आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

15. संत ज्ञानेश्वर महाराज चरीत्र भाग १, (१ ते ५)
आपला माहाराष्ट प्रान्त म्हणजे दर्याखोर्यांनी भरलेला, रानावनांनी झाकाळलेला, गिरिशिखरांनी साजुन दिसणारा आणि या गिरिशिखरावर जिथंं तिथं योगीराज ठाण मांडुन बसलेले! शंकराचे आदिपीठ म्हणजेच ज्योतीर्लिंग! भारतात एकुन बारा ज्योतीर्लिंग आहेत. पैकी पांच आपल्या महाराष्टातच आहेत… त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ आणि घृणेश्वर या आदिपीठां व्यतिरिक्त शिवमंदिर तर अगणित आहेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र !!!
भाग – १
नमस्कार!!
सगळ्या जगाची माऊली असलेल्या ज्ञानेश्वरांबद्दल कांही भागात त्यांना बदिस्त करणे म्हणजे सुर्याला काजवा दाखवण्यासारखे होईल. तरी सुध्दा अल्पबुध्दीनुसार थोडं फार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीप्रमाणे गोड मानुन आपला आशिर्वाद व क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!
आपला माहाराष्ट प्रान्त म्हणजे दर्याखोर्यांनी भरलेला, रानावनांनी झाकाळलेला, गिरिशिखरांनी साजुन दिसणारा आणि या गिरिशिखरावर जिथंं तिथं योगीराज ठाण मांडुन बसलेले! शंकराचे आदिपीठ म्हणजेच ज्योतीर्लिंग! भारतात एकुन बारा ज्योतीर्लिंग आहेत. पैकी पांच आपल्या महाराष्टातच आहेत… त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ आणि घृणेश्वर या आदिपीठां व्यतिरिक्त शिवमंदिर तर अगणित आहेत. नावं तरी कुठवर सांगायची?
महाराष्र्टातील गिरिशिखरांवर शंकरराजा आदिशक्ती पार्वतीसह निरनिराळ्या नांवाने मुक्कामाला आलेत. असा हा महादेव-जगदंबेचा, प्रकृती-पुरुषाचा शिवशक्तीचा देश! अशा त्या जटाभारांतुन गौतमानं गंगा आणली. गोदावरी नांवाने त्र्यंबकेश्वरी उतरुन दक्षिणेकडे निघाली. तिच्या काठी पैठण क्षेत्र, जुनं नांव प्रतिष्ठान! प्रतिष्ठान हे मोठमोठ्या विद्वांनांचं माहेर! उत्तरेत जो मान काशीला, तोच मान दक्षिणेतील पैठणला. पैठण हे न्यायाचं, धर्माच व्यासपीठ. केवढीही गहन समस्या असली तरी पैठण नगरीत उत्तर मिळाल्याशिवाय रहायचं नाही.
पैठणपासुन आठ मैलांवर गोदातरी आपेगांव नावांच छोटस गांव. त्या गांवी एका भागवत भक्त घराण्यात शके ११२५ च्या सुमारास गोविदपंत व पत्नि नीराबाई राहत होते. शेजारीच पैठण असल्यामुळे त्या घराण्यावर विद्वत्तेचेही संस्कार झालेले. गोविंदपंत चांगला व्युत्पन्न माणुस! ते नुसते शब्द पंडीतच नव्हते तर आल्यागेल्याचा चांगला सत्कार सुध्दा व्हायचा. त्यामुळे त्यांचे घर सतत भरलेलं असायचं परंतु घर भरलेलंअसुनही रितंरितं वाटायचं, कारण त्या दाम्पत्यांना मुलंबाळं नसल्यामुळे दोघेही दुःखी असत. देव सगळं चांगल करेल असा विश्वास गोविंदपंत आपल्या पत्नीला विश्वास देऊन तीचे सांत्वन करायचेत.
योगायोगाने मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरखनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ हे शंकराचे उपासक व फार मोठ्या योग्यतेचे, योगमार्गाचे आचार्य!फिरत फिरत गहिनीनाथ आपेगांवी आलेत. गोविंदपंत आणि पत्नि नीराबाई यांनी त्यांचे मनोभावे आदरसत्कार केला. त्या जोडप्याचा सेवाभाव पाहुन गहनीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी दाम्पत्यांना योगसांप्रदायाची दिक्षा दिली. दोघांनाही अपरंपार आनंद झाला. आधीच नेटका प्रपंच, त्यांत गहनीनाथासारख्या योग्याचा उपदेश लाभल्यामुळे दोघांच्याही जीवनाचे सार्थक होऊन कृतकृत्य झाल्याचे समाधान वाटले. कांही दिवसांतच प्रचिती आली. पंचेचाळीस वर्षाच्या नीराबाईला दिवस गेले. यथावकाश प्रसुत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले.घरी पहिला पाळणा हलला. पुत्राचे नांव, विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे नांव, विठ्ठल ठेवले. म्हातारपणीचं कौतुक, नीराबाई विठ्ठलाला जिवापाड जपत असे.
शेजारच्या पैठणला काशीवरुन व देशाच्या सगळ्या भागातुन मोठमोठे पंडीत, शास्री यायचे. त्यांची प्रवचण, किर्तनं व्हायची, कुणी वेदान्तावर, कुणी सांख्यशास्र उलगडुन, कुणी न्यायशास्राच्या उतरंडी रचुन, तर कुणी जैनांचं व बौध्दांचं खंडन करायचेत.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
!! संत ज्ञानेश्वर !!
भाग – २.
एखादा पंडीत वेगवेगळ्या राज्यातील शास्रांना जिंकीत, मशाल पेटवुन, पालखीत मिरवित शहाणं वाजवीत, दिग्विजय करीत येऊन पैठणच्या चौकात मशाल रोवुन वादविवादासाठी पैठणच्या विद्वांनांना आव्हान करायचा. आणि जो जिंकेल त्याला शिष्य करण्याचे आश्वासन द्यायचा. मग १५-१५ दिवस वादविवादांचे मोठ मोठे फड पडायचे. पंचक्रोशीतील खुप लोकांची गर्दी होऊन पैठण नुसतं गजबजुन जायचंय!
भागवत, रामायण, महाभारत ची शास्रचर्चा ऐकण्यासाठी छोट्या विठ्ठलाला सोबत घेऊन गोविंदपंत वारंवार पैठणला जात असत. विठ्ठलाने बालपणापासुनच हे सर्व ऐकले, पाहिले.कुळकर्ण्याचं काम म्हणजे गांवचं दप्तर चोख ठेवणे. विठ्ठलाची मुंज झाल्यावर कुळकर्णीच्या व्यवहार तर शिकेलच पण सोबत अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिसुपर्ण, पुरुषसुक्त, आणि गीतेची संथा दिली.
संथा घेत असतांना विठ्ठलाने वडीलांना विचारावे, विविक्तसेवी म्हणजे काय? पंत उत्तरलेत की, ज्यांना एकांतात राहायला आवडते त्यास विविक्तसेवी म्हणतात. विठ्ठल विचार करी की, कसं शक्य आहे? घरी तर पाहुण्यांची, येणार्या जाणार्यांची सतत वर्दळ! मग विठ्ठलाने गोदातीरी शंकराच्या मंदिरात एकटाच जाऊन बसावं.खुप विचार करायचा पण मार्ग सुचत नव्हता.
एकदा कांही तडीतापसी शंकराच्या देवळात उतरलेत. विठ्ठलाने त्यांना विचारले, तुम्हाला घर नसल्यासारखे असे कां हिंडता? देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा, देवाचे आवडते व्हावे म्हणुन!
सांपडली वाट! विठ्ठलाने ठरविले आपणही तिर्थयात्रा करत संतसमागन करुन देवाचे आवडते व्हावे. मनाततल्या इच्छांना तिलांजली द्यायची. ठरवल्याप्रमाणे घरी येऊन १५वर्षाच्या विठ्ठलाने गोविंदपंताचे ( वडीलांचे ) पाय धरुन तिर्थायटानासाठी अनुमती मागीतल्या बरोबर आई-वडीलांना धक्काच बसला. पण पंत गहिनीनाथाचे शिष्य होते, त्यांनी विठ्ठलाला जवळ घेऊन आशिर्वाद देत म्हणाले, आम्ही दोघं म्हातारे तुझी वाट पाहत असुं हे लक्षात असु दे! नीराबाई रडतांना पाहुन पत्निला म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासुनच दिसत होते. गहिनीनाथांवर विश्वास ठेवुन उद्या विठ्ठलाला हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा!
दुसर्या दिवशी शुभ मुहुर्तावर विठ्ठल बाहेर पडला. प्रथम व्दारका तिथुन पिंडारक तिर्थ, गिरनार अशी तिर्थ करीत सप्तश्रृंगीला पोहोचला. आदीमायाच्या चरणी डोकं ठेवुन नंतर त्रिम्बकेश्वर! एका ज्योतीर्लिंगाचं दर्शन घडलं. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन भीमा-चंद्रभागेच्या काठांकाठाने तुळापुरी त्याला इंद्रायणी भेटली. तीच्या काठी असलेल्या अलंकापुरी आला. अलंकापुरीचि भूमी मोठी देखणी! पश्चिमेकडुन इंद्रायणी चंद्राकार वाहते आहे. तीच्या पावन तीरावर सिध्देश्वर ध्यानस्थ बसला आहे. वरच्या बाजुच्या सुरेख वनाला सिध्दबेट म्हणतात. तिथे कितीही त्रस्त मनानं गेलेल्या माणसाचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही, असा महिमा त्या भूमीचा!
विठ्ठलपंतांना भटकंतीची हौस असलेलं मन तिथं रमलं. पहाटे उठुन इंद्रायणीत स्नान संध्या करुन सिध्धेश्वराचं दर्शन घेऊन इंद्रायणीच्या कुशीत आत्मचिंतन करीत बसावं. दुपारी गांवातुन माधुकरी आणल्यावर त्याचे दोन वाटे करुन एक वाटा इंद्रायणीतील माशांना खाऊ घालावं. परत चिंतनात मग्न व्हावं. संध्याकाळी सिध्देश्वरासमोर निरनिराळी स्तोस्र गावेत. अशी विठ्ठलपंताची दिनचर्या सुरु असायची.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
!!! संत ज्ञानेश्वर !!
भाग – ३.
अलंकापुरी-आळंदीला एक सत्पात्र, माणसांची पारख असणारा, नेमाने रोज संध्याकाळी सिध्देश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय झोपायचे नाही,असा नियम असलेले कुळकर्णी सिध्दोपंत नेहमीप्रमाणे सिध्देश्वरात शंकराचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांना समोरच्या ओवरीत गंभीर आवाजात, स्पष्ट आवाजात, नेटका शब्दोच्चारात महिम्न स्तोत्र म्हणत असलेले विठ्ठलपंत त्यांना दिसले…. असतगिरी समं स्थान् कज्जलं सिंधु पात्रे। सुरतरुवरशाखा लेखणी पत्र मुर्वी।। लिखति यदी गृहीत्वा शारदा सर्व कालं।तदापि तव गुणानामीश पारं न यति।। हे ऐकुन सिध्दोपंताचं मन मोहुन गेलं. त्यांनी विठ्ठलपंताची चौकशी केल्यावर विठ्ठलपंतांची निर्लेप वृत्ती पाहुन दुसर्या दिवशी आग्रहाने घरी जेवायला आमंत्रित केले.ं
घरी येऊन पत्निला आपली मुलगी रखुमाईकरतां स्थळ पाहिल्याचे व उद्या जेवायला आमंत्रित केल्याचे सांगीतले, दुसर्या दिवशी पत्निने चारी ठाव स्वयंपाकाचा बेत केला. दुपारी विठ्ठलपंत जेवायला बसल्यावर आईच्या आज्ञेने रखुमाई त्यांना वाढत होती. पण विठ्ठलपंतानी डोळा उचलुन वर सुध्दा पाहिले नाही.
जेवण आटोपल्यावर सिध्दोपंतानी सहज बोलत त्यांना म्हणाले, देवळात येण्याजाण्याचि राबता असल्यामूळे तुमच्या साधनेत विक्षेप येतो. आपल्या घरच्या माडीवरुन सिध्देश्वर स्पष्ट दिसतात, कुणाचा त्रास, व्यत्यय येणार नाही, शिवाय तुम्हाला पाहिजे त्या ग्रथांची व्यवस्था केल्या जाईल, तरी इथेच राहुन ध्यान धारणा करावी. विठ्ठलपंतानी तीथे राहायचे कबुल केले.
दुसर्या दिवशी विठ्ठलपंतांना इथे कसे वाटते? झोप आली का? वगैरे चौकशी केल्यावर सिध्दोपंत म्हणाले, रात्री मला दृष्टांत झाला. माझी लेक रखुमाईचा व तुमचा विवाह झाला. विठ्ठलपंत म्हणाले, पण मला असा कांही दृष्टांत झाला नाही. त्यावर ब्रम्हचारी, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ अन् सन्याश्रम असे चारही पुरुषार्थाबद्दल सिध्दोपंतांनी त्यांना समजावुन म्हणाले, तुम्हाला देवाचा संकेत मिळाल्यावरच हा विवाह होईल असे आश्वास्त केले.
पहाटे विठ्ठलपंताच्या स्वप्नात येऊन श्रीहरी म्हणाला, तू भक्तीचा पुतळा, ज्ञानाची वस्ती तुझ्या घरी आहे. वैराग्य पुरतेपणी अंगी बाणले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी रुख्मिनीशी लग्न कर! कारण तिच्या उदरी सगळ विश्व मंत्रमुग्ध होईल असं भक्ती-ज्ञान-वैराग्य जन्माला येईल. सकाळी हे स्वप्न सिध्दोपंताना सांगीतल्यावर त्यांना ब्रम्हानंद झाला. पत्रिका जुळल्यावर लगेच एका शुभ मुहुर्तावर विठ्ठल रखुमाईचे लग्न लावुन दिले. विरक्त विठ्ठलपंत प्रपंच्याच्या चौकटीत सांपडले खरे! पण ते कमलपत्रावरल्या पाण्याच्या थेंबासारखे, पाण्यांत उगवलेल्या कमळासारखे अलिप्त!
भोवती बंधन पडलं, पण विठ्ठलपंताचे मन कांही संसारात रमेना! जेष्ठात लग्न झाले,आणि लगेच सिध्दोतंतानी जावई, लेक व पत्निसह पंढरपुरला नेऊन सर्वांनी मनोभावे विठुरायाचं दर्शन घेतलं. नंतर विठ्ठलपंतानी सासर्याकडे रामेश्वरला जाण्यासाठी अनुमती मागीतल्यावर मोठ्या कष्टाने ते तयार झाली. रखुमाईने दाराआडुन भरल्या डोळ्याने निरोप दिला. आणि विठ्ठलपंत निघाले यात्रेला.
विठ्ठलपंत श्रीशैलमल्लिकार्जुन, व्यंकटेश, अरुणाचल, चिदंबर, रामेश्वर, गोकर्ण, कोल्हापुर, कराड, माहुली अशी तिर्थ करीत जवळजवळ एक वर्षांनी आळंदीला परतले. पत्नि रखुमाई डोळ्यात प्राण आणुन वाट पाहत होती. दक्षिणेतील सगळी तिर्थ झाल्यावर आतां घरी आपेगांवला जावं असा विचार त्यांच्या मनी आला. त्याप्रमाणे सासर्यांना सांगीतल्यावर सिध्दोपंत पुर्ण कुटुंबच घेऊन आपेगांवला पोहोचले. या सर्वांना पाहुन गोविंदपंत व नीराबाईंचा आनंद तर गगनांत मावेनासा झाला. लाडक्या लेकाला व देखण्या व सद्गुणी सुनेला कुठं ठेवु, त्यांच्यासाठी काय करुं? असं झालं. पाहुणचार, आहेर झाले. चार दिवस आनंदात राहुन मंडळीसह सिध्दोपंत आळंदीला परतले.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
!! संत ज्ञानेश्वर !!
भाग – ४.
लेक व सुनेचं सुखी संसार, व कौतुक पाहुन लवकरच विठ्ठलपंतांच्या आई-वडीलांचा स्वर्गवास झाला. विठ्ठलपंतांना पोरकेपणा भारी जाणवला. आणि त्यांच मुळचं वैराग्य परत जागं झालं. कुळकर्णी वतनाकडे त्यांच दुर्लक्ष झालं. एकट्यानेच गोदावरीच्या काठी जाऊन भजन, किर्तन करावं, ध्यान-धारणा करावी. त्यांच संंसारातुन पुर्ण लक्ष उडालं! परत एकट्याला तिर्थक्षेत्री स्वच्छंदी भटकावसं वाटु लागले . ही गोष्ट सिध्दोपंताना कळल्याबरोबर सत्वर आपेगांवला आलेत. गोदातीरी असलेल्या महादेवाच्या मंदिरांत विठ्ठलपंताना गाठुन, आळंदीला चलण्याबाबत त्यांचे मन वळवले. रखुमाई, विठ्ठलपंतांना सिध्दोपंत आळंदीला घेऊन आलेत, पण विधिलिखीत निराळच होतं.
आळंदीला एका पंडीताने प्रवचनामधे सांगीतले की, ज्या दिवशी वैराग्य निर्माण होईल त्या दिवशी बायकोच्या सम्मतीने सन्यास घेऊन चालते व्हावे. हे ऐकुन ते पत्नि रखमाईला सतत सन्यास घेऊन जाण्याबद्दल विचारणे सुरु ठेवले. त्यांना जाण्यापासुन प्रवृत्त व्हावे म्हणुन त्यांना ज्यात आनंद वाटेल अशा गोष्टी करण्याची तीची धडपड सुरु असे. परंतु विठ्ठलपंत आपल्या निश्चयापासुन तसुभरही ढळले नाही.एकदा रखुमाई अर्धवट झोपेच्या गुंगीत असतांना त्यांनी जाण्याची अनुमती मागीतल्यावर अर्धवट झोपेच्या भरात दुश्चितपणे हुंकार भरला. झालं! पडत्या फळाची आज्ञा माणुन थेट काशी गाठली. तिथं फार मोठा अधिकारी असलेल्या श्रीपादस्वामीकडून संन्यासाची दिक्षा घेतली. व चेतन्यस्वामी नांव धारण झाले.
इकडे रखुमाई जागी झाल्यावर व विठ्ठलपंत गायब दिसल्यावर सारा प्रकार तिच्या लक्षात आला. जणुं पारध्यानं बाण मारलेल्या हरिणीगत घायाळ झाली. त्या दिवसांपासुन एक भुक्त राहु लागली, रात्री पाण्याशिवाय कांहीच घेत नसे, तीच्या आईने तीला समजावण्याचा बराच प्रयत्न केला उलट तीने व्रत वैकल्य आणखीणच कडक केले.सिध्देश्वराशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाला सकाळ पासुन दुपार पर्यत प्रदक्षिणा घालण्याचा नेम कितीतरी दिवस चालविला.
एकदा श्रीपादस्वामी रामेश्वराची यात्रा करुन दक्षिणेत आले असतां वाटेत योगायोगाने आळंदीला सिध्देश्वर देवळाच्या ओवरीत उतरले. त्याच वेळी रखुमाईच्या प्रदक्षिणा पुर्ण झाल्याने घराकडे निघाली तर तिला तेजस्वी स्वामी दिसल्याने ती पुढे होऊन त्यांना नमस्कार केल्यावर स्वामींनी “पुत्रवती भव” असा आशिर्वाद दिल्यावर तिच्या मुखावर खिन्नतेचे हसु फुटले ते पाहुन त्यानी कारण विचारल्यावर “पतीने सन्यास घेतल्याचे” सांगीतल्यावर त्यांना एकदम चटचाच बसला. तिच्याबरोबर घरी येऊन तिच्या वडीलांना भेटले. स्वामींनी पुर्ण तपास केल्यावर त्यांना कळुन चुकले की, चैतन्यस्वामी म्हणजेच या घरचा जावई, रखुमाईचा पती!
रखुमाईच्या तपश्चर्येनं इंद्रसुध्दा आपल्या जागेवरुन ढळायचा! मग माझ्याकडुन दिलेल्याा आशिर्वाद, झालेल्या चुकीचे परिमार्जन नको करायला? स्वामींनी सिध्दोपंत व रखुमाईला सोबत घेऊन काशीला पोहोचले. चैतन्यास्वामी म्हणजेच विठ्ठलपंताना परत गृहस्थ होण्याची स्वामीनी आज्ञा देऊन तिघांनाही आळंदीला परत पाठवले.
विठ्ठलपंत आळंदीला परत आले खरे, पण त्यांच्या येण्याने गांवभर वणवा पेटला. विघ्नसंतोषी लोकं हातात चुडी घेऊन धांवत सुटले. त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासाठी ग्रामस्थांची सभा झाली. त्यांच्या कडे कुणीही जायचे नाही.घाटावरचं पाणी बंद, वाण्याकडुन सौदा, गवळ्याकडुन दुध, तेल्याकडुन तेल, फुलं, हजामत हे सगळं बंद केलं. त्यांच्या कडच्या श्राध्दाला कुणीही भिक्षुक म्हणुन जायचे नाही.सिध्दोपंत हतबल झालेत. शेवटी रखुमाईने कंबर कसली व नवर्याला घेऊन सिध्देश्वर बेटावर एकांतात झोपडी बांधुन राहायला गेलेत. गांवाचा सबंध संपला.
क्रमशः
!! संत ज्ञानेश्वर !!
भाग – ५.
विठ्ठलपंत रखुमाईसह एकांतात सिध्दबेटावर राहायला गेलेत पण विघ्नसंतोषी लोकांना कसं बरं बघवेल? त्यांचा धर्म बुडत होता ना! त्यांना जेवढ छळतां येईल ते सगळं केलं. जाता येता विठ्ठलपंताची टिंगल टवाळी करणे, झोपडी समोर घाण टाकणे, बांधल्या गायीला काठीने मारणे, फुल झाडं, वेली, तुळशीचे रोप उपटुन टाकणे, झोपडीचे बासे होळीत जाळणे असा जाच होत असुनही ते डगमगले नाही. ठामपणे उभे राहिले. याच कालावधीत सिध्दोपंत व पत्नि नीराबाई इहलोक सोडुन गेलेत. त्यांनी हाही घाव सहन केला.
विठ्ठलपंतानी गीता, रामायण, भागवत, महाभारत वाचावं व रखुमाईला सांगाव. दोघेही रामकथेत हरीकिर्तनात, प्रभुच्या चिंतनात तल्लीन व्हावं, असेच दिवस चालले असतांना शके ११९० ला एके दिवशी सकाळी एका गोजीरवाण्या पुत्ररत्नाचा जन्म झाला. नांव निवृत्ती ठेवले. तीन वर्षांनी शके ११९३ मधे ज्ञानीयांचा राजा ज्ञानेश्वर जन्माला आलेत. शके ११९६ मधे सोपान व शके ११९९ मधे मुक्ताईने जन्म घेतला. जनाबाईने अपरंपार भक्तीने म्हटले आहे…….सदाशिवाचा अवतार! स्वामी निवृत्ती दातार। महाविष्णुचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर। मुक्ताबाई मूळमाया! दासी जनी लागे पाया।।
या देवाघरच्या चिमण्या ज्योतींचं बालपण कसं गेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. ज्ञानेश्वरांचे आईवर अपरंपार प्रेम! त्यांनी ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायात आईचा महिमा कृतज्ञतेने वर्णीत केला आहे. या चिमण्या जिवांचा सन्यास्याची पोरं म्हणुन हेटाळणी करीत, अतोनात छळ केला. पण विरक्त विठ्ठलपंतांनी त्यांना सोशिकता सहन करणं शिकवलं. मुलांचा होत असलेला छळ पाहुन विठ्ठलपंत मुलांना घेऊन, निवृत्ती आठ वर्षाचा, सहा वर्षाचा ज्ञानोबा, सोपान चार, तर मुक्ताई दोन वर्षाची रखुमाईसह तिर्थाटनाला निघालेत. कुण्या देवळांत मुक्काम करावा, मिळेल ते जेवावे. रात्री विठ्ठलपंत मुलांना रामायण, भारत ऐकवावे. चारही बालकं उमलुं पाहणार्या जणुं कमळाच्या कळ्याच! त्यांचा सुगंध चहु बाजुंनी पसरला. ज्ञानोबाची निरिक्षण शक्ती अफाट होती. दृष्टी मोठी तिक्ष्ण! ते सर्वीकडचं निरीक्षण करुन पाहिलं ते लक्षात ठेवीत असे.
विठ्ठलपंत सर्वांना घेऊन भीमाशंकर, अगस्तीञृषींचा आश्रम, प्रवरेचा संगम, कळसुबाई पाहुन सर्वजण नाशिकला पोहोचले. त्रिंबकेश्वराचं दर्शन झाले. शेजारीच ब्रम्हगिरी! यावरच महादेवाने जटा आपटल्या व गंगेच अवतरण झालं तीच ही गोदामाई, या ब्रम्हगिरीला पदक्षिणा घालण्याच्या संकेतानुसार सर्वांनी दर्या खोर्या, डोंगर, गहन रान, नानापरीचे जनावरं, ओढे, जाळ्या, कांटे, रस्ता सांगायला कोणी नाही, असा खडतड प्रवास करत प्रदक्षिणा पुर्ण केली.
देवानं रचलेलं सृष्टी सौंदर्य पाहत निवृत्ती मागे राहिले. मंडळी पुढे निघुन गेली होती. तोच अचानक मोठा वाघ त्यांच्या अंगावर आल्यामुळे निवृत्ती तीथेच असलेल्या गुहेत शिरले.निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीचा शत्रु! गुहेत शिरल्याबरोबर तीथे गुहेत योगेश्वर गहिनीनाथ! निवृत्ती त्यांच्या पायांवर डोके ठेवले. त्यांनी निवृत्तीला जवळ असलेलं अद्वयांनंदाच वैभव, सर्व ज्ञान दिलं. आणि त्याची समाधी लागली. तिसर्या दिवशी त्यांच्या मुद्रेवर ज्ञानाचं तेज झळाळलं. सर्वजण त्यांना शोधत होतीच. नंतर सर्व मंडळी आळंदीला परतली. पण गावांतल्या कुटाळांनी झोपडीचे तीन तेरा वाजवले होते. परत विठ्ठलपंतांनी सगळं उभारलं नव्याने. नव्या उमेदीने पुनः समाधानाने दिवस कंठु लागलेत, पण निंदकांना त्यांचे सुख कसे बरं वाटेल? मुलांच्या मुंजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
देवाच्या साक्षीने सिध्देश्वरासमोर मुंज करण्याचे ठरविले. विठ्ठलपंत ग्रामजोशीकडे मुंजीची अनुज्ञा घ्यायला गेल्यावर अनुज्ञा तर दिली नाहीच पण त्यांना अतिशय अपमानकारक बोलुन, सन्यासाच्या मुलांची मुंज करतां येणार नाही असे सांगीतले. विठ्ठलपंतानी निर्दोष मुलांसाठी खुपच गयावया केल्यावर सिध्देश्वरासमोर ग्राम सभेत त्यांना देहांताची शिक्षा फरमावण्यात आली. विठ्ठलपंताच्या डोक्यावर जणुं वीजच कोसळली. ही चिमणी पोरं उघडी पडतील, काय खातील? कुठं राहतील? कोण आसरा देणार यांना?
क्रमशः
मिनाक्षी देशमुख















