Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

ग्रामगीता अध्याय चोविसावा – 24 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

संत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्याय 24 ९६ कुळी मराठा 96 kuli maratha warkari rojnishi

संत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्याय 24 ९६ कुळी मराठा 96 kuli maratha warkari rojnishi

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता
Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyay
संत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र.

अध्यायअध्याय विषय
ग्रामगीता अध्यायचोविसावा- २४
Gram Gita Chapter 24
ओवी संख्या :- १०२
देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन आणि ग्रंथाची प्रस्तावना
Deva-Darshan :- Obeisance to the cosmic form of God and preface to the book
ग्रामगीता अध्याय सूचीतुकडोजी महाराज भजने
हिंदी भजने-पदे

ग्रामगीता
प्रस्तावना
—-🕉ग्रामगीता अध्याय 24 – चोविसावा

॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (तुकड्या दास)
Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj (Tukdya Das)
ग्रामगीता अध्याय चोविसावा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय २४
Gram Gita Chapter Twenty-Fourth Commencement

—-🕉ग्रामगीता अध्याय 24 यात्रा – मेळे

यात्रा – मेळे
श्रोतयाने केला प्रश्न । गावी संप्रदाय असती भिन्न । वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥
ते सार्वजनिक उत्सवीहि येती । तरी आपणासि वेगळे समजती । आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥
त्यांचे फड निरनिराळे । साजविती भिन्न देवळे । कोठे प्रतिमापूजेचे सोहळे । कोणी मूर्तिविरोधक ॥३॥
कित्येकांची तीर्थी धाव । ते इतरांसहि देती उठाव । इकडे ओस पडले गाव । तरी पर्वा नाही ॥४
या सर्वाची मते वेगळी । भिन्न त्यांची संतमंडळी । एकएकाची करितो टवाळी । आपाआपुल्या गोटात ॥५॥
वेगवेगळया शिष्यशाखा । वेगवेगळे गुरु देखा । कोणी न मिळती एक-एका । करिती उत्सव आपुले ॥६॥
खरे-खोटे ज्ञान काही । अंधरूढया शिकविती पाही । गट पडले भिन्न भाविकांचेहि । मिरविती द्वाही आपुलाली ॥७॥
हे जोवरी एक न होती । तोवरी संघटनेची फजीती । यासि उपाय करावा कोणेरीती । तेचि आम्हा सांगावे ॥८॥
श्रोतयांचा प्रश्न मार्मिक । उत्तर ऐका आवश्यक । गावापासोनि विश्वापर्यंत देख । जरूरी याची ॥९॥
भिन्न भिन्न झाले गट । वेगवेगळे पडले तट । आकुंचित मते शिकविती रोगट । समाजासि ॥१०॥

अंधश्रध्देस आणोनि पूर । लोकी रुजविती मिथ्याचार । त्यांच्या उत्सवाचे प्रकार । विचित्रचि असती ॥११॥
अपार धनाची धुळधाणी । अनिष्ट प्रथांची पेरणी । फुटीर वृत्ति वाढेल जनी । ऐसी करणी कितीकांची ॥१२ll
कित्येक बुवा वेषधारी । जगती ऐशा गटांवरि । खरे ज्ञान न देती स्वार्थभरी । जनतेलागी ॥१३॥
ऐसे हे जोवरि चाले । तोवरि गाव भ्रमी बुडाले । सुधारणेच्या मार्गी आले । दरी-दरकुटे ॥१४॥
यासाठी एकचि उपाय । आपण न ठेवावे अलग ठाय । त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय । समुदाय साधाया ॥१५॥
असो कोणाचा कोणता पंथ । असो कोणीहि बुवा महंत । सर्वा आपुलेचि मानोनि सतत । जावे मिळोनि सर्वाशी ॥१६॥
पंच महोत्सवचि आपुले । येर ते तुच्छ मानता चुकले । आपण अलग पडता कसले । साधेल ऐक्य ? ॥१७॥
म्हणोनि निर्वाळा सांगतो । जेव्हा संतजयंती पुण्यदिन येतो । तेव्हा सगळयांमिळोनि करावा तो । सार्वजनिक स्थानी ॥१८॥
मग तो असो कोण्या पंथाचा । वेगळी न ठेवावी वाचा । संतसज्जन सखा विश्वाचा । म्हणोनिया ॥१९॥
सर्व पंथांचे उत्सव । ज्यात दिसेल सत्यगौरव । त्यातूनि विशालतेचे भाव । भरावे लोकी ॥२०॥

एकलकोंडे राहू नये । घरीच उत्सव करू नये । सर्वाचे सहकार्य घ्यावे । हेचि मर्म संघटनेचे ॥२१॥
उत्सवाचा व्हावा परिणाम । म्हणोनि प्रभावी ठेवावे कार्यक्रम । थोरांचे भाषण भजन उत्तम । करावे तेथे ॥२२॥
करिता संतांचा गुणगौरव । सांगू नये चमत्कारलाघव । पाडवा उत्तम वागणुकीचा प्रभाव । समाजावरि ॥२३॥
संत ज्ञानेश्वर, तुकाराम । नामदेव, सांवता, चोखा अनुपम । एकनाथ, दामाजी भागवतोत्तम । वर्णावे लोकी ॥२४॥
सजन कसाई, रविदास चांभार । सेना, संताजी, गोराकुंभार । कृष्णदयार्णव, वामन, श्रीधर । संतकवीहि ॥२५॥
रामदास, तुलसीदास । केशवदास, कबीरदास । सुंदरदास, विष्णुदास । सूरदासादि ॥२६॥
शंकराचार्य, रामानुजाचार्य । मध्वाचार्य, वल्लाभाचार्य । राधास्वामी, बसवाचार्य । रमणमहर्षि, श्रीचक्रधर ॥२७॥
शहादत्त, गोरखनाथ । गोविंदनाथ, दयाळनाथ । नरसी मेहता, रामतीर्थ । श्रीसमर्थ आडकोजी ॥२८॥
महात्मा मंसूर, महंमद । कवेरराम, शेखफरीद । झरतुष्ट्र आणि गौतमबुध्द । विवेकानंद प्रभावी ॥२९॥
गुरु गोविंदसिंह, नानकदेव । महाचैतन्य गौरांगदेव । रामकृष्ण परमहंसदेव । जैन महावीर स्वामी ॥३०॥

महात्मा येशु, टालस्टाय । मार्क्स, साक्रेटीस निर्भय । महात्मागांधी, राममोहनराय । दयानंदादि महाज्ञानी ॥३१॥
भक्त मीराबाई, मुक्ताबाई । कान्होपात्रा, जनाबाई । रंगनायकी, बहिणाबाई । एनिबेझंट, निवेदिता ॥३२॥
ऐसे जे जे योग्य प्रभावे । त्यांचे चारित्र्य समजोनि द्यावे । त्यांनी समाजकार्या गौरवे । काय दाविले जनतेसि ॥३३॥
ऐसियांची पुण्यतिथि आदि करावी । सर्वाची प्रार्थना घ्यावी । उत्तम वक्त्यांनी चरित्रे बोलावी । परिणाम होईल त्या शब्दी ॥३४॥
त्यांची विशालता समजोनि द्यावी । समान भावना अनुसरवावी । समाजानेहि तैशीच करावी । प्रगति आपुली म्हणोनि ॥३५॥
संत देहांनी भिन्न असती । परि ध्येयधोरणाने अभिन्न स्थिति । साधने जरी नाना दिसती । तरी सिध्दान्तमति सारिखी ॥३६॥
ऐसे सांगता अभ्यासे वर्णून । भिन्न संप्रदायांचे होईल मिलन । होईल बुवाबाजीचेहि खंडन । सर्वतोपरी ॥३७॥
नाहीतरि पंथांचे पडती गट । सहकार्याचा भंगे तट । पोटभरू दांभिकांचे पोट । चालतसे तयावरि ॥३८॥
आपापल्या भाविक जना । भुलविती उत्सवादिकी नाना । अंधश्रध्देने होय धिंगाणा । ग्रामजीवनाचा ॥३९॥
म्हणोनि आणावे मैदानावरी । आकुंचितपण सारोनि दुरी । मग सत्यचि बोलेल वैखरी । सर्वामुखी मंगल ॥४०॥

गावी येवोत संत कोणी । बोध करवावा प्रार्थनी । अथवा सार्वजनिक स्थानी । सर्वासाठी उत्सवादिकी ॥४१॥
तेथे न सांगवेल भाकडकथा । न पाळवेल अनिष्टप्रथा । मार्ग लाभेल आइता । लोका सत्य ज्ञानाचा ॥४२॥
ज्ञानाचिया भूमिकेवरि । फारशा भेदासि न उरे उरी । मिळते जुळते बोल बहुपरी । निघती सर्वाचे ॥४३॥
तेणे निरसेल भेद-कल्पना । तात्त्विकताचि कळेल जना । पंथबाजीच्या उच्चाटना । उपाय हा अमोलिक ॥४४॥
जेथे लोक समभावनेने बैसले । तेथे यथार्थचि चर्चा चाले । देव-संत-धर्म-ऐक्य साधे भले । हळुहळू तेणे ॥४५॥
म्हणोनि ऐसे वारंवार । प्रसंग आणावे गावी सुंदर । साधुसज्जन जुळवावे अपार । भिन्न भिन्न पंथांचे ॥४६॥
ऐक्य दृष्टीने संतोत्सव । करावे उत्साहे गावोगाव । जेणे तीर्थाचा गौरव । लाभेल गावा ॥४७॥
तीर्थी निर्मल साधुवृंद । तेथे तत्त्वचिंतानुवाद । जनास होईल तत्त्वबोध । म्हणूनीच महत्त्व तीर्थाचे ॥४८॥
एरव्ही ” तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनी ” । ऐसीच वदली संतवाणी । गर्जोनिया ॥४९॥
तैसे आज मार्गदर्शन । जया तीर्थी न होय पूर्ण । तेथे धाव घेवोनि कोण । लाभ या जना ? ॥५०॥

यात्रेस जावे तरि सेवेसाठी । विचारस्फूर्ति आणाया गाठी । तेणे गाव करावे उठाउठी । यात्रारूप आपुले ॥५१॥
परंतु यात्रा करिती चारोधाम । लोका मागती न करिता काम । यात न घडे पुण्यकर्म । वाउगा भ्रम अहंकार ॥५२॥
गावी उपाशी ठेवोनि बाळा । जावे कासया कुंभमेळा ? देव गावी थोडा तीर्थी निराळा । ऐसे नाही ॥५३॥
परि लोक सती पडाया जाती । पंडयादिकांच्या जाळी गुंतती । मेंढरापरी धावोनि मरती । रूढीमागे ॥५४॥
पंढरीपासून सहा कोसावरि । सावता राहिला जन्मभरि । देव मिळविला न करिता वारी । गावीच त्याने ॥५५॥
जनता-जनार्दनाच्या सेवेचे । काम करिता इमाने साचे । गावीच पुण्य पंढरीचे । धाव घेई आपैसे ॥५६॥
वसती जेथे ऐसे संत सेवक । ते गावचि तीर्थ होय सुरेख । स्फूर्ति घेवोनि जाती लोक । कराया गावे भूवैकुंठ ॥५७॥
जेथे प्रेम आणि पावित्र्य । त्यासीच नाम तीर्थक्षेत्र । कासया जावे गोंधळ विचित्र । बघाया तीर्थी ? ॥५८॥
गावाचे सार्वजनिक स्थान । तेचि समजावे तीर्थ महान । तेथेचि लागावे तन-मन-धन । दानशूरांचे ॥५९॥
तीर्थी कोणी खर्च न करावा । आधी गावमार्ग सुधारावा । तरीच तीर्थाचा पुण्यठेवा । गावी मिळेल सेवेने ॥६०॥

वांचवूनि ग्रामसंपत्ति । गावाची पवित्र घडवावी मूर्ति । मग न जाताहि क्षेत्री तीर्थी । पुण्य लाभे ग्रामोध्दारे ॥६१॥
सप्ताह, एक्के, यज्ञ, उत्सव । यासाठी वर्गणी होते ती सर्व । काही वर्षे सुधाराया गाव । याच कामी लावावी ॥६२॥
जयंती असो वा पुण्यतिथि । सप्ताह असो वा हवने, पंगती । पाहावी गावाची राष्ट्राची स्थिति । तैसेचि करावे पुण्यकर्म ॥६३॥
सर्व पंथीयांनी मिळावे । सर्वाच्या हिताचे कार्य उभारावे । हेकटपणे भरी न भरावे । भलतियाचि ॥६४॥
नाहीतरि महानुभाव पळे रानी । देवीभक्त सज्ज होती बलिदानी । कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनि । एकलकोंडे ॥६५॥
कोणी वर्गणी गोळा करून । देवीसि देती पशूंची दावण । परि रोग न जाती ग्रामसफाईविण । ऐसे उत्सव केलियाने ॥६६॥
कोणी गावच्या यात्रेमाजी । नाना अनिष्ट कामकाजी । पैसा उधळोनि पेरती समाजी । जहरचि जैसे ॥६७॥
त्यासाठी करावी यात्रा-कमेटी । यात्रा-मेळा-उत्सव-पर्वणी-हाटी । करावया सुधारणा उठाउठी । राष्ट्रीयतेच्या ॥६८॥
ग्रामोन्नतीची आयोजने करावी । शक्तिबुध्दीने राष्ट्रीयता भरावी । आपुल्या गावाची कीर्ति जावी । दिगंतरी तीर्थाऐसी ॥६९॥
गावी अथवा गावाजवळी । यात्रा-मेळा असे ज्या काळी । तेथे सेवा करावी सगळी । स्वयंसेवक होऊनि ॥७०॥

तैसेचि आपुल्या गावचे वैशिष्टय । ते जगापुढे मांडाया स्पष्ट । प्रदर्शन, संमेलन, यात्रादि इष्ट । सुरू करणे आपुल्या गावी ॥७१॥
सुंदर मार्ग सरळ निर्मळ । स्वच्छ आरोग्यदायी जळ । ग्रामरचनेतील आदर्श सकळ । वर्तावेत तेथे ॥७२॥
शौचकूप मुत्र्या चहू बाजूंनी । नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी । जेणे देश चढे उच्च स्थानी । वैभवाच्या ॥७३॥
नाना मनोरंजने चालवावी । परि व्यसने तमाशे येऊ न द्यावी । लोकास हळुहळु लावीत जावी । रुचि राष्ट्रीयतेची ॥७४॥
उद्योगाच्या सुंदर कला । वाद्यकलादि व्यवहारकला । माणुसकीच्या आचारकला । योजाव्या तेथे ॥७५॥
माणसाने मार्गी कैसे चालावे । कैसे बसावे कैसे बोलावे । आपुले वर्तन कैसे ठेवावे । घरात आणि समुदायात ॥७६॥
याचा सुंदर पाठ द्यावा । सर्वाचे ऐक्य शिकवावे गावा । यात्रा-उत्सवे संचार व्हावा । नवतेजाचा सर्वामाजी ॥७७॥
अनिष्ट प्रथा बंद कराया । सेवके झिजवावी काया । यात्राशुध्दीच्या नाना उपाया । अवलंबावे ॥७८॥
स्वामी दयानंद महाराज । तैसा त्यांचा आर्यसमाज । यांनीहि केले झटूनि काज । सुधारणेचे यात्रिकांच्या ॥७९॥
गाडगे बाबा वैराग्यमूर्ति । तैसीच सेवामंडळ-समिति । यात्राशुध्दीसाठी उत्तम रीती । प्रयत्नशील सर्वदा ॥८०॥
त्या प्रकारे गावचे सज्जन । मिळवोनि करावे यात्रा-नियोजन । यात्रा म्हणता ” या तरा ” ही खूण । पटावी लोका ॥८१॥
प्रचंड समुदाय जमवावा । उत्तम सदुपदेश करावा । संत-नेत्यांनी लौकिक वाढवावा । लोक-जीवनाचा ॥८२॥
हजारो लोक जरी जमले । तरी आरोग्य जराहि नाही भंगले । लोक सहजपणे आले-गेले । ऐसी व्हावी व्यवस्था ॥८३॥
गेले ऐकोनि कथा-कीर्तन । घेतले जीवनाचे सामान । भेटले परस्पराशी आदरे पूर्ण । देवाण-घेवाण उत्तम ॥८४॥
याची असावी रूपरेषा । कराव्या नाना समित्या ऐशा । जनतेमाजी सुधारणा आपैशा । घडोनि यावया ॥८५॥
नाना प्रदर्शने उपयुक्त । नाना चढाओढीहि त्यात । तैसेचि लोकशिक्षणाचे समस्त । कार्यक्रम योजावे ॥८६॥
यात्रादिकांच्या निमित्ताने । घ्यावी भिन्न पंथीयांचीहि संमेलने । संत-विद्वानांची ठेवावी भाषणे । निर्भेळ विचारांची ॥८७॥
न दुखविता कोणाचा भाव । त्यांच्या सत्तत्त्वाचा करावा गौरव । समारोप करावा लक्षूनि एकत्व । मूळचे सत्य ॥८८॥
तेथे भिन्नपण विरोन जाय । दांभिकतेचा न चले उपाय । विचित्रपणे वेगळा राहे । वाहोनि जाय प्रवाही तो ॥८९॥
हिरा आणि कांचवटी । कळो लागेल खरीखोटी । जाहीरपणे विचार-कसोटी । लागता ऐसी ॥९०॥

कोण संत कोण असंत । काय मिथ्या काय सत्य । ते जाणोनि धरितील पंथ । समन्वयाचा सर्व जन ॥९१॥
हत्ती दिसो लागता सगळा । मग कोणीहि एकांगी आंधळा । भुलवू न शके वेगवेगळा । भागचि हत्ति म्हणवोनि ॥९२॥
ज्या संत-देवांच्या नांवावरि । पंथ वाढले परोपरी । त्यांचे सत्य संदेश घरोघरी । पोहोचताचि सर्व साधे ॥९३॥
जैसा गुरु गोविंदसिंहानी । ग्रंथसाहेब रचिला जनी । भिन्न संतांची एकत्र वाणी । झाली संघटनी पोषक ॥९४॥
महिपतींनी संत-चरित्र । मांडोनि सदभावे एकत्र । भाविकजनी ओविले सूत्र । एकपणाचे जयापरी ॥९५॥
ज्ञानेश्वरादि संती केला । पंढरपुरी गोपालकाला । सर्व पंथांच्या संतांचा झेला । गुंफियेला ज्या भावे ॥९६॥
तैसे संतांचे संमेलन । आणि सर्व संत-स्मृतिदिन । पाळता गावी जन-ऐक्य पूर्ण । सहजचि साधतसे ॥९७॥
सर्व नद्या सागरी मिळोन । पावती महान तीर्थपण । तैसे सर्व पंथ ऐक्य साधून । करिती गावा तीर्थरूप ॥९८॥
कोणत्याहि संतांचा करावा उत्सव । परि चमत्कारांचा नको गौरव । द्यावा कर्तव्यमार्गासि उठाव । त्यांच्या जीवना स्मरोनि ॥९९॥
ऐसे कार्योत्सव चालता गावी । तीच भू पंढरी समजावी । जेथे नरनारी प्रसन्न बरवी । दु:खी कोणी असेना ॥१००॥
ऐसे न करिता आपुल्या गावी । तीर्थी घडली जरी आघवी । तरी मुक्ति न पावे जीवी । तुकडया म्हणे ॥१०१॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । यात्रा-मेळयांचा शुध्द संकेत । चोविसावा अध्याय संपूर्ण ॥१०२॥

ग्रामगीता अध्याय चोविसावा समाप्त
॥ सदगुरूनाथ महाराज की जय ॥

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता ग्रामगीता पारायण गीता माहिती. ग्रामगीता वाचन. तुकडोजी महाराज भजन. तुकडोजी महाराज, ग्रामगीता. तुकडोजी महाराज पुरस्कार. तुकडोजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. ग्रामगीता पारायण अध्याय पहिला. ग्रामगीता अध्याय पहिला सारांश. ग्रामगीता, अध्याय, पहिला नाव. ग्रामगीता, अध्याय, पहिला विषय. ग्रामगीता कठीण शब्दांच्या अर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गौळणी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खंजेरी पदे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हिंदी भजन. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रार्थना. ग्रामगीता सप्ताह. ग्रामगीता, दिंडी. ग्रामगीता पालखी सोहळा. ग्रामगीता भजन. ग्रामगीता कीर्तन. ग्रामगीता, प्रवचन. ग्रामगीता, व्याख्यान.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj. Gurukunj Mozri. Samagra Gram Gita Gram Gita Parayana Gita information. Gram Gita reading. Tukdoji Maharaj Bhajan. Tukdoji Maharaj, Gram Gita. Tukdoji Maharaj Award. Tukdoji Maharaj Akhand Harinam week. Gram Gita Parayana Chapter I. Gram Gita Chapter I Summary. Gram Gita, Chapter, First Name. Gram Gita, Chapter, First Topic. Meaning of Gram Gita difficult words. Rashtrasant Tukdoji Maharaj, Gaulani. Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan. Rashtrasant Tukdoji Maharaj Abhang. Rashtrasant Tukdoji Maharaj, Kanjeri Pade. Rashtrasant Tukdoji Maharaj, Hindi Bhajan. Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj, Prayer. Gram Gita Week. Gram Gita, Dindi. Village Gita Palkhi Ceremony. Gram Gita Bhajan. Gram Gita Kirtan. Gram Gita, Sermon. Gram Gita, lecture.

ग्रामगीता अध्याय सूची

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व साहित्य

Exit mobile version