Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

७ फेब्रुवारी, दिवस ३८, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ४४५ ते ४५६

“७ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 7 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक ७ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

सार्थ श्रीज्ञानेश्वरी
॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥

ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।


अध्याय चवथा
1-4
आजि श्रवणेंद्रिया पाहले । जे येणे गीतानिधान देखिले । आता स्वप्नचिहे तुकले । साचा सरिसे ॥1-1॥
आज कानांना उजाडले, म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला; कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे. असा गीतेचा ठेवा आज त्यांनी पाहिला, ऐकला. आणि प्रथमच स्वप्न खरे आहे असे म्हटले तर ते चूक नाहीच.
2-4
आधीचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥2॥
आधीच ही आत्मविचाराची गोष्ठ आणि ती सांगणारे भगवान श्रीकृष्ण आणि ऐकायला भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता. म्हणजे एक उत्तम पर्वणीच.
3-4
जैसा पंचमालापु सुगंधु । की परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥3॥
पंचम स्वर, त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिन्हीचा ऐक्यभाव असता जसा आनंद होईल तसा प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे. म्हणजे यात सर्व इंद्रियांनाआनंद होईल अशी गोडी आहे.
4-4
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची । हो का जपतपे श्रोतयांची । फळा आली ॥4॥
दैवाची थोरवी काय वर्णावी की ज्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूपी गंगाच त्यांना प्राप्त झाली.
5-4
आता इंद्रियजात आघवे । तिही श्रवणाचे घर रिघावे । मग संवादसुख भोगावे । गीताख्य हे ॥5॥
म्हणून आता सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी जाऊन रहावे आणि कृष्णार्जुन संवादरूपी गीतेचे सुख घ्यावे.


6-4
हा अतिसो अतिप्रसंगे । सांडूनि कथाचि ते सांगे । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥6॥
तेव्हा संतमंडळी ज्ञानेश्वरांस म्हणाली की, आता हे पाल्हाळिक बोलणे थांबवून श्रीकृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांगावी.
7-4
ते वेळी संजयो रायाते म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणे । जे अतिप्रीति श्रीनारायणे । बोलतु असे ॥4-7॥
त्यावेळी संजय धृतराष्ट्राला सांगतो की, दैवीसंपत्तीने युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अतीप्रेमाने म्हणाले,
8-4
जे न संगेचि पितया वसुदेवासी । जे न संगेचि माते देवकीसी । जे न संगेचि बंधु बळिभद्रासी । ते गुह्य अर्जुनेशी बोलत ॥4-8॥
जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधु बलराम ह्यांसही सांगितले नाही, ते अर्जुनास सांगितले.
9-4
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचे सुख । आजि कृष्णस्नेहाचे पीक । यातेचि आथी ॥4-9॥
लक्ष्मीदेवी इतकी नेहमी सन्निध राहणारी पण तिलाही ज्याप्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्याकृष्णप्रेमाचे पात्र आज अर्जुन झाला आहे.
10-4
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा । परी त्याही येणे माने यशा । येतीचिना ॥4-10॥
सनकादिक त्याची खूप दिवसापासून इच्छा करित होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-4
या जगदीश्वराचे प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसे पार्थे येणे सर्वोत्तम । पुण्य केले ॥11॥
या जगदीश्वराचे प्रेम या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे. अर्जुनाने हे सर्वोत्तम पुण्य कसे प्राप्त केले बरे ?
12-4
हो का जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥12॥
अर्जुनाच्या प्रेमामुळे श्रीकृष्ण हा निराकार असूनही साकार झाला. अर्जुनाची त्या देवाशी झालेली एकरूपता मला आवडली आहे.
13-4
एर्‍हवी हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥13॥
एरव्ही हा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांनाही सापडत नाही, वेदांना याचे वर्णन करता आले नाही, ध्यानानेही याला जाणता येत नाही, (ध्यानाचीहि नजर जेथे पर्यंत पोचत नाही)
14-4
ते हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी येणे माने सकृप । जाहला असे ॥14॥
तो हा आत्मस्वरूप, उत्पत्तीरहित हा श्रीकृष्ण, मूळचाच अचल आहे; परंतु कोणत्या कारणामुळे अर्जुनावर कृपावंत झाला आहे, हे समजत नाही.
15-4
हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥15॥
हा त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी आहे. हा सर्व प्रकारच्या आकाराच्या पलीकडचा आहे; पण अर्जुनाच्या निःस्वार्थ प्रेमाने या अनंताला आपल्या आटोक्यात आणले आहे.

श्रीभगनानुवाच:
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥4. 1॥
भावार्थ :-

श्रीकृष्ण भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सृष्टीच्या आरंभी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला.
16-4
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्ही विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवा दिवसांची ॥16॥
मग देव म्हणाले, अरे अर्जुना ! हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे.
17-4
मग तेणे विवस्वते रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥17॥
मग त्या विवस्वानं सूर्याने (रवीने) या योगाची संपूर्ण माहिती उत्तम प्रकारे मनूला सांगितली.
18-4
मनूने आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥18॥
मनूने स्वतः त्या योगाचे आचरण केले आणि मग आपला पुत्र इक्ष्वाकू यास उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे.

एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥4. 2॥
भावार्थ :-

या प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीनी जाणला; परंतु हे अर्जुना ! दीर्घकालानंतर तो योग या लोकी लुप्त झाला.
19-4
मग आणिकही या योगाते । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनि आता सांप्रते । नेणिजे कोणी ॥19॥
इक्ष्वाकूनंतर आणखी काही राजर्षी ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे होऊन गेले; पण तेंव्हापासून आजपर्यंत या योगाला कोणी जाणत नाही. (कोणाला ठाऊक नाही)
20-4
जे प्राणिया कामी भरू । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडला विसरु । आत्मबोधाचा ॥20॥
याचे कारण म्हणजे प्राणिमात्राचा सगळा भर ” काम ” या विषयावर होता (पडला) आणि ते देहालाच सत्य मानत होते. देहावरच प्रेम करत असल्यामुळे त्यांना आत्मज्ञाना चा विसर पडला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-4
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोका ॥21॥
आत्मबोधाची बुद्धीच आडमार्गाकडे जाऊ लागल्यामुळे लोकांना विषयातच आत्त्यंतीक सुख वाटू लागले आणि देहाचेच विचार प्राणांप्रमाणे प्रिय झाले.
22-4
एर्‍हवी तरी खवणेयांच्या गावी । पाटाऊवे काय करावी । सांगे जात्यंधा रवी । काय आथी ॥22॥
ज्या गावात वस्त्रे घालीत नाहीत, त्या गावात उंची वस्त्रांचा काय उपयोग ? किंवा जन्मापासून अंध असणाऱ्याला सूर्याचा काय उपयोग ? सांग बरे.
23-4
का बहिरयांचा आस्थानी । कवणे गीताते मानी । की कोल्हेया चांदणी । आवडी उपजे ॥23॥
किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देईल काय ? किंवा कोल्हयाच्या मनात चांदण्याची आवड कधी निर्माण होईल काय ?
24-4
पै चंद्रोदया आरौते । जयांचे डोळे फुटती असते । ते काऊळे केवी चंद्राते । ओळखती ॥24॥
चंद्राचा उदय होण्यापूर्वी ज्यांचे डोळे मिटतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखतील ?
25-4
तैसे वैराग्याची शिव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती । ते मूर्ख केवी पावती । मज ईश्वराते ॥25॥
त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची सीमादेखील पाहिली नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहित नाही, (सत्य व असत्य याची भाषा ज्यांना समजत नाही), ते अज्ञानी, महामुर्ख लोकांना माझी ईश्वराची प्राप्ती कशी बरे होईल ? (ते अज्ञानी ईश्वराला कसे बरे प्राप्त होतील. )

दिवस ३८ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४४५ ते ४५६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 445
मन वाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ती केले ॥१॥
भक्तीचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजवे ॥धृपद॥
योग याग तपे देहाचिया योगे । ज्ञानाचिया लागे न सांपडसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ॥३॥
अर्थ
देवा तुझे स्वरूप हे मन वाचा यांच्याही पलिकडचे आहेत्यामुळेच तर आम्ही भक्ती रूपाचे माप हाती घेतले आहे. आम्ही अनंताला भक्तीच्या मापाने मोजतो. इतर कोणत्याही साधनाने तुझी मोज माप होणार नाही. देवा तुझे स्वरूप योग याग याने तसेच देहावर अवलंबून असलेल्या साधनाने तुझ्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही आणि ज्ञानी पणाने देखील तू आम्हाला सापडला जाणार नाही त्यामुळेच हे देवा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही, केशवा, भोळ्या भावाने तुझी भक्ती करतो तीच तू प्रेमाने स्वीकार म्हणजे झाले.
अभंग क्र. 446
जंववरी नाही देखिली पंढरी । वर्णिसी थोर वैकुंठीची ॥१॥
मोक्षसिद्धी तेथे हिंडे दारोदारी । होऊनि कामारी दीनरूप ॥धृपद॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिनव सोहोळा घरोघरी ॥२॥
नामघोष कथापुराणकीर्तनी । ओविया कांडणी पांडुरंग ॥३॥
सर्व सुख तेथे असे सर्वकाळ । ब्रम्ह ते केवळ नांदतसे ॥४॥
तुका म्हणे जे न साधे सायासे । प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी ॥५॥
अर्थ
जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले नाही तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तू गाशील. अहो पंढरीमध्ये मोक्ष तसेच सिद्धी हे दिन पणाने दारोदारी हिंडत आहेत काम करणार्‍या दासी प्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे, इथे घरोघरी तुळशी वृन्दावने आहेत. रस्ते झाडून, साडे घालून रांगोळ्या काढल्या आहेत. घरोघर अभिनव सोहळा आहे. इथे कथा पुराणे कीर्तन, नाम घोष होत आहे. दळण कांडन करतांना स्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या म्हणत आहे. इथे सर्वदा सर्व सुख असून मूर्ती मंत ब्रम्ह इथेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या सायासाने सुद्धा ज्याची प्राप्ती होत नाही ते ब्रम्ह विटेवर प्रत्यक्ष उभे आहे.
अभंग क्र. 447
दुःख वाटे ऐसी ऐकोनिये गोष्टी । जेणे घडे तुटी तुझ्या पायी ॥१॥
येतो कळवळा देखोनिया घात । करितो फजित नाइकती ॥धृपद॥
काय करू देवा ऐसी नाही शक्ती । दंडुनि पुढती वाटे लावू ॥२॥
तुका म्हणे मज दावू नको ऐसे । दृष्टीपुढे पिसे पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या चरणांची तूट म्हणजे वियोग ज्या गोष्टींमुळे घडतो त्या गोष्टी ऐकून मला दुःख वाटते. या सर्व माणसांचा प्रपंचा मुळे मोठा घात होत आहे हे पाहून मला मोठा कळवळा येतो मी त्यांची वेळोवेळी फजिती करतो, पण ते एकात नाहीत. हे देवा, काय करावे ? त्यांना शिक्षा करून सन्मार्गाला लावण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे संसाराच्या प्रेमाने बहकलेले, वेडे झालेले लोक माझ्या दृष्टी पुढे येऊ देऊ नका, एवढी माझी विनंती आहे.
अभंग क्र. 448
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥
तेवी अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्या गोड परमार्थ ॥धृपद॥
श्वानासी भोजन दिले पंचामृत । तरी त्याचे चित्त हाडावरी ॥२॥
तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमिता विखार विष जाले ॥३॥
अर्थ
डुकराला मिष्टांन्न हे आवडणार नाही त्याला मिष्टान्नाची चव काय कळणार त्याला केवळ विष्टा खाणे हेच आवडते ? तसेच अभक्तांना, नास्तिकांना पाखंड मत आवडते परमार्थ आवडत नाही. कुत्र्याला पंचपक्वन्नाचे जेवण घातले, तरी त्याचे लक्ष हाडा वर असते. तुकाराम महाराज म्हणतात सर्पाला जरी दुध पाजले, तरी त्याच्या पासून त्याच्या शरीरात विषच तयार होते.
अभंग क्र. 449
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥१॥
तेवी खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचे ॥धृपद॥
सर्पासी पाजिले शर्करापीयूष । अंतरीचे विष जाऊ नेणे ॥२॥
तुका म्हणे श्वाना क्षिरीचे भोजन । सवेचि वमन जेवी तया ॥३॥
अर्थ
अहो रासभ म्हणजे गाढवाला कितीही महान तीर्थामध्ये धुतले तरी तो तेजस्वी शाम कर्ण घोड्या प्रमाणे होणार नाही. त्या प्रमाणेच खळ म्हणजे दुष्ट लोकांना कितीही चांगला उपदेश केला तरी त्यांचे मन शुद्ध होणार कारण त्यांचे मन शुध्द मुळीच नसते. सापाला दुधात साखर घालून जरी पाजले तरी त्याच्या आतले विष जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याला दुध पाजले तरी कुत्रा ते तत्क्षणीच ओकतो.
अभंग क्र. 450
जेवी नवज्वरे तापले शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥
तेवी परमार्थ जीही दुराविला । तयालागी झाला सन्निपात ॥धृपद॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥
तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥
माहिती तपासा अर्थ नाही टाका
अभंग क्र. 451
आता असो मना अभक्तांची कथा । न होई दुश्चिता हरीनामी ॥१॥
नये त्याची कदा गोष्टी करू मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नावे ॥धृपद॥
प्रभाते न घ्यावे नांव माकडाचे । तैसे अभक्ताचे सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे आता आठवू मंगळ । जेणे सर्वकाळ सुखरूप ॥३॥
अर्थ
आता हे मना अभक्ताची गोष्ट राहू दे. तू मात्र हरीनाम घेण्याच्या बाबतीती उदास राहू नकोस. अभक्ता विषयी तू बोलू नकोस. कारण तुझ्या जिभेला प्रायश्चित्त घ्यावे लागेल. सकाळी माकडाचे नांव जसे घेऊ नये, तसे अभक्ताचे नांव कधीच घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात आता जे मंगल मय आहे त्याचेच निरंतर स्मरण करू म्हणजे सर्व काळ सुखाचा जाईल.
अभंग क्र. 452
नाम आठविता सद्गदित कंठी । प्रेम वाढे पोटी ऐसे करी ॥१॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री । अष्टांग ही गात्री प्रेम तुझे ॥धृपद॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी । गाऊ निशिदिनी नाम तुझे ॥२॥
तुका म्हणे दुजे न करी कल्पांती । सर्वदा विश्रांती संतापायी ॥३॥
अर्थ
देवा तुझे नाम आठवले की आमचा कंठ दाटुनि यावा आणि तुझ्याविषयी प्रेम वाढतच जावे आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी दुप्पट प्रेम वाढावे असेच तू कर. तुझे नाम घेताच सर्वांगावर रोमांच उभे राहावेत, शरीराला स्वेद यावा, आनंदाश्रू ओघळावेत आणि अष्टांगामध्ये सर्वच शरीरामध्ये तुझे प्रेम असावे. माझ्या सर्व शरीराचा विनियोग तुझे कीर्तन करण्याकडे व्हावा आणि मी तुझे नावच रात्रंदिवस गावे. तुकाराम महाराज म्हणतात कल्पांत जरी झाला, तरी मी दुसरे काही करणार नाही. सर्व काळ संतांच्या पायी खरी विश्रांती आहे.
अभंग क्र. 453
जननी हे जाणे बाळकाचे वर्म । सुख दुःख धर्म जे जे काही ॥१॥
अंधापुढे जेणे दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥धृपद॥
शरणागता जेणे घातले पाठीशी । तो जाणे तेविशी राखो तया ॥२॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥
तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती । दिला त्याची गति तोचि जाणे ॥४॥
अर्थ
बालकाला ज्यावेळी सुखदुःख जे जे काही होईल ते सर्व धर्म आणि त्याचे वर्म त्याच्या आईला माहीत असते ती बालका विषय सर्वकाही जाण असते. आंधळ्याला हात देऊन, धरून चाललेला डोळस, पुढे येणारे खाच खळगे, मार्ग आडमार्ग जाणतो व आंधळ्याला सुखरूप घेऊन जातो. तसेच एखद्या मोठ्या शूराला जर कोणी संकट ग्रस्त मनुष्य शरण आला आणि त्याला त्या शुराने पाठीशी घातले, तर त्याचे रक्षण कसे करावे, याची चिंता त्या शूराला लागते. पुरातून नदी पलीकडे जायचे आहे पण पोहता येत नाही, अशा वेळी ऐखाद्या पोहणार्‍याची मदत घेतली, तर त्या पोहणाऱ्याला त्याची चिंता. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आपला जीव पांडुरंगाच्या हाती दिला आहे. आता आमच्या जीवाचे बर वाईट काय करायचे, ते तो पांडुरंग करील. आम्ही कशाला काळजी करू ?
अभंग क्र. 454
नका वाटू मन विधिनिषेधासी । स्मरावा मानसी पांडुरंग ॥१॥
खादलिया अन्ना मासी बोलो नये । अवघेचि जाये एका घासे ॥धृपद॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करिता जतन सांभाळावे ॥२॥
तुका म्हणे येथे न मना विषाद । निंबेविण व्याध तुटो नये ॥३॥
अर्थ
तुम्ही विधिनिषेधाची कटकट मुळीच करू नका पांडुरंगाचेच स्मरण मनात करत राहा. सगळे जेवण होत आले आहे, पण शेवटच्या घासत माशी पोटात गेली असे कोणी कोणाला म्हणू नये. कारण त्या कल्पनेनेच सगळे अन्न ओकून पडेल. एखादी लाभाची गोष्ट सहज घडते पण पुढे जपून ठेवणे फार कठीण आहे. म्हणून तिचे दक्ष पने रक्षण करावे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बोलण्याचा आपण विषाद मानू नका. खरोखर कडूनिंबाच्या कट्याशिवाय शरीरातील व्याधी बरी होत नाही.
अभंग क्र. 455
नको होऊ देऊ भावी अभावना । याचि नावे जाणा बहु दोष ॥१॥
मेघवृष्टि येथे होते अनिवार । जिव्हाळ्या उखर लाभ नाड ॥धृपद॥
उत्तमा विभागे कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥२॥
तुका म्हणे जिणे बहु थोडे आहे । आपुलिया पाहे पुढे बरे ॥३॥
अर्थ
देवा माझ्या मना मध्ये जो काही तुमच्याविषयी भक्तिभाव आहे त्याविषयी अभावना होऊ देऊ नका आणि असे जर झाले तर मला दोषच घडेल. कारण त्याने माझे फार नुकसान होईल. जर अपार पाऊस पडला, तर सुपीक जमिनीत चांगले पिक येत पण नापीक जमिनीत पिकाचे नुकसानच होते. कल्पतरूच्या तळवटी बसून चांगली इच्छा केली, तर चांगले फळ मिळेल आणि वाईट इच्छा केली, तर तसेच वाईट फळ मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात आपले आयुष्य फार थोडे आहे म्हणून आपले खरे हित आहे, त्या गोष्टीचा तू विचार कर.
अभंग क्र. 456
त्याग तव मज न वजता केला । काहीच विठ्ठला मनातूनि ॥१॥
भागलिया आला उबग सहज । न धरिता काज झाले मनी ॥धृपद॥
देह जड झाले ॠणाच्या आभारे । केले संवसारे कासावीस ॥२॥
तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारले ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला मला कोणत्याही विषयांचा त्याग केला नाही तरीदेखील त्याचा त्याग घडला आहे. कारण संसाराच्या त्रासाने माझ्याकडून सहजच त्याचा त्याग झाला आहे. ऋणाच्या भाराने माझा देह जड झाला संसार आणि मला फार कासावीस केले. तुकाराम महाराज म्हणतात संसारातील आपत्तीने मी तळमळलो त्यामुळे आळस आला, संसाराचा तिटकारा आला. परमार्थाचा तिटकारा आलाच नाही. पर्मार्थाचाच उत्साह वाढला. म्हणून संसारिक पणामुळे जो त्रास होतो, त्याचे निवारण आपोआप झाले आहे.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version