आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

संत गाडगेबाबा संपुर्ण भाग ४, (१६ ते २०)
अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत गाडगेबाबा !!!
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – १६.
लग्नानंतर थोड्याच दिवसात कलावतीचे निधन झाले.बाबा शोक समाचारालासुध्दा गेले नाहीत.नंतर कुंता बाईस व छोट्या गोविंदास आमल्यावरुन झिंगले पिंगले या गांवी त्यांना झोपडी बांधून दिली व तिथे त्या दोघा मायलेकरा ना ठेवून स्वतः चालते झाले.झिंगले पिंगले अगदी ओसाड गांव!केवळ अस्पृश्यांची २-३ घरे.त्यांच्या शेजारी या दोघांनी रहायचेय!बाबाप्रमाणेच खडतर व्रत त्यांच्या परिवारालाही भोगावे लागले. झोपडीपासून नदी बरीच लांब,प्यायचे व वापरायचे पाणी छोट्या गोविंदाला झोपडीत एकटे ठेवून आणावे लागत.त्या ओसाड गावांत रानडुक्कर व लांडग्यांचा फार वावर!काळजावर दगड ठेवून कुंता बाई पाण्याला जात.त्या गावात मजूरीची सुध्दा मारामार!कसे जगायचे?
शेवटी नाईलाजाने तीने सासु जवळ गार्हाणे मांंडले.सखुबाईने सून व नातवाला घेऊन पुन्हा आमल्याला रहायला आल्या.पुढल्या वर्षीच्या ऋणमोचन यात्रेतच बाबांची भेट झाली म्हणण्यापेक्षा कामाच्या अधिक्यामुळे नुसती नजरानजर झाली.रात्रीचे कीर्तन आटोपल्यावर प्रत्यक्ष भेट झाली,तेव्हा गोविंदाची फार आबाळ होत असल्याचे म्हटल्यावर,बाबांनी तोड काढली.त्याला कळशीला मावशीकडे ठेवण्यास सांगीतले.आणि माझं काय?मला कुठे धाडतां?तू कोणाचही कोणतही काम करुन भाकरी मागून जगावं! कुंताबाई गाडगेबाबांची पत्नी आहे हे कळलं की, लोक त्यांना भाकरी मागू देत नसत. त्यांची मोठी अडचण होई.बाबांना कळले तर ते संतापतील ही धास्ती!शेवटी झाले तसेच.मूर्तिजापूरला गेल्यावर तिथे भाकरी मागतांना डाॅक्टर सहस्रबुध्देशी गाठ पडली.डाॅक्टरना ह्या गाडगेबाबांची पत्नी आहेसे कळल्यावर त्यांनी अगत्य पूर्वक घरी नेऊन त्यांची चांगली बडदास्त ठेवली.तीला भाकरी मागायला बाहेर जाऊ देईनात की,घरकाम करुं देईना.डाॅ. नी बाबांची कीर्तने ऐकली होती.त्यांचे मनी बाबांविषयी श्रध्दा होती.शेवटी व्हायचे तेच झाले.बाबांना कळतांच त्यांनी डाॅक्टरांना तातडीने पत्र पाठवले. कुंताबाईस फुकट खाऊ घालू नये.आम्ही परीट!त्यांचेकडून कपडे धुवून घ्यावे अन्यथा त्यांनी कुठेही भाकरी मागून खावी.आपल्या घरी ठेवू नये.अश्या कडक शिस्तीचे बाबा भोक्ते होते.
गोविंदला कळशीला ठेवतांना घरधन्यास स्पष्ट बजावले याने काम केल्यावरच खायला द्यावे एरवी उपाशी राहू देत.त्याच्या अंगावरच्या कपड्यांची पार दैना झाली पण बाबांच्या धास्तीमुळे कुणी कपढे देण्यास धजावत नसे.बिचारा गोविंद एकटाच रडत बसायचा!ही वार्ता मुंबईतील परीट समाजास कळल्यावर एक परीट कळशीस येऊन,घरधन्यास म्हणाला भिक्षा मागून का होईना याचे मुंबईला शिक्षण तरी होईल.त्यास मुंबईस घेऊन आले.मुंबईत बाबांचे असंख्य भक्त पण त्यांच्या अनुशासनाविरुध्द जाऊन त्यास सांभाळण्याचे कुणात साहस नव्हते.शेवटी सातरस्त्यावर राहणार्या आऊबाई भंडारीकडे गोविंदाने राहून रोज एक एका घरी जेवावे व शाळा करावी.
इकडे सखुबाईची शक्ती वार्धक्याने क्षीण होऊ लागली.बाबा गोविंदच्या लग्नाचे बघणार नाही लक्ष घालणार
नाही हे त्या जाणून होत्या.त्यांना गोविंद च्या लग्नाचा ध्यास घेतल्याचे त्यांच्या समाजात कळतांच,परीट जातीतील खैरी च्या मारोतराव परीटाने आपल्या कन्येची सोयरीक गोविंदाशी पक्की केली.बाबा ऋणमोचनला आल्यावर, सखुबाई सोबत खैरीकर बाबांकडे आले.दोघां मायलेकां ची बरीच चर्चा झाल्यावर,बांबांच्या मना प्रमाणे लग्न करायचे ठरले.सखुबाई,कुंता बाई व वर्हाडी मुंबईस पोहोचली.लग्न वार्ता परीट समाजास कळतांच,बाबांच्या मुलाचे लग्न थाटामाटाने करण्याच्या हेतूने सारी तयारी केली.पण बाबांनी वेगळेच ठरवले होते.लग्नतीथी,स्थळ कशाचा पत्ता लागु दिला नाही.आणि एके दिवशी अचानक सकाळी सातरस्त्यावर आले.गोविंदाला म्हणाले,आज तुझे लग्न करायचेय!उठा…भिक्षा मागून या!ऐन लग्नाच्या दिवशी त्यांनी मुलास सातरस्त्यावर भिक्षा मागायला लावली. भिक्षा मागून आल्यावर त्याच्यासह सारं वर्हाड घेऊन बरळीच्या डोंगरावरील एका मोकळ्या मैदानाकडे बोट दाखवून स्वतःसहित सर्वांना मैदान स्वच्छ करायला लागले.परीट समाज व इतर भक्त मिळून ८-१० हजार लोकं जमा झालेत. Contractor अमृतराव पाध्यांनी सर्वांना पुरेल एवढ्या पाण्याची व्यवस्था केली.सर्व व्यवस्था झालेवर बाबांनी अंगावरच्या जुनेर्यावरच मुला मुलीस हळद लावून लग्नास उभे केले. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालून ७॥ रु.त लग्न उरकवले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षीदेशमुख.
दि. २७-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – १७.
गाडगेबाबांच्या मुलाचे लग्न इतक्या साधेपणाने होत आहे ही बातमी मुंबईभर वार्यासारखी पसरली.लोकं धावत वरातीसाठी मोटार,गाड्या घेऊन वरळी डोंगरावर पोहोचले,पण बाबांनी एका बैलगाडीत जुन्याच कपड्यात वधू वरांना बसवून,मागे हजारो लोकं अशी वरात फिरवून वरात वरळी डोंगरावर परतली.तीथे दोन वाजेपर्यंत बाबांनी कीर्तन केले.ते आटोपल्यावर,सखुबाईस म्हणाले,झालं ना तुझ्या नातवाचं लग्न? आतां गावाकडे परत जा.मनासारखे थाटामाटात लग्न झाले नाही तरी आपल्या लेकरांमागे हजारों भक्त असले ले बघून त्या मातेचा अभिमानाने उर भरुन आला.अशी विभूती जन्मास घातल्याबद्दल धन्यता वाटली.हा लहान पणापासूनच मनस्वी!मनाला वाटेल तसं करणारा,याच्या काळजीने जीव अगदी थकून जायचाय!अन् एके दिवशी कुणालाही न सांगतां प्रपंच त्यागून घरा बाहेर पडला.इतर मुले पळून जाऊन मातीमोल होतात,पण हा मात्र सन्मार्गी लागून कीर्तीवंत होऊन हजारो माणसां च्या काळजात शिरला.परीट कुळाचा उध्दार केला.
लग्नाहून परत आल्यावर सखुबाई गंभीर आजारी पडल्या.अंतकाळ जवळ आल्याच्या जाणीवेने डेबूजीच्या भेटी साठी प्रत्येकाला गळ घालू लागल्या.पण बाबांचा पत्ता कुठे?शेवटी मूर्तिजापूरला त्यांचे कीर्तन आहेसे ऐकुन कुंताबाई तिथे पोहचून बाबांना भेटण्याची गळ घातल्या वर बाबा म्हणाले,मी काय डाॅक्टर आहे? आईला सांग,नुकतीच आपली भेट लग्नात ऋणमोचनला झालेली आहे. आतां सर्व लक्ष देवाकडे लाव,असे सांगून अतिशय निसंगपणे कीर्तनाच्या दिशेने चालू लागले.हताश कुंताबाई कळशीला पोहोचल्या.
सखुबाई डोळ्यात प्राण आणून लेकाची वाट बघत होत्या.कुंताबाई एकट्याच परतलेल्या बघून त्या बेशुध्द झाल्या.धावाधाव झाली.थोड्या वेळाने शुध्दीवर आल्यावर क्षीण स्वरात म्हणाल्या,माझ्या डेबूने आपला तर उध्दार केलाच पण कुळाचाही केला.तो देवमाणूस झालाय!त्याचा राग न धरता त्याला साथ द्या.१ मे १९२३,फाल्गुन वद्य अष्टमीला मुलाची गाठ न पडतांच कष्टमय जीवनाची प्राणज्योत मालवली.
कामाचा पसारा वाढत दिवसेंदिवस नवनवीन कामें निर्माण होत होती. पंढर पूरला चोखामेळा धर्मशाळा बांधून झाली
परीट समाजाने वर्गणी गोळा करुन धर्म शाळा बांधण्याचे ठरविले.अनाथ आश्रमा च्या पूर्वेस हवी तशी मोकळी जागा मिळाल्यावर विकत घेऊन बांधकामास सुरुवात झाली.तळमजल्यावर पांडुरंग रखुमाईची मूर्ती,तळमजला व वरच्या दोन्ही मजल्यावर यात्रेकरुंना सामान ठेवण्यास कपाटें,स्वयंपाकाच्या भांड्यांची व्यवस्था,सर्व सोईयुक्त धर्म शाळा बांधून पूर्ण झाल्यावर,परीट समाजातीलच पंच नेमून धर्मशाळा त्यांच्या स्वाधीन केली. दर्यापूरचे अमृत गणाजी व दगडीबुवा परीटाकडे व्यवस्थापनाचे काम सोपवून बाबा मोकळे झाले.
दोन्ही धर्मशाळेचे काम उरकत नाही तोच मराठा धर्मशाळेचा सुत्रपात झाला.ज्यांचे जवळ बडव्यांना द्यायला पैसा असेल ते वारकरी यात्रेकरु आपली व्यवस्था त्यांचे कडे करवून घेत,त्यांना देवर्शनही सुलभ होत असे.पण हजारों निर्धन वारकर्यांची दुर्दशा पाहवल्या जात नसे.देव देवळांतच नाही तर तो सर्वत्र आहे,हे झाले तत्वज्ञान हे फक्त ग्रथातच असते.सामान्यांना या तत्वज्ञानाचा उंच घास गिळवत नाही. त्यांना हवे असते दृष्टीसमोर दिसनारे रुपडे!प्रपंचाचा भार कांही काळ लाजूला सारुन वाटेल तेवढे कष्ट सहन करुन, वारकरी आषाढी-कार्तिकीला देवदर्शन, भजनकीर्तन,चंद्रभागेत स्नान व पुढल्या वर्षी येण्याचा वायदा करुन घरी परततात
चोखामेळा धर्मशाळेमुळे अस्पृष्यां ची सोय झाली,पण निर्धन,दरिद्री निष्ठावंत भक्तासाठीही आसरा उभारण्या ची निकड बाबांच्या लक्षात आली.चहू बाजुंनी द्रव्यांचा ओघ वाहत होता. कित्येकदा बाबा नाकारीत असे.आषाढी कार्तिकेला बाबा पंढरीला येऊन गावा बाहेर,वाळवंटी तर कुठे शेतात,कीर्तना आधी मैदान स्वच्छ करीत.कीर्तन अगदी पहाटेपर्यंत चालत असे.वारीसाठी गरीब श्रीमंत,हौशी,स्पृश्य,अस्पृश्य सगळ्याच प्रकारचे लोकं येत.बाबांचे कार्य,त्यांची निःस्पृहता बघून आपलाही पैसा सत्कारणी लागावा म्हणून मराठा धर्मशाळा बांधण्याची बाबांना गळ घातली.मग त्यांनी एक शेत विकत घेतले.पायाभरणी सुरु होऊन जलद गतीने बांधकामास सुरुवात झाली. बाबांना शिक्षणाचा गंध नसूनसुध्दा त्यांची निरक्षणशक्ती अफाट होती.त्यांना प्रत्येक कामातील बारकावे माहीत असत जे माहित नसे ते शिकण्याची धडपड असे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – १८.
लहानपणापासून बाबांचे शरीर कष्टाळलेले,पुढे साधना काळात जीवाला अपार कष्टवून जय मिळवला.त्यामुळे झोप!भूक तहान सगळे ताब्यात.रात्री कीर्तन नसले की,कारभार्यासवे हिशोब बघत.त्यांना लिहिता वाचतां येत नसले तरी कोणत्या वहीत कुठे काय लिहिले आहे ही इतंभूत माहिती असायची. कारकोळ नोंदी सुध्दा त्यांच्या लक्षात असत.हिशोब आटोपला की अनेक प्रकारचे वादग्रस्त प्रकरणे समोर येत. योग्य निवाडा होईस्तोवर पहाट होत असे दिवस उजाडला की बाबा झाडायला लागले की मग सारेच कामाला लागत. कामचुकारपणा बाबांना अजिबात खपत नसे.स्वच्छतेचे काम आटोपत नाही तोच बाबांची ललकारी घुमे.कामावरची माणसे पटापट आपापली हत्यारी घेऊन कामावर हजर.बघता बघता सर्व सोई युक्त मराठा धर्मशाळा बांधुन तयार झाली या वैभवशाली धर्मशाळेच्या व्यवस्थापने साठी खूप विचार करुन बाबांनी “मराठा धर्मशाळा पंढरपूर विश्वस्त” ट्रस्ट निर्माण करुन मराठा धर्मशाळा त्यांच्या स्वाधीन केली.विश्वस्त कमेटीत बाबा प्रमुख!त्यांनी विश्वस्तपत्रामधे स्पष्ट नोंद केली,या मिळकतीवर माझा,माझा कोणीही आप्त शिष्य वा इतर वारस वा कोणत्याही प्रकारचा हक्क असणार नाही.सहीच्या जागी डाव्या हाताचा अंगठा उठवला.
गोविंदचे लग्न उरकल्यावर बाबा निघून गेले.भक्त मंडळींनी गोविंदास पुण्याला आणून श्रीशिवाजी मराठा फ्री बोर्डींगमधे ४ थ्या वर्गात नांव घातले. नियमित शाळा सुरु झाली.तो गर्भात असतांनाच वडिलांनी गृहत्याग केल्या मुळे अपशकुनी समजुन आई आजीने लाडकौतुक केले नाही पितृसुखाला पारखा!कुटुंबाची परवड होत असतां तो कसातरी वाढला.आई मोलमजुरीला गेली की,गोविंद झोपडीत एकटाच राही.मुंबई त आल्यावरही त्याची माधुकरी चुकली नाही.पुण्यात आल्यावर मात्र माधुकरी बंद होऊन एकाच ठीकाणी दोन वेळचे जेवण मिळू लागले.आता कुठे थोडे सुखाचे दिवस आले तर नियतीला बघवले नाही.एके दिवशी शाळेत जात असता पिसाळले कुत्रे चावले.डाॅक्टरांनी शर्थ केली पण ५ मे १९२३ ला आईबापा वेगळ्या गोविंदने आचके देत प्राण सोडला.त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटणास बाबांचे कीर्तन होते.गावांत बाबांच्या नांवे तार आली.बाबा स्तब्ध झाले पण क्षणभरच!ठरल्यावेळी रात्री बाबा कीर्तनास उभे राहिले.कीर्तनाचां जयघोष सुरु झाला…..” राम गेले,कृष्ण गेले,पांडवही त्याच वाटीनं गेले,ऐसे गेले कोट्यानुकोटी।काय रडू एकासाठी?खंत तरी कोणाकोणाची कराव?” दुसरे दिवशी पुढील कीर्तनासाठी चालते झाले, पण पुण्याकडे वळलेही नाही.
“तुका म्हणे राज्य करितां जनक ।
अग्निमाजी एक पाय जळे ।।
निसंगपणाची सारी लक्षणे बाबांमुळे सार्थ झाली.
नाशिक नगरपालिकेचे अध्यक्ष पंढरपूरास बाबांना भेटून पंढरपूरसारखेच नाशिकला धर्मशाळा बांधण्याची इच्छा प्रगट केली.नाशकांत बाबा येऊन स्मशानाजवळची टेकडीवर सोळा हजार स्केअर हेक्टर क्षेत्रफळ जागा पसंत केली बाबांच्या नेतृत्वाखाली निवडुंग भरलेली जागा युध्दपातळीवर सर्व प्रकारचे कारागीर कामास लावून फक्त जेवणा पुरतां एखादा तास सोडला तर,भुताने झपाटल्यासारखे दिवसभर काम सुरु ठेवले.बाबा स्वतः टिकाव फावडे हाती घेऊन काम करीत असल्यामुळे,इतर कामगारांना जखमा झाल्या तरी पट्ट्या बांधून कुचराई न करतां कामे करीत राहत.तिथे अनेक जाती जमातीचे उच्च वर्णिया पासुन तर अस्पृश्य सर्वच निःस्पृहतेने राबत होते.शिवाशिवी शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता.त्या भयंकर निवडुंग बनाचे परिवर्तन होऊन तिथे एक सुंदर धर्मशाळेची इमारत उभी राहिल हे कल्पनेपलिकडचे होते.
१९३२ साली नाशिक जिल्ह्याचे पेरी नावाच्या कलेक्टरने अचानक भेट दिली असतां,शिस्तबध्द शेकडों मजूर श्रमत असलेले बघून ते फारच प्रभावित होऊन बाबांना विचारले.. What can I do for you ?विनम्रतेने बाबा म्हणाले, हे काम गरीबांसाठी असल्यामुळे या जागेचा १०० रुपये असलेला कर माफ करण्यात यावा.चवथ्याच दिवशी त्या जागेचा कर नेहमीसाठी रद्द करण्यांत आल्याचे पत्र प्राप्त झाले.सुंदर धर्मशाळे ची इमारत पूर्ण झाली.समोर मोकळ्या जागेत फुलझाडे,पटांगणांत हरळी व कांही ठीकाणी वाळू पसरवली.अशा प्रकारे नाशकांत सुंदर सर्व सोईयुक्त धर्मशाळेची इमारत उभी राहिली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-९-२०२१
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – १९.
नाशिक तीर्थक्षेत्र असल्यामुळे असंख्य सश्रध्द यात्रेकरु बरोबर कांही धंदेवाईक भिकारी सोडले तर,अनाथ, अपंग,पांगळी भिकारीही जमा होत. संकोचवश ते भिक्षा मागत नसल्यामुळे उपासमारीने कित्येक भिकारी टांचा घासून मेले की,नगरपालिकेचे सेवक प्रेत उचलून नेत.भ्रमणकाळात बाबांनी स्वतः
वस्र,पात्र,अंथरुणाशिवाय काय हाल होतात हे त्यांनी अनुभवले होते.त्यामुळे अनाथांना,महारोग्यांना वस्रे,पात्रे,वाटण्या चे ठरविले.कीर्तनामधून ते आव्हान करुं लागले आणि दानांचा ओघ सुरु झाला. अमळनेरचे श्रीमंत प्रतापशेठ,मुंबईचे तुळशीदास खिमजी,अमरावतीचे किसन सिंह राठोड,नगरचे सरोष इराणी इत्यादी दाते दरमहा १००-२०० रुपये पाठवू लागले.
नाशिकला रामनवमी आणि सिंहस्थच्या मोठ्या यात्रा भरत असे. एरवीही वर्षभर यात्रा सुरु असत.यात्रेकरुं च्या नियमानुसार प्रथम रामकुंडावर स्नान करुन रामाचे दर्शन घ्यावे,सीताकुंड बघावा.कांही खरेदी,सायंकाळी घाटावर बसावे,सर्व आटोपले की, निवडुंग बनाच्या जागी राजवाड्यासारखी बाबांनी बांधलेल्या नाममात्र भाडे असलेल्या धर्मशाळेत विसावा घ्यावा.वाचकप्रेमीं साठी ग्रंथालयाचीही सुविधा केली होती. १९३५ मधे धर्मशाळा बांधून पूर्ण झाली त्यावर्षी चैत्रात आंधळ्या पांगळ्यांना कपडे,भांडी,द्राक्षेचा वाटप समारंभपूर्वक केला.याही धर्मशाळेचे विश्वस्त मंडळ स्थापून तयार करवलेले विश्वस्तपत्र विश्वस्तांच्या स्वाधीन केले.पुढे या धर्म शाळेची व्यवस्था यशवंतबुवा भंडारीकडे सोपवली.
शहरांतून एकत्र कुटुंबपध्दतीचा हळूहळू र्हास होऊ लागल्याने सहाजिक म्हातार्यांना जीवन जगणे केविलवाणे कठीण होऊ लागले.जीवनभर ताठरपणे जगलेली ही माणसे म्हातारपणी कोलमडून पडत.अनेक रोग,दमा,सांधे दुखी,दृष्टी अंधूक,कानाने कमी ऐकू येणे, दातांनी साथ सोडलेली अश्या अवस्थेत कुणाच्या तरी सहाय्याची अत्यंत निकड असते तीच मिळेनासी झाली की,नाईला जाने केविलवाणे होऊन घर सोडून तीर्थ यात्रेची वाटचाल करत.तिथे कुणी दयाळू भेटलाच तर रुपया दोन रुपये देई.जीवन भर सन्मानाने,स्वाभिमानाने जगलेली ही माणसे म्हातारपणी भीक मागण्याचे साहस कसे करुं शकतील?बाबांच्या भटकंती काळात अशी कितीतरी माणसे त्यांनी बघीतली होती विशेषतः तीर्थामधे.अशावेळी बाबा त्यांची सेवा सुश्रुषा करीत असे.कित्येकांनी बाबांच्या मांडीवर प्राण सोडला होता,त्यांचे अंत्य संस्कार स्वतः बाबांनी कष्टून केले होते. तरी त्यावेळी बाबा सामान्य होते.आतां त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त होते.अश्या असहाय्य निराश्रीतांसाठी कांहीतरी करायचा निश्चय केला.
पंढरपूरी बांधलेल्या धर्मशाळेमागील आवारात या अनाथ,दीन,अपंगासाठी झोपड्या बांधून त्यांच्या राहण्याची सोय केली.त्याच्या सेवासुश्रुषेची व्यवस्था धर्म शाळेत काम करणार्या सेवकांवर सोपवली तसेच त्यांच्यासाठी होणार्या स्वयंपाकातूनच यांच्यासाठीही दोन वेळची सोय केली.अशी लोकं तीर्थक्षेत्रीच नाही तर इतरत्र कुठेह आढळले तरी त्यांना इथल्या झोपड्यांमधे ठेवीत.एकदा बाबा वाखरी गावावरुन पायी येत असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गलितगात्र म्हातार्या ब्राम्हणास उचलून आणून झोपडीत त्याची व्यवस्था केली.
कित्येक वृध्द अखेरच्या क्षणी भान विसरल्याने जागेवरच ओकारी घाण घाण करीत.तिटकारा येऊ न देता बाबा स्वतः उपसत.कधी कधी बाबांचे स्नेही यांना फुकट खाऊ घालण्यावरुन वाद घालत तेव्हा बाबा समजुत काढत म्हणायचे अरे तुकोबा म्हणतात.. “जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले।।”बाबांनी त्यांचे साठी सदावर्त सुरु करायचे ठरविले.
बाबांना स्वतःला अर्ध्या भाकरीच्या वर लागत नसे,पण या दीनदुबळ्यांसाठी बाबा घरोघरी जाऊन भिक्षा मागीत. एखाद्या धनीकडे गेल्यावर त्याचा आदरसत्कार नाकारुन या लोकांसाठी कांही कराण्याचे आव्हान करीत असे. त्यातीलच एखादा पंढरपूरी आल्यावर एकही माणूस धडधाकट नसलेल्यांची शिस्तबध्द पंगत बघायला मिळायची, ज्यांना हात नाही त्यांना भरावे लागत असे.महारोग्याला भरवतांना कोणी कुचराई केली तर बाबा स्वतः येऊन भरवीत असे.कुणी वाढपी रेंगाळतांना दिसला की, कधी त्याच्या पाठीत तडाखा बसेल नेम नसायचा.पुंंडलिक वरदाच्या गजरांत जेवणं उरकत असे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – २०.
बाबांच्या निदर्शनाखाली काम करणारी माणसे,बाया चांगली सधन कुटुंबातील होती.फक्त बाबांवरील निष्ठा, भक्तीने भारावून आपली घरेदारे सोडून या सत्कार्यासाठी फुकट राबत होती.मग दाता ही शिस्तबध्द निस्वार्थी सेवा बघून भारावुन रुपयांची थैली बाबांसमोर ठेवीत.मिळत असलेल्या देणगीचा योग्य विनियोग व प्रत्येक गोष्टीत शिस्त आणलेल्या बाबांच्या या महाविद्यालयातू न शिकून तयार झालेले लोक अनेक ठीकाणी सेवा देण्यासाठी बाहेर पडत.
यात्रेकरुंच्या सुखसोईसाठी पंढरपूर, नाशिक तीर्थक्षेत्री केलेल्या कामाचा धडाका बघून इतर तीर्थेही बाबांना खुणावुं लागली.प्रत्येक तीर्थक्षेत्री यात्रे करुंची दाटी,मलमुत्रांची घाण!आळंदीला यात्रेकरुंना देवदर्शनास जास्त दूर जावे लागू नये अशा अंतरावर गावाबाहेर धर्म शाळा बांधल्या.या बांधकामाचा खर्च, मुळचा दरिद्री,अपूरे शिक्षण,कोकणातील रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने प्रभावित झालेले भागोजी कीर यांनी आपल्या हुशारी व अंगच्या हिंमती वर बांधकामांची कंत्राटे घेऊन लाखो रुपये कमावले.बाबांच्या कार्याचा आवाका बघून केला.एवढेच नव्हे तर यात्रेसाठी ८०० व प्रतिमाह १०० रुयये प्रमाणे वार्षिक २,०००/- रु.चा आय बांधून दिला.
देहुलाही भरपूर खडक असलेली पडीक जागा घेऊन बांबांच्या हाताखाली तरबेज झालेले अतिरथी महारथी कामास भिडले.होत असलेल्या जखमां ची पर्वा न करतां अविरत काम सुरु असे. बाबांचे घारीसारखं सगळीकडे लक्ष असायचे.जखमी व्यक्तीकडे जाऊन स्वतः मलमपट्टी करायचे व पाठीवर हात फिरवला की,दुखणे दूर पळून जात.देहु पासुन उत्तरेस भंडाराच्या उतरणीवर अति प्राचीन लेणे,त्याच्या समोरच बाबां च्या आज्ञेने साधकांसाठी राजारामबुवा वैश्यवाणींनी छपरी उभारली.समोर फुल झाडे लावून ते स्थळही देखणे केले.
एके काळी पुणे ही महाराष्र्टाची राजधानी.त्याकाळी मुंबई राज्याचे शासन
चार महिने आपला कारभार पुण्याहुन करत असे.पुण्यात एक मोठे हाॅस्पिटल होते.दूरदूरुन रुग्ण येत.रोजंदारीच्या निमित्याने गोरगरीब येत.काम आटोपल्यावर कुठे उतरायची सोय नसल्यामुळे कुठे तरी फुटपाथवर राहत.
हाॅस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांची हि अशीच गैरसोय होत होती.पंढरपूर धर्मशाळेचे ट्रस्टी श्री.चिपळेणकर पुण्यात राहत होते.अश्या लोकांसाठी कांही सोय व्हावी यादृष्टीने ते बाबांशी चर्चा केली आणि लगेच बाबा कामाला लागले.
आकुल नावाचे पोलीस अधिकार्याच्या मालकीची सोमवारपेठेतील गोसाव्यांचे स्मशान असलेली मोकळी जागेचा व्यवहार करुन बाबांनी ताब्यात घेतली. बाबांनी आपले कामगार बोलावून झपाट्याने कामास सुरुवात केली. गोसाव्यांनी थोडा आरडाओरडा करुन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला पण बाबांपुढे कांही चालले नाही.तीथे श्रीदत्ता चे सुंदर देऊळ बांधले.बाकी जागेववर सुरेख धर्मशाळा बांधली.हा सर्व खर्च अकुललांनीच केला.कित्येक गरीब विद्यार्थी,रुग्णाचे नातेवाईक,गरीबांच्या लग्नाची सोय या धर्मशाळेमुळे झाली. पूर्वी इथे स्मशान होते,या जागेचा उपयोग केवळ प्रातर्विधीसाठी करीत तिथे आज श्रीगाडगे महाराज आकुल धर्मशाळेची उत्तम इमारत उभी आहे.
पुण्याप्रमाणेच मुंबईतही असेच हाल होत होते.पारशी ट्रस्टने बांधलेल सुसज्ज जे.जे.हाॅस्पिटल!या रुग्णालयात हजारो लोक दूरदूरुन येत.त्यांना महिना दोन महिने राहावे लागत.मुंबईत आधीच जागेचा तुटवडा.त्यात रुग्णालयात भरती असलेल्या नातेवाईकांची फारच परवड होई.जे.जे. हास्पिटला लागून असलेली मोकळी जागा पारशी ट्रस्टची होती. ती जागा मिळण्यासाठी,त्यावेळचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि आरोग्य मंत्री डाॅ. गिल्डर या दोघांच्या खटपटीने पारशी ट्रस्टने अखेर बाबांना जागा दिली.त्यावेळ चे बांधकाम मंत्री,फलटणचे राजे मालोजीराव निंबाळकरांचे ही धर्मशाळा बांधण्यास बरेच सहाय्य मिळाले.धर्म शाळेच्या मध्यभागी मारोतीची स्थापना करुन त्याच्या चहूबाजूंनी तीन मजली इमारत उभारली.अनेक सद्भक्त दान शूरांनी आपापल्या भावांजुळी वाहील्या. मुंबईची ही धर्मशाळा म्हणजे गोरगरीबांचे
भरवशाचे विश्रामस्थल झाले.
बाबांचे अनुयायी जवळ जवळ १००-१५० कीर्तनकार महाराष्र्टभर प्रचार करीत.यात सर्व जाती जमातीचे स्री पुरुष होते.ब्राम्हण,मराठे,न्हावी, वंजारी,धनगर,सुतार,महार,मांग,चांभार या सर्वांचा सहभाग होता.या तरुणाचे महाराष्र्टावर मोठेच ऋण आहे म्हटल्यास वावगे होणार नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २९-९-२०२१.









