36. अपराजित योध्दा बाजीराव पेशवे भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन  “सेनाकर्ते”  किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  अपराजित योध्दा बाजीराव पेशवे !!! 

       !!!  प्रस्तावना  !!!

             !!  नमस्कार  !!

               आतापर्यंत आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयावर जसे.. धार्मिक, अध्यात्मिक, संत चरित्रे, ऐतिहासिक व इतरही ” ८१ ” व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. आपण सर्वांनी भरभरून माझे कौतुक केले. कोणी मेसेज द्वारे तर, कोणी फोन द्वारे. त्यामुळे मला लिहिण्याची ऊर्जा मिळत गेली. मी लिहित गेले… लिहीत आहे…

        आता आपल्यासमोर सादर करीत आहे  ” ८२ वे  पुष्प ”   ” अपराजित योध्दा बाजीराव पेशवे ” !

         नेहमीप्रमाणे आपल्या  प्रतिक्रिया अपेक्षित!

         या विषयावर लिहिताना बहुतेकांनी  बाजीराव मस्तानी हे केंद्रबिंदू मानूनच  लिहिले आहे. . त्यांचेवर लिहिलेली ” राऊ ” कादंबरी प्रसिद्ध आहे.  त्यात बाजीरावांपेक्षा मस्तानीच्या चरित्रावरच जास्त भर दिला गेलेला दिसतो.

आतापर्यंत बहुतेक पुस्तकांमध्ये बाजीरावांच्या अफाट शौर्य, बुद्धिमत्ता आणि युद्धनिपुणता या गुणांना म्हणावे तितके महत्व दिले नसल्याचे आढळून आले. बाजीरावांचे  कर्तृत्व  जनमानसापर्यंत पोहोचवावे, आजच्या पिढीला, तरुणांना स्फूर्ती मिळावी आणि त्यांच्यामध्ये शौर्य गुण, निर्भयता वाढावी या उद्देशाने ” बाजीरावचा वाढवावा प्रताप ” ही भूमिका घेऊन सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.

        हे चरित्र लिहिताना माझ्या वाचनातून काढून ठेवलेले संदर्भ आणि काही पुस्तकांचा आधार घेऊन माझ्या भाषेत शब्दबद्ध केले. त्या पुस्तकांच्या ज्ञात अज्ञात लेखकांचे ऋण मानते व कृतज्ञता व्यक्त करून लिहिण्यास सुरुवात करते.

            जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्रसामर्थ्य, अचूकता, सैन्याची चपळता,  रणनीती अचूक आखून ती समरभूमीवर  प्रत्यक्षात उतरविणे ; भौगोलिक परिसराचा अचूक लाभ उठवणे ;   सभोवतालचे भान ठेवणे ह्या गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. अलेक्झांडर, चेंगीझखान, ज्यूलियस सिझर, जनरल पॅटन, मियामोटो, मुसाशी हे जगात अजिंक्य ठरले गेलेत. आपण त्यांची चरित्रे आवडीने वाचतोही. आणि आपला इतिहास ? कधीतरी !!  शिवरायांच्या नंतर बहाद्दर योध्दा बाजीराव पेशवे  आपण वाचतो कधी ? उत्कृष्ठ सेनानींच्या आपल्या सूचीत किंवा पंक्तीत थोरल्या बाजीरावांचे नाव असायलाच हवे. . बाजीरावांच्या केवळ २० वर्षाच्या कारकिर्दीत लहान-मोठी ४१  युद्धे  झाली व ती त्यांनी सगळी जिंकली. त्यांना हार कधी पत्करावी लागलीच नाही.

      बाजीराव चार महत्त्वाची  युद्धे  लढले. त्यापासून बरेच शिकता येईल. ती चार युद्धे म्हणजे… पहिले युद्ध त्र्यंबक दाभाडे, कोल्हापूरचे बंडखोर संभाजी आणि निजाम यांच्या विरुद्ध लढलेली  ” डभोईची लढाई “. दुसरी… निजामा विरुद्ध जिंकलेली पालखेडची लढाई तिसरी… निजामाविरुद्ध जिंकली भोपाळची लढाई आणि चौथी… बुंदेलखंडात बंगशच्या विरुद्ध छत्रसालच्या बाजूने लढलेली लढाई.

        छत्रसालच्या बाजूने लढताना छत्रसालांना शिवाजी महाराजांनी दिलेले अभय, वचन बाजीरावांनी पूर्णत्वास नेले. इथे एक बाब आवर्जून लक्षात घ्यावी की ;  शिवरायांनी घालून दिलेले धडे  त्यांच्या पश्चात देखील सर्वांनीच प्रत्यक्षात उतरविले आहेत. त्यात हे बाजीराव पेशवे ठळकपणे  उठून दिसतात.

      छत्रसालने बाजीरावना आपला तिसरा पुत्रच मानले नाही तर, राज्यातील एक तृतीयांश भाग त्यांना दिला. आणि मस्तानीही. वास्तविक मस्तानी-  बाजीरावांचा सहवास केवळ १७ महिने इतकाच मर्यादित होता. पण त्यांचे बद्दल लिहिताना खेदाने म्हणावे लागते की, बाजीराव सारख्या लढवय्या, शूर, स्वाभिमानी  प्रशासकाच्या कर्तृत्वाकडे ; आदर्श गुणांकडे डोळेझाक करून  बाजीराव आणि मस्तानी विषयी अपप्रचार करून त्यांना विलासी ठरवले. करंट्या राज्यकर्त्यानी  आपला भव्यदिव्य इतिहासच विकृत करून ठेवला. ही खरे तर चीड आणणारी गोष्ट आहे. म्हणूनच या मालिकेचे प्रयोजन !!

    डॉक्टर दिघेंनी लिहिलेल्या  ” मराठ्यांचा इतिहास ” या पुस्तकात त्यांनी खोलवर संशोधन केले आहे. तसेच त्यांनी जंजिऱ्याची मोहीम ; वसईची मोहीम यात बाजीरावांचे खरे स्वरूप स्पष्ट केले. उत्कृष्ठ प्रशासक आणि अजिंक्य योद्धा असे बाजीरावांचे स्वरूप एका वाक्यात सांगता येईल. यावर पुढच्या  भागांमध्ये विस्तृत विवेचन येणारच आहे.

       बाजीरावांना  पेशवाईची वस्त्रे मिळाली ;  तेव्हा मराठ्यांच्या स्वतःच्याच घरात दुही माजली होती. राज्य छोटे, निजाम पूर्वेकडून तर, परकीय सत्ता दक्षिणेकडून. खजिना रिता अशा कठीण प्रसंगी बाजीरावांनी     स्वपराक्रमाने आणि मुत्सद्दीगिरीने राजपूत, बुंदेले तसेच मोगल सत्ताधाऱ्यांना मराठीशाहीच्या अंमलाखाली आणले होते.

प्रोफेसर नारायण केशव बहिरेंनी लिहिलेल्या  ” ” पहिले बाजीराव पेशवे ”  या पुस्तकात लिहिताना ते म्हणतात…” बाजीराव खरा शिपाई गडी होता. मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या सेनानीत त्याची गणना होईल.”

          नेपोलियन प्रमाणे बाजीरावांचे शब्दकोशात अशक्य शब्द नव्हता. मोगल येण्यापूर्वी हिंदुस्तान हिंदूंचा होता व तो पुन्हा हिंदूच झाला पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन,बाजीरावांनी  आपल्या हालचाली सुरू केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली चारही बाजूने आक्रमण सुरू झाले. ” हिंदू तितुका मेळवावा व हिंदू धर्म भारत खंडात विजयी करून दाखवावा ”  या महत्त्वाकांक्षेने ते झपाटले गेले.  १७२० ते १७४० या वीस वर्षाच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांची सैनिकी हालचाल किती चपळ होती हे त्यांनी बुंदेलखंडापासून पुण्यापर्यंत प्रवास केवळ २४ दिवसात केला यावरुन दिसून येते. त्या काळी वाहने नव्हती ; फक्त घोडे आणि सांडण्या असायच्या जलद प्रवासासाठी !!

          दिल्लीवर स्वारी करणारा बाजीराव हा पहिला मराठी सेनानी होय. ज्या चपळाईने त्यांनी  ” दिल्लीचेही तक्त फोडतो महाराष्ट्र माझा ”  हे खरे करून दाखवले.

         अशा या महान कर्तृत्ववान बाजीरावांचा खरा खरा इतिहास आपण पाहणार आहोत…

      क्रमशः
  मिनाक्षी देशमुख.

!!!  अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

                  भाग – १.

             छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन  “सेनाकर्ते”  किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा नेमला. आणि कान्होजी आंग्रेंशी मैत्री  घडवून आणली. अशी मैत्री प्रस्थापित झाल्याने शाहू राजांच्या राज्याला एक नवीन सामर्थ्य प्राप्त झाले.

        २ एप्रिल १७२८ रोजी पेशवे बाळाजी विश्वनाथचे निधन झाले. त्यांच्या जागी त्यांचा वीस वर्षाचा थोरला पुत्र बाजीरावांना शाहू राजांनी पेशवेपदी नेमले. या नेमणुकीला त्यांच्या बऱ्याच  मंत्र्यांचा  विरोध होता. पण शाहू राजांनी पटवून दिले की, बाळाजी विश्वनाथांचे प्रचंड उपकार आपल्यावर असल्यामुळे त्यांचा मुलाला निदान एक संधी द्यावी. दुसरे म्हणजे आम्ही स्वतः या बाजीरावाची हुशारी आणि शौर्य जाणून आहोत. ••••• आणि अशा प्रकारे बाजीराव  वयाच्या विसाव्या वर्षी पेशवे झाले.

         याआधी मराठ्यांचा इतिहास पाहणे आवश्यक आहे….

         खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजेंपासून स्वतंत्र मराठेशाहीच्या पर्वाला सुरुवात झाली. शिवाजीराजांच्या राज्यारोहणानंतर  दक्षिणेत मराठी सत्तेला राजकीय अधिष्ठान प्राप्त झाले होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. मराठ्यांना एकत्रित आणले.

         परंतु त्यांच्या मृत्युनंतर मात्र मराठा साम्राज्याची अवस्था नाजूक बनली. औरंगजेब महाराष्ट्रात उतरल्यावर, संभाजी राजांनी सतत नऊ वर्षे संघर्ष केला. ते  फितुरीमुळे पकडले  गेल्यावर औरंगजेबाने त्यांचे  हाल हाल करून त्यांना  ठार केले. त्यानंतर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठे एक होऊन त्या सर्वांनी  अतुल पराक्रम गाजवला. नंतर शाहू राजांचा  अंमल सुरू झाला. त्यावेळी मराठी राज्याला स्थिरता नव्हती. ज्या तडफेने शिताफीने, गनिमी काव्याने आणि कामालीच्या नेतृत्वगुणांनी छत्रपती शिवाजी राजांनी सगळे ऐतद्वेशियता सांभाळून स्वराज्याची निर्मिती केली, ते नंतरच्या शासकांना फारसे  साध्य करता आले नाही. स्वतःचा स्वार्थ साधणार्‍या सरदारांवर अंकुश मात्र प्रथम बाजीरावांनीच ठेवला.

           १६८० साली छत्रपती शिवाजी राजांचे निधन झाले. छत्रपती संभाजी राजे १६८९ मध्ये पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना ठार केले. त्यांचा पुत्र शाहू कित्येक वर्ष औरंगजेबाच्या ताब्यात होता. शिवाजी राजांचा दुसरा पुत्र राजारामाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी संघर्ष चालू ठेवला. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडेंनी मोगलास जेरीस आणले. छत्रपती राजारामांच्या  मृत्युनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी संघर्ष चालू ठेवला. औरंगजेबने मरताना आपल्या मुलांना सांगितले की, मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी योग्य वेळी शाहूची सुटका करा. त्याप्रमाणे शाहूंना सोडल्यानंतर मराठ्यांमध्ये फूट पडली. शाहूंचा हक्क ताराबाई मान्य करीना. त्यांच्यात यादवी सुरू झाली. यात बाळाजी विश्वनाथांची भूमिका महत्त्वाची होती. कोल्हापूर पक्षाचा पराभव झाला. राज्य दोन भागात वाटले गेले. कृष्णा नदीपलीकडचे राज्य कोल्हापूरकरांचे. तर अलीकडचे शाहू राजेंचे. याप्रमाणे छत्रपतींच्याच दोन गाद्या झाल्या. एक कोल्हापूरची आणि दुसरी साताऱ्याची !!

          बाळाजी विश्वनाथांनी राज्य व्यवस्थेत बरेच बदल केले. छत्रपती शिवाजी राजांनी वतने, जहागिरी पद्धत नष्ट केली होती, ती पद्धत शाहू राजांशी एकनिष्ठ राहणाऱ्या सरदारांसाठी पुन्हा सुरू केली. पण महसूल पाठवणे, प्रसंगी लष्करी सहाय्य करण्यास ते शाहू राजेंशी बांधील होते.

           शाहू राजे अजूनही मोगलांचे मनसबदार होते. म्हणजे मांडलीक होते. त्यांना स्वतंत्र राजा प्रस्थापित करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ प्रयत्नशील होते. १७२० एप्रिल मध्ये विश्वनाथांचा अचानक मृत्यू झाला. आणि पहिले बाजीराव पेशवेपदी आले. ते रणांगणातील सेनापती म्हणून आजोड होते. त्यांचा अवघा ४० वर्षांच्या आयुष्यातील निम्मी वर्ष लढाईतच गेली. अपराजित सेनापतीच्या समूहात त्यांची श्रेणी वरची व वेगळी ठरते. कारण जगाच्या इतिहासात एकही युद्ध न हरलेला हाच एकमेव सेनानी आहे.  बाजीरावांनी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा, त्यावेळी देशात दोन सत्ता प्रबळ होत्या. त्याकडेही बारकाईने पाहणे गरजेचे ठरते. पैशाने, ताकदीने आणि सर्व सुविधांनी प्रबळ मोगल सत्तेशी  बाजीराव पेशव्यांनी केलेला संघर्ष नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

       पहिल्या बाजीरावांच्या लष्करी नेतृत्वाचा परामर्श घेणे आवश्यक आहे. औरंगजेबानंतर निजामासारख्या बेरकी महत्त्वाकांक्षी दुसरा कोणी नव्हता. औरंगजेबने आपल्या सर्व गुणांना धर्मवेडेपणाने मातीमोल केले. मात्र निजाम शहाणा होता. त्याची महत्त्वाकांक्षा कधी न संपणारी होती. बाजीरावांच्या जीवनातील जेवढी वर्ष निजामाने खाल्ली, तेवढी कोणी खाल्ली नाही.

मराठा राज्याच्या उत्तरार्धात सतत अडथळा आणला तो या  निजामानेच.

             निजामाचे पूर्वज औरंगजेबाच्या पदरी आल्यापासूनच त्यांनी पराक्रम गाजवून मोगल दरबारात आपला दबदबा कायम राखला होता. बाजीरावांच्या काळात ज्या निजामाशी झालेल्या लढाईत मराठ्यांची सरशी झाली, त्या दीर्घायुषी निजामाने तीन पेशव्यांशी लढाई केली. मात्र त्याच्या असामान्य युद्ध नेतृत्वाला सर्वप्रथम धूळ चाटवली ती बाजीराव पेशवांनीच !! आणि नंतर माधवराव पेशव्यांनी.

           हा निजाम-उल् -मुल्क  तुर्राणी होता. त्याच्या गटातील सर्वात सामर्थ्यशाली उमराव होता. याचे खरे नाव होते चीन कीलीच खान. जन्म १६७१ चा. त्याला मिळालेली पदवी निजाम-उल् – मुल्क, बादशहा फर्खरुसियरने दिली होती.

           क्रमशः
संकलन ; लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

               भाग  – २.

            बाजीराव आणि निजामातील संघर्षाचे अनेक पैलू आपल्याला इतिहासात आढळून येतील. प्रत्यक्ष मैदानावर निजाम मराठ्यांशी लढला त्यापेक्षा जास्त चाली  (उपद्व्याप) तो रणांगणाबाहेर  खेळत होता. त्यामुळे मराठ्यांच्या – पर्यायाने बाजीरावांच्या राजकारणात अडथळा आणला जात होता. निजामाने सतत मराठ्यांमध्ये फूट पाडून मराठ्यांच्या विरोधकांना छुपी आणि  प्रसंगी उघडपणे मदत करून मराठेशाहीला खिंडार पाडण्याचे प्रयत्न केले. अशा या निजामाशी झालेल्या बाजीरावांचा सामना हा  कसलेल्या दोन  मल्लांच्या कुस्तीसारखा रंगतदार वाटतो.

        बाजीरावांच्या नेत्रदीपक, अजिंक्य कारकीर्दीचा परामर्श घेण्यापूर्वी, बाजीरावांचा उदय कोणत्या व कशा परिस्थितीत झाला ते पाहूया….

          बाजीरावांचा जन्म १७०० मध्ये झाला. त्याच्या नंतर आठ वर्षांनी चिमाजींचा जन्म झाला. यांचे पिता बाळाजी विश्वनाथांनी चासकमानच्या जोशींची कन्या काशीबाईशी बाजीरावांचे लग्न लावून दिले. आपल्या दोन्ही मुलांनी सिंहासारखे निर्भय आणि वाघासारखे ताकदवान असावे. त्यांच्यात नेतृत्वगुण असावेत हा दृष्टिकोन समोर ठेवून दोन्ही मुलांना शिक्षण दिले. बाजीराव दांडपट्टा चालवण्यात तरबेज होते. दोघेही सुदृढ होते पण चिमाजींना दम्याचा त्रास होता.

            बाळाजी आपल्याबरोबर लहानपणापासून बाजीरावांना मोहिमेवर नेत असत. बाजीराव अवघ्या अकरा वर्षाचा  असतानाच त्यांना थोरातच्या मोहिमेत नेले होते.  हा दमाजी थोरात एक मराठा सरदार होता. त्यांस बाळाजी विश्वनाथ यांचे वर्चस्व सहन होत नसे. म्हणून या दमाजीने बाळाजींना विश्वासघाताने पकडले, तेव्हा त्यांच्यासोबत बाजीरावही होते. नंतर शाहू राजेंनी खंडणी भरून दोघां बापलेकांना सोडवले.

           बाळाजींच्या शेवटच्या दोन वर्षात बाजीरावांनी सैन्य नेतृत्व केले होते. सय्यद हुसेन अली फर्खुरसियर खान बादशहाविरुद्ध दिल्लीवर चालून गेला, त्यावेळी बाळाजी त्याच्या मदतीला सैन्यासह गेले होते. त्या मोहिमेत बाजीरावांनी घोडदळाचे नेतृत्व केले होते. दिल्लीत वाटाघाटीच्या वेळीही बाजीराव वडिलांबरोबर उपस्थित होते. त्यामुळे बाजीरावांना लहान वयातच दरबारी राजकारणाची माहिती होत होती. याच वयात बाजीराव एक उत्तम लष्करी सेनानी आणि मुत्सद्दी म्हणून तयार होत होते. बाजीरावांची पेशवेपदी नेमणूक झाली, त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षाचे आणि चिमाजींचे दहा-बारा वर्षाचे होते. ‘गॅंट डफच्या म्हणण्यानुसार… बाजीरावांकडे आखणी करणारे डोके आणि  अमलबजावणी                 करणारे हात होते.’ शाहूराजेंनी बारा वर्षाच्या चिमाजींना  ‘पंडित’ किताब आणि  थोरातांची जहागीर बहाल केली होती.

               शाहूराजेंनी बाजीरावांना दिलेल्या पेशवेपदाला  त्यांच्या जुन्या सरदारांचा व सल्लागारांचा विरोध होता. यामागे  प्रतिनिधी श्रीपतराव होते. त्यांनी बाळाजी असल्यापासूनच दक्षिणी, कोकणस्थ ब्राह्मण व मराठे यांची फळी तयार करायला सुरुवात केली होती. यालाच दख्खन पक्ष म्हणत.

      बाजीराव पेशवे होण्याआधी पासून मोगल साम्राज्यात मोठी बेदिली माजली होती. बाजीराव – पेशवे होईपर्यंत ती बरीच विकोपास गेली होती. सय्यद बंधूंचे नामोनिशाण शिल्लक राहिले नव्हते. चंबळच्या दक्षिणेकडील मुलूख थेट कावेरी नदीपर्यंत बळकावला होता. त्याने स्वातंत्र्य पुकारले नव्हते इतकेच!

       दिल्लीपासून सुरतेपर्यंतचा मुलुख राजपूतांनी बळकावला होता. जाट आणि रोहिल्यांनी स्वतःची संस्थाने स्थापन केली होती. मोगल साम्राज्य ढासळायला सुरुवात झाली होती. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन, मोगली मुलूख हस्तगत करण्याचा विचार बाजीराव करीत होते.

       तर शाहू राजेंच्या प्रतिनिधींचा विचार होता, आधी दक्षिण भाग निर्वैध करून मग उत्तरेकडे वळण्याचा आग्रह धरत होते. प्रतिनिधींचा युक्तिवाद होता की, कोकणात सिद्दी बळावला आहे. निजाम वेशीवर उभा आहे. तेव्हा प्रथम त्यांचा समाचार घ्यावा. शिवाजी महाराजांचा बळकावलेला मुलूख परत जिंकावा. जिंजी परत घ्यावी. याआधी दिल्लीवर जाणे घातक ठरेल. बाजीराव प्रतिवाद करत म्हणाले, ” मोगलांच्या आपसी कलहाचा फायदा घेऊन, ही स्वराज्य वाढविण्याची ; आणि त्यांना हिंदुस्थान सोडायला लावण्याची  सुवर्णसंधी सोडू नये.”

       बाळाजी विश्वनाथांनी दख्खनच्या केवळ सहा सुभ्यामध्येच नाही तर, माळवा, गुजरातमध्ये चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मिळवले होते. परंतु निजाम व मोगलांचा या वसुलीला विरोध होईल हे शाहू राजे व बाजीरावांनी ओळखले होते. निजामाने कोल्हापूरच्या संभाजीराजांना मराठ्यांच्या चौथाईवर दावा करण्यास फितवून मराठ्यांच्या राजांमध्ये यादवी पेटवण्यास सुरुवात केली. निजामचा कायमचा बंदोबस्त करण्याचा बाजीरावांचा विचार होता. शाहूराजांनी बाजीरावला निजामाची भेट घेऊन मामला मिटवण्यास सांगितले.

जानेवारी १७२१ मध्ये खानदेशातील चाळीसगावला बाजीराव- निजाम भेट ठरली. तिथे निजाम मोठ्या सैन्यासह डेरा टाकून बसला होता. त्याने बाजीरावांचे स्वागतासाठी वैभवाचे प्रदर्शन मांडले होते.

       क्रमशः
संकलन  व लेखन  ©® मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

              भाग – ३.

            निजाम व बाजीरावांच्या भेटी होत होत्या.  चार दिवस चर्चा चालू होती. बाजीरावांच्या मुत्सद्दीपणाचा कस लागत होता. सुखासुखी निजाम मराठ्यांचा दावा मान्य करणार नाही, त्याला भाग पाडावे लागेल याची बाजीरावांना खात्री पटली.

               १७२२ मधे निजामने मुजारिज खानचा पराभव करून दख्खन वर कब्जा केला. नजीब वजीर होता. त्यांने औरंगाबादला राजधानी केली होती. पण मराठ्यांच्या धास्तीने नंतर हैदराबादला स्थलांतरित केले. १७२४ मध्ये तो स्वतंत्र झाला. चाळीसगावच्या भेटीनंतरही तो स्वस्थ बसला नव्हता. त्यादरम्यान कर्नाटकच्या दोन मोहिमांमध्ये शाहू राजांच्या आज्ञेनुसार बाजीराव गुंतले होते. पण त्यांचे चित्त मध्य व उत्तर हिंदुस्तानवर असल्यामुळे, कर्नाटक मोहिमेत त्यांचे मन लागत नव्हते. त्यांना प्रतिनिधी श्रीपतराव बरोबर नाईलाजाने जावे लागले.

        श्री दिघे व डॉक्टर पवार यांच्या संशोधनानुसार १७२४ मध्ये निजामने स्वराज्याची व इतर काही सनदा बाजीरावांना दिल्याचे नमूद केले आहे.

       मुगल सत्तेच्या शेवटच्या काळात मोगलांचे राज्य आतून जरी पोकळे झालेले असले तरी, वरवर नीट दिसत होते. तर मराठा राज्य प्रदीर्घ संघर्षातून बाहेर पडून सावरू लागले होते.

        अकबरने स्थापन केलेले, शहाजहानने आणि औरंगजेबाने वाढवलेले साम्राज्य त्याच्या पुढच्या पिढ्यांना साधे सांभाळताही आले नव्हते. एका सार्वभौम आणि सामर्थ्यवान साम्राज्याचा शेवट सुरू झाला होता. खजिना रिता झाला. लष्कराच्या मनातील लढण्याची उमेद खचली. प्रशासन बारगळले. या र्‍हासाला स्वतः औरंगजेब कारणीभूत होता. त्याचे धर्मवेडेपण ; सततच्या लढाया यामुळे त्याची प्रशासनावर पकड राहिली नाही. त्याने प्रत्येक गोष्टीला धर्माच्या तराजूतून तोलल्यामुळे मुत्सद्दीगिरीचा लोप पावला. निःसत्व अशी मोगल साम्राज्याची अवस्था झाली. याशिवाय निसर्गाची अवकृपा. सततच्या दुष्काळामुळे सारा, कर वसूल होत नसल्यामुळे खजिना रिकामा झाला. भरून काढण्यासाठी झिझिया कर लावला. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंचा रोष  ओढवून घेतला.

        त्याचे वारस निष्क्रिय, विलासी, मनोदुर्बल, नालायक, मूर्ख निघाले. र्‍हास थांबवण्याची कुवत एकातही नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर यादवी माजली. मुअज्जमने लढाई मध्ये भावांना ठार केले व स्वतः बादशहा बहादूर शाह नाव धारण करून तख्तावर बसला. त्याच्या कारकीर्दीत राजपूत दुरावले. शीख, जाट बंडखोर बनले. दक्षिणेतून मराठे मावळ्यापर्यंत आले. चिरे  ढासळायला लागले. बहादूरशहा सत्ताभ्रष्ट झाला. त्याचवेळी मराठे मावळ्यापर्यंत लूटमार करीत होते.

             मोगलाईत प्रत्येक बादशहाने काही कर्तृत्व करून साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पण बहादूरशहा अगदीच निष्क्रिय होता. त्याचा बराचसा वेळ चैन, विलासातच जात होता.६५ वर्षचा बहादूरशहा १७१२ मध्ये मरण पावला. पुन्हा वारसांचे युद्ध. चार पैकी तीन मुले लढाई ठार झाली. आणि जहाँदरशहा बादशहा झाला. तो अतिशय स्रीलंपट होता. त्याने एका नर्तकीला राणीचा दर्जा दिला. तिच्यासाठी तो वाटेल ते करीत असे. बेबंद, बेताल लंपट बादशहाच्या नाड्या सरदार दरकरांच्या हाती गेल्या. परिणाम व्हायचा तोच झाला.

           त्याचा पुतण्या फर्खरुसियरने आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी सय्यद बंधूंची मदत घेतली. जहांदरशहाने सैन्यांना कित्येक महिने पगार न दिल्यामुळे त्यांनी लढण्यास नकार दिला. शेवटी राजवाड्यातील सोन्या चांदीची भांडी मोडून पैसा उभा केला.

             १७ डिसेंबरला आग्र्याजवळ श्यामगड येथे फर्खरुखसियरचे सैन्य व जहांदरशहाचे सैन्य युध्दास समोरासमोर उभे ठाकले. बादशहाची निजामावर मोठी भिस्त होती. पण तोच शत्रूला मिळाला. जहादरशहाचा पराभव झाला. १७१३ मध्ये त्याला दिल्लीच्या किल्ल्यात मान मोडून ठार केले. आणि त्याचे शीर कापून फर्खरुखसियरलाला एका ताटात ठेवून भेट केले. नंतर काडीला लटकवून हत्तीवरून फिरवण्यात आले.

        फर्खरुखसियर तक्ख्तावर आला. हा अतिशय क्रूर होता. त्याच्या सात वर्षाच्या राजवटीत त्याचा दरबार कटकारस्थानाचा आगर बनले. सय्यद बंधूंच्या हातचे बाहुले बनला. त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यावर सय्यद बंधूंनी मराठ्यांची मदत घेतली. त्याबद्दल मराठ्यांना काही प्रदेशातील चौथाई  वसूल करण्याचा हक्क प्रदान केला. सय्यद बंधू व बादशहामधले वितृष्ट विकोपाला गेले. हुसेनअली प्रचंड सैन्यानिशी दिल्लीवर चालून आला. त्याचे अर्धे सैन्य मराठा होते. आणि मराठा सैन्याचा सेनापती होता पेशवे बाजीराव बाळाजी विश्वनाथ. लढाई झाली. व जनाखान्यात लपलेल्या ३६ वर्षे फर्खरुखसियरला पकडून प्रथम त्याचे डोळे काढले व नंतर ठार केले. मोगलांचा सर्वेसर्वा सय्यद बंधू बनले. अफाट राजकीय व आर्थिक शक्ती प्राप्त झाली. पण दोघां भावांमध्ये गादीसाठी स्पर्धा निर्माण झाली. शेवटी त्यांची साम्राज्यनिष्ठ संपुष्टात आली.

मोगल सैन्याचे केंद्रच डळमळीत झाले. त्याचवेळी दक्षिणेत मराठे शक्तिनीशी उदयास येत होते.

          क्रमशः
संकलन लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

                 भाग – ४.

               मोगल बादशहाच्या लहरी, मर्जीवर त्याच्या दरबारातील सरदारांचे जीवन आणि संपत्ती अवलंबून होती. शाहूराजा आणि बाजीराव पेशवे त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून होते. आणि पुढील डावपेचाची आखणी करीत होते.

       ब्रिगेडियर पळसोकरांच्या पुस्तकानुसार १७१९ मध्ये फर्खरुखसियरला सय्यद बंधूंनी सिंहासनावरून दूर करून रफीऊद्दाराजाला दिल्लीच्या सिंहासनावर बसवले. पण त्याला क्षयरोग झाल्यामुळे तो जूनमध्ये मरण पावला. त्यानंतर सय्यद बंधूंनी त्याचा थोरला बंधू रफीरुद्दौलाला दिल्लीच्या गादीवर बसवले. हा बादशहा देखील सप्टेंबर मध्ये मरण पावला. त्यानंतर सय्यद बंधूंनी बहादूर शहाचा अठरा वर्षीय नातू रोशन अख्तरचे मोहम्मद शहा नामकरण करून त्याला २८ सप्टेंबर १७१९ मध्ये दिल्लीच्या तख्तावर बसवले.

         मोहम्मदशहा उमदा होता. पण त्याला अधिकार काहीच नव्हते. सगळे महत्त्वाचे निर्णय सय्यद बंधूच घेत असत.

            डिसेंबर १७१३ मध्ये बादशहाने सवाई जयसिंगची माळव्याच्या सुभेदारपदी नेमणूक केली होती. आणि मुख्यालय उज्जैनला उघडले होते.

         खंडेराव दाभाडे आणि कान्होजी भोसलेच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी फेब्रुवारी १७१५ मध्ये सवाई जयसिंगवर हल्ला चढवला.  यात जयसिंगची प्रभावी कामगिरी पाहून बादशहाने जयसिंगाची प्रशंसा करून त्याला सय्यद विरुद्ध लढण्यास दिल्लीला बोलावले. पण तो दिल्लीला न जाता जयपूरला परत आला. या दरम्यान निजामचा चुलत भाऊ अमीनने जयसिंगच्या उज्जैनवर कब्जा केला.

       सय्यद बंधूंना दूर करण्यासाठी बादशहाकडून जी खलबते आली त्या विरोधात शाहूराजे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद हुसेनला सहकार्य केले.

          इकडे पश्चिम किनारपट्टीवर कान्होजी आंग्रेंचे संबंध इंग्रज व पोर्तुगीजांबरोबर वेगाने बिघडत चालले होते. शाहूराजांचे प्रमुख सरखेल या नात्याने कान्होजी आंग्रेंना या परकीय सत्तेचा मुकाबला करावा लागत होता. आपल्या सैन्याला हल्ला करणे सुकर होण्याच्या दृष्टीने शिवाजीराजांनी १६८२ मध्ये खांदेरीत किल्ला बांधला होता. मुंबई जवळ असल्याने  त्यांचा किल्ला घेण्याचा डाव इंग्रजांनी हाणून पाडला. शिवकालापूर्वी बांधलेल्या कुलाबा किल्ल्याला पुढे आरमाराचे प्रमुख केंद्र बनवण्यात आले होते.

           सोळाव्या शतकात विजापूरच्या बादशहाने सुवर्णदुर्ग बांधला होता. जंजिरावर लढाई करणे सोपे जावे या उद्देशाने शिवाजी राजांनी त्या किल्ल्याची डाग डुजी केली होती. विजयदुर्ग (जुने नाव घेरिया)  हा सुवर्णदुर्गच्या दक्षिणेस १०० मैलावर आहे. या ही किल्ल्याची राजेंनी डागडुजी करून किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधली. अंतर्गत रचना मजबूत केली होती. जंजिऱ्यात असलेल्या सिद्धीच्या हालचालीवर पूर्ण लक्ष राहण्याच्या हेतूने शिवाजीराजांनी या किल्ल्यावर बराच खर्च केला होता. पुढे याची जबाबदारी सरखेल आंग्रेवर आली.

            सागरामध्ये मराठ्यांच्या लढाऊ नौका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कान्होजी आंग्रेवर सोपवण्यात आली. त्यांना सागरी हुकुमतीचे सारे अधिकार देण्यात आले होते. त्यावेळी कान्होजींचे विरोधक होते… इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि वाडीचे सावंत.

          ज्यावेळी बाजीराव पेशवेपदी आले, त्यावेळेस कान्होजी आंग्रेजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या साठ युद्ध नौका होत्या. त्यात प्रत्येकी १६  ते २०  तोफा वाहून  नेणाऱ्या महानौका तसेच ८-१० तोफा वाहून नेणाऱ्या ३० हून लहान मोठ्या नौकाही होत्या. या नौकांवर सहा हजार खलाशी होते.

        कान्होजींनी कुलाब्याच्या किल्ल्यावर १००० पायदळ व ७०० घोडेस्वार तैनात केले होते.

         १७२१ मध्ये इंग्रज आणि पोर्तुगीजांची युती होऊन कान्होजींना जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी युद्ध  पुकारण्याचे गुप्तकारस्थान ठरले. ही गोपनीय बातमी कान्होजींना कळली. कान्होजींनी पेशवे बाजीरावांना मदतीची हाक मारली. बाजीरावांनी बिन्नीचे पथक घेऊन पिलाजी जाधवास पाठवले. कान्होजींनी पिलाजी जाधवरावांना अलिबागच्या दिशेने पाठवले.

          २९ नोव्हेंबर १७२१ ला चौल येथे पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या सेना एकत्रित आल्या. त्याचवेळी बाजीराव पेशवे स्वतः सात हजार घोडदळासह पिलाजी जाधवास येऊन मिळाले.

   या वेळची बाजीरावांची रणनीती जरूर बघावी. इंग्रज सैन्य ज्या ज्या ठिकाणी येऊन मराठी राज्यावर वरचढ ठरू शकत होते ; तो संपूर्ण पट्टा ( कुलाबा ते अलिबाग ) अगोदरच सज्ज करून तयार ठेवलाय. जणू हे सैन्य इंग्रजांची वाटच बघत होते. म्हणजे मूळ किल्ल्यावर येण्याच्या रस्त्याच्या तोंडाशीच शत्रूला अडकवून ठेवण्याची ही रणनीती आहे.

१२ डिसेंबरला इंग्रजांनी कुलाब्यावर चढवलेल्या हल्ल्यात इंग्रजांचा पराभव झाला. या लढाईत बाजीरावांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले होते.

           पोर्तुगीजांना कळून चुकले की, सामर्थ्यशाली मराठ्यांना नामोहरम करणे सहज शक्य नाही. पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रान्सिस्को जोझ दी साम्पय कॅस्टोने  मराठ्यांसमोर शरणागती पत्करली. ९ जानेवारी १७२२ रोजी त्याने मराठ्यांची तह केला. बाजीरावांचे सासरे महादजी कृष्णाजी जोशी चासकर यांनी शाहूराजांच्या वतीने तहावर साक्षरी केली. वारसोलीच्या तहानुसार मराठ्यांच्या शत्रूच्या लोकांना संरक्षण न देता, प्रसंगी मराठ्यांना मदत देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले. पेशव्यांना  योग्य दरात दारूगोळा विकण्याचे पोर्तुगीजांनी मान्य केले. त्या  बदल्यात कान्होजींच्या ताब्यात असलेल्या पोर्तुगीज नौका परत करण्याचे ठरले. परंतु हा तह अल्पकालीन ठरला. मराठ्यांचे सामर्थ्य वाढले. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांकडून चौथाई वसुलीची घोषणा केली. तणाव वाढला. वातावरण स्फोटक झाले. त्यावेळी बाजीराव पेशवे जेजुरीला गेलेले होते.

            क्रमशः
संकलन लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! अपराजित योध्दा बाजीराव पेशवे  !!!

               भाग  – ५.

              शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या लढ्याचा मुख्य उद्देश होता स्वराज्य स्थापना !! आणि त्यासाठी युद्ध हे साधन होते.

   युद्ध शास्त्रामध्ये तीन प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव होतो. ती तीन अंगे म्हणजे… १. विशाल युद्धनीती  (ग्रँड  स्ट्रॅटेजी)  २. लष्करी युद्धनीती (मिलिटरी स्ट्रॅटेजी) ३.  युद्ध व्यवहार  (टॅक्टीस) राष्ट्रीय स्तरावर राज्यकर्ते राष्ट्राचे उद्दिष्ट निश्चित करतात आणि त्यानुसार युध्दनीती ठरते.

           दुसऱ्या महायुद्धात चर्चिल, स्टॅलिन व रुझवेल्ट यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करणे हे आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट ठरवले होते. त्यासाठी जर्मनीचा  बिनशर्त पराभव ही युद्धनीती पक्की केली होती. याच न्यायाने छत्रपती शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य हे उद्दिष्ट ठरवले. त्याच्या पूर्ततेच्या आड येणाऱ्या —  मग ते स्वकीय असो की, परकीय ;  सर्व विरोधक शक्तीचा बिमोड करणे ही युद्धनीती निश्चित केली होती. आणि बाजीराव पेशव्यांनी या नीतीचा योग्य स्थळ, काळ पाहून स्वीकार केला होता.

           बाजीरावांना उत्तरेकडच्या स्वारीचे इतके वेड होते की, त्यांनी अंतर्गत विरोधाला न जुमानता उत्तरेतील  हल्ले कायम ठेवले.  शिवाजीराजांच्या गनिमी कावा तंत्राचा पूर्ण अभ्यास करून बाजीराव पेशव्यांनी मराठ्यांची सत्ता हिंदुस्तानभर पसरवली. छत्रपती शिवाजीराजांच्या गनिमीकावा व युद्धनीतीचा सर्वात जास्त उपयोग बाजीराव पेशव्यांनी करून घेतला. हिंदुस्थानात भीमा नदीपासून यमुना नदीपर्यंत स्वैर संचार करताना बाजीरावांनी युद्ध नेतृत्व असे नेत्रदीपक केले की, राजकारणात मुरलेले शत्रूचे सेनापती देखील हतबल झाले होते.

               बाजीरावांचे आयुष्य केवळ चाळीस वर्षे! पेशवाई मिळाली तेव्हा तेव्हा  उत्तर हिंदुस्थानाच्या राजकारणाची कोवळी सुरुवात झालेली. एवढ्या लहान वयातही एखाद्या निष्णात राजकारण्यासारख्या ;  आणि युद्धनीती तज्ञासारख्या ; बाजीरावांनी केलेल्या लढाया विशेष वाखाणण्यासारख्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या  नेतृत्वाची झलक दिसते. प्रामुख्याने दोन गोष्टीत विशेषतः दिसते. एक म्हणजे… गनिमी काव्याचे मैदानात वापरायचे सुधारित धोरण आणि दुसरे …. विशाल भूप्रदेशात सैन्याच्या अचूक वेगवान हालचाली.

         पेशवे बाजीरावांच्या युद्धाचे डावपेच गरजेनुसार व वेळेचे भान ठेवून असायचे. एकच मोहिम वर्षानुवर्ष सुरू ठेवण्यापेक्षा अचूक हालचाली आणि नेमका मारा करून यश मिळवण्याचे तंत्र त्यांना व्यवस्थित साध्य होते. बाजीराव कटाक्षाने सैन्यात घोडदळ जास्त ठेवत असत. त्या मानाने जड तोफ संख्या कमी असायची.  सैन्यात हत्ती सुद्धा जवळजवळ नसायचेच. अवजड  हत्ती आणि तोफा कमी असत. त्यामुळे  वेगाने मोठमोठ्या दौडी मारून शत्रूस जेरीस आणायचे. शत्रू जवळपास आला की त्याला वेढा देऊन, त्याचा दाणापाणी तोडून, उपासमार करून आपला कार्यभाग साधणे  हे बाजीरावांचे मुख्य तंत्र होते. त्यावेळी रेल्वे, रस्ते, तारायंत्रे, दळणवळणाची साधने अस्तित्वात नसताना एवढ्या लढाया जिंकायच्या, त्याही शेकडो शिपायांची जबाबदारी, स्वदेशी, घरभेदी आणि शत्रूंना एकाच वेळेस नामोहरम  करणे ही  सामान्य गोष्ट नव्हती.

           त्यांचेवर आरोप केला गेला जातो, त्यांनी कुशल तोफखाना व शस्त्रास्त्रांची निर्मिती केली नाही. पण सतत होणाऱ्या लढायामुळे, होणारे कर्ज, उत्पन्नाची अपुरी साधने, सरदारांच्या वाढत्या अपेक्षा, युद्धाव्यतिरिक्त या गोष्टींना सांभाळून वीस वर्षाच्या कारकीर्दीत जवळपास अर्धा हिंदुस्थान पालथा घातलेला दुसरा तरी इतिहासात कोणी आढळत नाही. शिवछत्रपती आणि बाजीरावांच्या युद्ध नेतृत्वाचा तौलनिक अभ्यास केला तर, दोघांचाही एकच हेतू दिसून येतो. की काळानुसार बदललेल्या तंत्राची बैठक पक्की असली तर विजय नक्की मिळतोच.

         बाजीराव ‘अजिंक्य योद्धा’ कसे ठरले ? तर गनिमी काव्याविषयी विचार केला तर, मलिक अंबरचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. हा मलिक अंबर ; बाल गुलाम म्हणून विकला गेला होता. पुढे तो अहमदनगरचा वजीर झाला. दख्खनमध्ये  तर त्याने पंधराशे सैन्याची फौज उभी केली. औरंगाबाद शहराची निर्मिती केली. पाश्चात्त्य इतिहासकार अंबरला दख्खनेतील गनिमी युद्धाच्या जनक समजतात. त्याने मोगल, विजापूरच्या बादशहाला नमावले. आणि निजामशाही कोसळत असताना त्याने नव्याने उभारली.

             १६०७ ते १६२६  या काळात तो अहमदनगरच्या निजामाचा वजीर होता. त्याने मोठे सैन्य उभारून परांड्याहून जुन्नरला राजधानी केली. आणि खडकी नावाची राजधानी उभारली. पुढील काळात औरंगजेबाने खडकी चे नामकरण करून औरंगाबाद ठेवले. मलिक अंबर वास्तुशास्त्रात निपुण होता. त्याचा भू-मापन, महसूल ; राज्याचे तिजोरी व्यवस्थापनचा मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेवर मोठा पगडा होता असे दिसून येते.

वेगवान घोडदौड, योग्य  वेळी आणि बेसावध शत्रूवर अचानक छापा मारून गारद करणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या या कर्तृत्वास  शहाजीराजे भोसलेंची साथ मिळाली.

          शिवाजीराजांकडून गनिमी काव्याचे धोरण बाजीरावांनी वापरून पुढे ते व्यापक आणि गतिमान बनवले हे खरे, परंतु शिवाजीराजांना गनिमी काव्याचे धडे मिळाले ते त्यांचे वडील शहाजीराजांकडूनच! पण श्रेय जाते मात्र मलिक अंबरकडे. महाराज तयार होत असताना, मलिक अंबरचे युद्धशास्त्राचे खोल संस्कार त्यांचे वर झाले असे इतिहासकारांचे म्हणणे आहे म्हणून मलिक अंबरचा  इथे उल्लेख केला. इतकेच!

           क्रमशः
संकलन ;  लेखन व ©®  मिनाक्षी देशमुख.

अपराजित योध्दा बाजीराव पेशवे संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading