अपराजित योध्दा बाजीराव पेशवे भाग ४, (१६ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन  “सेनाकर्ते”  किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!! 

                 भाग – १६ .

                पण प्रतिनिधी अंजनवेल घेण्यास टंगळमंगळ करू लागले. बंकाजी हताश होऊन हरणे- स्वर्णदुर्गाकडे निघून गेले.

          प्रतिनिधीने  मुत्सद्दीगिरीने बाजीरावावर मात करण्यासाठी सिद्दीसट्टला फोडण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. उलट सिद्दीसट्ट म्हणाला,” तुम्ही आपले सैन्य परत नेले तर, गोवळकोट सोडतो. “

      प्रतिनिधीने अट मानली नाही. विशाळगडावरून कुमक मागवली. पुन्हा बेटावर हल्ले सुरू झाले. यात इतका वेळ गेला की सिद्दीसट्टला लढाईची पूर्ण तयारी करण्यास अवधी मिळाला. जुलैला सुरू झालेली ही लढाई अडीच महिने चालली. त्यातच सिद्दीला इंग्रज, पोर्तुगीजांची मदत मिळाल्याने त्याचे बळ आणखी वाढले. यात मनुष्यहानी फार होऊ लागली. प्रतिनिधीने पुन्हा शाहूराजांकडे कुमक मागवली. स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नात शत्रूला लढाईच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळवून देणारे प्रतिनिधी नसते तर हे युद्ध बाजीरावांनी काही महिन्यातच तडीस नेले असते यात शंका नाही. शत्रूस संभ्रमात ठेवून अचानक बाजी मारणे प्रतिनिधीना साध्य झालेच नाही. वाटाघाटीचा घोळ घालून त्यांना पदरात काहीही पाडून घेता आले नव्हते.

       यावेळी बाजीराव जंजिरापाशी होते. ते हताशपणे प्रतिनिधीची अधोगती पाहत होते. प्रतिनिधीकडून मोहिमेची  सूत्रेही ते स्वतःकडे घेऊ शकत नव्हते. शेवटी सिद्दीच्या माऱ्यापुढे टिकाव लागत नाहीसे पाहून, प्रतिनिधीने वेढा उठवला. मोहिमेतून पळ काढला. व साताऱ्याकडे निघून गेले. मोहिमेचे प्रमुख म्हणून मानहानी, अपयश बाजीरावांच्या वाट्याला आले.

         ऑगस्टमध्ये सरखेल सखोजी आजाराने मरण पावला. त्याचा भाऊ संभाजी आंग्रेला शाहूराजांच्या पक्षात येण्यास सुचविले गेले.  पण त्याने ते मान्य केले नाही. बाजीरावांचा एक हात तुटल्यासारखाच झाला. प्रतिनिधी वेढा उठवून जाताच  सिद्दीसट्ट आपल्या फौजेसह सिद्दी याकूत खानाच्या मदतीला जंजिर्‍यास येण्यास निघाला.

              मोहीम चिघळली गेली. परिस्थिती शाहू महाराजांना कळविण्यात आली. सिद्दीशी तह करण्याचा सल्ला दिला गेला. त्याप्रमाणे इंग्रजांच्या मध्यस्थीने तह झाला….

               रायगड मराठ्यांकडेच  रहावा. आग्र्यांनी जिंकलेली चौल, थळ, रेवस ही ठाणी आंग्रेकडेच  राहतील. सिद्दीची ठाणे उंदेरी, अंजनवेल, जंजिरा, गोवळकोट सिद्दीकडे राहावी. असा विचित्र तह करावा लागला.

            प्रतिनिधीच्या हट्टी व मत्सरी वागण्यामुळे मोहीम फसली. तह झाल्यावरही सिद्दी गप्प बसला नाही. हताश झालेले बाजीराव ११ डिसेंबर १७३३ मध्ये साताऱ्यात येऊन दाखल झाले.

               थोडी विश्रांती घेऊन बाजीराव  गुजरात, माळव्याकडे निघाले. ते तिकडे जाताच  सिद्दीने पुन्हा डोके वर काढले. त्याने गमावलेली ठाणे पुन्हा घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सिद्दीसट्टने सिद्दी मसूदच्या मदतीने बाणकोट वर हल्ला केला. हा हल्ला इतका प्रखर होता की, आंग्रे पळून स्वर्णदुर्गात गेला. सिद्दीसट्ट रायगडकडे निघाल्याचे कळताच, शाहूराजे गडबडले. बाजीरावांनी इंग्रजांना पत्र पाठवून सिद्दीसट्टला लगाम घालण्या विषयी कळविले आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या बाजी  भिवराव सरदाराला १७३४ च्या जानेवारीत रामगडाकडे पाठवले. दुरावलेला खंदा वीर उदाजी पवार पुन्हा या स्वारीत सामील झाला. रायगडाच्या पायथ्याशी दोन्ही पक्षांची लढाई सुरू झाली. यात महत्त्वाचा सरदार सिद्दी अंबर ठार होताच, सिद्दीसट्टने पळ काढला. व अंजनवेल गाठले.

 फेब्रुवारी मराठ्यांनी रायगड घेतला. महाडवर कब्जा मिळवला. बाणकोट घेतला. त्यावर बाजी भिवरावची नेमणूक करण्यात आली.

          मार्चमध्ये सिद्दीसट्ट विरुद्ध दुसरी मोहीम हाती घेतली. त्याने इंग्रज, पोर्तुगीजांच्या सहाय्याने सगळे हल्ले परतवले. दुसरी मोहीम फसली. यावेळी बाजीराव उत्तरेकडे दौड करीत होते.

            पाच डिसेंबरला सिद्दीसट्टने बाजी भिवराव कडून बाणकोट घेतला. शाहू राजेंनी पिलाजी जाधवला रवाना केले. त्यांनी महाडमार्गे धाड घालून बाणकोट परत घेतला. यावेळी बाजीराव मेवाडच्या वाटेवर होते. एप्रिलमध्ये पिलाजी गोवळकोटकडे निघाले. पण महाराजांचे हुजुरातीचे सैन्य आल्याशिवाय ते गोवळकोटला भिडू शकत नव्हते. दरम्यान सिद्दीसट्टने रेवसवर हल्ला करून ते ठाणे सर केले.  हे ऐकताच चिमाजी अप्पा झपाट्याने अलिबागकडे निघाले. ते रेवसला येऊन पोहोचले .मोठी मातबर लढाई झाली. सिद्दीचे तेराशे तर मराठ्यांचे सातशे सैनिक पडले. या लढाई सिद्दीसट्ट व त्याचा सरदार सिद्दी याकूत दोघेही ठार झाले.

             शेवटी २५ नोव्हेंबर १७३६ ला तह झाला. तहानुसार सिद्दीच्या मुलखावर, सिद्दी, मराठे या दोघांचाही अंमल राहील. दोघांमध्ये महसूल वाटून घ्यावे. जंजिरा, मुरुड, नांदगाव, श्रीवर्धन, दिवे आगर , म्हसळे व अर्धा गोवळ यावर मराठ्यांची सत्ता चालेल. अर्धा गोवळ, अंजनवेल, उंदेरी, सिद्दीकडे राहील.

प्रतिनिधीने पहिल्या मोहिमेच्या विचका केला नसता आणि बाजीरावांच्या योजनेप्रमाणे मसलत चालली असती तर, चित्र वेगळे दिसले असते. पण इतिहासात जर तर ला महत्त्व नसते.

       बाजीरावांचे सारे लक्ष उत्तरेकडे एकवटले होते. त्यांना शाहू महाराजांचा आदेश, राजकीय गरज, दाभाडे सारख्या घरच्या शत्रूच्या आतताईपणा आणि देशहितासाठी दक्षिणेतीलही कामगिऱ्या कराव्या लागल्या. यामध्ये साष्टी वगळता, पूर्ण नेतृत्व बाजीरावांकडे नव्हते. तर उत्तरेकडील स्वाऱ्या सर्वस्वी बाजीरावांच्या अखत्यारित, नेतृत्वात आल्या. पण त्यांना सलग अखंडपणे भाग घेता आला नाही. मधून मधून दक्षिणेतील स्वाऱ्याही त्यांना कराव्या लागल्या.

          क्रमशः
संकलन ;  लेखन व ©®   मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

              भाग  – १७ .

            शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे बाजीरावांनी साम्राज्य केले. खरे म्हणजे त्यांनी स्वराज्याचाच विस्तार केला होता. त्यांच्या डोक्यातही साम्राज्य नव्हते. ते  प्रचंड उत्साही तरुण  होते. त्यांची निष्ठा सातारच्या गादीशी होती. काही प्रसंगी त्यांनी  छत्रपतींच्या आज्ञेचे उल्लंघन केले असेलही. पण छत्रपतींना बाजूला सारून स्वतः सत्ताधीश सम्राट बनण्याचे त्यांचे मनात चुकूनही कधी आले नाही. बाजीरावांनी केलेल्या स्वराज्य विस्ताराने ना दौलत ना पेशवे श्रीमंत झाले. बाजीराव लूटमार जरूर करीत होते. पण गरीब रयतेला उपसर्ग होत नव्हता. हा त्यांच्या स्वभावाचा आणि स्ट्रॅटेजी चा भाग असावा.

    शिवरायांनी स्थापिलेल्या दौलतीच्या सीमा बाजीरावांनी आपल्या कुशल नेतृत्वाने  उत्तर भारतात देखील अशा रीतीने विस्तारल्या होत्या. अत्यंत वेगवान हालचाली हा त्यांच्या युद्धनीतीचा प्रमुख भाग होता.

           उंदेरीच्या लढाईत सिद्दीचा पराभव झाल्यामुळे तो काही वेळ शांत बसला होता. दाभाडेचा शेवट झाला. वारणेच्या तहामुळे कोल्हापूरचे  संभाजीही  स्वस्थ झाले होते. अशा प्रकारे ही बाजू निर्वेध झाल्यामुळे बाजीराव उत्तरेकडे भरारी घेण्यास मोकळे झाले. त्यांच्याजवळ त्यांच्या युद्धतंत्रात तयार झालेल्या निष्ठावंत आणि जिगरबाज  सरदारांची फळी होती. छत्रसालचे दोन्ही पुत्र जीवावर उदार होऊन त्यांना साथ द्यायला सज्ज होते.

               राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पिलाजी जाधव बाजीराव पेक्षा जरी वडील असले तरी, ते सगळे मिळून बाजीरावांचेच  ” क्रिएशन ” होते. बुंदेल खंडातून गोविंदपंत बुंदेले बाजीरावांना मदत करण्यास तयार होते.

       डभोईच्या युद्धात विजय मिळवलेले मराठे पुन्हा गुजरात मावळ्यात परत येतील असे बादशहाला वाटल्यामुळे, त्याने बाजीराव परतीच्या वाटेवर असताना, त्यांच्या बंदोबस्तासाठी महम्मद बंगेशला पाठवले. मल्हाररावांनी उज्जैनला वेढा देण्याचा प्रयत्न केला.  पण कमी फौजेमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. ते भोपाळकडे निसटले. दरम्यान पिलाजी गायकवाड  यांनी गुजरात मधील खंबायत घेतले.

           पावसाळा संपल्यावर उदाजी पवार, राणोजी शिंदे आणि मल्हारराव  बंगेशवर चालून आले. त्याने वर्षभराची चौथाई देण्याचे कबूल करून आपला बचाव केला. बादशहाने त्याची उचलबांगडी करून मावळ्याचा  सुभेदार म्हणून सवाई जयसिंगला नेमले. मावळ्याच्या वसुलीतील ४५% पेशव्यांना व बाकीची रक्कम शिंदे, होळकर, पवार यांना देण्यात आली.

        २३ मार्च रोजी गुजरातचा सुभेदार अभयसिंगने विश्वासघात करून, पिलाजी गायकवाडला ठार केले. परिणामी पिलाजीचे भाऊ महादजी व मुलगा दमाजींनी अभयसिंगची अशी गत केली की, त्याने चौथाई, सरदेशमुखी देण्याचे कबूल करून तह केला. आणि कारभार रतनसिंग भंडारी वर सोपवून तो मारवाडात निघून गेला. दमाजी गायकवाडने रतनसिंगचा पराभव करून दक्षिण गुजरातवर कब्जा केला. शाहू महाराजांनी दमाजीला  “सेना सारखेल ” पदवी बहाल  केली. इथूनच बडोद्याच्या गादीचा प्रारंभ झाला.

          त्यावेळी बाजीराव जंजिराच्या मोहिमेत गुंतले होते. १७३२ च्या शेवटी बाजीरावांच्या सरदारांनी उत्तरेकडे चाल केली. चिमाजीअप्पा बुंदेलेकडे रवाना झाले. छत्रसालच्या मुलांनी, छत्रसालने बाजीरावांना कबूल केल्याप्रमाणे, चाळीस लाखाची जहागीर रितसर चिमाजी अप्पांच्या स्वाधीन केली. शिवाय गरज पडेल तेव्हा फौजेसह बाजीरावांच्या मदतीला हजर राहण्याचे आश्वासन दिले. या प्रदेशात मराठ्यांचा जम बसल्यामुळे यमुनेकडे झडप घालणे सोपे जाणार होते.

              मराठ्यांनी गुजरातमध्ये जम बसवून मावळ्याकडे चाल केली. सवाई जयसिंगने मार्च १७३३ ला तह केला. अशा प्रकारे दिल्लीच्या वाटेवरील सगळ्या टापू बाजीरावांच्या सरदारांनी मोकळा करून ठेवला होता. यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की, प्रचंड पराक्रम,  विद्वत्ता आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर भविष्याचा अचूक वेध घेऊन वेगवान हालचालींनी भावी अडथळे दूर करण्यात बाजीराव अग्रेसर ठरले आहेत. म्हणूनच ते आदर्श राष्ट्रपुरुष आहेत आपले!

          १७३३ च्या शेवटी जंजिराची मोहीम संपवून  बाजीराव पुण्यात आले. मग साताऱ्याला जाऊन छत्रपती राजांची भेट घेतली. त्यांच्या सल्लामसलतीने बाजीरावांनी दोन मोहिमा आखल्या. सिद्दी सट्टच्या परिपत्यासाठी बाजीरावांनी सरदार बाजी भीमराव, उदाची पवार आणि छत्रपतीची खास हुजुरातीची फौज रवाना केली. तर उत्तरेकडे पिराजी जाधव यांना पाठवले. घाबरून सवाई जयसिंग खंबाटास पळून गेला. मराठ्यांना पायबंद घालण्याचे काम बादशहाने कमरुद्दीनखान आणि खान दौरानवर सोपवले. पण मराठी गुजरातमार्गे माळव्यात शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडली.

१७३४ च्या प्रारंभी मराठ्यांनी नर्मदा ओलांडून मारवाड्यात शिरले. पिलाजी जाधवने दतिया, ग्वाल्हेरात धुमाकूळ करून चार-पाच लाखांची खंडणी वसूल केली.

        कोट्याचा खरा वारस बुधासिंगला पदच्युत करून जयसिंगने आपले नातेवाईक दलेलसिंगला जहागिरी दिली. बुधासिंगने शाहू महाराजांकडे मदत मागितली. शाहूराजांच्या आज्ञेवरून शिंदे, होळकरांनी बुंदीवर स्वारी करून किल्ला घेतला.आणि दलेलसिंगची हकालपट्टी करुन बुधेसिंगला गादीवर बसवले. त्याने सहा लाखांचा नजराणा दिला.

         बाजीराव कुलाब्याहून पुण्याला परतले. जुलैमध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. बारसे होताच बाजीराव साताऱ्याला छत्रपतींना भेटण्यास गेले. आठवड्यावर राहून पुण्यात परत आले.

            क्रमशः
संकलन ;लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित  योध्दा बाजीराव पेशवे  !!!

               भाग – १८.

               उत्तरेकडे स्वतः बाजीराव हजर नव्हते. पण त्यांचे सरदार त्यांच्या नियोजनाप्रमाणे युद्धतंत्राचा वापर करून कार्यभार उरकवीत होते. जंजिऱ्याच्या मोहिमेत बाजीरावांना  रस नव्हता. त्यांना उत्तरेकडचे वेध लागले होते.

     २६ ऑक्टोबर १७३६ ला बाजीरावांनी पुणे सोडले. आणि एक महिन्यात भोपाळ गाठले. तिथे त्यांना शिंदे होळकर येऊन मिळाले. फौजेची संख्या ५०,०००  च्या वर झाली होती. डिसेंबर मध्ये भोपाळच्या यार मोहम्मदशी पहिली चकमक उडाली. शेवटी तह होऊन  पाच लाख खंडणी बाजीरावांनी पदरात पाडून घेतली. जानेवारी १७३७ मध्ये भेलसा घेतला. नंतर त्यांनी जाटाच्या प्रदेशात प्रवेश केला. राजा अनिरुध्दसिंगने वीस लाख रोख  खंडणी, आणि दहा हत्ती दिले. नंतर ग्वाल्हेरजवळ सगळ्या मराठी  फौजा एकत्र जमा होऊन आग्र्यावर चढाई करण्यास सज्ज झाल्या.

        बादशहाने सादतखान, वजीर कमरुद्दीनखान, महम्मद बंगश, अभयसिंग, जयसिंग या सर्वांना मराठ्यांना रोखण्याचे आदेश दिले. सादतखान आग्र्याकडे निघाला. त्याला राजपुतांच्या फौजा मिळण्याआधीच  त्याचा समाचार घेण्यास बाजीरावांनी    शिंदे, होळकर, जाधवांना त्यांच्यावर चालून जाण्याचा हुकूम दिला. पण शत्रुबळाचा अंदाज न आल्याने मराठ्यांनी सपाटून मार खाल्ला. कसेबसे सरदार ग्वाल्हेरास परत आले.

        मराठे पळून गेलेले पाहून, सादतखान फुशारला. त्याला वाटले, आता मराठे परत येणार नाही. तेवढ्यात मोहम्मद बंगश, खान दौरान फौजेसह आग्र्याला आले. बाजीरावांना जाणीव होती एवढ्या प्रचंड सेनेशी सामना परवडणार नाही. परंतु इतक्या जवळ येऊन धडा न शिकवता परत जाणे त्यांना पसंत नव्हते.

               बाजीरावांचे फौजेने माघार घेतल्याच्या आनंदात दिल्लीत जल्लोष चालला होता. तर, आग्र्यात  सादतखान, बंगश मंडळी नाच-गाण्यात दंग होती. इतक्या वर्षात त्यांना बाजीराव कळलेच नव्हते.

          बाजीरावांच्या सैन्याने माघार घेतली ती जास्त नुकसान मनुष्यहानी होऊ नये म्हणून. बाजीराव  वेगळा पवित्रा घेतील याची शत्रूला यत्किंचितही कल्पना नव्हती.

       सत्तावीस मार्चला बाजीरावांनी थोडी फौज आग्र्यात  ठेवली. परत जाण्याचा  बहाणा  करीत एकदम वळून जाटांचा मुलूख गाठला. तिथून मुसंडी मारून २९ मार्चला दिल्ली जवळ पोहोचले. त्यावेळी बादशहाजवळ हुजुरातीच्या सैन्याशिवाय दुसरे सैन्य नव्हते. बाजीराव अनपेक्षितपणे येतील याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यांची फौज मोगल सल्तन खालसा करून दिल्ली कब्जात घेण्याच्या आज्ञेची वाट पाहत होते. काही सरदार दिल्ली जाळण्याची भाषा करू लागले. पण बाजीरावांनी मनाई केली.

       त्यावेळी चिमाजी आप्पा साष्टीच्या मोहिमेवर होते. बाजीरावांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, खान दौरान, कमरुद्दीन, बंगश एकत्र चालून आले तर, आपण एवढ्या प्रचंड सेनेचा सामना करू शकणार नाही. त्यांनी चिमाजीला लिहिले की, त्यांना रेवा नर्मदा पार करू देऊ नये.

           बाजीराव  बादशहावर आणि मोगलावर जरब बसवून जुलैमध्ये पुण्याला परत आले. मात्र त्यांनी आपल्या फौजा शत्रूच्या मुलुखात  मुख्यतः माळव्यात जागोजागी ठेवल्या होत्या. जणू बादशहावर बंदुका रोखून धरल्या होत्या.

           बाजीराव पुण्याकडे जात असताना, निजाम उत्तरेकडे येत होता. तब्येतीचे कारण सांगून आपण उत्तरेकडे येत आहे असा बहाणा वाटेत भेटलेल्या पिलाजी जाधव यांची फसवणूक करून बऱ्हाणपूर पर्यंत आला. त्याने बादशहाला पत्र पाठवले की, बादशहाकडून सैन्य खजिना मिळाल्यास, मराठ्यांचे पारिपत्त्य करू. ही त्यांच्याविरुद्धची मोहीम लांबणीवर पडली तर मग कोणताच उपाय चालणार नाही.

              हा दख्खनचा मातब्बर सरदार आपल्या पडत्यावेळी मदतीला येत आहेसे पाहून, बादशहा हरकला. तीन जुलैला निजाम-बादशहा भेट झाली. बादशहाने त्याची मोठीच खातिरदारी केली. वस्त्रे, जडजवाहिराचा मोठा नजराणा दिला.   ‘आसफजाह ‘ किताब प्रदान केला. निजामाचा थोरला मुलगा फिरोजजंगला  माळव्याची सुभेदारी दिली. जयसिंग, सादतखान, कमरुद्दीन यांना पदावनती करून, मराठ्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी एकट्या निजामावर सोपवली. ३५,००० फौज, मोठा तोफखाना आणि पन्नास लाखांचा खजिना त्याला दिला.

          बाजीराव जुलैला पुण्याला आले. दिल्लीच्या बादशहाच्या तयारीची खबर बाजीरावांना मिळाली, त्यावेळी ते साताऱ्याला शाहूराजे सोबत होते. पावसाळा संपताच निजामाचा बंदोबस्त करण्याच्या आपला मनोदय राजेंसमोर व्यक्त करून ते पुण्याला आले. दसरा संपताच निजामाचा समाचार घेण्यासाठी २५ ऑक्टोबरला साष्टीची मोहीम चिमाजी अप्पावर सोपवून रवाना झाले.

यावेळी बाजीरावांचे खास सरदार दाभाडे, कदमबांडे, गायकवाड, फत्तेसिंग, रघुजी- राणोजी भोसले वगैरे यांना या ना त्या कारणाने दूर केले. त्यांना बोलवायला  वेळ नव्हता. पैशाची उणीव तर होतीच. या उलट निजामाकडे स्वतःची चाळीस हजार फौज, घोडदळ, तोफखाना होता. दक्षिणेतून मुलगा नासिरजंग, दिल्लीकडून बादशहाची फौज, तोफखाना, पैसा अशी एकूण ७०-८० हजाराच्या वर फौजेची तयारी होऊन तो माळव्यात जाऊन बसला.

         क्रमशः
संकलन ; लेखन व,©®   मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित  योध्दा बाजीराव पेशवे  !!!

                भाग – १९.

              बाजीरावांकडे पैशाची अडचण असतानाही त्यांनी ७०,००० फौज उभी केली. त्यांच्याजवळ होते प्रसंगागणिक बदलणारे त्यांचे तंत्र. त्याच बळावर ते मावळ्याकडे निघाले. सोबत होते फक्त चिमाजीअप्पा, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर.

        १२ नोव्हेंबरला बाजीराव तापी नदीच्या खोऱ्यात तर, निजाम सागरच्या (मध्यप्रदेश) जवळपास होता. बाजीराव  नर्मदा ओलांडून मावळ्यात शिरले. दक्षिणेकडून येणाऱ्या नासिरजंगला अडवण्यासाठी चिमाजीअप्पा खानदेशात दबा धरून बसले. डिसेंबरमध्ये बाजीराव आणि निजाम भोपाळकडे निघाले. बाजीरावांनी सापळा लावला की, निजाम भोपाळच्या किल्ल्यात शिरावा. निजाम किल्ल्यात गेला आणि अडकला. त्याची कोंडी झाली. रसद, दाणागोटा मिळणे अशक्य झाले. दिवसेंदिवस निजामाची परिस्थिती अवघड होऊ लागली. हत्ती, घोडे, बैलांना चारा नव्हता. त्यांच्या सैनिकांनी बैल मारून त्यांचे मांस भक्षण केले. दिल्ली किंवा औरंगाबादवरून रसद येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्यामुळे निजामाचे मनोबल खचले.  १९ डिसेंबरला  त्याने आपल्या काही निवडक लोकांना इस्लामाबादला धाडले.

         निजामाने कित्येक रात्री जागून काढल्या. तो किल्ल्याच्या शेजारील असलेल्या आपल्या छावणीत जाऊन बसला. राजपूत व जाट बंडाच्या पवित्रात होते. त्यांना निजामाशी हात मिळवणी केल्याचा  पश्चाताप होत होता.

       बाजीरावांनी आपले सैन्य जागोजागी दबा धरून बसवले. निजाम बाहेर आला की, त्याची  गठडी बांधण्याचा डाव बाजीरावांचा होता.

        शेवटी निजामने आपल्या सरदारांना मराठ्यांवर चालून जाण्याचा हुकूम दिला. ते समोर येताच, राणोजी शिंदे, पिलाजी जाधव, सयाजी गुजर यांनी हल्ला चढवला. घमासान लढाई सुरू झाली. दोन्हीकडचे शेकडो लोक जखमी झाले. शंभर राजपूत व साठ मराठे ठार झाले. शंभर घोडे मारले  गेले. निजामाने संध्याकाळी लढाई थांबवून भोपाळमध्ये दडी मारली.

         दुसऱ्या दिवशी निजाम लढाईसाठी किल्ल्यातून  बाहेर येईल असे वाटले. पण तो हत्तीवर बसून सैन्याबरोबर उभा राही. युद्धाच्या सूचना देऊन पुन्हा तंबूत जात असे. त्याच्या मदतीला नासिरजंग व बादशहाची कुमक आली की, बाहेर पडण्याचा त्याचा मनसुबा होता. तो दिल्लीला सारखे हेर पाठवीत होता. त्याच्यापुढे मोठा पेच होता  तो बाजीरावांच्या फौजेचा. त्याला नेमका थांग लागत नव्हता. ते एका जागी  कधीच नसे. ही पथके भोपाळ भोवती घिरट्या घालीत होती.

         इकडे बादशहाला स्वतःची चिंता पडली होती. तो दोन कारणाने हैराण झाला होता. एक म्हणजे… निजामाचा पराभव करून बाजीराव थेट दिल्लीवर आला तर?  दुसरी भीती होती… शिवाजी महाराज चेटके आहेत, ते कुठेही प्रकट होतात, असा समज पसरला होता. तीच परिस्थिती बाजीरावांबद्दल झाली होती. निजामकडे फौज पाठवावी आणि बाजीराव  त्या सैन्याला जायबंदी करून झुकांडी देऊन, भलत्याच मार्गाने दिल्लीला  आले तर, आपली धडगत राहणार नाही. म्हणून तो निजामाकडे कुवत पाठवण्यास कचरत होता.

        वऱ्हाडातून अंमलदार सुजाक्षत खान भोपाळकडे निघाला होता. पण नागपूरकर राघोजी भोसलेंनी त्याचा पराभव केला. फौज पळून गेली. रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्यात पेटते बाण सोडून आगी लावत होते. किल्याच्या बाहेरही लहान लहान हल्ले करून त्यांची झोप हराम करीत होते.

           निजामाची किल्ल्यात काय दुर्गती झाली हे चिमाजीअप्पांनी बाजीरावांना पाठवलेल्या पत्रावरून दिसून येते. चिमाजी  लिहितात… धान्य महागले. तेही जास्त पैसे देऊनही पुरेसे मिळत नाही. हत्ती, घोड्यांना वैरण नाही. एके दिवशी झाडाच्या साली व तळ्यातील लव्हाळे चारली. २५ रमजाणी पठाणाने तोफेचे बैल मारून खाल्ले. राजपूत तर निव्वळ उपाशीच आहेत. आमच्या फौजांनी चौतर्फा नाकेबंदी  करून टाकली असून रसद त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही.

          बादशाहाकडे बढाया मारून हा प्रसंग निजामाने स्वतः ओढून घेतला होता. बाहेर पडून लढायची त्याची हिंमत होत नव्हती. उत्तरेकडून, दक्षिणेकडून फौज येण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजीरावांनी बांडे, भोसले यांची फोर्स पाठवण्याबद्दल चिमाजीअप्पांना  तसेच शाहू महाराजांना विनंती करत म्हटले, नबाब ठिकाणी लागला तर, अवघी दक्षिण निर्वेश होईल. आमच्याजवळ इतकी कमी फौज असल्यामुळे त्याचा मुकाबला करणे अशक्य होईल.

        एक दिवस भल्या पहाटे निजाम बाहेर पडला व लगेच शहरात पळून गेला. मराठ्यांनी त्याच्या पळत्या फौजांचा चांगलाच समाचार घेतला. शेवटी निजामाने तडजोडीचा निरोप बाजीरावांकडे पाठवला. ७ जानेवारी १७३८ ला तह झाला. बाजीरावांच्या मागण्या बादशहाकडून मान्य करून देण्याची कुराणावर हात ठेवून निजामाने शपथ घेतली. आणि तहावर सह्या केल्या. बाजीरावांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे…

१.  माळव्याची सुभेदारी मिळावी.

२.  ५० लाख रुपये युद्ध खर्चाची भरपाई मिळावी.

३.  चंबळ व नर्मदा नद्यांच्या प्रदेशातून खंडण्या वसूल करण्याचा हक्क मिळावा.

           नामुष्की पदरात घेतलेल्या निजामाला जाऊ देण्यात आले.

            क्रमशः
संकलन ;  लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित  योध्दा बाजीराव पेशवे  !!!

               भाग – २०.

            मराठी फौजा कोट्यावर चालून गेल्या. तेथील राजाकडून दहा लाख खंडणी मिळाली. बाजीराव माळव्यात आले. आणि चिमाजीआप्पा पोर्तुगीजांचे पारिपत्य करण्यास गेले.  २५ जुलै १७३८ रोजी बाजीराव पुण्यात आले. काही दिवसांनी महाराजांच्या भेटीस साताऱ्यात गेले. बाजीराव भोपाळ मोहिमेत असताना त्यांनी आपले काही सैन्य साष्टी बेटात ठेवले होते. साष्टीचा लढा मार्च १७३७ पासून चालू होता. त्या मोहिमेचे नेतृत्व बाजीरावांनी चिमाजी आप्पांना दिले होते.

           निजामाने भोपाळच्या लढाईत चांगलाच मार खाल्ल्यानंतर स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने तह करून दिल्लीकडे निघाला खरा, पण दगलबाजी त्याच्या रक्तातच मुरलेली होती. तहात ठरल्याप्रमाणे बादशहाकडून तहाच्या अटींची पूर्तता न करता, वेळकाढूपणाच  करत होता. दरबारातील बाजीरावांचे वकील तगादा लावत होते. तो नित्य नव्या सबबी सांगत होता. याचवेळी अफगणिस्थान  आणि इराणचा बादशहा नादीर शहाशी बादशहांचे वितुष्ट आले.

            अफगाणिस्तान हा मोगल साम्राज्याचा प्रांत होता. नादीर शहाने अफगणिस्तानचा पराभव करून तो प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतला. मोगल बादशहाने आपलाच हक्क आहे असे सांगून लढाईची भाषा करू लागला. नादिरशहाने हिंदुस्तानवर आक्रमण करण्याची धमकी दिली. त्याला दिल्लीच्या बादशहाची ताकद माहीत होती. तो केवळ धमकीच्या जोरावर आपले  उद्दिष्ट  साधण्याचा विचारात होता.

         मोगल दरबारात दोन प्रकारचे सरदार होते .देशी व परदेशी. परदेशी सरदारांना बादशहाचे मराठ्यांशी नमून वागणे पसंत नव्हते. उलट देशी मुसलमान  सरदार जाणून होते की, मोगलराज्य निव्वळ मुसलमान सरदारांवर  उभे नसून, राजपुतादी हिंदूंचा मोठा आधार आहे. राजपूत- मराठे एक झाले तर, मोगल साम्राज्याची धूळधाण होईल. परचक्र आले तर, बलाढ्य मराठेच  उपयोगी पडतील असे त्यांना वाटत होते.

         परदेशी सरदार उतावीळ झाले होते. मराठ्यांचा निकाल लावून, आपला हेतू साध्य करण्यास नादिरला बोलावणे फायद्याचे वाटले. त्यातच निजाम, सादतखान त्याला हिंदुस्तानावर चालून येण्याची चिथावणी  देत होते.  त्यांचा समज होता की, नादीर इराणचा बादशहा. तो काही इथे राहणार नाही. त्याच्या मदतीने मराठ्यांचा पुरता बीमोड केला की, मग हिंदुस्थान आपलाच !!  तसेही निजामाची दक्षिणेत स्वतंत्र राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा फार जुनी होती.

        यांच्या आग्रहाने आणि हिंदुस्थानसारखा संपन्न देश आपल्या साम्राज्याला जोडता येईल या लालचेने नादिरशहाने आपला मोर्चा हिंदुस्तानकडे वळवला. वायव्य सरहद्दीवरच्या पहाडी प्रदेशातील खैबरखिंडीने तो हिंदुस्थानात उतरला. तिथेच जर त्याला प्रतिकार झाला असता तर, पुढे येण्याचे त्याला धाडस झाले नसते.

        नादिरशहाने पेशावर काबीज करून, चिनाब नदी पार केली. लाहौरकडे निघाला. वाटेत कटक काबीज केले. लाहोरच्या सुभेदाराने बादशहाला मदतीसाठी विनंत्यावर विनंत्या केल्या. पण मदत न मिळाल्याने नादीरशहाने लाहोर जिंकले.

       आणि बादशहाचे डोळे खाडकन उघडले. त्याने सरदारांना एकत्रित करून १८ जानेवारीला कर्नूलला तळ दिला. त्याची फौज प्रचंड होती पण नेतृत्व विस्कळीत होते. सेनापती एकच नव्हता. नाजीरशहाची  फौजेवर त्याची एकट्याची हुकमत होती. तो उत्तम सेनानायक होता. त्याचा तोफखाना आणि  बंदुका मोगलांपेक्षा जास्त  लांबवर मारा करणार्‍या होत्या. शिवाय मोगलांचे निजाम आणि सादतखान फितूर होते. नादीरखानाने लढाईपूर्वी आपल्या सैन्याला चांगली विश्रांती दिली. युद्ध साहित्य, दाणागोटा भरपूर भरून ठेवला. पथकांच्या सेना नायकांना त्यांच्या नेमक्या कामगिऱ्या  वाटून दिल्या. अशाप्रकारे  पूर्ण तयारीनिशी पुढे जाऊन सरहिंद घेतले. आणि १३ फेब्रुवारीला स्वतः कर्नुलला बादशहाच्या फौजेला भिडला. निजामाने लढाईत भाग घेतलाच नाही. खान दौराने मात्र निकराची झुंज दिली. त्याचे तीन मुले व भाऊ मारले गेले. तो स्वतः जबर जखमी होऊन दोन दिवसांनी मरण पावला.

      बादशहाचे मुख्य दोन आधारच नादीरला सामील असल्यामुळे त्याला सहजच विजय प्राप्त झाला. बादशहाचे शंभरहून अधिक लहान मोठे सरदार, तीस हजार सैन्य मारले  गेले. कापले गेले. बादशहाची पूर्ण फौज नष्ट झाल्याशिवाय, हिंदुस्तानसारख्या अनोळखी प्रदेशाचा ताबा मिळणार नाही हे जाणून त्याने बादशहाच्या फौजेची कत्तल चालवली. सशस्त्र, निशस्त्र सर्वांनाच कापून काढण्याचा सपाटा चालवला. रक्तपात करून झाल्यावर नादिरशहाची फौज लुटमार करू लागली. भोवतालचा प्रदेश वैराण झाला. बादशहाला तह करण्यापासून पर्याय नव्हता. निजामाला देखील नादिरशहा दिल्लीत नको होता. दिल्ली वाचवणे त्याच्यासाठी आवश्यक होते. दिल्ली वाचण्यावरच त्याचे जीवन आणि भवितव्य अवलंबून होते. बादशहाची माफी मागून बादशहाच्या वतीने नादीरशहा समोर जाऊन पन्नास लाख रुपये हप्त्याने देण्याचे कबूल केले.

क्रमशः
संकलन ; लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

अपराजित योध्दा बाजीराव पेशवे संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading