आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महाराणा प्रताप संपूर्ण भाग ३, (११ ते १५)
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
भाग – ११.
महाराणा उदयसिंह गडावरुन या अवाढव्य मोगल सैन्याचे निरिक्षण करीत मोठ्या काळजीत पडले.त्यांच्या जवळ फक्त आठ हजार सैनिक असूनही ते घाबरले नाही.कारण प्रत्येक सैनिक देश प्रेमाने प्रेरीत होता.जिंकू किंवा मरु या एकाच भावनेने सारे वीर सज्ज होते. अकबर हा उत्तम कसलेला लढवय्या असला तरी गडावरील सैन्याची अंतिम क्षणापर्यंत लढण्याची जिद्द होती.उदय सिंहने चितोडगडाच्या भोवतालचा भू- प्रदेश उजाड करुन टाकला होता.शेताती ल उभी पिके नष्ट केल्यामुळे अकबरच्या सैन्याला धान्य व जनावरांना चारा मिळणार नव्हता.अकबराने संतापून गडा ला घातलेला वेढा आणखी आवळला. त्याने केलेले हल्ले गडावरील राजपूत वीरांनी परतवून लावले होते.शेवटी अकबराने गडाच्या भिंतींना सुरुंग लावण्यासाठी शेकडो सैनिक कारागिर कामाला लावले पण गडावरील वीरांनी मुकाबला करुन सर्वांना ठार केले तरी भिंतींना सुरुंग लावण्याचे काम अकबराने थांबवले नाही,हे बघून जयमल वीरदेव उदयसिंहास राजपरिवारासह गड सोडून जाण्याचा सल्ला दिला,पण त्यांना पटला नाही.ते म्हणाले,नुसता राजपरिवारच नाही तर,गडावरील सर्वांचेच प्राण धोक्यात असतांना आम्ही गड सोडावा? नाहीss आम्ही अंतिम क्षणापर्यंत लढू, पळून जाणार नाही.महाराज!लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा मरायला नको!सिसोदिया राजवंश संपला तर मेवाडला कोण सांभाळणार? इतरही सरदारांनी तोच सल्ला व आग्रह धरल्यामुळे,गुप्त मार्गाने परिवारासह सुरक्षित उदयपुरला पोहोचले.गडाची जबाबदारी जयमल वीरदेव आणि फत्तेसिंहावर सोपवली.
जयमल वीरदेव आणि फत्तेसिह कसलेले सरदार होते.जयमल हा विरमदेव मेडतियाचे जेष्ठ पुत्र!१५६२ मधे अकबरने शर्फुद्दीनला मेवाडवर आक्रमण करायला पाठवले होते,त्यावेळी शर्फुद्दीन ने मेडतियाच्या किल्ल्यास सुरुंग लावून भिंति फोडून किल्ल्यात घुसले होते. असंख्य राजपूत धारातीर्थी पडले होते. त्यावेळी जयमल वीरदेव आपल्या परिवारासह महाराणा उदयसिंहांच्या आश्रयाला येऊन आपली राजनिष्ठा उदय सिंहाच्या चरणी अर्पण केली होती.त्याच मुळे त्याच्याहाती चित्तोडगड सुपूर्द केला.
एवढ्या कडक पहार्यातून उदय सिंह परिवारासह निसटल्याचे पाहुन अकबराचा भयंकर संताप झाला.प्रचंड सैन्यानीशी कुलीखाॅं सरदाराला उदयसिंहाला पकडून आणण्यास पाठवले पण तो रिकाम्या हाताने परत ल्या मुळे अकबराने प्रतिकार अधिक तिव्र केला.चितोडगडावरील सैन्य जाज्वल देशप्रेम,सर्वसुख सोयिंनी युक्त, अजिंक्य गड हेकट अकबरला कांही दाद देत नव्हता.वेढा देऊन दोन महिने झाले तरी गडावरील मुठभर राजपुत सैन्याने अकबराला हतबल करुन सोडले होते.
चितोडगडाला एकूण सात दरवाजे होते.पश्चिम व उत्तरेकडील दरवाजे अतिशय महत्वाचे होते.गडाच्या लखोटी दरवाज्यावर हसनखाॅं,चगताईखाॅं,रायपत दास,इख्तियाखान या सरदारांसोबत स्वतः अकबर होता.या सर्वांचा बिमोड करण्यासाठी जयमल वीरदेव उभा ठाकला.अकबरने चोहोबाजुंनी आक्रमक तयारी केलेली बघून,जयमल व फत्तेसिंह यांनी गडावरील सरदारांशी मसलत करुन,अकबरशी सामोपचाराची बोलणी करुन गड वाचवावा,कारण आतां कोणत्याही परिस्थितीत गड वाचणार नव्हता,निदान रक्तपात टाळावा असे सर्वानुमते ठरल्यावर,रावत साहिबखान या सरदाराला दूत म्हणून सोबत डोडिया ठाकुरसह अकबराच्या छावणीत पाठवले
दोघेही अकबरच्या छावणीत पोहचुन कुर्निसात स्विकारल्यावर अकबर म्हणाला,तुम्हा सरदारांचा हा प्रस्ताव मान्य नाही.मी प्रत्यक्ष महाराणा उदयसिंहशी बोलूनच काय ते ठरवीन.
त्या सरदारांनी प्रस्ताव स्विकारण्याबद्दल अकबरचे मन वळविण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याला उदयसिंहच हवे असल्यामुळे त्याने कुणाचेच ऐकले नाही. दोघेही निराश होऊन गडावर परतुन घडलेली हकिकत जयमल व फत्तेसिंहला कथन केली.आपल्या महाराणाचा घोर अपमान करायचा त्याचा इरादा पाहून सारे राजपूतवीर भयंकर संतापले आणि अंतिम क्षणा पर्यंत निकराने लढा देण्याचा निश्चय सर्वानुमते ठरविला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – १२.
चित्तोडगडावर आगळे वेगळे वातावरण निर्माण झाले.तिथल्या कणांकणात वीररस संचारला होता.गडा वरील तोफचींनी तोफा डागून मोगल सैन्याची धुळदान करण्याचा सपाटा लावला.मोगल सैन्य किड्यामुंगीसारखे मरुं लागले.सुरंग लावण्यात अडथळे येत होते तरी जिद्दी अकबरने माणसं कितीही माणसं जाया झाले तरी,गडाच्या भिंतीला सुरंग लावून खिंडारे पडायलाच हवा असा कडक हुकुम सोडला.सुरंग पेटल्या जात होते,गडावरुन तोफा डागल्या जात होत्या.मोगल सैन्य ठार होत होते.तोफां च्या भडिमारात सुध्दा सुरुंग लावल्या जात होते.अखेर गडाच्या भिंतीजवळ १२० व ८० मन दारु भरलेले दोन सुरुंग लावण्यात मोगल यशस्वी झाले.
१७ डिसेंबर १५६७ ला एक सुरुंग उडवल्या गेला.त्याचा स्फोट एवढा भयानक होता की,स्फोटाचा आवाज ५० कोसांपर्यत गेला.त्या दणक्याने गडाचा एक बुरुज ढासळून गडाला मोठे भगदाड पडले.५० राजपूत वीर ठार झाले.त्या भगदडातून मोगल सैन्य शिरण्याच्या प्रयत्नात असतांना एकाएकी दुसरा सुरुंग उडाला व गडात शिरणारे मोगल सैन्य जागीच ठार झाले.सुरुंगाने उध्वस्त झालेला बुरुज जयमल वीरदेवने लगेच कारांगिरांकरवी बुजवुन घेतला.असे सतत चालु होते.गडाला खिंडार पडले की लगेच बुजवल्या जात होते,त्यामुळे मोगलसैन्यांचा गडात शिरकाव होऊ शकत नव्हता.दीर्घकाळापासून युध्द सुरु असल्यामुळे गडावरील अन्नधान्य संपत आल्यामुळे सारे काळजीत पडले.
वारंवार खिंडारे बुजवणार्या जयमल वीरदेवलाच उडवायचे अकबराने ठरविले
एके दिवशी जयमल वीरदेव स्वतः उभे राहून कारागिरांकडून भिंतीच्या डागडुजी चे काम करवून घेत आहे ही संधी साधून अकबराने अचूक नेम धरुन त्याच्या दिशेने गोळी झाडली.पण त्याचवेळी जयमलच्या मस्तकावर रानमाशी बसल्या मुळे तीला ऊडवण्यासाठी थोडी हालचाल झाल्यामुळे,छातीचा वेध घेणारी गोळी पायाला लागली.गडावर काळजीचे वातावरण निर्माण झाले.गडा वरील परिस्थिती अत्यंत बिकट झाली. वीरदेव लंगडे झाले.अन्नधान्य संपुष्टात आलेले,गडाभोवती कडक पहारा,त्यामुळे खालून धान्य येणे अशक्य,सर्व वाटा बंद झालेल्या,आतां एकच मार्ग ..जीव ओतुन लढाई करुन मृत्युला कवटाळणे.खालून अकबराचा सतत गोळीबार,सुरुंगाचे स्फोट..त्यामुळे गडावरील लोकं घाबरुन गेली.अखेर सेनापती जयमलनी सर्वांना एकत्रीत बोलावुन म्हणाले,आतां एकच मार्ग…”केसरिया” आणि स्रीयांसाठी “जोहार”!मोगलांच्या हाती सांपडून स्रीयां ची विटंबना होण्यापेक्षा आधी त्यांना जोहार करायला सांगुन नंतर आपण केसरिया वस्रे परिधान करुन शत्रूवर तुटुन पडू!आपला गड हातून जाणार म्हणून मन आक्रंदत होते.बायकांना जोहाराची कल्पना दिल्यावर त्या आनंदा ने तयार झाल्या.
अग्निकुंड पेटवल्या गेले.राजपुत रमणींनी आणि मुलांनी धडाधड पेटत्या अग्निकुंडात उड्या घेऊन आत्मबलिदान केले.दुसर्या दिवशी गडाचा महादरवाजा उघडल्या गेला.केसरी वस्रे परिधान करुन जयमलसह सारे सरदार युध्दास सज्ज झाले.दरवाजा उघडल्याबरोबर मोगल सैन्यांच्या झुंडीच्या झुंडी आंत घुसले.दीन दीनss आणि मातृभूमी की जयss एकलिंगजी की जयss च्या घोषनेत दोन्ही सैन्यात घमासान युध्द सुरु झाले. राजपूतांच्या अंगात वीरश्री संचारलेली, जीवावर उदार व शिर तळहातावर घेऊन लढत होते.धडं-मुंडक्यांचा नुसता दोन्ही कडच्या सैन्याचा खच पडत होता.रक्त मासांचा चिखल झाला होता.रक्ताचे पाट वाहत होते.जखमी जयमल वीरदेव दोन्ही हातांनी तलवारी चालवत होते.पायाला गोळी लागल्यामुळे घोड्यावर स्वार होता येत नसल्यामुळे त्यांना तिव्र दुःख होत असलेले बघून,हत्तीचे बळ असलेल्या कल्लु नामक सैनिकाने त्यांना खांद्यावर घेतले.मग मात्र दोन्ही हातांनी तलवार चालवत मोगल सैन्य कापत होते.शेवटी दोघेही थकले,लढतांलढतां मातृभूमीच्या कुशीत अंग टाकुन दोघेही अमर झाले. राजपुत वीरांचा पराक्रम बघून अकबर थक्क झाला.अतुलनीय पराक्रम गाजवून एक एक वीर मातृभूमीत विसावत होते. २४ फेब्रुवारी १५६८ ला चितोडगड अकबराने जिंकला.सर्वदूर हाहाःकार माजला होता.’जोहार’ आणि ‘केसरिया’ घटनेची नोंद इतिहासाने घेतली.राजपुत वीरांनी आपली आन,बान,शान कायम राखली.धन्य तो राजपूत वीर…धन्य त्या राजपुत रमण्या…धन्य तो मेवाडप्रदेश… धन्य ती मातृभूमी…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – १३.
चितोडगड हाती आला पण महाराणा हाती न लागल्यामुळे,अकबरने ३० हजार निष्पाप जनतेची कत्तल करुन आपला संताप व्यक्त केला.चौथ्या दिवशी गडावरचे नगारे,झुंबरं सजावटीसाठी अजमेरला घेऊन गेला.
उदयसिंहाच्या मागे अकबराचे सैन्य असल्यामुळे त्यांनी उदयपूर सोडून अरवली पर्वताच्या दर्या खोर्यात सतत स्थलांतर करत राहिले.अखेर गोगुंद्याला वास्तव्य करुन तिथून ते राज्यकारभार बघू लागले.स्थैर्य प्राप्त होताच परत ते भोगविलासात गर्क झाले.अति मद्यसेवन व स्रीभोगामुळे त्यांची अवनती झाली. अकबरने चितोडगडावर आक्रमण करुन मोठ्या प्रमाणांत मनुष्य व वित्तहानी,मृत्यु चे थैमान,जोहार,केसरिया झाला त्यावेळी अफाट शक्ती असलेले प्रतापसिंह व इतर राजपुत्र काय करीत होते?या गोष्टीला सर्वस्वी उदयसिंह जबाबदार होते.मेवाड वर अकबरचे एवढे अस्मानी संकट आले असतांना व त्यांच्या योग्यतेची जाणीव असून सुध्दा जेष्ठ पुत्र कुॅंवर प्रतापसिंहांना विश्वासात घेतले नव्हते.धाकटी राणी भटियाणीने त्यांच्या मनांत एवढा द्वेष भरला होता की,जाणुनबुजुन त्यांच्या पराक्रमाची दखल घेतली नव्हती.आणि इतर राजपुत्र विलासात दंग होते.
पिताजींनी जरी कुॅवर प्रतापांना गृहित धरले नसले तरी ते गप्प बसले नव्हते.त्यांनी संपूर्ण मेवाडप्रांत पिंजून काढून अकबर विरुध्द जनजागृती केली.
मेवाडची जनता पेटून उठली.उदयसिंहांने प्रतापसिंहाना विश्वासात घेतले असते तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असत. चितोडगड अजिंक्य राहुन सिसोदिया राजवंश कलंकित होऊन पराजय सोसावा लागला नसता.प्राणप्रिय चितोड गड अकबराच्या ताब्यात गेल्यामुळे नरवीर प्रतापसिंहांना अतिव दुःख झाले.
गोगुंद्याच्या किल्ल्यावर उदयसिंह पुनः भोगविलासात डुबल्यामुळे त्यांची प्रकृती खुप खालावली.धाकटी राणी भाटीयाणीने आपल्या अद्वितिय सौंदर्यां चा त्यांचेवर प्रभाव पाडून आपला पुत्र कुॅंवर जगमलला भावी महाराणा बनविण्याचे वचन घेतले.दिवसेंदिवस प्रकृती बिघडतच गेली.शरीर नुसते वेदने चे माहेर झाले.लोहासारखे कणखर शरीर आतां हिन दिन झाले.त्यांची ती विकल अवस्था बघून धाकट्या राणीने वचनाची आठवण करुन दिली.दुसर्याच दिवशी दरबार भरवुन आपला उत्तराधिकारी कुॅंवर जगमलचे नांव घोषित केले.परंपरे नुसार जेष्ठ पुत्र प्रतापसिंहाचा अधिकार डावलला गेल्यामुळे दरबारांत गोंधळ निर्माण झाला.दरबारातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावर क्षोम आणि नाराजी उदयसिंहाला दिसत होती,पण धाकट्या राणीला दिलेल्या वचनामुळे ते बाध्य होते
राजगुरु ताडकन उठून हरकत घेतल्यावर इतरांचेही त्यांना समर्थन मिळाल्याचे बघून उसणे अवसान आणून उदयसिंह म्हणाले, तुम्ही राजगुरु आहात धर्म,नितिमत्ता,सदाचाराचे पाठ देणे एवढाच तुमचा प्रांत!राजकारणांत नाक खुपसुन मर्यादाच्या कक्षेचे उल्लंघण करुं नका.कांही वेळ जीवघेणी शांतता पसरली.महाराजांना हाच निर्णय घ्यायचा होता तर दरबाराचे हे नाटक कशाला? एवढे बोलून नरेश चंदावत कृष्णसिंह सारखे प्रमुख सरदार दरबारातून बाहेर पडले.आपोआपच दरबार बरखास्त झाला.
कुॅंवर प्रतापसिंह म्हणजे उत्तम गुणांची रत्नखाणच!ते विचारी असल्या मुळे कोणताही पवित्रा न घेता शांत राहीले.त्यांची आई जयंतीबाईनी त्यांच्या वर खूप चांगले संस्कार केले होते.त्या संस्कारामुळेच पितृज्ञा ही ब्रम्हाज्ञा म्हणून स्विकारली.गुरुदेव त्यांंचा आदर्श होता. त्यांनी कोणताही विरोध न दर्शवता मातृ भूमीच्या कार्यात गर्क राहत,सर्वांना मदत करत निष्काम सहकार्याच्या वर्तनामुळे ते जनमानसात प्रिय झाले.इतर सावत्र बंधूं चा देखील त्यांनी कधी द्वेष,मत्सर केला नाही.उदयसिंहानंतर सगरसिंहाला महाराणा बनायचे होते,पण जगमलने बाजी मारल्यामुळे तो सर्वांचा द्वेष करुं लागला.कुॅंवर जगमल महाराणाच्या तोर्यात वागू लागला.त्याच्याभोवती खुश मस्करे हुजरे व संधीसांधुंचा विळखा पडू लागल्याने तो अधिकच उर्मट होऊन आपल्याच मस्तीत राहू लागला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
!!! महाराणा प्रतापसिंह !!!
भाग – १४.
शक्तिसिंह प्रतांपांचा धाकटा भाऊ निर्व्यसनी,शूर,पराक्रमी पण अतिशय संतापी!त्याची सुध्दा मेवाडचा राणा व्हायची अभिलाषा होती,आतुन तोही द्वेषाने जळत होता.महाराणा उदयसिंह बिछाण्याला खिळले होते.राणी धीरकंवर भटियानी लोक लाजेस्तव त्यांची देख भाल करीत होती,पण उदिष्ट साध्य झाल्यामुळे बेफिकीर झाली होती.उदय पूरवर मोगलांचे कधीही आक्रमण होत, त्यामानाने गोगुंडा आणि चावंडागड सुरक्षिततेच्या दृष्टीने भक्कम सोयीचे होते विशेष म्हणजे हे दोन्ही स्थानं दर्या खोर्यात असल्यामुळे मोगलांची भीती नव्हती.मोगलांची धाड उदयपूरवर आली की,या दोन्ही ठीकाणी आश्रय घेतल्या जाई.मोगल परत गेले की पुन्हा उदयपूर राजपुतांच्या ताब्यात यायचे,हा पाठ शिवणीचा खेळ सातत्याने चालू होता.
२८ फेब्रुवारी १५७२ ला मेवाड दुःखसागरांत बुडुन गेला.गोगुंद्यावर शोक कळा पसरली.महाराणा उदयसिंहांचा स्वर्गवास झाला होता.त्याकाळी राजपुता मधे अशी प्रथा होती की,राजा निधन पावला की,सिंहासन रिक्त राहू नये म्हणून तिकडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व इकडे राजवाड्यात राजपुरोहित जेष्ठ पुत्राला राज्यरोहणाची दीक्षा देणे हे दोन्ही विधी एकाच वेळी होत असत.अंतयात्रा स्मशानभूमीत पोहचून महाराणाचा देह चंदनी चितेवर ठेवण्यात आला.जेष्ठपुत्र प्रतापसिंह अग्नी देण्यासाठी चित्तेजवळ आल्याने तिथे उपस्थित असलेले दूरदूरचे राजे,महाराजे,जहांगिरदार,सामंतांना मोठे विचित्र वाटले.जेष्ठपुत्र कुॅंवर प्रताप आणि स्मशानभूमीवर?कुॅंवर जगमल सोडून सर्व राजपुत्र उपस्थित होते. चौकशीअंती त्याना कळले की,राज वाड्यात कुॅंवर जगमलचा राज्याभिषेक साजरा केल्या जात आहे.ह्यावर कडवट प्रतिक्रीया होणे स्वाभाविकच होते.
महाराणा लाखांनी एक दंडक घालून दिला होता…मेवाडच्या महाराणा ची निवड करतांना चोंडाच्या वंशजांना विश्वासात घेऊन त्यांचा सल्ला घेतला जाई.मेवाड नरेशाच्या वतीने केले जाणारे हुकुमनामे,परवाने,बक्षिसपत्रे इत्यांदीवर फक्त चोंडाचे राजपुत्र व त्यांचे वंशजच राजमुद्रा मारतील,अन्यथा सनदा व अधिकार अनाधिकृत समजल्या जातील. संकेतानुसार जेष्ठपुत्र राज्याचा वारस असला तरीही दरबार भरवून उमराव, अमिर,मंत्रीगण यांच्या उपस्थितीत औपचारिक का होईना मान्यता घेणे आवश्यक होते,एकटी व्यक्ती वारस हक्काचा निर्णय घेऊ शकत नव्हती.
महाराणा उदयसिंहांनी ही प्रथा मोडीत काढून,मरतांना स्वहस्ते आपल्या पुत्रांमधे द्वेषाचे आणि सत्तासंघर्षाच्या विषवृक्षाचे बीजारोपन केले होते.कुॅंवर प्रतांपांचे नाना सोनगड नरेश आणि पालीचे शासक अक्षयराज सोनगरा यांना हा अन्याय सहन न होऊन ते कृष्णसिंह चंदावत व रावळसांगांना म्हणाले,आपण दोघे चोंडाचे वंशज असून मेवाडचा वारसा आपल्या सल्ल्याने व्हायला पाहिजे होता.तुम्हाला वा इतर संबंधीतां ना विश्वासात न घेता,पूर्वापार चालत आलेल्या या महान परंपरेला ठोकरुन ही नवीन कुप्रथा कशी अमलांत आणल्या गेली?आज मेवाडवर परकीय आक्रमणा ची छाया पसरलेली,बादशहा अकबर सारखा बलाढ्य शत्रू मेवाडचा घास गिळंकृत करण्यास टपून बसलेला,अशा स्थितीत आपसांतच दुफळी असली तर मेवाडचा नाश निश्चित ठरलेला आहे. आजपर्यंत अनेक राजपूत वीरांनी मातृ भूमीसाठी आपल्या प्राणांच्या आहूत्या दिल्यात,बाप्पा रावळांपासून आजपर्यंत च्या महाराणांनी स्वसुखाचा विचार न करतां संघर्ष करुन शत्रूला पार इराण पर्यंत पिटाळून लावले.म्हणूनच हिंदुस्थानात मेवाडचे नांव आदराने घेतल्या जाते.
आपल्या आजोबांचे संतप्त बोलणे ऐकून प्रतापसिंह मोठ्या धर्मसंकटात पडले.गृहकलहाचे नवीन संकट आ वासून समोर उभे होते.त्यांनी मनात विचार केला,चोंडा महाराज सुध्दा माझ्या सारखेच महाराणा लाखाचे जेष्ठपुत्र असून,धाकट्या राणीच्या स्वार्थी महत्वा कांक्षा पूर्ण करण्यासाठी राजहक्क सोडून आयुष्यभर मातृभूमीच्या स्वातंत्र्या साठी झगडत राहिले.मी सुध्दा त्यांचेच अनुकरण केले तर गृहकलहामुळे आपल्याच भूमीवर माझ्या बंधूंचे रक्त सांडण्यास कारणीभूत होणार नाही.मी प्रभू रामचंद्राचा वंशज आहे.कैकयीच्या इच्छेसाठी व पित्याच्या वचनपूर्तीसाठी रामाने १४ वर्से वनवास पत्करुन राज्या वरचा हक्क सोडला होता.मी सुध्दा पित्याची इच्छापूर्ती करेन!मन शांत झाले व त्यांनी वडिलांच्या चित्तेला अग्नी दिला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – १५.
महाराणा उदयसिंहाच्या निधना नंतरचे धार्मिक सोपस्कार पार पडल्या वर,महाराणा जगमलचा मेवाड राज्यावर स्वैर राज्यकारभार सुरु झाला.अत्याचार, अन्यायांना नुसतां उत आला.त्याचे चटके सामान्य जनतेलाच नव्हे तर,दरबारातील सरदार,मातब्बरांनाही बसू लागले.असाच एक वर्षाचा काळ निघून गेला.
चंदावत रावत,कृष्णसिंह,अक्षय राज सोनगरा,रावळ सांगा व इतर सरदार मेवाडची इज्जत वाचवण्यासाठी कुॅंवर प्रतापांना महाराणापद ग्रहण करण्या बद्दल म्हटल्यावर,प्रताप नम्रपणे म्हणाले, मी पिताजींच्या इच्छेचा अनादर नाही करुं शकत.कुॅंवर!लोकांच्या सहनशीलते चा अंत नका पाहू!ते इतके चिडले आहे की,जगमलच्या जीवीतेलाच भय उत्पन्न झाले.आज मेवाडला तुमच्या सारख्या खंबीर नेतृत्वाची नितांत गरज आहे. जगमलसारख्या नेभळटाची नाही. पिताजींच्या इच्छेपेक्षा मातृभूमी श्रेष्ठ आहे.आपण सांगता ते योग्य व हितावह असले तरी पिताजींच्या इच्छेचा सन्मान करणे आहे.आपल्यासारखी जेष्ठ आणि श्रेष्ठ माणसं पाठीशी आहे त्याचा आनंद व अभिमानाने उर भरुन आला.मातृभूमी चे रक्षण करणे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी शीर तळहातावर घेऊन लढण्या स तयार आहे,परंतु जगमलच्या हक्कावर गदा आणून नाही.दोघा भावांत दुफळी नकोय.मी सैनिक या नात्याने शत्रूला मेवाडच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही हे आपल्याला वचन देतो.
कुॅंवर प्रतापांचे नितीयुक्त दृढनिश्चयी बोलणे ऐकून,त्यांचे मामा म्हणाले,तुमच्या बंधूप्रेमापायी संपूर्ण मेवाडला गुलामगिरी त ढकलणार का?कुॅंवर! माणूस नुसता पराक्रमी असून चालत नाही तर सत्ता, अधिकार हाती असावा लागतो.सत्ते शिवाय पराक्रमाला कवडीची किंमत नसते.सत्ता प्राप्त करुन सर्वांना संघटीत करा,लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवा.ही इच्छा आमची नसून सार्या प्रजेची,सावं,सरदारांची आहे.आतां जर निर्णय घेतला नाही तर बंडाळी माजेल, तेव्हा तुम्ही कांहीच करुं शकणार नाही. राजपूत राजपूतांचे रक्त सांडतील, याचा फायदा शत्रू घेतील.कुॅंवर!मातृभूमीचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो,तेव्हा सर्व बाबी गौण ठरतात.पितृभक्तीमुळे उदयपूरच्या गादीवर आरुढ होण्यास विरोध आहे ना? तर तुमचा तात्पुरता तिलक गोगुंद्याला करुन नंतर सवडीने कुंभळगडावर राज्या भिषेक पार पाडू.ठीक आहे,पण माझी एक अट राहील.गुरुदेवांना दिलेल्या वचनानुसार,मी ऐश्वर्य,वैभवापासून दूर व साध्या झोपडीत राहीन.गवताचे राजासन असेल.स्वतः भूमीवर झोपेन.सोन्याचांदी च्या भांड्यांऐवजी मातीच्या भांड्यांचा उपयोग करेन.हे सर्व मान्य असेल तरच महाराणापद स्विकारण्यास तयार आहे.
कसे कां होईना,प्रतापसिंहांनी मान्यता दिल्यामुळे चंदावत रावत कृष्णसिंह आणि अक्षयराज आंनदविभोर होऊन त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या. असा व्रतस्थ राजा मेवाडला मिळाल्याची नोंद इतिहास नक्की घेईल.
गोगुंडाss !उदयपूरच्या इशान्येस सोळा मैलावर अरवलीच्या दर्याखोर्यात वसलेले सुरक्षित स्थान!महादेवाच्या बावडीशेजारी एका मोठ्या वृक्षाखाली तात्पुरते साधे सिंहासन स्थापन करु अत्यंत साधेपणे कुॅंवर प्रतापसिंहाचा राज तिलक संपन्न झाला.यथावकाश सर्व संमतीने कुंभळगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यांत आला.
कुॅंवर प्रतापसिंह मेवाडचे महाराणा घोषित करण्यात आले.मातृभूमीने समाधानाचा उसासा सोडला.सिसोदिया राजघराण्याचे वारसदार बनले.प्रथम ते लोक महाराणा होते.मेवाडभूमीचा सच्चा सेवक,अन्याय,अत्याचाराविरुध्द पेटून उठणारे,मोगलांना आपल्या तेजाची चमक दाखवणारे वीरपुरुष आज मेवाड चा महाराणा म्हणून सन्मानीत झाले.
मेवाडच्या दृष्टीने हा काळ अतिशय कठीण होता.मेवाडचे महाराणा पद म्हणजे साक्षात ज्वलंत अग्निकुंड मोगलां च्या हल्ल्यांनी सतत धगधगणारे,होरपळू न काढणारे,महाराणा प्रतापांची कसोटी पाहणारे होते.त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा होता.चितोडगड हे मेवाडचा गौरव,मेवाडचे नाक तेच अकबराच्या ताब्यात होते.दुखावलेल्या संगरने गुप्त पणे अकबरशी संधान बांधले.अकबराला तर तेच हवे होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.











