16. संत तुकाराम महाराज चरीत्र भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


          पुण्याच्या उत्तरेस सुमारे दहा कोसांवर इंद्रायणी नदीच्या तीरी देहु हे तुकारामाचे जन्म गांव. देहु गावातील प्रतिष्ठीत घराण्यांत तुकोबांच्या घराण्याची गणना होत होती. या घराण्याकडे महाजनकीची मिरास, बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा, महाजनकीचा अधिकार व उत्पन्न, श्रीसंनिध वाडा आणि श्रीची पुजाअर्चा पुर्वीपासुन होते.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! संत तुकाराम महाराज चरित्र  !!!

!!! संत तुकाराम !!!

प्रस्तावना…. ! 

आतापर्यत रामायण, महाभारतातील पात्रांचे आपण उत्साहाने स्वागत केलेत.

आता ज्यांच्यामुळं भागवत धर्माची पताका महाराष्टातील घरांघरांत झाला, ते पात्र घेऊन येत आहे.

*संत तुकाराम महाराज !*

 भाग-१

 तुकाराम महाराज यांचे चरित्र्य सुरुवात करण्यापुर्वी त्यांच्या पुर्वीच्या सात-आठ पिढ्यांची माहिती सांगणे आवश्यक आहे, कारण तुकाराम कसे घडले ?  विठ्ठलाच्या भजनी कसे लागले ? त्याशिवाय कळणार नाही.

पुण्याच्या उत्तरेस सुमारे दहा कोसांवर इंद्रायणी नदीच्या तीरी देहु हे तुकारामाचे जन्म गांव. देहु गावातील प्रतिष्ठीत घराण्यांत तुकोबांच्या घराण्याची गणना होत होती. या घराण्याकडे महाजनकीची मिरास, बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा, महाजनकीचा अधिकार व उत्पन्न, श्रीसंनिध वाडा आणि श्रीची पुजाअर्चा पुर्वीपासुन होते. याशिवाय त्यांचे वडिल शेती, सावकारी, आणि वाण्याचे दुकान चालवित. विठोबा हे त्यांचे कुलदैवत !

 सातार्‍या जिल्हात जावळी येथे मोरे घराणे शेकडों वर्षे नांदत होते. महाराष्टातील मराठा सरदारात या घराण्याला बरेच महत्व होते. परंतु कौरव-पांडवांपासुन चालत आलेली क्षत्रियातील भाऊबंदकी ह्या मोरे घराण्यांत जन्माला आल्यामुळे अनेक अनिष्ट प्रकार होऊ लागल्यामुळे घराण्यांच्या लौकीकास कमीपणा येऊ लागला. या सर्व गोष्टींमुळे विश्वंभराचे मन उचाट, उदास झाल्याने त्यांनी घरादाराचा, भाऊबंदगीचा त्याग करुन कायमची जावळी सोडुन देहु गांवी कायमचे वास्तव्य केले. थोड्याच दिवसांत देहु गांवची महाजनकी, शेतीवाडी संपादन करुन घराण्याच्या मुळ  वैभवास साजेसा लौकीक मिळवला. पण एवढे करुनही त्यांना समाधान लाभेना. संसाराची उदासीनता वाढु लागली. संसारसुखापेक्षा परमार्थाकडे त्यांचा कल दिसुं लागला.

 विश्वभरांनी संसारांतुन मन काढून अहोरात्र भजनांत वेळ   घालवुन पंढरपुरच्या अनेक वार्‍या केल्यात. पुढे ते थकल्यामुळे वारी करतां येत नसल्यामुळे ते सारखे तळमळत. त्यांची भक्ती पाहुन त्यांना दृष्टांत झाला      की, आंबेवनात विठोबाची  यां मुर्ति आहे तीचे पुजन कर !

 त्यांनी गांवकर्‍यांच्या सहाय्याने आंबेवनात सापडलेली मुर्ती वाजत गाजत आणुन इंद्रायणी तीरी विश्वंभराच्या घराजवळ मोठ्या समारंभाने मुर्तिची स्थापना करुन देऊळ बांधले.

 विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचा मुलगा बोल्होबा! बोल्होबाचा आणि कनकाईचा चाळीस वर्षानंतर झालेला पुत्र म्हणजेच तुकोबा, आपले तुकाराम महाराज!

 विश्वंभर व त्यांची बायको आमाबाई ह्यांना हरी व मुकुंद असे दोन पुत्र होते. त्या दोघांनी चंदीचंदावरकरांचे पदरी नोकरी धरुन पराक्रमाने सरदारकी मिळवली. विश्वंभर मरण पावल्यावर पुत्रांनी आमाबाईला व कुटुंबाला चंदीचंदावरला नेले. पण तीचे मन देहुकडेच लागले होते. पुढे परचक्र येऊन लढाईत दोघेही ठार झालेत. दोन्ही सुनांपैकी एक गर्भवती होती. तीला विठोबा नांवाचा मुलगा झाला.

        क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-२

 बल्होबांना तीन मुलं, सावजी, तुकाराम, कान्होबा! सावजीचा पुर्वीपासुनच वैराग्याकडे कल होता. धाकटा कान्होबा पुढे तुकारामाचा शिष्य झाला. तुकोबांचे मुळ पुरुष विश्वंभर यांनी देहुस आले ते केवळ भक्ती व जिवंत धार्मिक भावना यांच्या बळावरच !  त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पन करुन सामाजासाठी राष्टभक्तिचा मार्ग मोकळा करुन दिला. मागील सहा पिढ्यांचा धार्मिक कमाईचा वारसा बोल्होबा मोरे यांना मिळाला.

 बोल्होबांची वडीलोपार्जित खरी मिरासदारी विठ्ठल भक्ती तुकोबांना मिळाली. त्यांची पत्नी कनकाईचीही भक्ती उत्कट होती.

 अशा या महान आईबापांनी तुकाराम महाराजांना जन्म दिला म्हणण्यापेक्षा महाराष्टधर्म! मानवधर्म, भक्ती, त्याग, वैराग्य व महाराष्टाचे भाग्यासच जन्म दिला असे म्हणणे संयुक्तीक होईल. महाराष्टाचा नवा मनु जन्मास आला. त्यावेळी महाराष्टाची राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थीती मृतप्राय होऊन तीला घाण येऊ लागली होती.

 महाराष्टाची बहुसंख्य जनता गुलाम होते. उच्चनिचतेचे शिखर गाठल्याने हिंदु समाज विस्कळीत झाला होती. अशी सर्व परिस्थिती सुधारण्यासाठीच त्यांचा जन्म  झाला म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

 तुकोबांच्या जातीवरुनही त्यावेळी बराच हलकल्होळ माजला होता. जातीजातीतील विषमता त्यांच्या मनाला फार डाचत असे. विठोबाची कास धरल्याने जातकुळीचा भेदभाव नष्ट होतो हे त्यांनी पुनः पुनः सांगीतले. पण त्यावेळी जातीजातीतील द्वेष, मत्सर नीट लक्षांत घेतल्याशिवाय त्यांच्या अभंगाचे मर्म कळणार नाही.

 वास्तविक तुकोबांचे मोरे घराणे देशमुखी, वतनदारीचे, पण त्यांचा वाण्याचा धंदा असल्यामुळे त्यांना शुद्र समजत होते. त्यांनी महप्रयासाने अभंग रचना केली. या अभंगामुळे समाजाचे खरे हित होणार होते पण वाघोलीच्या रामेश्वर भटजींनी सर्व अभंग नदीत खोलवर बुडवले. हेच त्यावेळी धार्मिक स्वातंत्र्य होते का?

 महाराजांची खरी योग्यता जातीवर नसुन निर्मळ भक्ती, सत्याचारण, अहिंसा, हीन-दीनांबद्दलची जागती कळवळ, भागवत धर्माची द्वारे सर्वांसाठी खुली करणे,

 उच्चनिचतेची कृत्रिमता गाडणे, रुढीच्या दास्यातुन सर्वास मुक्त करणे, वर्णाश्रमधर्माबाबत उघड बंड करणे, परधर्मियाच्या धार्मिक आक्रमणास अटकाव करणे आणि महाराष्टातील बहुसंख्य लोकात चालु काळाबद्दलची जाणीव उत्पन्न करणे, वगैरे राष्टोध्दाराचा बाबींवर त्यांचा भर होता.

 अशा एकंदर महत्वाच्या गोष्टींमुळे महाराष्टातील आबालवृध्दांच्या ह्रदयात कायम ठाव करुन असेल, तोपर्यंत मानवी मन हे धर्म व भक्तीस बांधील राहिल आणि  इतिहास जिवंत राहिल. महाराष्टाच्या ह्रदयात तुकाराम महाराजांची जागा कायम राहील.

 तुकोबा हे व्यापकपणे चहुवर्णातीत होते कारण ते ब्रम्हनिष्ठ होते.

 ब्रम्ह जाणे तो ब्राम्हण !

 रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग,

अंतर्मन व बाहेर जनांशी युध्द करुन दोहोंवर जय मिळवला म्हणुन क्षत्रिय!

संताचा उदीम उपदेशाचा, भक्तीप्रेमाचा देवघेवचा व्यापार जन्मभर केला म्हणुन वैश्य! आणि पांडुरंगाची, जनता जनार्धनाची त्यांनी निष्काम भावनेने सेवा केली म्हणुन शुद्र ठरतात. बरं ते चहुवर्णाच्या पलीकडे गेले होते. स्वानुभव सुर्यापुढे. सारेच विचार तुच्छ ठरतात

       क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-३

 बोल्होबा मोरे संसारातील सर्व व्यवहार अगदी दक्षतेने करीत असत, परंतु त्यांत ते गुंतलेले नव्हते. कारण संसारापेक्षा विठ्ठलभक्तीस विशेष महत्व देत. विश्वभरांच्या भक्तीमुळे देहु गावास क्षेत्राचे महात्म्य प्राप्त झाले. त्यांनी लावलेला भक्तीरुप वृक्ष त्यांच्या नंतरच्या सर्व पिढ्यांनी वाढविला. बोल्होबा पुर्वजांच्या मार्गाचा अवलंब वाढत्या प्रमाणांत करुन पंढरपुरची आषाढी व कार्तिक वारी नियमाने करणे, घरातल्या मुर्तिची पुजाअर्चा करणे, भागवतधर्मीय संताच्या अभंगवाणीचा भजनाव्दारे प्रसार करणे वगैरे  धार्मिक बाबतीत त्यांचा बराच वेळ जात असे. संपत्ती वाढविण्यापेक्षा विठ्ठल भक्तीची वाढ जास्त कशी होईल याकडेच त्यांचे विशेष लक्ष असे.

 शेतीवाडी, धनदौलत यापेक्षा विठ्ठलभक्ती जास्त उपयोगी पडेल असं त्यांना वाटे. त्यांच्या या उच्च ध्येयास सर्वतोपरी सहाय्यकर्ती अशीच गुणवती पत्नी लाभली होती. कनकाई आपल्या नवर्‍याप्रमाणेच संसारसुखापेक्षा परमेश्वर भक्तीसच जास्त महत्व देई. संतवचनाप्रमाणे बोल्होबा मोरे प्रपंचात अगदी सावध होते. मालकीचा वाडा, महाजनकीचे उत्पन्न, किराणामालाचे दुकान, पुरेशी  शेती व सावकारी अश्या गोष्टींकडे कर्तव्य म्हणुन काळजीपुर्वक लक्ष देत. भक्तीच्या नावाखाली परक्याची एक दमडीही नको हे महान पथ्य सांभाळुन पुढील पिढीने हाच आदर्श ठेवला. त्यांच्या निर्लोभ वागण्यामुळे समाजात त्यांना चांगला मान होता. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे तुकोबाचे लग्न लहानपणीच रमाबाई बरोबर झाले. पण तीला दम्याचा त्रास असल्यामुळे, त्यांचे दुसरे लग्न पुण्याच्या गुळबे या श्रीमंत सावकाराने आपली मुलगी जिजाबाईचे लग्न उत्तमप्रकारे लावुन दिले.

 बोल्होबांचा थोरला मुलगा साबाजीची पत्नी वारल्यामुळे त्याच्या लग्नासाठी प्रयत्न केले पण या जन्मत्यागाने लग्नास नकार देऊन उभे आयुष्य भक्तीत घालवणे हेच ध्येय होते. कांही दिवसांनी त्याने कोणासही न कळू देता गृहत्याग करुन स्वतःच्या अस्तीत्वाचा कुणालाही थांगपत्ता लागु दिला नाही. पुत्रवियोगाने बोल्होबा संसारातुन  विरक्त होऊन भक्तीसंस्कारांत चांगलेच रमले. याचा परीणाम तुकारामावर होऊ लागला. बोल्होबाने संसाराची जबाबदारी तुकारामावर सोपवुन स्वतः परमेश्वर भक्तीत मग्न झालेत.

 अल्प वयातच संसाराची जबाबदारी तुकोबा आनंदानं पार पाडीत होते. वडीलांचे संसारातुन पुर्णपणे निघालेले मन आणि आईचा पुत्रवियोगाचा जिवंत उमाळा पाहुन तुकोबांचे संसारात मन रमेना…!  आईबापांची वाढत्या प्रमाणांतील भक्तीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन दिवसेदिवस वाढ होऊ लागली.

 तुकोबांच्या संतपणाचा, भक्तीचा , श्रेष्ठतेचा पाया मातृभक्तीतच होता. त्यांच्या ठीकाणी जाज्वल्य स्वरुपात भक्ती निर्मान करणारी त्यांची माता कनकाईच होती. तुकोबा गर्भात असतांना त्यांचेवर श्वासाबरोबर भक्तीची पाखर घातली. तान्हेपणी स्तनांतुन त्यागरुपी दुध पाजुन पवित्र असे वैराग्याचे संस्कार घडविले.

 त्यामुळेच हा जगद्वंद्य महात्मा निर्माण होऊ शकला. एक माता जे करु शकेल ते हजार शिक्षकास गुरु म्हणुन मिरवणारांस अशक्य आहे. भक्त पुंडलीकाने पंढरपुरी मातृपितृ भक्तीने विठोबास उभे करुन समाजास आईबापांच्या सेवेचा मार्ग दाखविला. तुकोबांच्या अभंगावरुन ते निःसीम मातृपितृ भक्त होते हे दिसुन येते.

        क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख


संत तुकाराम

 भाग-४

 तुकारामांचा जन्म इ.स. १५८८ मधे झाला. १६२७-ते ३० मधे महाराष्टात भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी ते ४२ वर्षाचे असावेत. त्यांचा विपरीत काळ येणे आणि त्यांची साधु व कवि होणे ह्या दरम्यान ज्या गोष्टी घडुन आल्यात त्या त्यांनी आत्मचरित्रपर अभंगात सांगीतल्यात. त्यांच्या कवितेचा निषेध होणे, वह्या बुडवणे या गोष्टींचा उल्लेख केला. दुष्काळ पडल्यानंतर व्यवहारात तुट पडत गेली. दुष्काळाने घरांतील पुंजी संपल्यावर, दुकान नीट चालेनासे झाल्यावर व्यवहाराचा नीट जम बसत नाही असे पाहुन त्यांनी कोकणात जाऊन मीठ, मिरची, गुळाचा व्यवहार केला, परंतु त्यातही तुट येत गेली. नंतर कर्ज काढुन मीठ व गुळ खरेदी करुन बालाघाटास गेले. आलेल्या पैशातुन ञृणग्रस्त ब्राम्हणास सोडवले.

 तुकोबांचे मन संसारात रमेनासे होऊन इश्वरभक्तीकडे अधिक  लागले. ह्याच सुमारास त्यांना शेताची राखण करण्याचे काम मिळाले, पण राखण करीत असतां ते भजनांत इतके दंग, रंगुन जात की, तिकडे पक्षी दाणे लुटुन नेत. हे पाहुन शेतमालकाने पंचायतकडे फिर्याद केली. चौकशीअंती तुकोबाकडुन नुकसान भरपाई म्हणुन खत द्यायला लावले. शेताची कापणी केल्यानंतर नेहमीपेक्षा  अधिक धान्य आल्याने तुकोबाला देऊ केलेले  धान्य त्यांनी नाकारले. यावरुन त्यांचा बाणेदारपणा दिसुन येतो.

 तुकोबांच्या पुर्वजांनी देहुला बांधलेले देऊळ मोडकळीस आले म्हणुन त्यांनी स्वतः कष्ट करुनही जीर्णोध्दराचे काम एकट्याने होऊ शकत नाही हे पाहुन त्या शेतकर्‍याने तुकोबाच्या वाटणीचे धान्य विकुन आलेल्या पैशातुन देऊळ तयार झाले. उद्यापन करुन ब्राम्हण भोजन घालण्यासाठी त्यांचे जवळ पैसे नव्हते, पण इश्वरी लीला अगाध आहे, त्या शेतमालकाला ऊपरती झाली आणि राखणीसाठी कबुल केलेले धान्य विकुन कार्य पार पाडले. देवळाचा जीर्णोध्दार झाल्याचा त्यांना अतिशय आनंद झाला.

 तुकोबा आता परमार्थपर वाडःमयाचा जारीने अभ्यास करुन भजन, पुजन, किर्तन करीत होईल तेवढा परोपकारही करुं लागले. कोणाच्या कामात मदत कर, भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, गांजलेल्याचा परामर्श घे, व्याधीग्रस्तांना औषधपाणी, अशी नाना प्रकारची कामें करत शरीर कष्टवुन घेत.

 तुकोबांचा व्यापार उद्दीम अगदी बसला. संपन्न स्थितीत अब्रुत राहणारे ते अगदी तिरस्कृत अशा वेड्यापिश्याच्या स्थितीत पोहोचले. पत राहिली नाही, मानमान्यता नाहीशी झाली. त्यांची गाढवावरुन धींड सुध्दा काढण्यांत आली. ऐहिक स्थितीत असे परिवर्तन होत असतांना मात्र परमार्थात पुढे पाऊल पडत होते.

 जगाविषयी व जगाच्या बेपर्वाईने उदासीनता अंगी बाणु न देता द्वेष, मत्सर, लोभ इत्यादी विकारांनी कलंकीत होणार्‍या प्रपंचात, परिभ्रमण करणार्‍या संसारात धृवाप्रमाणे अचल असणार्‍या निरंजन व विशुध्द अशा परमेश्वराकडे त्यांचे लक्ष स्थिरावत गेले.

 तुकोबाचे आईवडील परमधार्मिक असल्यामुळे ते आधीपासुनच भाविक, सदाचार संपन्न होते. संसार सांभाळुन धार्मिक ग्रंथाचे पठण, भजन पुजनांत वेळ घालवित असत. आईबाप निवर्तले, भावजयीचे मरण, भाऊ निघुन गेलेला, दिवाळे निघाले या सर्व वैतागाने संसाराचा वीट येऊन त्यांना एकांतवास अधिक प्रिय वाटु लागला. घरदार सोडुन रानावनात भजनांत दंग होऊन बसु लागले. अंतःकलह आणि अशांती जोरावली. आणि भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली.

      क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम

 भाग-५

 देहुमधील समताधर्म फडकावणार्‍या धर्मवीराकडे अखिल जगाने पहावे असा दिवा कनकाईने पाजळविला, तर पारततंत्र्यांच्या जोखडातुन मुक्तता व्हावी, शेकडो वर्षे परसत्तेचे तुफान नष्ट व्हावे, स्वातंत्र्याची ज्योत महाराष्टात प्रथम पेटविण्याचे श्रेय जिजामातेने शिवबासारखा पुत्र देऊन घेतले.                   

*जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उध्दारी।।*

 तुकाराम महाराज आणि

छ. शिवाजी महाराज दोघेही मातृभक्त होते. खरं पाहतां तुकोबांचा विपरीत काळाच

 काळाचा आरंभ दुष्काळापासुन झाला नाही तर त्यांचे वडील बोल्होबा मरण पावल्यापासुन झाली. लवकरच त्यांची परमवत्सल माता मरण पावली. व्यापार धंदा बसल्यामुळे आधीच्या दुखण्याने त्यांची प्रथम पत्नी रखमाबाईची प्रकृती क्षीण असल्यामुळे अश्या परिस्थीतीत ती टिकाव न धरु शकल्याने मरण पावली. बायको, मुल  मेल्याने मायापाशांतुन ते मोकळे झाले. संसाराचे गाडे नीट चालत नाही असे पाहुन भामनाथ पर्वतावर जाऊन ते भजन व हरीनामस्मरणांत मग्न झाले. भजन पुजन, नामस्मरण, ग्रंथाध्यायन, किर्तन, मनन ध्यान इत्यादिकांत वेळ घालवु लागले. जवळपास असणार्‍या आळंदी वगैरे तिर्थयात्रा करीत.

 अमेरिकन तत्ववेत्ता इमर्सनच्या म्हणण्यानुसार *’जोपर्यंत मनुष्यावर संकटं येत नाहीत तोपर्यंत त्याच्या अंगी असणार्‍या गुणांचा विकास होत नाही’*

 संकटे म्हणजे उन्नतावस्था प्राप्त करुन देणारी साधनें आहेत. ज्याच्यावर देवाचे प्रेम असते त्याच्यावर संकटे आणुन देव त्याला तावुन सुलाखुन त्याची परिक्षा घेत असतो. भागवताचे प्राकृतात निरुपण केल्याबद्दल, आणि अभंगाद्वारे वेदांताचा उपदेश केल्याबद्दल तुकोबाचा अतिशय छळ करण्यांत आला. धर्मतत्ववेत्तांचे ज्ञान व्हावे व इश्वरस्वरुपाची ओळख व्हावी, ज्या देवाची भक्ती करतो त्याचे यथार्थ रुप समजावे, आणि हे ज्ञान वेदांतच आहे हा दृढ समज असल्यामुळे वेदांचा ठाव घेण्याची त्यांना उत्कंठा होती. परंतु हा अधिकार आपल्याला नाही म्हणुन ते दुःखी होते.

 तुकोबा वेदांती नव्हते, पंडीत नव्हते. त्यांनी पंडीतांप्रमाणे वाद केले नाहीत, तरी अनेक व्यावहारीक दृष्टांत देऊन अद्वैत मनाचे उत्तम रितीॅ खंडन केले. भेदभाव नाहीसा करावा, हे त्यांचे आरंभापासुन ध्येय होते. सर्व सृष्टी परमेश्वराची आहे, परमेश्वर भूतमात्रात आहे, विश्वव्यापक आहे. यासाठी सर्वांविषयी समभाव ठेवुन कोणाचा मत्सर, द्वेश, इर्षा करुं नये. त्यांची भक्ती म्हणजे प्रेमभक्ती, सख्यभक्ती होती. देवांचे भजनपुजन,जनी जनार्दनाची आणि भूतमात्राची सेवा करत देवाशी समरस झालेत.

 वैराग्य प्राप्त झाल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, अपनिषदे अभ्यासली. द्वेत-अद्वैतावर कांही अभंग रचना केली. नंतर ग्रंथावलोकन कमी होऊन भजन, किर्तन, मनन, ध्यान करुन देवाशी समरह होण्याचा जो आनंद मिळतो तो भक्तांच्या भजन किर्तनांत आहे, ज्ञान्यांच्या आत्मस्थितीत नाही.

 महारांजास वैराग्य उत्पन्न होण्याचे मुख्य कारण त्यावेळी परसत्तेने गरीब जनतेकडे दुर्लक्ष करुन चालवलेले भयंकर हाल ! जनतेच्रा दुःखास अनुसरुन परमेश्वरास जागे केल्याशिवाय, त्याला प्रसन्न केल्याशिवाय दुसरा उपाय नाही हे त्यांना उमगले.

 संसारी जीवनास स्वहस्ते त्यागरुपी अग्नी लावुन जनहिताचा खरा मार्ग शोधला. परहितासाठी नवीन जीवन धारण केले.

        क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख


९/११/२०, सकाळ ११:०१ – Akola Minakshi Deshmukh: तुकाराम

संत तुकाराम म. चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading