आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

13. श्री समर्थ रामदास भाग १, (१ ते ५)
संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु!
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!श्री समर्थ रामदास !!
प्रस्तावना
नमस्कार!!
प्रत्येकाच्या ह्रदयाला हात घालणारी, सर्वांच्या जवळची, हवीहवीशी वाटणारी, जिव्हाळ्याची व्यक्तीरेखा आपल्यासमोर सादर करीत आहे.
संतवाड्ःमयाच्या अभ्यासकाला समर्थ वाड्ःमय टाळुन पुढे जाताच येत नाही. इतर संतापेक्षा अगदी वेगळी वाट चोखळलेला हा शस्रधारी संत! स्वान्तुसुखाय अध्यात्ममार्गाच्या बरोबरी नं पुरुषार्थ घडणार भक्कम समाजरचनेची आलोचना करणारा हा संत! माणुस-माणुस अंतर्बाह्य पारखुन शिवकारणासाठी जोडण्याचा प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरु! आणि धर्मगुरुपणाचा अहंकारी टीळाटोपीचा त्याग करुन रामाच्या उत्सवासाठी फक्त अकरा मुठी धान्याची अपेक्षा करणारा हा राजगुरु! अवघ्या संतमालिकेमधलं अगदी भिन्न प्रवृत्तीचं हे स्वरुप! समाजाभिमुख असुनही दासबोधाच्या निर्मितीच्या निमित्तानं म्हणा, अथवा सार्वसामान्याच्या बुध्दीची झेपही पोहचु शकणार नाही.
अशा कांही गुढ, अकालनीय कारणामुळे म्हणा, आयुष्यातील ८-१० वर्षे अवघ्या महाराष्र्टाला एक नवी दिशा एक नवे परिमाण देणारा, मराठी सिंहासन उभं राहण्याची प्रक्रीया घडत असणारा, मोगल आणिअदिलशाहीच्या मगरमिठीतुन निसटुन मराठी सिंहासनाधीश्वर निर्माण होण्याचीस्पंदने अवघ्या मातीत उचंबळत ठेवणारा, आनंदवन भुवनाची स्वप्ने पाहणारे समर्थ रामदास याच कालखंडात शिवथर प्रांतीच्या परिसराला एक गुढ असं वलय असणार्या या शिवथर प्रांती एकांत वासात आपले ध्येय गाठण्यासाठी वास्तव्य व्यतीत करुन होते.
अशा दुर्गमस्थळी समर्थ कां वास्तव्य करुन राहिले असावे, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे हेच ऊत्तर असु शकेल की, त्यावेळची जनसामान्याची परिस्थिती, त्यांचे अज्ञान दूर व्हावे या दृष्टीकोणातुन लोकशिक्षण देणारा व पुरुषार्थ जगविणारा दासबोध अशाच परिसरात लिहायचे समर्थांच्या मानसी असावे. महाराष्र्टाला मिळालेला दुहिचा फितुरीचा, परधार्जिपणाचा शाप, त्या काळच्या वतनदार, जहागीरदार,पाळेगा र यांच्यातील दुर्गुणांचा नाश, मोगलांचे किंवा अदिलशाहीचे पाय चाटुन इनामाच्या आणि वतनांच्या सनदा स्वतःच्या नांवे करुन, जनतेची पिळवणुक, त्यांच्या आया बहिणी भ्रष्ट करणार्या तथाकथित लोकनेत्यांना वठणीवर आणुन सार्या प्रजेवर पितृवत प्रेम करणारा एकनिष्ठ राजा म्हणून शिवाजीराजांमधे या सर्व खुणा समर्थांना दिसल्या असाव्यात.
दासबोध लिखाण एवढच कारण असतं तर, गुप्तता पाळण्याची अवश्यकता नव्हती. पण! त्याना तिथे राहुन मोठे राजकारण घडवायचे होते. जावळी प्रकरण, अफझलखान प्रचंड सेनेनीशी स्वराज्यावर चालुन येत आहे अशा प्रकारच्या हालचालींची माहिती समर्थ आपल्या शिष्यरुपी हेराद्वारे शिवाजी महाराजांना अवगत करीत असावे.
समर्था ! तू काळातीत…. देहधारी नाहीसच… तू एक सुविचार, एक स्फुलिंग, एक चेतना, एक प्रेरणा, पृथ्वी पादक्रांत करणारी, पुरुषार्थ फुलविणारी, माणुसपण जागविणारी…देवपण चेतवणारी… पंचमहाभुतांना ओलांडुन सुर्य मंडळाला भेदून जाणारी… तुझ्या श्वासनिश्वासांत महाराष्र्ट सामावला आहे….
तुझ्या विचारांचे स्फुलिंग… भविष्यकाळात तुझ्या या रुद्ररुपाचे सदैव स्मरण ठेवुन सांगतील, नरामधला नारायण रामरुप झाला आहे.
चुकभूल माफ करुन आपल्या क्रीया प्रक्रीया अपेक्षित!
मिनाक्षी देशमुख
!! श्री समर्थ रामदास !!
भाग – १.
दहा गांवचे कुळकर्णीपद असलेले जांब नगरीचे कुळकर्णी सुर्याजी ठोसर व त्यांची पत्नी राणुबाई यांच्या संसारवेली वर दोन फुले उमललीत, थोरला गंगाधरपंत, आणि चैत्र नवमीला, एकवचनी, एकबाणी, दुरितांचा निःपात करणारा, प्रजाहितदक्ष धनुर्धारी प्रभू रामचंद्र ज्या सुमुहुर्तावर जन्मास आलेत त्याच मुहुर्तावर धाकट्या नारायणाचा जन्म झाला. त्याच क्षणी त्याचा पिंडही निश्चित झाला. ज्योतिष्याने वर्तवलेल्या भविष्यानुसार नारायण मारोतीरायाचा अंश असुन त्याच्यावर प्रभु रामचंद्राचा अनुग्रह असेल. ताह्यात विश्वकल्याणाकरितां सदैव तत्पर असेल
कळत्या नाकळत्या वयातच तो आई, राणुबाईला म्हणायचा…” चिंता करतो विश्वाची…”! कांही दिवसानंतर सुर्याजीपंतानी जलसमाधी घेऊन आपली इहयात्रा संपवल्यामुळे थोरला गंगाधरपंत नारायणापेक्षा फक्त तीनच वर्षाने मोठा असुन वडीलांच्या माघारी एकट्यालाच कुळकर्णीपद सांभाळणे, प्रपंच्याच्या जबाबदारीचे ओझे त्याच्या खांद्यावर येऊन पडले. आई राणुबाई नारायणाला म्हणाली, तुही जरा लक्ष घालायला हवय! तुला अकरावं वरिस लागल! विश्वाच्या आधी या मांडलेल्या प्रपंचाची थोडी तरी चिंता कर!”
जन्माला आल्यापासुन प्रपंच्याचा विचार सारेच जण करतात आई! काय मिळत त्यांना? खांद्यावर गुलामगिरीचं जूं आणि नाकातत पारतंत्र्याचं वेसण! माणसातल माणुसपण हरवत आहे. कुणी तरी या सार्यांची चिंता करायला हवीच ना! राणुबाई क्षणभर अस्वस्थ झाल्यात.” मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” त्याप्रमाणे नारायणाच्या ललाटी सटवाईने लिहिलेला अदृष्य लेख कांहीसा धूसरपणे त्यांना दिसु लागला. त्या थोडाश्या दुखावल्या, बर्याचश्या धास्तावल्या, म्हणाल्या…. विश्वाची चिंता करतांना या विश्वात आपल्याला जन्म देणारी एक आई आहे एवढं मात्र विसरु नकोस म्हणजे झालं!
जवळच्याच पंचवटीच्या सानिध्याने जाम गांव जणु प्रभु रामचंद्रा ची दक्षिणेकडची राजधानीच वाटत होती. गावांत नांदणारे चारही वर्ण सुखी होते. विद्या, तप, आणि सुचिता, न्याय आणि निती हे जीवनसुत्र मानणारे, विद्वान ब्रम्हवृदांचा यथायोग्य मान ठेवणे कथा, किर्तन, निरुपण, प्रवचन या सतत च्या श्रवणामुळे मनांत आपोआपच परमार्थ बुधदी जागृत होत होती. घरोघरी समाधरणा चालत, कोणीही विन्मुख जात नसे. या सर्व वातावरणाचा परिणाम नारायणावर झाला नसतां तर नवलच!
एकदा नारायण आईला विचारतो, आई! लोक रामजन्म साजरा कां करतात? ” आदर्श पुरुषोत्तमाच्या अवताराचं स्मरण म्हणुन! नारायण म्हणाला, मी तर अहोरात्र त्याच्याच नावाचं स्मरण करतो. नारायणा! रामाचं स्मरण केलं तर महापापी सुध्दा पुण्यश्र्लोक होतो.. वाल्याचा वाल्मीकीही होतो.पण स्मरणाबरोबर कठोर साधनाही करावी लागते. त्याने विचारले, मी अशी साधना केली तर? आई म्हणाली, अशी साधना कर की, तुझ्यावर अवलंबुन असलेले कृतार्थ होतील. संसारिकाला प्रपंच्याच्या जबाबदार्या टाळुन साधना करतां येत नाही. ऊत्तम प्रपंच करणं ही सुध्दा साधनाच असते……
क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख
!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – २.
स्वतःच्या पोळीवरच फक्त तुप ओढुन घेणारे तर सर्वच संसार करतात आई! रयत वेठीस धरुन रयतेचे श्रम राजाच्या विलासाठीच! बर! राजा तरी स्वकीय आहे कां? तो तर परकीयच. ना धर्माचा, ना वंशाचा! स्वकीयाचं शोषण आणि परकीयाचं लांगुलचालन हीच इथली लोकरीती! माझी साधना यापेक्षा अधिक मोठी व व्यापक असेल.
बरं बाबा! पण येत्या फाल्गुनात तुझ्या लग्नाची तिथी ठरवतीय, बोहल्या वर उभा तरी राहशील ना? आई, मी माझे वचन पाळीन. बोहल्यावर नक्की उभा राहीन, त्यानंतर प्रभू रामचंद्र जे घडवतील तसे घडेल! गुढपणेहसत देवघरांत पाटावर शून्यात बघत बसलेला पाहुन गंगाधरपंतांनी विचारले, का रे! बाबा! पुन्हा मौनमुद्रा? नारायण म्हणाले, दादा तुम्ही वडील भाऊ! पण मनांत जे उचंबळुन येते ते तुमच्याशिवाय कोणास सांगणार? आपणच मला उपदेश द्यावा, तो अधिकार आपलाच आहे.
अरे, तू तर प्रभू रामचंद्राचा अनुग्रहीत! वेदोक्त महावाक्य सांगुन तुझ्या ब्रम्हस्वरुपाची जाणीव करुन त्यांनु तुला उपदेश केला व प्रत्यक्ष मारुतीरायाच्या हाती तुला सोपवले. यापरते आणखी उपदेशाची तुला काय आवश्यकता? नारायणाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग शब्दातीत उभा राहिला. प्रभूरामचंद्राचं सगुण दर्शन घडलं, त्यांनी देवघरांतील ठेवलेला अर्धचंद्राकृती बाण, हुर्मुजी वस्र दिलं. त्याचं दिव्य तेज सहन झालं नाही. सार्या दिशा महाप्रचंड ध्वनीने दणाणून गेल्या.वाटलं अवघ ब्रम्हांडच अंगावर कोसळत आहे. सारं अंग थरथर कापु लागलं जणुं दातखीळ बसली. विजेसारखं लखवखीत वस्र परिधान केलेली दिव्य तेज असलेली राममुर्ती, वामांगी सीतामाई, पाठीशी सौमित्र लक्ष्मण, पुढे वीर हनुमान उभा, अशा श्रीरामचंद्रांनी “अहं ब्राम्हास्मि” या महावाक्याचा उपदेश करुन माझा हात वीर मारुतीरायाच्या हाती देऊन ते क्षणा र्धात अंतर्धान पावले, एक क्षणभर मी मला हरवुन गेलो. त्या मौनकाळात एकांती सदैव श्रीरामाचा आदेश एकु येत असे. नारायणा! काय आदेश आहे रघुपतींचा? भारावुन कुतुहलाने गंगाधरपंतानी विचारल्यावर, नारायण सांगु लागले. “सांप्रत धर्माला ग्लानी आली, धर्मस्थळं बाजार झालीत, देवस्थानं फुटली, प्रतिष्ठापना झालेल्या सहस्रावधी मूर्ती भंगल्या. राष्र्टाप्रमाणे धर्मावरही परचक्र आलं, ब्राम्हणांच ब्रम्हतेज लोप पावलं. क्षत्रियांची खड्गं गंजली, बाण तुटले! धनुष्य मोडली, वैशांनी व्यवसाय नीती सोडली, शुद्र अधिकच पायदळी तुडवला जात आहे . स्री-बालंकावर अन्याय, कुलस्री विटंबली, बालके बाटविली. या सर्वांना रोखण्यासाठी, आळा घालण्यासाठी मारुतीचा अंश म्हणुन निर्माण केले, आतां दक्षिणदेशी कृषातीरी जाऊन धर्मस्थापना, भक्ती आणि उपासना वाढवुन जगाद्धार कर हा आदेश आहे प्रभु रामचंद्राचा!
हे ऐकून गंगाधरपंत तेजस्वीपणे म्हणाले, “नारायणा! तू खरोखरीच फार भाग्यवान! प्रत्यक्ष रामरायाचं सगुन दर्शन तुला घडलं! त्यांच्या उपदेशानुसार धर्मजागृतीचं महान कार्य करतांना चार दिशांच्या भिंतीचे बंधही तुला अडवू शकणार नाही. उदासीन वृत्ती सोडुन लोकाभिमूख हो…… पण दादा! अईच्या मायेचा उंबरठा कसा ओलांडु? सार्या विश्वाचे आर्त हाक आणि मातेच्या वात्सल्याची थरथरती ज्योत प्रपंचाकडे खेचत आहे, काय अंतरु? नी, काय स्वीकारु?
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!! श्री समर्थ रामदास !!
भाग – ३.
नारायणाच्या डोळ्यांतील तराळलेलं पाणी आपल्या उपरण्याने पुसत गंगाधरपंत म्हणाले, ” ज्याला माते ची महती कळली, तो नरजन्मी कृतार्थ होतो. ज्याला मातीची माया जाणवते तो मृत्युनंतरही अमर होतो. शालीवाहना प्रमाणे तूं मातीतुन सैनिक निर्माण करशील, मात्र त्यासाठी जन्मदात्रीचाही विरह तुला सहन करावा लागेल…. पण आईने मला वचनात अडकवले, दिलेला शब्द कसा मोडायचा? जाऊ दे! तुझ्या विवाहाला अजुन बराच अवकाश आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती प्रभू रामचंद्र नक्की देतील.आज नारायणाच्या असलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गंगाधरपंत निघुन गेले.
पंचवटीमधील राममंदिरात जन्मोत्सव अगदी रंगात आलेला असतां ना गावच्या वेशीतुन ५०-६० हशम उद्दामपणे गांवात शिरुन सर्वीकडे धुमाकुळ माजवुन टोळधाड आली तशी निघुन गेली. हे हशम कोणाचे? कुतुबशाहीचे? निजामाचे? की आदिलशाहीचे? देश,देव धर्माचा विचार कुणीच करेनासे झाले. दीनपणे अश्रु गाळणे व दिर्घ सुस्कारे सोडणे एवढच गांवचे पाटील चावडीत बसुन करत होते. चिडलेला नारायण तीरासारखा चावडीत शिरुन पाटलाला म्हणाला, चला! रामनामाच्या पर्वकाळी गांवावर ही अस्मानी सुल्तानी कोसळली आणि आपण इथे स्वस्थ बसुन अश्रु ढाळण्या पेक्षा अमंलदाराला जाब विचारायला जाऊ या!
पाटीलकी जाईल या भितीने पाटलाने हताशपणे नकार दर्शवल्यावर, नारायण म्हणाला, पाटील! वतनं येतात आणि जातात पण हरवलेलं माणुसपण कधीही परत येत नाही. कीडा मुंगीचे कणाहिन जीणं जगण्यापेक्षा सज्जनापुढे विनम्र व ऊध्दटापुढे उध्दट या नव्या विचाराने वागणे जमत नसेल तर मी गांवातील तरुनांना शस्रविद्या शिकवुन, शस्रधारी बलसैन्यासह दौलताबादच्या सुभेदारापुढे ऊभा राहुन न्यायाची मागणी करतो. करशील बाबा कांहीही अशक्य नाही, हनुमानाचा अवतार ना तूं! त्याने शेपटाने लंका जाळली, तू दे सार्या सुलतानशाह्या पेटवून! पुरुषार्थहीन पाटलांच्या नादी न लागतां नारायण तिरामिरीत चावडीतुन घरी निघाला. घरांघरांतुन क्रदन आणि उमासे ऐकु येऊ लागले. घरी सर्वजन नारायणाच्या चिंतेने व्याकुळ झाले होते.
नारायण वडील बंधु समोर बसुन असतां गंगाधरपंत म्हणाले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आचरणांत आणतांना प्रत्येक क्षणी विवेकबुध्दीचा जो वापर करतो तोच खरा पुर्ण पुरुष! सध्या तू लहान आहेस! थोडा विवेक धरुन प्रथम समर्थ हो! कदाचित भविष्यकाळात हाच विवेक कुणा महामानवाला सांगावा लागेल.
वैशाख वणव्यात सारा आसमंत होरपळुन निघाला.दुष्काळाने सर्वत्र होळी झालेली. क्षत्रियांची शस्रे बोथटली. शुद्र अधिकच केविलवाणा झाला. दुष्काळाने सारी प्रजाच गांजून गेली. ओंजळभर पाण्यासाठी तापलेल्या भूमीवरुन मैलामैलाची वणवण करणं नशीबी आलय……,!!
एके दिवशी पहाटेस जांबेचे पाटील अंबाजी शेतात एकाएकी चक्कर येऊन कातळावर कोसळल्यामुळे क्षणांत गतप्राण झाले. दुष्काळाने गांवपाटलाचा बळी घेतला….. पाटीलीण सती गेली… अबंडच्या अमंलदार हशमांच्या टोळीने, या वर्षीचा सारा पाटलाने भरला नसल्या मुळे पाटलाच्या वाड्यावरुन नांगर फिररवला. आज पाटलाचं घर उठलं, उद्या इमानदार, परवा आपली कुळकर्णी पदाची हीच गत होईल दादा!
आतां अंबडच्या अमंलदाराला जाब विचारण्याची, शम्मीच्या झाडावरची शस्रं काढण्याची वेळ आली आहे. नारायण तळमळुन बोलत होता.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!!! श्री समर्थ रामदास !!!
भाग – ४.
नारायणाचे अश्रुपुर्ण तळमळीचे बोल ऐकुन गंगाधरपंत म्हणाले! रयतेला पारतंत्र्यात जगण्याची, ठसठसणार्या वेदनेची संवय झालेली आहे! जोपर्यंत इथे स्वतंत्र, स्वकीय राजा नाही तोपर्यत हे असच चालायचय.. तू प्रथम सर्वार्थाने समर्थ हो….. देह जरी मर्त्य आहे हे जरी खरं असलं तरी पुर्ण पुरुष होण्यासाठी देह-मनाच्या दुःखालाही सुख मानण्या ची वृत्ती तयार व्हावी लागते, त्यासाठी साधना करुन साधक हो….. पुर्व पुण्या ईने मिळालेल्या प्रभु रामचद्राचा आशीर्वाद आणि महारुद्र हनुमानाचं सदैव सानिध्य दोन्हीही तुझ्या पुढच्या वाटचालीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील….!”
सभोवतालची परिस्थिती पाहुन नारायण अधिकाधिक व्यथीत होत होता. कलियुगाच्या या खुणा कोन पुसणार? धर्म थराथरा कापतो आहे. राजा यवनदेशीचा! सत्य आणि स्वधर्म कुणालाच उमजेना. यवनांनी अगदी उच्छाद मांडला. कुलीन स्रीया भ्रष्टविल्या. या सार्याचं उत्तररदायीत्व घ्यावं तर आपण ब्राम्हणकुळी जन्ममलो. फारच झालं तर अभिमानाने जगण्याचा विचार समाजामधे रुजवु शकतो. राजा हा क्षत्रियच हवा. दुर्जनाशी चार हात करण्यासाठी स्वतःची शारिरीक शक्ती, क्षमता, चापल्य बाणवण्यासाठी घराच्या चार भिंतीतुन बाहेर पडायलाच हवय.. तप,साधना करणे संसारांत राहुन अशक्य आहे. पण आईला दिलेलं वचनानुसार बोहल्यावर उभं राहण्यापुरतच! अंतरपाट दूर होण्या पुर्वीच या मायेच्या कोषातुन निसटुन खुप दूर गेलं पाहिजे. तपश्चर्येसाठी गांव घर आणि सांसारिक पाश तोडण्याचा कठोर निर्णय नारायणानं घेतला.
नारायणाच्या लग्नाची तयारी जोरात सुरु झाली. यांत्रीक प्रमाणे तो सार्या विधी उरकवित होता आणि मनांत विचारांची आवर्तने फिरत होती. गंगाधरपंतांना त्याची होत असलेली घालमेल दिसत होती. संसारात पदार्पन करण्याच्या आदल्या रात्री मनाने तो संसारव्यापातुन पुर्णपणे मुक्त झाल्याने अतिताकडे झेप घेण्याची त्याच्या मनाची पुर्ण तयारी झाली होती फक्त मारुतीरायाच्या आदेशाची प्रतिक्षा होती. विचारांच्या आवर्तनात असतांनाच त्यांना रामभक्त हनुमंताचे भीमकाय स्वरुप डोळ्यात साठवुन पाहत होते. आणि अंजनीसुत हनुमान! नारायणाला सर्वांगे निरखित आपल्याच स्वरुपात साठवुन घेत सारी शक्ती, भक्ती, बुध्दी, चातुर्य, स्थिरता, चपलता यांचा वर्षाव नारायणावर करुन प्रभू रामचंद्राने सोपवलेली जबाबदारी पार पाडीत होते. झेप घेण्याचा क्षण उंबरठ्यावर आला, नारायणा…..! स्निग्ध स्वरांत मारुतीराय उद्गारले उगवलेला सुर्य मावळण्याआधी उड्डाण करायला हवय! हा मूहुर्त टळला तर सारं जीवन करपून जाईल!
आपल्या अनुज्ञेचीच वाट पाहत होतो किष्कींधापती!” विनम्रपणे नारायण म्हणाला, पण मातोश्रींना दिलेले वचन?
ती माया आहे. तू ब्रम्ह आहेस. मायापाशात अडकु नकोस…!
परंतु पुत्र कर्तव्य…?
तेही योग्यवेळी आचरणांत आणतां येईल. उद्याचा सुर्य तुला स्वतःच्या कर्तव्याकडे नेणारा असेल!” गोदातीरा च्या खर्या पंचवटीकडे, जीथं प्रभू राम चंद्राचा अजुनही निवास आहे. सीतामाई वृक्षछाया होऊन साधकांना सावली देते. सौमित्र सुक्ष्मरुपाने दुष्ट शक्तींना पिटाळण्यासाठी अहोरात्र उभा आहे. मीही तिथेच प्रभू रामचंद्रांचा दासानुदास वास करतो. तुला प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त असल्याने मी तुझाही दास होईन….!
आपण माझे सद्गुरु! आपला सहवास हे परमभाग्य. जीथे मी जाईन तीथे आपल्या मुर्तीची स्थापना करुन त्या सार्या मूर्तींमधे चेतनारुपानं वास्तव्य करीन…..!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
!!! श्री समर्थ रामदास !!!!
भाग – ५.
गहिवरुन नारायण म्हणाले, बलभीमा मारुतीराया आपण सिध्दयोगी वार्याप्रमाणे आपला मनोवेग, सार्या इंद्रियाला जिंकलेलं, श्रेष्ठ बुध्दीचं वरदान लाभलेलं, वानरकुळीचे प्रमूख, प्रत्यक्ष रामचंद्रांचे प्रथमदूत! आपल्यापुढे मी यतःकिंचित बालक, आपण दाखवाल तो राजमार्ग! सांगाल तो गुरुमंत्र… आणि हातुन घडवाल ते कर्तव्य!नारायणा, उठ! तुला प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनी वेदोक्त महावाक्याची दिक्षा दिली आहे, तू माझा गुरुबंधु! जीथं तू तिथं माझं वास्तव्य अवश्य राहील….!”
इकडे विवाहाची तयारी जोरात सुरु झाली. सनईवर राजदारी आळवुन अष्टमीला असलेल्या नारायणाच्या विवाहाचे आमंत्रण सार्या गांवाला गेले. सध्या घरांतल्यांना कोणाला दुखवायचे नाही म्हणुन हळद लावुन घेणे,वगैरे इतर विधी सद्गदित अंतःकरणाने करीत होते. सजलेल्या गाडीत बसुन वर्हाड वधुघरच्या मांडवात निघाले. आणि नारायणाचं भवितव्य रामचंद्राच्या आणि मारुतीरायाच्या हाती असल्याची जाणीव असलेले गंगाधरपंत मात्र निर्विकार, निर्विकल्प होते…!
विवाहापुर्वीचे सारे विधी नारायण शांतपणे पार पाडीत होते. शालू नेसले ली, सुवर्णालंकारांनी नटलेली वधु बोहल्याकडे मंद गतीने येत होती. जमलेल्या लोकांमधे गंगाधरपंतांची व नारायणाची दृष्टादृृष्ट झाली. नारायण क्षणभर भांबावले. गंगाधरांच्या ठीकाणी रात्री स्वप्नात भेटलेले महारुद्र हनुमान दिसू लागले. मांडवाच्या दारातील केळीच्या महिरपीत रामपंचायतन उभं असलेलं दिसले. त्यांच्या मुखावर दिव्य हास्य विलसत असलेलं दिसले. सीतामाई आशीर्वादाचा वरदहस्तात, सौमित्र लक्ष्मण सुहास्य वदनाने साद घालीत आहे, भरत शत्रुघ्न सरयुच्या वाळवंटी मांडलेल्या विश्वशांती यज्ञाचं आवतन द्यायला जणुं आलेत असं तिव्रतेने जाणवुं लागले….!
वर वधू अंतरपाट्याच्या समोरा समोर उभे ठाकलेत. नारायणाच्या अंतःकरणांत वादळ उसळलं.मांडवाच्या दारातील रामपंचायत गुप्त झालं नी मारुती रायाच्या ठीकाणी परत गंगाधरपंत उभे दिसले. वधुवरांवर अक्षता उधळल्या. शुभ मंगलम् सावधान” असा गजर झाला. बाहेरच्या झाडावरील माकडांनी उच्च स्वरांत भुभुःकार केला. स्वतःच्या मनावर कठोर कर्तव्याच्या स्मरणाचं कवच घातल. आई, थोरला भाऊ!पार्वती वहिणी! वागःदत्त वधू, आशिर्वाद देणारे ब्राम्हण, जमलेले सगे सोयरे या कुणाचाही विचार न करतां नारायणाने उडी मारुन विजेच्या चपळाईने गर्दीला दूर सारुन वाट फुटेल तिकडे पळत ओढा ओलांडुन दुसर्या तीरावर आला, अचानक वादळवारे सुटुन, विजा चमकु लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन्ही काठाने ओढा तुडुंब भरल्याने नारायणाचा पाठलाग करणारे लोक अडकुन पडले.
मुसळधार पाऊस थांबला, पण वीज बाभुळवनावर पडल्याने उन्हाळ्याच्या तिव्र कडाक्याने वाळुन गेलेले बाभळवन धडाडुन पेटले. सारा मांडव उध्वस्त झाला. बोहोलं उधळलं, अक्षता चिखलांत पसरल्या. राणुबाईचा आक्रोश पहावल्या जात नव्हता. वहिणी पार्वती त्यांचे अश्रु पुसण्याचा प्रयत्न करीत होती. न झालेली धाकटी सुन देव घरातल्या विखुरलेल्या गौरीहारासमोर बसुन अपल्या प्रारब्धाला दोष देत मुसमुसत होती. शोधायला गेलेले लोकं नारायण सांपडत नाही म्हणुन हताश होऊन परत आलेत. राणूबाई कठड्या वर डोकं आपटत आहेसे पाहुन गंगाधर धावत आले.
क्रमशः संकलन-मिनाक्षी देशमुख.



















