आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

11. महाराणा प्रताप संपूर्ण भाग १, (१ ते ५)
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
प्रस्तावना
नमस्कार !
आतांपर्यंत आपल्या समोर रामायण, महाभारतातील व्यक्तीरेखा,संतचरित्रे तसेच ऐतिहासिक कांही व्यक्तीरेखा सादर केल्यात.त्याच इतिहासातील आणखी एक व्यक्तीरेखा प्रस्तुत करीत आहे.सोळाव्या शतकातील मेवाड म्हणजे आजचा राजस्थान! तेथील एक उच्च कोटीतील महाराणा म्हणून आपला ठसा उमटवून गेले.त्या महाराणा प्रतापसिंहांविषयी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.आपल्या क्रिया प्रतिक्रीया अपेक्षित!
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते.
महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
मेवाड म्हणजे आजचा राजस्थान मधे १६ व्या शतकांत एक उच्चकोटीचा महाराणा म्हणून प्रतापसिंहांनी आपला ठसा उमटवला होता तर,१७ व्या शतकात एक थोर महापुरुष राजे म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या अनमोल कार्याने मोहोर उमटवून गेलेत.दोघांमधे बरेचसे साम्य अढळून येते.दोघेही सिसोदिया राजवंशातील होते.महाराणा प्रतापसिहांनी आपली सारी कारकिर्द पहाडी मुलखाचा आश्रय घेऊन,तर शिवाजी महाराजांनी डोंगर दर्या,गनिमी कावा,छापामार युध्द करुन मोगलांना जेरीस आणले होते.
महारानी आयुष्यभर अकबराशी संघर्ष केला,तर शिवाजी महाराजांनी औरंगजेब आणि विजापूरकरांशी सामना केला.महाराणांनी जसे सामान्य जनतेला जवळ करुन मुक्तीसंघटना स्थापुन अकबराशी सामना देत आपली मेवाड मातृभूमी स्वतंत्र केली होती,तर शिवाजी महाराजांनी दख्खनमधील सामान्य मावळ्यांमधे स्वातंत्र्याची ज्योत पेटवून, गुलामगिरीच्या श्रृखंला तोडून स्वतंत्र हिंदू राज्य निर्माण केले होते.
या थोर वीराची संघर्षमय जीवन गाथा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेली आहे.त्यांच्याविषयीची सहसा माहित नसलेली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे,ते ८० किलो वजनाचा भाला,१२ किलो वजनाचे कवच कवच छातीवर बाळगून वावरत असत.भाला,कवचढाल, आणि दोन तलवारी यांचे एकून वजन २०८ किलो शरीरावर बाळगणे ही साधी गोष्ट नव्हती.त्यांच्या ह्या वस्तू आजही मेवाड राजघराण्याच्या इतिहासात बघायला मिळतात.
महाराणा प्रताप हे नियतीच्या हातचे खेळणे झाले होते.सिसोदिया राजवंशीय परंपरेनुसार थोरला पुत्रच राजगादीवर आरुढ होत असे,पण प्रतापसिंहाचे वडिल उदयसिंह हे धाकटी राणी धीरकंवर भटीयाणीच्या आहारी गेले असल्यामुळे,तिचा पुत्र जगमलला गादीचा वारस म्हणून घोषीत केले.पित्या वर परमेश्वरासमान अलोट प्रेम असणार्या प्रतापसिंहांनी हा अन्याय सहन केला.जगमल महाराणा झाल्यावर तो व्यसनाधीन झाला.त्यांचे दोन भाऊ सगरसिंह व शक्तिसिंह अकबराला शरण गेले.मेवाड जनतेने प्रतापसिंहांना उदयपूरच्या राजगादीवर बसवल्यावर जगमल देखील अकबरला जाऊन मिळाला.अकबरने चितोडवर आक्रमण केल्यामुळे चांगले चांगले वीर धारातीर्थी पडले.खजिना रिकामा झाला. संपूर्ण चितोडगड ताब्यात घेण्यासाठी अकबराने हल्ले करायला सुरुवात केली.अशा भीषण राजकीय परिस्थितीत प्रतापसिंहा ना मेवाडचे महाराणापद ग्रहण करावे लागले.अकबराने राजपूत राज्यांमधे फोडझोडीचे तंत्राचा अवलंब केला.त्यांनी ही इतर राजांप्रमाणे शरण यावे म्हणून अकबराने सर्व प्रकारचे प्रयत्न केले,पण स्वाभीमानी प्रतापसिंहांनी त्याचे सारे प्रयत्न विफल केले.हळदीघाटाच्या युध्दात मूॅंहतोड जबाब दिला.२५ वर्षे अकबराशी सतत संघर्ष केला पण मान झुकवली नाही.ज्वलंत राष्र्टप्रेम,मातृभूमी विषयीची प्रखर भावना असलेला हा महाराणा एका झोपडीत वास्तव्य करुन दर्भाच्या शय्येवर झोपतो.असा व्रतस्थ, त्यागी,वचनाचा पक्का राजा इतिहासात दुसरा कोणी सांपडेल का?
तब्बल २५ वर्षे लढा देणार्या या इतिहास पुरुषावर लिहितांना माझी लेखणी भारावून गेली,मंत्रमुग्ध झाली. त्यांच्यावर लिहितांना त्यांचे राष्र्टप्रेम, निष्ठा या गुणांनी युक्त,त्यांच्यातील प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.आपण गोड मानुन घ्यावे.
क्रमशः
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – १.
सह्यांद्री पर्वतरांगानी जसे महाराष्राटावर अनंत उपकार करुन ठेवले तसेच अरवली पर्वत रांगांनी राजपुताण्यां वर मेहरबाणी केली आहे.घनदाट जंगलं, उंच डोंगरं,थरकाप उडवणार्या खोल काळदर्या बघीतल्या की,वाघाच्या हिंमतीचा माणूस देखील भयभीत होत .
हुमायू बादशहापासून ते सम्राट अकबरापर्यंतच्या मोगलांना राजपूत शूर वीरपुरुषांनी त्राही भगवान करुन सोडले होते,पण शरणांगती पत्करली नव्हती. सिसोदिया राजवंशाचा एक गरुड राजा होता, “राणा सांगा”! म्हणजेच संग्रामसिंह यांनी आपल्या आयुष्यात दिल्ली आणि माळव्याच्या सुल्तानाबरोबर अठरा युध्दे केलीत.तहान भूक विसरुन शत्रूला सतत मागे हटवत राहिले.राणा संगाचे एक वैशिष्ट्य होते,ते कोणत्याही युध्दावर गेले की,युध्दाची अठवण म्हणून एक तरी जखम आपल्या देहावर घेऊन येत असत लहानपणी बंधू पृथ्वीराजशी झालेल्या भांडणात एक डोळा निकामी झाला होता इब्राहिम लोधी बरोबर लढतांना एक हात कापण्यात आला होता.शिवाय एका पायाने लंगडे होते.त्यांच्या शरीरावर एकून ८० जखमा होत्या.त्याचबरोबर ते उत्तम कवी आणि भाटांचे स्फुर्तिस्थान होते.
बाबर सोबत झालेल्या युध्दात राणा सांगाचा पराभव झाला होता.त्या पराभवाचे त्यांना इतके दुःख झाले की, स्वतःला महालात बंदिस्त करुन घेतले.हे बघून टोडमरल चाॅचला नांवाच्या भाटाने त्यांच्या महाली येऊन,वीररसाने ओतप्रोत भरलेले महाभारत,रामायणातील दाखले देत स्फूर्ती गीते गायली,ती गीते ऐकून राणा सांगांना स्फुरण चढून मनातील नैराश्य दूर झाले आणि राजपुतांना एक संघ करुन शत्रूशी मुकाबला करण्याचा कानमंत्र मिळाला.त्यांच्या या सांघिक वृत्तीमुळे जबरदस्त राजपूत नेता म्हणून त्यांचा नांवलौकिक झाला.त्यांचे प्रजेवर व मेवाडवर अतुट प्रेम होते.सिसोदिया घराणे म्हणजे महापराक्रमी घराणे,या सिसोदिया घराण्याने मेवाडला एकापाठो पाठ एक असे महापराक्रमी राज पुरुष दिले.या राजपूतांनी आपल्या स्वाभीमाना ला अस्मितेला धक्का लागु दिला नाही. वेळप्रसंगी “जोहार” आणि “केसरिया” चा अवलंब केला.राजपूत स्रीयाही आपल्या शीलरक्षणार्थ अग्निकुंडात उडी घेऊन जोहार करीत आल्या.
अशा या राजपुरुषांमधे राणा सांगाचे नांव अग्रक्रमाने घेतल्या जाते. त्यांच्या या पराक्रमात त्यांची धर्मपत्नी, महाराणी कर्मवतीचा सिंहाचा वाटा होता. महाराणी कर्मवती चतूर,धाडसी,हुशार, प्रसंगसावधानता,निर्णायक क्षमता या गुणांमुळे अनेकवेळा राणा सांगांना कठीण प्रसंगातून अलगद बाहेर काढले होते.त्यामुळे ते पत्नीला खूप मानत.प्रजा सुध्दा या दोघांना परमेश्वरस्वरुप व माता पित्याच्या ठायी मानत.त्यावेळच्या प्रथे नुसार राणा सांगाचे २८ विवाह झाले होते भोजराज,कर्णसिंह,रत्नसिंह,विक्रमादित्य उदयसिंह,पर्वतसिंह,कृष्णसिंह आणि चार कन्या होत्या.
राणा सांगा अतिशय न्यायप्रिय होते. सततच्या संघर्षमय आयुष्याने तेअतिशय कडवे योध्दा झाले होते.मोगलांचे पारिपत्य करण्यासाठी मेवाडच्या सर्व राजपुतांना एकसंघ केले होते.खानवाच्या युध्दात पराभव झाल्यावरही नाऊमेद न होता त्यांनी परत युध्दाची तयारी केली पण सरदारांना सततचे युध्द नको असल्यामुळे सारे त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्यावर विषप्रयोग करण्यांत आला.३० जानेवारी १५२८ मधे राणा सांगा मरण पावले.त्यांच्या मृत्युने कधीही भरुन न येणारे नुकसान मेवाडचे झाले. मेवाड संकटात पडले.सारे मेवाडवासीय शोकसागरात बुडुन गेले.
क्रमशः
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – २.
राणा सांगांच्या मृत्युनंतर अल्प वयीन विक्रमसिंह चितोडच्या राजगादी वर आले.त्यांना राज्यकारभाराचा अनुभव,व्यवहार ज्ञान नसल्यामुळे, सरदारांना कसे खुष ठेवावे हे कळत नसल्यामुळे ते नाराज होऊन मेवाड सोडून निघून गेले.राणा विक्रमादित्य एकाकी पडल्याचे बघून,गुजराथच्या सुल्तान बहादूरने अचूक संधी साधून १५३३ मधे चितोडगडावर हल्ला केला. घाबरलेल्या,भयभीत विक्रमादित्याने माळव्याचे अनेक परगाणे देऊन टाकले. दोन वर्षै शांत बसून १५३५ मधे त्याने पुन्हा चितोडगडवर स्वारी केली.
त्यामुळे विक्रमादित्यांची परिस्थिती मोठी कठीण झाली.सक्षम सरदार गडावर नव्हते.पराभव निश्चित होता. अशावेळी महाराणी राजमाता कर्मवतीने सारी सूत्रे हाती घेतली.सर्वात प्रथम तीने विक्रमादित्य व उदयसिंहाला गुप्त मार्गे बुंदीला सुरक्षित रवाना केले.त्यानंतर सर्व सरदारांना पाचारण करुन चितोडगड वाचवण्याचे आव्हान केले.त्यांना आपल्या राजकर्तव्याची जाणीव होऊन रक्त सळसळु लागले.हात तलवारीवर गेले.नेत्रातून अंगार बरसू लागला.डोडीया भाण आपल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून गरजला… जय भगवान एकलिंगजीsss पाठोपाठ सारे सरदार गरजले.राजमाता कर्मवतीने प्रोत्साहित होऊन रावत वाघसिंहाला महाराणाचे राज्यचिन्ह व त्याच्या हाताखाली युध्द प्रतीनिधी म्हणून सोनगर्यांची नेमणूक केली.राजमाता कर्मवतीच्या आज्ञेने वीर राजपूत सरदार बहादूरशहाच्या सैन्यावर चालून गेले.
घनघोर युध्दाला प्रारंभ झाला. दोन्ही बाजुंच्या सैन्यांच्या मुंडके आणि धडांचा नुसता खच पडला.रक्ताच्या नद्या वाहू लागल्या.शौर्याची परिसीमा करुन दिवसभर तुंबळ युध्द सुरु होते.राजपूत सरदारांनी अमाप शौर्य गाजवले पण बहादूर शहाच्या अफाट फौजेपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.आपला पराभव निश्चित आहे हे ध्यानी येताच राजमाता कर्मवतीने गडावरील तेरा हजार रजपूत रमणींना एकत्रीत करुन गोमुखकुंड आणि विजयकुंड मैदानात अग्निकुंड पेटवून त्यात सार्या रमणींनी धडाधड उड्या घेतल्या.राजपूत रमणींनींनी आपल्या पवित्र शीलरक्षणार्थ दाहक अग्निला उरी कवटाळले.केवढा त्याग? केवढे आत्मबलिदान?हे दिव्य बघून काळ देखील थरारला.चितौडगडावर शत्रूचा हिरवा ध्वज फडकू लागला.
आठ महिन्यानंतर हुमायूने बहादूर शहाचा पराभव करुन त्याला ठार केले.हे कळतांच बहादूरचे सैन्य भयभीत झालेले पाहून सर्व राजपूत सरदार एकत्र येऊन चित्तोडगडावर हल्ला केला.बहादूरशहाचे सैन्य मुकाबला न करतांच पळून गेल्या मुळे रक्ताचा थेंबही न सांडतां चित्तोडगड पुन्हा राजपुतांच्या ताब्यात आला.
महाराणा सांगाचा बंधू पृथ्वीराज ला दासीपासून बनवीर नांवाचा पुत्र होता राणा विक्रमादित्याचा गैरकारभार बघून चितोडची गादी बळकावण्याच्या हेतूने तो चित्तोडगडला आला.तो अतिशय महत्वाकांक्षी व स्वार्थी होता.केव्हा पाठीत खंजिर खुपसेल याचा नेम नव्हता त्याने चितोडगडला येऊन पाय पसरायला सुरुवात केली.मधाळ बोलण्याने सरदारां ना आपल्या अंकित करु लागला.विक्रमा दित्य विलासनेत गर्क होता.बनवीर आपल्या विरुध्द षडयंत्र रचुन घातपाती कृत्ये करुन आपला विश्वासघात करेल याची शंका सुध्दा आली नाही.विक्रमा दित्याच्या भोवती जाळे विणायला सुरुवात झाली.बनविरने विक्रमादित्या च्या विरोधकांना मोठमोठे आमिषे दाखवून षडयंत्र रचले.एके रात्री सगळीकडे सामसुम झाल्यावर महालाच्या गुप्त दालनात त्याने आपल्या अधिन केलेल्या सरदारांना बोलावुन आपला कुटील डाव सांगत असतांना एका दासीने ऐकले. आज रात्रीच विक्रमादित्य आणि उदयसिंहाला ठार मारण्याचा कट ऐकून ती सिंसोदिया वंशाची एकनिष्ठ दासी एकदम घाबरली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ३.
सिसोदिया राजपरिवाराची निष्ठावंत दासी अंधाराची पर्वा न करतां धावत जाऊन कुॅंवर उदयसिंहाच्या शयनगृहा जवळ जाऊन दारावर हळुवार खटखट केले.शयनगृहात उदयसिंहाची दासी पन्ना खाली अंथरुण टाकून झोपली होती. सुशोभित मंचकावर कुॅंवर उदयसिंह निद्रिस्त झाले होते.दुसर्या जुन्या साध्या मंचकावर तिचा स्वतःचा मुलगा झोपला होता.एवढ्या रात्री दारावरचा आवाज ऐकून विस्मयचकीत होऊन दार उघडल्या बरोबर भयभीत,घाबरलेली करमेती दासी एकदम आंत घुसुन पटकण दार बंद केले.तोंडातून शब्द फुटत नव्हता. अगदी कळकळीने घाईने म्हणाली,पन्ना घाई कर!तो सैत्यान बलवीर उदयसिंहा ला ठार करण्यास इकडे यायला निघाला. पन्ना अवधी फारच कमी आहे.कुॅंवरला वाचव!कटकारस्थाचा ऐकलेला वृतांत्त थोडक्यात तीला सांगीतला.
पन्नादायी एक राजनिष्ठ दासी होती. राजमाता कर्मवतीची ती अत्यंत विश्वासू दासी असल्यामुळे उदयसिंहाच्या पालन पोषण,देखभालीची व्यवस्था तिच्यावर सोपवली होती.पन्ना थोडी विचलित झाली,पण क्षणभरच!मनाशी एक ठाम निर्णय घेतला.उदयसिंहाला व आपल्या पुत्राला उठवून एकमेकांचे कपड्यांची अदलाबदल केली.कुॅंवरचे भरजरी कपडे आपल्या पुत्राला परिधान करुन कुॅंवरच्या सुशोभित पलंगावर आणि कुॅंवरला तीच्या मुलाच्या साध्या जुन्या पलंगावर झोपवुन,कांहीही घडले तरी,दोघांनीही तोंडातून ब्र शब्द काढायचा नाही असे निक्षून सांगून,दोघांनाही डोक्यापर्यत पांघरुणाने झाकून टाकले.पन्नादायीचे कृत्य बघून तीचा डाव लक्षात येऊन ती करमेती दासी एकदम आवाक झाली.केवळ चितोडगडचा वारस,मेवाडच्या भूमीसाठी आपल्या काळजाच्या तुकड्याचा बळी द्यायला निघाली त्या महान मातेचा त्याग अवर्णनीय होता.
कर्मवतीला पलंगाखाली श्वास रोखून लपायला सांगीतले.व स्वतः तिच्या अंथरुणावर अंग टाकून येणार्या संकटाची प्रतिक्षा करुं लागली.एक एक क्षण पुढे सरकत
होता.तोच दारावर बनवीरने कडकदार आवाजांत तीला दरवाजा खोलण्याचा हुकुम केला.ती टाळाटाळ करीत असल्या चे बघून दरवाजा तोडण्याची धमकी दिल्यावर तीने भितभीत दरवाजा उघडल्याबरोबर डोळ्यात खून चढलेला बनवीर शाही मंचकाजवळ तलवार घेऊन आल्यावर,त्याचा इरादा ओळखुन गया वया करीत कुॅंवरला मारु नका म्हणून विनवनी करुं लागली,पण त्या नराधमाने तिला बाजूला ढकलून तलवारीच्या एकाच घावात तीच्या पुत्राचे शिर धडा वेगळे केले.त्यावेळी त्या मातेची अवस्था काय झाली असेल,याचा नुसता विचार केला तरी थरकाप होतो.छिन्न-विछिन्न ह्रदयाने प्रत्यक्ष स्वतःच्या पुत्राचा समोर झालेला वध पाहुन तीच्या ह्रदयाचे तुकडे तुकडे झाले.आपला हुंदका व ओठ गच्च आवळून धरला.
दुसर्या मंचकावर कोण झोपलय? माझा पुत्र!पन्नादाई कसेबसे म्हणाली. बनवीरने पांघरुण दूर करण्याची तसदी न घेतां,विकट हास्य करीत आला तसा निघून गेला.तो दूर जातांच आतांपर्यंत धरुन ठेवलेले अवसान व दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला.पन्नाला दुःख आवेरानासे झाले.कसे आवरेल?ज्याला स्वतःच्या रक्तामासांवर नऊ महिने उदरात वाढवले त्या पुत्राचा बळी जात असलेला डोळ्यादेखत बघणे साधी बाब नव्हती.पण ती महान माता निष्ठावान होती.तिने हा महान त्याग केला नसता तर सिसोदिया घराण्याचा वंश तिथेच खुंटला असतां.तिचे राजघराण्यावरच नव्हे तर संपूर्ण मेवाडवर उपकार होते.
करमेतीदासी पन्नाचे अचाट कर्तुत्व व त्याग बघून भारावल्या स्थितीत तिचे सांत्वन करुं लागली.कुॅंवर उदयसिंह या सार्या गोंधळाने घाबरुन गेला होता. शेजारच्या मंचकावर दाईमांचा पुत्र रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडलेला होता. पन्नाला दुःख करायलाही अवसर नव्हता. स्वतःच्या दुःखाला आवर घालून, सुर्यो दयापूर्वी कोणालाही भनक न लागतां कुॅंवर उदयसिंहाला गडाबाहेर काढणे अति आवश्यक होते.नाही तर केलेल्या बलिदानावर पाणी फेरल्या गेले असते. पन्नादायीने बाहेर जाऊन दोन निष्ठावान सेवकांना सोबत आणून घडलेली घटना सांगून विक्रमादित्याचा वध झाल्याचे सांगीतले.राजघराण्याचा वारस वाचवण्यासाठी मी माझ्या मुलाचा बळी दिला.ते दोन्हीही निष्ठावंत सेवक तिच्या महान त्यागापुढे नतमस्तक होऊन कुॅंवर ला गडाबाहेर काढण्याची जबाबदारी स्विकारली.एकाने तीच्या मुलाचे धड व शिर एका झोळीत टाकून पाठीला बांधले व दुसर्या सैनिकाने कुॅंवरला खांद्यावर घेतले.पन्नादायीने करमेतीदासीचा निरोप घेऊन गुप्त मार्गाने अंधारात चितोडगडा च्या परिसरातून बाहेर पडले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
!! महाराणा प्रतापसिंह !!
भाग – ४.
झपाट्याने बरेच अंतर चालून आल्यावर,त्या दोन सैनिकांसह पन्नादाई कुॅंवर उदयसिंहाला घेऊन एका नदीकाठी पोहोचले.त्या दोघांनी लाकडे गोळा करुन चित्ता रचली.चित्तेवर दाईमाच्या पुत्राचे शव ठेवल्यावर,त्या महान त्यागी मातेने अश्रू गाळत चित्तेला अग्नि दिला.आपले दुःख आंतल्या आंत कोंडून सर्व जन देवळी गांवी आलेत.पन्ना उदयसिंहास घेऊन रायत रायसिंहाकडे आली.त्यांनी उदयसिंहाचे चांगले स्वागत केले,पण बनवीरच्या भीतिने आश्रय देण्यास नाकार दिला.त्याने पुढच्या प्रवासाची व्यवस्था लावून दिली.तिथून डुंगरपूरला येऊन रावत आस्कणाला उदयसिंहाला आश्रय देण्याची विनंती केली,पण त्याने ही नाकारले.पण त्याने कांही पैसे व घोडा दिला.स्वतःला महान समजणार्या राजपूतांचा तीला संताप आला,पण ही वेळ संताप करण्याची नव्हती,उदयसिंहा ला आश्रय मिळणे महत्वाचे होते,त्यामुळे सारा अपमान आंतल्या आंत गिळत होती. अगदी असहाय्य झाली होती.
पण ती हिंमत हरणारी राजपुतानी नव्हतीच.शेवटपर्यत प्रयत्न सोडणार नव्हती.सैनिकांशी मसलत करुन कुंभमेर म्हणजेच कुंभळगडावर आलेत.या गडाचा किल्लेदार आशा देवपुराने त्यांचे स्वागत केले.पन्नादाईने घडलेला सारा करुण वृतांत ऐकुन तो कळवळला.पण अशा कठीण समयी काय निर्णय घ्यावा,त्याला ही कळेना.बनवीरची भीती त्यालाही होतीच,त्यामुळे त्याने नकार दिला.
करुण स्फुंदून स्फुंदून रुदन करत पन्नादाई म्हणाली,माझ्या डोळ्यादेखत स्वतःच्या पुत्राचा बळी जातांना बघीतले, कशासाठी?सिसोदिया घराण्याचा अंतिम राजवंश वाचावा आणि आज आपली म्हणवणारी माणसेच अशा कठीण प्रसंगी माघार घेताहेत.माझे बलिदान व्यर्थ जाणार का?कुठे लपवू या कुॅंवरजींना?हा तिचा करुण विलाप बाजुच्या दालनात असलेल्या किल्लेदाराच्या आईने ऐकला. आंत येऊन म्हणाल्या,बेटाss मी सारं ऐकलय!हिचा असिम त्याग अख्ख्या मेवाडात कुणाचा असेल का?फार मोठा संघर्ष करुन सिसोदिया राजघराण्याचा अंतिम वंश कुंभळगडावर घेऊन आली. ज्या महाराणा सांगांनी तुला या उच्चपदा वर आणून मानमरातब दिला,ते उपकार फेडण्याची सुवर्ण संधी तू घालवू नकोस. मातेच्या बोलण्याने मतपरिवर्तन होऊन किल्लेदाराने कुॅंवर उदयसिंहास ठेवून घेतले.पन्नादाईने आशा देवपुर किल्लेदारा चे मनःपुर्वक आभार मानुन निरोप घेतला आपल्या त्या दोन विश्वासू सैनिकांसह चित्तोडगडला परतली.बनवीरला संशय येऊ नये म्हणून ती फार काळजीपुर्वक राहू लागली.वैयक्तीक दुःख विसरुन उतुंग कर्तव्याने आनंदविभोर झाली.
राजस्थान….! म्हणजे संघर्ष… महान त्यागाची भूमी!!!
देशभक्तीचे महान प्रतिक म्हणजे मेवाड! या भूमीने महान राजपुत पुत्रांना जन्मास घालून आक्रमक परकीय शत्रूंची वाचाच बंद केली.स्वाभिमान,स्वदेशप्रेम,मातीची महती त्यांच्या नसा नसांत भरलेली,मृत्यु ला कवटाळतील पण झुकणार नाही राजस्थानातील चिवट राजांना,वीरांना व सामान्य जनतेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत परकीय शत्रूं बरोबर संघर्ष करावा लागला होता.
राजस्थानातील सर्वात मोठा पर्वत म्हणजे अरवली.या पर्वतामुळे राजस्थान चे दोन भाग झाले.एक मेवाड आणि दुसरा मारवाड!मेवाडमधील अरवली पर्वताच्या उंच पहाडाच्या माथ्यावर कुंभळगड होता.या कुंळगडावर सिसोदिया राजपरिवाराचा वंश कलेकले ने वाढत होता.किल्लेदारआशा देवपुरे कुॅंवर उदयसिंहाची अतिशय काळजी घेत होते.त्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था करुन त्यांना राजकारण,समाजशास्र,इ. बरोबर शस्रास्राचे शिक्षण,तलवार चालवणे,भालाफेक,धनुष्यबाण चालवणे यांतही निष्णात केले जात होते.त्यासाठी खास शिक्षकांची व्यवस्था केली होती. कसाही बिथरलेला घोडा असला तरी त्याला वठणीवर आणून घोड दौडीत ते अतिशय तरबेज झाले होते.
त्यावेळच्या बालविवाह प्रथेनुसार आशा देवपुरने १५ वर्षाच्या उदयसिंहाचा विवाह सोनगड नरेश अक्षयराजची राज कन्या देखण्या जयंतीबाईशी करुन दिला.कुॅंवर उदयसिंह राजपुत्राच्या इतमानाने कुंभळगडावर व्यवस्थीत व मजेत वाढत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ५.
इकडे चित्तोडगडावर…बनवीर अतिशय घमेंडी आणि उन्मत झाला होता.चित्तोडगडची सारी सत्ता त्याच्या अधिकारात असल्यामुळे तो खुप जुलमी, अत्याचारी बनला होता.शुल्लक चुकीला तो भरचौकात मुडकी उडवत असे.प्रजा तर घाबरत होतीच,पण सरदारही त्याच्या विरोधात ब्र काढत नव्हते.विक्रमादित्य व बनवीर दोघेही अत्याचारी,भोग विलासात गर्क!फरक फक्त एकच होता,विक्रमा दित्याला राजकारणाची जाण नव्हती, बनवीर मात्र उत्तम राजकारणी होता. पन्नादाईला स्वतःला कांही त्रास नव्हता, पण प्रजेवरील अन्याय,अत्याचार बघून चिंताग्रस्त झाली होती.प्रजेत असंतोष घुसमसत होता.कोणीतरी त्याच्या विरोधात जाऊन त्याला गादीवरुन पदच्युत करावे असे वाटत होते.त्यादिशेने पन्नादाई विचार करु लागली.
उदयसिंह चांगले तरणेबांड झाले होते. ९ मे १५४० ला प्रताप नांवाचे पुत्र झाले.या बाळाचा नामकरण विधी थाटा माटात झाला.तिकडे चितोडगडावर पन्ना दाईने सावधतेने एक एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली.कांही सरदारां चा विश्वास संपादन करुन,कुॅंवर उदयसिंह जिवंत असल्याचे सांगीतल्या वर त्यांचा प्रथम तर खरेच वाटले नाही, पण घडलेली हकिकत सांगून स्वपुत्राचे बलिदान देऊन उदयसिंहाला वाचवल्याचे कळल्यावर तिच्या स्वामिनिष्ठेपुढे ते नतमस्तक होऊन फार कौतुक वाटले. आणि संधी मिळतांच बनवीर विरुध्द बंडाचा पवित्रा घेण्याचे ठरविले.बनवीर मात्र या सर्व कटापासुन अंधारत होता. त्याला कोणतीही चाहूल न लागू देता, पन्नादाई त्या सरदारांना घेऊन कुंभळगडा वर आली.दाईमांला बघून उदयसिंहाच्या बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या.पन्ना दाईचे बलिदान,निःस्वार्थी प्रेम आठवले व एकदम तीच्या कुशीत शिरुन तीचे अश्रू पुसत म्हणाले,दाईमां!आज आम्ही जिवंत केवळ तुझ्यामुळे आहोत.तिच्या सोबत आलेले सरदार आणि किल्लेदार आशा देवपुरा ही अलौकिक भेट भान हरपून भारावल्या अंतःकरणाने बघत होते.त्याच्याही नेत्रांच्या कडा ओलावल्या.स्थानापन्न व जलपान झाल्या वर पन्नादाई म्हणाली….
कुॅंवर!चित्तोडगडावर नुसती बेबंद शाही माजली आहे.लोकांची मालमत्ता हडप करणे,स्रीयांची अब्रु सुरक्षित नाही, कुणाचा कडेलोट,कुणाला हत्तीपायी देणे, कुणाचे मुंडके उडवल्या जात आहे,सर्वी कडे अन्याय,अत्याचाराला नुसता उत आला आहे.या सर्वांचा बंदोबस्त झालाच पाहिजे.दाईमां!याच सरदारांनी त्यावेळी त्या दुष्टाला साथ दिली नसती तर,आमचे मोठे बंधू विक्रमादित्य मारल्या गेले नसते नी राज्यात अशी अराजकता माजली नसती,आणि तुलाही आम्हाला वाचवतां ना पुत्र गमवावा लागला नसतां.सारे सरदार खजिल होत म्हणाले,चुकले कुॅंवरजी! माफ करा…व आम्हाला झालेली गलती सुधारण्याची संधी द्या.
पन्नादाई म्हणाली,कुॅंवरजी!तुम्ही सिसोदिया वंशाचे कर्ते राजपुरुष म्हणून आपले कर्तव्य निभवावे.चितोडगडची प्रजा बंडात साथ द्यायला तयार आहेत. मदतीला या सरदारांचे सैन्य आहेतच! आंतून बाहेरुन एकदम उठाव झाला तर बनवीरला राजगादी सोडावीच लागेल. चितोडगडची जनता तुमच्याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसली आहे.कुॅंवर विचारमग्न झालेले बघून आशा देवपुरा म्हणाले,कुॅंवर!ही संधी महत्वाची आहे. तुम्ही प्रकट होण्याची योग्यवेळ आलेली आहे.प्रजेत बनवीरबद्दल क्षोम आहे.गडावरील सरदार नाराज आहे.यावेळी तुम्ही चितौड वर हमला केला तर तुमच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होऊन त्रस्त झालेल्या प्रजेला आपला राजा मिळेल, प्रजा सुखी होईल.ठीक आहे आबासाहेब आपल्या व दाईमांच्या इच्छेचा आम्ही मान ठेवू!कुॅंवर उदयसिंहांच्या आश्वास युक्त होकाराने सर्वांनाच आनंद झाला.
कुॅंवर उदयसिंह म्हणाले,आम्ही सिसोदिया राजवंशीय राजे,प्रभू रामचंद्रा चे वंशज आहोत.जसे प्रभू रामचंद्रांनी दुष्ट,अन्यायी,अत्याचारी रावणाचा वध करुन संपूर्ण आर्यवर्तात वैदिक धर्माचा प्रसार केला,धर्माला अधिष्ठान देऊन अधर्माचा समूळ नाश केला,त्या धर्माला स्मरुण आम्ही बनवीराचे समूळ उच्चाटन पारिपत्य करण्याचे आश्वासन देतो.पण सरदारांनो!तुम्ही राजपूत असतांना एका दासीपुत्रापुढे कसे झुकलात,नतमस्तक झालात याचेच आम्हाला आश्चर्य वाटते. सर्व सरदारांच्या माना शरमेने खाली गेल्या.नंतर आशा देवपुरांनी छान मेजवानीचा थाट केला.सर्वांनी सुग्रास भोजनावर यथेच्छ ताव मारला.



















