पेशवा बाजीरावची दुर्भागी ” मस्तानी ” भाग ३, (९ ते १२)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !! बाजीराव मस्तानी !!!

!!!  मस्तानी  !!!

                  भाग – ९.

            निजामाच्या भेटीचा मुहूर्त ठरला.आघाडीच्या तुकड्या पुढे रवाना झाल्यात.पेशव्यांबरोबर आबाजी पुरंदरे होते. भेटी साठी अंबारिसह हत्ती व घोडदळ घेतले. काशीबाईंनी अश्रूभरल्या डोळ्यांनी पेशव्यांना औक्षण करुन हातावर दही  घातले. कुलस्वामींचे दर्शन घेऊन मागे वळून न पाहतां ते फौजेत दाखल झाले. पंधरा दिवसांनी मांजरा नदीच्या ऐलतीरी  पेशव्यांच्या फौजेचा तळ पडला. पैलतीरी आधीच निजामाचा पांच कोसांपर्यंत तळ पडलेला होता. तिसर्‍या दिवशी निजामाचे वकील पेशव्यांच्या भेटीस आले. वकीलाने मुगली पध्दतीने तीनदा कुर्निसात केल्यावर पंतांनी त्याला आसनावर बसवले. औपचारिक बोलणी झाल्यावर, बाजीरावांनी विचारले भेटीची कोणती वेळ निजामसाहेबांनी मुक्रर केली आहे? पेशव्यांनी आराम करावा. १५ दिवसा नंतर  भेटीची वेळ ठरवू असे नबाबसाहेबाचे म्हणणे आहे. इतके दिवस बसून राहण्याची आम्हाला संवय नाही व वेळही नाही. त्याचा वेळकाढूपणा पाहून अंबाजीपंत म्हणाले, पेशव्यांच्या भेटीसाठी छत्रपतींकडे खलिते पाठवून निकड लावली होती,मग आतां उशीर न करतां ताबडतोब भेटीची वेळ ठरवावी.

         पेशवे वकीलास म्हणाले, भेटीचा दिवस ठरवण्यापूर्वी आमची शंका निरसन व्हायला हवी. ही भेट सलोख्याची म्हणून आम्ही केवळ ५००० स्वारांसह भेटीस आलो आणि नबाब साहेबांचा ४०-५० हजाराच्या फौजेचा तळ दिसतो. सलोख्याच्या भेटीस्तव एवढ्या फौजेची काय आवश्यकता? भेटीचा दिवस ठरण्याआधी नबाबांची खाजगी फौज सोडून बाकीची फौज २५ कोस मागे हटली नाही तर आम्ही छावणी सह पुण्याला परत जाऊ. दुसरं म्हणजे नबाबसाहेबांच्या मुलुखात परळीबैजनाथचं आमचं पुरातन देवालय आहे त्याला हल्ली तुमच्याकडून उपसर्ग पोहचत आहे तो ताबडतोब बंद व्हायला हवा. तसेच देवस्थानासाठी नबाबसाहेबांनी इनामाच्या सनदा तयार करुन भेटीच्यावेळी आमच्या स्वाधीन कराव्या त्या आम्ही पुजार्‍याच्या सुपुर्द करु. आणखी कांही किरकोळ बोलणी झाल्यावर वकील निघून गेला.

          आठ दिवसांनंतर नबाबाची बरीचशी फौज छावणी पासून दूर गेली. भेटीचा दिवस मुक्रर झाला. पेशव्यांनी आपल्यासोबत दावतजी सोमवंशी, शंभूसिंग जाधव, संताजी जाधव, अंबाजीपंत व इतर दोन मुत्सद्दी घेतले. निवडक दीड हजाराचा ताफा घेऊन नेमलेल्या दिवशी पेशव्यांनी मांजरानदी ओलांडली. दरबारी पोषाख व शस्रसज्ज होऊन पेशवे अंबारीत बसले. हत्तीसमोर उंटावरुन पेशव्यांची नौबत झडत होती. उंटा मागे पेशव्यांचा जरीपटका फडकवीत, बंदूकसह पांच स्वार धीम्या गतीने चालत होते. खवसखान्यात अंबाजीपंत बसले. त्यांची घारीसारखी चौफेर नजर फिरत होती. आघाडीला दावलजी सोमवंशीच पथक, बाजूला जाधवांचे घोडदळीचे पथक आणि पिछाडीला खास हुजरतीची पागा चालली होती.

          भेटीसाठी निजामाने प्रचंड शामियाना सजवला होता. शाही नौबती झडत होत्या. निजाम सोन्याच्या अंबरीत बसून पेशव्यांना सामोरे गेले. दोघेही आपपल्या हत्तीवरुन खाली उतरले.उभयंतांची खांदाभेट झाल्यावर निजामअलीने पेशवांचा हात धरुन काश्मिरी गालिचा व पायघड्यावरुन शमियानांत सजवलेल्या उंची आसनावर बसवले. एका बाजूने निजामाच्या मानकर्‍यांसाठी तर दुसर्‍या बाजूने पेशव्यांच्या मानकर्‍यांसाठी बैठकी होत्या. भेटीप्रित्यर्थ नौबती,तुतारी, कर्णे चा जल्लोष उडाला. उभयंताकडून नजराण्यांचा समारंभ आटोपताच नाच गाण्यास सुरुवात झाली. आगत स्वागताची औपचारिक बोलणी झाल्यावर  बाजीरावांना घेऊन निजाम मागच्या छोट्या बिचव्यात घेऊन गेला. बिचव्यात दोघांच्याही मुत्सद्याशिवाय दुसरे कोणी नव्हते. वाटाघाटीस सुरुवात झाली. पण बोलण्याला भलतेच वळण लागत असलेले पाहून अंबाजीपंत मधेच म्हणाले, नबाबसाहेब आपल्या आमंत्रणानुसार पेशवे आलेले आहेत.उभयंतांचे बोलणे हिताचे झाल्यास बरे होईल.

           मांजरीनदीकाठी पेशव्यांचा महिनाभर मुक्काम होता. मुत्सद्यांच्या गाठीभेटी अहोरात्र चालू होत्या. अटींच्या याद्या या छावणीतून त्या छावणीत फिरत होत्या.कधी रागाने,कधी प्रेमाने कधी आडवळणाने दोन्ही बाजू एकमेकांना अजमावत होते. अखेर आपल्या अटी निजामाच्या गळी उतरवण्यांत पेशवे कामयाब झाले. चंदीचंदावरचे शिवाजीमहाराजांचे पूर्वी असलेले राज्य छ.शाहू महाराजांच्या नावे करण्याची महत्वाची अट निजामाकडून कबूल करुन घेतली. पेशव्यांच्या कर्जासाठी खानदेश,औरंगाबाद, विजापूर या सुभ्यामधील पन्नास लाखाचा मुलूख पेशव्यांना तोडून देण्याची शर्तही मान्य झाली.

           मांजरानदी काठावरुन नबाबाची दावत घेऊन श्रीमंत पेशवे पन्नास लाखाच्या मुलखाच्या सनदा घेऊन पुण्यास परतले.मराठी दौलतीने सुटकेचा निःश्वास टाकला. ही आनंदी वार्ता सातार्‍यास पोहचवताच छत्रपतींना अतिशय आनंद झाला.

                       क्रमशः
   संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख

!!!  मस्तानी  !!!

                         भाग – १०.

            हुताशनी आठ दिवसांवर आली. हवेलीमधे रंगाचे हौद ठीकठीकाणी ठेवले. फडावरची कामे पांच दिवस बंद ठेवली. दरवर्षी या सनाला पेशवे मोहिमेवर असत. यावर्षी ते पुण्यात असल्यामुळे सगळ्यानाच आनंद वाटला. संध्याकाळी रंगपंचमीचा दरबार आणि नाच गाणे होणार होते. दरबार आटोपला पण मस्तानीचा नाच न झाल्याने लोकंं हिरमुसले.

अंबाजीपंत पुरंदरे दौलतीचे जुने सेवक.वयाने वडिल असल्याने  बाजीरावही त्यांचा अधिकार मानीत असत. कधी कधी राऊंना न आवडणार्‍या गोष्टीही बोलत असत. थोडी उसंत मिळाल्या वर पंत राऊशी बोलण्यास त्यांच्या महाली आले. वरकड गोष्टी झाल्यावर हळूच रंगपंचमीचा विषय काढला. यावर्षी आपण इथे असल्यामुळे रंगपंचमीचा दरबार छान झाला पण मस्तानीचा नाच न झाल्याने सर्वांचा विरस झाला. आम्हीच तिला मना केली.यापुधे ती कुठल्याच समारंभात नाचणार, गाणार नाही.याचा अर्थ श्रीमंतासाठी मस्तानी खास झाली. हवं तर तसं समजा.

            मोहरमच्या सणाची संधी साधून पंतानी आपला वृध्द कारकुन कोथरुडच्या बागेत मस्तानीची भेट घेण्यास पाठवला.  चिकाच्या पडद्याआड बसलेल्या मस्तानीस म्हणाला, श्रीमंताची तुमच्यावर खास मर्जी असल्यामुळे, कांही रीतिरिवाज पाळावे लागतात त्याबद्दल माहिती देण्याची मला आज्ञा झाली आहे. कारकुनाने बरोबर आणलेली कागदाची सुरळी उकलून एक एक कलम वाचण्यास सुरुवात केली.

           श्रीमंताच्या खाजगी महालात बोलावल्याशिवाय मस्तानीने जाऊ नये, पण बोलावणे आलेच तर अदबीने जावे. काशीबाईसमोर मस्तानीने तांबूल खाऊ नये.अशा बर्‍याच किरकोळ गोष्टी सांगून शेवटी म्हणाले, यानंतर मस्तानीने यवनी रहाणी व चालरीत सोडुन वागावे.पंतानी दिलेल्या हुकमाप्रमाणे जरुर वागू. फक्त एक विचारायचे होते, ही सारी कलमे आधी श्रीमंतांच्या कानी घातली असतीलच ना? कारकुन निघून गेल्यावर मस्तानी बसंतीला म्हणाल्या, श्रीमंतांना भेटून सांग की आम्ही याद केली, सवडीने इकडे येऊन जावे. श्रीमंत अचानक सातार्‍याला गेल्याचा निरोप घेऊन बसंती परत आली.

         राधाबाईचा निरोप मिळाल्याने काशीबाई त्यांना भेटायला गेल्या. काशीबाईंनी त्यांना नमस्कार केल्यावर राधाबाई म्हणाल्या, राऊ गुजरात मोहिमेवर गेले असतां, तुम्ही कोथरुडमधे राहत असलेल्या यवनीला अभिषेकाची परवाणगी दिली होती व ती आम्ही रद्द केल्याने तुम्हास वाईट वाटले होते. आज त्याचा अर्थ तुम्हाला कळला असेलच. तीच यवनी आज राऊच्या खास मर्जीतली झाली हे ऐकून काशीबाईंच्या डोळ्याला धारा लागल्या. सुनबाई कांही लढाया ज्याच्या त्यानेच लढायच्या असतात.राऊच्या बेंबंद वागण्याला तुम्हीच खीळ घातली पाहिजे. आम्ही लवकरच तीर्थयात्रेला जाणार आहोत.त्यानंतर हवेलीची मालकिन म्हणून तुम्हालाच सारं पहावं लागेल.आज तुम्हाला जे कांही सांगीतले त्या सार्‍या गोष्टी नीट लक्षात ठेवा. इकडचतिकडच बोलून काशीबाई आपल्या महाली आल्या.

              सातार्‍याहून पेशवे परस्पर कोकणात उतरले. जंजिर्‍याच्या सिद्दयाशी लढून रायगड दौलतीत आला.चिमाजी अप्पा उत्तरेकडील मोहिमेत त्यांनी बुंदेलखंड, राजपुताना आणि मावळ्यातून खंडणी वसूल करुन,खंडणीने लादलेले उंट दक्षिणेची वाटचाल करीत होते.पेशव्यांनी आजारी बंधूंची चौकशी करुन म्हणाले,दौलतीत खंडणी घेऊन आलात पण प्रकृतीची किती हेडसाळ केलीत.

             पुण्यात आल्यावर इतके दिवसांचे तुंबलेले फडावरची कामे उरकवलीत, मोहिमा आखल्या, सरदारांच्या नेमणुका केल्या. झालेल्या दगदगीची श्रमपरिहार करण्यास त्यांनी कोथरुड बागेत तीन दिवसांचा मुक्काम केला. सकाळी मस्तानीबरोबर घोड्यावरुन वेताळच्या डोंगरापर्यंत फेरफटका मारण्याचा त्यांचा परिपाठ होता पणआज मस्तानीची तब्बेत ठीक नसल्या मुळे आली नाही. त्यांना आश्चर्य वाटले,काल रात्री उशीरापर्यत बोलत बसले होते, आज अचानकच काय झाले असावे?

               बाजीराव रपेट करुन आल्यावर मस्तानीला तब्बेती बद्दल विचारल्यावर ती टाळाटाळ करत लाजून त्यांच्यासमोरुन निघून गेली. बसंतीला विचारल्यावर, तीने सांगीतलेले कारण ऐकून मोठ्याने हसत म्हणाले, म्हणजे तुझ्या बाईजींची ही बिमारी आहे तर? ते मस्तानीच्या दालनात जाऊन तिला जवळ घेत म्हणाले, तुझी बिमारी आताच कळली. ही तर खुशीची बात आहे.तिने लाजून उशीत खुपसलेले मुख वर उचलून म्हणाले, तुझ्या कुशीत आमच्या वंश वाढतो यापेक्षा दुसरा आनंद नाही. बाजीरावांचा चेहरा आनंदाने फुलला.त्या आनंदाचा वेग मस्तानीला सहन होत नव्हता. काया थरथरत होती. ओठ बोलण्यासाठी आतुरले होते. पण शब्दच मुके झाले अस्मानातून फरीश्ता बोलावा तसे शब्द मस्तानीच्या कानावर पडले. “प्यारी मस्तानी!” देहभान विसरलेल्या मस्तानीच्या ओठांतून शब्दांचे मोती ओघळले… राऊ! हां हां राऊ! मस्तानीचा राऊ! एकदा पुन्हा म्हण. राऊऽराऊऽ मंद सुंगधावर हवेत शब्द तरळला… “राऊ,  राऊंची मस्तानी! राऊ राऊ…

                       क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख
             दि. १९-५-२२.

!!!  मस्तानी  !!!

                     भाग – ११.

             श्रीमंत, मालिक, सरकार ही उपाधी कधी गळून पडली, ह्रदयाला साद घालणारा ‘ राऊ ‘ शब्द कधी उच्चारला गेला हे मस्तानीच्या लक्षातही आले नाही. भानावर आली तेव्हा  त्यांच्या खांद्यावर मान टाकून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

वेडे ही काय दुःखाची वेळ आहे? राऊ ही आसवं ना सुखाची, ना दुःखाची, आहेत ती भीतीची!

              भीतीची? हा बाजीराव असतांना मस्तानीला कुसली भीती? राऊ, मी लोकांच्या दृष्टीने केवळ कलावंतीन! हिंदुस्थान भर कीर्ती गाजवणार्‍या पेशव्यांचे हे ओझे कसे पेलणार? म्हणून जीव दडपला आहे. बाजीरावांनी तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत आश्वासक स्वरात म्हणाले, आम्ही आहोत ना? तुम्ही आहात म्हणूनच भीती वाटते. पेशव्यांच्या रुपात साक्षात तुफानाशीच आमचा संबंध आला आहे. या तुफानात ही मस्तानी पाला पाचोळ्यासारखी उडून तर जाणार नाही ना याची भीती वाटते. वेडे, ज्या दिवशी तुला आमच्या मर्जीत घेतले त्याचक्षणी या बळकट हातांचा आधार तुला दिला आहे. ती माहुलीच्या जन्माष्टमीची रात्र आठव! त्यारात्री तुला दिलेले वचन या राऊच्या जीवात जीव असेपर्यंत पाळल्या जाईल हे पुन्हा दुसर्‍यांदा वचन देतोय! आपल्याच भरवशावर ही मस्तानी जगत आहे आणि जगणार आहे. बाजीरावांनी तिचे अश्रू पुसत म्हणाले, आतां नेहमीचे निर्व्याज्य हसून दाखव बर! राऊस्वामींनी एवढं यकीन दिल्यावर आतां आम्हाला दुनियाची फिकीर नाही. राऊंच्या प्रेमाचा अंश मोठ्या अभिमानाने वाढवीन. एक बोलायचे होते, बोल! लवकरच आमचे रोजे… नाही आतां रोजे बंद! यापुढे तुझं नाव जरी मस्तावनी असलं तरी, तूं आमची झाली आहेस. तुझा आमचा धर्म एकच झाला. यापुढे आम्ही सांगू तेच करायच! राऊंची आज्ञा शिरसावंद्य!

एक इच्छा पुरवावी, आपण आजचं भोजन आमच्यासोबत घ्यावं.इथून गेल्यावर,राजकारणात गुंतले की, आमची आठवण ही विसरुन जाल. क्षणाचाही विचार न करतां बाजीराव म्हणाले  जरुर! आज  तुझ्या ताटातील घास खाऊ. पण आपण ब्राम्हण! माझेसाठी धर्म सोडू नये. जिथं राऊ तिथं मस्तानी! जिथं मस्तानी ति राऊ!

              बरीच रात्र झाली तरी झोप येत नव्हती म्हणून राधाबाईंनी व्यंकटेशस्तोस्रही म्हणून झाले पण डोक्यातील वादळ कांही कमी झालं नाही.त्यांनी खिडकीतून बाहेर नजर टाकली तर कचेरीत उजेड दिसल्यामुळे दासीला चौकशी करायला सांगीतल्यावर, अप्पास्वामी असल्याचे कळल्यावर, आम्ही याद केली म्हणून सांगून ये. थोड्याच वेळात जाग्रणाने लाल झालेले डोळे, चुरगळलेला अंगातील मखमलीचा अंगरखा,जरीकाठी धोतराला पडलेल्या चुण्या अशा अवतारात आप्पा राधाबाईच्या दालनात येऊन म्हणाले, माते एवढ्या रात्री कशासाठी आठवण काढली? हाच प्रश्न तुम्हास विचारला तर?  फडावरच राजकारण फार गुंतागुंतीचं झाल ते सोडवत बसावं लागते. तसचं आमच्या खाजगीचं झालं. खाजगीत? कशाचं राजकारण? आणि गुंता होण्याचं कारणच काय? झालं खरं! काय झालं हे मातोश्रींनी सांगीतल्यावर आमच्या परीने गुंता सोडवण्पाचा प्रयत्न करु. अप्पा! बाब खूप नाजूक आहे. कदाचित तुमच्याकडून ऊलगडेलसे वाटल्याने इतक्या रात्री तुम्हाला बोलावलय!

            आप्पांच्या कांही लक्षात आले नाही. खाजगीत असं काय घडलं की, मातोश्रींनी रात्री बोलवावं? आसपास पाहत हलक्या आवाजात राधाबाई म्हणाल्या, राऊंच्या वर्तनाबद्दल बोलत आहे. एकदम प्रकाश पडला. अप्पांना अनेक गोष्टी आठवल्या ज्या कुणासमोर बोलता येत नव्हत्या. अनेक समजलेल्या गोष्टी त्यांच्या ओठी गर्दी करुं लागल्या पण  ओठ घट्ट मिटून घेतले. थोडं थांबून म्हणाले, मातोश्री आम्ही राऊंशी सुचकतेने बोललो होतो पण उपयोग झाला नाही.

            राधाबाई म्हणाल्या, आज कुलोपाध्याय कृष्णभट कर्वेनी जे सांगीतले ते ऐकून आम्ही थक्क झालो. कोथरुडमधे मस्तानीकडे राऊंचे जाणेयेणे फार वाढले असून तिथे ते भोजनही घेतात. जे खाऊ पिऊ नये असे अभ्यक्ष खातात. होय आमच्याही कानावर आलं आहे. मग तुम्ही काय योजलं आहे?

मातोश्री, आम्ही काय करुं शकतो? राऊ आमचे वडील बंधु, तीर्थरुपाठीकाणी. सुचकतेने बोलायचे ते बोललो एकदा. अप्पा  राऊ तुमचे फक्त वडीलबंधूच असते तर चिंता नव्हती. पण ते मराठी दौलतीचे पेशवेही आहेत.कलावंतीणी कुणीही ठेवतात पण आहारी जाउन आपला ब्राम्हण धर्म कुणी सोडतो का?

तुम्हालाच याबाबतीत बंदोबंस्त करावा लागेल.

       आप्पा दीर्घ श्वास टाकून म्हणाले, ते स्वार्‍या शिकारीवर असतांना असं वर्तन होत असल्याचं आम्हु ऐकून होतो पण राऊ  पुण्यात असं काही करतील असं वाटलं नव्हतं.

                   क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
           दि. १९-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                        भाग – १२.

               राधाबाई म्हणाल्या अप्पा, राऊ पेशवेपदावर आहे. पुण्यात खट्ट वाजलं तर सातार्‍यात क्षणात समजते. आपल्या पेशव्याचं वर्तन बेबंद होत आहे हे समजलं तर छत्रपती काय करतील याचा विचार राऊने करायला हवा. आज कृषाणंभट बोललेत,उद्या पुण्यातील इतर ब्राम्हण बोलतील. अगोदरच दाभ्याड्याला मारल्यामुळे व श्रावण मासाचा देकार बंद

 झाल्यामुळे  खवळले आहेत. माकडाच्या हाती आयतेच कोलीत मिळेल म्हणून राऊंनी जपून असावं.

              आप्पा म्हणाले, एक मार्ग सुचतो, याबाबतीत वहिनी साहेबांची मदत घेतली तर आपल्यापेक्षा त्यांच्या शब्दाचे वजन राऊवर पडेल. पण तुम्ही त्यांना राऊबरोबर मोहिमेवर जाण्यास मनाई केली असे ऐकले. होय, कारण एवढ्या दूरचा प्रवास त्यांच्या ह्या अशा अवघडलेल्या परिस्थीतीत योग्य होणार नाही पण राऊकरितां त्यांना जाऊ द्यावं, त्याच आवर घालू शकतील ठीक आहे. जाऊ द्या सुनबाईंना राऊबरोबर. चिरंजीवासमोर मनातील दुःख बोलल्याने राधाबाईचे मन हलके झाले.

             निजामअलीने खानदेश,  विजापूर, औरंगाबाद सुभ्यातून खंडणी वसूलीच्या सनदा दिल्या होत्या पण तो त्याचे पालन करत नसल्यामुळे त्याच्याविरुध्द शस्र हाती घ्यावे लागेल हे जाणून व खलित्यांचे मार्ग संपल्यावर, निजामाचा खानदेश वर अचानक लुटून या एकाच सुभ्यातून तीन सुभ्यांची वसूली करण्यासाठी मोहिमेची आखणी आप्पा व बाजीरावांनी केली.

आठ दिवसांनी मोहिमेवर निघण्याचा मुहूर्त ठरला.

                खानदेश मोहिमेसाठी आघाडीच्या फौजा रवाना झाल्या. नर्मदा स्नानासाठी काशीबाईंचे मेणेही रवाना झाले. दुसर्‍या दिवशी पहाटेच पेशवे पुण्याहुन मोहिमेसाठी बाहेर पडायचे ठरले.आज रात्री त्यांचा मुक्काम कोथरुडच्या बागेत करुन तिथून परस्पर मोहिमेवर निघायचे ठरले.

            मस्तानी त्यांची आतुरतेने वाट बघत होती. त्यांना पाहताच म्हणाली, राऊंचं इकडे येणे होते की नाही अशी धास्ती होती.लाजून दूर उभ्या असलेल्या मस्तानीला म्हणाले, ये इथे बैस आमच्याजवळ. अदबीने गुडघे टेकून राऊंसमोर बसली.

परवा तुझ्याबरोबर दोन घास खाल्ले त्याचा हवेलीत मोठा गवगवा झाला.

        राऊ तुमच्या या स्वभावाची आम्हाला भीती वाटते. आपण उतावळेपणे कांही कराल, परीणाम मात्र भोगावे लागतील मला. आपण भोजन केल्याच्या दुसर्‍याच दिवशी आप्पास्वामींचा राऊत जामदाराला तंबी देऊन गेला. कलावंतीणीने आपल्या पायरीने रहावे नाही तर तोंड फुटेल. त्यांना जे करायचे ते करु देत आम्ही आमच्या मर्जीला जसे वाटेल तसेच वागु. हवेलीत आवडत नसेल, वितंडवाद होत असेल तर कशाला? घटका दोन घटका राऊ इथे मन रमवायला आलेत तरी चालेल ना?

           मस्तानी, आमचा स्वभाव आहे, जसं रणांगणात आम्हाला कुणी आव्हान केलं तर, ते तलवारीच्या टोकावर पेलतो, तसच खाजगीत कुणी विणाकारण आमच्यावर अधिकार गाजवू म्हटले तर आम्ही सहन करणार नाही. बाजीरावांच्या मनाला या विषयाने व्यथा होत असल्याचे पाहून त्यांचे मन दुसरीकडे गुंतावे म्हणून विषय बदलून विचारले, मोहिमेवर बाईसाहेब येताहेत ना? होय, पुण्यकाल जवळ येत असल्याने त्यांना नर्मदा स्नान करायचे आहे. मग आमची काळजी मिटली. मोहिमेवर स्वतःचं माणूस बरोबर असलेल बर. राऊ, एक विनंती करायचीय,  बोल मस्तानी, एखादेवेळी कधीतरी आम्हाला आपल्याबरोबर मोहिमेवर  न्यावं, राऊंना कधी कंटाळा आला, थकला तर त्यांचे श्रमपरिहार करण्यासाठी गाणे बजावण्याने त्यांचे मन रिझवू शकेन. ठीक आहे, होईल तुझ्या मनाप्रमाणे.

        तुझ्यासाठी आम्ही एक बेत आखला आहे, पुण्यापासून दूर इथे बागेत मस्तानीने राहण्यापेक्षा हवेलीतच ठेवायचे ठरवले लोकांची पर्वा या बाजीरावाला नाही. चिरंजीवासाठी महाल तयार होत असतांनाच आमच्या मस्तानीसाठीही एक महल तयार होत आहे याची कल्पना सध्या तरी कुणाला नाही. महाल तयार झाल्यावर ही मस्तानी तिथे येईल,तेव्हा लोकं काय म्हणतील या नुसत्या कल्पनेनेच आमची आताच करमणुक होत आहे. मुद्दाम रान पेटवून त्यात उडी घेण्याची राऊंना हौसच आहे. बर ते जाऊ दे! आमच्या मनाचा दाह शांत होईल असं एखादे गाणं म्हणून दाखव,तेच मधूर सूर कानात साठवून आम्ही मोहिमेवर निघू. राऊ खुशीत बोलत होते पण मस्तानी? हवेलीत महाल तयार होत असल्याचे ऐकुन भविष्यातील संकटाची चाहूल तिला आतांच लागली होती. तिला वादळाची साथ मिळाली, त्या वादळाचे तडाखे वाट्याला आल्यावर सहन करण्याची तयारी ठेवायलाच हवी असे तिने मनाला बजावले. मनातील खळबळ दाबून तिने सारंगी उचलली. मधूर सुरांनी दालन भरुन गेले.

               भोजन झाल्यावर मस्तानी व्याकुळतेने कितीतरी वेळ बाजीरावांशी बोलत होती.कितीतरी आणाभाका देतघेत होते. राऊ तिचे सामाधान करीत होते. बाहेर पक्षांची किलबिल सुरु झाली तसे बाजीराव बाहेर पडले.

                     क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. १९-५-२२.

मस्तानी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading