आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

32. स्वामी विवेकानंद चरित्र भाग १, (१ ते ५)
विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्या विरेश्वर शिवाची विशेष पुजा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! स्वामी विवेकानंद !!!
!! प्रस्तावना!!
नमस्कार !!
आतांपर्यंत महाभारत रामायण मधील आणि कांही संतचरित्रे रेखाटले, जसेः- कृष्ण,कर्ण,द्रौपदी,सीता,कुंती, भीष्म,अश्वत्थामा,मंदोदरी, अहिल्या,तारा, तुकाराम,ज्ञानदेव,एकनाथ,नामदेव,श्रीगणेश,नामदेव,जनाबाई, सावित्री,दत्तात्रय, स्वामी समर्थ, इत्यादी.
आजच्या दृष्टीने ज्यांच्या चरित्राची पुनः पुनः पारायणे केली जावीत असा विश्वमानव, साधुसंन्यासासाठी सांगीतले ला “आत्मनो मोक्षार्थ जगद्वितायच” हा मंत्र गृहस्थ लोकांनाही तितकाच लागु पडणारा, सर्वसाधारण लोकांना व्यावहारिक वेदांत सांगीतलेला, प्रेरणा दायी विचार, अद्वितीय कार्य आणि त्यांनी सांगीतलेला वेदांत आपण नजरे समोर ठेवला तर, केवळ एवढ्या प्रामाणिक प्रयत्नानेही मुक्तीचा मार्ग खुला होऊन आपल्या जीवनातील अनेक प्रकारची दुःखे निश्चितच कमी होतील असा—
विश्वाचा इतिहास पाहिला तर असे दिसुन येते की, महामानव जन्म घेतात आणी काळाच्या ओघात विलिन ही होतात, परंतु त्यांचे विचार,कार्ये या जगाला हजारो वर्षे स्मृतीत राहणारे आणि मार्गदर्शक ज्ञानप्रकाशात मानवी संस्कृतीची वाटचाल झालेली असते. मानवाच्या केवळ संस्कृतीतच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही हे महापुरुष, संत,महंत,आचार्य यांचे खुप मोठे योगदान असते.
असाच एक महामानव एकोणिसा व्या शतकाच्या अखेरीस प्रेरणादायी व्यक्तीमत्व सर्वज्ञात झालेले, शिकागो येथे १८९३ साली भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत हिंदुधर्माचे प्रतिनिधित्व करणारा हा अज्ञात भारतीय सन्यासी एकाएकी प्रकाशात आलेल्या प्रौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीविषयी असीम ज्ञान, सखोल आध्यात्मिक दृष्टी,प्रभावशाली वकृत्व, ओजसपुर्ण संवादशैली,मानवा बद्दलची विशाल सह्रदयता, देखणे व्यक्तीमत्व यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अमेरिकन,इंग्लडचे लोकं सुध्दा ओघाने आकर्षित झाले.इश्वराची ध्यान धारणा व मानवमात्राची सेवा या आपल्या आंतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन मानवसेवा हेच आपले जीवीत कार्य असा अंतीम निश्चय याने केला.
केवळ ३९ वर्षाच्या छोट्याशा जीवनांतील (१८६३ ते १९०२) केवळ दहाच वर्षे त्यांनी सामाजिक कार्यात व्यतित केले आणि कमालीच्या देह यातना सोसत….. त्यांनी चार अभिजात विचारशिल्पे,ज्ञानयोग,भक्तीयोग,कर्मयोग आणि राजयोग मानवाच्या आगामी समस्त पिढ्यांसाठी मागे ठेवली.खरोखर इतके व्यापक अंतःकरण,विशाल संवेदनशील मन असलेल्या स्वामी विवेकानंदासारखा विश्वमानव निराळाच विवेकानंदांच्या लेखी God तरी कोण? तो पाषाण, संगमरवर कींवा धातुच्या मुर्तीत नसुन तो मानव रुपात मूर्त, व्यक्त झालेल्या हाडामासांच्या जिंवत समूहात असतो. स्वामी म्हणतात…. I born again and again suffer thousand miserise,so that, I may worship the only God that exists, the only God I believe in the total of all souls.अश्या या सर्वोच्च कोटीच्या महामानव नायका बद्दल माझ्या अल्पमतीनुसार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. चुक भुल क्षमा करुन आपल्या क्रिया प्रक्रिया अपेक्षित…..
मिनाक्षी देशमुख
!!! स्वामी विवेकानंद !!!
आजपासून स्वामी विवेकानंद यांचे चरित्र लेखमाला सुरु करीत आहोत प्रत्येक साधू संत सद्गुरु यांनी आपल्या जीवनात अतोनात कष्ट सोसले आहेत. प्रखर साधना करताना हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत, त्यातील आपले चरित्र नायक एक होत, हिंदू धर्म तत्वाचा प्रचार व प्रसार त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवला, त्यांचे समग्र चरित्र शब्दांकित करणे अशक्यच आहे
लेखिका मिनाक्षी देशमुख व आम्हाला हे आवर्जून पाठविणारे श्री भालचंद्र महाजन यांचे मनापासून आभार….
भाग – १.
विवेकानंदाच्या जन्माअगोदर त्यांची माता भुवनेश्वरीदेवींनी आपला वंश उज्वल व्हावा म्हणून इतर धर्मशील हिंदु मातांप्रमाणे अनेक धार्मिक व्रत वैकल्ये,तपःसाधना, उपवास करीत होत्या.त्या शंकरभक्त असल्यामुळे त्या क्षेत्राचे दैवत असणार्या विरेश्वर शिवाची विशेष पुजा बांधली.एके रात्री भुवनेश्वरीं च्या स्वप्नात येऊन त्यागीश्वर महादेव म्हणाले, मी तुझ्यापोटी जन्म घेत आहे, या स्वप्नाने जाग आल्यावर त्या आनंद विभोर झाल्या.
यथावकाश १२ जानेवारी १८६३ ला बाळाचा जन्म झाला.हा दिवस हिंदु लोकांचा महत्वपुर्ण सण असलेला मकर संक्रमणाचा! त्यामुळे गंगानदीवर हजारो हिंदु प्रार्थना, पुजापाठ,स्तोत्रादी पठण सुरु असलेले निर्माण झालेल्या पवित्र वातावरणांत भविष्य काळातील स्वामी विवेकानंदांनी पहिला श्वास घेतला. वीरेश्वर शिवाचा प्रसाद, भुवनेश्वरींनी त्याचे नांव वीरेश्वर ठेवले,मात्र कुटुंबात नरेंद्रनाथ हेच नांव प्रचलीत झाले.
कोलकात्याचे ऐश्वर्यसंपन्न,दानशूर, विद्वत्ता, पांडित्य आणि स्वतंत्र वृत्ती यासाठी प्रसिध्द असलेल्या दत्त कुटुंबात नरेंद्रनाथांचा जन्म झाला.नरेंद्रनाथांचे आजोबा दुर्गाचरण यांनी पहिल्या पुत्र जन्मानंतर इश्वरप्राप्तीसाठी संसारत्याग केला होता. नरेंद्रचे वडील विश्वनाथ हे कोलकात्या उच्च न्यायालयात वकील होते. इंग्लीश व पार्शियन वाडःमयावर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. ते वडीलां सारखे विरक्त न होता जीवनाचा पुरेपुर आनंद घेत व वकीलपेशातुन भरपुर अर्थ प्राप्ती करुन घेतली. त्यांचा आवडता छंद पाककला व प्रवास होता.अडल्या नडल्यांच्या गरजा ते उदार अंतःकरणाने भागवित असत.त्यांच्या अपत्यावर अत्यंत बारीक लक्ष असुन मुले मुलींची थोड्याही चुकीची ते गय करीत नसत.
वडिलांच्या तुलनेत नरेंद्रची आई भुवनेश्वरीदेवीचे व्यक्तीमत्व अगदी भिन्न होते. नरेंद्रव्यतिरिक्त दोन मुले व चार मुली,पैकी दोघांचा मृत्यु बालपणांतच झाला. भल्या मोठ्या कुटुंबाची त्यांना उस्तवारी करावी लागे.उरलेल्या वेळी त्या शिवणकाम,भजन गाणे,रामायण, महाभारत पठण करणे, असे असले तरी आपल्या कर्तव्यात बिलकुल हयगय करीत नव्हत्या. शांतस्निग्ध, इश्वरभक्ती, अंतर्मुख व आत्मसन्मानयुक्त अलिप्तता या त्यांच्या सद्गुणांमुळे सर्वजण त्यांचा मान ठेवीत असत.
गोड,उत्साही पण अवखळ स्वभावाचा नरेंद्र हळुहळु मोठा होऊ लागला.
तो बहिणींना फार त्रास देत असे.त्याचा उफाळलेला हट्टीपणा किंवा राग शांत करण्यासाठी त्याची आई शिवजप करीत त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतले की, नरेंद्र शांत होई. नरेंद्रच्या मनांत पशुपक्षांविषयी विशेष प्रेम होते. घरांत गायी,माकड,मेंढा,मोर,कबुतरें, पिनिपिग हे आवडते पक्षी होते.
संन्यस्त जीवन जगण्यासाठी घरा दाराचा त्याग केलेल्या आजोबाच जणु नरेंद्रच्या रुपात जन्माला आले.नरेंद्रला साधु संन्यांश्याविषयी विलक्षण आकर्षण होते. एकदा साधु भिक्षेकरितां दारी आला असता नरेंद्राने नवंकोरं वस्र त्याला देऊन टाकले. परिणामी कोणी असा साधु आला की, याला खोलीत कोंडुन ठेवत, तरी सुध्दा खिडकीतुन जी हातास येई ती वस्तु तो खाली टाकीत असे. याच बालवयात आईकडुन अक्षरओळख, रामायण,महाभारतातील नितीपर कथांचे शिक्षण मिळू लागले.
क्रमशः
देव किंवा अशा विभूती अवतार घेताना मागील पिढ्या धार्मिक, अध्यात्मिक असतील अशाच घराण्यात अवतार धारण करतात,
“ॐ सद्गुरु परब्रह्माय नमो नमः”
!!! स्वामी विवेकानंद !!!
भाग – २.
आई भुवनेश्वरीकडुन ऐकलेल्या देव देवतांविषयीच्या गोष्टींनी नरेंद्रच्या मनांत भक्ती निर्माण होऊ लागली.बालबुध्दी नुसार तो रामसीतेची पुजा करु लागला, पण नंतर त्याने त्यागमूर्ती शिवशंकराची आराधना सुरु केली.याच काळात त्याला झोपेत विलक्षण अनुभुती येऊ लागली, डोळे मिटले की, दोन्ही भुवयां मधे रंग बदलणारा प्रकाशगोल दिसत असे. हा प्रकाशगोल हळुहळु मोठा होऊन नरेंद्रचा संपुर्ण देह तेजाने व्यापला जाई. याबाबत कांही वर्षांनी त्याचे अध्यात्मिक गुरु श्रीरामकृष्णांना विचारल्यावर, त्यांनी सांगीतले, हे सर्व पुर्व जन्मातील महान आध्यात्मिकतेचे आणि जन्मजात कलेचे सुलक्षण आहे. हे प्रकाशदर्शन त्याच्या अखेरच्या श्वासापर्यत टिकुन होते, तथापी ऊत्तरकालीन जीवनांत मात्र या दर्शनाची नियमतता आणि घनता कांहीशी कमी झाली होती.
सहाव्या वर्षी नरेंद्र शाळेत जाऊं लागला. शाळेतील कुसंगतीच्या मुलांबरोबर बिघडू नये म्हणुन वडीलांनी त्याला शाळेतुन काढुन घरीच खाजगी शिक्षकाची नेमणुक केली. तीव्र बुध्दीने महाभारत रामायणातील मोठमोठे सर्ग मुखोद्गत झाले. खेळात त्याचा “राजा व दरबार” आवडता खेळ!सम्राटाची भुमिका नेहमी स्वतः घेई. नरेंद्र म्हणजे नरांचा इंद्र म्हणजेच सम्राट! नियतीने जणुं मानवांचे नेतृत्व करण्यासाठीच त्याला जन्माला घातले होते. बालपणी नरेंद्रच्या व्यक्तीमत्वावर, ज्ञानसंपन्न वडीलांचे व भक्तीमय आईचे संस्कार बिंबले होते. आईने शिकवले होते की, सत्यपालन करतांना बरेचदा अन्याय सोसावा लागेल किंवा नको ते परिणाम पण भोगावे लागतील, पण “कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडायचा नाही”
एकदा शालेय मित्रांसोबत खेळत असतांना नरेंद्र जिन्यावरुन खाली पडल्यामुळे डोक्याला खोक पडुन रक्त स्राव झाला व उजव्या डोळ्याच्यावर जखमेची ही कायम खुण राहिली. पुढे त्यांचे गुरु रामकृष्णांना ही हकीकत कळल्यावर ते म्हणाले,असे रक्त वाहणे गरजेचे होते नाहीतर अतिरिक्त बळाने धुमाकुळ घातला असता.
वयाच्या आठव्या वर्षी १८७१ मधे नरेंद्र माध्यमिक शाळेत जाऊ लागले. अल्पावधीतच त्याच्या असामान्य बुध्दीमत्तेची ओळख शिक्षक आणि वर्गबंधुना पटली.इंग्लीश परकीय भाषा असुनही त्याने ती आवडीने आत्मसात केली. शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त तो वेगवेगळे उपक्रम करीत असे. त्यांनी गॅस दिव्यांची व जल शुध्दीकरण कारखान्याचे नमुने तयार केले. एका नवोदित नाटक कंपनीची स्थापना केली.दांडपट्टा, कुस्ती, मलखांब, पाककला पण शिकले.अशा हरहुन्नरी,धैर्यशील व स्पष्टोक्तेपणामुळे सर्वजणांच्या प्रशंसेस तो पात्र झाला. भय व अंधश्रध्दा, घाबरणे त्याला बिलकुल पटत नसे.
एकदा व्यायामशाळेत अवजड झोका बसवित असतांना एका इंग्रज खलाश्याच्या अंगावर खांब पडल्याने जखमी होऊन बेशुध्द झाला.पोलीसांच्या भीतीने सर्वजण पळुन गेले, पण नरेंद्रने त्याची आठवडाभर सुश्रुषा करुन पैसे जमवुन त्याला दिले व मगच त्याला निरोप दिला.
तारुण्यात त्याच्या स्वभावात खुप फरक पडला. बौध्दीक गोष्टींचे आकर्षण वाढल्याने इतिहास,वाडःमयीन अश्या गंभीर ग्रंथाचे वाचन, जाहीर सभांना हजेरी, संगीत तर आवडतेच होते. नरेंद्रला पहिली भावानुभुती १५व्या वर्षी झाली. तो कुटुंबासोबत बैल गाडीने रायपुरकडे जात असतां, सृष्टीसौंदर्य निरखित असतां त्याला मध माशाचे विशाल पोळे दिसले.त्याचक्षणी इश्वरीयोजने बद्दलच्या आदरभावाने मन भरुन आले व भान हरपले. शुध्दीवर आल्यावर सुध्दा आनंदविभोर अवस्थेतच होता.
क्रमशः
ॐ सद्गुरु परब्रह्माय नमो नमः
!!! स्वामी विवेकानंद !!!
भाग -३.
नरेंद्रला एक विशिष्ट मानसिक अनुभुती वारंवार येत असे. काही व्यक्ती किंवा स्थळ प्रथम जरी पाहिले तरी, ते ओळखीचे वाटत असे, हे प्रकार लहान पणापासुनच घडत असे. एके दिवशी एका बिल्डींगमधल्या रुममध्ये मित्रांबरोबर निरनिराळ्या विषयांवर चर्चा सुरु असतांना त्याला वाटले एका प्रसंगी ही चर्चा झालेली आहे, एवढेच नव्हे तर, ती इमारत कधी पाहिलेली नसुन सुध्दा त्याने तिच्या कानाकोपर्याचे अचुक वर्णन केले.
रायपुरला असतांना त्याचे वडिल
ख्यातनाम विद्वानांना भेटवुन त्यांच्याशी चर्चा करण्यास प्रोत्साहित करीत. नरेंद्र आपल्या मनाच्या अद्भुत शक्तींचा अविष्कार करीत आवश्यक विचारधारा आत्मसात करण्याची सत्याकडे सर्वस्पर्शी दृष्टीकोनातुन केंद्रवर्ती मुद्याला धरुन राहण्याची कला तो वडीलांकडुन शिकला.
माध्यमिक शिक्षण संपवुन उच्च शिक्षणाकरितां कोलकोत्याच्या प्रेसिडेन्सी काॅलेजमधे प्रवेश घेतला.दुसर्या वर्षी स्काॅटिश चर्च काॅलेजमधे प्रवेश घेतला.त्या काॅलेजचे प्राचार्य हेस्टीकडुन पहाल्यांदाच श्रीरामकृष्णाचे नांव ऐकले. नरेंद्रची आकलनशक्ती एवढी तीव्र होती की, कोणतेही पुस्तक नुसतं चाळलं तरी, पुस्तकातील विषयाचा संपुर्ण आशय लक्षात येत असे.
नरेंद्र महाविद्यालयातील देखणा, पिळदार स्नायुंचा, चपळ आणि शौर्य साहसाकडे झुकलेला काॅलेज युवक असुनही तो अभ्यासातच जास्त रमत असे. दोनच वर्षातच त्याने तर्कशास्राचे अध्ययन केले. नंतर पाश्चिमात्य आणि युरोपातील विविध देशांच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासात प्राविण्य मिळवले. त्याची स्मरणशक्ती इतकी अद्भूत होती की, केवळ तीन दिवसांत Histry of English people हा ग्रंथ आत्मसात केला.याच सुमारास तो श्रीरामकृष्णांच्या संपर्कात आला.त्यांच्या सहवासाने नरेंद्रची आंतरिक अध्यात्मिक आकांशा उफाळुन आली .संसारातले असारत्व आणि विद्वत्तापुर्ण अध्ययनाची व्यर्थता जाणवली. बी.ए.च्या परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याला परमेश्वराच्याअस्तित्वाचीजाणीवझाली
त्याची इशचिंतनात बुडालेली स्थिती पाहुन त्याच्या मित्रांनी परीक्षेची आठवण करुन दिली, परंतु तो बेफीकीर होता.कारण उत्तीर्ण होण्याची त्याला पुर्ण खात्री होती. संन्यास जीवनाची छाया त्याच्या दिशेने वेगाने सरकत होती प्रोफेसर हेस्टींनी नरेंद्रच्या विद्वतेबद्दल अभिप्राय देतांना म्हणाले, नरेंद्र इतका असामान्य बुध्दीवान आहे की, तो आपला ठसा मानवी जीवनावर उठवल्या खेरीज राहणार नाही.
नरेंद्रने तज्ञ गुरुंच्या मार्गदर्शनाखाली वाद्यसंगीत,कंठसंगीत आणि अनेक प्रकारची वाद्ये वाजवण्यात प्राविण्य संपादन केले.याच काळात ब्राम्हो चळवळीमुळे तो प्रभावित झाला. हिंदुस्थानात ब्रिटिशांनी पाय रोवल्यावर, इंग्रजी शिक्षणपध्दतीची मोहिनी पडलेल्या नवतरुणांना आपल्या समाजातील जीवनशैलींच्या उणीवांची जाणीव होऊ लागली. इंग्रजांच्या आधी मुस्लीम सत्तेमुळे भारतीय संस्कृतीला संपूर्णपणे शिथिलता आलेली होती.जातीसंस्था तर चांगलीच दृढमुल झालेली. ब्राम्हण, पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सामान्य लोकांच्या धर्मजीवनावर अंकुश ठेवला होता. श्रीमंतवर्ग,जमीनदारांकडुन सामान्यजनांची पिळवणुक आणि स्रियांची स्थिती तर खुपच दयनीय झालेली. मुस्लीम र्हास काळांत भारतीय जीवनाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक क्षेत्रात अनागोंदी माजली होती. नव्यानेच सुरु झालेल्या इंग्रजी शिक्षण पध्दतीने हिंदुसमाजाच्या सार्या उणीवा उजेडात आल्या,राष्ट्रीय जीवन गतिशील व्हावे म्हणुन सामाजिक सुधारणेच्या पुनरुज्जीवनावादी अशा चळवळींना सुरुवात झाली.
क्रमशः
सर्व भारतीयांना अनंत चतुर्दशीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आज आपण बाप्पाला जड अंतःकरणाने आपण निरोप देणार. बाप्पा सुखकर्ता व दुःखहर्ता तसेच विघ्नांचा नाशकर्ता आहे त्याला मनापासून प्रार्थना हे बाप्पा विश्व सुखी करा विश्वापत्ती नष्ट करा, तुमच्या कृपेने सर्वांना आयुरारोग्य,सुख,आनंद लाभो…..
दुसरे महत्त्वाचे म्हणजे ही लेखमाला तुमचे लाईक्स मिळावेत किंवा तुमचे मनोरंजन व्हावे यासाठी नाही हिचा उद्देश एवढाच आहे येणारी पिढी ही संगणक मोबाईल यात पूर्णपणे गुंतून स्वत:च्या -हासाला कारणीभूत होण्याकडे वाटचाल करीत आहे त्यांचेच काय मोठे वयस्कर सुध्दा गुंतत चालले आहेत व्यायाम, देशभक्ती, देवभक्ती यापासून दूरावत चालले आहेत
यातून सुटण्यासाठी या महामानवाच्या सद्विचारांचा प्रभाव सर्वांवर पडणे ही आजच्या काळाची गरज आहे आपण तर आचरणात आणूच पण आपल्या मुलांवर देखील हे संस्कार होणे गरजेचे आहे त्यांना हे वारंवार वाचून दाखवा. सर्वांनी प्रयत्न करावा ही सर्वांना हात जोडून विनंती.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
ॐ सद्गुरु परब्रह्माय नमो नमः
!!! स्वामी विवेकानंद !!!
भाग – ४.
बंगालमधील सुशिक्षित तरुणांनी ब्राम्होसमाजाच्या धार्मिक चळवळीत पुढाकार घेतला. या समाजाची स्थापना करणार्या राजा राममोहन राॅय (१७७४-१८३३) यांनी हिंदु धर्मातील कर्मकांडे, मुर्तिपुजा व पुरोहितगिरीपासुन फारकत घेतली, त्यांनी आपल्या शिष्यांना शाश्वत, अज्ञेय, निराकार इश्वराची पुजा व आराधना करण्याचा तसेच इश्वर या विश्वब्रम्हाडांचा शास्ता व निर्माता असल्याचे प्रतिपादन करुन आग्रहपुर्वक उपदेश केला. ब्राम्हो समाजातील प्रमुख नेते म्हणुन देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्रसेन या दोघांच्या नेतृत्वाखाली हिंदु धर्मातील कर्मकांडे, मुर्तिपुजेला विरोध केला. हिंदु विधवांचा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध, सतीप्रथा आणि शिक्षणाचा सार्वत्रिक पुर्णशक्तीनिशी प्रसार सुरु केला. नरेंद्रलाही ब्राम्हो
समाजाच्या पुरोगामी विचारांनी आकृष्ट केले व तो त्याचा सदस्यही झाला, पण त्याच्या आध्यात्मिक आकांक्षेची परिपुर्ती होऊ शकणार नव्हती.
याच काळात विवाहाकरितां एका धनवान वधुपित्याकडुन नरेंद्रचे इंग्लड मधील शिक्षणाचा सर्व खर्चाचा भार उचलण्याची तयारी दाखवली,पण नरेंद्राने या प्रस्तावास नकार दिला. त्याने गृहस्थजीवन जगावे ही नियतीची इच्छा नसावी.
बालपणापासुनच त्याच्या भावना विरक्तवादी होत्या,पण एखादे वेळी तारुण्यसुलभ भावनेने अप्रस्तुत आकर्षणाकडे मोहित झाला तरी अज्ञान शक्ती त्याला रोखत होती.त्याच्या मनात आईनेच ब्रम्हश्चर्याचे व चारित्र्याचे महत्व रुजवले होते. हिंदु धर्मशास्रानुसार ब्रह्यश्चर्य हाच सर्वश्रेष्ठ सद्गुण असणारी व्यक्तीच आध्यात्मिक अनुभुती घेऊ शकतो. याच धारणेमुळे एकाग्रता स्मरणशक्ती, द्रष्टेपणा,असामान्य प्रतिभा आणि शरीरबल हे विशेष गुण नरेंद्र प्राप्त करु शकला, नरेंद्रनाथांना तारुण्यदशेत रात्री झोपेत दोन परस्पर विरोधी स्वप्नदृष्ये दिसत, एक गुणसंपन्न पत्नी, मुलेबाळे, पैसा किर्ती,वैभव
व सामाजिक प्रतिष्ठा असणार्या संसारी माणसांचे, तर दुसरे दृष्य — सर्वत्यागी, निष्कांचन,इश्वराच्या ध्यानात बुडुन गेलेल्या संन्याशाचे! या दोहींची जेव्हा तो तुलना करी तेव्हा त्याचा अंतरात्मा तपःपूत त्यागमय जीवनाकडे खेचला जाई.
ब्राम्होसमाजाच्या चळवळीत कांही काळ नरेंद्र रमला पण यात अध्यात्मिक अनुभव मिळु शकत नाही हे लक्षात आल्यावर, ज्याने खरोखर इश्वर पाहिला अशाच व्यक्तीकडुन ज्ञान संपादन करण्याची तीव्र जिज्ञासा त्याच्या मनात जागृत झाली. त्याअनुषंगाने बरीच यातायात केल्यावर दक्षिणेश्वर येथील परमहंस रामकृष्ण या महापुरुषाची माहिती मिळाली.आधुनिक काळातील इश्वरावतार म्हणुन गणल्या जाणार्या श्री रामकृष्णांचा जन्म ऐका खेडेगांवात १८ फेब्रुवारी १८३६ रोजी झाला.नरेंद्रां च्या तुलनेत रामकृष्णांचे बालपण,संगोपन व परिस्थिती फार वेगळी होती. साध्यासुध्या ग्रामीण वातावरणात ते वाढले होते. त्यांना पुस्तकी विद्येची आवड नव्हती..ते जन्मभर निरक्षरच राहिलेत, पण आध्यात्मिकतेकडे तीव्र ओढ होती.सहाव्या वर्षीच त्यांना समाधीची अनुभुती आली. १६व्या वर्षी वडीलांचे निधन झाल्यामुळे कौंटुबिक अडचणींने ते कोलकात्याला वडील बंधुकडे राहायला गेले. तिथेही शिक्षण घेण्यास मनाई केली मात्र इश्वरानुभुतीची त्यांना तीव्र ओढ होती.
कोलकात्यातील दक्षिणेश्वर येथील जगदंबेच्या मंदिरात पुजारी म्हणुन काम स्विकारले.त्यांचे अंतःकरण कालीमातेच्या आराधना, भजन पुजनांत जेव्हा पुर्ण रमून जाई, त्यावेळी त्यांना अन्नग्रहण,निद्रा, देहपोषणाच्या इतर सर्व गोष्टींचा पुर्णपणे विसर पडत असे. शेवटी जगदंबेला त्याच्या प्रार्थनेला साद द्यावीच लागली.रामकृष्णांना जगन्मातेच्या अस्तित्वाची अनुभुती आल्याबरोबर त्यांची शुध्द हरपुन कोसळले. पण स्वतः मधे परमसुखाच्या प्रवाहाची अनुभुती घेत होते. त्यांना अखंड इश्वराचे दर्शन घडत राहावे असे वाटत.आपणामधे ब्रामह्मणत्वाचा अहंकार नष्ट व्हावा म्हणुन गुप्तपणे शौचालये साफ करु लागले. प्रत्येक स्रीस मातेच्या स्वरुपात पाहत असत. कित्येक वर्षे झोपेत पापण्या बंद न होत उघड्याच राहत.त्यांच्या अश्या वागण्याने त्यांना वेडाच समजत!
क्रमशः
!!! स्वामी विवेकानंद !!!
भाग – ५.
अध्यात्मिक तीव्रतेने रामकृष्णांची तब्बेत बिघडली म्हणुन ते कामारपुकुर ला आले. एकेकाळचा आनंदी असणारा मुलगा आता चिंतनशील अन्यमनस्क होऊन कुठेतरी नजर लावुन बसलेला आढळत असे. यावर उपाय म्हणुन त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. जगदंबेची इच्छा असेल म्हणुन त्यांनी मान्यता दिली. तीन मैलावर असलेल्या गावातील सारदामणिशी त्यांचा विवाह झाला.विवाहविधीत केवळ लौकिक उपचार म्हणुन अलिप्तपणे भाग घेतला. विवाहानंतर परत दक्षिणेश्वरात आले. व कठोर साधनामय अध्यात्मिक जीवन जगणे सुरु केले. नवपरिणीत बायको, आई व इतर नातेवाईकांना पार विसरुन गेले. सुयोग्य मार्गदर्शनानुसार त्यांना अनेक गुरु लाभले.त्यातच एक भैरवी ब्राम्हणी नावाची स्रीगुरु लाभली.तिच्या मार्गदर्शनाने रामकृष्णांनी वैष्णव पंथातील तंत्रसाधनेत अल्पावधीतच सिध्दी प्राप्त केली. रामकृष्ण हे इश्वरावतार आहे हे भैरवीने घोषीत केले,एवढेच नव्हे तर धर्मपंडीतांच्या सभेत शास्रांच्या आधारे सिध्दही करुन दाखवले.
जटाधारी नामक गुरुच्या मार्गदर्शना नुसार रामकृष्ण रामभक्तीच्या कठोर साधनेत इतकी प्रगती केली की, त्यांना प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन झाले. तोतापुरी नावाच्या तपःपूत संन्याशखकडुन संन्यास जीवनाची दीक्षा मिळाल्यावर केवळ तीन दिवसांत ब्रह्माशी एकत्व साधुन अध्यात्मिक साधनेची जिला कळस मानले जाते ती “अद्वैत अनुभुती” प्राप्त झाली. हीच अनुभुती प्राप्त होण्यास तोतापुरींना चाळीस वर्षे लागली. नंतर रामकृष्णांनी इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या ही साधना करुन पाहिल्या आणि हिंदु धर्म व या धर्मात इश्वराची अनूभुती सारखीच आहे हे लक्षात आले. स्वतःच्या पत्नीची, जी बाल्यावस्थेतुन एकोणीस वर्षाची, तिची साक्षात जगतजननी म्हणुन पुजा करुन आजवर केलेल्या सर्व साधनेच फळ तिला अर्पण केले.
कांही वर्षापुर्वी ज्याची वेडा म्हणुन जे लोकं थट्टा करीत होते, तेच आता हा तरुण पुजारी इश्वरभक्त तपस्वी झाल्याचे पाहुन अचंबित झाले. नंतर रामकृष्णांनी निरनिराळ्या मतप्रणालीच्या,विभिन्न बौध्दिक क्षमतेने सामाजिक स्तरांच्या स्री-पुरुषांना आपल्याकडे आकृष्ट करुन घेतले. त्यांनी आपल्या दिव्य ज्ञानाच्या अक्षय भांडारातुन सर्वांना मुक्तपणे दान केले. त्यानंतर त्यांचे अंतरंग शिष्य म्हणुन कांही तरुण आले.त्यात नरेंद्रनाथ हे त्यांच्यातील अग्रणी शिष्य होते.
नरेंद्र इतर शिष्यांपेक्षा वेगळा होता. त्याने पहिल्या भेटीत पुर्ण अंतःकरण ओतुन भजने गायली. ते ऐकुन रामकृष्ण रामकृष्ण खुप प्रभावित झाले, त्यांना हवा तसा शिष्य मिळाल्याचे समाधान वाटले.नरेंद्रने त्यांना विचारले, आपण इश्वर पाहिला का? ते तात्काळ उत्तरले, होय! प्रत्यक्ष इश्वरदर्शन घडले. “इश्वर प्राप्तीसाठी जो मनापासुन प्रामाणिक पणे जो प्रयत्न करतो तो निश्चितच इश्वराला पाहुं शकतो.”
दुसर्या भेटीत नरेंद्रला गुरुदेवांनी एक चमत्कार दाखवला.भावावस्थेतील नरेंद्रावर नजर केंद्रीत करुन उजव्या पायाचा त्याच्या शरीराला स्पर्श केल्या बरोबर नरेंद्रचे उघडे डोळे असुनही भोवतालचे संपुर्ण विश्वच लय पावत असुन तो स्वतःही एका शुन्यात विरुन जात आहे व आतां आपला मृत्यु होणार असे वाटल्याने त्याची पाचावर धारण बसली. जोरात ओरडुन म्हणाला, हे काय करताहात? माझे आई वडील आहेत ना? रामकृष्णांनी नरेंद्रच्या छाती वर हात फिरवल्याबरोबर तो सामान्य स्थितीत आला. त्याला कळाले की, रामकृष्णांनी आपल्यावर संमोहन शक्तीचा प्रयोग केला, पण इच्छाशक्ती जबरदस्त असल्यावरही हे कसे घडु शकले? तरीही रामकृष्णांबद्दल तीव्र आंतरिक आकर्षण जाणवले. तिसर्या वेळी नरेंद्र सावध राहुनही कांही करुं शकला नाही.रामकृष्णांनी त्याला पंचवटीत नेले. नरेंद्रला भावावेशात नेल्यावर त्याचे बाह्य भान पुर्णपणे हरपले.
क्रमशः
आपण काय बोध घ्यायचा?
जीवनातील प्रवासात ज्याच्याकडून काही चांगले गुण घेतले तोही गुरु व ज्याच्याकडून अवगुण त्यागण्यास शिकलो तोही गुरुच पण असे कितीही गुरु केले तरी योग्य सद्गुरु खेरीज जीवनाचे सार्थक व ब्रह्य प्राप्ती होतच नाही, व त्यासाठी योग्य वेळच यावी लागते. तोपर्यंत पराकोटीची साधना व आंतरिक तळमळ यांचा उद्रेक व्हावा लागतो ध्यासाने वेडे झाले पाहिजे…….
ॐ सद्गुरु परब्रह्माय नमो नमः
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.



















