आद्य शंकराचार्य भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  आद्य शंकराचार्य !!! 

भाग २१.

                  हळूहळू आचार्यांवर लोकांची श्रद्धा बसू लागली. हे आचार्य धनाची अपेक्षा करत नाही की, मानासाठी हपापलेले  नाहीत. निरपेक्ष, निष्काम भावनेने ; लोकहितार्थ सर्वांना मार्गदर्शन करतात. या विचाराने अनेक तरुणांच्या  मनात परिवर्तन घडत होते. याच बरोबर आचार्यांचे  अखंड लेखन कार्यही सुरू होते. हिमालयाच्या वास्तव्याच्या वेळी  गौडपादाचार्यांच्या आज्ञेने प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलेच होते. त्यामध्ये उपनिषदे, गीता, वेदांत सूत्रे, इत्यादींचा समावेश होता.  प्रस्थानत्रयीचा लेखनव्याप  मोठा होता. तोही त्यांनी सांभाळला. स्तोत्र लेखन अखंडपणे चालू होते.

        आचार्यांची सोपी अर्थगर्भ भाषा, काव्यातील गेयता यामुळे लोकांनी भराभर स्तोत्र मुखोद्गत केली.

         एकदा गंगातीरी शंकराचार्य विचार मग्न होऊन फिरत होते तिथे त्यांना एक वयोवृद्ध पारमार्थिक पाठ करण्याऐवजी डुकृत्र् हा धातू पाठ करीत होते असे दिसले. ही भौतिक विद्या आत्मसात करताना उगाचच शक्तिक्षय होतो असे वाटल्याने, आचार्य त्याच्याजवळ उभे राहून उच्च स्वरात म्हणू लागले…..

” भज गोविंद भज गोविंदं भज गोविंदं  मूढ मते।  

   प्राप्ते सन्निहिते  मरणं नहि नहि रक्षति डुकृत्र् करणे।”

     .     हे ऐकताच, वृद्ध चपापला लक्षपूर्वक आचार्यांचे स्तोत्र ऐकू लागला. एक एक श्लोक ऐकता ऐकता त्याच्या मनाला उपरती होऊ लागली. आपले जगणे फोल आहे, आपण वरवर आयुष्य व्यतीत करत आहो. नरजन्म सार्थकी लावत नाही. याची वृद्धाला जाणीव झाली. आचार्य म्हणाले….

” कस्त्वं  कोहं कुत आयातः  का मे जननी को मे तातः    

             हे  ऐकताच तो वृध्द अंतर्मुख झाला. हा हितोपदेश ह्रदयी ठसला. व जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागला.अशा वेगवेगळ्या प्रसंगांमधून आचार्य जनजागृती करीत होते.

    एकदा प्रवचन करीत असतात आचार्यांनी  छंदोग्य उपनिषदातील विषय घेतला. जीव ह्या जगात परत कसा येतो या विषयावरचे विवेचन आचार्य करीत होते. त्यावेळी श्रोत्यांमधील  एका वृद्ध महापंडिताने शंका विचारली. दोघांची बरीच चर्चा झाली. खर म्हणजे आचार्यांच्या उत्तराने त्याचे समाधान व्हायला हवे होते. पण प्रश्न उत्तराला वितंड वादाचे स्वरूप येण्याचा संभव दिसताच आचार्य शांत बसले.

                वितंडवाद टाळण्या साठी  आचार्यांनी पाळलेला  संयम पाहून तो वृद्ध आनंदित झाला. आणि आचार्यांच्या समोर ;  त्या वृद्धाचे रूपांतर साक्षात भगवान वेदोनारायण व्यासांमध्ये झाले. वृद्धाच्या रूपात येऊन ते आचार्यांची परीक्षा पाहत होते की, याच्या ठिकाणी प्रचंड पंडित्याबरोबर संयम, शांती, विवेक इत्यादी गुणधर्म आहेत की नाही?

     आचार्यांनी चटकन उठून वेदव्यासांचे पाय धरले. आपण करीत असलेल्या कार्यापाठीशी प्रत्यक्ष भगवंत उभा असल्याचे पाहून त्यांना अतिव समाधान वाटले.

         असेच एकदा ; नेहमीप्रमाणे पहाटेपूर्वीच्या काळोखात आचार्य गंगेवर आपल्याच विचारांच्या नादात स्नानासाठी जात होते. काळोखामुळे व विचारमग्न असल्यामुळे समोरून येणारा काळकभिन्न चांडाळ आचार्यांना दिसला नाही. चांडाळ त्यांना खेटून जाऊ लागताच, आचार्य झटकन ”  दूर हो.. दूर हो.. ” म्हणाले. केवळ लंगोटी घातलेला, सोबत चार कुत्र्यांना घेऊन जात असलेला चांडाळ म्हणाला,  

   ” हे यतीश्रेष्ठा, तू कोणाला दूर हो म्हटले? अरे, आपल्या दोघांचे देह त्याच पंचमहाभूतांचे  असताना, तू माझ्या देहाला दूर हो म्हटलेस? का ? अरे आचार्य, तू माझ्या आत्म्याला दूर हो दूर हो म्हणालास का? पण आत्मा तर नित्य शुद्ध, चैतन्यमय आणि अविनाशी असतो. तुला त्याची  बाधा  होण्याचे कारणच नाही.”

   आचार्य त्या चांडाळकडे पहातच राहिले. तो म्हणत होता ……

    ” अरे संन्याशा, तुझ्या व माझ्या देहातील चैतन्य शक्ती जर एकच आहे तर तू कोणाला दूर हो म्हटले? ” 

             चांडाळाच्या स्वरात जरब होती.आपादमस्तक चांडाळाला न्याहळत आचार्य  त्यास विचारते झाले …

    ”  तू हे ज्ञान कुठे संपादन केलेस?”

              चांडाळ म्हणाला,

” हे यतिंद्रा, तू गंगेच्या वाळवंटात रोज प्रवचन करतोस,  ते मीही मधून मधून ऐकतो. म्हणून तर हे असे बोलू शकलो. पण मला नवल वाटते  की, तू स्वतःला ज्ञानी म्हणून घेतोस. पण बोलतो एक, कृती दुसरीच आहे. तुझे खायचे आणि दाखवायचे दात वेगळेच आहे हे मला माहित नव्हतं. तू अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करण्याचे कंकण बांधले आहेस तेव्हा निदान तू तरी असा द्वैतभ्रम बाळगता कामा नये.”

               आचार्यांनी विचार केला, हा जन्माने कोणी असला तरी, ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष दिसतो. ते नम्रपणे म्हणाले,

” अरे, तुला आत्म्याचे सर्व व्यापकत्व कळले तेव्हा तू माझ्या गुरुच आहेस. असे म्हणून आचार्यांनी भर रस्त्यात साष्टांग नमस्कार घातला.”

                उठून उभे राहून पाहतात तो काय आश्चर्य! साक्षात श्रीविश्वनाथ ;  माता-पार्वतीसह आचार्यांकडे सस्मित मुद्रेने पाहत होते. आचार्यांना आठवले, ते हिमालयात आपल्याला दर्शन दिलेले दक्षिणामूर्ती !! चेहऱ्यावर तोच भाव, तीच सिग्नता, स्नेहमय ओथंबणारी नजर आणि तोच वरद हस्त !! आदिनाथांची  ही स्पंदने जाणवल्यामुळे ;  आचार्यांच्या भावना उचंबळून आल्या. कुत्रा आणि चांडाळ याच्या ठिकाणी मी समदर्शी रहावे म्हणूनच हे  आदिनाथा आपण चांडाळवेष धारण केलात ?भगवंता, किती काळजी करता आपण माझी? मी धन्य झालो आज !! “

    आणि तिथल्या तिथे त्यांनी भावमधुर स्वरात  “श्रीविश्वनाथाष्टक म्हटले. भगवंत प्रसन्न झाले.  

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ९-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                    भाग – २२.

                    आचार्यांना दृश्यादृश्य रूपाने हा सर्व समर्थ ; सर्व प्रकारचे सहाय्य करीत होता. आचार्यांचे ब्रह्मसूत्रावरील अविरत भाष्य लेखन चालूच  होते. सदनंदन उर्फ पद्मपादाचार्य त्या भाषेवर ” पंचदीपिका ” ही  टीका लिहू लागला. त्याचे पंचदीपका लिहितांना आवश्यक असणारे   चौफेर बुद्धीचातुर्य ज्ञान पाहून आचार्य थक्क होत असत.

            शंकराचार्य कुशल संघटक होते. त्यांचा शिष्य परिवार वाढला होता.ते सर्व शिष्य आचार्यांच्या शब्दाखातर प्राणार्पण करण्यास सिद्ध होते.

        देशाची दुर्दशा पाहून नुसती हळहळत  न बसता ;  तत्त्ववेत्ता चिकित्सक दृष्टीने आचार्य विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. पण परमार्था बरोबर राष्ट्राच्या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यासही ते करीत होते.

         एव्हाना  प्रस्थानत्रयीवर लिहित असलेले त्यांचे भाष्य पूर्ण झाले होते. शास्त्री पंडितांनी त्यावर बरीच चर्चा केल्यावर त्या भाष्याला मान्यता दिली. त्यामुळे होतकरू शास्त्री, विद्वान ; शास्त्रार्थासाठी आचार्यांकडे येऊ लागले. आचार्यांच्या यशाची पताका व त्यांचे नाव चहूकडे दुमदुमू लागले.

          एकदा चित्सुखाचार्य म्हणाले, 

   ” आचार्य आपण म्हणता, आपले धर्मकार्य साऱ्या भारतभर व्हायला हवे ; आणि सध्या तर चहूबाजूनी  अनाचार होत असताना, आपण काशीत किती दिवस थांबायचे?”

आचार्य म्हणाले,

” मी त्याच विचारात आहे. पण त्यासाठी शिष्यवृदांची सिद्धता व्हायला हवी. तीच करतोय.”

         आता काशीतील अग्रगण्य पंडितांमध्ये शंकराचार्यांची गणना होऊ लागली होती. काशीनरेश रतनसिंग महाराजांना ; आपल्या राजधानीत हे विद्वानरत्न असण्याचा अभिमान  वाटत होता. त्यांनी विद्वत्- पूजेच्या वेळी शंकराचार्यांना अग्र पूजेचा मान दिला. व समारंभ पूर्वक आचार्यांचे शिष्यत्व पत्करले .धर्म कार्याला राज्यसत्तेचा पाठिंबा मिळाल्यामुळे येणाऱ्या अडथळ्यांना तोंड द्यायला राजसभाबळ पाठीशी होती.

    एकदा शंकराचार्यांनी प्रवचनात भारत भ्रमणाच्या आणि सनातन वैदिक धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आवाहन केले. कित्येक तरुण या धर्मकार्यासाठी सहर्ष झोकून द्यायला तयार झाले .आचार्य म्हणाले, 

   ” गेल्या हजार वर्षापासून आपल्या देशातील धर्मस्थिती विचित्र झाली आहे. अनेक धर्मांनी वैदिक धर्मावर आक्रमणे  केली. पण गौरव आणि अभिमानाची गोष्ट हीच आहे की, आपला अनादि सिद्ध धर्म कोणीही नष्ट करू शकले नाहीत. महर्षी कौटिल्यांनी राष्ट्रमंदिराचा पाया रचला. ऋषीमुनी, द्विग्विजयी, सम्राट, स्मृतिकार, कवी, धर्मशास्त्राचे प्रणेते इत्यादी थोर पुरुषांनी या राष्ट्रमंदिराची बांधणी करून, त्याला भक्कम केलं. बाहेरच्या आघातांनी हा अनादिसिद्ध धर्म नष्ट होणे इतका लेचापेचा नाही.”

                आचार्य पुढे म्हणाले ;

” ज्यांची आपल्या धर्मावर श्रद्धा, आणि प्रेम आहे, ज्यांच्या नसानसात आपल्या पूर्वजांचे रक्त सळसळत आहे, ज्यांच्याजवळ आत्मविश्वास, उत्साह आहे त्यांनी या धर्मकार्यात स्वतःला झोकून द्यावे. पण लक्षात ठेवा, या कार्यात कुणालाही मानसन्मान मिळणार नाही. वैयक्तिक सुख, आनंदाला पारखे व्हावे लागेल. निंदानालस्ती सोसून सर्वस्व पणाला लावावे लागेल. हा सर्व विचार करूनच या पुण्यकार्यात सामील व्हावे.”

            एका शुभ मुहूर्तावर श्रीविश्वनाथ व अन्नपूर्णा देवीचे दर्शन घेऊन जयघोषात ही यात्रा द्विगविजयासाठी  प्रयागतीर्थाकडे निघाली.आचार्य अग्रभागी चालत होते. 

        आचार्यांनी त्रिवेणी संगमावर आपले माता-पिता, गुरूंचे स्मरण केले. संन्यास धर्मांत तर्पणाचा अधिकार नसतो. अक्षय वडाची  पूजा बांधून ते भारद्वाज आश्रमात आले. तिथे त्यांनी प्रयागाष्टक स्तोत्र रचले…

” सीता असते यत्र नरंग चामरे नद्यौ

  विभाते मुनी भानु कन्यके।

  लीलातपत्रं वर एव साक्षात्

   सतीर्थराजो जयती प्रयागः।”

    याशिवाय शंकराचार्यांनी माधवाष्टक, लक्ष्मी- नृसिंह पंचरत्न व वेदसार शिवस्तोत्रांची रचना केली.

         आचार्यांचे मधुर मंत्रमुग्ध प्रवचन सुरू झाले की, जे वेदविरोधी पंथाचे अनुयायी केवळ करमणुकीच्या दृष्टीने येत ; तेच  आचार्यांचे प्रवचन होताच प्रभावित होऊन ;  शिष्यत्व पत्करून मोकळे होत. इतकी ती प्रवचने प्रभावी असायची. आचार्य म्हणजे जणू धर्म धन्वंतरीच होत असत त्यावेळी !!

    आचार्यांचा शिष्य समुदाय दिवसेंदिवस वाढतच होता. त्यांच्या प्रवचनाने लोकांची मानसिक दुर्बलता नष्ट होत होती .आचार्यांची शोभायात्रा त्रिवेणी स्नानानंतर अक्षय वटवृक्षाच्या दर्शनाला शिस्तीत जात असे. एकदा अघटीतच घडलं.

                 आचार्य या वटवृक्षाच्या दर्शनाला जात असताना, एक ब्राह्मण तरुण महारोगाने ग्रस्त, अत्यंत  विद्रूप ;  नजर निस्तेज, असह्य जीवन झाल्याने तो प्राण त्यागाचे तयारीने तिथे आला होता.शंकराचार्यांना पाहताच त्याने लोटांगण घातले. जणू पूर्व प्रारब्धानेच त्या दोघांची गाठ पडली होती. आचार्यांनी गुरु स्मरण करून त्याच्या दुर्गंधयुक्त शरीरावरून हात फिरवला. आचार्यांचा हस्तस्पर्श झाला मात्र,  तात्काळ तो तरुण रोगमुक्त झाला. सारा शिष्य समुदाय आश्चर्याने पाहतच राहिला.

         धर्म -धनवंतरी असलेले आचार्य जणू शारीरिक व्याधीचेही धन्वंतरी झाले तर! त्या तरुणाचे नेत्र सतेज झाले .जमलेल्या समुदाय ओरडला…” उदंक…उदंक..”  (सर्व डाग नाहीसे झालेले)  त्या तरुणाला नामाभिधान  मिळाले….” उदंक” आनंदातिशयाने तो आचार्यांचे पायावर गडबडा लोळू लागला.  त्याची भावविभोरावस्था पाहून आचार्यांनी त्याला स्व -स्वरूपाची जाणीव करून दिली.  (उदंक म्हणजे कलंक नष्ट झालेला)…

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. ९-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                  भाग – २३.

                 आचार्यांनी साध्या सोप्या भाषेत स्वरूपाची उदंकला ओळख करून दिल्यावर, उदंकला आत्म्याची सर्व प्रकाशक म्हणून जाणीव होताच त्याने आचार्यांना अनन्यभावे शरण जाऊन  संन्यास दीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. धर्मउभारणी साठी आचार्यांनाही अशा संन्यस्त कार्यकर्त्याची आवश्यकता होतीच.  अर्थातच त्यांनी त्याची इच्छा पूर्ण केली.

               एक दिवस पद्मपादाचार्य म्हणाले,

  “आचार्य, इथून जवळच प्रतिष्ठानपुरी ही चंद्रवंशीय राजाची राजधानी आहे. तिथे कुमारील भट्टशिष्य प्रभाकराध्वरी राहतात. तेच माझ्या दिवाकर मामांचे गुरु. पूर्वी मी तिथेच राहिलेलो आहे. हे प्रभाकरध्वरी सध्या स्वतःचे गुरु कुमारील भट्टांना देखील मानेनासे झालेत. यज्ञयाग हाच ते परमेश्वर मानतात. ते अतिशय घमंडखोर आहेत, म्हणूनच आपल्याला भेटायला आले नाहीत.”

           शंकराचार्य म्हणाले, 

   ” आपणच त्यांना भेटायला जाऊ. विशेष म्हणजे त्यांचा वैदिक धर्मावर विश्वास आहे म्हणजे आपले ५०% टक्के काम झालेच म्हणून समज. शिवाय ते निष्ठावंत श्रद्धाळूही आहे. त्यांच्यातील काही चांगल्या गुणांचा आपण फायदा करुन घेऊ.”

            आचार्य आपल्या निवडक शिष्यांसह प्रभाकरध्वरीकडे जायला निघाले. प्रतिष्ठानपुरीतील श्रीवल्ली या  इनाम मिळालेल्या गावी त्यांचे वास्तव्य होते. स्वतः शंकराचार्य भेटीस येत असल्यामुळे त्यांना आनंद वाटला. तो मोठ्या घमंडीत आचार्यांच्या स्वागताला पुढे येऊन त्यांनी वादविवाद करण्याची इच्छा व्यक्त केली.

        सभा बोलावण्यात आली. “कर्म हाच परमेश्वर” या विषयावर दोघात वादविवाद सुरू झाला. आचार्य आपला मुद्दा पटवून देत होते. श्रोतृवृंद कानात प्राण आणून ही अमृतवाणी वाक् गंगा प्राशन करीत होती. श्रुती- स्मृती ज्ञान मार्गास पोषक असा अर्थ सांगून कर्मकांडापेक्षा ज्ञान मार्ग श्रेष्ठ हे आचार्यांनी पटवून दिले. आचार्यांच्या वाणीचा, त्यांनी प्रतिपादन केलेल्या तर्कशुद्ध विचारांचा, युक्ती वादाचा प्रभाकराचार्य व श्रोतेमंडळीवर अनुकूल परिणाम होऊन ते आचार्यांच्या पुढे विनम्र झाले. प्रभाकराचार्यांचे सगळे शिष्यही आचार्यांच्या मार्गाने यायला तयार झाले. हा आचार्यांचा मोठा विजय होता. आचार्य हे जणू वैचारिक व मानसिक परिवर्तन घडवून आणणारे धन्वंतरीच ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, बुद्धीमत्तेचा, परमार्थिक उंचीचा प्रभाव प्रतिपक्षावर सहज पडत असे.

           प्रभाकराचार्यांच्या घरचा पूर्वपरिचय असल्यामुळे पद्मपादाचार्य त्यांचे घरी जात येत असत. प्रभाकरध्वरींची पत्नी मोठ्या आत्मीयतेने पद्मपादांशी बोलत असे. एकदा म्हणाली,   

  ” अरे पद्म, माझा एकुलता एक घराण्याचा वंश असलेला मुलगा पृथ्वीधर दिसायला देखणा, तेजस्वी असून, तो काहीच बोलत नाही.  तो मुका आहे की, त्याला समज कमी आहे हेच कळत नाही.”

पद्मपादाचार्य म्हणाले,

   ” मातोश्री, एकदा पृथ्वीधरला आचार्यांच्या पायावर घाला. ते दाखवतील काही मार्ग.”

          ” पण त्यांच्या वडिलांना पटेल का? त्यांनी अनंत उपाय केले. मोठ-मोठे धन्वंतरी आणले. पण गुण आला नाही.” 

      पण रात्री तिने पतीला पटवून दिले की आपण निदान आचार्यांच्या समोर तरी पुत्राला न्यायला काय हरकत आहे ?  प्रभाकरधरांनी  विचार केला, गुण नाही आला तर निदान एका थोर विभूतीचे दर्शन तरी घडेल.  या विचाराने त्यांनी आचार्यांना आपल्या घरी पाचारण  केले.

         आचार्यासाठी उच्चासन घातले. थोड्याच वेळात हाताने धरून पृथ्वीधराला घेऊन प्रभाकाराचार्य आले. आचार्यांचा लक्षात आले इथे काहीतरी पुत्र समस्या आहे. त्यांच्या मातेच्या चेहऱ्यावरील दुःखछटा पाहून त्यांचे मन कळवळले. आचार्यांनी त्या मातेला मनोमने शक्ती स्वरूप वंदन करून पुटपुले…

” नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।”

        आचार्य पृथ्वीधराकडे एकटक पाहू लागले. त्याच्या  निर्बुद्ध चेहऱ्यावर किंचित स्मित उमटलेले पाहून त्याच्या आई-वडिलांना आश्चर्य वाटले. आचार्यांनी मोठ्या ममतेने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि  विचारले,….

” कस्त्वं शिशो, कस्य कस्य कुतोऽसि गन्ता।

किं नाम ते त्वं कुतःआगतोऽसि।

ऐतन्मयोक्तं वद चार्भक त्वम्।

मत् प्रीतये प्रीती विवर्धनोऽसि।।”

          अरे तू कोण आहेस? कोणाचा आहेस? कुठे जाणार? तुझे नाव काय? या प्रश्नाचे उत्तर दिल्यास मला आनंद होईल.”  इतके दिवस पूर्णत:  मुखस्तंभ असलेल्या पृथ्वीधराच्या मुखातून नादब्रह्म उमटले….

” नाहं मनुष्यो नच देव यक्षो।

  न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः

  न ब्रह्मचारी न गृही न वनस्थो।

भिक्षुर्न चाहं निजबोध रुपः।।”

         अर्थात  ” मी मनुष्य, देव, यक्ष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, अगर भिक्षु, संन्याशी यापैकी कोणीच नाही. उलट मी ज्ञानस्वरूप असंग असा आत्मा आहे.”  आणि ओळीने त्याच्या मुखातून बारा श्लोक बाहेर पडले. त्यात आत्मतत्वाचे  प्रतिपादन केले होते. पृथ्वीधराने आचार्यांच्या पायावर लोटांगण घातले. त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला…..

क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ९-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – २४.

                  आचार्यांनी प्रभाकराचार्यांना सांगितले,   

    ” हा पृथ्वीधर एक बाल योगी आहे. तुमच्या एकांडी कर्मकांडाला त्याचा विरोध होता. पण पित्याविरुद्ध बोलणार कसे? जनसंपर्क  टाळण्यासाठी तो मूढ बनवून वागत होता. तुमच्या प्रपंचात याचा काही उपयोग नाही. तुमची इच्छा असेल तर, या बालयोग्याला आपण माझ्या स्वाधीन करावे ; त्याचे कल्याण होईल. आपण आताच ऐकले ना , त्याने  आत्मतत्त्वाचा अर्थ तळहातावर असलेल्या आवळ्यासारख्या स्पष्ट केला. आपला मुलगा ज्ञानी, आणि बालयोगी आहे. मुका किंवा मूढ नाही.”  

   हे ऐकून ती माऊली हरखून गेली. अर्थातच ही किमया शंकराचार्याची आहे. त्यांच्या इच्छेनुसार होऊ द्यावे हा विचार करून तिने संमती दर्शक होकार आपल्या पतीला नेत्र संकेताने केला.

        मग शंकराचार्यांनी त्याला दीक्षा दिली. नामाभिधान केले.  “हस्तामलक”!!

    आता आचार्यांची शिष्यांसोबतची महायात्रा प्रयागजवळच्या कौशांबी नगरीत आली. शिष्यगणांसह ते कौशंबींच्या राजरस्त्यावरून चालले असताना एका घाटातून रडण्याचा आर्त स्वर ऐकू आला. चौकशी केल्यावर कळले की, एका ब्राह्मण कुटुंबातील एकुलता एक मुलगा अकस्मात वारला. वृद्ध माता-पिता धाय मोकलून शोक करत होते. आचार्यांचे कनवाळू मन द्रवले. ते त्या घरी जाऊन त्या वृद्ध जोडप्याचे सांत्वन करू लागले. त्या वृध्दाचे सांत्वन तर  झाले नाहीच, उलट शोकावेग असह्य झाल्याने आचार्यांना म्हणाला, 

” तुमच्या संन्यासीपणाचा काय उपयोग? नुसता शब्दांचा प्रसाद वाटत फिरता. “

         तो असेच बरेच काही बोलू लागला.

      आचार्यांनी मनोमन परमेश्वराची प्रार्थना केली. त्या मुलाच्या अंगावरून हात फिरवला. त्या कलेवरात हालचाल झाली. तो एकदम उठून बसला. वृद्ध मातापित्यांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही आता !!  सर्वांनी एकमुखाने आचार्यांचा जयजयकार केला. वृध्द पित्याने त्यांना दूषणे दिली म्हणून त्याने क्षमा मागत त्यांच्या पायावर लोटांगण घातले. सारे वातावरण आचार्यामय झाले.

       आचार्य कौशंबीला असतानाच बातमी आली की, रुद्राख्यपुरातील कुमारील भट्ट तृषाग्नी भक्षण करून देहार्पण करणार आहे. आचार्यांनी ताबडतोब रुद्राख्यपूरला जाण्याचा निर्णय घेतला. उदंकने विचारले,

   ” आचार्य, हे कुमारील भट्ट कोण आहेत? अरेऽ, या कर्मकांडी महापुरुषांनी आम्हा वैदिक धर्मीयांचा मार्ग अनंत अडचणी दूर करून मोकळा केला. आजच्या प्रवचनात कुमारील भट्टांची माहिती सांगेन…”

             प्रवचनाच्या वेळी प्रथम पूर्वपीठिका सांगून आचार्यांनी कुमारील भट्टांची माहिती सांगण्यास सुरुवात केली… 

  ” कुमारील भट्ट हे पूर्वमीमांसेचे;  कर्मकांडाचे महान अर्ध्वयू !! वैदिक कर्मकांड आणि यज्ञयागाचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केलाय.ज्या काळात आपल्या वैदिक कर्मकांडात पशुहिंसा शिरली व त्याचा स्वार्थासाठी अतिरेक होऊ लागला, त्याच वेळी भगवान बुद्ध, महावीरांनी सुधारणावादी चळवळ उभारून ; अहिंसेच्या तत्त्वप्रणालीचा आधार घेऊन स्वतंत्र धर्म काढून लोकांच्या मनावर पगडा बसवण्यास सुरुवात केली. राजाश्रय मिळवून अवैदिक धर्माचा प्रसार त्यांनी वेगाने करायला सुरुवात केली. या लोकांनी वैदिक कर्मकांड आणि तत्त्वज्ञानावर प्रचंड हल्ले चढवून जनसामान्यांची मने खिळखिळी केली होती.  आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही प्राप्त झाले होते. त्याचवेळी कुमारील भट्टानी देशकालीन परिस्थितीचे अवलोकन आपल्या कुशाग्र बुद्धीने सखोल अभ्यास करून लोकांच्या निदर्शनास आणून दिले की, हे बौद्धधर्मीय, जैनपंथीय लोक काही वेगळे तत्त्वज्ञान मांडत नाही तर, आपल्याच  पुराण ;  वेद ग्रंथातील विचार वेगळ्या  शब्दात सांगून वैदिक अनुयायांची दिशाभूल करतात.   कुमारील भट्टांचे ; वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कुमारील भट्ट यांनी आपल्या पदाचा उपयोग करून घेत ; आपले सर्वस्व पणाला लावून विना विश्रांती अविरत कार्य सुरू ठेवले. त्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा सांगोपांग अभ्यास केला. धर्मासाठी त्यांनी भेदनीतीचा अवलंबन केला. व बौध्दधर्म स्वीकारला.

        नंतर त्यांनी जैन धर्मात प्रवेश केला. जैन यती तंत्रविद्येत प्रवीण आहेत. जारण, मारण, वशीकरण अशा विद्या त्यांनी आत्मसात केल्या. आणि जैन धर्म गुरुलाच आव्हान करून काट्यानेच काटा काढायचे ठरवले. जैन साधू वेदनिंदा करीत तेव्हा भट्टांना अतिशय दुःख होत असे. काही धूर्त जैन साधूंना त्यांच्याबद्दल संशय आल्याची जाणीव झाल्यावर, आपल्या विरुद्ध षडयंत्र रचले जाण्याची शक्यता आहे हे जाणून भट्टाचार्य सावधगिरीने वागत. आणि सही सलामत सुटकेचा मार्ग शोधत होते.

             एका रात्री कुमारील भट्टांना संधी मिळाली. त्यांनी सापळा तोडून द्वारकेकडे प्रयाण केले. तिथे जैन धर्मीयांचा  मोठा प्रभाव प्रजा व राजावरही होता. पण कुमारील भट्टानी आपल्या युक्तिवादाने व हिंसारहित यज्ञयागाने जनमत आपल्या मतप्रणालीकडे वळवले. राजावर सुद्धा त्यांच्या मतप्रणालीचा प्रभाव पडला.

     राजाने राज दरबारात वादसभा आयोजित केली. कुमारील भट्टानी जैन साधूंचा पराभव केला.

             कुमारील भट्टाचा दरबारात प्रभाव पडला. आणि वैदिक  धर्माला राजाश्रय मिळाला. हळूहळू कुमारील भट्टांच्या कामाचा व्याप वाढू लागला.”

       इतके सांगून  शंकराचार्य म्हणाले,

  “अशा महापुरुषाला तृषाग्नी  भक्षण करण्याची वेळ का यावी, हे प्रत्यक्ष रुद्राख्यापुरी जाऊन प्रत्यक्ष कुमारील भट्टांना भेटून जाणून घेऊन ;  देहत्यागाच्या  निर्णयापासून त्यांचे मन वळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आम्ही उदयिक रुद्राख्यापुरला प्रस्थान करू…”

         क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. ९-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – २५.

    मागील भागापर्यंत आपण कुमारील भट्ट यांच्याकडे जाण्याचा शंकराचार्यांचा निश्चय बघितला. त्यामागील आणखी एक उद्देश असाही होता की — आचार्य ठिकठिकाणी पंडितांच्या बरोबर शास्त्रार्थ करून त्यांना जिंकीत असत ; आणि वैदिक धर्माच्या कार्याकडे वळवत असत. कुमारील  भट्ट तर वेदप्रामाण्य मानणारे होतेच. विद्वान आणि चिकित्सक असे धर्मज्ञानीही होते. आचार्य शंकर देखील याच सनातन धर्माच्या प्रचार प्रसाराची पताका घेऊन दिग्विजयासाठी भारत भ्रमण करीत होते. फरक एवढाच होता की आचार्य ज्ञानमार्ग प्रधान मानत ; तर कुमारील भट्ट कर्ममार्ग !!

   तेव्हां त्यांच्याशीच शास्त्रार्थ करून त्यांना आपल्या बाजूचे केले तर आपल्या कार्यास सुंदर गती मिळेल हे आचार्यांना ठाऊक होते. म्हणून याही उद्देशाने ते त्यांना भेटण्यास उत्सुक होतेच. मागील भागात आचार्य ;  कुमारील भट्ट यांच्याबद्दल किती आदर बाळगून होते तेही आपण बघितले आहेच. आता आपण मुख्य कथानकाकडे वळू यात…..

                  शंकराचार्य जेव्हा रुद्राख्यपूरला  पोहोचले तोवर कुमारील भट्ट भातांच्या तुसांच्या ढिगावरच्या चित्तेवर एका शुभ मुहूर्तावर पहुडलेले होते ; आणि नुकताच त्या चितेस मंत्रांग्नी दिला गेला होता. पावलांच्या घोट्यापर्यंत अग्नि पोहोचला होता. तरी ते शुद्धीवर होते.

आचार्य म्हणाले,   

  ” हे द्विजश्रेष्ठ! आत्मदहन करण्याचे कारण काय? हे अज्ञानपण् नाही का ?”

         भट्टांनी विचारले.

  ” मला अज्ञानी ठरवणारा तू कोण आहेस?”

   ” मी शंकराचार्य! “

       एवढे ऐकताच कुमारील भट्टांना अतिशय आनंद झाला. मृत्युसमयी एका सत्पुरुषाचे दर्शन घडले यासारखे आणखी पुण्य कोणते? अग्निशैयेवर असूनही त्यांना आत्मिक शांती प्राप्त झाली.

         कुमारील भट्ट म्हणाले,

   ” मी हा निर्णय विचार पूर्वक घेतला. माझ्याकडून गुरुद्रोह झाला. त्याचे प्रायश्चित घ्यायला नको?” या

           ” गुरुद्रोह?  तो कसा? “

कुमारील भट्ट सांगू लागले …  

      ” आचार्य, मी द्वारकेत असताना विजय मिळवला. द्वारकेचा राजा सुधन्वा हा जैनांच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याला वैदिक धर्माची महती  पटवून वैदिक धर्माकडे वळवणे आवश्यक होते. मी माझे कार्य नेटाने करून जैन गुरु कानकाचार्याच्या बरोबर झालेल्या वादात जय मिळवला. राजाने माझी कसोटी पाहण्यासाठी एका उंच डोंगरकड्यावरून उडी मारायला सांगितली. मी जैनविद्येत प्रवीण असल्यामुळे भगवंत स्मरण करून बिनदिक्कत उडी मारली. व सहीसलामत राहिलो. पण राजा एवढ्यानेच थांबला नाही. त्यांनी दुसरी अघोरी कसोटी घेण्याचे ठरविले. त्याने एका घागरीत विषारी सर्प ठेवून घागरीचे तोंड बांधून ती पालथी घातली आणि घागरीत काय आहे हे ओळखण्यास सांगितले. चुकीचे उत्तर आल्यास शिरच्छेदाची शिक्षा होणार होती. मी सूर्याची प्रार्थना व गुरुस्मरण केले. मनात म्हटले,

  ” मी करत असलेले धर्मकार्य आणि माझी प्रतिष्ठा प्रखर असेल तर उत्तर बरोबर येईल.”

        मी शांतपणे म्हटले,

  ” या घागरीत शेषषायी नाग आहे.”

” अर्थात माझे उत्तर चुकीचे निघाल्यामुळे जैन मंडळींना आनंद झाला.पण घागर उघडताच त्या विषारी सर्पाचे रूपांतर शेषशायी नागात झालेले होते. भगवंताने माझी लाज राखली होती.”

          या कसोटी नंतर मात्र राजा सुधन्वा पूर्णपणे  बदलला. त्याने जैन धर्माचा  त्याग तर केलाच पण सरसकट जैन साधूंची कत्तल करण्याचे फर्मान काढले. त्यात माझे गुरु कानकाचार्यही होते.”

              यावर पद्मपादचार्य म्हणाले,

  ” तुम्हाला राजमान्यता मिळाली होती. धर्मकार्य करण्यास अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली असताना, हा देह त्यागाचा निर्णय का घेतला?”

               आतापर्यंत कुमारील भट्टांना अग्नीने गुडघ्यापर्यंत ग्रासले होते. ऐकणारे सर्वजण अग्निचितेवर असून सुद्धा शांतपणे बोलणाऱ्या कुमारिल भट्टाकडे पाहून दिगमूढ झाले होते. काय हे धाडस? वैदिक धर्मावर केवढी ही निष्ठा?

          शंकराचार्य स्तब्ध उभे राहून ईश्वर स्मरण करत होते. प्रारब्ध कुणालाही बदलता येत नाही. भट्टपादांची मृत्यूची वेळ जवळ आली होती. त्यांचा मृत्यू असाच होणार हे विधिलिखित होते.

      भट्टपादाचार्य म्हणाले, 

  ” आचार्य, हा माझा देहत्याग  नसून देहयज्ञ आहे. न कळत का होईना माझ्यामुळे गुरुवध झाला. म्हणजेच मी गुरुद्रोह केला .त्याचे प्रायश्चित घ्यायलाच हवे. या क्षणी मी पूर्ण आनंदात आहे. शेवटची इच्छा आपल्या भेटीची होती ती अगदी सहजपणे पूर्ण झाली.”

        शंकराचार्य म्हणाले, 

” भट्टपाद, आपण माझ्या पेक्षा वयाने, अनुभवाने वडील आहात. मृत्युसंबंधी भगवद्गीता काय सांगते हे आपल्याला माहित आहे. “नायंहन्ति न हन्यते।”  मग हे देहक्लेश  कशासाठी?”

           भट्टपाद म्हणाले,

” हे देहक्लेश नव्हेतच; तर ही स्वच्छ मनाने स्वीकारलेली शांती आहे. शिवाय भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे…

” नैनं छिन्दान्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।”  या नात्याने माझ्या गुरुची हत्या झाली नाही. व मी पण आत्महत्या करीत नाही.”

  शंकराचार्यांनी त्यांना आपला शास्त्रार्थ करण्याचा उद्देश सांगताच •••••••

       चित्तेवर असलेले भट्टपादाचार्य नमस्कार करून शंकराचार्यांना म्हणाले, “

  “आचार्य, मी तुमच्या भावना जाणतो. पण माझा देहत्याग अटळ आहे. मी आता वडीलकीच्या नात्याने काय सांगतो ते ऐका…  

  ” माझी भगिनी सरस्वती, तिचे पती मंडनमिश्र हे दोघेही नर्मदा तीरी राहतात. मंडनमिश्र माझा शिष्य असून तो सकल विद्या संपन्न आहे. तरीही माझ्यासारखाच पूर्व- मीमांसा प्रणित कर्मकांडांचा महान उपासक आहे. त्याला आपण आपली मते पटवून द्यावीत. म्हणजे आपले वैदिक धर्मप्रसाराचे काम सुकर होईल.

 आचार्य, मी आता इहलोक सोडतो. आपण मला तारक मंत्र देऊ उपकृत करा.”

   कुमारील भट्ट यांनी आचार्यांची योग्यता जाणली होती ; म्हणूनच त्यांनी ही मागणी केली आहे हे इथे आवर्जून लक्षांत घेण्यासारखे आहे ना ? सत्य सनातन धर्म याहून भिन्न काय असणार ? असो !!

    आचार्यांनी त्यांना तारक मंत्र दिला ; आणि भट्ट यांनी आपले प्राण ब्रह्मरंघ्रात नेले. आणि  त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली.

    शंकराचार्यांचा शिष्य समुदाय बराच वाढला होता. त्या साऱ्यांना घेऊन यात्रा केल्याने विशेष असे काही साध्य होणार नव्हते. त्यापेक्षा काही शिष्यांनी संघटित होऊन भारताच्या चतुःसीमा एका सूत्राने ग्रथित करून कार्य करायला हवे. त्याद्वाराच  सामान्य जनतेचे मनःसाम्राज्य विशाल होऊन वैदिक धर्माची सत्ता प्रस्थापित व्हायला हवी. त्या दृष्टीने प्रयत्नास लागायला हवे.. या विचारांनी आचार्य त्या दृष्टीने आता प्रयत्न करण्याचे नियोजन करू लागले.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. ९-९-२०२३.

आद्य शंकराचार्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading