वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.
| अध्याय | अध्याय विषय |
|---|---|
| ग्रामगीता अध्याय बत्तीसावा – 32 Gram Gita Chapter 32 ओवी संख्या :- १०७ | देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book |
| ग्रामगीता अध्याय सूची | तुकडोजी महाराज भजने हिंदी भजने-पदे |
ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 32
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय बत्तीसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३२
Gram Gita chapter thirty-second beginning
—-🕉ग्रामगीता अध्याय 32 संत-स्वरूप
संत-स्वरूप
श्रोता सदभावे करी प्रश्न । चमत्कार नव्हे संत-खूण । मग संतांची ओळखण । समजावी कोण्या प्रकारे ? ॥१॥
साधू दिसती जेथे तेथे । कैसे जाणावे खरे-खोटे ते ? त्यांचे तात्त्विक रूप कोणते ? सांगावे आम्हा ॥२॥
श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । करोनि सकळासि नमन । कथितो संतांची ओळखण । ग्रामहितासाठी ॥३॥
श्रोतियात साधु नसे बैसला । म्हणता लागेल काळे तोंडाला । म्हणोनि प्रथमचि नमस्कार केला । ग्राम-श्रोतेजना मी ॥४॥
साधु सर्वत्रचि आहे । साधुत्वाविण स्थिर काय राहे ? जे असेल ते विलया जाय । साधुत्व नसता ॥५॥
सती आणि साधुवृत्ति । हीच गावाची महासंपत्ति । साधुत्वाविण कोणे रीती । टिकेल जीवन जगाचे ? ॥६॥
सर्व परस्परा खाऊ बघती । त्यांना सांभाळी संतवृत्ति । आघात सोसूनि देई शांति । सर्वजना अन्य कोण ? ॥७॥
दया क्षमा शांति विवेक । यांचे केंद्रस्थान साधु देख । प्रत्येक कार्यी आवश्यक । पुरुष ऐसा सर्वहिता ॥८॥
परि तयाची ओळखण । बहिरंगावरोनि करील कोण ? संत ओळखावा वृत्तीवरून । अथवा सदगुण पाहोनिया ॥९॥
नाहीतरि ओळखता नये । नाना सांप्रदायिक संत दिसताहे । नाना रंगांनी सजला राहे । वरोनिया संत कोणी ॥१०॥
कोणी भगवीच वस्त्रे घालिती । कोणी काळा रंग पसंत करिती । कोणी पांढरे फटफटीत वापरती । वस्त्र अंगी ॥११॥
कोणी माथा भार ठेविती । कोणी माळा, टिळे लाविती । कोणी लंगोटीच परिधान करिती । नारळाची ॥१२॥
कोणी अंगासि फासती भस्म । कोणी धुनी लावूनि घेती नाम । कोणी साधिती पंचाग्निकर्म । बहिरंगाने ॥१३॥
चिरकुटचिंध्या अंगा बांधती । घोगडी भोपळेच कोणी मिरविती । कोणी ओंजळीनेच पाणी पिती । सर्वकाळ ॥१४॥
कोणी अखंड उभे राहती । कोणी दिवसभरि पहारा देती । कोणी गुप्तचि वावरती । लोकामाजी ॥१५॥
कोणी एकाने समाधी साधली । खळगा करोनि मान पुरविली । चोवीस तासांनी काढली । शेवटी घेतली शिफारस ॥१६॥
कोणी म्हणवी दीन सेवक । कोणी अवतार म्हणवी अलौकिक । योगीराज म्हणवोनि वाजवी शंख । ऐसे अनेक खरे-खोटे ॥१७॥
नाना मतांचे नाना संत । नाना संतांचे नाना पंथ । कोण निवडावा उत्तम त्यात । वेषादिकांनी कळेना ॥१८॥
म्हणोनि संतांच्या ऊणखुणे । कोणी न पावे बहिरंगाने । त्यास पाहिजे सहवास करणे । अथवा ओळखणे कार्यावर ॥१९॥
कार्य कधी दांभिकहि करी । आतले न जाणवे लौकरी । ज्ञानध्यानहि बोले वैखरी । ओळखू ये ना सहजी तो ॥२०॥
त्याला कारण आपलाहि स्वभाव । भिन्न प्रकृतीचे भिन्न भाव । परि बाह्य वेषावरि संत-असंत गौरव । देता नोहे हिताचे ॥२१॥ .
बाह्य सतकार्य सदाचार ज्ञान । यासि मानिले श्रध्दास्थान । तेणे मात्र अध:पतन । नव्हे आपुले सदभावे ॥२२॥
उत्तम गुण, सदाचरण । अभेदवृत्ति, विशाल ज्ञान । हे दिसे तोवरिच तेथे गुरुपण । मानिता कोणी फसेना ॥२३॥
मानव्याचा उत्तम आदर्श । नाही विषाद नाही हर्ष । सरळ विवेक सत्कार्य-संतोष । संतापाशी पाहावा ॥२४॥
ज्याचे गेले संकुचितपण । झाले विशाल अंत:करण । ज्याचा व्यवहार आदर्श पूर्ण । त्यासीच नम्र असावे ॥२५॥
एरव्ही संत म्हणता हात जोडावे । जवळ जाता निरखीत जावे । ऐसे करिता फजीत न व्हावे । लागेल कधी ॥२६॥
आसक्तीने लोभी न व्हावे । मुमुक्षुत्व अंगी बाणवावे । म्हणजे ऐशातैशा गुरूसि न फावे । भुरळ घालणे ॥२७॥
जो स्वये उत्तम शिष्य झाला । त्यासि गुरूहि लाभे भला । परि सात्विकतेचाचि आदर केला । पाहिजे निश्चये ॥२८॥
अहो ! सत्वशील तोचि साधु भला । जो रिकामा कधीच न पाहिला । तो काम करिताचि ओळखला । पाहिजे सत्य ॥२९॥
समजा तो जेथे उभा असे । काही कराया स्मरे उल्हासे । तो जेथे बैसला दिसे । तेथे लोक तैसे बसावे म्हणोनि ॥३०॥
जेथे तो सभास्थानी जाय । लोकांचे जोडे रांगेत ठेविताहे । अथवा लोका बैसवी नीट उपाये । समाजसौंदर्य कळावया ॥३१॥
तो जेथे भोजनास बैसे । उणे पडोचि न देतसे । उणे दिसता कामी लागतसे । व्यवस्थेच्या आपणचि ॥३२॥
तो जेथे जेथे काम करी । ते ग्राम बनवी स्वर्गपुरी । त्याची सेवा महाक्रांतिकारी । ग्रामोध्दारक ॥३३॥
बोले तैसा चाले उत्तम । लोकसंग्रही त्याचे प्रेम । आपणचि करी आपुले काम । नरवदेव न होता ॥३४॥
जगणे परिश्रमावाचून । हे नव्हे संताचे लक्षण । झटूनि करावे लोक-कल्याण । निष्कामपणे ॥३५॥
आपुल्या देही अनासक्त । परि हीनदीनांचा झाला भक्त । अहोरात्र सेवानुरक्त । नम्रभावे, संत तो ॥३६॥
जनता तयासि वाटे देव । सेवेत नाही लपंडाव । परि अधिकार तैसी देई ठेव । उपदेशाची सर्वजना ॥३७॥
मूर्खासि करावे शहाणे । हेचि त्याचे नेहमी पाहणे । जडाज्ञानासि बोध देणे । कामचि संताचे ॥३८॥
हा तो संताचा सहजस्वभाव । न पहावा भेद-भाव । बोध करावा सदैव । सत्कार्मांचा सर्वासि ॥३९॥
ओज असे तयांचिया वाणी । सहज बोलता घेई वेधोनि । नम्र होती ऐकता प्राणी । संत-वचना ॥४०॥
संतांचे सदा प्रेमळ बोल । वाक्य-बोध अति विशाल । कर्तव्यतत्परता प्रबल । संतांपाशी ॥४१॥
संतवचनांचा महाप्रताप । ऐकता श्रवणी होय अनुताप । दुष्ट आपोआप । निरसोनि जाय सत्संगे ॥४२॥
संतांची नजर कृपेने पडे । त्यासि तीर्थाटन ठायीच घडे । संत प्रसन्नतेने धडे । पदोपदी देताति ॥४३॥ .
संत मातेहूनि मायावी । संत वैभव असोनि गोसावी । राज्य करोनि फकीरी दावी । आपुल्या अंगी ॥४४॥
संत सत्तेविण राज्य करी । धनावाचूनि वैभव भरी । स्त्रीपुत्र नसताहि संसारी । विश्वव्यापी ॥४५॥
संत गंगेहूनि पवित्र । शीतल निर्मल सूर्यचंद्र । संत कल्पतरूहूनि थोर । मोक्षदानी ॥४६॥
संत हृदये असती कोवळे । दया द्रवोनि ह्रुदय उफाळे । मनुष्य-कल्याणाचे निर्वाळे । संतापाशी ॥४७॥
संत ह्रुदये जरी दयाळ । कठिण काळाचेहि काळ । न्यायनीतीने अति निर्मळ । निर्भय वृत्ति ॥४८॥
संतापाशी एकचि धर्म । सकल जीवाचे कल्याणकर्म । मानवता हेचि मुख्य वर्म । सर्वकाळ ॥४९॥
संतास नाही जात-परजात । विश्वकुटुंब संतांचे गोत । जे जे भेटतील ते आप्त । सुह्रद त्यांचे ॥५०॥
कोणा कधीहि न होवो दु:ख । संतुष्ट राहावेत सकळीक । असोत राव अथवा रंक । समान त्यांना ॥५१॥
विश्वसुखे संत संतोषे । जनदु:खे दु:खी भासे । सदा सत्कर्मी उल्हासे । लागती संत ॥५२॥
संतांचा तो मूळस्वभाव । सर्वात वाढवावा प्रेमभाव । करावा सज्जनांचा गौरव । कौतुकाने ॥५३॥
कोठे सज्जनांवरि नाराजी । कोठे दुर्जनासीहि पूजी । परि ध्येय एकचि, समाजी । वाढ करणे उत्तमाची ॥५४॥
दुर्जनावरीहि प्रेम करावे । दुर्जनतेसि निवारावे । सज्जन करोनि सोडावे । प्रेमबळे ॥५५॥
आपुले अंगहि अर्पोनि । उणे करावे पूर्ण जनी । शांति दे चंदनापरी झिजोनि । संत तोचि ॥५६॥
अंध रूढयांचे उच्चाटन । मानवधर्माचे संस्थापन । यासाठी करी प्राणहि अर्पण । प्रसंगी संत ॥५७॥
ऐसे सुंदर बहिरंग । याहूनि थोर अंतरंग । संपादिल्या संतसंग । फिटे पांग जीवाचा ॥५८॥
संतसंगति ज्यास लाभली । त्याची दुर्दशाच पळाली । कर्तव्यफळे उमगू लागली । जीवनाची ॥५९॥
संताचिया सहज संगती । सदबोधाची फळे लाभती । प्रवृत्ति ते होय निवृत्ति । अंतरंगी ॥६०॥
अंतरंग आणि बहिरंग । उन्नत करील सर्व अंग । ऐसा आहे संतसंग । सर्वोदयकर्ता ॥६१॥
उज्ज्वल संतांचे जीवन । भक्तिभाव-वैराग्यपूर्ण । आत्मानात्मविवेक ज्ञान । संतापाशी ॥६२॥
आत्मशक्ति कर्मशक्ति । ज्ञानशक्ति प्रेमशक्ति । सात्विक कला प्रमाणशक्ति । वास करी संतांठायी ॥६३॥
मानसिक शक्तीचे सागर । संत करितील जो निर्धार । निश्चये होईल तो व्यवहार । सर्वागपूर्ण ॥६४॥
परि प्रत्येक साधु सर्वोदयी नव्हे । काही तत्त्वी अपूर्णता राहे । त्यातहि अधिकारभेद आहे । अवस्थापरत्वे ॥६५॥
जीवलोक आणि देवकोटी । परलोक तैसी परात्परकोटी । चढती वाढती संतदृष्टी । परि केंद्रबिंदु एकचि ॥६६॥
जो ऐहिक दृष्टीने जन । मानी सेव्य, एक समजोन । करितो सेवा रात्रंदिन । मानिती धन्य लोक तया ॥६७॥
परि त्यास नाही खंती महंती । रागद्वेष नाही कोणाप्रति । मान-अपमानहि नये चित्ती । कार्यीच वृत्ति समाधानी ॥६८॥
हा जीवसृष्टीचा साधुसंत । ईशसृष्टीचा साधूहि तद्वत । तो ” देव-देवी ” म्हणोनीच ओळखीत । जनलोका भक्तिभावे ॥६९॥
न मानी देशवेष धर्मपंथ । नाठवे नीच-उंच जातपात । देवाचे कुटुंब मानी जग समस्त । व्यवहार उन्नत तयाचा ॥७०॥
ओळखी एकाच स्थानावरूनि । त्यास न दिसे रावरंक कोणी । राजा-प्रजा भेद न मानी । साधु देवकोटीचा ॥७१॥
ज्याने परसृष्टि अनुभवली । त्यासि परमात्मता साधली । आप-पर बोलीच निघोनि गेली । एकात्मता झाली सर्वभूती ॥७२॥
अखिल ब्रह्मांडी जे जे दिसे रूप । ते ते झाले ब्रह्मस्वरूप । जन मिथ्याभ्रमे सोशिती ताप । तो निवारी नानापरी ॥७३॥
स्वप्न मिथ्या परि ओसणे कोणी । त्यास जागवी हालवोनि । तैसा दयाळुपणे करी जनी । सर्व सुखकार्य ॥७४॥
सर्वासि समत्वाकडे न्यावे । एकत्व व्यवहारी नांदवावे । अवघे विश्वचि ब्रह्मसुखी डोलावे । वाटे तया संता ॥७५॥
परात्पर स्थिती विश्वचि नाही । सर्व स्वानंद कोंदला पाही । त्याची राहणीच सहजी ब्रह्ममयी । सहज बोलहि वेदोत्तम ॥७६॥
ऐसे असती भिन्न प्रकार । साधुसंतांचे विविध संसार । तेथे आम्ही पडतो पामर । जाणावयासि ॥७७॥
म्हणोनि संतांच्या अगम्य खुणा । संतचि जाणतील संतजना । परि आपुल्या जाणिवेने त्यांना । ओळखीत जावे ॥७८॥
जितके संतरूप जाणू आपण । तितके अंगी येईल संतपण । गंगेसि मिळता गंगाचि होऊन । राही नाला ॥७९॥
गंगा नेहमीच झुळझुळ वाहे । परि पाणी घ्यावयासि जो जाये । त्याच्या पात्राइतुकेचि राहे । पाणी जवळी ॥८०॥
गंगा जरी मोठी असली । तरी घरी कैसी न्यावी भली ? ज्याने नेण्याची व्यवस्था केली । प्राप्त झाली शांति त्यासि ॥८१॥
तैसे संत सदा कृपाळू । दयाळू स्नेहाळू प्रेमळ मायाळू । जीवजनांचे नित्य कनवाळू । सुसंकल्पी ॥८२॥
उकलोनि दाविती ग्रंथवर्म । आपुल्या अनुभवे नाशिती भ्रम । सकळा दाविती वाट सुगम । संत मार्ग झाडोनिया ॥८३॥
त्यासि शरण लागे जावे । बोलता वचन श्रवणी भरावे । भरले तैसेचि करावे । निश्चयाने जीवनात ॥८४॥
मग जीवन होय उन्नत । हाचि उध्दाराचा पंथ । संत दाविती मार्ग सतत । जडजीवांसि सदभावे ॥८५॥
तयांचा बोध ऐकता स्वभावे । जडजीवहि उध्दरोनि जावे । या मार्गेंचि सर्व सुख पावे । जनतेलागी ॥८६॥
संत जनतेशी समरस होती । म्हणोनीच जडली त्यावरि भक्ति । संत चालती बोलती मूर्ति । भगवंताची ॥८७॥
मित्रहो ! जे जे देवाने केले । तेचि संतांनी हाती धरले । प्रचाराद्वारे गाजविले । देव-वाक्या सर्वत्र ॥८८॥
ईश्वरी अवताराचे कार्य । तेच संतांचे अंगी चातुर्य । सर्वाठायी आणोनि माधुर्य । वळण देती जनाला ॥८९॥
विसरोनि आपुले मोठेपण । वाढविती सत्याचे महिमान । न जाती प्रतिष्ठावैभवा भुलोन । आडमार्गे कधीहि ॥९०॥
जुनीच साधने घेवोनि हाती । करिती जनांची जागृति । समयानुरूप स्वरूप देती । सर्व उत्तम प्रथांसि ॥९१॥
असो दगडाचाहि उत्सव । परि त्यात भरोनि दिव्य भाव । त्याद्वारे उन्नत करिती मानव । साधुसंत ॥९२॥
सर्व संस्था पक्ष पंथ । यांच्यामध्ये जे जे उचित । त्यासि करिती प्रोत्साहित । संतजन समभावे ॥९३॥
जनांचिया चाली चालतो । जनांचिया बोली बोलती । परि आपुले उद्दिष्ट घालती । कुशलपणे त्यामाजी ॥९४॥
सर्वास वाटती आपुल्यासारखे । नव्हती कोणासि पारखे । आबालवृध्दांसि करिती कौतुके । आकर्षित प्रेमाने ॥९५॥
सर्वापासूनि पुढेच असती । परि दूर न वाटे कोणाप्रति । तेणे करू लागली प्रगति । लोक निराश न होता ॥९६॥
लहान मुलासि शिकवावे । त्यासाठी पांडित्य दूर ठेवावे । तैसे वर्तती स्वभावे । साधुसंत जनासाठी ॥९७॥
आंधळयांचे होती नेत्र । चैतन्य ओतिती सर्वत्र । घुसती होऊनि ऐक्यसूत्र । संत विरोधा अंतरी ॥९८॥
सर्व मानवांसि उन्नत करावे । सर्वत्र समाधान पोचवावे । प्रत्येकाने प्रत्येकास व्हावे । पूरक, ऐसे उपदेशिती ॥९९
मेघवर्षावासारिखा उपदेश । तेथे नाही गुरु-शिष्य । आत्मवत पाहती सर्वास । संतसज्जन ॥१००॥
त्यांचा उपदेश म्हणजे अमृत । शांति लाभे होता प्राप्त । त्रिविध तापे जीव जे तप्त । होती तृप्त सत्संगे ॥१०१॥
म्हणोनि ग्रंथी वर्णिले सकळ । संत उध्दरील आपुले कूळ । ऐसेचि नव्हे, प्रेमाचा सुकाळ । करील गावी ॥१०२॥
जया गावी वसेल संत । तेथे पुण्य करील पापांचा अंत । उध्दरोनि जाय प्रांतचा प्रांत । दु:खे होत देशोधडी ॥१०३॥
संत करिती आपणासमान । संतसंगे संतपण । प्रयत्ने उन्नत होय जीवन । संतबोध लाभता ॥१०४॥
ऐसा संतांचा महिमा । आवडतो पुरुषोत्तमा । सर्व जीवांच्या येतो कामा । मायबाप म्हणोनिया ॥१०५॥
ऐसे क्रियाशील संतजन । त्यांचीच गावी असावी चलन । तरीच उध्दरेल गाव पूर्ण । नांदती सदगुण तुकडया म्हणे ॥१०६॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । सत्संग कथिला ग्रामोध्दारार्थ । बत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०७॥
ग्रामगीता अध्याय बत्तीसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

