आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महाराणा प्रताप संपूर्ण भाग ७, (३१ ते ३५)
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ३१.
१ एप्रील १५७६, राजा मानसिंहां नी मोगल फौजेचा सेनासागर घेऊन मांडलगडावर छावणी दिली.दूरवर संरक्षण फळी उभारली.लष्करी तळाने विसृत भूप्रदेश व्यापला गेला.मांडलगड ला दोन महिने तळ देऊन,दुर्गम भागाची, रस्त्यांची माहिती करुन घेतली.मुख्य हेतू हा की,महाराणा प्रतापसिहांना संधी देऊन,अकबराचे अफाट सैन्य पाहून शरण येईल या अटकळीने छावणी हलवायला दिरंगाई करीत होते.एकाच ठीकाणी दोन महिने तळ पडल्याने सैनिक कंटाळले होते,सोबतचे सरदारही नाराज झाले होते.शिवाय तळाबाहेर पडण्यास बंदी घातली असली तरी,कांही सैनिक लपून बाहेर पडले की,मेवाडचे मुक्तीसंघटनेचे राजपूत सैन्य त्यांचेवर हल्ला करुन युध्द साहित्य,चिजवस्तु लुटून चांगले झोडपत किंवा ठार करत.
मांडलगडावरुन बनास नदीकाठी असलेल्या मोलेला गावाजवळ पिण्याच्या पाण्याची चांगली सोय असल्यामुळे तिथे छावणी टाकली.मानसिंहाच्या प्रत्येक हालचालीची अचूक माहिती,वेशांतरीत गुप्त हेरांकडून महाराणांना कळत होत्या. युध्दाच्या मसलतीसाठी गोगुंद्याला मोठा शामियाना उभारला होता.शामियान्यात मोठमोठे वेगवेगळ्या राज्याचे राजे आणि छोटे मोठे सरदार उपस्थित होते.तसेच त्यांच्यासाठी केव्हाही बलिदानास तत्पर, प्रतापांचे जिवलग मित्र तेजसिंह राठोड व मन्नासिंह झाला उपस्थित होते.राजपूत सैनिकांचीही छावणी दूरवर पसरली होती.मध्यभागी सूर्यचिन्ह असलेला केसरी ध्वज रुबाबात डौलाने फडकत होता.सैनिकी वेशात,मस्तकावर टोकदार शिरटोप,कमरेला धारदार तलवारी,दोन्ही हाती लांब टोकाचे भाले असलेले महाराणा प्रताप सैनिकांच्या मध्यभागी पाषाणखंडावर उभे होते.त्यांच्या मुखावर आगळे वेगळे तेज,नेत्रात चमक,गात्र वीरश्रीने तेजाळले होते.
धारदार ललकारणार्या आवाजात त्यांनी बोलायला सुरुवात केली.आपली प्राणप्रिय मातृभूमी मेवाडवर अकबराचे साम्राज्यविस्ताराचे संकट कोसळले आहे त्याने चित्तोड काबिज करुन मेवाडचा आत्माच हडप केला आहे.आपल्या मातृ भूमीची ही दैनावस्था,तिच्या वेदनांचा आकांत कोणत्या सुपुत्रास सहन होईल?सत्तापिपासू अकबरने हेतूपुरस्पर,त्याचे जवळ कसलेले मोगली लढवय्ये असतांना,राजा मानसिंहाना सरसेनापती चा मानाचा तूरा खोवण्याची मेहरबानी कां केली?तर राजपूतांकडून राजपूतांचा काटा काढण्याचा कुटील डाव खेळून दोन्हीकडचे राजपूत सैन्यच ठार होतील. मोगल फौजा मात्र सुरक्षित राहतील. राजा मानसिंहांना कां हे समजत नसेल? पण ते अकबरशी नातेसंबंधात गुंतले असल्यामुळे लाचार आहेत.आपल्याला तयारीला वेळ मिळावा म्हणूनच ते मांडल गडावर थांबले असावेत.आपल्यावर चाल करुन येणार्या मोगल सैन्याला अन्न व जनावरांना चारा मिळू नये यासाठी सार्या भूप्रदेशातील मैदानी मुलूख उजाड करुन टाका.
अकबराचे भाडोत्री सैन्य संख्या बळाने जरी जास्त असले तरी,आपला एक एक वीर दहांना भारी आहे.रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यत लढा.रक्ताच्या शाईने लिहिणारा इतिहास निर्माण करा.जयss मातृभूमीss जय ss एकलिंगजी ss ! प्रतिघोषणांनी आसमंत दुमदुमुन गेला. नंतर त्या खुल्या व्यासपीठावर प्रत्येक जण आपापले विचार व्यक्त करुं लागला तेजसिंह म्हणाला,आपण सरळ मोलेला असलेल्या बेसावध मोगल सैन्यावर हल्ला केला तर? पतंगाने स्वतःहुन ज्योतीवर झेप घेतल्या सारखे होईल. नंतर मन्नासिंह झाला म्हणाला,महाराज! मोगलसैन्य म्हणजे हत्तीच्या कळपा सारखे मंदकतीने हालचाल करणारे,तळ पडला की,दोन चार महिने उठत नाही. अशा सुस्तावलेल्या सैन्यावर,चांगल्या कसलेल्या सैन्यासह रात्रीच्यावेळी छुप्या युध्दतंत्राचा वापर करुन छापा टाकून होईल तेवढे सैन्य गारद करायचे,ते युध्दा स ठाकले की हाती जे शस्र,घोडे मिळेल ते घेउन पळ काढायचा.युध्दाला तोंड लागण्यापूर्वीच त्यांचेवर दहशत,दरारा निर्माण होईल,मग हे युध्द जिंकणे कठीण जाणार नाही.प्रतापसिंहांना त्याची ही योजना पटली.त्यांनी त्याला हवे असलेले कडवे सैन्य देण्याची व्यवस्था केली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ३२.
महाराणा प्रतापसिंहांनी जनतेला आव्हान केल्यानुसार,दररोज शेकडोंनी आपला जीव ओवाळून टाकण्यासाठी, आत्मबलिदान करण्यास लोकं सेनेत दाखल होत होते.मोलेला पाठविलेल्या सरदारसिंह नावाच्या गुप्तहेराने खास खबर आणली.राजा मानसिंहांनी मोलेल ची छावणी हलवून गोगुंद्याकडे प्रस्थान केले असून मार्ग दाखवण्याचे काम कुॅंवर शक्तिसिंह व कुॅंवर सगरसिंहावर सोपवले या दोघां बंधूंच्या देशद्रोहाबद्दल सगळी कडून संतप्त आवाज येऊ लागल्यावर, त्यांना शांतवत महाराणा म्हणाले, हिंदुस्थानचा इतिहास आहे,जयचंद राठोडने ऐनवेळी असाच द्रोह केल्यामुळे शेवटचा हिंदु ठरलेले सम्राट पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला होता आणि दिल्ली तख्तावर परकिय राज्यकर्ते येत राहिले. शांत व्हा.गुप्तहेर सरदारसिंहाची पुढील वार्ता ऐका.कुॅंवर सगरसिंग खूप भयभीत वाटले.त्यानी कदाचित योग्य मार्ग न दाखवल्यामुळे त्यांच्यात बरीच खडाजंगी झाली.मानसिंग सर्वांना शांत करीत म्हणाले या युध्दाची जबाबदारी माझेवर आहे,त्यामुळे मी योग्य दिशेने पाऊल उचलत आहे.महाराणा प्रतापसिंहांना डोंगर दर्यातून मोकळ्या मैदानात आणल्यावर त्यांचा बिमोड करणे कठीण नाही.असा डाव रचून राजा मानसिंहने “मोलेला” गावी तळ ठोकला.
दुसर्या दिवशी गोगुंद्याच्या शामियानांत बैठकीला झाडून सारे राजे, सरदार उपस्थित होते.महाराणांनी बोलायला सुरुवात केली.हे युध्द निर्णायक राहील.दोघांपैकी एक जिंकू, मात्र हे युध्द संघर्षात्मक होणार!आपल्या जवळ सैन्य,शस्रसाठा कमी असला तरी पराक्रमांत कमी नाही,त्यासाठी आपल्या ला गनिमी काव्याने लढावे लागेल. गिरव्यापासून कुंभळगडापर्यंतचा,तसेच त्या पलिकडील डोंगरपट्टी व दर्याखोर्या तील सर्व मोकळ्या जागेवर मोर्चे लावून १०-१० राजपूत सैनिकांचे टेहाळणी पथक ठेवायचे.ते आपल्याला युध्दाच्या बातम्या ताबडतोब पोहोचवतील,तिथून हळदी घाटाचे मैदान लांब नाही.तिथल्या मातीचा रंग हळदीसारखा पिवळा धमक आहे.ती घाटी फक्त एक मैलाची आहे.ती घाटी इतकी अरुंद आहे की,एकावेळी एकच माणूस किंवा घोडेस्वार जाऊ शकतो.आपलं सैन्यबल कमी असल्याने त्या घाटीत मोर्चे लावून गनिमी काव्याने प्रचंड मोगल सैन्यांना हैराण करतील. त्यांची कोंडी झाली की,शेकडो मोगल सैन्य कामी येतील.मैदानातील जे महत्वा चे मोहरे राहतील त्यांचा बंदोबस्त करणे कठीण जाणार नाही.
फारच सुंदर योजना आहे,राजा दोदिया भिमसिंह समाधानी होत म्हणाले, आदिवासी भिल्ल सैनिकांच्या धनुष्यातून निघालेल्या अचूक विषारी बाणाने मोगल सैन्य तडफडून मरतील.
दुसर्या दिवशी सैन्यासह सर्वजण कुंभळगडावर पोहोचले.कसंहीकरुन मोगल सैन्यांना हळदी घाटाकडे वळवण्याचा मानस महाराणांचा होता, म्हणून ते कुंभळगडाच्या पहाडी किल्ल्या वरुन डोंगराच्या हळदीघाटाच्या पायथ्या शी उतरले.हळदी घाटीच्या पश्चिमेस आठ मैलांवर असलेल्या लौहसिंह गावाजवळ महाराणांची छावणी पडली.मोगल आणि महाराणांच्या सैन्यात फक्त बारा मैलांचे अंतर होते. महाराणांनी धूर्तपणे मोगल फौजेचे रसद पुरवण्याचे सर्व पहाडी मार्ग बंद केले होते.मधेच मोकाट फिरणार्या मोगल सैन्यांशी किरकोळ चकमकी होऊन त्यांची शस्रे,घोडे पळवली जात, त्यामुळे नुसते त्रस्त झाले होते.राजपूत सैन्याची दहशत निर्माण होऊन त्यांचे पारडे जड झाले होते.एकप्रकारे महाराणां नी स्वतःहुन मोगल सैन्यावर चाल केली होती.
बनास नदीकाठी मोलेला छावणी च्या फौजेला महाराणांवर चालून जाण्या आधी राजा मानसिंहाने शक्तिसिंहाला बोलावुन आपल्या पथकाच्या अग्रभागी वाटाड्या म्हणून राहायची आज्ञा केली. त्याच्या हाती मोगल साम्राजाचा ध्वज होता.सुसाट वेगाने मोगल सैन्य महाराणा प्रतापसिंहांच्या फौजेवर चाल करायला निघाली.शक्तिसिंह पुढे दौडत होता. त्याच्या मागुन दीनss दीनss करत मोगल सैन्य दौडत होती.ठराविक टप्प्या वर येताच,झाडीत,डोंगराच्या कडी कपार्यात लपून बसलेल्या आदिवासी भिल्ल सैनिकांनी बाणांचा तिव्र वर्षाव केल्याने मोगल सैन्य धडाधड घोड्यावरु न कोसळू लागले.विषारी बाणांमुळे अनेक सैनिक तडफडत मरुं लागले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ३३.
आपल्या फौजेची अतोनात होत असलेली हानी बघून राजा मानसिंह एकदम संतप्त झाले.त्यांनी शक्तिसिंहाला बोलावुन,त्याचेवर चुकीचा मार्ग दाखवत
असल्याचा आरोप केल्यावर,एकदम बिथरुन म्हणाला,आपल्यासारख्या सरसेनापती असलेल्या जबाबदार माणसाने असा मिथ्या आरोप करायच्या आधी माझ्या निष्ठेविषयी शंका घेतांना विचार करायला हवे होते.मी खरोखरच चुकीच्या मार्गाने नेले असते तर निम्मी अधिक फौज वाटेतच गारद झाली असती.
कुॅंवर शक्तिसिंहाची भाषा बदलली त्याला खरोखरच पश्चाताप होऊं लागला. आपणही जयचंद राठोडच्या पक्तिंत बसून आपल्याच मातृभूमीच्या पाठीत खंजीर खुपसत आहोत.मानसिंह म्हणाले बादशहाला आश्वासन दिल्याप्रमाणे तूं आम्हा सर्वांना गुप्त मार्गाने हळदीघाटा कडे घेऊन चल.शक्तिसिंहाने हळदीघाटा कडे जाणार्या सरळ सुरक्षित मार्गाने वाट चाल करुं.
गुप्तचराने महाराणांना कटू वार्ता देत म्हणाला,कुॅंवर शक्तिसिंह आणि मानसिंहांची खूप वादावादी होऊन,शेवटी शक्तिसिंह सरळ रस्त्याने मोगल सैन्य घेऊन हळदीघाटाकडे निघाले.ती कटू वार्ता ऐकून महाराणा काष्टशिल्पासारखे झाले.त्यांनी केलेली गनिमी काव्याने लढण्याची व्यूहरचना,शक्तिसिंहाने सरळ सुरक्षित मार्ग दाखवल्याःमुळे त्यांच्या सार्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले महाराणा प्रतापसिंह स्वतःशीच कळवून म्हणाले,अरेरेss शक्तिss हे तु काय केले तूं तर आमचा सख्खा भाऊ ना?किरकोळ गोष्टीवर वाद करुन अकबरची थूंकी झेलायला शरण गेलास,तरीही आम्हाला आशा होती,एक दिवस पश्चातापदग्ध होऊन परत येशील.आम्ही हळदीघाटात मोगलांची कोंडी करुन तिथे च झोडपणार होतो,राजा मानसिंहांना त्यांची जागा दाखवून मेवाडला गुलामगिरीतून मुक्त करणार होतो.पण तूं सरळ सुरक्षित मार्ग दाखवून आमच्या युध्दरचनेला सुरुंग लावलास,ते हातभर आणि आम्ही मुठभर,त्यांच्यापुढे मोकळ्या मैदानांत सिमित शस्रानिशी किती टिकाव धरणार?शक्ती तुझ्यामुळे आम्हाला पराभव पत्कारावा लागणार, मेवाड आतां गुलामगिरीत खितपत पडणार!तरीही आम्ही अंतिम क्षणापर्यंत लढत राहणार.ते अशा विचारांत असतां ना महामंत्री रावत कृष्णसिंह येऊन म्हणाले,निघायचे ना हळदीघाटाकडे?आतां आपल्याला युध्दरचना बदलावी लागेल.गनिमी काव्याचा आतां कांही उपयोग नाही.आमच्याच पाठच्या बधूने, महाराणा उदयसिंहच्या एका पुत्राने सिसोदिया राजवंशाच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगली.बोलतांना त्यांना अनावर होऊन अश्रू ओघळू लागले.हे ऐकताच चंदावत रावत कृष्णसिंहाच्या पायाखाल ची जमीनच सरकली.
दुसर्या दिवशी कामाची विभागणी करण्याच्या दृष्टीने प्रतापसिंहांनी सर्व सहकारी,सामंतांना पाचारण केले.प्रतापां च्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते.
हळदीघाटीचे युध्द इस्लाम विरुध्द हिंदूचे नसून मेवाडविरुध्द मोगल असे होते. हे युध्द राष्र्टीय भावनेने प्रेरित असून तात्विक आणि सार्वजनिक स्वरुपाचे होते.
दोन्हीकडचे सैन्य युध्दास सज्ज झाले.युध्दभूमीवर निघायच्या आधी प्रतापसिंह महाराणी सुलक्ष्मीदेवीच्या दालनी गेले.तिला आपल्या पतीच्या पराक्रमाबद्दल अतिशय अभिमान होता. ती म्हणाली,आपण विजय मिळवून येण्याच्या प्रतिक्षेत असणार आहोत. राणीसा!आम्हाला युध्दभूमीवर वीरगती प्राप्त झाली तर?तर..तर..आम्ही हसत हसत सती जाऊ!नंतर तीने मोठ्या भक्ति भावाने त्यांना औक्षण करुन त्यांचे चरण स्पर्श केल्यावर,तीला उठवून आवेगाने तिला आपल्या कवेत घेत म्हणाले,आम्ही विजयी होऊनच परत येऊ,काळजी करुं नका आणि जड अंतःकरणाने दालना बाहेर पडून आपल्या आवडत्या चेतक घोड्यावर स्वार होऊन रणभूमीवर दाखल झाले.
महाराणांना आलेले बघून सेनेच्या उत्स्फुर्त जयघोषांनी आकाशमंडल निनादून गेले.जोशपूर्ण उंच स्वरात महाराणा गर्जत म्हणाले,आपल्यासमोर महाबलवान,सामर्थ्याची घमेंड असलेला शत्रूला चोपून काढायचे आहे.आपल्या या भूमीला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक करुन युध्दयज्ञकुंडात शत्रूच्या समिधा टाकाय च्या आहेत.शत्रूच्या धड मुंडक्यांचा खच पाडून रक्ताचा पाट वाहवायचा आहे.हा मेवाडभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही प्राणपणाने लढतांना प्राणांचे समर्पन करावे लागले तरी मागे हटू नका.
जय एकलिंगजीsss जय मेवाडsss जय घोषांनी परीसर दुमदुमुन गेला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ३४.
महाराणांनी आपल्या चेतक घोड्याला इशारा केल्याबरोबर ते प्रामाणिक जनावर चौखूर ऊधळला. पाठोपाठ सारी सेना हळदीघाटाच्या मैदानाकडे दौडू लागली.महाराणा प्रताप सेनेसह लोसिंगहून कलोडा व बलीचा या गावावरुन हळदीघाटाच्या पहाडी भागात उतरले.तिथे मोगलाच्या हालचाली न दिसल्यामुळे,हळदीघाटाच्या दुर्गम मार्गाने खणनोर गावी पोहोचले.हा भाग खूप दुर्गम दर्या डोंगरांनी व्यापलेला होता. खणनोर आणि हलदीघाटामधे असलेल्या प्रशस्त मैदानालाच हलदीघाटाचे मैदान म्हणत.दोन्हीकडील सैन्य युध्दाच्या तयारीने सज्ज होते.दोन्ही दले एकमेकां च्या हल्ल्याची वाट बघत होते.महाराणां नी सैन्याची व्यूहरचना नेहमीची परंपरा सोडून केली होती.
हरावल म्हणजे पुढचा भाग ह्यात हकीम खाॅं सूर,रावत कृष्णसिंह,चुडावत, दोदिया,राजा भीमसिंह,रावत संग्रामसिंह चुडावत,रामदास मेडनिया ह्या योध्दांना ठेवले.८०० घोडेस्वारांचा प्रमुख हकिम खाॅं सूर होता.उजव्याबाजुने ग्वाल्हेर नरेश रामसिंह तंवर आणि त्यांचे तीन पुत्र शालीवाहन,भवानसिंह आणि प्रतापसिंह होते.त्यांच्यासोबत भामाशाह व ताराचंद हे दोन भाऊ होते,त्याबाजूने ५०० सैनिक होते.डाव्या बाजूने मन्नासिंह झाला,बिंदा झाला,चुडावत रावत,कल्यानसिंह, सोनगरा मानसिंह ४०० सैनिंकांसह होते.
चंदावल म्हणजे मागील भाग,ह्यात पानवरचा राजा पुंजा हा प्रमुख होता.या भागात सर्व आदिवासी भिल्ल सैन्य होते. त्याचबरोबर पुरोहित गोपीनाथ,जगन्नाथ व इतरही होते.मध्यभागी स्वतः महाराणा १३०० हजार लढाऊ सैन्यासह होते. दुंदुभी,नगारे वाजवणारे,तसेच मोठमोठे शूर नावाजलेले सरदार व राजेही होते. महाराणांंनी सैन्यरचना करतांना राखीव सैन्य ठेवले नव्हते.
दोन्हीकडचे सैन्य अगदी जय्यत तयारीत,प्रथम कोण हल्ला करतो ह्या प्रतिक्षेत होते.राजा मानसिंहांनी देखील आपल्या सेनेची उत्तम संरचना केली होती आणि त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते.या सर्व सैन्याच्या मागे मिहिरखान च्या नियंत्रणात राखीव तुकडी ठेवली होती.स्वतः मानसिंह आपले अंगरक्षक व राजपूत कछवाह सर्व सैन्यासह मध्य भागी होते.
राजपूत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणार होते तर मोगल साम्राज्यविस्तारासाठी! १८ जून १५७६ ला सकाळच्या किरणांत हळदीघाटाचे मैदान लख्ख सूर्यप्रकाशात उजळून निघाले.रणभेरी,बिगुल वाजत होते. भाटांनी वीरश्रीचे गीते मोठ्या आवाजात गायला सुरुवात केल्यामुळे महाराणांच्या सैन्यात एकदम स्फुरण चढले.जयsss मेवाड!महाराणा प्रताप की जयsss! भगवान एकलिंगजी की जयsss च्या घोषणांनी व वाद्यांच्या आवाजाने सारे आसमंत दुमदुमुन गेले.
महाराणा मेवाडचा राष्र्टध्वज हाती घेऊन,पाठोपाठ हरावलमधील हकीमखाॅं सूरा इतर साथीदारांसह महाराणांचा जय जयकार करीत अकस्मात मोगल सैन्या वर तुटून पडले.वाद्यांचा आवाज,घोड्यां चे खिंकाळणे,हत्तीचे चित्कार,तलवारीचा खणखणाट,जयघोष,सैनिकांचे ओरडणे यामुळे युध्दभूमी एकदम दणाणून गेली.
हकीमखाॅं सूर व त्याच्या सैन्याने मोगलांच्या अग्रभागात असलेल्या सय्यद हसीम बरहाचा ८० लढवय्या जवानांवर इतके जोरदार आक्रमण केले की,ते घाबरुन आसफखाॅं आणि जगन्नाथसिंह कछवाहच्या पुढच्या भागातील सैन्यात घुसले.त्यामुळे त्यांची फळीच विस्कटली. युध्दभूमी खाच खळगे,काटेरी झुडपांनी भरलेली असल्यामुळे,उघड्या मैदानावर लढणार्या मोगल सैन्याना फारच अडचणीचे झाले.अचानक हल्ला झाल्या मुळे एकदम गोंधळून,घबराहट निर्माण झाल्याने, जीव वाचवण्यासाठी ते काटेरी भू-प्रदेशातून पळू लागले.या गोंधळात सय्यद हाशीम घोड्यावरुन खाली पडला, पण सय्यद राजूच्या मदतीने लगेच सावरला.मानसिंहाच्या हारावलमधील सैन्याची नुसती दैन्यावस्था झालेली बघून आसफखाॅंननेही आपली जागा सोडून डाव्या बाजूच्या सैन्य तुकडीत घुसला. मोगल सैन्यात नुसता हाहाःकार माजला. हरावलचा भाग एकदम मोकळा झाला. एकदम अशी विकट स्थिती निर्माण झालेली बघून मानसिंह काळजीत पडले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ३५.
मानसिंहांचे हरावलमधील सर्व मोगल सैन्य एकदम बाजुच्या सैन्यात घुसले,त्याचवेळी महाराणा आपल्या सैन्यासह कांजीखाॅंच्या मोगल तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवून गोंधळ माजवून दिला.मेवाड राजपूत सैन्य कर्दनकाळ बनुन मोगल सैन्याची नुसती कापाकापी सुरु केली.मृत्यु थयथय नाचत होता. युध्द भूमीवर प्रेतांचा ढीग,रक्ताचा चिखल झाला होता.मेवाडभूमी मोगलांचे रक्त प्राशन करुन तृप्त होत होती.नुसता गदारोळ झाला होता.महाराणांची तलवार विजेसारखी तळपत होती.एक घाव-एक मृत्यू!दहा घाव-दहा मृत्यू!मृत्यूच मृत्यु! मेवाड राजपूतांचा आवेश बघून मी मी म्हणवणारे मोगल सरदारांच्या तोंडचे पाणी पळाले होते.कसलेला सेनापती आसफखाॅंची मेवाड राजपूतांच्या लांडगे तोडीने पाचावर धारण बसली होती.
काझीखाॅंचे सारे सैन्य मानसिंहाचे जवळ असल्यामुळे त्यांच्यावर वेगळेच संकट कोसळले होते.त्या सैन्याच्या मागे महाराणांचे सैन्य होते.पळून जाणार्या सैन्यांना थांबवण्यासाठी ओरडून ओरडून मानसिंहाचा घसा बसला.मोगल सैन्याची होत असलेली दुर्दशा हत्तीवर आरुढ मानसिंह हताशपणे बघत होते.महाराणा वेगाने त्यांच्या दिशेने येत होते.ही दैना बघून राखीव सैन्यप्रमुख मिहिरखाॅंने आपले सैन्य एकदम पुढे आणले.मिहिर खानने ढोल,ताशे वाजवत जोराने ओरडत हूल उठवली.भागो मत!स्वतः बादशहा सलामत ताज्या दमाची फौज घेऊन रणांगणी येत आहेत.हे ऐकून पळणारे सैनिक हिंमत येऊन परतू लागले एवढ्यात महाराणा मध्यभागी येऊन पोहोचले.हळूहळू जमा होऊ लागलेल्या मोगल सैन्यांना पळवून लावण्यासाठी मलहारांनी लढावू हत्तींना पुढे आणले. शरीराने दणकट,हूशार,प्रतिक्षित महाराणांचा “रामप्रसाद” हत्ती पुढे आणण्याआधी “लुना” नावाचा हत्ती रणांगणात उतरवला.त्याच्याशी लढण्या साठी सरदार कमलखानने शाही हत्ती “गजमुक्ता आणला.दोन्ही हत्ती समोरा समोर येऊन चित्कार करीत एकमेकांच्या अंगावर चालून गेले.हत्तींच्या चित्काराने भयभित होऊन मोगल सैनिक घाबरुन गेले.मोगलांच्या हत्तीने महाराणाच्या ‘लुना’ वर मात केली,पण ‘गजमुक्ता’ थकल्यामुळे पळून जाऊ लागला.त्याचा पाठलाग करतांना लुनाच्या माहूताला गोळी लागून तो खाली कोसळलेला पाहून लुना पळून गेला.लगेच “रामप्रसाद ला रणांगणावर आणण्यात आले.आल्या बरोबर त्याने तिव्र जोशाने मोगल सैन्या वर चाल करुन अनेक मोगल सैनिक पायाखाली चेंगरले,सोंडेत पकडून जमीनीवर आपटू लागला.त्याच्या भयंकर अवताराला बघून मोगल सैन्य घाबरुन पळू लागले.रामप्रसादचा रुद्रावतार बघून कमलखाॅंने बादशहाचा ‘गजराज’ आणला.दोन्ही हत्तींमधे तुंबळ युध्द सुरु झाले,पण त्याचाही टीकाव न लागल्याने ‘रामदार’ नांवाचा हत्ती “रामप्रसादा समोर आणला दोन्हीही हत्ती मस्तवाल,शरीराने दणकट,रामदर धडका देऊन चांगलाच जखमी झाल्याने त्याने पळ काढला. त्याचळेळी कुठुनतरी आलेल्या बाणाने रामप्रसादचा माहुत जखमी होऊन खाली कोसळला.रामप्रसाद गोंधळला,काय करावे ,त्याला सुचेनासे झाले.त्याचवेळी हत्तीखान्याचा प्रमुख हुसेनखाॅं एकदम पुढे येऊन रामप्रसादच्या मानेवर उडी घेऊन आपली बैठक जमवून रामप्रसाद ला ताब्यात घेतले.महाराणा प्रतापसिंहाचा प्रिय हत्ती ‘रामप्रसाद’ मोगलांच्या ताब्यात गेला.
खमणेरच्या मैदात सुरु झालेल्या लढाईत सुरुवातीपासून सरशी होत होती मेवाड राजपूतांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला होता.मोगलांचा हरावलचा भाग मोकळा झाल्याने महाराणा अतिशय वेगाने मोगल सैन्याच्या मध्य भागी येऊन पोहोचले.त्यांचा खरा शत्रू कांहीच अंतरावर होता.त्यांच्या अंग रक्षकाचे कवच फोडल्याशिवाय ते मानसिंहापर्यत पोहचू शकत नव्हते.पळून गेलेले सैनिक परतु लागल्याने शत्रूचा जोर वाढढला.युध्दाचे पारडे मोगलांच्या बाजूने झुकु लागले.
क्रमशः संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.











