“२१ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 21 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक २१ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
126-5
म्हणोनि अविद्याजात नाथिले । ते तिहीचि साच दाविले । जिही सुखबुद्धी घेतले । विषयदुःख ॥126॥
म्हणून ज्यांनी, विषयापासून होणारे दुःखच सुख मानले / स्वीकारले. त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अज्ञान, ते खरे आहे, असे दाखविले.
127-5
या कारणे गा सुभटा । हा विचारिता विषय वोखटा । तू झणे कही या वाटा । विसरोनि जाशी ॥127॥
अर्जुना, यामुळेच विचार करून पहिले, तर ते विषय वाईट आहेत. तू कधी चुकून त्यामार्गाला जाशील तर जाऊ नकोस.
128-5
पै याते विरक्त पुरुष । त्यजिती का जैसे विष । निराशा तया दुःख । दाविले नावडे ॥128॥
जे विरक्त पुरुष आहेत, ते या विषयांस, जसे काही विषच आहे, असे समजून त्याचा त्याग करतात.
कारण ते निरिच्छ असल्यामुळे विषयांनी दाखविलेले दुःखरुपी सुख त्यास आवडत नाही.
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥5. 23॥
भावार्थ :-
इहलोकी, मरणाच्या आगोदर काम व क्रोध यांच्या वेगाला सहन / जिंकतो करू शकतो, तो पुरुष योगी व तोच सुखी आहे.
129-5
ज्ञानियांच्या हन ठायी । याची मातुही कीर नाही । देही देहभावो जिही । स्ववश केले ॥129॥
आत्मज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणात, दुःखरूप विषयांची गोष्टसुद्धा नसते; कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती स्वाधीन केलेल्या असतात.
130-5
जयाते बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरी सुख । एक आथी ॥130॥
जे बाह्य विषयांच्या उपभोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत, त्यांच्या हृदयात ब्रम्हसुखच नांदत असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-5
परि ते वेगळेपणे भोगिजे । जैसे पक्षिये फळ चुंबिजे । तैसे नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥131॥
ब्रम्हसुखाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. पक्षी ज्याप्रमाणे फळाला झोंबतो, तेंव्हा भोक्ता, भोग्य आणि भोग त्रिपुटी असते; पण तशी त्रिपुटी ब्रम्हानंदात नाही. कारण त्या अवस्थेमध्ये भोकतेपणही विसरावा लागतो.
132-5
भोगी अवस्था एक उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी । मग सुखेसि आंठी । गाढेपणे ॥132॥
त्या भोगांमध्ये वृत्तीची एक अशी अवस्था निर्माण होते की, ती अहंकाराचे वस्त्र दूर सारते आणि मग तो जीव ब्रम्हसुखाचा दृढ आलिंगन देतो.
133-5
तिये आलिंगनमेळी । होय आपेआप कवळी । तेथ जळ जैसे जळी । वेगळे न दिसे ॥133॥
जसे पाण्यात पाणी टाकले असता ते वेगळे दिसत नाही, तसे त्या अलिंगणात, मिळणात आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडलेली असते.
134-5
का आकाशी वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरुपे । सुरती तिये ॥134॥
अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत, ही भेदाची भाषा संपून जाते, त्याप्रमाणे ऐक्य अवस्था आणि ब्रम्हसुख ही भेदाची भाषा संपून फक्त आनंदच स्वरूपाने शिल्लक राहतो.
135-5
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणो जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जे ॥135॥
अशी द्वैताची गोष्टच गेली, म्हणजे ऐक्य होते. असे जर म्हणावे, तर तसे ऐक्य जाणून, ” ऐक्य आहे ” असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण आहे ?
(म्हणजे एकत्वाला जाणणारा दुसरा साक्षी तरी कोण आहे ? दोन गोष्टी एकच झाल्यावर कोण उरणार ? )
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥5. 24॥
भावार्थ :-
जो पुरुष निश्चयाने अंतरात्म्यातच सुखी आहे, जो आत्म्याचे ठिकाणीच रममाण झालेला आहे, तसेच ज्याला आत्म्यातच ज्ञान प्रकाश लाभला आहे, तो सच्चीदानंदस्वरूप परब्राम्हशी ऐक्य पावलेला योगी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥5. 25॥
भावार्थ :-
ज्याची सर्व पापे नाहीशी झाली आहेत, ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, सर्व भूतमात्र्यांचे कल्याण करण्यात जे रत झाले आहेत आणि भगवंताच्या ध्यानात ज्याचे चित्त एकाग्र झाले आहे, असे ब्रम्हवत्ते पुरुष ब्रम्हस्वरूप शांतीला प्राप्त होतात.
136-5
म्हणोनि असो हे आघवे । एथ न बोलणे काय बोलावे । ते खुणाचि पावेल स्वभावे । आत्माराम ॥136॥
म्हणून हे सर्व बोलणे असू द्या. जो प्रत्येक्ष अनुभवाचा विषय आहे, त्याबद्दल शब्दांनी काय बरे बोलावे ? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे ऐक्य पावलेले ब्राम्हनिष्ठ पुरुष आहेत, ते या सूक्ष्म विचारतील खरे वर्म सहज जणतील.
137-5
जे ऐसेनि सुखे मातले । आपणपाचि आपण गुंतले । ते मी जाणे निखळ वोतले । साम्यरसाचे ॥137॥
जे अशा सुखाने परिपूर्ण संपन्न झाले आहेत, जे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्यरसाचे ओतलेले पुतळे आहेत, असे मी समजतो.
138-5
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । की महाबोधे विहार । केले जैसे ॥138॥
ते ब्राम्हनिष्ठ पुरुष आनंदाचे प्रतिबिंब आहेत, सुखाचे अंकुर आहेत किंवा त्यांच्या रूपाने महाबोधाने जणू क्रीडा केलेली आहे.
139-5
ते विवेकाचे गाव । की परब्रह्मीचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥139॥
ते विवेकाचे संपूर्ण गाव आहे, आणि प्ररब्रह्मच्या ठिकाणचे स्वभाव अथवा ब्रम्हविद्येचे सुशोभित केलेले अवयव आहेत.
140-5
ते सत्त्वाचे सात्त्विक । की चैतन्याचे आंगिक । हे बहु असो एकैक । वानिसी काई ॥140॥
ते शुद्धत्वाचे (सत्वगुणातला मूर्तिमंत सात्विक पणा आहेत. ते चैत्यन्याच्या शरीराची बांधेसुद ठेवणं आहेत. यावर सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, हे बोलण्याचा विस्तार असू दे. ब्राम्हनिष्ठ पुरुषांची एक – एक लक्षणे किती म्हणून वर्णन करणार आहेस ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-5
तू संतस्तवनी रतसी । तरी कथेची से न करिसी । की निराळी बोल देखसी । सनागर ॥141॥
पाहा निवृत्तीनाथ पुढे काय म्हणत आहेत.
ज्ञानदेवा तू जेंव्हा संतांची स्तुती करण्यामध्ये रंगून जातोस, त्यावेळी तुला मूळ कथेची आठवण राहत नाही; कारण तू निराकार स्वरूपासंबधी प्रेमळ आणि रसाळ भाषा बोलत राहतोस. (आणि तेही चांगले बोल तू बोलतोस)
142-5
परि तो रसातिशयो मुकुळी । मग ग्रंथार्थदीपु उजळी । करी साधुहृदयराउळी । मंगळ उखा ॥142॥
परंतु आता हा रसाचा विस्तार आवरता घे; आणि ग्रँथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलीत कर व सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर.
143-5
ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेचि आइका ॥143॥
हे सद्गुरू निवृत्तींनाथांचे विचार ज्ञानेश्वरांनी मानले. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ते भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, ते आता ऐका.
144-5
अर्जुना अंनत सुखाच्या डोही । एकसरा तळुचि घेतला जिही । मग स्थिराऊनी तेही । तेचि जाहले ॥144॥
अर्जुना ! अनंत सुखाच्या डोहात उडी मारून एकदम तळ गाठला, ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूप बनले.
145-5
अथवा आत्मप्रकाशे चोखे । जो पापियाचा आपणपेचि विश्व देखे । तो देहेचि परब्रह्म सुखे । मानू येईल ॥145॥
हृदयामध्ये शुद्ध आत्मप्रकाश पसरला, की संपूर्ण विश्व आपलेच स्वरूप आहे, असे जो पाहत असतो, तो मनुष्य देहासह परब्रम्ह झाला, असे सहज मानता येईल.
146-5
जे साचोकारे परम । ना ते अक्षर निःसीम । जिये गावीचे निष्काम । अधिकारिये ॥146॥
जे खरोखरच परममश्रेष्ठ अथवा अविनाशी व अमर्याद असे ब्रम्हसुख, त्याचे अधिकार निरिच्छ होतात,
147-5
जे महर्षी वाढले । विरक्ता भागा फिटले । जे निःसंशया पिकले । निरंतर ॥147॥
जे थोर ऋषिकरिता काढून ठेवले आहे किंवा विरक्तांच्या वाट्याला आले व सदैव संशयरहित पुरुषास सर्व काळ टिकले आहे.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥5. 26॥
भावार्थ :-
जे काम- क्रोधानी रहित आहेत, ज्यांनी चित् स्वाधीन केले आहे, ज्यांनी परमात्म्याला जाणले आहे, असे योगी पुरुष देह असतानाही जीवमुक्त असतात आणि देह ठेवल्यानंतरही परब्राम्हशी एकरूप असतात.
148-5
जिही विषयांपासोनि हिरतले । चित्त आपुले आपण जिंतिले । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥148॥
ज्याने आपले चित्त विषयापासून हिराहून घेतले आहे आणि आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने त्या स्वरूपात लीन झाले असता पुनः पूर्ववृत्तीवर येत नाहीत.
149-5
ते परब्रह्म निर्वाण । जे आत्मविदांचे कारण । तेचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥149॥
हे पांडुकुमरा ! आत्मज्ञानाचे फल असे ते मोक्षरूप परब्रम्ह आहे. आत्मज्ञानी पुरुष ते परब्रम्हच होतात, असे तू जाण.
150-5
ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहीचि ब्रह्मत्वा आले । हे ही पुससी तरी भले । संक्षेपे सांगो ॥150॥
हे पुरुष देह असताना ब्रहत्वास कशाने पावेल, हे जर विचारत असशील, तर उत्तमच आहे. तुला ती साधने संक्षेपाने सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ५२ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६१३ ते ६२४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ६१३
सांगो देवा नेणा काय । बोलाची आवडी ॥१॥
वाया मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदे ॥धृपद॥
आवडीच्या करा ऐसे । अंतर्वासे जाणतसा ॥२॥
तुका म्हणे समाधाने । होइन मने मोकळा ॥३॥
अर्थ
हे प्रभू तुमचे अमृतासारखे शब्द नेहमी कानावर पडावे असे वाटते. हे तुम्हाला वारंवार सांगावे लागेल काय ? हे विश्वंभरा थट्टेने देखील माझ्याशी चुकवा चुकाव करू नकोस. माझ्या ज्या काही आवडी आहेत त्या तुम्ही पूर्ण करा, तसे तुम्ही अंतर्यामी आहात. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्याशी समाधानाने बोलाल तर मी मानाने मोकळा होईल.
अभंग क्र. ६१४
निर्धाराचे अवघे गोड । वाटे कोड कौतुके ॥१॥
बैसलिया भाव पायी । बरा तई नाचेन ॥धृपद॥
स्वामी कळे सामाधान । तरि मन उल्हासे ॥२॥
तुका म्हणे आश्वासावे । प्रेम द्यावे विठ्ठले ॥३॥
अर्थ
निर्धारपणे कर्म केले तर, त्याचे गोड फळ प्राप्त होते. त्या कार्याचे कौतुक होते. तुझ्या पायी माझा भाव दृढ झाला म्हणजे मी आनंदाने नाचेन. स्वामींचे अस्तित्व कळले की आणि स्वामी च्या ठिकाणी माझे मन एकाग्र झाले तर मनाला समाधान प्राप्त होईल आणि, मन उल्हासित होईल. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाने त्याच्या चरणांशी दृढ राहण्या विषयी आश्वासन द्यावे आणि प्रेमाचा वर्षाव करावा.
अभंग क्र. ६१५
जाली तडातोडी । अवघी पडिलो उघडी ॥१॥
नव्हो कोणांचीच काही । तुझे भरलिया वाही ॥धृपद॥
पारुशला संवसार । मोडली बैसण्याची थार ॥२॥
आता म्हणे तुका । देवा अंतरे राखो नका ॥३॥
अर्थ नाही टाका अर्थ टाका
अभंग क्र. ६१६
आधार तो व्हावा । ऐसी आस करी देवा ॥१॥
तुम्हापाशी काय उणे । काय वेचे समाधाने ॥धृपद॥
सेवेच्या अभिळासे । मन बहु जाले पिसे ॥२॥
अरे भक्तपराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
अर्थ
मला तुझा आधार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा (आस) आहे. तुमच्या पाशी सर्व काही आहे मला जर त्यातून थोडे दिले तर तुम्हाला काय कमी पडणार आहे ? तुझ्या सेवेच्या इच्छेने माझे मन वेडावून गेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे भक्त पराधीना (भक्तांच्या आधीन असणाऱ्या) माझ्या अंतकरणाचे समाधान कर नारायणा.
अभंग क्र. ६१७
तुमचा तुह्मी केला गोवा । आता चुकविता देवा ॥१॥
कैसे सरे चाळवणे । केले काशाला शाहाणे ॥धृपद॥
कासया हो रूपा । नावा आलेति गा बापा ॥२॥
तुका म्हणे आता । न सरे हवाले घालिता ॥३॥
अर्थ
तुम्ही सगुण रूपात येऊन तुम्हालाच अडकवून घेतले आहे, आता चुकवा चूकवी का करता ? आता आम्हाला तुम्ही मायाजाळात कसे गुंतवू शकाल ? तुम्ही आम्हाला तुमच्या भक्ती विषयी शहाणे केलेत. तुम्ही नावा रुपाला का आलात ? तुकाराम महाराज म्हणतात आता कोणाचाही हवाला देऊन चालणार नाही.
अभंग क्र. ६१८
माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥
मी का पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥धृपद॥
आता अनारिसा । तेथे न व्हावे सहसा ॥२॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढे उगा उभा राहे ॥३॥
अर्थ
माझी भक्ती भोळी आहे. मी फार एकनिष्ट तुमच्याशी आहे. असा छान चाललेला भक्तीचा सोहळा सोडून मी का निराळा राहू ? देवा तुझ्याशी माझे असे नाते जुळले आहे की आता मी तुझ्याशी बिलगून राहावे. तुकाराम महाराज म्हणतात तू आता तुझे पाय दोन्ही जोडून निट उगाच उभा रहा.
अभंग क्र. ६१९
आहे तरि सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
अंगसंगाची उत्तरे । सलगी सेवन लेकुरे ॥धृपद॥
तरो निकटवासे । असो अशंकेच्या नासे ॥२॥
तुका म्हणे रुची । येथे भिन्नता कैची ॥३॥
अर्थ
माझा तुझ्यावर हक्क आहे. म्हणून मी असे शब्द बोलतो. आंम्ही भक्त म्हणजे तुझी छोटी बालके आहोत. याच करणा मुळे आमचे बोलणे सलगीचे आहे. कोणतीही शंका न धरता आम्ही तुझ्या जवळ राहू. तुकाराम महाराज म्हणतात हरी विषयी मला ऐवढी गोडी लागली आहे की, आता कसली भिन्नता मनात येणार ?
अभंग क्र. ६२०
काळ सारावा चिंतने । एकातवासी गंगास्नाने । देवाचे पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥धृपद॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥
देह समर्पीजे देवा । भार काहीच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥
अर्थ
हरीच्याच चिंतने काळ घालावा. एकात राहावे, गंगास्नान करावे. देवाची पूजा करून तुळशीप्रदक्षिणा कराव्या. आहारात व्यवहारात नियम असावे. इंद्रियावर संयम असावा, जास्त बडबड नसावी, जास्त झोप हि नासावी. परमार्थ हे महा धन आहे, त्या योगे हरीच्या चरणांची प्राप्ती करून घे. हे सर्व जतन होण्या साठी हे नियम आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देह हा देवाला समर्पण केला पाहिजे, त्याचा भार स्वतःवर घेऊ नको, म्हणजे अवघा आनंदच तुला होईल.
अभंग क्र. ६२१
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे ॥१॥
मेले जित असो निजोनिया जागे । जो जो जे जे मागे ते ते देऊ ॥धृपद॥
भले तरि देऊ गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करू घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत ते काय गोड आम्हापुढे । विष ते बापुडे कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचे पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
अर्थ
आम्ही विष्णुदास मेणाहूनही मऊ नम्र शीतल शांत आहोत. तसेच आम्ही कठीण आहोत की दगडासही भेदू. आम्ही देह बुद्धीने मरून सुद्धा आत्मस्तीतीने जागे आहोत. आम्हाला जो जो जे जे मागेल आम्ही त्याला ते ते देऊ. आमची नेसलेली वस्त्रे सुद्धा आम्ही त्याला देऊ, पण जर एखादा नाठाळ असेल तर आम्ही मात्र त्याच्या डोक्यात कठी घालू. आई वडील माया करतात त्या पेक्षाही आम्ही मायाळू आहोत, पण शत्रू पेक्षाहि घात पात करू. अमृतापेक्षाही आम्ही गोड आहोत आणि विष पेक्षाही आम्ही कडू आहोत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अवघे सगळेच गोड आहोत. पण ज्याच्या त्याच्या पद्धती प्रमाणे आम्ही त्याचे लाड पुरवितो.
अभंग क्र. ६२२
गाढवाचे ताने (तान्हे) । पालटते क्षणक्षणे ॥१॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाही मन ॥धृपद॥
उपजता बरे दिसे । रूप वाढता ते नासे ॥२॥
तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥
अर्थ
गाढवाच्या शिंगारा मध्ये क्षणाक्षणाला बदल झालेला दिसतो. त्या प्रमाणे अधम मनुष्याचा स्वभाव असतो. त्याचे मन कधी एकनिष्ट नसते. गाढवाचे पोर जन्मल्यावर चांगले दिसते. पण ते जसे जसे वाढत जाते तसतसे ते कुरूप दिसते. तुकाराम महाराज म्हणतात गाढव केव्हाही ओरडते. त्याला काळ वेळ कळत नाहि.
अभंग क्र. ६२३
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोवळा ॥१॥
गद्ये पद्ये काही न धरावी उपाधी । स्वाधीनचि बुद्धी करुनी ठेवा ॥धृपद॥
विचाराचे काही करारे स्वहित । पापपुण्यातीत भांडवल ॥२॥
तुका म्हणे न लगे जावे वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखेचि ॥३॥
अर्थ
दुसऱ्याचे धनआणि दुसऱ्याची पत्नी याचा विटाळ मानवा. या पासून जो दूर राहतो तो सोवळा (शुद्ध) आहे. गद्य पद्य ग्रंथ रचून दुसऱ्याची उपाधी करून घेऊ नये. आपली बुद्धी स्वाधीन करून ठेवा. विचारांचे काही स्वहित करा, पाप पुण्यातील भांडवल निवडून आत्म नंदाचे भांडवल जोडावे. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या प्राप्तीसाठी काही वनात वगैरे जावे लागत नाही, सर्व विश्वा मध्ये तो विश्वात्मा व्यापक आहे.
अभंग क्र. ६२४
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इछितिया ॥१॥
उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥
तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवे भेटी थोर पुण्य ॥३॥
अर्थ
जगात बाभळीचे आणि रुई चे झाडे थोडी आहेत का ? पण आपल्याला हवी ती फळे कल्पतरूच देऊ शकतो. गाई, म्हैसी, शेळ्या अनेक आहेत, पण त्या सर्वापेक्षा कामधेनु वेगळीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो देवाचे दर्शन घडवितो असा संत महात्मा मिळणे फार दुर्लभ आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

