वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा – 41 Gram Gita Chapter 41 ओवी संख्या :- 147 | ग्रामगीता अध्याय 41 ग्रंथ-महिमा Gram Gita Chapter 41 Book-Glory |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 41
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय 41 ग्रंथ-महिमा
Gram Gita Chapter 41 Book-Glory
ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ४१
Gram Gita chapter Forty One beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 41 ग्रंथ-महिमा
ग्रंथ-महिमा
ईश्वरे व्यापिले हे विश्व । म्हणोनि जगचि आम्हा देव । विश्वाचा मूळ घटक गाव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥
यात ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचे ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसता प्रलयचि ॥२॥
ग्राम म्हणजे देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर । सर्वाची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥
ग्रामगीता शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा । तेणे ईश्वरी राज्य गावा । नांदेल सदासर्वकाळ ॥४॥
ग्रामगीता दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी । ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥
चाळीस दिवस म्हणजे मंडळ । ऐसी अनुष्ठाने प्रांजळ । करिता गाव सुधारेल सकळ । संस्कारे ग्रामगीतेच्या ॥६॥
म्हणोनि चातुर्मास्यादि निमित्ता । मंदिरी, पारी, बैठकीत बसता । वाचावी हर्षभरे ग्रामगीता । रंग रंगणी आणोनिया ॥७॥
परि ऐसी नसावी भावना । अर्थहीन करिता पारायणा । ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥
माझ्या मते हे अज्ञान । दूर सारोनि करावे वाचन । आधी शिकावे अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥
प्रथम हीच महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचे कळावे ज्ञान । आपुले वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥
असेल मित्रमंडळी बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली । नाहीतरि वाचनपठने केली । कोणा न कळले तरि काय ? ॥११॥
काय वाचतो याचे ज्ञान । नाही वाचकासीच झाले पूर्ण । श्रोते पळती उगेच उठोन । अर्थ काय वाचनासि ? ॥१२॥
कोठे थांबावे वाचकांनी । कोठे वाचावे जोर देवोनि । कोठे रंगवावे गंभीरपणी । कळले पाहिजे वाचका ॥१३॥
ऐसे जव कळलेच नाही । केली पारायणे सर्वहि । लक्ष नसे अर्थप्रवाही । तरि ते व्यर्थ वाचन ॥१४॥
वाचतांनाचि बोध होतो । अंगी स्फुरणभाव उठतो । कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरी ॥१५॥
ऐसे वाचन आधी शिकावे । तरीच ग्रंथपठन करावे । मग आपणासि ओळखीत जावे । अधिकारपरत्वे वाचके ॥१६॥
वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यावरि परिणाम करील । नाहीतरि होईल टिंगल । जनतेमाजी तयाची ॥१७॥
मुखाने ग्रंथ वाचावे । घरी विपरीत आचरावे । तैसेचि बाहेरि गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥
मुखे वाचतो ” सत्य बोलावे ” । परि सत्य करणेचि नाही ठावे । म्हणे ” मज सत्यवान म्हणावे ” । कैसे म्हणतील ग्रामवासी ? ॥१९॥
मी तो धनावरचा सर्प बरवा । परि मला ” उदार दाता ” गौरवा । ऐसे कोण मानील आपुल्या गावा ? सांगा सांगा ॥२०॥
रंजल्यासि न दे पाणी । म्हणे ” मज म्हणा दानशूर राणी ” । ऐकेलचि का ऐसे कोणी । किती वाजविले चौघडे तरी ? ॥२१॥
पानतंबाखू खावोनि आला । प्रवचनी कीर्तनी शाळेत बसला । हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । ” व्यसने सोडा ” बोलता ॥२२॥
एक पंडित जेवणासि बैसला । आरंभ शांतिपाठासि केला । परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारले त्याने बाइलेसि ॥२३॥
ती म्हणे वाहवा ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति ! तोंडाने पति दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचे ॥२४॥
ऐसे न व्हावे आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी । आहे सर्वावरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ॥२५॥
उपदेशक वाचक आचारशील । असले तरीच भाव फळेल । श्रोत्यांचे हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेसि ॥२६॥
वक्ता असेल सरळ सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक । जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघासि ॥२७॥
म्हणोनि हेचि वरिष्ठांनी करावे । जैसे सांगावे तैसेचि वागावे । तरीच होईल त्यांच्या प्रभावे । कल्याण ग्रामजीवनाचे ॥२८॥
येथे श्रोत्यांनी विचारले । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिले । परि कित्येक ग्रंथी सांगितले । पारायणचि फलदायी ॥२९॥
कोणी म्हणती ग्रंथाचे पारायण । करिता मिळेल पुत्र, धन । होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणे ग्रंथाच्या ॥३०॥
कोणी म्हणती मंत्रचि जपा । हजारोनी करा संकल्पा । म्हणती सांगतो मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न वाचता ॥३१॥
कोणी म्हणती अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा । मोक्ष चालत येईल घरा । कानी पडता शब्दचि ॥३२॥
कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरी । तेथे नये काळाची फेरी । याचा मेळ कोणेतरी । बसेल सांगा ? ॥३३॥
याचे उत्तर ऐका सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण । ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिले प्रलोभन दावूनि ॥३४॥
त्यात एक आहे उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रही । त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥
कानी पडो एकचि वचन । परि त्यात असे महापुण्य । हेहि ओढ लागावी म्हणून । कथिले असे थोरांनी ॥३६॥
नुसत्या पारायणाचे महत्त्व । त्यातहि हेचि आहे तत्त्व । कधीतरी येईल आचरणी सर्व । संस्कार होता ॥३७॥
कराया सांगितले जप-अनुष्ठान । तेहि शुध्द कराया जीवन । क्रमाने तितुके दिवस तरि मन । शुध्दाचरणी लागाया ॥३८॥
म्हणोनि मी या सकला मानितो । परि जपणारे एकांगी समजतो । तेणेचि लाभ हाता न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥
घोडयासि पाणी दाखवावे । म्हणता तेचि धरिले जीवे । पाणी पाजणे नाही ठावे । तैसे झाले लोकांचे ॥४०॥
ऐसेचि नाना ग्रंथ वाचले । परि तैसे मुळीच नाही वर्तले । कोण्या तोंडाने मागावे भले । फळ तयासि ? ॥४१॥
काही ग्रंथांतहि अवास्तवपणा । हे न राहवे सांगितल्याविना । त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येता हातामाजी ॥४२॥
ग्रंथी अपार फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली । हजारो लोकांनी आम्हा सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥
ग्रंथी सुखाची फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी । आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिके ॥४४॥
कोणी कोणास साधन सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति । घरोघरी व्रतवैकल्ये आचरती । भुलती बायाबापडया ॥४५॥
व्रतांची वाचती कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती । नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥
काही उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी । सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटी । अर्पा म्हणती देवासि ॥४७॥
लोकहि असती आसक्त बावरे । काहीहि सांगोत सांगणारे । धावोनिया करिती बिचारे । व्रतसाधने वेडयापरी ॥४८॥
फळ न लाभता मग चिडती । म्हणती काय चाटावे ग्रंथाप्रति । रोज वाचावे ग्रंथ किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥
पतिपत्नी आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना । काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीती ? ॥५०॥
घाला उंबरीस प्रदक्षिणा । परि सुधारू नका आचरणा । भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ? ॥५१॥
कलकत्त्याच्या गाडीत बसावे । आणि म्हणे ” देवा ! पंढरीसि न्यावे ” । ऐशा प्रार्थनेसि फळ यावे । कोण्या प्रकारे ? ॥५२॥
एकाने चोरी केली ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती । ती जावया वाची शनीची पोथी । चोरी काही सोडीना ॥५३॥
शेवटी पोलिसाहाती सापडला । गुन्हा त्याचा साक्षीत आला । तो पुसतो आपुल्या गुरुला । ” साधन सांगा सुटण्याचे ” ॥५४॥
गुरुहि होता लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी । शिवलीलामृताचा अध्याय चित्ती । सदभावने आठवी ॥५५॥
लावी देवीचे पुराण । करी नेटाने सत्यनारायण । आम्हासि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि तू ॥५६॥
त्याने तैसेचि सर्व केले । ग्रंथ साधन करोनि वाचले । बुवाब्राह्मणा धन उधळले । दंड काही चुकेना ॥५७॥
शेवटी पडला कैदेमाजी । म्हणे दाखवा तो गुरु पाजी । त्याने केली फजीती माझी । धन तेहि गमावले ॥५८॥ .
वाचली नेमधर्माने पोथी । परि जेल न चुके मजप्रति । काय करावी देवपूजा ती ? ग्रंथ जाळावे अग्नीवरि ? ॥५९॥
बिचारा चोरी करणे सोडीना । पण गुरुसि मागे साधना । काय करिती गुरु, ग्रंथ नाना ? वाचणारा लबाड हा ॥६०॥
ऐसे जन्मभरि साधन केले । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले । याने सांगणारांचेहि पतन झाले । फिके पडले साधन त्यांचे ॥६१॥
ऐसे कासयासि करावे । सत्य तेचि शोधूनि आचरावे । आपण बुडावे दुसर्या नर्की न्यावे । ऐसे न करावे स्वार्थभरे ॥६२॥
सांगणाराने तर्कशुध्द सांगावे । करणाराने सत्यचि करावे । तेव्हाचि फळ अनुभवास यावे । होते ऐसे ॥६३॥
हीच मुख्य घेवोनि धारणा । झाली ग्रामगीतेची रचना । हा ग्रंथ पुरवी सर्व कामना । कैसा ते ऐका ॥६४॥
हा आहे प्रखर शब्दबाण । जाय वाचकाचे हृदय भेदून । जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसे वाचनबोधे होतसे ॥६५॥
ग्रामगीता नव्हे पारयणासि । वाचता वाट दावी जनासि । समूळ बदली जीवनासि । मनी घेता अर्थ तिचा ॥६६॥
ही नव्हे फुले टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि । आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतो आम्ही ग्रामगीता ॥६७॥
कोणी दु:खाने होरपळला । कोणी संसारतापे तापला । कोणी असहाय्यपणे संकटी पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥
कोणी अन्याये लोका त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गी लावी । देवत्व सर्वाचे जागवी । दिव्य व्हाया जग सारे ॥६९॥
याने संस्कार बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम । सुखशांति लाभेल करिता उद्यम । सांगितले जे या ग्रंथी ॥७०॥
अल्पबुध्दि जाईल विलया । वाचता ज्ञान होईल तया । खरा धर्म अंगी ये सखया ! जीवन उज्ज्वल होताचि ॥७१॥
प्रेम आजवरि होते एकटे । ग्रंथ-चिंतने वाढेल चोखटे । सर्वाभूती दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥
द्वेषबुध्दीचे अज्ञान । ग्रंथ वाचता जाईल पळोन । सत्कार्य कराया धावे मन । करिता अनुष्ठान सक्रिय ॥७३॥
ग्रामगीता वाचूनि करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान । दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरता ॥७४॥
ग्रामगीता ग्रंथ वाचला । तैसाचि गावी वर्तू लागला । त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजी कोणीहि ॥७५॥
सामुदायिक वाढली वृत्ति । सारे गाव त्याची संपत्ति । ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥
ग्रामगीतेतील उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून । त्याचे घरी धनधान्य । भरपूर येईल समजावे ॥७७॥
आरोग्याचा वाचील धडा । आणि घेईल हाती फडा । रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणी त्याच्या ॥७८॥
कार्यास लागता तत्क्षणी । फलश्रुतीसि आरंभ होय झणी । चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षात घेता अर्थ त्याचा ॥७९॥
एकांती बैसोनि वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करिता । जीवनी उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥
ऐसे घर आदर्श झाले । कीर्ति-स्फूर्तीने गावी चमकले । मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनी ॥८१॥
हा केवढा लाभ झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला ! आपुला गाव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया ॥८२॥
ग्रामगीतेचे फळ नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि । उध्दरतील गाववासी । वाचूनि वर्तता ग्रामगीता ॥८३॥
एक एक साधन वाचता । आणि मग तैसेचि वर्तता । केवढे लाभ येतील हाता । सांगता नये ॥८४॥
ग्रामगीतेतील संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना । ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श ॥८५॥
नाना कलांची उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति । समजूनि येता विद्या-महती । विकास होई जीवनाचा ॥८६॥
सामुदायिक प्रार्थनेची प्रथा । रामधून, संत-उत्सव व्यवस्था । साधनसंपदा ऐकता वर्तता । शांति लाभे सर्वासि ॥८७॥
गायीगुरांची वाचता सेवा । करिता तैसेचि आपुल्या गावा । दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥
विवाहादि सर्व संस्कार । समाजी होतील सुखकर । मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा ॥८९॥
स्त्रिया-मुले होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरी होता पठन । ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचता वर्तता ग्रामगीता ॥९०॥
भिकारी बेकारी गावी राहीना । सत्तेची बंधने नुरतील कोणा । सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया ॥९१॥
आरोग्यसंपन्न होतील जन । नाही गावी तंटाभांडण । अन्याय, व्यसने, कारस्थान । जातील लया द्वेषादि ॥९२॥
गावी वाढेल संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना । नांदेल विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गावी ॥९३॥
ग्राम नांदेल स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी । परमार्थाच्या खुलतील घरोघरी । आनंद-लहरा ॥९४॥
जी जी इच्छा कराल मनी । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि । यात संदेहचि नाही माझिया मनी । उरला श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥
येथे नाही अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा । जे जे शब्द निघती ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेसि ॥९६॥
मी पंडित नोहे आपुल्या ठायी । सांगावया पंडिताई । ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली ग्रंथाद्वारे ॥९७॥
माझिया बालरूप वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी । चंद्रभागेतिरी उमटली वाणी । केली ऐकोनि लिपिबध्द ॥९८॥
जैसे जडजीवाने वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावे । तैसेचि दासाकडोनि घ्यावे । गीताकथन मानतो मी ॥९९॥
म्हणोनि पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो । या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत ॥१००॥
भगवदगीतेचे हे सक्रिय रूप । प्रकट झाले आपोआप । अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन म्हणोनि ॥१०१॥
गीता बोधिली अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला । राहू नये कोणी मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥
मी तो केवळ बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरी । म्हणोनिच प्रकटली धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥
श्री ज्ञानराज गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली । परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥
ग्रामगीतेत ज्यांची नांवे, चित्रण । त्या सर्व संतांचेचि सहवरदान । ऐसे मी मानतो विश्वासे पूर्ण । फळेल निधान ग्रामगीता ॥१०५॥
ग्रामगीता माझे हृदय । त्यात बसले सदगुरुराय । बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥
शब्दरचना गावंढळ । हे मी समजतो मनी प्रांजळ । दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥
वालुकापात्री गंगाजळ । ते पापनाशक मधुर निर्मळ । तैसे वाचक श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥
आमचे गावचि मागासले । तेथे जाड शब्द जरि योजिले । ग्रामीण म्हणतील नाही कळले । सांगा अर्थ पंडितहो ! ॥१०९॥
घरोघरी पंडित कुठले ? आहेत तेहि विकृत झाले । पोटापाण्यासि लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥
जे जे कोणी उरले उत्तम । त्यांनाहि काही रूढिभ्रम । ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥
क्वचित असती विद्वदरत्न । सर्वचि याती-यातीमधून । त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतो मी अंत:करणे ॥११२॥
ऐसियांसीच पंडित मानावे । जे असतील सात्विक संत स्वभावे । त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे ग्रामासि ॥११३॥
धुंडाळू नयेत पंडित कोणी । वाचक निवडावा गावातूनि । आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ कार्यकर्ता ॥११४॥
जो ग्रंथहि प्रेमे वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो । वेळ पडल्या सेवा करितो । गावलोकांची पाहिजे ती ॥११५॥
ऐसा असेल कोण्याहि जातीचा । अथवा धर्म, पंथ, देश-विदेशीचा । तरी तो चालेल, ग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥
पंडितांनी वाचूं नये । ऐसे माझे म्हणणे नोहे । परि काम न अडावे त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद कोणी ॥११७॥
पंडित पुराणिक विद्वान । यांनीहि अवश्य करावे वाचन । समाजाचे जबाबदार म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावे सर्वा ॥११८॥
ग्रामी विचारी शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण । सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरा जमवोनि ॥११९॥
जमवोनि श्रोते वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल । मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू ॥१२०॥
जे जे नारीनर साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति । वाचा ग्रामगीता, अर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरा ॥१२१॥
जो समजोनि हा ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावे असे मत ज्याचे । तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी ॥१२२॥
पाप म्हणजे बिघाड करणे । पाप म्हणजे कुमार्ग धरणे । पाप म्हणजे बळीच राहणे । गरीब प्राण्या पिळोनि ॥१२३॥
ऐसे नसावे वाचकाचे । जे ज्ञान मिळेल ग्रामगीतेचे । तैसेचि वर्तता वर्तविता पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥
ग्रामगीता ग्रंथ वाचोन । कोणी घेऊ नयेत पैसे आपण । ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावे वक्त्याने ॥१२५॥
ग्रामगीता ग्रंथ सुंदर । निर्मावया गावाचे चारित्र्य । प्रचार करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि ॥१२६॥
जे कोणी माझे स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ । घरोघरी चालवावा प्रचार । निर्मळ । ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥
ग्रामात खेळावी ग्रामगीता । सर्वास पाठ असावी सूत्रे तत्त्वता । प्रमाण द्यावे कोणाचे चुकता । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥
ज्याचे हाती हा ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला । वाचताचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने मजलागी ॥१२९॥
मग तयाचा न घडो अपमान । विचार करावा तारतम्य जाणून । कळत नसता घ्यावी पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥
उत्तम उपदेश हाती लाभला । समजावा शुभदिन आज उदेला । तैसेचि वर्तावे समजोनि बोला । ग्रामगीतेचिया ॥१३१॥
प्रथम ऐकावे हे गीतावचन । आचरणासि दृढ करावे मन । मग संकल्पावे कार्याचे साधन । ग्राम स्वर्ग करावया ॥१३२॥
प्रथम श्रध्देने वाचन करावे । अर्थ सर्व लक्षात घ्यावे । उठता बसता कार्यास लागावे । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥
यातचि माझे समाधान । सुधारेल । ग्रामाचे जीवन । पाखंड जाईल वितळोन । मतलबियांचे ॥१३४॥
संपोनि जातील भेदवाद । नांदेल गावी प्रेम शुध्द । लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावे ॥१३५॥
मानवांतील असुरत्व, पशुत्व । संपोनि उजळेल देवत्व । जीवनी संचरेल शुध्द तत्त्व । निरूढ ऐसे सर्वाच्या ॥१३६॥
निसर्ग साह्य दे वेळच्या वेळी । वृक्षवेली बहरती फुलीफळी । जलपूर्ण होतील नद्यातळी । आपुली मर्यादा न सोडता ॥१३७॥
आरोग्य होईल सर्वाचे भूषण । लोपेल दारिद्रय, उणीव, अज्ञान । कोणीच न राहतील हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥
समानतेची समाजरचना । शांति देईल जीवजना । प्रगतीची नवी नवी प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥
शोषण अथवा शासन । यांचे गळोनि पडेल बंधन । नाही शत्रूंचे आक्रमण । स्वयंपूर्ण गाव होता ॥१४०॥
दास होतील त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप । गाव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि ॥१४१॥
स्वर्गींचे अमर हेचि इच्छिती । हेचि संतऋषींच्या चित्ती । ऐसिया गावी लाभता वस्ती । कासया जाती वनांतरा ? ॥१४२॥
सांडोनिया आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव । ऐसिया गावा देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचे ॥१४३॥
त्यांच्या बोधे धर्मनीति । त्यांच्या सहवासे सेवाभक्ति । त्यांच्या प्रभावे शांति, शक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥
ऐसी ग्रामगीतेची फलश्रुति । ज्यात संतविभूतींची संकल्पपूर्ति । देवचि गेला बोलूनि चित्ती । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥
उभा विश्वाचिया विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर । त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे ग्रामगीता ॥१४६॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥
ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

