आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

अपराजित योध्दा बाजीराव पेशवे भाग २, (६ ते १०)
छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन “सेनाकर्ते” किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – ६.
बाजीरावांनी पेशवे म्हणून वीस वर्षाच्या कारकीर्दीत स्वराज्यात सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणून जरब, आणि दरारा बसवला. बाजीरावांचे आपल्या सैन्याबरोबर संबंध कसे होते, हे पाहणेही महत्वाचे आहे. युद्धासाठी सैन्याची चपळता, अनपेक्षित हालचालीसाठी घोडदळ उपयुक्त होते. त्यांच्या घोडदळात दोन प्रकारचे घोडेस्वार सैनिक असत. जो शिलेदार आहे त्याचा स्वतःचा घोडा, व शस्रे असत. मोहिमेवर बोलावताच येत असत. हे शिलेदार घोडेस्वारीत, तलवार चालवणे, भालाफेकीत तरबेज असत. त्यांना वेतन जास्त असे.
दुसरा प्रकार… ” बारगीर “! यांना घोडा, शस्त्र वगैरे सरकारकडून मिळत. याचा अर्थ ते कमी तरबेज होते असे नाही.
मराठे सरदार स्वतःचे सैन्य ठेवून असत. मोहिमेत आवश्यकतेनुसार वाटेवर पेशव्यांना येऊन मिळत. घोडदळाची हत्यारे… भाला, तलवारी आणि ढाल असे. घोडेस्वाराजवळ चकमकीच्या बंदुका असत. ही पथके वेगवान असल्यामुळे लढाईच्या सोयीनुसार तैनात केली जात असत. किंवा जरुरीनुसार बोलावली जात असत.
अधिकाऱ्यांना खास संरक्षणासाठी शिरस्त्राण आणि साखळ्यांचे चिलखत असे . हे सैन्य दिवसाला ५०-५० मैल मजल मारीत असे. ते तंबू किंवा इतर सामान जवळ बाळगत नसत. जिथे तळ असेल तिथूनच गरजा भागवीत असत. शत्रुभोवती घिरट्या घालून त्यांना हैराण करणे त्यांचे खास तंत्र होते. शत्रूची रसद तोडून त्यांना जेरीस आणायचे. हे तंत्र जरा विस्ताराने बघू. •°•°•°
बाजीराव आपले सैन्य तुकडी तुकडी ने युध्दात उतरवीत. म्हणजे एक उदा.बघा- शत्रू समोरून येताना दिसताच एकदम अकस्मात वेगवान झडप घालून त्या ठिकाणी खिंडार पडताच ; भांबावून सोडून; पटकन माघारी वळायचे. ते बघून शत्रू पळणाऱ्या बाजीरावांच्या सैन्याचा पाठलाग करू लागताच ; बाजीरावांनी शत्रूच्या पिछाडीस ठेवलेली तुकडी हल्ला करायची. शत्रू प्रतिकारासाठी माघारी वळतो ना वळतो — तोच त्याच्या डाव्या उजव्या बाजूने परत हल्ला !! हेच गनिमी काव्याचे विकसित तंत्र होते. अशा गनिमी काव्याच्या युद्धाचा कालावधी लांबवायचा नसतो. हे फक्त एकच उदाहरण बाजीरावांच्या युद्धनीतीचे म्हणून इथे वर्णन केले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या सर्वच ४१ युद्धाचे बारकावे या छोट्या मालिकेत देणे अवघडच आहे.
शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र बाजीरावांनी पुरेपूर अमलात आणले म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. बाजीराव सामान्य माणसासारखे सैनिकात मिसळून राहत असत. त्यांचे खाणे, पिणे, झोपणे सैनिकांसारखेच असायचे. ते शिवाशिवी पाळत नसत. त्यांना थकवा माहीत नव्हता. त्यांच्या अशा साध्या व सौजन्यपूर्ण जीवनशैलीमुळे माणसे जोडली जात होती. अनेक जिवाभावाचे मित्र निर्माण होत होते. आपल्या वर्तणुकीने त्यांनी मराठ्यांमध्ये एकी वाढवली. या ऐक्य भावनांचाच युद्धाच्या वेळी त्यांना सर्वात जास्त उपयोग झाला.
त्याकाळी मद्रासचा बराचसा भाग कर्नाटकात होता. १७२९ च्या सुमारास त्या बाजूने आपला राज्य विस्तार करण्यासाठी निजाम उतरणार असल्याची बातमी शाहूराजांना मिळाली होती. निफाडच्या पुंड-पाळेगारांनी बंडावा माजवला होता. त्यासाठी बाजीरावांना उत्तरेची मोहीम सोडून कर्नाटककडे जाण्याचा आदेश शाहूराजांनी दिला. शाहू महाराजांची इच्छा होती, आपला दत्तक पुत्र फत्तेसिंग भोसलेला दक्षिणेकडील राज्यांचा विशेषतः कर्नाटकचा कारभार सोपवावा. या मोहिमेची जबाबदारी शाहू राजांनी फत्तेसिंगवर सोपवली. त्याच्यासोबत प्रतिनिधी श्रीपतराव, खंडेराव दाभाडेंचे पुत्र त्रिंबकराव, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर दिले. त्यांचे सोबत सुमारे ४००० घोडदळ होते. या सैन्यावर निजाम चालून येण्याची दाट शक्यता होती. म्हणून शाहू महाराजांनी पिलाजी जाधवसह बाजीरावांना हैदराबादला जाण्याची आज्ञा दिली.
या २५ वर्षीय पेशव्याने कर्नाटकाच्या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले. २४डिसेंबरला १७२५ रोजी मराठ्यांच्या विविध फौजा पंढरपूरला एकत्र झाल्या. आणि निजामाच्या मुलुखाजवळून दक्षिणेकडे कूच केले. बाजीरावांनी विजापूर मार्ग निवडला आणि फौजेची एक तुकडी गुलबर्गाकडे रवाना केली. इथे आपण कर्नाटकचा नकाशा समोर ठेवलात तर बाजीरावांची अचूक चाल लगेच समजेल.
बाजीराव कृष्णा नदी ओलांडून तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर असलेल्या कोप्पल या गावी पोहोचले. आणि तिथून १२ फेब्रुवारी १७२६ रोजी ते बेळहट्टीला पोहोचले. इथे एक आठवडा तळ ठोकून विश्रांती घेतली.
या अवधीत बाजीरावांनी सोंडा येथील राजाकडून जुनी येणी वसूल केली व शत्रूपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चित्रदुर्गाकडे कूच केले. तिथे २० मार्च ते २६ एप्रिलपर्यंत तळ ठोकला. या दरम्यान त्यांनी स्थानिक सरदारांची भेट घेऊन त्यांना मराठ्यांकडून सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. त्याबद्दल त्यांच्याकडून चौथाई वसूल केली. ते दक्षिणेत असते तर फार पुढे गेले असते.
पण साताऱ्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती.
छत्रपती राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाईचा पुत्र संभाजी याने राजगादीकरता शाहूराजेंना सत्तेवरून दूर करण्याचे खलबत सुरू केले. यासाठी त्याने निजामाशी चंद्रसेन जाधवामार्फत संधान बांधले. हा चंद्रसेन धनाजी जाधवांचा पुत्र. याला शाहूराजेंनीच त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सेनापती पद बहाल केले होते. पण तो फितूर होऊन कोल्हापूरच्या संभाजींच्या पक्षाला जाऊन मिळाला. याला निजामाने बदामी परिसरातील जहागीर देऊन मिंधे केले होते. या निजामाचे सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन संभाजींना दिले. संभाजी आणि चंद्रसेन जाधव साताऱ्यावर आक्रमण करणार असल्याची बातमी बाजीरावांना मिळताच त्यांनी ७ एप्रीलला चित्रदुर्ग सोडले. २३ मे ला साताऱ्यात दाखल झाले.
या मोहिमेत बाजीरावांनी बरीच कामगिरी केली होती. जुनी येणी वसूल केली. स्थानिक सरदारांनी शाहू राजेंकडून जबरदस्तीने हिरावून घेतलेल्या प्रांतात पुन्हा शाहूराजांची सत्ता प्रस्थापित केली. बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना सक्त ताकीद दिली.
क्रमशः
संकलन लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – ७.
निजामाच्या स्वारीमुळे शाहूराजांचा खजिना रिता झाला. राज्याचा व्याप चालवण्यासाठी पैशाची उभारणी करणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी बाजीरावांना कर्नाटक मोहिमेवर जाण्याची आज्ञा केली. नोव्हेंबर १७२६ ते एप्रिल १७२७ मध्ये झालेल्या या स्वाऱ्यांनंतर, झालेली पालखेडची लढाई विख्यात आहे.
पहिली मोहीम संपत नाही, तोच स्वतः निजामाने कर्नाटकात आखणीपर्यंत जाऊन तिथून कर्नाटकाच्या अंतर्भागात फौजा पाठवून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. ते पाहून शाहूराजांनी लगेच दुसऱ्या मोहिमेची कारवाई केली.
ते पाहून निजाम चाल खेळला. त्याने चंद्रसेन जाधवाला हाताशी धरून मराठ्यांमध्ये असंतुष्ट असलेल्या सरदार कान्होजी भोसले, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यांना फितवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बाजीराव श्रीरंगपट्टण पर्यंत खंडण्या वसूल करण्यात गुंतले होते. त्यातच पाणीटंचाई, साथीचे रोग यात मराठे सैनिक मृत्युमुखी पडले. शिवाय निजामाच्या हालचालीमुळे ही मोहीम अर्धवटच टाकावी लागली.
निजामाच्या घरभेदीपणाच्या उपद्व्यापाचे पर्यवसान पालखेडच्या लढाईत झाले. या लढाईत निजामाने दणकून मार खाल्ला. शेवटी मुंगी- शेवगावचा १७ कलमांचा तह झाला. या पालखेडच्या लढाईमुळे बाजीरावांचे नाव जागतिक युद्ध इतिहासात चांगलेच झळकले.
बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर पहिली पाच वर्षे विशेष घडामोडीत गेली. त्यामुळे त्यांची कर्तबगारी लोकांसमोर येऊ शकली नाही पण त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. बाजीराव वयाने लहान असल्यामुळे मुत्सद्यांमध्ये त्यांना अननुभवी मानले जात नसे. त्यामुळे त्यांना आपले म्हणणे पटवून देण्यात त्यांचा फार वेळ खर्च होत असे.
शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र खुल्या मैदानात लढताना यशस्वीपणे उपयोग आणणारे हे पहिले बाजीरावच होते. असे खुल्या मैदानातील युद्ध शिवरायांनी देखील गनिमी काव्याने यशस्वी करून दाखवले होतेच. तोच धडा बाजीरावांनी देखील प्रत्यक्षात उतरवून दाखवला. आपले राज्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मोगलांचा दक्षिणेतून जाणारा मार्ग मावळ्यातून आहे. मावळा काबीज केल्यास त्याला अटकाव होईल या दृष्टीने मोहिम आखण्याचा बाजीरावांचा बेत होता. पण समोरचा शत्रू सामान्य नाही. त्यासाठी तेवढेच सैन्यबळ आवश्यक होते.
शाहू राजांना निजामाच्या कारवाया कळत नव्हत्या असे नाही. पण लढाईपेक्षा आपले कार्य सलोख्याने व्हावे अशी त्यांची प्रवृत्ती होती. त्यांच्या याच प्रवृत्तीचा फायदा निजामाने घेऊन, प्रत्यक्ष शाहू राजांनाच नामशेष करण्याचा घाट घातला, तेव्हा मात्र राजांना आपले धोरण सोडावे लागले. बाजीरावांचा दुस्वास करणारे सरलष्कर सुलतानजी निंबाळकर, कान्होजी भोसले, सेना साहेब सुभा या शाहू राजांच्या सरदारांना भरपूर लाच देऊन निजामाने आपल्याकडे ओढलेच, त्याच बरोबर राव रंभा निंबाळकर, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव यांनाही हाताशी धरून कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहू विरुद्ध भडकावले. त्यावेळी चंद्रसेन जाधव निजामाचा हस्तक होता.
बाजीराव व प्रतिनिधी श्रीपतराव कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहू राजांच्या प्रदेशावर चढाई करण्यास या चंद्रसेन जाधवने भाग पाडले होते. स्वतः निजाम कर्नाटकात आखणीपर्यंत खोलवर गेला होता, तेव्हा शाहूराजांनी बाजीरावांना परत बोलावले. निजामाने चौथाई सरदेशमुखी वसूल करण्यास मराठ्यांना विरोध केला. इतकेच नव्हे तर खरा राजा कोण? असा प्रश्न उपस्थित करून, शाहूराजे आणि संभाजीराजांना हैदराबादला बोलावले. तिथे स्वतः आपण कोणाचा अधिकार खरा हे ठरवू …
प्रतिनिधी श्रीपतरावांनी निजमाचा प्रस्ताव मान्य करण्याचा सल्ला शाहूराजांना दिला. परंतु बाजीरावांनी विरोध केला. त्यांनी शाहू राजांना पटवून दिले की, निजामाचा हेतू मराठ्यांना नेस्तनाबूत करण्याचा आहे. आपण त्याचा नाश केला नाही तर तो आपला नाश केल्याशिवाय राहणार नाही. युद्धाखेरीज दुसरा पर्याय नाही हे राजांना पटले.
कोल्हापूरच्या संभाजींना आपल्याकडे वळवून मराठ्यांमध्ये यादवी माजवण्याचा घाट घातला होता. पण त्याने बाजीरावांना ओळखले नव्हते. हा पोरसवदा तरुण आपल्याला काय टक्कर देणार? शाहूराजांचा निकाल लागल्यानंतर संभाजीचा निकाल लावणे त्याला अशक्य नव्हते.
बादशहाला तीन वेळा विजय मिळवून देऊन तो त्याकाळी सर्वश्रेष्ठ सेनानी ठरला होता. त्याच्या जवळ अफाट सैन्यबळ, शस्त्र, तोफखाना मोठ्या संख्येने होता. त्यामुळे बाजीरावांना हरवणे त्याला हातचा मळ वाटत होता. बाजीरावांचे चापल्य, चपळाई, हुलकावण्या आणि शत्रूचा शक्तिपात करण्याच्या तंत्रात ते तरबेज होते. त्यांच्या या वेगळ्या तंत्राशी निजामाला लढा द्यायचा होता.
दुसऱ्या महायुद्धातील इंग्रजांचे महान सेनानी फिल्ड मार्शल ( मांटेगोमेरी ) यांनी आपल्या ‘अ हिस्टरी ऑफ वेल्फेअर’ या ग्रंथात पालखेड्याच्या लढाईबद्दल लिहिले की, ‘पालखेडच्या लढाईत बाजीरावांनी आपल्या नेतृत्वगुणाने निजामाचा सपशेल पराभव करून त्याच्यावर मात केली. ही लढाई म्हणजे स्ट्रॅटेजीक आणि प्रॅक्टिकल मोबिलिटीचा मास्टरपीस होय !’
क्रमशः
संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – ८.
बाजीराव मोहिमेवर असताना इकडे साताऱ्यात त्यांचे अनेक विरोधक शाहूराजांचे कान बाजीरावांच्या विरुद्ध भरत होते. बाजीरावांच्या युद्धतंत्राला त्यांचा सक्त विरोध होता. त्यांच्या मते आधी कोल्हापूरचे संभाजी, चंद्रसेन जाधव वगैरे घरच्या शत्रूंचा बंदोबस्त करून राजधानी स्थिरस्थावर झाली की, मगच बाहेर लक्ष द्यावे. या पार्श्वभूमीवर बाजीराव निजामाशी लढताना त्यांची भूमिका सेनानीची होती फितुराची नव्हती.
निजाम अफाट सैन्य आणि अवजड तोफांनी, साधनसामुग्रीने बलवान होता. पुढे बिन्नीचे सैन्य, डावी उजवीकडे सैन्याची फळी व मधल्या भागात निजाम असायचा. प्रत्यक्ष लढाऊ सैन्याच्या मागे बाजारबुगणे असायचे. त्यांची संख्या लढणाऱ्यांपेक्षा अधिक असायची. अवजड तोफखाने असल्यामुळे वेगवान सहज हालचाली करता येत नव्हत्या.
आणि मराठ्यांच्या म्हणजे — बाजीरावांच्या सैन्यात अवजड सामानाला अजिबात थारा नव्हता. सैनिकांची हत्यारेही मोजकीच असायची. बाजीरावांचे सैनिक अत्यंत काटक, आवेश भरलेले, आपल्या सेनापती वर निस्सीम प्रेम करणारे होते. बाजीराव सतत त्यांच्याच बरोबर राहात. खाणे, पिणे, झोपणे, उठणे बसणे होते. त्यामुळे ते सर्वांनाच ; त्यांच्यातीलच एक वाटायचे. त्यांच्या मोहिमेत चैनीला वाव नव्हताच . बाजीरावांचे संपूर्ण सैन्य घोडदळाचे असल्यामुळे विजेच्या वेगाने हालचाली करू शकत होते. दोन सैनिकांमध्ये एक जास्तीचा घोडा असे. त्यामुळे एखाद्या स्वाराचा घोडा जखमी झाला किंवा पडला तरी, तो स्वार लगेच दुसऱ्या घोड्यावर स्वार होऊन दौड करता येत असे. कधीच खोळंबा होत नसे.
सन् १७२७ च्या सुरुवातीला औरंगाबादला निजाम निघाला तेव्हा, बाजीराव भिरला होते. जून ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी धारूरला तळ ठोकला होता. ते ऑक्टोबर मध्ये साताऱ्याकडे निघाले. त्यांनी आपल्या हालचाली गुप्त ठेवल्या होत्या. शाहूराजांच्या वतीने आबाजी पुरंदरेने बाजीरावांना लिहिले की, निजाम साताऱ्यावर चालून येत आहे. शाहूराजे तुमच्यावर व सेनापती खंडेराव दाभाडे यांच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही कामगिरी योग्य रीतीने बजावून शाहूराजेंना खूश करा.
त्यावेळी खंडेराव दाभाडे तळेगावी होते. त्या वृद्धासेनानीला तरुण बाजीरावांकडून आज्ञा झेलायची मानसिक तयारी नव्हती. त्यांनीच बाजीरावांना तळेगावी भेटीस बोलावले. बाजीरावांनी आपल्या विश्वासू माणसाला खंडेरावांना नेमके काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्यास पाठवले. यामध्ये बहुमूल्य वेळ वाया गेला. शेवटी खंडेरावांनी स्वतः ऐवजी आपला मुलगा त्रिंबकरावला पाठवायचे ठरवले.
कोल्हापूरच्या संभाजीचे आणि निजामाचे सैन्य शाहू महाराजांच्या राज्यात शिरायला सज्ज झाले. प्रत्यक्ष युद्ध पावसाळा संपल्यावर सुरू होणार होते. बाजीरावांचे हेर खाते त्यांना खडान् खडा माहिती पुरवित होते.
बाजीरावांनी पावसाळ्यातच फक्त सहा सात हजार हलके घोडेदळ घेऊन लांब लांब मजला मारत प्रसंगी दिवसाला ३०-५० मैल दौड करत निजामाची राजधानी औरंगाबाद जिल्ह्यात चक्रीवादळासारखा प्रवेश केला. त्यांना अडवण्यासाठी निजामाने ऐबाजखानला पाठवले. त्याच्याशी थोडी चकमक करून वाऱ्याच्या वेगाने बाजीराव माहुरावर जाऊन आदळले. गावामागून गावे जाळीत, लुटीत त्यांनी नोव्हेंबर अखेर जालना जिल्ह्यातील जाफराबाद गाठले. तिथे सैन्याची फेर – जुळवणी आणि मांडणी करून, डिसेंबरच्या मध्यात वर्हाडला आले. तिथे धुमाकूळ घालून अचानक मागे फिरले. हदगाव साफ केले. परत मागे वळसा घेऊन ते खानदेशात शिरले. गावे जाळीत खजिने लुटले. शस्त्रसाठे ताब्यात घेतले. रोज दर दिवस ३०-४० वेगाने त्यांच्या मजला चालल्या होत्या.
आपला प्रदेश बेचिराख होत असल्याचे निजामाला समजले. बाजीरावांच्या मनाचा थांग त्याला लागेना. हातघाईच्या लढाया टाळीत बाजीराव उलट सुलट दिशांनी झंझावाती वेगाने मजला मारीत होते. शत्रूला दमवून गोंधळून टाकीत होते. निजामाच्या अवजड चिलखतांनी जडावलेल्या घोडदळाला तोफखानावाल्यांना कुठे जावे? बाजीरावाला कुठे गाठावे ? हे सगळे समजेनासे झाले. बाजीरावांचे हलके घोडदळ शत्रुभोवती घिरट्या घालीत होते. त्याच्या फळ्यांमध्ये घुसून बाहेर पडत होते. नद्या, नाले दऱ्याखोऱ्यातून बाजीरावांचे सैन्य केव्हाही, कसेही निसटत होते.
बाजीरावांनी एक अफवा पसरवली की, बाजीराव बऱ्हाणपूर या धनाढ्य शहरावर धावा घालून राखरांगोळी करणार आहे. ती अफवा खरी वाटावी म्हणून एक लहान तुकडी बऱ्हाणपूरच्या दिशेने रवाना केली. बाजीरावांच्या या चालीला निजाम फसला व तो स्वतः ऐबाजखानासह शहर वाचवण्यास निघाला. निजामाचे सैन्य कष्ट, हाल, उपासमार, दुष्काळ असल्याने पाण्याचा अभाव यांनी हैराण झालेले, कसे तरी बऱ्हाणपूर गाठले. निजाम तिथे पोहोचल्यावर त्याला आढळले की बाजीराव सैन्यासह गायब झालेले.
निजामाला हा चकवा चांगलाच महागात पडला.
बाजीरावांनी वेगळाच पवित्र घेतला. त्यांनी निजामाचा प्रदेश एकदम सोडला व गुजरातमध्ये मुसंडी मारली. तेथील मोगल सुभेदार सरबुलंदखान अतिशय घाबरला….
क्रमशः
संकलन व लेखन,
मीनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – ९.
बाजीरावांना माहीत होते गुजरातचा मोगल सुभेदार सरबुलंदखान निजामाचा शत्रू आहे. बाजीरावांनी त्याला कळवले, की आपण निजामाच्या हुकुमावरून मोगल प्रदेशावर चालून आलो. निजामाच्या दुटप्पीपणा जगजाहीर असल्यामुळे, त्यालाही हे खरे वाटले. पेशवांनी त्याला अभय दिले.
बाजीरावांचा गुजरात मध्ये घुसण्याचा एक हा एक गनिमी कावा होता. निजामाजवळ असलेला तोफखाना त्याच्या पासून बाजूला केल्याशिवाय त्याच्याशी थेट लढाई केली जाऊ शकणार नव्हती. बाजीरावांच्या पाठलागावर येण्यासाठी त्याला तापी आणि नर्मदा या मोठ्या नद्या ओलांडताना तोफखाना मागे ठेवूनच यावे लागणार होते. आणि बाजीरावांना नेमके हेच साधायचे होते.
बाजीराव सापडत नाहीसे पाहून निजामाने त्यांचा पाठलाग सोडून, थेट पुण्याकडे वळला. बाजीरावांनी मोहीम सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे सहा-सात हजार सैन्य होते. पण शत्रू प्रदेशात शिरताना त्यांनी पुण्यातील घोडदळ पथक सोबत घेतल्यामुळे, पुणे असुरक्षित झाले होते.
बाजीरावांनी जालन्याची जाळपोळ केली. सिंदखेड लुटून बऱ्हाणपूर कडे निघण्याची बातमी निजामाला समजली तेव्हा बाजीरावांना पराभूत करण्यासाठी बऱ्हाणपूरला पोहोचला. तोवर बाजीराव भडोचकडे गेलेले कळताच, निजामाने त्यांचा पाठलाग करीत असतानाच, बाजीराव अहमदाबादला गेल्याचे कळले. सरबुलंदखानशी तहाची बोलणी अजून झाली नसल्यामुळे, त्याने पुण्याच्या दक्षिणेत जायचे ठरवले. त्याने उदापूर, नारायणगड, औसरी, आणि खेड ( पुण्याच्या उत्तरेकडील सर्व ठिकाणं) यांचा ताबा घेऊन जुन्नरच्या करीम बेगकडे सोपवला. आणि स्वतः लोहगड मार्गे पुण्यात आला. ८ फेब्रुवारी १७२८ रोजी कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या लग्नाला उपस्थित राहिला.
तोपर्यंत बाजीरावांनी निजामाच्या मुलुखात व गुजरातमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे निजाम चांगलाच प्रक्षोभित झाला होता. तो कडेने निसटला.
इतके होईपर्यंत १७२८ चा फेब्रुवारी महिना उजाडला. बाजीराव गुजरात मध्ये असताना शाहूराजांकडून त्यांना निरोपावर निरोप जात होते. पण बाजीरावांनी लक्ष न देता निजामाच्या प्रदेशावर झडप घातली. लुटालूट, जाळपोळ, करत औरंगाबादेवर चालून गेले. घाबरलेल्या निजामाने पुण्याकडचे सैन्य काढून बाजीरावांच्या पाठलागावर निघाला. त्यावेळी बाजीराव पालखेडला होते. बाजीरावांनी निजामाचे दोन्ही प्रदेश सहा दिवस लुटले. निजामाला अन्नाला मोताद करून टाकले. धान्य, भाजी, चारा काही म्हटल्या काही मिळेनासे झाले. त्याचे सैनिक वाट मिळेल तिकडे पळत असताना बाजीराव त्यांच्यावर हल्ले चढवायचे. मात्र लढाईला तोंड लागताच पळून जायचे.
२८ वर्षीय तरुण बाजीरावांनी घोड्यावरून ७०० मैल अंतर कापले होते. तर ५७ वर्षे वयाच्या उतरणीला लागलेल्या निजामाला ही धावपळ जड जात होती. त्याचे सरदार ऐबाजखान व चंद्रसेन जाधव हेही वयस्कर होते. सैन्य थकून गेले होते. या उलट बाजीरावाचे सरदार, शिंदे होळकर त्यांच्याच वयाचे शिवाय बाजीरावावर अतिशय जीव असणारे होते.
निजामाला आपले घोडदळ, पायदळ, तोफखाना बाजारबुणगे घेऊन गोदावरी पार करायची होती. त्याचे सैन्यच नुसते चाळीस हजार होते. त्यासाठी त्याला तीन दिवस लागणार होते. पहिल्या दिवशी बिन्नीचे सैन्य, दुसऱ्या दिवशी निजाम, व तिसऱ्या दिवशी तोफखाना गोदावरी पार करणार होते. एक सबंध दिवस निजाम सैनिकांपासून वेगळा राहणार होता. बाजीराव या संधीची वाट पाहत होते. निजामाने गोदावरी ओलांडली न ओलांडली तोच बाजीरावांनी त्याच्यावर झडप टाकायला सुरुवात केली. पाण्याचा अभाव असलेल्या ठिकाणी त्याच्या सैन्याला यायला भाग पाडले. पाण्याबरोबरच अन्न व चारा मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. येत असलेली रसद लुटण्यात आली. उपासमार, पाणी नाही घोड्यांना शिबंदी नाही. शिवाय बाजीरावांच्या भीतीने झोप नाही. अशी सैन्याची कठीण अवस्था झाली. तरी देखील निजामाने काही तोफा आणून मुंगी-शेवगावला फळी उभारली. पण त्याच्या सैन्याची लढाईची अवस्था नसल्यामुळे, नाईलाजाने ऐबाजखानला तडजोडीसाठी बाजीरावांकडे पाठवले. बाजीरावांनी अटी घातल्या…..
१. संभाजीला ताबडतोब ताब्यात द्यावे.
२. शाहूराजांना मराठ्यांचा एकमेव सार्वभौम राजा म्हणून मान्यता द्यावी.
३. दख्खनच्या सहा सुभ्यांमधील चौथाई, सरदेशमुखीची थकबाकी द्यावी.
४. संभाजी निंबाळकरांकडून मावळ प्रांत काढून मराठ्यांना द्यावा.
संभाजीराजाला हवाला करण्याची अट सोडून बाकी अटी निजामाने मान्य केल्या. ह्या वाटाघाटी चालू असताना त्याने संभाजीराजेला पन्हाळावर पाठवून दिले. शाहूराजांना संभाजीचे जे काय करायचे ते करावे अशी अट कबूल केली आणि बाजीरावांना पोशाख देऊन सन्मान केला.
नंतर सामान्य गोष्टी सुरू असताना निजाम बाजीरावांना म्हणाला….
क्रमशः
संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख.
!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!!
भाग – १०
बाजीरावांना निजाम म्हणाला,
” यावेळी आम्ही तुमच्याशी दगाबाजी करून तुम्हाला कैदेत टाकले तर? कुठे आहे तुमचे शिंदे- होळकर? ते आता कशी मदत करतील?”
त्याच क्षणी बाजीरावांबरोबर असलेल्या हुजर्यांनी अंगरख्यात लपवून असलेल्या समशेरी सपासप उपसून बाजीरावांभोवती कोंढाळे केले. बाजीराव निजामाला म्हणाले,
” माझे शिंदे, होळकर नेहमीच माझे बरोबर असतात. ते आणि मी एकमेकांपासून कधीच दूर नसतो. “
बाजीरावांचे हुजरे हेच शिंदे होळकर सरदार आहेत हे कळताच, निजाम आश्चर्याने स्तंभित झाला. निजामाने शिंदे, होळकरांना मानाची वस्त्र देऊन त्यांचाही गौरव केला.
बाजीराव आणि त्यांच्या सरदारांमध्ये नेहमीच एक प्रकारची सुसूत्रता ( Wave length )दिसून येते. बाजीरावांच्या मोहिमा यशस्वी करण्यात या सरदारांचा महत्त्वाचा वाटा आहे. पेशव्यांनी मराठ्यांचा दरारा थेट दिल्लीपर्यंत बसवला असला तरी, त्या सबंध प्रदेशावर त्यांची निर्भेळ मालकी स्थापन झाली नव्हती. ” मुल्क खुदा का, मुल्क बादशहाका, अंमल मराठों का !! “अशी परिस्थिती निर्माण करण्यात सुद्धा या सरदारांची कामगिरी महत्त्वाची होती.
‘माळवा’ हा विंध्य आणि सातपुडा या दोन मध्य प्रदेश राज्यातील पर्वत रांगांमध्ये असणारा प्रदेश. उत्तर हिंदुस्तान आणि दक्षिण यांना जोडणारा एक महत्त्वाचा प्रांत म्हणून माळव्याचे महत्त्व होते. तापी नदी ; सातपुड्याचा भुलभुलय्या डोंगराळ प्रदेश. नर्मदा नदी आणि विंध्य पर्वताचे छोटे – मोठे पहाड. असे या बिकट प्रदेशाचे हे भौगोलिक महत्त्व आणि तेथील सामाजिक स्थिती व त्याचेही महत्त्व बाजीरावांच्या लक्षात आले होते. मराठ्यांना माळव्याची ओळख औरंगजेबाच्या कारकीर्दीतच झाली होती. त्यावेळी जसे संताजी, धनाजी छापे मारून औरंगजेबाची रसद तोडीत होते, तसेच नेमाजी शिंदे माळव्यात संचार करून कुमक व रसद मिळू देत नव्हते.
बाळाजी विश्वनाथाच्या काळात सुरू असलेले उत्तर हिंदुस्थानातील राजकारण बाजीरावांच्या काळात फुलून आले होते.
मराठ्यांचे माळव्याचे राजकारण बाळाजी विश्वनाथ पासूनच सुरू होते. दिल्लीहून परत येताना बाळाची विश्वनाथांनी मुद्दामच बाजीरावांना माळव्यात ठेवले होते. तेव्हापासूनच मराठ्यांच्या माळव्यातील हालचाली चालू होत्या. १७२२-२३ मध्ये बाजीराव माळव्यात शिरताच, मल्हारराव होळकर आणि उदाजी पवारांनी घाट ताब्यात घेतले. माळवा मोहिमेच्या शेवटी मल्हाररावांनी इंदूरला आपले ठाणे बनवले. तर उजाजी पवारांनी धारला !!
येथे आपणास थेट शिवरायांचे राजकारण आठवते. सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगिजांना शह म्हणून त्यांनी सागरी किल्ले / जंजिरे बांधले. आणि या सर्वांवर जबरदस्त वचक बसवला होता. तीच रणनीती इथे बाजीरावांनी माळव्यात अवलंबली दिसून येते. बलाढ्य दुश्मनाशी थेट जंग छेडण्याऐवजी त्याच्या — जणू प्राणवायुच आलेल्या नसांवर नियंत्रण आणणे हा अत्यंत बुद्धिमान डाव बाजीरावांनी प्रत्यक्षात उतरवला आहे.
माळव्याच्या मोहिमेवर खानदेश मार्गे चिमाजी आप्पा निघाले तर, अहमदनगर, वऱ्हाड, बुंदेलखंड येथून बाजीराव निघाले. माळव्यात अनागोंदी माजली होती. जोर जबरदस्तीने झिजिया नांवाचा कर वसूल केला जात होता. कोणीही पाच-दहा माणसे गोळा करावी, एखाद्या गावात शिरावे, लूटमार करावी. जनता अगदी त्रस्त झाली होती. त्यात सततच्या दुष्काळाने सारा ( महसूल ) जमा होत नव्हता. खर्च वाढत होता. खजिना रिता झाला होता. झिजिया कर लादल्याने कुळे, जमीनदार वगैरे सगळेचजण मोगलांवर संतापले होते. माळव्याचा सुभेदार सवाई जयसिंग, गिरधर व दया या बहादूर बंधूंच्या गैरकारभारवर चिडले होते. बादशहा मोहम्मद शहाला सांगूनही उपयोग होत नव्हता. तो रंगविलासात आंकठ बुडाला होता. त्यामुळे जयसिंगाची निष्ठाही डळमळीत झाली होती. सगळ्या रजपूत मांडलिकांनी जयसिंगाकडे तक्रार केल्यावर, त्यांनी मराठ्यांशी संगनमत करण्याचा सल्ला दिला.
इंदूरचे प्रतिष्ठित जमीनदार राव नंदलाल चौधरी मार्फत बाजीरावांशी संधान साधण्यात आले. नर्मदेतून बाजीरावांचे सैन्य पार करण्यासाठी नंदलालने उतारांच्या जागांची माहिती दिली. यापेक्षाही त्याने बरीच महत्त्वाची मदत केली. कशी ते बघा …..
विंध्य पर्वतातून माळव्यात जाण्यासाठी सुभेदार गिरधर आणि त्याचा चुलत भाऊ दया बहादूर निघाले असता, मुख्य घाटात त्याने सुरुंग पेरून ठेवले होते. त्याने २५,००० सैन्य बाजीरावांच्या पराभवासाठी सज्ज ठेवले होते. पण नंदलालच्या हेरांनी आधीच बातमी आणल्यामुळे मराठ्यांना त्यांनी भैरव घाटाने नेले. मराठ्यांनी मागे फिरून बहादूर बंधुंवर हल्ला चढविला. दोघेही बंधू मारले गेले. पराजित मोगल सैन्य पळून गेले.
मोगल सुखासुखी माळवा सोडायला तयार नव्हता. बादशहाने मोहम्मदशहा बंगश या सेनापतीला पाठवले. पण त्याचाही पडाव झाला. मग बादशहाने स्वतःचे खाजगी सैन्यासह मुजफ्फर खानला पाठवले. पण बाजीराव त्याच्या स्वागताला हजर होते. त्यांनी या सैन्याला आत शिरोच्यापर्यंत येऊ दिले. आणि एकदम मोगल सैन्यवर हल्ला चढवला. त्यांनी नेहमीच्या तंत्राने मोगल सैन्यांना इतके जेरीस आणले की,ते दिल्लीकडे पळून गेले. स्वतः बादशहाही परत गेला. माळव्यावर मराठ्यांचा अंमल बसला असला तरी, मध्य हिंदुस्थानातील मराठ्यांची मोहीम संपली नव्हती. माळव्याच्या लढाईनंतर बाजीरावांनी चिमाजी आप्पाला पत्र पाठवून कळवले की, शाहू महाराजांच्या कर्जाची फेड करण्याची मोहिम हाती घ्या. आणि बाजीराव बुंदेलखंडाकडे वळले.
क्रमशः
संकलन ; लेखन व ©® मीनाक्षी देशमुख.





