आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

पतिव्रता मंदोदरी संपूर्ण भाग ४, (१६ ते २०)
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
पतिव्रता मंदोदरी
मंदोदरी
भाग – १६
शूर्पणखाला दंडकारण्यात पाठवुनही रावणाची अस्वस्थता कमी झाली नाही. अंतर्यामी विचारांचे द्वंद सुरु होते. अश्याच विमनस्क, अस्वस्थ मनःस्थितीत असतांनाच मंदोदरी त्याच्या महालांत आलेली पाहुन तीला म्हणाला, “आमचा झालेला पराभव, मानहानीने तुम्हाला खुप आनंद झाला असेल ना…?””
मंदोदरी दुःखी, विव्हल स्वरांत म्हणाली, “कोणत्या पतीव्रतेला आपल्या पतीचा मानहानी, पराभवाचा आनंद वाटेल? त्याच्या होणार्या दुष्किर्तीने सुखावेल? तुम्ही अन्याय करुं नये, तुमच्या पराक्रमाला सत्याचं, न्यायाचं तेज चढावं, अत्याचार करु नये, तुमच्या शौर्याला सत्किर्तीचं वलय लाभावं यासाठी माझी धडपड आहे. माझा विरोध होता आणि आहे तो तुमच्या अन्याय, अत्याचार आणि दुष्कृत्यांना..! नाथ…! मी हे अंतःकरणापासुन बोलते आहे. मी आले ते तुमच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी, दुःखाचा भार हलका करण्यासाठी, मन निवळायला, शांत करायला. तुम्ही पृथ्वीचं व पाताळाचं राज्य मिळवलय, आतां कांहीही कमी नाही सन्मार्गाने राहिलात तर अजुनही अधःपतनातुन उध्दार होऊ शकेल.”
मंदोदरीच्या अमृतसिंचनाने अंतर्यामी शांत होऊन रावण म्हणाला, “देवी..! पटले तुझे म्हणणे, यापुढे अन्याय अत्याचार सोडुन राक्षस प्रवृत्तीचा त्याग करीन.” हे ऐकुन हर्षातिकाराने, तृप्त मनाने रावणाच्या महालाबाहेर पडली. त्याच्या वागण्यात थोडी सुधारणा होऊन दिग्विजयाला जाणे तुर्त तरी सोडुन दिले.
रावणाला उपरती झाल्यावर बरेच दिवस त्याने अत्यंत धर्मनिष्ठेने घालवले. वेदविद्येत मग्न होऊन वेदांचे परदे पाडुन समाजातल्या सर्व थरांतील लोकांना वेदविद्येचा परिचय करुन दिला. त्रिखंडात वेदवत्ता विद्वान रावण अशी किर्ती पसरली. या आपल्या किर्तीमागे, विचारवंत, सद् सद विवेकी पत्नि मंदोदरीचे नितांत परिश्रम असल्याची त्याला पुर्ण जाणीव होती. आणि म्हणुनच तिच्याशी आदराने वागुन संसारसुख देऊ लागला.
एके दिवशी रावण आनंदात आहे असे पाहुन म्हणाली, “आपल्याला एक कन्या असावी.”
त्यावर तो म्हणाला, “तुझ्या मातृकुलातील अप्सराकुळातील बघ एखादी कन्या…! तीचे आपण स्वतःच्या कन्येसारखे पालन करु या. लागलीच तीच्या जवळचे आप्त असलेले राजा कुशध्वजाची धाकटी कन्या वेदवतीला मोठ्या सन्मानाने लंकेत घेऊन आली. तीच्या बोबड्या बोलांत, व बाललिलांत दिवस अपुरा पडु लागला.
रावणांच्या शब्दांनी भावविभोर होऊन मोहरुन आली. आतां आपले दुःख सरले असे वाटुन त्याच्या भावविश्वाशी एकरुप होऊ लागली…. पण…. विधिलिखीत कांही वेगळेच होते. नियती हसत होती.
रावण म्हणाला, “मंदोदरी! वाट सोडुन अधःपतनाच्या खोल गर्तेत जाणार्या पतीला सन्मार्गावर आणलेस! खरी पतिव्रता आहेस तूं! देवांनीही पुजा करावी अशी योग्यता आहे. पत्नी ही केवळ पत्नीच नसते तर, मायाच्या ममतेने अपराध पोटांत घालुन, कटु असला तरी हितकारक सल्ला देऊन त्याला सन्मार्गावर आणणारी मार्गदर्शिकाही असते हे तू पटवुन दिलसं “.
रावणाने स्विकारलेला मार्ग त्याला मिळमिळीत वाटुं लागला. मद्य, मांसाला चटावलेल्या जिभेचे चोंचले शाकाहाराने तृप्त होईनासे झाले. त्याचा कोंडमारा होऊन अंतर्यामी तो तडफडु लागला. विद्याभ्यास संपवुन मेघनाद परत आला की, आपली ताकद वाढेल व नव्या उमेदीने पुनः स्वार्या, शिकारी करतां येईल या विचाराने त्याचे मन थोडे शांत झाले. आणि मेघनाद येण्याची वाट पाहुं लागला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – १७.
राजनितिचं शिक्षण, शस्रास्र विद्येत निपुणता व विद्याभ्यास संपवुन मेघनाद आज वाद्यांच्या गजरांत आणि जयजयकाराच्या घोषांमधे लंकेत प्रवेशित होता. हा आनंदोत्साह प्रासादाच्या सौंधावरुन मंदोदरी कौतुकाने न्याहाळत होती. मेघनादला पाहताच तीला दशग्रिवाबरोबर झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली.
मेघनाद भेटीला येत असल्यामुळे मंदोदरी खाली उतरुन महालात आली. मेघनादने आईचा आशिर्वाद घेतला. ती म्हणाली, “युवराज..! पराक्रमानं सार्यांना अंकीत करणं सोपं असलं तरी सर्वांना सर्व काळ बंधनांत ठेवणं कठीण असतं. *जीत* आणि *जेते* यांची परस्पर विरोधी प्रक्रीया सुरु असते. जेते आपल्या पराक्रमाने आणि विजयाने अहंकारी, धुंद होऊन वास्तवाचं भान हरपतात, तर जीत आपल्या अपमानाचा सूड घेण्याची संधी शोधत असतात. सूडाने पेटलेल्या संघटीत सामर्थ्याचा प्रतिकार करणं सोपं नसतं. देवेंद्रालाही एखादेवेळी पराभूत करुं शकाल परंतु अपयशापेक्षा यश पचवणं फार फार अवघड असतं.”
त्यावर मेघनाद म्हणाला, आमच्या मायावी सामर्थ्यापुढे त्यांचा टिकाव लागु शकणार नाही. त्यांना पराभव पत्कारावच लागेल. गुरुगृही यज्ञयाग करुन विशिष्ट सिध्दी व त्यांच्या सहाय्याने बलवत्तर कसं व्हायचं हे अवगत केलं आहे. त्या सिध्दीने त्रैलोक्याच्या संपतीला तुझ्या पायाशी लोळण घ्यायला लावीन. तातांसारखं अजिंक्य मीही होऊन दाखवीन. मेघनादचे अहंकारी, गर्वोक्तीक बोलणे ऐकुन मंदोदरीच्या मुखावरचा पुत्रभेटीचा आनंद ओसरला. मेघनादही पित्याच्या वळणावर जाणार याची तीला खात्री वाटु लागली. त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिषाने सांगीतलेले भविष्य तीला आठवले. आणि अंधाराची वर्तुळे तीच्याभोवती फेर धरुन नाचु लागले. त्या फेरांत कितीतरी वेळ ते शब्द तिचा पाठलाग करु लागले.
लंकेजवळच निकुंभिला हे नितांत रमणीय उपवन…! तीथे मेघनादने अग्निष्टोम, अश्वमेध, बहुसुवर्ण, राजसूय, गोमेध, वैष्णव, याग व महेश्वर असे सात यज्ञ केले. भगवान पशुपतीने प्रसन्न होऊन त्याला महान वर दिलेत तसेच अंतरिक्षातुन संचार करणारा अक्षय दिव्य रथ, तामसी माया.
या मायेचा संग्रामामधे प्रयोग केला तर देभ-दैत्यांनाही गती समजणे शक्य होणार नाही. तसेच बाणांनी भरलेले अक्षय भाते, अत्यंत दुर्घट असे धनुष्य आणि शत्रुंचा विध्वंश करणारे प्रचंड अस्र देऊन पशुपती म्हणाले “तु अमर होशील”. देव, दैत्य, यक्ष, किन्नर, कोणीही तुला मारुं शकणार नाही. युध्दाला जाण्यार्वी याच वटवृक्षाखाली हवन करावे. पण येथे येऊन हवनापुर्वी जो तुझ्याशी युध्द करेल त्याच्याकडुन तुझा वध होईल.
इकडे लंकेतुन कुंभनीसी रावणाची बहिण हिला पळवुन नेल्याचे कळल्यावर संतप्त रावणाने मधुदैत्यला धडा शिकविण्यासाठी मधुपुर वर आक्रमण केले, हे कळताच कुंभननीसी रावणाला भेटुन त्याच्या चरणांवर पडली. भाऊ रावणाला तीने आधी मागुन सांगीतले की, “मधुदैत्याने पळवुन आणले नाही तर, आमचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे मीच त्याच्यासोबत येऊन त्याच्याशी विवाह केला.”
रावणाने अभय दिले असल्यामुळे तो म्हणाला त्याचा वध नाही करत, परंतु जेव्हा मी देवराज्यावर स्वारी करुन इंद्रासन जिंकण्यास जाईन त्यावेळी मधुदैत्याने सर्व सैन्यानिशी मदतीला यावे. मधुदैत्याने अट मान्य करुन रावणाचा यथोच्छित सन्मान, पाहुणचार केला.
मधुदैत्याचे सैन्य मिळाल्याच्या आनंदांत लंकेकडे जाणारा रावण आतां स्वप्न पाहत होता स्वर्गावरील स्वारीची! स्वर्गविजयाची!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख
मंदोदरी
भाग – १८
रावण देवेंद्रावर स्वारी करतोय हे निश्चित झाल्याचे कळल्यावर कमीत कमी आपला पुत्र मेघनाद याला तरी अघोरी विचारांपासुन परावृत्त करावं या उद्देशाने त्याला बोलावुन मंदोदरी म्हणाली, “पुत्रा…! कोणत्याही गोष्टीचा शेवटी नाशाला, विनाशाला कारणीभूत ठरते. तुझ्या पित्याने पृथ्वीचं, पाताळाचं राज्य जिंकलं, पण भोगाने आत्मकेंद्रीत होऊन अनेकांची जीवनं पायदळी तुडवुन अर्थ, काम या दोन महान प्रेरक पुरुषार्थ्यांचे लगाम धर्माच्या हाती न ठेवल्याने पापाच्या राशी उभ्या केल्यात. तुझ्या पित्याला अनेक प्रकारे समजावुन सांगीतलं, पण उपयोग शुन्य! तुझ्यावर सार्या आशा केंद्रीत होत्या पण भ्रमनिरस झाला माझा. मला वाटत होते, माझा पुत्र पराक्रमी असावा पण तो पराक्रम दीन दुर्बलांवर होणार्या अत्याचारांच्या विरुध्द असावा, सदाचरणी, धर्मपालक असावा… पण…”
“तू आई असुन माझ्या पराक्रमाचे कौतुक न करतां तेजोभंग करतेस का?” असे म्हणुन मेघनाद तिच्या कक्षातुन निघुन गेला.
मंदोदरी रिक्त मनाने, अंगातले त्राण नाहीसे झालेल्या अवस्थेत अनेक परस्पर विचारांचे युध्द तिच्या मस्तकात सुरु होते.
तिने मौन पत्करले, अबोला धरुन बघीतला पण रावणाने तिच्या भावनांची कदर न करतां, भावना पायदळी तुडवीत, फणा काढुन फुत्कार टाकीत चाललेल्या गर्वोनत्त नागाप्रमाणे युध्दाला निघुन गेला. त्या अपमानाच्या शल्याने मन बंड करुन उठले. तिने ठरविले, लटका पडला तरी चालेल पण विरोध करायचाच!
काय पण तिचं नशीब! नशीब म्हणायचं की रावणाच्या अनुकुल तीचे विचार नव्हते हे म्हणने जास्त संयुक्तीक होईल. कां नाही रावणासारखी ऐशोरामात मग्न झाली? पण तीचे सात्विक विचार आचार तीला तस करुच देत नव्हते. रावणासारखा त्रिभुवन विजेता पती, मेघनाद सारखा पराक्रमी पुत्र, त्रैलोकांचं अतुल वैभव पायाशी लोळण घेत असतांनाही नदीतीरी असुनही तुषार्तच! या भरजरी जीवनाला असलेली कारुण्याची किनार कधीच कोणाला दिसणार नाही का? या दिपकळीला असं एकाकी जीवनच जगावं लागेल का? प्रश्न! प्रश्न? प्रश्न….
देवेंद्रावर स्वारी करण्यासाठी रावण ससैन्य कैलासावर आला. प्रवाशाच्या दगदगीने सर्व सैन्य निद्राधिन झालेत पण रावण मात्र चांदण्यात कैलासचे अनुपम सौंदर्य नेत्रात साठवित सरोवराकाठी एका शिलाखंडावर बसला असतां त्याला एक लावण्यवती त्याच्या जवळुन जात असलेली दिसली. त्याने तिचा पटकन हात धरल्यावर ती केविलवानी म्हणाली, “मी रंभा! आपण माझे श्वसुर आहात. कुंभकर्णाचा पुत्र नलकुबेराची वाःग्दत्त वधु आहे. पण मदानंध रावणाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन तीच्या इच्छेविरुध्द उपभोग घेतलाच.
असाह्यतेने संतापुन खवळलेल्या नागाणीसारखा फुत्कार टाकीत शाप देत म्हणाली, “दुष्टा, निर्दया माझ्या इच्छेविरुध्द, कोमल भावनांना पायदळी तुडवुन माझा उपभोग घेतलास, पण जेव्हा तु मदनाने पिडित होऊन कोणत्याही निरिच्छ स्रीवर बलात्कार करुं पाहशील त्याच क्षणी तुझ्या मस्तकाचे सात तुकडे होऊन तुझ्या पायावर पडतील.”
रंभेचा शाप ऐकताच अंगावर वीज कोसळल्या सारखे झाले त्याला. रंभाकडे न पाहतांच पराभूत मनाने शिबिराकडे परतला. रंभेचे संतप्त रुप आणि अग्निवर्षासारखा शाप त्याला अस्वस्थ करीत असतांनाच कधी तरी निद्रेच्या स्वाधीन झाला.
दुसर्या दिवशी सकाळी इंद्रलोकांवर अचानक हल्ला करुन स्वर्गलोकीचे राज्य पादाक्रांत करावे या उद्देशाने आंद्रलोकी पोहचला. थोड्याच वेळांत दोन्हीकडच्या सैन्यात धुमश्चक्री सुरु होऊन शस्रांच्या खणखणाटांनी, वीरांच्या आव्हान-प्रतिआव्हानांनी जखमी सैन्याच्या विव्हळण्याने सारा असमांत भरुन गेला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – १९
देव-राक्षसांचे घनघोर संग्राम सुरु झाला. सर्वांनाच रणमद चढला होता. मेघनाद व इंद्रपुत्र जयंतचे समोरासमोर युध्द सुरु झाले. जयंतचे पितामह पुलोमा याच्या लक्षात आले, मेघनादच्या मायावी युध्दकौशल्यासमोर जयंतचा टिकाव लागणार नाही, म्हणुन आपल्या मायाविद्येने जयंताला सागरात सुरक्षीत स्थळी नेऊन ठेवले. मेघनाद थकल्यामुळे त्याला पाठवुन स्वतः रावण युध्दात उतरला. देवेंद्र-रावणाचे युध्द जुंपले. एका दैदिप्यमान बाणाने रावण निचेष्ट पडला हे ऐकुन गर्जना करीत मेघनाद परत सैन्यात प्रविष्ट झाला.
मेघनाद-इंद्रचे तुंबळ युध्द सुरु झाले. मेघनादने अद्दृष्य रुपाने इंद्राला राक्षस सैन्याकडे बंदी करुन नेले. अपराजीत इंद्राला जिंकले म्हणुन त्याचे नांव इंद्रजीत पडले.
विजयी इंद्रजीत (मेघनाद) व रावण सेनेसह लंकेत पोहचल्यावर त्यांचे प्रचंड स्वागत झालेक बिचारा इंद्र रथामागे बांधलेल्या स्थितीत खाली मान घालुन बसला होता.
दुरुन येणारी विजयी मिरवणूक मंदोदरी प्रासादाच्या सौंधावरुन पाहत होती. तिच्या मनांत सम्मिश्र भावनांचे तरंग उठलेत. प्रश्नमालिकाच ! हा विजय विनाशाच्या वाटेने जाऊन उन्नतीच्या अंत पतनात तर होणार नाही ना?
विजयी पतीचं अन् पुत्राचं स्वागत कसं करु? तीची दोलायमान स्थीती झाली. त्यांना पंचारतीने ओवावळण्याचा बिलकुल उत्साह नव्हता, पाऊले जडावलीत, परंतु उसणे अवसान आणुन ओवावळायला खाली आली.
एके दिवशी विमनस्क मनःस्थितीत थोडी शांतता मिळावी या उद्देशाने अशोक वनात एकटीच निवांत येऊन बसली. पण तिथेही विचारांची आवर्तने पिच्छा सोडत नव्हती. फार वर्षापुर्वी दशग्रिवाचा पराक्रम, सतत मिळत असलेला विजय, राजसुख, महाराणीपद या सर्वांचा मोह पडला होता, अभिमान वाटत होता, पण आता हे सर्व मृगजळासमान मायावी वाटत होते.
असं वाटतय की, या त्रिकुट पर्वताच्या शिखरावर उभं राहुन समस्त स्रियांना ओरडुन सांगावेसे वाटते, वैभवाच्या बाह्य देखाव्याला भूलुन प्रेमहीन, रुक्ष जीवन जगण्यापेक्षा एखाद्या गरीब, सालस, प्रामाणिक, प्रेमळ जीवनसाथी बरोबर आनंद घ्यावा. माझेही पतीवर ऊत्कट प्रेम आहे व करतेही परंतु त्यांच्या अत्याचारी, अन्यायी वागण्यामुळे, त्यांची शक्ती, पराक्रम, दिग्विजय इतरांना कितीही भुषणास्पद वाटत असले तरी मला मात्र घृणास्पदच वाटते.
हाती शस्र धरावं, युध्दही करावं पण विधायक बाजु असावी, दुष्टांना दंड देऊन संस्कृतिच संवर्धन, अन्यायी लोकांच्या विळखातुन गोरगरीबांना सोडवणे, स्रियांवर होणारे अत्याचार रोखणे, सत्य आणि शांततेचा प्रयत्न हे सर्व रावणाने जर मनांत आणले तर करुं शकतील. परंतु त्याच्याकडुन अपेक्षा करणं अगदी निरर्थक आहे.
तपाचरण करुन मिळवलेल्या शक्तीचा उपयोग सत्कारणी लागावा अशी बुध्दी कां नाही मागुन घेतली? पण कशी होणार अशी बुध्दी? कारण शक्तीचे उपासक मदिरेच्या नशेतच ऊपासनेला प्रारंभ करतात. त्यामुळे नशेमधे विचारांची दारे उघडी असुन शकत नाही.
भविष्यांत होणार्या अनर्थाचे चित्र तिच्या नजरेसमोर तरळूं लागले. लंकेत देव, दानव, गंधर्व यांच्या असहाय्य कन्या या सर्वांचे शिव्या-शाप भोऊन त्यांच्या अश्रुसागरांत लंका वाहुन जाईलसे वाटते. आणि आपण काहीच करु शकत नाही, अगदी असहाय्य आहोत, शेवटी बिभिषणांकडुन तरी कांही प्रयत्न होऊं शकेल का? या विचाराने मनांत दाटलेल्या अंधकार घेऊन प्रासादात परतली.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
मंदोदरी
भाग – २०.
नागराज आदिशेषाची कन्या रुप, गुण, शालीनता, नम्रता समन्वयाचा मणीकांचन योग असलेल्या सुलोचनाशी होणार्या विवाहानिमित्त्य सुवर्ण नगरी लंका आनंदोत्साहात मग्न झाली. या विवाहसोवळ्याच्या निमित्याने यौवनाच्या उंबरठ्यावर असलेल्या वेदवतीने सुध्दा आपली नटण्यामुरडण्याची हौस भागवुन घेतली. सुलोचनासारखी समवयस्क एक सखी मिळाल्याचा आनंद झाला.
सुलोचनाला शिवभक्तीची आवड असल्याने मंदोदरीने खास तिच्यासाठी एक सुवर्णदेवघर तयार करवुन घेतले. कितीतरी दिवसांनी सुलोचनाच्या होणार्या आगमनाने मंदोदरीची कळी खुलली.पण इंद्रजीत निकुंभुलेला मायावी विद्यांच्या प्राप्तीसाठी होमहवन करण्यास गेला कळल्यावर तीचा उत्साह, आनंद कापरासारखा उडुन गेला.
विवाहानंतर एक दिवस मंदोदरी सुलोचनाला म्हणाली, “इंद्रजीत पराक्रमी, धाडसी आहे. इंद्रालाही त्याने जिंकले, पण त्याचा पराक्रम मायावी विद्येच्या जोरावरचा आहे. त्याची अर्धांगीनी म्हणून प्रेमाने अंकीत करुन या पतनापासुन परावृत्त करण्याचा आटोकाट करण्याचा प्रयत्न कर.”
इंद्रजीतच्या विवाहानंतर रावणाला रिकामपणाचा कंटाळा आला. महिष्मती नगरीचा राजा सहस्रार्जुनाशी युध्द करण्याच्या विचाराने पुष्पक विमानाने विंध्य पर्वतावरुन जात असतांना नर्मदेमधे सहस्रार्जुनसोबत अनेक सौंदर्यवती युवती जलक्रीडा करतांना दिसल्यात. तिव्र युध्देच्छा निर्माण होऊन सहस्रार्जुनाचा पराभव करुन सर्व लावण्यवती युवतींना लंकेत नेण्याचे स्वप्न त्याच्या मनांत तरळुन गेले.
दोन नरराक्षसांचे तुबळ युध्द सुरु झाले. लढतांना सहस्राअर्जुनाने अत्यंत वेगाने निर्वाणीचा जोरदार तडाखा रावणाच्या वक्षःस्थलावर मारल्याने तडाखा वर्मी बसल्याने रावण खाली कोसळला. त्याच अवस्थेत रावणाला अापल्या सहस्र हाताच्या सहाय्याने करकचुन रथाला बांधुन महिष्मती नगरीत आणले. ज्या युवतींची रावणाने अभिलाषा धरली होती त्याच उपहासाने हसत होत्या. असह्य अपमानाने त्याला मेल्याहुन मेल्यासारख्या अवस्थेत फरफरटत ओढत बंदिखान्याकडे नेत होते. एवढ्या दिवसांचा पराक्रम, किर्ती धुळीत मिळाली.
रावणाच्या पराभवाची वार्ता पुलस्त्यमुनीला कळल्याने ते स्वतः सहस्रार्जुनाकडे आलेत. त्यांच्या विनंतीवजा आज्ञेवरुन रावणाला बंधनमुक्त केले. त्यांच्याच सांगण्याने रावणाने अर्जुनाशी सख्य केले. व्यथित मनाने अपमानाचे शल्य उरी घेऊन नगराबाहेर पडला. पराभवाचा पहिलाच चटका त्याचे अंतःकरण जाळीत होते. अशावेळी त्याला मंदोदरीची शाकवण, विरोध, अबोला, उपदेश सारे सारे आठवल्याने ती आपले स्वागत करेल? अपमानीत स्थितीत न जातां काष्किंधाच्या प्रचंड ताकदीचा वनराज वालीशी युध्द करुन त्याला पराभूत करुनच लंकेत जायचे हा विचार पक्का करुन काष्किंध नगरीत उतरुन वालीला युध्दाचे आव्हान केले.
वाली दक्षिणसमुद्राच्या तिरावर संध्यावंदना करीत होता, त्याचे लक्ष आपल्याकडे वळायच्या आंत वालीला पकडावे या विचाराने अत्यंत सावधगीरीने पावलाचा आवाज न करता त्याच्याकडे जाऊ लागला. पण वालीने त्याला आधीच पाहिले होते. रावण त्याच्या टप्यात आल्याबरोबर प्रचंड वेगाने रावणाला काखोटीला मारुन लोंबकळत्या स्थितीत समुद्रावरुन फिरवुन फिरवुन किष्किंधानगरीत आणल्यावर वालीने त्याचा परिचय विचारल्यावर लज्जीत होऊन रावण असल्याचे सांगीतले. युध्दलालसेने आलो होतो पण आपल्या सामर्थ्यापुढे मी टिकुं शकत नाही ही जाणीव झाली.आपण माझी एक विनंती मान्य करावी ती म्हणजे चिरकाल प्रेमयुक्त मैत्री! दोघांची अग्निसाक्ष मैत्री झाली. पाहुणचार घेऊन अपमानीत, निराश मनाने संतापुन, चिडुन, मंदोदरीच्या आठवणीने लंकेकडे परत निघाला.
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.





