आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

अपराजित योध्दा बाजीराव पेशवे भाग ५, (२१ ते २४)
छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन “सेनाकर्ते” किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – २१.
दिल्ली शाबूत राहील या कल्पनेने बादशाह थोडा गाफील झाला. खान दौरानचे रिकामे झालेले ‘मीरबक्ष ‘ पद त्याने निजामाला दिले.
निजामाला मीरबक्ष पद दिल्यामुळे सादतखान नाराज झाला. बादशहाला अद्दल घडवण्यासाठी त्याने नादीरशहाशी संधान साधले. त्याला जास्त खंडणीसाठी उद्युक्त केले. नादिरशहाने निजामला बोलवून वीस कोटी खंडणी व वीस घोड्यांची मागणी केली. इतके मिळाले तरच परत जातो, नाहीतर दिल्लीवर कब्जा करतो असा दम भरला. एवढी मोठी रक्कम आणि इतके घोडे देणे शक्यच नव्हते. वरचा मुलुख नादीरशहाने घेतलेला, खालच्या महसुलावर मराठ्यांचा हक्क, त्याने नादीरशहाला परोपरीने समजावले पण तो मान्य करीना. त्याने बादशहा, निजाम, कमरुद्दीन, सादतखानला कैद केले. या शाही कैद्यांना रस्त्याने मिरवित दिल्लीला आणले. दुसऱ्या दिवशी दिवाण-ए- खास मध्ये दरबारात मयूरासन सिंहासनावर आसनस्थ झाला.
सादतखानला त्याच्या बेईमानीचे फळ मिळाले. नादीरखानच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. नादीर खानच्या फौजेने दिल्लीची लूट चालवली. त्याने आपल्या सैन्याला सर्रास कत्तल व लुटीचा हुकूम दिला. दिल्लीची इंच नी इंच जागा रक्ताने माखली. स्त्रियांच्या विटंबनेला तर सीमाच नव्हती. शेकडो स्त्रियांनी आत्महत्या केली. कोणी विष खाल्ले, कोणी पेटवून घेतले. रस्ते प्रेतांनी भरले. शेवटी शेवटी तर रस्त्यातच मुडद्यांना पेटवत रस्ता मोकळा केला गेला. शेकडो मुडदे यमुनेत फेकले गेले.
हा भयंकर संहार पाहून, बादशहा, निजाम, कबरुद्दीने नादीरशहाचे पाय धरून कत्तल थांबवण्याची विनंती केली. कत्तल थांबली. पण लूट चालूच होती. तीन कोटी रोख, अगणित जडजवाहीर, मयुरासन, कोहिनूर हिरा, आणि बादशहाच्या जनानातल्या सुंदर स्त्रिया घेऊन मे महिन्यात नादीरशहा पंजाबकडे रवाना झाला. कमरुद्दीन खानाकडूनही एक कोटी रोख, जवाहर आणि हत्ती घेतले. शेकडो वर्षांच्या कारकीर्दीत मोगलांनी हिंदुस्तान मध्ये जमवलेली संपत्ती अशी तडकाफडकी लुटली गेली.
या सगळ्या घटनांची खडान् खडा माहिती बाजीरावांना त्यांचे वकील, हेर, आणि इतर अंमलदार पाठवीत होते. त्यामुळे ते सावध होते. बादशाही फस्त करून इराणी आल्यास काय करायचे? याचे डावपेच ते आखत होते. बाजीरावांची इंटेलिजन्स यंत्रणा कशी कार्यरत होती हे यावरून दिसून येते.
पेशव्यांचा वकील बाबुराव मल्हार बर्वे बादशहाच्या कर्नुलच्या छावणीत होता. त्याने पत्रातून आतापर्यंत झालेल्या लढाईपासून ते तहापर्यंतचा सविस्तर वृत्तांत कळविला. यावरून बाजीराव उत्तरेकडील खबरा किती जागरुकपणे ठेवत होते हे लक्षात येते. प्रसंग पडल्यास ते नादीरशहालाही अंगावर घेण्याची हिंमत ठेवत होते. आणखीही बातम्या येतच होत्या.
तिकडे सवाई जयसिंग नादीरशहाला मुबारक बादाची पत्र पाठवीत होता. आणि बाजीरावांनाही पत्रावर पत्र पाठवून उत्तरेकडे बोलावीत होता. एका पत्रात जयसिंग म्हणतो, आता राजपूत आणि स्वामी, बुंदेले एकत्र आल्यास काहीतरी निकाल लागेल.
निजाम, सादतखानने नादीरशहाशी संधान साधले. परिणामी तो दिल्लीत आला. बादशहाला पदच्युत केले. दिल्ली लुटून फस्त केली. राजपुतांना भीती वाटू लागली. आता त्याने राजपुतान्यात येऊन राजपुताना फस्त केल्यास खाली शिरणारच. आता बाजीरावच हिंदुस्तानला वाचवू शकतात. असे राजपुतांसह उत्तरेकडील लोकांस वाटू लागले.
परंतु बाजीराव ताबडतोब उत्तरेकडे जाऊ शकत नव्हते. त्यांची सगळी फौज साष्टीच्या मोहिमेत गुंतली होती. वसई वेढा निकरावर आला होता. पोर्तुगीजांवरील मोहिमेतील मोठी फौज काढून घेऊ शकत नव्हते. त्यांची घाईने जाण्याची कितीही इच्छा असली तरी, त्यांना सध्या शक्य नव्हते.
दुसरे कारण होते, नादीरशहा दिल्लीत असेपर्यंत त्याला मागचा सगळा मुलुख मोकळा होता. सरहद्द जवळ होती. माघारी जायला सोयीस्कर अंतर होते. तो जितका दक्षिणेत येईल तेवढी त्याची लाईन ऑफ कम्युनिकेशन वाढली असती. तो जितका लांब तेवढे बाजीरावांना अनुकूल होते. नादीरशहाला उपाशी मारणे, त्याच्या तोफा, बंदूका पासून अलग पाडून मार देणे बाजीरावांना शक्य झाले असते.
नादिरशहा अजमेरला पीराचे दर्शन घेऊन दक्षिणेस येण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली. पण पक्की खात्री झाल्यावरच, वसईच्या मोहिमेतून जेवढी शक्य होईल तेवढी फौज घेऊन बाजीराव निघाले. आणि २२ मे ला बऱ्हाणपूर गाठले. तिथे त्यांना उत्तरेकडचे जासूद भेटले. नादीरशहा निघून गेल्याची बातमी कळली.
एक मे ला नादीरशहा दिल्लीहून इराणला रवाना झाला. अजमेरला जाण्याचा बेत त्याने रद्द केला होता. त्याला बाजीरावांच्या हालचालीच्या बातम्या कळल्या होत्या का? की त्याला कळले असेल का की, बाजीराव म्हणजे दिल्लीचा बादशहा नव्हे. त्यांचे सरदार शिंदे- होळकर म्हणजे सादतखान, निजाम नव्हे. वेळोवेळी बाजीरावांकडून मार खाणाऱ्या निजामाने बाजीराव संबंधी नादीरशहाला सावध केले असेल का?
क्रमशः
संकलन ; लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – २२.
नादिरशहा आणखी काही काळ हिंदुस्थानात राहिला असता तर, बाजीराव त्याच्यावर नक्कीच चालून गेले असते. कारण त्यांना परिस्थिती अनुकूल झाली होती. १३ मे ला चिमाजी आप्पांनी वसई जिंकली. त्यामुळे मोकळी झालेली मोठी फौज आणि बाजीरावांच्या तालमीत तरबेज झालेले सरदार बाजीरावांबरोबर जाऊ शकले असते.
पण दिल्लीला बाजीराव धडकण्या आधीच नादीरशहा प्रचंड संपत्ती घेऊन गेला. बाजीरावांना स्वस्थता मिळू नये असेच जणू नियतीने ठरवले होते. भोपाळच्या लढाईत मार खाल्ला तरी निजामाची कुरापती काढण्याची सवय गेली नाही. दिल्लीत नादीरशहा भोवती तो रुंजी घालत असला तरी, मराठे वसईच्या मोहिमेत गुंतले असल्याचे पाहून, त्याचा मुलगा नासिरगंजने वचनभंगाचा बापाचा वारसा पुढे चालूच ठेवला. भोपाळच्या लढाईत निजामाचा पराभव झालेल्या तहात निजामाने हंडीया व खरगोन प्रांताची जहागिरी बाजीरावांना देण्याचे कबूल केले होते. पण दिल्लीला जाताच त्याने त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
बाप दिल्लीला गेल्यावर नासिरजंगने वचन पाळण्यात साफ नकार दिला. म्हणून त्याचेवर आक्रमण करणे बाजीरावांना भाग पडले. १२ डिसेंबरला नासीरजंगवर ते चालून गेले. गोदावरी किनारी दोन्ही फौजा भिडल्या. दोन महिने युद्ध चालू होते. नासिरजंगला औरंगाबाद पर्यंत बाजीरावांनी झोडपत नेले. शेवटी तो शरण आला. बापाने दिलेल्या वचनानुसार हंडिया व खरगोन प्रांत बाजीरावांना दिला. २७फेब्रुवारी १७४० रोजी मुंगी पैठणला मराठ्यांशी तह केला. नंतर बाजीराव नव्या प्रांताचा ताबा घेण्यासाठी उत्तरेकडे निघून गेले.
प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकारांचे शब्द आहे….’पेशव्यांच्या मालिकेत बाजीराव बल्लाळ पेशवा याला साहस आणि लोकोत्तरपणाचा अस्सलपणा या बाबतीत तुलनाच नाही. ते खरोखरच एक ‘कार्व्हालियन हिरो मॅन ऑफ ॲक्शन होते. ‘ हे शब्द त्यांनी डॉक्टर वि.गो. दिघे यांच्या ‘बाजीराव पेशवा अँड मराठा एक्सपायन्शन ‘ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहेत.
डॉक्टर वि.गो दिघे आपल्या प्रबंधात लिहितात… बाजीरावांच्या सुरुवातीपासून त्यांच्यात जी चैतन्य आणि ऊर्जा दिसली ती त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या दीड वर्षात हरवलेली दिसते. त्यांच्या हालचालींना शैथिल्य आले होते. त्याचे कारण मस्तानी!मस्तानीवरील प्रेमामुळे त्यांच्या आयुष्यात पेचप्रसंग निर्माण झाला. ते जवळजवळ कुटुंबापासून तुटल्यासारखेच झाले होते.. मस्तानीच्या सहवासात त्यांनी खाण्यापिण्या विषयीच्या निर्बंधाचे उल्लंघन केले. त्यामुळे घरात आणि पुण्यातील कर्मठ ब्राह्मण समाजात मोठे वादळ उठले. त्यांना तिच्यापासून दूर करण्यासाठी राजेंना गळ घातली. गंगाजळाची, आणाभाकांची देवघेव झाली. शेवटचा उपाय म्हणून मस्तानीला बाजीरावांपासून जबरदस्तीने अलग करून कैदेत कडक बंदोबस्तात ठेवले.
या घरातल्या कलहापासून सुटका होण्यासाठी त्यांनी मोहिमांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. १७३९ नोव्हेंबरमधे त्यांनी पुणे सोडले. आणि निजामाच्या मुलुखाकडे कूच केले. हिंदुस्थानात जाण्याचा मार्ग निजामाच्या मुलुखातून होता. तो सुरक्षित करण्यासाठी त्यांनी तो प्रदेश निजामाच्या स्थानिक प्रतिनिधीकडे जहागीर म्हणून मागितला. प्रतिनिधीने मागणी फेटून लावली. चकमकी सुरू झाल्या. नासिरजंग औरंगाबादेत वेढला गेला. मराठ्यांचे घोडदळ पाठोपाठ होतेच. शेवटी तडजोड झाली. आणि अखेरीस नासिरजंगने पेशव्यांनी मागितलेला नेमाडचा प्रदेश दिला. पेशवे बऱ्हाणपूरकडे रवाना झाले.
बाजीरावांना मस्तानीची काहीच खबर मिळत नव्हती. तिच्या अटकेच्या बातमीने ते सैरभैर झाले. हतबल झाले. घरातील लोकांशी ते युद्ध करू शकत नव्हते. शनिवार वाडा त्यांच्याविरुद्ध बंड करून उठला. पुण्यातील कर्मठांचा त्यांच्यावर दबाव आला. मस्तानी प्रकरण हाताबाहेर गेले. बाजीरावांना समजून घ्यायचा प्रयत्न कोणीच केला नव्हता.
बाजीराव रावळखेडी येथे तळ टाकून असताना त्यांना २३ एप्रिलला ताप आला. अंगाची तलखी होत असल्यामुळे ते नदीत बराच वेळ पोहले. ताप वाढला. २८ एप्रिल १७४० ला त्यांचे निधन झाले. शाहूराजे, त्यांचे कुटुंब, रयत सर्वांना अतिशय दुःख झाले.
सर रिचर्ड टेम्पल म्हणतात…’ पेशवे जसा आपल्या माणसांमध्ये तंबूच्या कनातीखाली जगला तसाच मरण पावला. ‘ आजतागायत ते मराठ्यांमध्ये लढवय्या पेशवा, हिंदू चैतन्याचा अवतार म्हणून स्मरले जातात.
त्यांच्या कर्तृत्वाचे विश्लेषण असे करता येईल की, ‘दक्षिणेत पूर्ण वर्चस्व, उत्तरेत राजकीय वर्चस्व !’
छ. शिवाजींनी जसे निष्ठावान मावळ्यांना हाताशी धरून स्वतंत्र स्वराज्य निर्माण केले, त्यांच्या स्वराज्याला मोगलांनी आव्हान दिले. त्यांचा प्रदेश व्यापला. मराठ्यांचा राजा संभाजीराजेंचा शिरच्छेद केला. पण मराठ्यांनी अभूतपूर्व संघर्ष करून स्वातंत्र्य परत मिळवले. मोगलांचा दख्खनमधील प्रतिनिधी शक्तिशाली निजामाचा बाजीरावांनी पराभव करून त्याला मान्य करायला लावले की, जोवर पेशव्यांच्या हाती सूत्रे आहेत तोवर फूट पाडून किंवा शस्त्रबलाने मराठ्यांची सत्ता कमकुवत करता येणार नाही.
क्रमशः
संकलन ; लेखन व ©®
मिनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – २३.
बाजीरावांच्या योग्य धोरणाने निजामाने मराठ्यांना त्याच्या प्रदेशामध्ये चौथाई, सरदेशमुखीचे हक्क देऊन स्वतः दुय्यमपणा स्वीकारला. परकीय सत्तेच्या ताब्यात असलेले महाराष्ट्राचे सागरी किल्ले पण बाजीरावांनी परत मिळवले. सिद्दीची नेहमी कुरापत काढण्याची सवय कायमची पंगू करून त्याला हाकलण्यात आले. उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्ता नष्ट करण्यात आली. त्यांचा प्रांत स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला. दाभाडे आणि इतर सरदारांनी परकीयांशी संगनमत करून फुटून निघण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना चांगला धडा शिकवला. आपल्या लोकांना दक्षिणेत मुख्य स्थान मिळवून देत बाजीरावांनी आपली मातृभूमी परकीय आक्रमणापासून सुरक्षित केली.
बाजीराव पेशव्यांच्या या कर्तृत्वानेच देशाच्या इतिहासात अढळपद मिळून दिले आहे. त्यांचे धोरण देशाच्या सुरक्षेसाठी तर होतेच . आणि त्यांचा उद्देश तर नर्मदे पलीकडे देखील वर्चस्व स्थापायचा होता. त्यांना कल्पनाशक्तीचे अद्भुत वरदान प्राप्त होते. त्यांच्या लक्षात आले की, मोगलांचे साम्राज्य ढासळायला आले आहे. ते हस्तगत करण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारात परस्परांमध्ये चालू असलेल्या मत्सराचा व द्वेषाचा हुशारीने उपयोग करून गिरधर बहादूर आणि मोहम्मदखान यांच्यावर विजय मिळवून माळवा व बुंदेलखंडावर आपली पकड बसवली. त्यांनी भोपाळला निजामावर मिळवलेल्या विजयाचे त्यांचे उत्तरेकडील श्रेय शाहू महाराजांच्या सरदारांनी हिरावून घेण्याचा केलेला प्रयत्न बाजीरावांनी हाणून पाडला.
बाजीरावांच्या यशाचे श्रेय कशात होते? वीस वर्षे दणदणीत मिळवलेले विजय कशाने लाभले? याचे उत्तर त्यांचे व्यक्तिमत्व आणि विलक्षण सेनापत्य! राज्यासाठी सामर्थ्याचा अभेद्य बुरुज बनवण्यासाठी लागणारे सारे गुण त्यांच्यात होते. व्यक्तिमत्व, चिकाटी, ऊर्जा, उच्च उद्दिष्ट, युद्धासाठी निसर्गाचा वापर करण्याची कला, अपार श्रद्धा, हिम्मत तसेच राजकीय परिस्थितीचे अचूक ज्ञान, अवलोकन.
त्यांचा घरापेक्षा जास्त काळ छावणीतच गेला. ते सदैव मोहिमेवरच असत. सतत कूच करत होते. लढत होते. सामान्य शिपायांसारखे अन्न खात होते. सैन्याच्या सुख दुःखाचे सहयोगी होते. त्यामुळे ते सैन्याचे लाडके होते. त्यांच्यामुळे सैनिकांना स्फूर्ती मिळत असे. बाजीराव आपला मुद्दा शस्त्रबळाऐवजी संवादाने पटवण्याचा प्रयत्न करीत असत. ते जसे गुणग्राहक होते, तसेच शिस्त आणि कामाच्या बाबतीत तेवढेच कडक होते. त्यांना भ्याडपणा व कामचुकारपणाचा अतिशय तिटकारा होता. असे कोणात दिसले तर त्याला कठोर शासन करीत असत.
ते शौर्यासाठी फक्त सरदारांनाच नाही तर, साध्या शिपायाला देखील बक्षीस आणि बढती देत असत. एकदा शाहूराजांनी पेशव्यांच्या पायदळाच्या कार्यक्षमतेबद्दल संशय व्यक्त केला तेव्हा, फत्तेसिंग भोसले जे त्यांचे विरोधक होते, त्यांनी ताडकन उत्तर दिले,
” पेशवे आपल्या पायदळाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. ते आपले सैन्य दक्ष आणि आणीबाणी साठी सुसज्ज ठेवतात.”
त्यांना गुणवत्ता ओळखण्याची चांगली जाण होती. बढत्या देताना जात, पंथ, धर्म, वर्ग याची कधीच अडकाठी येत नव्हती.
त्यांच्या वडिलांच्या सैन्यात साधे शिपाई असलेले होळकर- शिंदेंना त्यांनी आपले निष्ठावान सरदार बनवले. गोविंद खेडकर त्यांच्या वडिलांचा खाजगी नोकर होता. त्यालाही सरदार बनवले. बाजीरावांचा आपल्या सरदारांवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या नेतृत्वाखाली कित्येक सरदार उदयास आले. बाजीराव जेवढे लढवय्या म्हणून महान होते, त्याहीपेक्षा महान सेनानी होते. सर यदुनाथ सरकार त्यांना । हेवन बाॅर्न कव्हल् रि लीडर ” घोडदळाचा स्वर्गात जन्मलेला नेता म्हणतात. घोडदळाच्या मोठ्या फौजेचे आश्चर्यकारक वेगाने हालचाली ते कौशल्याने करीत असत. याच कौशल्याने त्यांनी १७२८ साली निजामाला गुडघे टेकायला लावून मुंगी- शेवगावच्या तहावर सही करण्यास भाग पाडले. १७२९ मध्ये विजेसारख्या वेगानेच जैतपूर येथे बंगशला चकवले. ते शत्रूच्या स्थितीची पूर्ण माहिती घेऊनच शत्रूची कमजोरी हेरून आघात करीत असत.
ते शत्रूची बारीक सारीक माहिती मिळवीत. मग वहिवाटीत नसलेल्या आडवाटेने जाऊन शत्रूसमोर प्रकट होत. त्यामुळे शत्रूमध्ये गोंधळ उडत असे. पालखेडचे युद्ध आणि दिल्लीवरील धडक हे त्याचे भक्कम पुरावे आहेत. पालखेड येथे उलट सुलट मजला मारून शत्रूला आधी दमवले आणि त्याला अवघड जागी गाठून त्याचे पाणी तोडले. १७३७ मध्ये त्यांनी गोहदपासून काही अंतरापर्यंत माघार घेतली. आणि लांबचा वळसा घेऊन दिल्लीवर चाल केली. त्यांच्या हालचाली इतक्या गुप्त असत की, दिल्लीच्या संरक्षकांच्या लक्षातच आले नाही की पेशव्यांनी आपल्याला गुंगारा कधी दिला?
शत्रूने आपला तळ कुठे टाकावा हे बाजीराव ठरवत असत. ते अशी परिस्थिती निर्माण करीत, की, निबिड अरण्यात, सूर्यास्ताच्या आसपास आणून शत्रूला मुक्काम करण्यास भाग पाडत असत. कधी विहिरीत मिठाच्या गोण्या टाकून पाणी तोडत, तर कधी डोंगराच्या पायथ्याशी शत्रूसाठी मुक्कामाची जागा निर्माण करून डोंगरावरून दगडे सोडून शत्रूला घायाळ करीत. बाजीरावांच्या फौजेचे सामान अगदी हलके असल्याने, त्यांना वेगाने मजला मारणे शक्य होत असे. ते शत्रूला प्रत्यक्ष न भिडता शत्रूला त्याच्या निवासापासून बाहेर खेचत असत. त्याची रसद तोडून शरण येण्यास भाग पाडीत. याच पद्धतीने पालखेड व भोपाळला निजामाचा पराभव केला होता.
क्रमशः
संकलन ; लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
अंतिम भाग – २४.
कितीही बिकट परिस्थिती आली तरी बाजीराव डगमत नसत. त्यांची तीव्र बुद्धी, सुपीक डोके आणीबाणीच्या प्रसंगांचा सामना करण्यास समर्थ होते. १७३७ साली त्यांनी दुवाबात पाठवलेल्या एका मोठ्या पथकाचा धुव्वा उडाला होता. ते पथक अत्यंत विस्कळीत होऊन परत येत असताना, तीन मोठ्या शत्रूंच्या फौजा त्यांचा आग्र्याकडचा मार्ग रोखून बसल्या होत्या. बाजीरावांच्या जागी दुसरा कोणी असता तर झटकन माघार घेतली असती. पण बाजीरावांनी सरस डावपेच, चपळाईच्या जोरावर शत्रूला चक्रावून टाकले.
वागण्यात ते अतिशय अदबशीर होते. युद्ध प्रसंगी आणि शत्रूशी देखील ते सद्गृहस्थासारखेच वागत असत. भोपाळच्या लढाईत निजामाचा पार पराभव झाला व वाटाघाटी सुरू केल्या, तेव्हा निजामाने पेशव्यांकडे थोडे मागे जाण्याची विनंती केली होती. त्याच्या वयाचा मान राखून पेशव्यांनी त्याची विनंती मान्य केली.
एवढे सर्व कर्तृत्व असूनही बाजीरावांना आपल्या रयतेसाठी हितकारक गोष्टी, राजकीय व्यवस्थेला आकार देण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न करता आला नाही. कारण त्यांना पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यांची वीस वर्षाची कारकीर्द अधिकतर रणांगणावरच गेली. शिवाय ते शाहूराजांचे पंतप्रधान होते. राजा नव्हते. पुरेसे स्वातंत्र्य हाती नव्हते. छ. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यातील सरंजामशाही प्रवृत्तीने डोके वर काढले होते. बाजीरावांच्या अधिकारावर बंधने होती. शाहूराजांची सार्वभौमता त्यांना लागू होती. तरीसुद्धा ते स्वतः एक सर्वात मोठे सरंजामदार बनले. स्वतःच्या निष्ठावान फौजा उभारल्या. त्यांनी माळवा, गुजरात, कोकणवर विजय मिळवून शाहूराजांचा अधिकार बळकट केला. वास्तविक शाहूराजांना आपल्या प्रतिनिधीमार्फत मराठा सत्तेचा विस्तार करायचा होता, तो पेशव्यांनी केला.
मराठी, इंग्रजीत इतिहासकारांनी बाजीरावांबद्दल लिहिताना त्यांच्या पराक्रमापेक्षा प्रेम प्रकरणालाच अधिक महत्त्व दिलेले आढळते. बाजीरावांनी इतका मोठा पराक्रम गाजवला. भल्याभल्यांना गुडघे टेकायला लावले. या सगळ्या मराठेशाहीला बळकटी आणल्यावरही दीर्घकाळ अस्तित्वात राहण्यास कितपत उपयोग झाला याबद्दल बाजीरावांचे कर्तृत्त्व बघूया….
शाहूराजे हे मराठा राज्याचे Titular head होते तर, बाजीराव पेशवे हे एक्झिक्युटिव्ह हेड होते. ते सर्वाधिकारी नसले तरी, ते शाहूराजांचे सर्वच ऐकत होते असे नाही. बऱ्याच वेळा ते आपल्या मनासारखे करीत. तसेही राज्यविस्ताराकरिता काही विधायक गोष्टी करण्याची जबाबदारी त्यांची होती.
बाजीराव पेशवे झाले त्यावेळची परिस्थिती आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. शिवरायांनी स्वराज्य निर्मिती शून्यातून निर्माण केली होती. बाजीरावांच्या वेळी राज्य होते. युध्दनेतृत्वाच्या बाबतीत विचार केला तर, बाजीरावांनी गनिमी काव्याचा विकास केलेला आढळतो. त्यांनी गनिमी काव्याची मूलतत्त्वे बाजूला सारली नाहीत, पण अवलंबन मात्र मोठ्या सैन्याच्या सहाय्याने पठारांवर केले. लांब लांब मजला मारून छापे घालून शत्रूचा शक्तिपात घडवणे, शत्रूला बलस्थानापासून अलग करून आपल्या सोयीनुसार युध्दक्षेत्रात ( रेंजमध्ये ) आणणे, प्रत्यक्ष न भिडता उपासमार करून, गुडघे टेकायला लावणे, शरण यायला लावणे अशा तऱ्हेने त्यांनी गनिमी काव्याचा विकास केला. या गनिमी काव्याची पालखेड व भोपाळ उत्तम उदाहरणे आहेत. पालखेड लढाईच्या आधी बाजीरावांनी निजामला आपल्या मागे धावायला लावून इतकी दमछाक केली की, तो लढाई आधीच टेकीस आला होता. नंतर त्याला गोदावरीकाठी तोफखान्यापासून आणि अडचणीच्या ठिकाणी खेचले. तिथे त्याची रसद तोडून अन्नान्नदशा करून इतके जेरीस आणले की, अखेर इतिहासातील प्रसिद्ध असा मुंगी- शेवगावचा तह झाला. भोपाळच्या बाबतीतही असेच केले. अशा तऱ्हेने बाजीरावांचे युद्ध नेतृत्वातील नैपुण्य, विजय दिसतो. पण मुत्सद्देगिरीत बाजीराव काही वेळा कमी पडलेले दिसतात. अनेकदा तह करून शत्रूला मोकळे सोडले. शिवाजी महाराज, संभाजीराजे सिद्दीकडून जंजिरा जिंकू शकले नाही, तो बाजीरावांनी जिंकला. पण तहात पुन्हा सिद्दीकडे दिला. पोर्तुगीजांनाही तहावर सोडले. त्यांची सेनापती म्हणून जशी ख्याती झाली तशी मुत्सद्देगिरीत झाली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची उणीव मराठेशाहीला चांगलीच जाणवली.
बाजीरावांच्या वीस वर्षाच्या कारकीर्दीत त्यांच्या सरदारांनी राज्याचा पसारा इतका झपाट्याने वाढवला की, बाजीरावांच्या मृत्यूनंतर राज्यशकटाचा डोलारा सांभाळणे कठीण गेले. शाहू राजांच्या राज्य विस्तारासाठी त्यांनी मोठमोठे कर्ज काढली. ती फेडण्यासाठी युद्ध करणे, पुन्हा विस्तारासाठी युद्ध, पुन्हा कर्ज.
पुढच्या सत्ताधाऱ्यांमध्ये त्यांच्या एवढा पाठपुरावा व पराक्रम नसल्यामुळे कर्ज फिटणार कसे? बारामतीकरांचे कर्ज प्रकरण हाताबाहेर गेले होते. बाजीरावांवर सावकारांचा जो विश्वास होता, तो नंतर इतरावर नव्हता. परिणामी मराठ्यांची पत कोसळली. तिजोरी रिती झाली.
बाजीरावांना घरात देखील मस्तानी प्रकरणाचा नको इतका त्रास सोसावा लागला. त्यांचा अचानक मृत्यू हा मनस्तापातून उद्भवलेल्या मानसिक अवस्थेत झाला. त्यांच्या सख्या भावाने चिमाजी आप्पांनी मस्तानीला अटक केल्याचे दुःख त्यांच्या मनाला फार लागले. हे प्रकरण बाजीरावांनी आणि त्यांच्या घरच्यांनी समंजसपणे घेतले असते तर, त्यांचा पराक्रम आणखी गाजला असता आणि जगलेही असते.
बाजीराव हे अजिंक्य योद्धा होते. जगात बोटावर मोजण्याइतके कधीही युद्ध न हरणारे सेनानी होते, त्यात बाजीरावांचे नाव गणले जाते ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.
पुण्यातील शनिवार वाडा बांधला तो बाजीरावांनीच !! त्यांनी साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला पण मिळवून दिले. आणि हे सर्वांच्याच पथ्यावर पडलेले दिसून येते. कारण त्यानंतर स्वराज्यावर आक्रमण करू पाहणारे गनिम स्वराज्याला टरकूनच राहू लागले होते.
अशा या दुर्दैवी बाजीरावांचे निधन २८ एप्रिल १७४० मध्ये झाले. मराठेशाहीची स्थापना शिवरायांनी केली तर, बाजीरावांनी ती दूरवर पसरवली.
अशा या महान योध्यास कोटी कोटी प्रणाम!
!!! समाप्त !!!
संकलन लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४ – ३ – २०२४.





