आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महाराणा प्रताप संपूर्ण भाग ५, (२१ ते २५)
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – २१.
शिकारीसाठी अनेक मचाने तयार करण्यात आले.हरकारे जंगलात सर्वत्र पसरले.प्रतापसिंह प्रिय मित्र मन्नासिंह बरोबर बोलत जंगलात बरेच दूरवर आले तेवढ्यात तिथे राजगुरु,महामंत्री,चंदावत रावत कृष्णसिंह,शक्तिसिंह,तेजसिंह राठोड,सरदार,जमिनदार,जहागिरदार येऊन पोहोचले.राजगुरुंनी मंत्रोचारांत शस्रांची विधीवत पुजा करुन महाराणा, शक्तिसिंह आणि इतर व्यक्तिंचा अभिषेक करण्यांत आला.नंतर सर्वांना म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडलेला अहेरिया उत्सव आज साजरा करण्यांत येत आहे,हा अहेरिया उत्सव म्हणजे राजपूतांची शक्ती,शौर्य आणि क्रूर जंगली जानवरांना शत्रूस्थानी माणून आपल्या मनगटातील जोर,गंजत चाललेल्या युध्द शक्तीला तेजस्वी करुन,शस्रास्रे चालवून परंपरागतता व प्राविण्य दाखवण्याचा आहे.नगारे व हरकर्यांच्या डबे बडवण्या च्या आवाजाने जंगल दणाणून गेले.
गुरुदेवांच्या आदेशानुसार कांही साथीदारांसह प्रतापसिंह त्यांचा उजवा हात असलेल्या मन्नासिंह व तेजसिंह पूर्वेस,कुॅंवर शक्तिसिंह पश्चिमेला,चंदावत रावत उत्तरेला अशी विभागणी होऊन आपापल्या दिशेने गेले.जंगल आवाजाने दणाणून गेल्यामुळे वनचर प्राणी बिथरुन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले महाराणा व तेजसिंह जंगलात खूप आंत शिरले.दुपार टळून गेली तरी मनाजोग सावज मिळत नव्हते.आणि त्यांना करवंदीच्या जाळीत लपलेला चांगला ताकदवार रानडुक्कर दिसला.शिकार्या ची चाहुल लागल्याने सावध झालेले रान डुक्कर मुसंडी मारुन धावत सुटले.भाला सरसावत प्रतापसिंह पाठलाग करत संधी साधून फेकलेला भाला रानडुकरा च्या कमरेतून आरपार निघून गेला.त्याच वेळी विरुध्द दिशेने आलेला दुसरा भाला त्याच्या पोटात घुसला.रानडुक्कर जणुं कलीच झाला,वादाला जागा करुन दिली. नियतीने बरोबर आपला डाव साधला.
रानडुक्कर मोठ्याने चित्कारत स्वतःभोवती गिरकी घेत धाडकण जमीनीवर आपटला.त्याचवेळी एका बाजूने महाराणा तर दुसर्या बाजूने शक्तिसिंहाने तिथे प्रवेश केला.शक्ती म्हणाला,हे रानडुक्कर माझ्या भाल्याने मेला.नाही शक्ती,प्रथम माझा भाला त्याला लागला.दादा,माझा भाला आधी नंतर तुमचा भाला आला.जाउ दे न शक्ती रानडुक्कर मारणे महत्वाचे!आपण असे गृहित धरु,दोन्हीही भाले एकदम येऊन रानडुक्कर मेले,वाद मिटवण्याच्या दृष्टीने महाराणा समंजसपणे म्हणाले,अतिशय हेकेखोर,हट्टी शक्तिसिंह आग्रही स्वरात
आपल्याच शब्दावर ठाम होता.तेजसिंहा ने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पानउतारा करुन चूप बसवले. दुराग्रही शक्तीसिंह म्हणाला,तुम्हाला जर माझे म्हणने मान्य नसेल तर निर्णय तलवारीने होईल.महाराणांनी त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला,पण तो आपल्या हट्टावर कायम राहिला. नाईलाजाने प्रतापसिंहांनी म्यानातून तलवार काढली,तेवढ्यात राजगुरु इतर मंडळीसह तिथे येऊन पोहोचले.राजगुरुं नी शक्तिसिंहाला खडसावले असतां, त्यांना बाजुला ढकलून आपली तलवार वर नेली.नाहीss नाहीs शक्ती असं नको करुस…मोठा अनर्थ होईल.तुम्ही दोघे बंधू मेवाडचे दोन हात आहांत.मेवाडला तुमची नितांत गरज आहे.मेवाड आज फार मोठ्या संकटात आहे,पण शक्तीवर कांही परिणाम झाला नाही.मेवाडच्या भूमीला रक्ताचा अभिषेक हवा हे ओळखून राजगुरु दोघा भावामधे आले आणि त्याचवेळी शक्तीसिंहाची तलवार गुरुदेवांच्या छातीत घुसली.क्षणार्धात हा प्रकार घडला.क्षणभर काय झाले कोणालाच कळले नाही.गुरुदेव खाली कोसळले.सर्वजन भयभीत होऊन त्यांचे शेजारी बसले.
महाराणा प्रतापांनी अतिव दुःखाने आपली तलवार दूर भिरकावून गुरुदेवांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.पश्चाताप दग्ध शक्तिसिंह मान खाली घालुन उभा होता.दुःखी कृष्णसिंह बाजुला उभे होते.
गुरुदेव!तुम्ही असं कां केलेस?शक्तिचा राग शांत करायचा दुसरा मार्ग नव्हता. मेवाडचा एक हात तुटला असतां.मेवाड भूमीला रक्ताचा टिळा हवा होता.तो तुम्हा दोघांपेक्षा मी दिला एवढेच!गुरुदेव मातृ भूमीला तुमची नितांत गरज आहे,नाही राणा,माझ्यापेक्षा तुमच्या सळसळत्या रक्ताची जास्त गरज आहे.मी तर केव्हाही जाणारच होतो…..
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – २२.
पश्चातापदग्ध शक्तिसिंह म्हणाला, गुरुदेव!तुम्ही स्वःहुन आत्मत्याग कां केला? केवळ देशासाठी खोल जात
असलेल्या आवाजात म्हणाले,आतांतरी तुझा राग झाला ना शांत?गुरुदेव मी अतिशय दुष्ट आहे.पित्यासमान गुरुदेवां ना मी ठार केले.कसे करु या पापाचे क्षालण?आणि ओक्सिबोक्सि रडू लागला.शक्ति शांत हो…आणि रागाला आतांतरी आवर घाल.क्षीण आवाजात म्हणाले.आपसांत भांडणार नाही असं वचन द्या.एकमेकांवर प्रेम करा.ये..तो…
मा..तृ..भू..मी..च्या..रक्षणा..साठी..झटा.
भगवान….एकलिंग..जी..आणि गुरुदेवांचे प्राण पंचतत्वात विलिन झाले.
प्रतापसिंहांचे आपल्या गुरुंवर उत्कट प्रेम होते,त्यांच्या उत्तम संस्कारामुळे त्यांचे आयुष्यच बदलले होते.त्यांच्या निधनामुळे प्रतापांना एकदम पोरके झाल्यासारखे वाटले.शक्ती तू परमपुज्य राजगुरुंचा खून केलास,यापूर्वीही बरेच वेळा आततायीपणा केलास पण आम्ही तुला माफ करत आलो.तू मेवाडचा शत्रू आहेस,आमची तलवार विटाळण्याआधी बिनाविलंब आमच्या नजरेसमोरुन निघून जा.प्रतापांना धमकी देत तावातावाने घोड्यावर आरुढ होऊन निघून गेला. आजच्या अहिरेया उत्सव इतिहासात कायमस्वरुपी काळा दिवस म्हणून नोंद होईल.नंतर गुरुदेवांच्या शवाला अग्नि देऊन सर्वजण दुःखी आणि जड अंतःकरणाने कुंभळगडाकडे परतले.
शिघ्रकोपी शक्तिसिंह,प्रतांपांनी केलेल्या निर्भत्सने सगरसिंह व जगमल च्या पाठोपाठ अकबराच्या दावणीला बांधुन घेण्यासाठी आग्र्याला येऊन राजा मानसिंहांची भेट घेतली व घडलेली हकिकत सांगीतल्यावर,त्यांना वाईट वाटले.आपल्या कडून जी चूक झाली, मांडलिकत्व पत्करुन गुलामगिरी स्विकारावी लागली तशी चूक शक्तिसिंह ने करुं नये असे त्यांना मनापासून वाटल्याने त्याला समजावत म्हणाले, गुलामगिरीच्या यातना काय असतात? आपण कसे बंधनात अडकतो, सत्व, स्वाभिमान कसा विकल्या जातो,मान कशी सतत झुकवावी लागते,वेळोवेळी अपमानाचा घुट कसा प्यावा लागतो, आपल्याच बांधवांचे रक्त आपल्या इच्छे विरुध्द कसे सांडवावे लागते हे सांगून म्हणाले,शक्ती अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही परत मेवाडला जावे.राजाजी,एक वेळ धनुष्यातून निघालेला बाण परत येत नाही,आमचेही तसेच झाले.आमचा परतण्याचा मार्ग बंद झाला.अपमानाचा बदला घ्यायचाय!
अखेर शक्तिसिंहाला घेऊन मानसिंह अकबराच्या राजदरबारी पोहचून दोघांनीही कमरेत झुकुन कुर्निसात केला.तुमचे जेष्ठबंधू प्रतापांनी संधीप्रस्ताव घेऊन पाठवले कां?नाही हूजुर,आम्ही झगडा करुन आपल्या चरणी रुजु व्हायला आलोय.तिथे उपस्थित असलेल्या राजपूत राजे व मानसिंहाना शूर व पराक्रमी असलेल्या शक्तीचा खूप राग येऊन घृणा निर्माण झाली.ठीक! जर तुम्हाला आश्रय दिला तर आमच्यासाठी काय करणार? मी मेवाडचा कोपरा नी कोपरा जाणतो, माझी तलवार उंच धरुन फौजेपुढे राहुन मार्ग दाखवित मेवाडचा नाश करण्यास आपल्याला सहाय्य करीन.बहोत खूब! दरबार बरखास्त झाल्यावर कुर्निसात करुन शक्तिसिंह दरबारातून बाहेर पडला
दोन दिवसांनी अकबरने गुजराथवर स्वारी करण्याचे निश्चित केले.गुजराथ ताब्यात आला की,नैऋत्येच्या बाजूने मेवाड पूर्णपणे वेढल्या जाणार आणि महाराणा प्रतापसिंहा भोवती फास घट्ट आवळून त्यांची कोंडी करतां येणार होती अंबर,मारवाड,जोधपूर आणि बिकानेर च्या राजांप्रमाणे प्रतापसिंहांनी देखील आपल्याला शरण यावे असे त्याला वाटत होते.प्रतापसिंहाचे मन वळविण्याचे काम आधी राजा मानसिंह,राजा भगवानदास वर सोपवले होते,पण त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे आपल्या मर्जीतला सरदार जलालखान कोर्चीवर सोपवली.
एक महिन्यानंतर अकबर मोठ्या
फौजेसह गुजराथ मोहिमेवर गेल्यावर, जलालखान कोर्ची अकबराचा दूत म्हणून प्रतापसिंहांची भेट घेतली.महाराणांनी त्याची उत्तम बडदास्त ठेवली.प्रदीर्घ चर्चा झाल्यावर प्रतापसिंह आपल्या विचारांवर ठाम होते.निर्णायक युध्द होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.एकमेकां चा प्रेमाणे निरोप घेऊन जलालखाॅंने उदयपूर सोडले व अकबराच्या छावणीत दाखल होऊन खाल मानेने आपण अयशस्वी झाल्याचे सांगीतल्यावर अकबर म्हणाला,हरकत नाही आम्हाला फक्त त्याचे मन जाणून घ्यायचे होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महराणा प्रताप !!!
भाग – २३.
जलालखान निघून गेल्यावर अकबर बादशहा विचार करुं लागला, आम्ही फक्त महाराणा प्रतांपांचे मन जाणून घेण्यास पाठवले होते.वास्तविक आमच्या जवळ अख्ख्या हिंदुस्थानची जरी ताकद असली तरी,त्यांना जोपर्यंत कोमलगिर व अरवलीच्या कडेकपारीचे संरक्षण आहे तोवर त्याला आम्ही स्पर्शही करुं शकत नाही,हीच आमची शोकांतिका आहे.अरवली पर्वताच्या परीसरात भिल्लांच्या जहरी बाणांनी आमचे सैन्य किड्यामुंग्यासारखे मरत आहेत,तो बंदोबस्त कसा करायचाय?
आणि अचानक एक विचार सुचला,व राजा मानसिंहाला बोलावणे पाठवले,ते आल्यावर अकबर म्हणाला,तुमचे पिताजी आणि तोरडमल एक वचन, आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? सत्यप्रिय मानसिंग म्हणाले,दक्षिण मोहिमेव जातांना भेट घेऊ असे सांगीतले होते,पण आपणच आम्हाला डावलून जलालखान कोर्चीवर हे काम सोपवले. ठीक आहे..ठीक आहे… डुंगरपूरचे सिसोदिया वंशीय राजा रावळ आस्कर आणि इडरचा राजा नारायणदास राठोड मेवाडचे व प्रतापसिंहाचे मित्र आहेत, शिवाय नारायणदास राठोड तर प्रतापांचे सासरे आहेत.प्रतापसिंहाच्या आज्ञेने गुजराथ सरहद्द व मोगल मुलखात उपद्रव देत आहेत.त्यांचा पराभव करा.येतांना प्रतापसिंहाची भेट घेऊन त्यांचे मतपरि वर्तन करुन आम्हाला आग्र्यास येऊन भेटा.आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करुं पण यश येईलच याची खात्री देतां येत नाही, मानसिंहांनी स्पष्टपणे सांगीतले.
भर उन्हाळ्यात मानसिंह दक्षिण मोहिमेवर निघाले.डूंगरपूर व इडरवर हल्ला करुन दोन्ही ठीकाणं काबिज केली
त्या दोन्ही ठीकाणी अकबराची माणसे तैनात केली आणि प्रतापांचे मन वळवण्याच्या मोहिमेवर निघाले.प्रताप आपली पुजाअर्चा करुन पाषाणाच्या सिंहासनावर विराजमान होताच,तिथे चंदावत रावत कृष्णसिंह,सावंत भीमसिंह राठोड नायक,तेजसिंह,मेवाडचे महामंत्री, व इतर सरदारांनी येऊन महाराणांना प्रणिपात केला.
कृष्णसिंह म्हणाले,महाराज!मेवाडमधील परिस्थिती अत्यंत भिषण झालेली आहे.मोगल सैन्यांनी नुसता कहर मांडला.भयभीत जनतेसाठी तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे. बेदनूरचे राठोड,सैंगर राजपूत,केलवाचे जगावत,क्षत्रिय,दोलवाडचे झाला सरदार कोठारी,बिदवाचे चव्हाण,बिजलिचे पवार,दक्षिणेची सर्व भिल्ल जात,पूर्वे कडील मीर जात,पश्चिमेचे लढवय्ये मीना राजपूत हे सर्व आपल्या आदेशाच्या प्रतिक्षेत,केवळ एका शब्दावर पेटलेल्या युध्दाच्या अग्निकुंडात झोकुन द्यायला आतुर झालेले आहेत.
तेवढ्यात नेहमीचा परिचित स्वर कानावर पडला…”जागो हे मेवाड मनस्वी
समय नही अब सोनेका।उठ,रण-सजा ले
सीमाएँ हैं सुलग रही जब।तू भी शस्र उठा ले।सजा आरती तलवारों की,ओ स्वातंत्र्य तपस्वी।। हा आवाज होता चारिणीच्या वेशातील गुप्तहेराचा.जनतेत स्फुरण यावे, विरवृत्ती जागृत व्हावी या उद्देशाने चारिणी भाटिणी मेवाड देशात फिरुन जनजागृतीच्या कामाबरोबरच शत्रूपक्षाती ल गुप्त वार्ताही आपल्या राजाला पुरवित असत.त्यांचा कुणालाही संशय येत नसे. महाराज! अकबराचा सरसेनापती अंबरचा राजा मानसिंहाने डुंबरपूर व इडावर मोगलांचा झेंडा फडकवून,इकडे यायला निघाले.ही बातमी देऊन चारण निघून गेली.कृष्णसिंह म्हणाले,धूर्त अकबराने शांती प्रस्ताव घेऊन जलालखाॅं
कोर्चीला पाठवले होते,पण त्याला यश न आल्याने आतां आपलाच जातभाई राजा मानसिंहाला पाठवले असावे.शिवाय त्यांच्या लहान बहिणीची शादी कुॅवर अमरसिंहशी करुं इच्छितात,या निमित्या ने आपल्यालाही अकबरची थुंकी झेलण्यासाठी त्याच्या दरबारात नेता येईल,या हेतूने येत असतील.
उदयपूरपासून जवळच मानसिंहाचा तळ पडला होता.प्रतापसिहाचा गैरसमज न व्हावा म्हणून,केव्हा व कुठे भेटायचे हे विचारण्यासाठी व पूर्व परवाणगी घेण्या साठी त्यांनी आपला स्वार पाठवला होता प्रतापसिंहांनी उदयपूरच्या उदयसागर तलावाजवळ भेट व दुपारच्या भोजनाचे निमंत्रण देऊन स्वार रवाना केला.आणि पुत्र अमरसिंहाला बोलावून,उद्याच्या भेटी ची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्या चा आदेश दिला.रात्रीचे भोजन आटोपून महाराणा झोपडीसमोरील पाषाणावर बसले होते.पत्नी सुलक्ष्मी,महाराणी असून देखील राजभोगाचा त्याग केल्या मुळे स्वतः घरातील कामें व आवराआवर करीत होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – २४.
महाराणा विचार करीत होते,धूर्त, हुशार अकबराच्या हाती लहान वयातच राज्यकारभाराची सुत्रे आल्यामुळे चांगला मुरब्बी व स्वतः युध्दात भाग घेत असल्या मुळे कर्तबगार झाला होता.राजपूतांचा त्याला चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांच्याशी जवळीक साधून सोयरीक संबंध जोडले होते.त्याने राजपूतांच्या स्रीया आपल्या महालात आणल्या पण आपल्या राजपरिवारातील,किंवा नात्या तील एकही स्री राजपूत घराण्यांत जाऊ दिली नाही.आमचे मतपरिवर्तन करण्यात जलालखाॅं कोर्चीला अपयश आल्याने, अकबराने आतां आमचा जातभाई राजा मानसिंहाला पाठवले.पण आम्ही बधणार नाही.असे गर्क असतांना झोपडीतून सुलक्ष्मीच्या आवाजाने भानावर येऊन झोपडीत शिरल्यावर ती म्हणाली,स्वामी!
दिवसभर घोड्यावर मांड,मुक्तीसंघटनेचे काम सुरु असते.थोडातरी विसावा घ्यावा ना!उद्या पहाटेच उदयपूरला जायचे ना?
दुसर्या दिवशी पहाटेच महाराणा उदयपूरकडे रवाना झाले.पुत्र अमरसिंहने सजवलेल्या शामियान्यात प्रवेशले. थौड्याच वेळात राजा मानसिंह आपल्या ठराविक लोकांसह पोहोचले.महाराणा प्रसन्न मुद्रेने सामोरे जाऊन पुष्पहार अर्पन केला.शामियान्यात सार्या मानकर्यांसह दोघेही स्थानापन्न झाले. औपचारिक बोलणे झाल्यावर,राजा मानसिंह मुख्य विषयाकडे लक्ष वेधित म्हणाले,महाराणा! आपला पुत्र अमरसिंह व आमची भगिणी मानाबाईचा विवाह व्हावा अशी आमची फार दिवसां ची इच्छा आहे.राजेसाहेब!गैरसमज नसावा,पण आम्ही एकलिंगजी समोर शपथ घेतलेली आहे,जोवर मेवाड स्वतंत्र होत नाही तोपर्यंत अमरसिंहाच्या विवाहाचा विचार देखील करणार नाही. पण एवढ्या प्रचंड,बलाढ्य शस्रास्राने संपन्न शत्रूसमोर आपला निभाव लागेल?आमच्या तलवारी व भाल्यावर भरोसा आहे.आमच्यात जाज्वल देशप्रेम कुटकुट भरुन असल्याने कठीण नाही वाटत. आम्ही मृत्युला कवटाळू पण शत्रूस शरण जाणार नाही.किरकोळ मुंगी देखील हत्ती च्या कानात शिरली तर बलाढ्य हत्ती सुध्दा तडफडून मरतो.राजाजी!आपापले विचार असतात.अकबरने चितोडगडावर हल्ला करुन विजय प्राप्त केला.राजपूत वीर चिवटपणे लढले.जेव्हा अशक्य झाले तेव्हा त्यांनी ठेवणीतले अस्र केसरिया बाहेर काढले.अश्यावेळी त्या क्रूरकर्माने गडावरील ३०,०००निष्पाप लोकांची कत्तल केली.अशा मानवसंहारक भस्मा सुराशी मैत्री? छे! बादशहाने आग्रा दरबारी निमंत्रित केले आहे,म्हणजे आम्हाला मांडलिकत्व स्विकारण्याचा सल्ला देताहात तर!
फार बोललात महाराणाजी!आम्ही ऐकून घेतो म्हणून का?स्वतःला सुसंस्कृत म्हणवता आणि आम्हाला किती अपमानास्पद बोलताहात!राग आला राजेसाहेब?राजेसाहेब! खरोखरच राग आला असेल तर,आपण बादशहाची चाकरी सोडून मेवाडच्या मुक्ती संघटनेत मिळा आणि मग आपण मोगलांंना पळवून लावू!मानले राणाजी अकबरने तुम्हाला फितवण्यासाठी पाठवले नी तुम्ही मात्र बुमरॅंग आमच्यावरच चालवतां
महाराणाजी!आमच्या परतीचा मार्ग बंद झाला.तुमचे मनपरिवर्तन करण्याची उमेद संपली.
नंतर अमरसिंहाने त्यांना भोजना च्या शामियान्यांत नेले.प्रतापसिंह कामाचे निमित्य करुन बाहेर निघून गेले.भोजना चा आगळा वेगळा थाट बघून मानसिंह प्रसन्न झाले.पण बाजुचा खाली पाट पाहून,ते महाराणाची प्रतिक्षा करत राहिले.पण महाराणा बराच वेळ झाला तरी आले नाही,ते काय समजायचं ते समजले,आणि पाटावरुन उठून जायला लागल्यावर,अमरसिंह सावरासावर करत भोजनाचा आग्रह केला पण…तेवढ्यात प्रतापसिंह आले.महाराणाजी! तुम्ही स्वतःला मेवाड राजपूतांचे संरक्षक,धर्म आणि जातीचा अभिमान आहे म्हणवता आणि आपल्याकडे आलेला पाहुणा, आपला जातबांधवाचा अपमान करतां हे कसे? तुम्ही श्रेष्ठ आदर्शवादी समजतां, मग तुमचे तीन भाऊ अकबराला शरण जाऊन त्याच्यापुढे मान झुकवतात हे कसे?आमचे तीन्ही बंधू स्वार्थ व राज्य लोभाने पछाडल्या गेले,ते तर अनुभव शुन्य आहेत,पण आपण?जलालखान कोर्ची अपयशी होऊन गेला हे माहित असून,स्वतः राजपूत असून देखील शरणागतीचा प्रस्ताव घेऊन आलात, बाहेरुन आलेला अकबर,आपल्या सारख्या शूरवीराच्या शक्तीवर,जोरावर, आपल्याच जातबांधवाचा,देशाचा नाश करत आहे,अन्याय,अत्याचार करत आहे आणि आपण त्याला साथ देताहात. राजाजी!अजुनही वेळ गेली नाही,आतां ही आपण सारे एक झालो तर, त्याला घालवायला वेळ लागणार नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – २५.
महाराणाजी आमच्या पंगतीला आपण बसला नाही,आम्हाला जाती बाहेर टाकल्याची वागणूक दिली.जातो आम्ही.आतां आपली भेट युध्दभूमीवरच! राजा मानसिंह ताडताड करीत निघून गेले.शरणागतीचा प्रस्ताव घेऊन आलेले मानसिंह रिकाम्या हाताने परतले.राजपूत घराण्यांतील स्रीया अकबराच्या जनान खान्यात लोटल्यामुळे मानसिंहाच्या पक्तिस न बसून आपला स्वाभिमान तेवत ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.गर्जत आलेले मानसिंह खालमानेने परत गेल्यामुळे सर्व सरदारात आपल्या महाराणाबद्दल मन भरुन आले.युध्द अटळ असल्याची जाणीव सर्वांना झाली.
प्रजा आतां खूप सहनशील होऊन धैर्याने संकटांना तोंड देत होती.राजपूत स्रीया देखील खंबीर बनल्या होत्या.त्याचे उदाहरण….मोगुंडा परिसरातील रुद्रासिंग परमारची सून जयंतीबाईने आपल्या पराक्रमाने दाखवून दिले.झाले असे की, ती सासर्यासोबत जंगलातून जात असतां दोन मोगल सैन्याने तळपत्या तलवारीनीशी रस्ता अडवला असतां तीने स्वरक्षणार्थ जवळ ठेवलेल्या मिरचीची पूड दोन्ही सैनिकांच्या डोळ्यात फेकून सुटका करुन घेतली.
अपमानीत व पराभूत मानसिंह अकबर दरबारात दाखल झाले.बादशहा ला कुर्निसात करुन म्हणाले,हुजूर! सर्व वाटाघाटी,सामंज्यस्याने समजावून बघीत ले पण महाराणा आपल्या निश्चयावर ठाम आहे,युध्द अटळ आहे.बोलणे सुरु असतांनाच द्वारपालाने मेवाडचा भाट आपली भेट मागत असल्याचे अकबराला सांगीतल्यावर,पाठव त्याला!दरबारात भाट आल्यावर कुर्निसात करण्याआधी गळ्यातील टपोर्या पाणीदार मौल्यवान मोत्याचा कंठा बाजुला असलेल्या चंदनी चौरंगावर काढुन ठेवला.नंतर बादशहाचा जयजयकार करत मुजरा केला.अरे चारण!तूं मुजरा करण्याआधी मौतिकहार कां काढून ठेवला?हुजूर या हाराला एक इतिहास आहे.एकदा गोगुंद्याला महाराणा प्रतापांच्या दरबारी जाऊन एक कविता गाऊन दाखवल्यावर प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातील हा मौक्तिकहार आमच्या कंठात घालत म्हणाले,आम्ही मातापिता आणि गुरुदेवांशिवाय कुणाही पुढे झुकलो नाही.हा हा स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतिक आहे.हे तुझ्या कंठात असतांना जर तुला झुकण्याची वेळ आलीच तर प्रथम माला गळ्यातून काढून बाजूला ठेवीत जा.तेव्हापासून कोणत्याही दरबारात गेलो तरी मालेचा अपमान होऊं नाही दिला. खामोशsss! या घमेंडखोर चारणला कैद करा. महाबलीच्या दरबारी येऊन प्रतापसिंहाची स्तुती करतोस?एवढी हिम्मत?
तो भाट देखील लेचापेचा नव्हता. तो म्हणाला,आमचा धंदाच आहे,क्षत्रिय वीर पुरुषांच्या दरबारी जाऊन त्यांच्या शौर्याचे गुणगाण गाऊन वीरवृत्तीला चेतवने,ही आमची एक राष्र्टसेवा आहे.
अकबराने सर्वांना शांत केले.सारे लज्जीत होऊन एकमेकांकडे बघू लागले. चारण तुझी अपेक्षा सांग!आपण जर या सरदारांप्रमाणे नाराज होणार नसणार तर एक कवन ऐकवण्याची इच्छा आहे. अभय देत अकबर म्हणाला, कवनाचा विषय कोणताही असो आम्ही जरुर ऐकू
कवी स्वतंत्र विचाराचा असल्याने कवितेत स्वतंत्रपणे भ्रमण करीत असतो.
सद्यस्थितील मेवाडचे रुप बघीतले तेथील जागृती हा माझ्या कवितेचा विषय आहे. ऐकव!त्या चारणाने स्वरचित काव्य आपल्या ढंगदार शैलीत व गडगडाटी आवाजांत जोशपूर्ण गायला सुरुवात केली.दरबारी मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागले
चारणाने आपल्या कवण्यात मेवाडचे सुपुत्र महाराणा प्रतापसिंहच्या देशभक्ती चे आणि असिम त्यागाचे असे कांही शब्दचित्र उभे केले की,सारा दरबार स्तंभित झाला.अकबरच्या मनांत कांही असले तरी वरवर प्रसन्न असल्याचा आभास निर्माण केला.आतां सांगss तुझे
महाराणा सध्या काय करताहेत?ते ससैन्य हलदीघाटाच्या दिशेने निघालेत. संतापलेल्या मानसिंहाना अकबर म्हणाला,त्याच्यावर राग नका व्यक्त करुं. त्याने फक्त निरोप सांगीतला.हळदीघाटा च्या युध्दाची तयारी तयारी करा.चारणला उचित बक्षिस देऊन त्याची रवानगी केली मिळालेली बिदागी व चौरंगावर ठेवलेला मौक्तिकहार कंठात घालून चारण बाहेर पडला.
दुसर्या दिवशी अकबरने दरबार भरवून प्रतापसिंहाचे ठीकाण व त्यांना शोधण्याची कामगिरी शक्तिसिंहवर व राजा भगवानदास प्रतापसिंहाची भेट घेण्याची जबाबदारी सोपवली.त्यांचेवर दबाब आणण्यासाठी वडनगरचे किल्लेदार शेरखान फौलंदिया,गुलाम रावळी आणि इडरचा राजा नारायणदास यांचा पडाव करण्याची आज्ञा दिली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.











