37. आद्य शंकराचार्य भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  आद्य शंकराचार्य !!! 

    

!!!  प्रस्तावना  !!!

               !! नमस्कार !!

            आतापर्यंत आपल्यासमोर वेगवेगळ्या विषयांवरील ७१ व्यक्ती चरित्रे प्रस्तुत केलीत. आपल्या उत्स्फूर्त  प्रतिसादामुळेच मला लिहिण्याची ऊर्जा मिळत गेली. आज ७२ वे  पुष्प  “आद्य शंकराचार्य” घेऊन येत आहे.

     नेहमीप्रमाणे आपल्या क्रिया प्रतिक्रिया अपेक्षित!

            तो काळच असा होता की आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसात अनावस्था निर्माण झाली होती. परधर्मियांची आक्रमणे होऊन धर्माला ग्लानी आली होती.

” धर्म संस्थापनार्याय संभवामि युगे युगे” हीभगवदोक्ती आचार्य शंकराचार्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते. आपण श्रीकृष्ण, राम जन्मोत्सव फक्त साजरा करतो. पण त्यांचे जीवन, तत्त्वज्ञान अंगिकारायचा विचार  कोणीच करत नाही.

   आचार्य शंकर यांच्या काळात धार्मिक मतमतांतरांची नुसती बजबजपुरी माजली होती. कथित धर्ममार्तंड समाजाला दिगभ्रमित करून स्वार्थ साधण्यापलीकडे काहीही करीत नव्हते. अन्यायपूर्वक अकारण पीडा भोगत होता भारतीय  समाजपुरूष !! अशा बिकट काळात भ. श्रीकृष्णांच्या वचनाची प्रचिती म्हणूनच की काय आचार्य शंकर यांचे आगमन या भूतलावर झाले होते.  वैदिक धर्मावर भयंकर संकट आले असताना या महात्म्याने अवतार घेतला. अल्पवयातच या महामानवाने सर्व भारतभर पदयात्रा करून धर्मजागृती केली. आपल्या प्रकांड अभ्यास, प्रखर बुद्धिमत्ता आणि प्रभावी वक्तृत्वाने  सर्वच धर्मांच्या प्रमुखांशी, श्रेष्ठींशी वाद, चर्चा करून ;  इतर धर्माचा योग्य तो मान राखून हे महामानव दिग्विजयी झालेत.

                या महापुरुषाच्या जन्माच्या अगोदरपासून  अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, सनातन धर्म आता टिकतो की नाही ? परंतु या पुरुषोत्तमाने  आपल्या संयमित , सदाचारी आचरणाने, आंतरिक तळमळीने जनमानसात उच्च स्थान मिळवून ; संभ्रमात पडलेल्या समाज बांधवांना संघटित करून त्यांना धर्माभिमुख केले. अगदी अल्पवयात त्यांना  “जगद्गुरु” ही सन्माननीय पदवी जनतेनेच उत्स्फूर्तपणे बहाल केली. सर्व भारत पादाक्रांत करून हिंदू धर्माचे पुनरुत्थान करण्याचे जे महान उत्तुंग कार्य आद्य शंकराचार्यांनी केले त्याला तोड नाही.

“अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद्।

  षोडशे कृतवान् भाष्य द्वात्रिंशे मुनिभ्यागत्।”

              आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन पूर्ण करून बाराव्या वर्षी ते सर्व शास्त्र पारंगत झाले. १६ व्या वर्षी त्यांनी प्रस्थानत्रयीवर म्हणजे उपनिषदे, ब्रह्मसूत्र व भगवद्गीता यावर भाष्य लिहिले. ३२ व्या वर्षी या महामानवाने आपला जीवन प्रवास संपवला.

     बौद्धांच्या निरिश्र्वर वादामुळे ;  वैदिक धर्मात घुसलेली मरगळ  नाहीशी करण्याचे महान कार्य आचार्यांनी केले. अद्वैताचा ध्वज हाती धरून वैदिक धर्माचे पुनरुस्थान केले. त्याचे सातत्य रहावे म्हणून त्यांनी चारही दिशांना पीठे  स्थापन करून मतलबी लोकांशीच नव्हे तर, केवळ  कर्मकांडातच गुरफटून असलेल्या वैदिक धर्मियांबरोबर शास्त्रोक्त चर्चा आणि  वादविवाद केला. वैदिक धर्मातील ७२ पंथीयांना एकत्र करण्याचे कठीण काम करताना त्यांना खूपच परिश्रम करावे लागले. त्यासाठी त्यांनी पंचायन पूजा रुढ केली. त्यामुळे त्यांना “प्रच्छन्न बौद्ध “सुद्धा म्हणायचे.त्यांनी स्थापिलेल्या चारही पीठाची बोधवाक्ये ही हिंदू धर्मातील चार महावाक्येच आहेत.

        चाणक्याने ३५०० वर्षांपूर्वी राज्यक्रांती केली तर आचार्यांनी २५०० वर्षांपूर्वी धर्म क्रांती घडवूनआणून सुप्तावस्थेतील हिंदूंना जागृत करून धर्माचे पुनरुत्थान केले. आचार्यांचे अद्भुत जीवन चमत्कारांनी भरलेले होते. सामान्यांना चमत्कार अद्भुत वाटत असला  तरी ते योग्यासाठी सहज घटने सारखे असते. त्यासाठी योगाभ्यास असणे जरुरी आहे.

            आचार्यांच्या ग्रंथरचना व जीवन कार्याविषयी अनेक वाद आढळतात. पुरी, द्वारका आणि ज्योतिर्मठा मठांच्या परंपरेनुसार आचार्यांचा काळ सनपूर्ण ५०९ असल्याचे सिद्ध होते. आचार्यांनी स्थापलेला पहिला मठ कोणता? प्रमुख पीठ  कोणते? कांचीकाम कोटीचे पीठ मुख्य की उपपीठ? त्यांची समाधी कोणती? माहुरी की केदारनाथ? त्यांच्या विजय यात्रेचे मार्ग कोणते? त्यांच्या चरित्रा वरचे अधिकृत ग्रंथ कोणते? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न मी या चरित्रात केला आहे.

           शंकराचार्यावर सुमारे दहा ग्रंथ लिहिले गेले आहेत.  त्यातील त्यांचा पहिला शिष्य चित्सुखाचार्यांनी लिहिलेला  “बृहत शंकर विजय”. परंतु हा ग्रंथ सलग भागात उपलब्ध नाही. माधवाचार्यांचा “शंकर दिग्विजय ” आणि आनंद गिरींचा  “शंकर विजय ” हे दोनच ग्रंथ उपलब्ध झाले. या ग्रंथाच्या आधारानेच आचार्यांचे चरित्र साकारण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. या ग्रंथांचे   संदर्भ आम्ही जरूर घेतले आहेत. अर्थातच त्या पुस्तकांचे लेखक ; प्रकाशक यांच्याविषयी आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.

          श्रीमद शंकराचार्यांचे जीवन अलौकिक, दिव्य विशाल आहे. सलग २० वर्षे त्यांनी धर्मप्रसाराच्या जागृतीचे काम, विपुल ग्रंथरचना, सर्व पंथ एकत्र करून सशक्त हिंदू समाजाची निर्मिती केली. विचार मनी येतो की, जर आचार्यांचा उदय झाला नसता तर, सारा हिंदुस्तान इस्लाममय  झाला असता.

त्यांनी हिंदू कल्याणसाठी स्वतःला झोकून दिले होते. त्याच तळमळीने वेदांत तत्त्वज्ञानाचा गाभा असलेल्या अद्वैत मताचा प्रसार केला. मंदिरांचे जीर्णोद्धार केले. अपार लोकसंग्रह केला. चार मुख्य पीठे स्थापून हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यांनी संपूर्ण आर्यावर्तच नव्हे तर बाहेरचा प्रदेश सुद्धा पालथा घातला.

अशा या आचार्यांविषयी लिहिण्याची उर्मी निर्माण झाली  खरी ; पण, दुसऱ्याच क्षणी मन धास्तावले. ह्या तेजोनिधीचे संन्यस्त भव्य, दिव्य, विशाल जीवन  बुद्धीच्या अव्याक्यात तरी येईल का?  लेखणीला पेलेल का? ह्या प्रश्नांच्या जंजाळातच आव्हान स्वीकारून प्रयत्नाची कास धरायचा प्रयत्न केला. बघा तुमच्या पसंतीस उतरतेय का ?

               क्रमशः
मिनाक्षी देशमुख
दि. ७-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                भाग – १.

               केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम !! बघावे तिकडे हिरवेगार !! अशा या सौंदर्यसंपन्न केरळमधल्या  खेड्यात जणू जगद्गुरु अवतीर्ण होणार होते.

   त्या गावातील काही भूमी त्यांना अग्रहार म्हणून मिळाली होती. त्या भूमीत विद्याधरराजेंनी विद्यालय स्थापले होते. तिथेच त्यांचे असलेल्या निवासस्थानाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना शिकवित असत. यथासमय त्यांना पुत्रलाभ झाला. त्याचे नांव शिवगुरू ठेवले. पुत्र शिवगुरूचा जन्म होताच त्यांच्या  पत्नीचा देहांत झाला. मग  विद्याधरराजेच आपल्या पुत्राचे माता पिता दोन्ही भूमिका निभावू लागले.

           बाळ शिवगुरू कलेकलेने वाढत होते. त्याचा यज्ञोपवित संस्कार झाल्यावर तो विद्याध्य्यनासाठी गुरुकुलामध्ये गेला.

 विद्यासंपन्न करून पंधरा-सोळा वर्षाचे तारुण्यात पदार्पण केलेले शिवगुरू परतले. आपल्या या युवा पुत्राच्या स्कंधावर विद्यालयाचा भार सोपवून विद्याधर राजे  निवृत्त झाले. युवा शिवगुरू विवाह योग्य झाल्यामुळे या देखण्या मुलाला जावई करून घेण्याकरिता अनेक वधू पिते त्यांच्याकडे येऊ लागले. पण शिवगुरू विवाहास उत्सुक नव्हते. त्यांना विवाह करून गृहस्थाश्रमात अडकण्याची इच्छा नव्हती. त्यांना अध्ययन आणि अध्यापनातच अधिक रस वाटत होता. त्यांची विवाह बद्दलची अनिच्छा बघून विद्याधरराजेंना खूप दुःख होत होते.

        एक दिवस शिवगुरूला जवळ बोलावून म्हणाले, ”  पुत्रा मी दिवसेंदिवस वार्धक्याकडे जात आहे. हे शरीर कधी गळून पडेल नेम नाही. तत्पूर्वी तू गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला पाहण्याची माझी इच्छा तू पूर्ण करणार नाहीस का?”

         ” पुत्रा, तुझ्यासारखा सद्गुणी, शीलवान, वैदिक ज्ञानात पारंगत पुत्राचा मला अभिमान आहे. पण तुला सांगून येणाऱ्या मुलींना तू  नाकारतोस. तू गुरुकुलातून शिक्षण घेऊन आलास. तुला माहीत असेलच मनुष्याने आश्रमाशिवाय एकही दिवस राहू नये.”

  ” तात, मी आपल्या आज्ञेबाहेर नाही. “

   ” तर मखपंडितांना होकार कळवू? “

   ” म्हणजे तात, आधीच…. “

   ” होय पुत्रा! त्रिचुरा जवळच्या पंजरपलै गावी मखपंडितांची आर्यबा नावाची सुलक्षणी, देखणी, गृहकृतदक्ष कन्या आहे….”

          एका सुमुहूर्तावर आर्यबा आणि शिवगुरूंचा विवाह संपन्न झाला. पुत्राच्या विवाहानंतर समाधान पावलेले विद्याधरराजेंचे काही दिवसातच  देहावसान झाले. बराच काळ लोटला तरी आर्यबाची कूस उजळत नव्हती. अनेक व्रतवैकल्ये, औषधोपचार केला. पण व्यर्थ! कालटी गांवात  असलेल्या कृष्ण मंदिरात सकाळ सायंकाळी दोघांचा जाण्याचा नेम होता. रम्य प्रदेशातून रमत गमत जात असताना शिवगुरू म्हणाले,

” आर्याबा, आपल्याला पुत्र नाही. निःसंतानाला नरकातही जागा मिळत नाही. “

  ” त्याला काय करणार? मला सुद्धा आजूबाजूंच्या बायाच्या तीक्ष्ण नजरेचा सामना करावा लागतो.”  असे म्हणतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू पाझरु लागले.

            शांत झाल्यावर ती म्हणाली,

” स्वामी एक उपाय आहे.”

” कोणता? “

” आपण शिवाच्या आराधनेचे व्रत करू या. पण ते व्रत फार कठीण असते. नुसत्या जलावर राहावे लागते.”

”  तुला झेपेल का?”

”  माझी चिंता करू नका. आपण वृषाद्रीवर जाऊन वृषाद्रीनाथाची आराधना, तपश्चर्या करू! “

” ठीक आहे. उद्या पहाटेच वृषाद्रीवर जाऊ. आपली मनीषा पूर्ण होईपर्यंत तिथेच राहू. जर इच्छा पूर्ण झाली नाही तर वृषाद्रीनाथाच्या चरणी देह ठेवू. उद्यापासून विद्यालय पूर्ण बंद करतो.”

            बोलत बोलत दोघेही श्रीकृष्ण मंदिरात येऊन दर्शन घेतले व आपले मनोगत नारायणा जवळ व्यक्त करून घराकडे निघाले.  आर्यबाने रात्रीच सर्व तयारी करून ठेवली होती. भल्या पहाटेच स्नान उरकून दोघेही वृषाद्रीकडे निघाले. पर्वत चढून दोघेही मंदिरात गेले. मनोभावे प्रार्थना करून शिवासमोर आपला संकल्प सांगून ध्यानासाठी बसले. वृषाद्रीनाथाचा जागृत दैवत असा लौकिक होता.

       शिवगुरूंनी पूजा, प्रार्थना, स्वल्प आहार सुरू केला. आर्यबाही कर्पूरगौराच्या आराधनेत समय व्यतीत करू लागली. सुरुवातीला दोघे कंदमुळे तरी घेत होते. नंतर त्यांनी तेही बंद करून केवळ जलप्राशन करू लागले. वर्षभर अशी कठोर साधना केल्यावर, एका रात्री वृषाद्रीनाथने स्वप्नात येऊन दर्शन दिले. आणि विचारले,  ” वत्सा, एवढी कठोर तपश्चर्य कशासाठी करत आहेस? काय हवं? “

    ” हे देवाधिदेवा! मी निपुत्रिक आहे. मला दीर्घायु ज्ञानसंपन्न पुत्र हवा.”

शंकर भगवान म्हणाले, ” तुला सर्वज्ञ आणि कीर्तिमान पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी  असेल. आणि दीर्घायुषी पुत्र हव असेल तर तो ज्ञानसंपन्न नसेल. बोल तुला काय हवे? “

  ” हे देवा, ज्ञानसंपन्न नसून दीर्घायुषी पुत्राचा काय उपयोग? हे आशुतोषा, मला सर्वज्ञ पण अल्पायुषी पुत्र चालेल.”

” तथास्थु! मी स्वतः तुझा पुत्र म्हणून तुझ्या पोटी जन्म घेईन. मी तुझी परीक्षा पाहत होतो. त्यात तू यशस्वी झाल्यास. जा…वत्सा, तुझी मनोकामना पूर्ण होईल.”

असे म्हणू शंकर अंतर्धान पावले.

सकाळी त्यांनी आपली पत्नी आर्यबाला आपले स्वप्न सांगितल्यावर तिला अत्यानंद  झाला. पूर्व जन्माची पुण्याई फळाला आली. दोघेही वृषाद्रीवरून कालटीला परत आले. शिवगुरूंनी पुन्हा विद्यालय सुरू केले. आणि नित्य कार्यात मग्न झाले. काही दिवसांनी आर्यबाला दिवस गेले. शिवगुरू आर्यबाच्या कामात मदत करू लागले. पूर्णा नदीवरुन स्वतः पाणी आणून देऊ लागले. सर्वतोपरीतीची काळजी घेऊ लागले.

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. ७-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                भाग – २.

              शिवगुरू आर्याबाला पुराणातील कथा सांगू लागले. मोठ्याने उपनिषदांमधील उतारे बोलत राहिले. विद्यार्थी पण त्यानुसार  अभ्यास करू लागले. विद्यार्थ्यांना शिकवताना ते सूक्ते, स्तोत्रे अधिक उच्च स्वरांनी शिकवत. आर्याबा हे सर्व भक्तीभावाने श्रवण करीत असे. स्त्रोत्रे ऐकतांना आपला गर्भ सुद्धा हुंकार देत असल्याचे तिला जाणवू लागले होते.

” अचिनोति च सूत्रार्य आचारे स्थापत्यपि।

  स्वयमप्याचरेद् यस्तु स आचार्य इति स्मृतः।”

      अर्थात जो वेदांचा गुणार्थ जाणून लोकांना तसे आचरण करण्यास प्रवृत्त करतो आणि स्वतः पण ती  तत्त्वे आचरणात आणून आदर्श बनतो त्याला आचार्य म्हणतात. इतकं निरूपण झाल्यावर ; आज इथेच थांबू आपण ; यावर चिंतन करा असे बोलून त्यांनी “ओम् ”  म्हटले.

 सर्व छात्र त्यांना नमस्कार करून मार्गस्थ झाले.

         यथासमय नऊ मास पूर्ण झाले आणि आर्याबा प्रसुती वेदनेने तळमळू लागली. काही वेळातच आतून नवजात अर्भकाचा सदनध्वनी  “कोऽहं, कोऽहम ” कानी आला. शिवगुरुंना आनंद झाला. प्रत्यक्ष वृषाद्रीनाथच आर्याबाच्या कुशीतून जन्माला आले होते. तो दिवस होता वैशाख शुद्ध पंचमी. वार रविवार. वैदिक परंपरेनुसार युधिष्ठीर शके २६३१ असे वर्ष होते. शिवगुरूंना अवर्णीय आनंद झाला.

               नूतन बालकाची जन्म कुंडली विद्वान ब्राह्मणांकडून तयार करण्यात आली. पूनर्वसू नक्षत्रावर जन्म, कर्क लग्न, सूर्य मेष राशीत असून, महत्त्वाचे सर्व ग्रह स्वस्थानी आहेत. कुंडलीवरून हा मुलगा अवतारी पुरुष असून याची कीर्ती संपूर्ण आर्यवर्त आणि बाहेरच्या प्रदेशातही पसरेल. पण हा अल्प आयुष्य आहे असे सर्वांनीच भविष्यकथन केले.

         यथासमय बालकाचे जातकादी संस्कार करून त्याचे नाव शंकर ठेवण्यात आले. शंकर दिसायला सुंदर व तेजस्वी, अजानुबाहू होता. बुद्धी कुशाग्र, स्मरणशक्ती तीव्र होती. विशाल भाल प्रदेश, पाणीदार नेत्र, चेहरा पूर्ण चंद्रासारखा होता. वयाच्या दुसऱ्याच वर्षी तो संस्कृत मध्ये संभाषण करू लागला.

             त्यांच्या कालटी गावाची ग्रामदेवता भगवती होती. तिला रोज शिवगुरू दुधाचा नैवद्य दाखवत असत. एक दिवस त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागल्यामुळे छोट्या शंकरला घेऊन आर्याबा भगवतीच्या मंदिरात गेल्यावर, शंकर आईला म्हणाला,

   ” माते तू बाहेरच थांब. मी नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन येतो.”

  ” तुला जमेल? “

  ” न जमायला काय झाले? तातांकडून मी सर्व काही श्रवण केले आहे.”

      असं बोलून  शंकर मंदिरात गेला. देवीची पूजा करून नैवेद्य दाखवला. देवी अचल आणि दूध तसेच असलेले पाहून शंकराला रडू कोसळले. करूणा भाकत म्हणाला,

” हे देवी माते, मी दाखवलेला नैवेद्य का स्वीकारत नाहीस? तू स्वीकारला नाहीस तर तात वचनाला बाधा येईल.”

त्याचा आक्रोश पाहून देवी प्रगट झाली. तिने दूध प्राशन केले. शंकर पुन्हा रडू लागलेला पाहून देवीने विचारले,

” वत्सा, आता काय झाले?”

            तू सर्वच दूध प्राशन केलेस. आता मला प्रसाद कसा मिळेल? असे म्हणून तो दोन वर्षाचा बालक पुन्हा रडू लागला. देवी भगवतीने त्याला आपल्या मांडीवर घेतले. ते दैवी स्तनप्राशन करताच शंकराला काव्य स्फुरले. देवीची स्तुती करणारे, ” देवी भुजंग स्तोत्र” रचले. ते शीघ्र काव्य गाऊन तो देवीची स्तुती करू लागला. शंकराला एवढा वेळ का लागला म्हणून आर्याबा आत आली. तो तिला काय दिसले, देवीसमोर हात जोडून शंकर देवीची स्तुति स्तोत्र गात आहे. हे पाहून तिला अपार कौतुक वाटले.

     ” शंकरा, हे स्तोत्र तुला कोणी शिकवले? मी तर कधी ऐकले नाही.”

 ” माते, हे स्तोत्र आत्ताच  मी रचले.”

हे ऐकताच ती आश्चर्यचकित झाली. दोन वर्षाचा मुलगा संस्कृत काव्य रचून त्याचे गायन करतो, हे आश्चर्यकारक होते. आर्याबा सुद्धा ऐकू लागली. दोन दिवसांनी शिवगुरू परत आल्यावर, आर्याबाने शंकरचे कौतुक करत २८ श्र्लोकी संस्कृत स्तोत्र रचल्याबद्दल सांगितल्यावर, शिवगुरूसुद्धा रोमांचित झाले. हा पुत्र सर्वज्ञ व कीर्तिमान होईल याची त्यांना साक्ष पटली.

          बृहस्पती-बुद्धीच्या आपल्या पुत्राला शिवगुरूंनी वेदोपदनिषदाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर लिपीचे ज्ञान सुद्धा. त्याच्या पाच वर्षापर्यंत शंकर वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण महाभारता सारखे ऐतिहासिक ग्रंथ ही शंकरने मुखोद्गत केले. तो एकपाठी असल्यामुळे, ऋचा, सुक्त, श्लोक अर्था सहित मुखोद्गत होऊ लागले.

             पुत्राची प्रचंड बुद्धी व बाललीलांचे कौतुक  पाहण्याचे भाग्य मात्र शिवगुरुच्या नशिबात नव्हते. अकस्मात त्यांचा मृत्यू झाला. आणि शंकराचे बालपण सरले. आर्याबावर वैधव्याची कुर्‍हाड कोसळली. तिच्या सांत्वनासाठी आजूबाजूच्या बाया येऊन, तिला समजावत म्हणायच्या,

” आर्याबा, तुझे नशीब थोर म्हणून तुला असा पुत्र मिळाला. तू तुझे दुःख बाजूला ठेवून त्याचे चांगले संगोपन कर.”

आर्यबाने हा केवढा मोठा आघात, प्रहार सहन केला. शंकराला कीर्तिमान करण्यासाठी व तो सर्व शास्र संपन्न होण्यासाठी कोणताही त्याग करण्याचे ठरवून तिने कंबर कसली. प्राप्त परिस्थितीची जाणीव झाल्याने मन खंबीर केले. कोलमडून चालणार नाही. आता आपल्याला दुहेरी जबाबदारी स्वीकारायला हवी. दुप्पट आवेशाने उभे राहायला हवे. त्याच्यासमोर अश्रू ढाळता कामा नये. त्याचा संवेदनक्षम मनावर विपरित परिणाम व्हायला नको. परमेश्वराने आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पेलायलाच हवी.

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ८-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                भाग – ३.

               आर्यबा बाळ शंकराची मुंज करण्याच्या आणि  पाचव्या वर्षी त्याला गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवण्याच्या विचारात होती.

  शंकर रावणराव गड्या बरोबर आगरातून परत आल्यावर त्याने सायंसंध्या केली. रात्रीचे जेवण वगैरे झाल्यावर शंकर आईचे कुशीत शांत झोपला होता. अर्ध्या रात्री त्याला आईच्या मुसमुसण्याने एकदम जाग आली.

” अम्ब, काय झाले? डोके दुखते का? चेपून देऊ का?”

बाळाच्या स्वरातील कळकळ ऐकून तिला आणखी भडभडून आले. म्हणाली,

  ” बाळा, आपण पोरकी आहोत रे! तुझे तात आपल्याला सोडून गेलेत.”

 एवढासा बाळ तिचे डोळे आपल्या चिमुकल्या हाताने पुसत म्हणाला,

” अम्ब, बाबा कुठेही गेलेले नाहीत. अगंऽ! आत्मा अविनाशी आहे. अगं!”

” नैनं छिन्दति शस्राणि  नैनं दहती पावकः।

         आर्यबाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ” अरे बाळा! कोणी शिकवले?”

” अगं, अम्ब, आज पद्मनाभ  गुरूजींनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायाची संथा देताना त्यांनी सांगितले….

” वासंसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृण्हाति नरोऽपराणि।।”

         ” अगं, आपण वस्त्र जसे बदलतो तसे आत्मा  बदलतो. बाबांचा देह नष्ट झाल्यासारखे वाटले तरी, तो नष्ट झाला नाही. फक्त परिवर्तन झाले. निर्वाण झालेली कोणतीच गोष्ट कधीच नष्ट होत नाही हा सिद्धांत आहे.” 

             पाच वर्षाचा बाल पंडित जीवन मरणाचे तत्वज्ञान समर्थपणे विशद करून सांगत होता. जणू भावी काळामध्ये करायच्या गोष्टींची पूर्वतयारी करीत होता. तो  तिला पुढे म्हणाला ;

” अम्ब, तू एकटी नाहीस. मी तुझ्याजवळ आहे. शिवाय रावणकाका पडवीत झोपले आहेत.”

    ज्ञानाने लाभलेल्या शांत रसातून ; विवेकाने अडचणींवर मात करायचा सराव करीत होता की काय हा चिमुकला बालक ? आर्यबा

त्याला आवेगाने कुशीत घेऊन थोपटत झोपवू लागली. तिच्या मनी विचार आला,

” असा गुणी पुत्र आपल्या पोटी जन्माला आला. आणि आपण करंटासारखे दुःख करतो. नाही.. यापुढे त्याच्यासमोर अश्रू ढळायचे नाही. ही पतीची अनमोल ठेव, त्याचे जतन करणे, त्याला नित्य आनंदात ठेवणे आपले कर्तव्य आहे.”

      एकदा गुरुकुलात अध्ययन करीत असताना ; म्हणजेच  विद्यादानाची अत्यंत आवड असणारे गुरूजी शिकवत असताना त्यांनी  मुलांना प्रश्न विचारला,

    ” सांगा बरं! आपल्या या केरळ भूमीला भार्गव भूमी आणि परशुराम भूमी का म्हणतात? “

चिमुकला पाच वर्षाचा शंकर चटकन उभा राहून, आपल्या मधुर वाणीने परशुरामांच्या जन्मापासून ते २१ वेळा पृथ्वी कशी निःक्षत्रिय केली, क्षत्रियांचा कसा नायनाट केला, जिंकलेली भूमी दक्षिणेत कष्यप ऋषींना दान दिल्यावर गोकर्ण महाबळेश्वराकडे आल्यावर त्यांनी कसे वरुणाला आव्हान करून सागर  मागे सरला आणि गोकर्ण पासून कन्याकुमारी पर्यंतची भूमी भार्गवभूमी झाली. ही सविस्तर माहिती लहानगा शंकर सांगत असताना सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागले होते. गुरुजींनी पुन्हा विचारले,

    ” ही भार्गवभूमी पुढे केरळ म्हणून कशी प्रसिद्ध झाली? “

शंकर सांगू लागला…

   ” चरे नावाचा राजाचे चेरतळ हे वसतीस्थान होते. पुढे चेरतळ मधला  ‘त’ लुप्त झाला आणि चरेल झाले. त्याचाचं पुढे अपभ्रंश होऊन  “केरळ” बनले.”

त्याचे आगाध ज्ञान पाहून गुरुजींना असा शिष्य मिळाल्याची धन्यता वाटली.

              एके दिवशी दुपारी मार्तंडस्वामी, जगन्नाथ अरमर आणि पद्मनायक गुरुजी आर्यबाकडे आले. शिवगुरूंच्या आठवणीने सर्वांनाच गहिवरून आले. मार्तंड स्वामी म्हणाले, 

   ” वहिनी, शंकर अलौकिक बुद्धिमान आहे. त्याचे मौजीबंधन करून, वेदाध्ययनाला  गुरुगृही पाठवावे असे आम्ही सुचवतो.ते  पुढे म्हणाले,

” शंकरसारखा प्रखर बुद्धिमत्तेचा पुरुष युगायुगातून एकदाच निर्माण होतो. ते भाग्य तुमच्या कुळाला व आपल्या कालटी गावाला लाभलेले आहे. शिवाय केवळ सरस्वतीच नव्हे तर, प्रत्यक्ष ग्रामदेवता त्रिपुरसुंदरीही प्रसन्न आहे त्याच्यावर !! त्याशिवाय का मागे शंकरने नैवेद्य दाखवलेले दूध तिने प्राशन केले होते?”

            पद्मनाथ म्हणाले,

  ” वहिनी, तुम्ही काळजी करू नका. शिवगुरू नाहीत  म्हणून काय झाले? आम्ही काय परके आहोत? शंकरची मुंज आम्ही सारे कालटीकर आपल्या घरातला सोहळा ; सण म्हणून साजरा करु.”

     हे ऐकून तर मार्यबा निश्चितच सुखावली. नाहीतरी काही दिवसापासून शंकराची मुंज करून, गुरुगृही पाठवण्याचे तिच्या मनात होतेच. अनायसे असा  योग आल्याने ती आनंदित झाली.

            मनमिळावू,  सहिष्णु स्वभावाचा, मधुर गोड बोलणे असलेला , सर्वांना आपलेसे करण्याची हातोटी असलेल्या शंकरच्या मुंजीचा सोहळा कालटीतला प्रत्येक जण उत्सुक होताच… जेव्हां मुहूर्त ठरला तेव्हां तर गावकरी आपल्याच घरचा सोहळा समजून अत्यंत उत्साहाने सजावटी करून तयारी करू लागले.

     नंबुद्री कुळातला हा थोरा मोठाच्या घरचा कार्यक्रम म्हणजे गाव जेवण घालायलाच हवे. त्यादृष्टीने आर्यबाने तयारी सुरू केली. ही तयारी सुरू असताना तिला सतत पतीची उपस्थिती असल्याचा भास होत होता. तिला शंकरचे बोलणे आठवले. ” बाबा कुठेच गेले नाही ते इथेच आहेत.”

          भल्या भल्याच्या वाट्याला असा सुरेख सोहळा येत नाही. पण शंकर मात्र भाग्यवान निघाला. त्याच्या मुंजीची भिक्षावळ हत्तीवरून निघाली. गावातील सारी वाहने मिरवणुकीत सामील होती. पंचक्रोशीतली विद्वान, शास्त्री, पंडित मिरवणुकीबरोबर पायी निघाले. त्यामुळे या सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली होती.

मौंजीबंधन झाल्यावर  माता आर्यबाचे बरोबर बाळ शंकर गुरुकुलात आले. आल्याबरोबर त्याने आचार्यांना  चरण स्पर्श करून प्रणाम केला.. आचार्यांच्या कानी शंकरच्या अद्भुतत्त्व आधीच गेले होते. त्यांनी त्याला अत्यंत कठीण प्रश्न विचारल्यावर बटू शंकरांनी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. त्यांनी जवळ ठेवून घेतले आणि पत्नीला म्हणाले,

” हा आपला आणखी एक पुत्र. हा सर्वात लहान बटू आहे. याच्याकडे विशेष लक्ष असू द्या.”

          तिथला नित्य दिनक्रम सुरू झाला. भल्या पहाटे स्नानासाठी नदीवर जावे, सूर्यनमस्कार झाले की, गुरु माता सर्वांना गोरस देत असे. मग संध्या व्हायची. नंतर दूर्वा, फुले, समिधा, लाकूडफाटा गोळा करणे, पूर्णे वरून ( म्हणजे पूर्णा नदीवरून )  पाणी आणणे, ही नित्यकर्मे ठरवून दिल्याप्रमाणे छात्र करीत असत.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. ८-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                    भाग – ४.

         गुरुकुलात सर्वांचे अध्ययन सुरूच होते. नित्यकर्मे पण प्रत्येकास नेमून दिली गेली होती. त्यातलेच एक कर्म म्हणजे भिक्षा मागणे.                           

     सूर्य माथ्यावर आला की प्रत्येकाला नेमून दिलेल्या घरी  सर्व छात्र भिक्षेला जात. सुरुवातीला थोडा संकोच वाटायचा. पण मग अंगवळणी पडले. बाल शंकराच्या लक्षात आले की,  अशी भिक्षा मागणे म्हणजे भीक मुळीच नसते ; तर ते एक पवित्र असे व्रत असते.  भिक्षाव्रतामुळे विविध माणसांच्या स्वभावाचे अवलोकन होते. त्यांच्यातले  गुणदोष दिसून येतात. भिक्षान्नामुळे जिभेचे चोचले गौण  ठरू लागतात. चवीवर नियंत्रण येते. अन्नाचे  महत्त्व  शरीरधारणेसाठी असते !!  याची जाणीव झाली की आपली बुद्धी विद्याभ्यासावर केंद्रित होते. बाल शंकर याचा अनुभव नित्य घेत असे.

                दुपारचे अध्ययन प्रशस्त वटवृक्षाच्या गर्द छायेत होत असे. गुरुदेवांची भव्य आकृती, स्नेहार्द्रा  नजर, धीरगंभीर शब्दोच्चार !! शिवाय विषय समजून सांगण्याची हातोटी इतकी आकर्षक असायची की, छात्रवृंद अगदी तल्लीन  होऊन जायचे.  कलत्या दुपारी वर्ग संपला की, आश्रमाच्या नित्य कामांना सुरुवात होई. गाईंना पूर्णेवर पाणी पाजण्यास नेणे, संध्याकाळच्या पाकसिद्धीची तयारी करणे, भोवतालच्या फुलझाडांना पाणी घालणे, साफसफाई करणे, स्नान करून, संध्या करणे ;  सामुदायिक प्रार्थना, आपापसात शंका निरसन, सुसंवाद  इत्यादी चाले.

             बालशंकर या वातावरणात चांगलाच रुळला होता. त्याचे सारे लक्ष मनन, चिंतनावर केंद्रित झाले होते. भुकेलेल्याने अन्नावर झडप घालून बकाबका खावे — तसे शंकर ज्ञान मिळवू लागला. जणू ज्ञानावर तुटून पडला. त्याच्या शुद्ध उच्चारण करण्याच्या पद्धतीमुळे आचार्यवृदांना आश्चर्य वाटायचे. केवळ दोन वर्षातच वेद, उपनिषदे इतिहास, धर्मशास्त्र, न्याय, सांख्य तत्वज्ञान ;  पातंजल, वैशेषिक, बौद्ध व जैन मतानुवाद वगैरे सर्व  शिकला.

            गुरु कुलातील परंपरेनुसार भिक्षेसाठी जावे लागत असे. एक दिवस हा छोटा तेज:पुंज ब्रह्मचारी एका कुटीसमोर उभा राहून उच्च स्वरात म्हणाला, ” ॐ भवती भिक्षां दे हि। माते, भिक्षा वाढ.”

 आतून एक ब्राह्मण स्री फाटक्या विटक्या वस्त्रात येऊन म्हणाली,

  ” पुत्रा, गेल्या दोन दिवसापासून मी व माझे पती उपाशी आहोत. क्षमा कर! “

तिची दयनीय अवस्था पाहून दुःखी झालेले शंकर म्हणाले,

” माते, तू घरात जाऊन नीट बघ. काहीतरी मिळेल. अतिथीला विन्मुख पाठवण्यास गृहस्थ धर्माचा अपमान होतो. जे काही खाण्यालायक असेल ते आण.”

ती घरात गेली. सगळीकडे  शोधल्यावर तिला एका कोपऱ्यात सुकलेला आवळा मिळाला. तिने तोच शंकराच्या झोळीत घातला. ते पाहताच शंकराचे मन द्रवले. त्यांस तिथल्या तिथे  ” कनकधारा ” स्तोत्र  स्फुरले. लक्ष्मीस्तुति स्तोत्र म्हटल्याबरोबर, साक्षात लक्ष्मी प्रकट होऊन म्हणाली,

   “बोल वत्सा, काय हवे?”

         ” हे देवी माते, या ब्राह्मण पती-पत्नीची निष्कांचनावस्था दूर कर.”

“अरे पण, त्यांनी पूर्व जन्मात काहीच पुण्यकर्म केलेले नाही.”

” हे माते, घरात काही नसताना या स्त्रीने आज मला एक आवळा दिला. हे पुण्यकर्मच आहे. तेव्हा माझी इच्छा पूर्ण कर माते.”

” तथास्तु!”  म्हणून देवी अदृश्य झाली. नंतर त्या ब्राह्मणाच्या घरावर सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव झाला. ब्राह्मणाचे दारिद्र्य नाहीसे झाले. गावचे नाव “कनकंबा” असे पडले.

        या प्रसंगाने शंकराची विद्वत्ता व चमत्काराची प्रसिद्धी झाली. ठिकठिकाणचे विद्वान त्याचे दर्शन घेण्यास येऊ लागले.

          जे ज्ञान मिळवण्यासाठी १८-२० वर्षे लागतात ते ज्ञान या बाल ब्रह्मचाऱ्याने केवळ तीनच वर्षात  प्राप्त करून घेतले. सर्व शास्रात पारंगतता मिळवली. आणि आचार्य बनण्यास पूर्णतः सक्षम आणि योग्य बनले. केवळ तीनच वर्षात सर्व बौद्धिक आणि मौखिक कसोटीच्या सर्व निकषांवर त्याचे प्रथम स्थान अढळ राहिले. त्यांची कथन शैली वाल्मिकी सारखी तर निग्रहीवृती शुकासारखी ; वाद करण्याबाबत याज्ञवलक्य ;  तर बुद्धी बृहस्पतीचीच होती जणू !!.

     बाल शंकराला गुरुकुलात जाऊन जेमतेम तीन वर्षे झाली नाही तोच गुरुकुलाकडून शंकराचा अभ्यासक्रम संपला. त्याला येथून नेण्याकरता कोणी जबाबदार माणूस पाठवल्याबद्दल आर्यबाकडे सांगावा आला. आर्यबाच्या मनात नाना शंका कुशंका येऊ लागल्या. गुरुकुलात साधारणतः बारा वर्षाचा काळ घालवावा लागतो. मग शंकराला तीनच वर्षात परत का पाठवत आहे? काय घडलं असेल?  ” मन चिंती ते वैरी न चिंती” अशी तिची अवस्था झाली.

          पण निरोप आणणाऱ्या व्यक्तीने  बाल शंकरची खूप स्तुती केली. शंकर कुशाग्र बुद्धीचा मुलगा असून इतर छात्रांपेक्षा चौपट वेगाने त्याने विद्याग्रहण केली. त्याचा सारा अभ्यासक्रम तीन वर्षातच पूर्ण झाला. म्हणून गुरुदेवानी त्याला स्वगृही पाठवण्याची आज्ञा दिली. हे ऐकताच तिला आणि

कालटीवासियांना अतिशय आनंद झाला. त्याचा खूप थाटात सत्कार करण्याचे सर्वानुमते ठरले. त्याला आणायला राघवराव, वीरभद्राचार्य, पुट्टू स्वामी रवाना झाले. तिघेही गुरुकुलात पोहोचल्यावर, गुरुदेवांनी बाल शंकरासाठी निरोप समारंभ आयोजित केला. सर्वात लहान वयाचा शिष्य सर्वांच्या आधी विद्याभ्यास संपवून परत जात असल्याचा वियोग तपस्वी गुरुदेवांना सुद्धा विचलित करणारा होता.

यापूर्वी असा प्रखर बुद्धिमत्तेचा, विनम्र भाव असलेला शिष्य लाभला नाही व पुढेही लाभण्याची शक्यता वाटत नाही. वटवृक्षाखाली सर्व शिक्षकगण शिस्तीत बसले होते. अशा सद्गुणी  मुलाचा विरह होईल म्हणून गुरुदेवांसह सगळे व्याकुळले होते.

    .   आईने पाठवलेली गुरुदक्षिणा शंकरने आचार्यांच्या चरणी ठेवून त्यांना खाली वाकून नमस्कार केला. आचार्यांनी साश्रू नयनानी त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले व त्याच्या अंगावर बहुमोल वल्कल  शालीप्रमाणे घालून म्हणाले,…

” अचिनोतिच शास्त्रार्थ आचरे स्थापयति अधि।

  स्वयंमापि आचरेद यः तु  आचार्य इति स्मृतंः ।।”

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. ८-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

            भाग -५.

            बाल शंकरचा निघण्याचा दिवस आला. तेव्हा आचार्यांनी त्याच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला. आचार्य म्हणाले,

   ” चि. शंकर शिवगुरु नंबुद्री याने सर्व नियमांचे काटेकोर पालन केले; अल्पावधीतच तो समस्त विद्यांमध्ये पारंगत झाला आहे.  म्हणून या बटूला “आचार्य ”  ही पदवी मोठ्या अभिमानाने व आनंदाने बहाल करण्यात येत आहे.” टाळ्यांच्या कडकडात निरोप देत समारंभ पार पडला. शंकर जायला निघाला ;  तेव्हा सर्वांच्याच मुखातून हुंदके बाहेर पडले. डोळे पुसत शंकरला घ्यायला आलेल्या तिघांना गुरुदेव म्हणाले,

  ” हा मुलगा निखळ तेजस्वी हिरा आहे. याला योग्य कोंदणात बसवा. हा नक्की दिग्गज होऊन दशदिशा गाजवणार.”

         नंतर  तिघांबरोबर शंकर कालटीकडे रवाना झाले. गाववेशीवर कालटीवासी शंकरच्या स्वागतासाठी सज्ज होते. कालटीच्या प्रत्येक घरापुढे सुंदर सुबक रांगोळ्या काढल्या गेल्या. नवनवीन वस्त्रे, अलंकारांनी सजलेल्या लोकांनी दीपोत्सवासारखी तयारी सुरू केली. आर्यबाचा उर अभिमानाने भरून आला. शिवगुरूंच्या आठवणीने तिचे डोळे पाझरु लागले.

             वेशीवर मानाचा हत्ती सजवून उभा केला  होता. भरजरी झुलीने मढवला आणि अंबरीने शोभिवंत केला होता. सारा वाद्यवृंद ढोल, पडघम, मृदंग, ताशेवाले सज्ज होते. हे  चारही जण जवळ येताच देवदेवतांचा जयजयकार सुरू होऊन  आणि वाद्यवृंद निनादू  लागले. इतक्या भव्य स्वागताची शंकरला पुसटशीही कल्पना नसल्याने तो बावरल्यासारखा  झाला. सुवासिनीनी शंकरच्या पायावर घागरी रित्या केल्या. पावलावर हळद-कुंकवांची स्वस्तिके काढली. तिथेच त्यांस मानाची वस्रे परिधान करायला लावली. सर्वानी मिळून त्यांस अंबारीत बसवले. वाद्य वृंदांच्या गजरात मिरवणूक गावातून जाऊ लागली.

         मिरवणूक घरासमोर येताच शंकरने  आपल्या वास्तुपुरुषाला नमस्कार केला. पडवीत उभ्या असलेल्या मातेला प्रथम ओळखलेच नाही, इतकी ती थकली, कृष झाली होती. त्यांनी मातेला वंदन केले. मिरवणूक हळूहळू पुढे चालली होती. शंकरावर ओवाळून कित्येक नारळ फोडले जात होते. आपापल्या दारात सुवासिनी त्यांना ओवाळत होत्या. मिरवणूक मंदिरासमोर आली. सभा मंडपात या बाल -आचार्यासाठी उच्चासन तयार केले होते. मोठ मोठ्या शास्त्री – पंडितांच्या पंक्तीत बसण्याचा  बहुमान बाल शंकरला मिळाला होता. त्याच्या गळ्यात कित्येकांनी पुष्पहार घातले. वेदमंत्रांच्या घोषात त्यांनी देवदर्शन घेतले. शिवस्तुतीपर अभंग गायन झाले. बाल आचार्यांच्या हातून सर्वांना प्रसाद वाटप झाला. आणि वीरभद्राचार्यांनी गौरवपर भाषणात गुरुकुलातील सर्व वृत्तांत कथन केला. कालटीकर मंडळी अत्यंत हर्षभरित होऊन आपापल्या घरी परतली. शंकरचा विद्याभ्यास पूर्ण झाल्याने त्यांस मुली सांगून येऊ लागल्या. आर्यबाला बायका म्हणत,

  ” अगं! केवळ आठ वर्षाचा तुझा मुलगा आचार्य! हे अघटितच आहे.”

आर्याबाही  सुनेचे स्वप्न पाहू लागली. ती मधून मधून शंकरापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवू लागली. शंकर तिचे बोलणे हसण्यावारी टाळत होते.

                 शिवगुरूंनी घराच्या आवारात चालवलेले गुरुकुल शंकरने स्वतः  चालवायचे ठरविले. त्याची प्रसिद्धी ऐकून बराच शिष्यगण गोळा झाला. बाल आचार्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्याचबरोबर स्वतः नियमित अध्ययन, वाचन, टिपणे काढणे, ऋचा मुखोद्गत करणे, हे सर्व छात्रांकडून पण करून घेणे सुरू होते.

        आचार्य अल्प वयाचा तर, शिष्य समुदाय प्रौढ असे आगळेवेगळे दृश्य कालटीकरांना दिसू लागले. लहान वयाच्या गुरुचे विद्यादान किती समर्थ आहे याचा अनुभव शिष्यवर्गांला येऊ लागल्यामुळे शिष्य संख्या वाढू लागली.  त्यावेळी केरळ अधिपती राजा चंद्रशेखरच्या कानी या बाल आचार्यांची कीर्ती गेल्याने आपणही या बाल आचार्यांचा भव्य सत्कार करावा म्हणून राजाने आपल्या प्रधानासोबत हत्ती, घोडे, शिपाई असा लवाजमा कालटीला पाठवला. प्रधान तर हा छोटासा बाल आचार्य पाहून चकित झाला. प्रधानाने नजराणा  आचार्यापुढे ठेवला व नमस्कार करून आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले.

              बाल आचार्य प्रधानास म्हणाले,

    ” भिक्षा हेच आमचे अन्न आणि मृगाजिन  हेच आमचे वस्त्र. या साऱ्याचा आम्हाला काय उपयोग? हे सारे तुम्ही परत न्यावे.”

    या बाल आचार्यांची ती नि:स्पृह वृत्ती पाहून सारे आवाक् झाले. मोहावर केवढा हा विजय ? कशाची अभिलाषा नसणे म्हणजे केवढे हे वैराग्य? एवढा विवेक बाळगण्याचे त्यांचे वय तरी आहे का? सर्व लोक आपसात कुजबुजत होते. आणि बाल आचार्यांची प्रतिमा समस्त जनमानसात उंचावत होती.

         शेवटी स्वतः राजा चंद्रशेखर आचार्यांच्या भेटीस आले. ती भस्मचर्चितत तेजःपुंज  बालमूर्ती पाहून राजाच्या मनात आदरयुक्त भाव निर्माण होऊन या ज्ञानसागरापुढे नतमस्तक झाले. आणि दहा हजार मोहरा आचार्यांसमोर ठेवल्यात. आचार्यांनी त्या द्रव्याचा अस्वीकार केला. पण या द्रव्याने सुंदर देवालय बांधावे असे  सुचवले.

राजा म्हणाला , ” माझी एक छोटीशी विनंती आहे ! मी तीन ग्रंथ लिहिलेत. त्याचे आपण अवलोकन करावे. तिन्ही ग्रंथ बालाचार्यांनी वाचल्यावर ग्रंथ प्रशंशनीय असल्याचे सांगितले.

             यादरम्यान बाल आचार्यांनी लेखन कार्य सुरू केले. विषय साधे सुलभ बालकांना अवगत होणारे, भाषा सोपी असली तरी त्यातली आचार्यांची विलक्षण बुद्धी प्रत्ययाला येत होती. लेखनाची हातोटी, मांडणीचे कौशल्य प्रत्ययास येत होते.

          निसर्गाचे वेड असलेला हा आचार्य मोकळ्या हवेत पूर्णा नदीच्या काठी जाऊन वाहत्या जलराशीशी हितगुज करीत बसत असे.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. ८-९-२०२३.

आद्य शंकराचार्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading