Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२६ फेब्रुवारी, दिवस ५७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ६७३ ते ६८४

“२६ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 26 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक २६ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

76-6
जैसी ते शुकाचेनि आंगभारे । नळिका भोविन्नली एरी मोहरे । तेणे उडावे परी न पुरे । मनशंका ॥76॥
पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरीत नळी ओवून झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसतात. नळी कोणत्या तरी एका बाजूला फिरते. त्यावेळी वास्तविक पाहता पोपटाने उडून जाणे आवश्यक आहे; परंतु नळी सोडल्यास आपण पडून मरून जाऊ, अशी शंका आल्यामुळे तो नळी सोडत नाही.
77-6
वायाचि मान पिळी । अटुवे हिये आंवळी । टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥77॥
तो पोपट मानेला व्यर्थ पिळे देतो. छातीने व चवड्याने ती नळी चोचीने आवळून धरून ओरडतो.
78-6
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडा । की मोकळिया पायांचा चवडा । गोवी अधिके ॥78॥
मग तो मनात समजतो की, खरोखरच मी बांधला गेलो आहे. अशा भ्रामक कल्पनेच्या खोड्यात तो सापडतो आणि मोकळ्या असलेल्या आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवितो.
79-6
ऐसा काजेवीण आतुडला । तो सांग पा काय आणिके बांधला । मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडुनि अर्धा ॥79॥
असा तो कारणाशिवाय अडकून राहतो. त्याला कोणी अर्धा तोडून नेण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तो नळी सोडत नाही. आता तूच सांग की, त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधून ठेवलं आहे काय ?
80-6
म्हणऊनि आपणया आपणचि रिपु । जेणे वाढविला हा संकल्पु । येर स्वंयबुध्दी म्हणे बापु । जो नाथिले नेघे ॥80॥
म्हणून ज्याने मी शरीर आहे, असा संकल्प वाढविलेला आहे, तो आपणच आपला शत्रू होय. परंतु जो मिथ्या देहाचा अभिमान धरत नाही, तो स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विचार करणारा होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥6. 7॥
भावार्थ :-

शीत- उष्ण व सुख-दुःख वगैरेमध्ये, तसेच मान व अपमान यामध्ये ज्याच्या वृत्ती पूर्णपणे शांत, विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचेही अस्तित्व राहत नाही.

81-6
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाही ॥81॥
ज्याने आपले मन जिंकलेले आहे, ज्याच्या सर्व विषयवासना नष्ट झाल्या आहेत, त्याला परमात्मा कोठे पलीकडे दूर नाही.
82-6
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेचि होये । तैसे जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपी ॥82॥
सोन्याचा हिणकस पणा अग्नीत तापवून नाहीसा झाल्यावर ते शंभर नंबरी सोने होते, त्याप्रमाणे संकल्प नाहीसे झाल्यावर अहंभाव, भ्रम नाहीसे होऊन जीव हा ब्रम्हस्वरूप आहे, याची जाणीव होते
83-6
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळो जाणे आकाशा । आना ठाया ॥83॥
ज्याप्रमाणे घटाचा आकार नाहीसा झाल्यानंतर त्यातील पोकळीला महाआकाशाची एकरूप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही.
84-6
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधीचि आहे ॥84॥
त्याप्रमाणे ज्याच्या देहाच्या ठिकाणी असलेला मिथ्या अहंकार अज्ञानासह नष्ट झाला आहे, तो पुरुष अज्ञान-निवृत्तीपूर्वीसुद्धा परमात्माच होतो आणि नंतरही परमात्माच आहे.
85-6
आता शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणी । इये न समाती काही बोलणी । मानापमानांची ॥85॥
शीत उष्णचा ओघ, सुख दुःखाचा विचार, मान – अपमानाची बोलणी हे काहीही त्या पुरुषाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही; कारण त्याचे अंतःकरण परब्रम्हभावनेने परिपूर्ण भरलेले असते.


86-6
जे जिये वाटा सुर्यु जाये । तेउते तेजाचे विश्व होये । तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणऊनि ॥86॥
ज्या वाटेने सूर्य जात असतो, तिकडेच सर्व विश्व प्रकाशमान होत असते. त्याप्रमाणे योगी पुरुषाला जे जे प्राप्त होते, ते ते त्याचेच स्वरूप असते.
87-6
देखै मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशी शुभाशभे योगीश्वरा । नव्हती आने ॥87॥
मेघातून सुटणाऱ्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला टोचत नाहीत, त्याप्रमाणे योगी पुरुषाला शुभ-अशुभ द्वंद्ववे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात, म्हणून त्रास देत नाहीत.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥6. 8॥
भावार्थ :-

ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, तसेच ज्याला दगड, माती, सोने वगैरे सर्व समान वाटतात, असा योगी सिद्ध बनला जातो.
88-6
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारिता जाहला वावो । मग लागला जव पाहो । तव ज्ञान ते तोचि ॥88॥
जो योगरुढ पुरुष दृश्य प्रपंचाचा विचार करू लागतो, तेंव्हा त्याच्या दृष्टीने तो प्रपंच मिथ्या झालेला असतो. मग अनुभवाने तो ज्या वेळी आत्मस्वरूपाला पाहू लागतो, त्यावेळी ते अनुभव- ज्ञानदेखील त्याचे स्वरूप झालेले दिसते.
89-6
आता व्यापकु की एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥89॥
मी व्यापक आहे का मर्यादित आहे, अशी चर्चा द्वैत संपल्यामुळे आपोआपच थांबलेली असते.
90-6
ऐसा शरीरीचि परी कौतुके । परब्रह्माचेनि पाडे तुके । जेणे जिंतली एके । इंद्रिये गा ॥90॥
ज्यांनी आपली सर्व इंद्रिये पूर्णपणे जिंकलेली आहेत, तो देहधारी असला, तरी त्याची परब्रह्मच्या बरोबरीने तुलना होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥6. 8॥
भावार्थ :-

ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, तसेच ज्याला दगड, माती, सोने वगैरे सर्व समान वाटतात, असा योगी सिद्ध बनला जातो.

91-6
तो जितेंद्रियु सहजे । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणे साने थोर नेणिजे । कवणे काळी ॥91॥
ज्याने आपली सर्व इंद्रिय सहजपणे जिंकलेली असतात, त्याला योगयुक्त म्हणतात. त्याला हा लहान, हा मोठा अशा प्रकारचा भेद कोणत्याच वेळी जाणवत नाही.
92-6
देखे सोनियाचे निखळ । मेरुयेसणे ढिसाळ । आणि मातियेचे डिखळ । सरिसेचि मानी ॥92॥
असे बघ की, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वताऐवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ जो सारखेच मानतो,
93-6
पाहता पृथ्वीचे मोल थोडे । ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे । देखे दगडाचेनि पाडे । निचाडु ऐसा ॥93॥
पृथ्वीची किंमत ज्याच्यापुढे काहीचं नाही, असे अनमोल रत्न देखील जो दगडासमान मानतो, त्याचे अंतःकरण निरिच्छ बनलेले असते.

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुध्दिर्विशिष्यते ॥6. 9॥
भावार्थ :-

सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेषी, बंधू, साधुपुरुष आणि पापिजनाविषयी जो समानबुद्धी ठेवतो, तो सर्वश्रेष्ठ होय.

94-6
तेथ सुहृद आणि शत्रु । का उदासु आणि मित्रु । हा भावभेद विचित्रु । कल्पु कैचा ॥94॥
त्याच्या ठिकाणी आप्त आणि शत्रू, उदासीन आणि मित्र अशा वेगवेगळ्या द्वैताच्या विचित्र कल्पना कशा येणार ?
95-6
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥95॥
मीच विश्वाच्या रूपाने सर्वत्र पसरलेलो आहे, असे ज्याला विश्वव्यापक ज्ञान प्राप्त झाले आहे, त्याला कोण कोणाचा बंधू असणार; आणि त्याला द्वेषी तरी कोण असणार ?


96-6
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ॥96॥
मग त्याच्या दृष्टीने अर्जुना ! (त्याच्या अंतःकरणात) हा चांगला हा वाईट, असा भेद असू शकेल काय ? परीसाच्या कसोटीवर घासले असता सुवर्णाचे चांगले – वाईट असे प्रकार करता येतील काय ?
97-6
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाचि बुध्दी चराचरी । होय साम्याची उजरी । निरंतर ॥97॥
त्या कसोटीपासून जसे शुद्ध सोनेच निर्माण होते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धिमध्ये चारचराविषयी समता उदय पावलेली असते.
98-6
जे ते विश्वाळंकाराचे विसुरे । जरी आहाती आनाने आकारे । तरी घडले एकचि भांगारे । परब्रह्मे ॥98॥
विश्वातील प्राणिरूप अलंकारचे समुदाय जरी वेगवेगळ्या आकाराचे असले, तरीपण ते एकाच परब्रम्हरूपी सोन्याचे बनलेले आहेत,
99-6
ऐसे जाणणे जे बरवे । ते फावले तया आघवे । म्हणौनि आहाचवाहाचे न झकवे । येणे आकारचित्रे ॥99॥
असे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान योगारूढ पुरुषाला प्राप्त झालेले असते; म्हणून तो वरवरच्या या विविध प्रकारच्या आकारांनी फसत नाही.
100-6
घापे पटामाजी दृष्टी । दिसे तंतूचि सैंघ सृष्टी । परी तो एकवाचुनि गोठी । दुजी नाही ॥100॥
सूक्ष्म दृष्टीने वस्त्र पहिले असता, त्यामध्ये उभ्या-आडव्या तंतूंची रचना दिसते. स्थूल दृष्टीने पट दिसत असला, तरीदेखील त्यात एका तंतूंवाचून दुसरी गोष्ट नसते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ५७ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६७३ ते ६८४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ६७३
जन देव तरी पायाचि पडावे । त्याचिया स्वभावे चाड नाही ॥१॥
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेता नये ॥२॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवो नये ॥३॥
अर्थ
सर्व लोक देवाचे स्वरूप आहे, त्यांच्या पाया पडावे. त्यांचे दोष लक्षात ठेऊ नये. अग्नीचे कार्य हे थंडी कमी करणे आहे, पण मग अग्नीला पदरात बांधून नेता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विंचू व सर्प हि नारायणाचीच रूपे आहेत पण त्यांच्या स्पर्श न करता त्यांना दुरून नमस्कार करावा.
अभंग क्र. ६७४
भूत भविष्य कळो येईल वर्तमान । हे तो भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥
आह्मी विष्णुदासी देव ध्यावा चित्ते । होणार ते होते प्रारब्धेचि ॥धृपद॥
जगरूढीसाठी घातले दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी ॥३॥
अर्थ
भूत, भविष्य व वर्तमान ज्याला कळावे असे वाटते तो तर भाग्यहीन आहे. आम्ही विष्णू दासांनी सदैव देवाचे स्मरण करावे, प्रारब्धाप्रमाणे भोग भोगावे. ज्ञानी भविष्याचे ज्ञान असणार्‍या लोकांनी त्यांना पैसे मिळावेत म्हणून दुकान थाटून बसेल असतात. त्यांना नारायण भेटत नाही उलट तो त्याला त्रास देतो. तुकाराम महाराज म्हणतात आधीच हा प्रपंच अवघड आहे अशा परस्थितीत रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यास पिडा वाढतच जात असते.
अभंग क्र. ६७५
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडिये फांदा घातलासे ।
हिंडवुनि पोट भरी दारोदारी । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलो तो मी गा सोडवी आता ।
माझे मज काही न चलेसे जाले । कृपा हे तुज न करिता ॥धृपद॥
आविसे मिन लावियला गळी । भक्ष तो गिळी म्हणोनिया ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊ पाहे । तेथे बापमाये कवण रया ॥२॥
पक्षी पिलया पातले आशा । देखोनिया फासा गुंते बळे ।
मरण सायासे नेणे माया धावोनि वोसरे । जीवित्वा नास जाली बाळे ॥३॥
गोडपणे मासी लिगाडी गुंतली । सापडे फडफडी अधिकाधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घाली ॥४॥
अर्थ
गारुड्याने पुंगी वाजविली तर सर्प त्या आवाजाला भुलून जातो, त्या वेळी गारुडी पाश टाकून सर्पाला पकडतो मग तो त्याला पेटाऱ्यामध्ये घेऊन दारोदारी हिंडतो व आपले पोट भरतो. सर्प बरोबर गुंतून जातो पांडुरंग माझी पण अशीच अवस्था झाली आहे मी या संसार पशामध्ये पूर्ण गुंतून गेलो आहे. माझ्यावर कृपा करून मला यातून सोडवा. माझे काहीच चालत नाही. देवा तुझी माझ्यावर कृपा नाही त्यामुळे मी यामध्ये आधीच गुंतलो आहे यातून मी बाहेर पडतच नाही त्यामुळे तू माझ्यावर कृपा कर. मासा पकडण्यासाठी गळ्याच्या टोकाला माशाला आमिष म्हणून काहीतरी लावले जाते आणि त्या आमिषाला भुलून तो मासा त्या गाळाला अडकतो. पाण्यातील मासा ते आपले भक्ष आहे असे समजू त्याला धरण्याचा प्रयत्न करतो तो कोळीच्या ताब्यात सापडतो. कोळी त्याला बाहेर काढतो. तो तडफडतो. त्यावेळी त्याचे रक्षण करणारे कोण आई बाप आहे. पिलाला त्याचे आई वडील घरट्यात ठेऊन बाहेर जातात परत येऊन पाहतात पारध्याच्या पाशात पिले सापडलेली असतात. पिलांच्या प्रेमामुळे पारध्याच्या जाळ्यात पक्षीण स्वतःला पारध्याच्या जाळ्यात अडकून घेते व आपले जीवन संपवते. तुकाराम महाराज म्हणतात चिकट गुळावर माशी जाऊन बसते तेंव्हा तिचे पाय तेथे गुंतून रहातात. तेंव्हा उडण्यासाठी प्रयत्न केल्याने पंखाच्या फडफडण्याने पाय अधिकच गुंतून जातात. तेंव्हा हे पंढरीनाथा आता तू धावत ये या संसार पाशातून सोडव.
अभंग क्र. ६७६
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥धृपद॥
द्रव्यामुळे माथा वाहियेली चिंधी । होन जनामधी होता गाठी ॥२॥
तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥
अर्थ
देवा माझी जात हीन आहे तर मला कसला अभिमान, तुला तर लोक मान देतात. देवा या गोष्टीचे अजिबात मला काही सुख दुखः नाही. ज्याचा जसा गुण असतो त्याला त्याप्रमाणे लोक भाव देतात एखाद्या चिंधीत जर धन बधले तर लोक ती चिंधी माथ्याला धारण करतात. तुकाराम महाराज म्हणतात लोक ज्यांना वंदन करतात तो वेगळा (सर्वगुणसंपन्न) आहे, मला दुर्बळाला त्या विषयी काहीच घेणे देणे नाही.
अभंग क्र. ६७७
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥
जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागेले ते इच्छे पीइन वरी ॥धृपद॥
कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृतसंजीवनी लोटलीसे ॥२॥
आनंदाचा ठाव नाही माझे चित्ती । सागर तो किती उपमेसी ॥३॥
सैर जाये पडे तयेसी साकडे । सांभाळीत पुढे मागे आसे ॥४॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे । लडिवाळ तान्हे विठाईचे ॥५॥
अर्थ
विठाबाई माऊली हि आमुची शीतल साउली आहे, कायम प्रेमाचा पान्हा आम्हाला पाजते. तीच्या कुशीत जाऊन मी माझ्या इच्छेला येईन तोपर्यंत तीचा कृपारूपी प्रेमपान्हा पीत राहीन. हि विठाबाई माऊली आपल्या कृपेने माझा सांभाळ करीन. तिच्या मुळे अमृताची संजीवनी लोटली आहे. माझ्या आनंदाला ठाव राहिला नाही त्याला सागराची काय उपमा द्यावा ? मी जर सैर वैर चललो तर माझ्या विठाबाईलाच संकट पडते. माझ्या मागे पुढे राहून ती माझे रक्षण करते. तुकाराम महाराज म्हणतात मला चिंता कशी असते हे माहित नाही. मी या विठाबाईचे लडिवाळ लाडके तान्हे बाळ आहे.
अभंग क्र. ६७८
सुटायाचा काही करितो उपाय । तो हे देखे पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सांपडलो संदी । हारपली बुद्धी बळ माझे ॥धृपद॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे । वोढत ठायीचे आले साचे ॥२॥
विधिनिषेधाचे सापडलो चेपे । एक एका लोपे निवडेना ॥३॥
सारावे ते वाढे त्याचियाचि अंगे । तृष्णेचिया संगे दुःखी जालो ॥४॥
तुका म्हणे आता करी सोडवण । सर्वशिक्तहीन जालो देवा ॥५॥
अर्थ
मी या संसारुपी सागरातून सुटण्यासाठी प्रयत्न करायला गेलो तर माझे पाय अधिकच गुततात. त्यामुळे अश्या दुखाच्या पेचात मी पडलो आहे. माझी यातून मुक्ती होण्यासाठी बुद्धीही हरपली आणि माझ्या अंगी बळ नाही प्रारब्ध क्रियमाण आणि संचित माझ्या कडे धाव घेतात. विधीनिषेधाच्या चक्रात मी चेपलो आहे. एकाच्या लोपाने दुसऱ्याचा लोप होतो म्हणजे विधीचे पालन करू गेले असता निषेध पाळला जात नाही आणि निषेध जर पळलाच नाही तर विधीचे योग्य पालन कसे होणार. संसारातील कामे दूर सरावे असे वाटले तर ती वाढतात. अशा मुळे मी दुखी कष्टी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा, आता मी शक्तिहीन झालो आहे, तुम्ही आता यातून माझी सोडवणूक करा.
अभंग क्र. ६७९
भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥
ऐसा पडिलो काचणी । करी धावा म्हणउनी ॥धृपद॥
विचारिता काही । तो हे मन हाती नाही ॥२॥
तुका म्हणे देवा । येथे न पुरे रिघावा ॥३॥
अर्थ
या संसारात मला भीती वाटत आहे पण मला हा संसार काही सुटतच नाही. अश्या संकटात मी पडलो आहे, म्हणून मी तुझा धावा करत आहे. मी या प्रपंचाचा विचार करून पहिला पण माझे मन काही माझ्या ताब्यात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी काय करू मी मुक्त होण्याच्या विचारत माझ्या मनाचा प्रवेश होत नाही.
अभंग क्र. ६८०
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥
ऐसी असोनिया वेसी । दिसतो मी परदेसी ॥धृपद॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावे देवा ॥२॥
तुज आड काही । बळ करी ऐसे नाही ॥३॥
तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा तू लगेच धावत ये, आणि मला उचलून आपल्या पदरात घे. तुझा आश्रय मला आहे तरी मी मला मी परदेशी असल्या सारखे वाटत आहे. हे प्रभू मला या भवसागरातून सोडून मुक्त कर. तुला कोणी आडे म्हणजे विरोध करेल असा कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा माझ्या कडे येण्यासाठी तू का विलंब करत आहेस ?
अभंग क्र. ६८१
माझी विठ्ठल माउली । प्रेमे पान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळूनि लावी स्तनी । न वजे दुरी जवळूनि ॥धृपद॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोवळी ॥२॥
तुका म्हणे घास । मुखी घाली ब्रम्हरस ॥३॥
अर्थ
माझी विठाबाई माऊली माझ्या वरील प्रेमाने ती प्रेमरूपी पान्ह्याने पान्हावली आहे. ती विठाबाई मला प्रेमाने कुरवाळीत आहे, व ती विठाबाई मला जवळून एक क्षण भरही दूर करत नाही व दूर जात नाही. मी जी मागणी करत आहे ती मागणी ती विठाबाई पूर्ण करते व ती विठाबाई निष्टुर नाही ती विठाबाई अतिशय कोमल आहे. तुकाराम महाराज म्हणतात हि विठाबाई माझ्या मुखात ब्रम्ह रसाचा घास भरवत आहे.
अभंग क्र. ६८२
आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायी ॥१॥
तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळी ॥धृपद॥
आमुचा हा नेम । तुम्हा उचित हा धर्म ॥२॥
तुका म्हणे देवा । जाणो सांगितली सेवा ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला आम्ही आमच्या हृदयातील भाव तुझ्या चरण कमलावरती अर्पण करून मोकळे झालो आहोत. आम्ही जो हट्ट प्रेमाने तुझ्या जवळ करावा, तो तू पुरवावा. आम्ही असा हट्ट करणे हा आमचा नेम आहे, आणि तुम्ही तो हट्ट पुरवावा हा तुमचा स्वभाव धर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही आम्हाला जी काही सेवा सांगितली आहे ती आम्ही जाणतो आहोत.
अभंग क्र. ६८३
केले पाप जेणे दिले अनुमोदन । दोघासी पतन सारिखेचि ॥१॥
विष नवनीता विष करी संगे । दुर्जनाच्या त्यागे सर्व हित ॥धृपद॥
देखिले ओढाळ निघालिया सेता । टाळावे निमित्या थैक ह्मुण ॥२॥
तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखता तो श्रम न मानिता ॥३॥
अर्थ
एखाद्याने पाप केले आणि त्या पापाला एखाद्याने ज्या कोणी अनुमोदन म्हणजे सहमती दिली तर त्या पापाला ते दोघे दोषी असतात. नवनिता मध्ये थोडे जरी विष मिळविले तरी ते नवनीत लोणी विषमय बनते त्या प्रमाणे पापी विचार असणाऱ्या दुर्जनापासून नेहमी दुर राहावे. जर एखादे ओढाळ जनावर शेतामध्ये गेले किंवा घुसले तर त्या जनावराला हैक हैक म्हणून हाकलून द्यावे आपण आपले कर्तव्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात एखादे कर्म (सत्कर्म) जर अवघड असेल तर ते कर्म केले जर नाही तर त्या कर्माचा (सत्कर्माचा) लाभ कसा होईल ?
अभंग क्र. ६८४
विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी । विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी ॥धृपद॥
विठ्ठल जागृति स्वप्नीसुषुप्ति । आन दुजे नेणती विठ्ठलाविण ॥२॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जया नरा ॥३॥
तुका म्हणे ते ही विठ्ठलचि जाले । संकल्प मुराले दुजेपणे ॥४॥
अर्थ
ज्याचा गीतात विठ्ठल आहे, ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे, ज्याच्या विश्रांती मध्ये विठ्ठल, भोगा मध्ये विठ्ठल आहे, ज्याच्या आसनामध्ये विठ्ठल शायानामध्ये विठ्ठल, ज्याच्या भोजनामध्ये व प्रेत्येक घसा ला विठ्ठल आहे, जागेपणात, झोपेत स्वप्नात अर्धवट झोपेत विठ्ठल आहे विठ्ठला शिवाय दुसरे काहीच दिसत नाही, ज्याचे सर्व अलंकार हे विठ्ठलच आहे, ज्याचा सर्व निर्धार हा विठ्ठलच आहे, तुकाराम महाराज म्हणतात तेच लोक विठ्ठल झाले, त्यांचे संकल्प विकल्प हे विठ्ठल रूपच होऊन जातात.

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version