आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

संत गाडगेबाबा संपुर्ण भाग ७, (३१ ते ३५)
अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३१.
आडकुजींचे शिष्य तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा दोघेही वर्हाडातले.दोघेही स्वयंप्रकाशी,वर्हाडी लोकांचा दोघांवरही लोभ!स्वातंत्र्य आंदोलनांत भाग घेतलेले तुकडोजी महाराज पुढे राष्र्टसंत म्हणून प्रसिध्दीस आले.चिमूरचे गोळीबार प्रकरण तुकडोजीवरील जनतेच्या प्रेमास्तव उद्भवले होते.
“अब काहे को शोर मचाते हो।दुखवाकर भारत सारे।आते हैं नाथ हमारे ।।” हे तुकडोजींचे पद त्याकाळी फार लोकप्रिय होते.दोघांचा संबंध येणे अटळ होते.दोघा च्याही प्रेरणेने मोठमोठे उत्सव होत होते. त्या कार्यक्रमास दोघेही अगत्याने उपस्थीत राहत असे.
विदर्भातील सातपुडा पर्वताच्या गुहेत सालबर्डी क्षेत्री महादेवाचे लिंग. दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत.तिथे तुकडोजींनी यज्ञ केला त्यानिमित्य कितितरी प्रवचनकार कीर्तनकार अगत्या ने जमत.शिघ्रकवी,उत्तम खंजीरी वाजव णारे तुकडोजी महाराजांच्या भजनास अलोट गर्दी होत असे.निमंत्रणानुसार बाबाही गेले.रात्री त्यांचे कीर्तन झाले. दुसरे दिवशी पहाटेच बाबांनी सारे पटांगण झाडून स्वच्छ केले.बेशिस्त यात्रे ला बाबांनी शिस्त लावून दुकाने,बैल गाड्या,चुली हे सर्व चुण्याने आखुन व्यवस्थित ठीकाणी लावून दिले.मोझरी, वरखेड इ.तुकडोजींच्या केंद्रस्थळी जाऊन तिथे होणार्या उत्सवच्या यशात बाबांचा मोठा वाटा होता.बाबांची प्रकृती नीट राहत नसे तरी योजलेले कार्यक्रम सुरळीत चालत होते.
बाबांची ढासळत चाललेली प्रकृती बद्दल ऐकून तुकडोजींनी बाबांना पत्र लिहिले,आपण थोडी तरी विश्रांती घ्यावी आज आपल्यासारख्या निःस्पृह व जन हितेषी सेवकाची भारताला नितांत गरज आहे.समाजात विद्वता सांगणारे तर बहुत आहेत,पण हातात खराटा घेऊन,मागुन हातावर भाकर घेऊन खाणारे,जनतेचे हितचिंतक बोटांवर मोजण्याएवढेही नाहीत.आपल्याकडून जास्त दिवस मानवसेवा व्हावी त्यासाठी तरी तब्बेती ची हेंडसाळ करुं नये.
कुटुंबाशी किंवा अनुयायांशी बाबा जितके निष्ठूर वागत त्यापेक्षा जास्त कठोर आपल्या शरीराशी वागत.प्रकृती अस्वस्थतेची,खचत असल्याची चाहूल १९५१ पासूनच लागली होती.पण कोणा चे न ऐकता आपलाच हट्ट चालवीत.डाॅ. नी हलू नये अशा सूचनि दिल्यावरही मजूरांबरोबर उन्हात काम करत असल्या मुळे आणखीनच त्रास वाढला.कोणी कांही सांगायला गेले तर,म्हणायचे या देहरुपी दुकानाचे लाड किती पुरवायचे? दुकानाला आग लागेल असेच करायला हवे.सुक्ष्म विचार केल्यावर लक्षात येते, “तुका आकाशाएवढा” या तुकोक्तीप्रमाणे बाबा फार उंचीवर स्थीर झालेले.हाती चूड घेऊन शरीराच्या मागे लागले होते.
२५-४-१९५३ ला मराठवाड्यातील डेंभीच्या कार्यक्रमात बाबांनी पंगती बसवल्या.त्या गडबडीत डोक्याला आंब्या ची फांदी लागून रक्त वाहू लागले.कोणी सांगायला गेला की त्याला दूर करत. उन्हात रक्त तसेच सुकुन गेले पण मलम पट्टी केली नाही.भर उन्हाची वेळ,पोटात अन्नाचा कण नाही,बिन तट्टयाच्या बैलगाडीत फातलापूर निघाले असतां फार त्रास झाला पण बाबांनी लक्ष दिले नाही.तिथून नांदेडला मोटारीतून येतांना तब्बेत जास्तच बिघडली.नांदेडला उतरल्यावर कसेबसे श्री मोहरील साहेबां च्या घरी गेले.रात्रभर उलट्या व शौच्याने हैराण झाले.कुणाला जवळही येऊ देत नसत की डाॅक्टरांना बोलावू देत नसल्या मुळे जवळची मंडळी हताश झाली.संबंध रात्र व दिवस बेशुध्दीत गेला.
२६-४-१९५३ ला टेंभी गांवी आधी ठरवलेल्या कीर्तनास धड उभेही राहता येत नसून कोणाचे न ऐकता रिक्षात बसून स्टेशनवर आले.रिक्षातून उतरल्या बरोबर एकदम जमीनीवर पडले.गाडी येईस्तोवर पडूनच राहिले.गाडी आल्याचे कळताच मदतीशिवाय चिक्कार गर्दी असलेल्या डब्यात कसेबसे बसले. हिमायत नगर स्टेशनवर बाबा उतरताच “श्रीसंत गाडगे महाराज की जय” च्या घोषनेने स्टेशन दणाणून गेले.हजारक जमलेल्या मंडळींना त्याही स्थितीत बांबा नी दोन उपदेशाच्या गोष्टी सांगीतल्याच!
बैलगाडीत बसलेले बाबा टेंभी गांव येई पर्यंत पडूनच होते.नेहमी गावाबाहेर उतरणारे बाबा आज मात्र गावांत बैला च्या गोठ्यात अर्धवट बेशुध्दावस्थेत पडून होते.आज कीर्तन होणार नाही असाच सर्वांचा होरा होता.बांबाच्या न कळत हिमायतन गावाहून डाॅक्टर आणण्यांत आले.दोन इंजेक्शन व औषध देऊन डाॅ. म्हणाले,आज कीर्तन करुं नका.परंतु रात्री कीर्तनासाठी जमलेल्या मंडळीं कडून निरोप आला,कीर्तन नाही केले तरी चालेल पण फक्त बाबांचे मुख दर्शन झाले तरी आमचे समाधान होईल.निरोप मिळताच बाबा तसेच उठून कीर्तनाच्या ठीकाणी आले.ताकद नसतांनाही कसे बसे स्टेजवर उभे राहून थोडाच वेळ कीर्तन केलेच.बाबांच्या भेटीने जनतेला संतोष झाला.जयजयकार दुमदुमला….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-१०-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३२.
२७-४-१९५३ ला पोटात कांहीही न घेता दुपारच्या भर उन्हात अर्धवट बेशुध्दा वस्थेत रात्री ढाकणीला पोहोचले. २८-४ ला दारव्हा मोटारस्टॅंड जवळील एका अंगणात पडून राहिले.मांगला इजारला कीर्तन केले.एवढ्या वाईट स्थितीत असतांनाही कीर्तन कार्यक्रमाचा सपाटा लावला.शस्र घेऊन बाबा शरीराच्या मागे हात धुवून लागले.फारच आग्रह झाला तर ते डाॅक्टरी इलाज करवून घेत.पण नंतरच्या विश्रांतीच्या निकडीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत.प्रवासाचा तडाखा अगदी पूर्वीसारखाच सुरु होता.आहारांत फक्त तुरीच्या वरणाचे पाणी!थांबला तो संपला हे बाबांचे तत्व स्वस्थ बसू देत नव्हते.पंच भूताचे हे शरीर शेवटी परत करावेच लागते.शरीर हे भाड्याचे!त्याचे जेवढे केले तेवढे लाडावते.त्याच्याकडून जेवढे जास्त काम करवून घ्याल तेवढे ते करते.
अंदाजे १८७६ मधला जन्म. लहानपणापासूनच जीवन कष्टात गेले. प्रति दिनी सती जाणे,नित्याचाच अग्नी प्रवेश होता.पुढे प्रसिध्दी लाभल्यावर, सिध्दावस्थेत जरा बरे दिवस आले ते जीणे ना स्वतः जगले ना निकटवर्तीयांना जगू दिले.स्वतः भिंगरीगत फिरले व इतरांनाही फिरवले,रोज सदावर्ते चालत. अनेक ठीकाणी हजारो अनाथ,दुर्बल, आंधळे पांगळेंना जेऊ घातले,पण स्वतः मात्र दारोदार भीक्षा मागून चटणी भाकर खाल्ली.शहरे वगळता रानावेगळे कधी राहिले नाही.शहारात निरुपायास्तव तेही गॅलरीत अंग टाकावे.शरीर मजबूत, काटक म्हणूनच ८५ वर्षे तग धरला,एरवी अशा कहरांत कधीच कोलमडून पडले असते.आतां मात्र विकार बळावू लागला. त्यात मधूमोहाचा त्रास!
यंदा पहिल्यांदाच नियम मोडून नव्हे मोडावाच लागला,१९५५ च्या आषाढ यात्रेस पंढरपूरला गेले नाही.गणपतराव तपासे,मालोजीराजे निंबाळकर या दोघां नी अति आग्रहाने मुंबईस सेंट जार्ज हाॅस्पिटलात भरती केले.तिथे तरी बाबा स्वस्थ राहिले का? दर्शनार्थींना मनाई केली तर बाबा रागावून म्हणायचे एवढ्या दूरुन येतात येऊ देत त्यांना. पत्रलेखन, निरनिराळ्या संस्थेची व्यवस्था लावणे अशी अनेक कामे सुरुच होती.त्यांना आपला अंत जवळ आल्याची कल्पना आली होती.हाॅस्पिटलमधे एवढ्या ऐषारामात पडून राहणे पटत नव्हते.जन्म भर जे स्वप्नातही मनी आणले नव्हते असे जीवन या शेवटच्या दिवसांत करावे लागत असल्यामुळे मन खंतावत होते. मुक्त आकाशात स्वच्छंद विहार करणारा गरुडाला हा सोन्याचा पिंजरा कसा भावेल?
४-७-१९५५ ला मध्यरात्री सगळे गाढ झोपेत असतांंना एका अनुयायाच्या सहाय्याने हाॅस्पिटल बाहेर पडले.सकाळी सगळीकडे हाहाःकार उडला.सांपडल्या वर विचारले असतां म्हणाले,दवाखान्याचे बील भरण्यास आमच्या जवळ पैसे कुठे
नादुरुस्त तब्बेतीतच एकेक कामे उरकव ण्याचा सपाटा चालवला.तब्बेतीला धाब्यावर बसवून पर्वा न करतां चहू बाजूंनी प्रवास सुरुच होता.आपल्या माघारी सर्व व्यापाच्या व्यवस्थापनेचे कामाचा भार अच्युतराव देशमुख व शिंदे यांचेवर सोपवला.१९५६ सालच्या आषाढीला बाबांची गाठ नक्की पडेल या धारणेने वारीस बरीच गर्दी जमली होती.
वारी उरकल्यावर बाबा वर्हाडातील आपल्या आवडत्या नागरवाडीस येऊन तिथले कांही गोरक्षणाचे बांधकाम मार्गी लावून अमरावतीस आले.वलगाव मार्गावर असलेल्या जगूभाई पटेलच्या बंगल्यात अमरावतीकरांच्या सहाय्याने आंधळ्या पांगळ्यासाठी सदावर्त सुरु केले.
त्यांच्या प्रकृतीबरोबरच दृष्टीहि मंद होऊ लागली.अमरावतीच्या प्रसिध्द डाॅं. कडून डोळे तपासल्यावर चष्म्यासाठी नकार देत म्हणाले,मला कुठे ग्रंथ वाचायचेय?चष्म्याच्या किंमतीत एका गरीबाघरचे लग्न होऊ शकते.
८-११-१९५६ ला बांद्रे पोलीस स्टेशनमधे सत्यनारायणाची पुजा ठेवली. तिथल्या श्रध्दाळू पोलीसांनी बाबांनी एकदा तरी कार्यालयासमोर कीर्तन करावे अशी विनंती केल्यावर,बाबा म्हणाले आम्ही आजारी आहोत.त्यावर अति आग्रहाने पोलिस ऑफीसर म्हणाले,तुम्ही फक्त या,आम्ही भजन करुं,आपण ऐकावे.त्यांच्या आग्रहाला मान देऊन बाबा बांद्र्याला आले तर सर्व तयारीसह हजारो माणसे जमलेली.बाबांच्या दर्शनोत्सुक ,त्यांना डोळे भरुन पाहण्या साठी भायखाळा,दादर,माहीम,बोरीवली अशा सर्व ठीकाणचे भाविक पोलीस स्टेशन समोर जमलेले होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-१०-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३३.
बांद्र्या पोलीसांच्या आग्रहास्तव बाबा आल्याने सर्वांना अतिशय आनंद झाला.खुर्चीवर बसून बोलण्याची विनंती धुडकावून,हाती काठी घेऊन समूहाच्या मध्यभागी बाबा येऊन उभे राहिल्यावर भजन सुरु केले.भजनाचा रंग,सश्रध्दांची गर्दी,बत्या,तोरणे असे जुळवलेले वातावरण बघून शरीराच्या वेदना विकल ता,खोल गेलेला आवाज उसळी मारुन वर आला.आणि तोच आवेश उत्साहाने त्यांचे आवडते भजन सुरु केले…गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला…बाबा बोलणार म्हणून सगळीकडे शांतता पसरली आणि बाबांच्या वाणीचा ओघ धबधबा वाहू लागला.समाजातील व्यसनें दारु,उच्चनिच भेदाभाव,जातपात,श्रीमंत गरीबांमधली तफावत,शेतकर्यांची व्यथा सावकारांची माजोरी,राजकारण,लढाईचे वर्णन काय काय नव्हते त्यांच्या कीर्तनात सगळीकडचे विदारक वर्णन अगदी डोळ्यासमोर उभे केले.शेवटी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाच्या गजराने शेवट करत म्हणाले,बांद्रा पोलीस स्टेशन चे माझेवर फार उपकार झाले,यांच्यामुळे आज तुम्हा सर्वांचे पाय दिसले.बोलतांना कांही चुकले असल्यास माफ करा.हेच बाबांचे शेवटचे कीर्तन आणि एकमेव उपलब्ध ध्वनिमुद्रीत कीर्तन!
बाबांची प्रकृती तोळामासा चालूच होती.चिंता न करतां मुंबईला जे.जे. हाॅस्पिटलजवळच्या धर्मशाळेत वास्तव्या स राहून बाकी असलेले कामे उरकवीत होते.कार्तिक एकादशी तोंडावर आली. शिंदे व गुणवंतराव चर्हाट्यांनी बाबांची इच्छा नसतांं पंढरपूरी चालण्याची गळ घातली.अखेर १२-११-१९५६ ला मंडळीं सह बाबांना मिळालेल्या गाडीत निघाले. दुसर्या दिवशी बाबा आल्याची वार्ता कळतांच दर्शनासाठी तोबा गर्दी उसळली गर्दीला बाजूला सारुन त्याही परिस्थितीत साफसफाईस सुरुवात केली.तिसरे दिवशी पहाटेस धर्मशाळेच्या पुढील चौकात येऊन भजनाचा गजर सुरु केला. आणि पाहतां पाहतां लोकं जमा झाले. जन्मभर ज्या तत्वज्ञानाचा पाठपुरावा केला,तेच तत्वज्ञान शेवटच्या भेटीत यात्रे करुपर्यंत पोहचवत होते.पहाटे चार पासून करुण व्याख्यान क्षणाचीही उसंत न घेता अखंड रात्रीपर्यत सुरु होते.जराही विश्रांती ना त्यांनी घेतली ना भाविकांना घेऊ दिली.शेवटी रात्री नऊ वाजतां पासून बारा वाजेपर्यंत कीर्तन केले.जणूं त्यांच्या अंगी हत्तीचे बळ संचारले होते. समोर बसलेल्या आपल्या लाडक्या भक्तां ना भरभरुन उपदेश केला.कीर्तन आटोपतां सर्वांचा निरोप घेत बाबा म्हणाले,हे आमचे शेवटचे कीर्तन!
“आम्ही जातो आमुच्या गावा।
आमुचा राम राम घ्यावा ।
आतां कैचें येणें जाणें ।
सहज खुंटले बोलणें ।। आतां माझा अंतिम काळ दिसत आहे.मी धोबी, निरक्षर माणूस, कांही चुकले असल्यास मोठ्या मनाने अपराध पोटात घाला.
” आम्ही येतो आतां कृपा असो द्यावी ।
सकळा सांगावी विनंती माझी ।।
सकळांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुध्द करा ।।
कीर्तन आटोपून धर्मशाळे मागील झोपडीत टेकताहेत तोच कैकाडीबुवांचा सांगावा घेऊन मीराबाई सूर्यवंशी आल्या
वाळवंटात हजारो लोकांच्या जमावात कैकाडी महाराजांचे कीर्तन सुरु होते. बाबांची भेट घडवून देतो म्हणून त्यांनी जमावाला शब्द दिला होता.मीराबाईने अगदी काकुळतेने निरोप सांगीतला होता दिवसभर उभे राहिल्याने बाबांना अतोनात श्रम झाले होते.अगदी उठवत नव्हते.तरी कसेबसे वाळवंटी पोहचुन कीर्तनास उभे राहिलेले बघताच भाविकां चे मन अपार प्रेमाने उचंळळून आले. अति हर्षात जयजयकार करुं लागले. पोटात अन्नाचा कण नाही.दिवसभर अपार कष्ट,विश्रांतीची नितांत आवश्यक ता असूनही बाबा कीर्तनास उभे राहिले. ज्या जनता जनार्दनाची जन्मभर सेवा केली तो प्रेमाचा कल्लोळ बघून बाबांचे मन उचंबळून आले.नेत्रातील आसवे पुसत बाबा वाक् पुजा बांधत म्हणाले..
” बुडत हे जन देखवेना डोळां ।
येतो कळवळा म्हणोनिया ।।
कीर्तन आटोपायला रात्रीचे दोन वाजले.
शेवटच्यावेळी तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. भाग्यवान आहो आम्ही.आम्हाला आतां रजा द्या.
ते धर्मशाळेत परतले,पण पहाटेच निघायचे असल्याने विश्रांती न घेता कामाची निरवानिरव करुं लागले.शिंदेनी आग्रह करुन ज्या कामासाठी बाबांना पंढरपूरी आणले ते कालच्या गडबडीत करायला थोडाही अवधी मिळाला नाही.
तनपुरेबुवा आणि गयाबाई मनमाडकर यांची धर्मशाळा व मराठा धर्मशाळेच्या मागील बाजूस होत्या.तनपुरेंच्या जागेतून गयाबाईची जायची वाट होती.त्याबाबत दोघांमधे वाद होता.शिंदे आणि बाबा भल्या पहाटेच शकरराव बंजार्यांच्या धर्म शाळेत पोहचून तीथे दोघांनाही बोलावून बरेच समजावले पण तडजोड झालीच नाही.बाबांचेही ऐकले नाही म्हणून त्यांना फार वाईट वाटले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-१०-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३४.
बाबांची गाडी पुण्याकडे निघाली. २०-२५ मैल अंतर गेले नसेल तोच बाबां ना सडकून ताप भरला.गाडीतच मध्य भागी अंग टाकले. दोन तीन दिवसांच्या श्रमाने त्यांना अतिशय शीण आला होता. शरीराने व मनाने अगदी थकून गेले होते. तापाने अंग थडथडू लागले.पोटात असह्य वेदना होऊ लागल्या.उलटीची भावना होत होती.गाडीतील लोकांना काय करावे काहीच सुचेना.पुण्यात गेल्याशिवाय कांहीच करतां येत नव्हते.बाबांनी मधेच गाडी थांबवली.शेतात जाऊन त्यांना भरपूर शौचास झाल्यावर थोडे बरे वाटू लागले.गाडीत बसल्यावर थोडा ताप उतरला.बाबा स्वस्थ पडून होते.शक्य तेवढ्या वेगाने आठ वाजतां गाडी पुण्यात पोहोचली.मोहनलाल मणियारांच्या बंगल्यात बाबांना आणण्यात आले. तातडीने डाॅ.ना बोलावले.ताप १०४ डिग्री होता.तात्काळ उपचार सुरु केले. १६ ता. शुध्दीवर आल्याबरोबर मुंबईस चलण्या ची इच्छा व्यक्त केल्यावर,बाबांच्या मना विरुध्द जाण्याचे साहस कुणात नव्हते. हळूहळू गाडी रात्री आठ वाजतां डोंगरी वर विठाबाई विडीवाल्यांच्या घरी आली. पोटात अतिशय दुखत असल्याने शेवटी सेंट जार्ज हाॅस्पिटलला भरती केले.रात्र भराच्या उपचाराने १७ ता.ला थोडा उतार पडला.बाबांच्या प्रकृतीबद्दल वृत्तपत्रात बातम्या येऊं लागल्या.ठीकठीकाणी तार टेलिफोनने कळविण्यात आले.चहूबाजुचे लोक गोळा होऊं लागले.एकेक धन्वतरी दवाखान्यात जमु लागले.
शेवटी विख्यात डाॅ.जाल पटेलच्या नेतृत्वाखाली बाबांवर उपचार सुरु झाले. हाॅस्पिटलमधे बाबा अत्यवस्थ असल्याचे कळतांच,फक्त दूरुन कां होईना,त्यांच्या दर्शनार्थ दवाखान्यात लोकांची गर्दि होऊ लागली.कर्मचार्यांना आवरणे कठीण जात होते.म्हणून त्यांना मनाई केली हे बाबांना कळल्यावर,व्यवस्थापकाला बोलावून,लोकांना भेटू द्या अन्यथा आम्ही बाहेर जातो.नाईलाजाने अधिकार्यांनी दर्शनाच्छुकांना भेटण्याची परवानगी द्यावी लागली.बाबा सर्वांशी बोलत, एखादा थट्टेचा शब्दही उच्चारीत.तब्बेतीत अनुकुल फरक दिसू लागला.
बाबांच्या प्रकृतीच्या गांभीर्याची कल्पना येताच,पंढरपूरहून शिंदे आणि शंकरराव माने तातडीने आले.मुख्त्यार पत्र बाबांनी मागेच अच्युतराव देशमुख व शिंदेंच्या नावांने केले होते.परंतु बाबांच्या माघारी आवरा आवरी व्यवस्थेसंबंधीचा निर्णय मात्र अद्याप दिला नव्हता.माने, शिंदे व गुणवंतरावांनी कागद तयार केला पण,बाबांना बाचून दाखवून त्यांची निशाणी उठवण्याएवढी उसंत मिळत नव्हती.बाबांना आपली अंतिम वेळ जवळ आल्याची जाणीव झाली.तत्पूर्वी त्यांना नागरवाडीस जायचे मनाने घेतले. सातपुड्याचा वेध लागला.२१ ता.ला रात्री १० वाजतां बाबा अचानक उठले.या बाबतीत चर्चा करावी असं त्यांचेजवळ त्या वेळी कोणीच नव्हते.जन्मभर माणसांमधे वावरुनही शेवटी बाबा एकटे होते,आकाशासारखे व्यापक व उदास! कुणाचेही न ऐकता ते गणपतराव तापसें च्या बंगल्यावर पोहोचले.बाबा आल्याचा आनंद झाला,पण त्यांच्या तब्बेतीची मोठी जबाबदारी होती.डाॅ.जाल पटेल व डाॅ.वजिराणींचे उपचार सुरु होते.शारीरी क दृष्ट्या प्रकृती सुधारु लागली पण,मन मात्र नागरवाडीकडे ओढ घेत होते.७-८ दिवस वारंवार जागा बदलत होते.ढेंबरे मास्तर सतत त्यांचे सोबत असे.पत्र लिहिने,निरोप देणे,वृत्तपत्र वाचून दाखवणे अशी कामे ते करीत.
६-१२-१९५६ ला डाॅ.आंबेडकर गेल्याची बातमी ऐकून बाबा स्तब्ध झाले. डाॅ.आंबेडकरांचा जीवनपट बाबांच्या नजरेसमोर उभा राहिला.एक महाराचा मुलगा,वडिलांनी मोठ्या हिंमतीने शिकवले,शिकत असतांना अस्पृश्य जातीमुळे सोसावा लागलेला छळ, सयाजी महाराजांच्या सहाय्याने परदेशी गमन,परतल्यावर महार जातीचे नेतृत्व, महाड-नाशिकचा सत्याग्रह,राऊंड टेबल काॅन्फरन्स,स्वातंंत्र्य प्राप्तीनंतर भारताची बनवलेली घटना,बौध्दधर्म स्विकार, चोखामेळा धर्मशाळेशी असलेला संबंध, इतर कुठलाही धर्म न स्विकारता बौध्द धर्म स्विकारण्यात कांही अंशी बाबांचा स्नेह कारणीभूत होता.गेले आंबेडकर… कांही क्षणांनंतर बाबा पुटपुटले फार घाई केली तुम्ही…आणखी कांही दिवस राहते तर बरीचशी कामे झाली असती. असो परमेश्वरी इच्छा!आणि मग बाबांनी भराभर निर्णय घेऊन लगेच अमलांतही आणले.गुणवंतराव चर्हाटेंना बोलावुन आजचे आज नागरवाडीस जायचेय!अशा नाजुक तब्बेतीमुळे पुष्कळांनी न जाण्याबद्दल विनवले,शब्दही न बोलतां बाबा उठले.अशा अवस्थेत बाबा प्रवास करणार,लोकं काळजीत पडले.पण बाबा निर्णयावर स्थिर!किंबहुना आंबेडकर गेल्यापासून त्यांचे बोलणे कमी झालेहोते
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. २-१०-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३५.
स्टेशनवर पोहोचल्यावर बाबांना
खुर्चित बसवून डब्यापर्यत न्यावे लागले, इतकी प्रकृती क्षीण होती.हावडा एक्सप्रेसचा पहिला दुसरा वर्ग नाकारल्या ने तिसर्या वर्गाच्या डब्यांत व्यवस्था केली.सोबत गुणवंतराव होते.गाडी निघतांना सर्वाचे डोळे भरुन आले.बाबा मात्र स्थिर,अभंग,अडिग होते.अत्यवस्थ बाबा गाडीने जात आहे कळतांच प्रत्येक स्टेशनवर शेकडों लोक जमा होत. इतकी वर्षे वाघासारखे,कुणाच्याही हाती न येणारे बाबांना अशा विकलावस्थेत बघून मने उदास होत होती.
७-१२-५६ ला गाडी बडनेरा स्टेशन वर पोहोचली.बाबांना उतरवून घेण्या साठी अच्युतराव,गोकुलभाई,राठोड, नवाथे असे कितीतरी मंडळी हजर होती.
अमरावतीच्या अलिकडे असलेल्या नवाथ्यांच्या बंगल्यात बाबा थांबले.दुसरे दिवशी गोकुलभाईच्या बंगल्यावर पोहोच ताच डाॅ.शहांकडून उपचार सुरु झाले. पण बाबा नाकारत होते.बातमी वार्या सारखी चहुबाजुंनी पसरल्यामुळे भक्तांचा ओघ वाहू लागला.बाबांना विश्रांतीची अतिशय निकड होती,पण भेटीला आलेल्यांना टाळणे बाबांना पटत नव्हते. सहाजिकच औषधोपचार ठीक होऊ शकत नव्हता.शेवटी डाॅ.शहांनी इर्विन हाॅस्पिटलमधे भरती करण्याची सूचना केली जेणेकरुन गर्दीला थोडा तरी आळा बसेल.पण बाबा तयार होईना.ध्यास लागला होता सातपुड्याचा,नागरवाडीचा
१३ ता.ला तब्बेत अधिकच बिघडली.डाॅ.नी निमोनिया,डायबिटिक कोमाचे निदान केल्यावर,धास्तावून मंडळींनी इर्विन हाॅस्पिटलला हलवले. पोहचतां क्षणी डाॅक्टरांच्या टीमने तात्काळ उपचार सुरु केले.१४ ला जास्तच झाल्यामुळे ऑक्सीजन लावले. थोडे बरे वाटल्यावर बाबांचे नातू वासुदेव सोनावणे,शिंदे आणि शंकरराव माने यांनी तयार केलेले व्यवस्थापत्र वाचून दाखवल्यावर कांहीही न बोलतां बाबा स्तब्ध झाले.१७ ला तब्बेतीत थोडा उतार पडला.लोक दर्शनाला येतच होते.बाबा न बोलतां फक्त हात जोडत होते.ता.१८च्या सकाळी एकदम उठून म्हणाले, नागर वाडीच्या वाटेवर असलेल्या राठोडांच्या बंगल्यावर चला.नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.भक्तांनी हातास धरुन बाबांना गाडीत बसवले.राठोडच्या बंगल्याच्या आवारातील बगीच्यात असलेल्या चिकूच्या झाडाखाली थांबून बाबांनी न्हाव्याला बोलवायला सांगीतले.दाढी मिशी,छातीचे केस कमी केले.दुपारी तीन वाजतां पुनः त्रास सुरु झाला.बाबा अत्यवस्थ झाले तरी नागरवाडीला,सात पुड्याला जाण्याचा ध्यास घेतला.तो पूर्ण दिवस बाबांची तब्बेत तोळामासा होत होती.१९ ला सकाळी बाबा नवाथ्यांचे बंगल्यावर आले जणूं शेवटच्या प्रवासा साठीच!बाबा बळ एकत्र करीत होते. घशाला त्रास असल्यामुळे कांहीच गिळता येत नव्हते.मंडळींंनी एरंडाच्या डेखाची नळी करुन थोडे थोडे पाणी पाजले.कांही वेळ सुस्त पडून राहिले. सायंकाळचा मुक्काम राठोडांच्या बगीच्यात झाला. सलाईन घ्यायला साफ नकार दिला.नागरवाडीस जाण्यापुरते बळ अंगी एकवटले.संध्याकाळची कैकाडीबुवा व इतर मंडळींसह सामुदायि क प्रार्थना सुरु केली.वातावरण अतिशय गंभीर होते.बळ एकवटून उभे राहत सर्वां ना हात जोडत म्हणाले,आतां थोडा आराम आहे.नागरवाडी गोरक्षणात जाऊन तेथील झाडाखाली विश्रांती घेतली की,आराम वाटेल.मरण तर सर्वानाच येते.कबिर म्हणतात..
” काजी मरे मुल्ला मरे मर गये पंडित जोसी।अच्छे बुरे सब कोई मरे बुटी कालकी फासी।।” मरण कोणालाच चुकले नाही.तेव्हा मुखी नामस्मरण करत सावधपणे जावे.चुकले असेल तर माफ करा.आजपर्यंत आम्ही कधीच कोणाला स्वतःसाठी कांही मागीतले नाही.आज मागतो.दवाखान्याचे बील देण्यासाठी सर्वांनी वर्गणी जमा करावी.भराभर सर्वां नी पैसे जमा केले. बीलापोटी २५० रु. अच्युतरावांना देऊन बाकीचे नगीनभाई जवळ ठेवले.नंतर गाडी बोलावली.गाडी त मुख्य मंडळी व मुद्दाम मुंबईहून आलेल्या सावित्रीबाई बोराडे,डफ वाजवणारे नरहरि मांग,लोभाजी कांबळे बसले.कुंताबाई आधीच बसल्या होत्या. त्यांचेकडे लक्ष जाताच बाबांनी त्यांना खाली उतरवून दिले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-१०-२०२१.









