वाटेवरच युधीष्ठीराला पुनः द्यूत खेळण्याचे निमंत्रण मिळाल्याने परत युधीष्ठीर द्यूतामधे सर्व हरला. बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. सर्व पांडव काम्यकवनात वस्तीला राहिले.
पांडव वनात जाऊन दोन मास होत आले. भीष्मांनी स्वतःला कक्षात कोंडुन घेतले. हस्तीनापुरचे सर्व व्यवहार नियमीत सुरु होते पण यंत्रवत. भीष्म कुणालाही भेटत नव्हते. दुध, फलाहारावर जीवन व्यतीत करीत होते. वनामधे महर्षी व्यास, धौम्यऋषी पांडवांशी पुढील भविष्याच्या युध्दाची सांग्रत चर्चा सुरु होती. दुर्योधन युध्दाची करीत असलेल्या तयारी बद्दल बोलतांना व्यास म्हणाले, “पृथ्वीच्या प्राप्तीस्तव हवी विक्रमांची रास ! आपुल्या पराक्रमे झाकावी विपक्षाची आस ! अत्यंत प्रकर्षाने वाढता वाढता वाढे बळां ! श्रेष्ठ तंत्रानेही रणीं, उतरे विजयमाळा !”
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.










