Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१५ फेब्रुवारी, दिवस ४६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ५४१ ते ५५२

“१५ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 feburvari

राम कृष्ण हरी आज दिनांक १५ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

येथे सार्थ ज्ञानेश्वरीच्या २५ ओव्या टाकाव्या.

201-4
तैसे साच आणि लटिके । विरुद्ध आणि निके । संशयी तो नोळखे । हिताहित ॥201॥
त्याप्रमाणे खरे खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे काहीचं संशयी माणूस जाणत नाही.
202-4
हा रात्रिदिवसु पाही जैसा । जात्यंधा ठाउवा नाही । तैसे संशयी असता काही । मना न ये ॥202॥
जन्मापासून आंधळ्या असणाऱ्या व्यक्तीला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही, त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाला काही पटत नाही.
203-4
म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥203॥
म्हणून संशयासारखे दुसरे मोठे पाप नाही; कारण हा संशय प्राण्यांना सर्वनाशाचे जाळे आहे.
204-4
येणे कारणे तुवा त्यजावा । आधी हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजी असे ॥204॥
एवढ्याकरिता तू या संशयाचा त्याग कर. जेथे आत्मज्ञानाचा अभाव असतो, तेथेच हा संशय असतो. प्रारंभी त्याला जिंकावे.
205-4
जै अज्ञानाचे गडद पडे । तै हा बहुवस मनी वाढे । म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्वासाचा ॥205॥
जेंव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार पसरलेला असतो, तेंव्हा हा संशय मनामध्ये वाढत जातो; म्हणून परमेश्वरावरील परम श्रद्धेचा मार्ग बंद पडतो.


206-4
हृदयी हाचि न समाये । बुद्धीते गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥206॥
हा फक्त हृदय व्यापून राहतो, असे नाही; तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी त्याला तिन्ही लोक संशयात्मक दिसू लागतात.

योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः ॥4. 41॥
भावार्थ :-

हे धनंजया ! ज्याने निष्काम कर्मयोगाने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत, आत्मज्ञानाने ज्याचे सर्व संशय नाश पावले आहेत, अशा आत्मज्ञानी परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करत नाहीत.
207-4
ऐसे जरी थोरावे । तरी उपाये एके आंगवे । जरी हाती होय बरवे । ज्ञानखड्ग ॥207॥
संशय एवढा जरी वाढला गेला, तरी तो एका उपायाने जिंकला जातो. उत्तम प्रकारचे ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल,
208-4
तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसीचा ॥208॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण (संशय) नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहीसा होतो. (मग मनातील इतर दोषही नाहीसे होतात)

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥4. 42॥
भावार्थ :-

म्हणून हे भरतवर्षा अर्जुना ! अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय ज्ञानरूपी शस्त्राने नाहीसा करून ईश्वरार्पण भावनेने कर्म कर आणि युध्दासाठी उभा रहा.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥4॥
209-4
याकारणे पार्था । उठी वेगी वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥209॥
एवढ्याकरिता अर्जुना अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून, तू लवकर युध्दासाठी ऊठ.
210-4
ऐसे सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐके राया ॥210॥
संजय धृतराष्ट्रस म्हणाला, राजा ऐक, सर्वज्ञाचे जनक, जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण, अशा प्रकारे मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


211-4
तव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अवसरीचा । करिता होईल ॥211॥
तेंव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आताच्या व मागील बोललेल्या तत्त्वज्ञानाचा विचार करून अर्जुन हा समयोचित प्रश्न विचारील.
212-4
ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाचि उन्नति । म्हणिपेल पुढा ॥212॥
ती एकसंध (संगतवार) कथा अनुभवाच्या संपत्तीने व रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल.
213-4
जयाचिया बरवेपणी । कीजे आठा रसांची ओवाळणी । सज्जनाचिये आयणी । विसावा जगी ॥213॥
ज्याच्या सात्विकपणावरून विविध प्रकारच्या आठही रसांची ओवाळणी करावी आणि जो या जगतामध्ये सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतीस्थान आहे.
214-4
तो शांतुचि अभिनवेल । ते परियेसा मऱ्हाठे बोल । जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥214॥
तो शांतीरस पुढील कथेमध्ये नाविन्यपूर्ण भावाने प्रकट होईल. जे अर्थपूर्ण व समुद्रपेक्षाही गंभीर आहे, असे मराठी बोल ऐका.
215-4
जैसे बिंब तरी बचके एवढे । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे । शब्दाची व्याप्ती तेणे पाडे । अनुभवावी ॥215॥
जसे सूर्यबिंब आकाशात छोटे जरी दिसले, तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यदेखील अपुरे पडते, त्याप्रमाणे मराठी शब्दांची व्याप्ती महान आहे, याचा अनुभव येईल.


216-4
ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोल व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे ॥216॥
किंवा कल्पवृक्ष जसा माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण करतो, तसे हे बोल अंतिम सत्य जाणण्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत. यासाठी या शब्दांकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे.
217-4
हे असो काय म्हणावे । सर्वज्ञु जाणती स्वभावे । तरी निके चित्त द्यावे । हे विनंती माझी ॥217॥
श्रोते हो ! यासंबंधी अधिक काय सांगावे ? आपण सर्वज्ञ आहात; म्हणून एकाग्रतेने लक्ष द्यावे, ही माझी आज्ञा नसून विनंती आहे.
218-4
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥218॥
जशी एखादी स्त्री लावण्य, गुण आणि कुळ यांनी संपन्न व पतिव्रता असावी, त्याप्रमाणे या बोलण्याचा पद्धतीमध्ये सर्व अलंकार व शांती भरलेली दिसेल.
219-4
आधीचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदी जोडे । तरी सेवावी ना का कोडे । नावानावा ॥219॥
आधीच साखर आवडते आणि तीच जर औषधांच्या रूपाने मिळाली, तर ती आवडीने पुनः पुनः का सेवन करू नये ?
220-4
सहजे मलयानिळु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥220॥
मलय पर्वतावरील वारा सहजच मंद व सुगंधी असा वाहत असतो. त्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि त्याठिकाणी जर सुमधुर स्वर दैवगतीने लाभला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


221-4
तरी स्पर्शे सर्वाग निववी । स्वादे जिव्हेते नाचवी । तेवीचि कानाकरवी । म्हणवी बापु माझा ॥221॥
तर तो वारा आपल्या शरीराला स्पर्शाने शांत करतो, गोडीने जिभेला संतोष लाभतो आणि सुमधुर स्वर श्रवण केल्यावर कानाकडून धन्य माझा बाप अशी वाहवा मिळवितो.
222-4
तैसे कथेचे इये ऐकणे । एक श्रवणासि होय पारणे । मग संसारदुःख मूळवणे । विकृतीविणे ॥222॥
त्याप्रमाणे या गीताकथेच्या श्रवणाने होणार आहे. एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे म्हणजे अनायासे संसारातील दुःख पूर्णपणे नाहीसे होईल.
223-4
जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायाचि का बांधावी कटारे । रोग जाये दुधे साखरे । तरी निंब का पियावा ॥223॥
मंत्राने जर मृत्यू पावत असेल, तर कमरेला काट्यारी का बरे बांधाव्यात ? दुधाने व साखरेने रोग नाहीसा होत असेल, तर कडूलिंबाच्या रस का बरे घ्यावा. ?
224-4
तैसा मनाचा मारु न करिता । आणि इंद्रिया दुःख न देता । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ॥224॥
त्याप्रमाणे मनाचा विरोध न करता, इंद्रियांना कोंडून दुःख न देता, केवळ एकाग्रतेने श्रवण केल्यामुळे आयताच मोक्ष प्राप्त होतो.
225-4
म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तीदासु ॥225॥
म्हणून उत्कंठतेने मन एकाग्र करून अर्थ श्रवण करावा, असे निवृत्तींनाथांचे शिष्य श्रीज्ञानदेव म्हणतात.


॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां –
ज्ञानकर्मसंन्यासयोगोनाम् चतुर्थोऽध्यायः ॥4॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 42॥
॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 225॥

दिवस ४६ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५४१ ते ५५२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. 541
जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥
बहुत अन्न विष मोहरीच्या माने । अवघेचि तेणे विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणे आपुले स्वहित । तैसी करी नीत विचारूनि ॥३॥
अर्थ
एखादा मनुष्य, परमज्ञानी बनला, तरी देखील त्याने दुर्जनाची संगती कधी करू नये. अन्न पुष्कळ असले, तरी मोहरी एवढ्या विषाने सुद्धा त्या सर्व अन्नात विष पसरले जाते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या मध्ये आपले खरे हित आहे, अशा नीतीने वागावे.
अभंग क्र. 542
द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनिया हेचि राहिलो जीवन । एक नारायण नाम ऐसे ॥२॥
तुका म्हणे हेचि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥
अर्थ
आम्ही द्रव्याचा (पैसे, धन) याचा विटाळ मानलेला आहे. कारण या द्रव्याच्या मागे काळ लागलेला असतो. आता द्रव्या पेक्षा नारायण रुपी धनाचा विचार केलेला आहे. नारायणाचे नाम हेच माझे जीवन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आणि आम्ही नारायण रुपी धन हे हृदयात जतन करून ठेवले आहे. आणि हेच धन आम्ही याचकाला देत आहोत.
अभंग क्र. 543
द्रव्याचिया मागे किळकाळाचा लाग । म्हणोनिया संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचे मूळ घालुनिया मागे । मांडिली प्रसंगे कथा पुढे ॥धृपद॥
आजिच्या प्रसंगे हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥
प्रारब्ध काही न पालटे सोसे । तृष्णेचे हे पिसे वायाविण ॥३॥
तुका म्हणे घेई राहे ऐसे धन । सादर श्रवण करोनिया ॥४॥
अर्थ
धनाच्या मागे काळ लागलेला असतो. धनाचि संगत हि खरोखर खोटी आहे. धन कितीही मिळविले तरी समाधान नाही. धनाचा अति लोभ हे नरकाचे मुळ आहे. त्याच त्याग करून मी आता अक्षयरूप हरी कथा सांगत आहे. आज या भगवंताच्या लीलाविलासाच्या कथेचा लाभ घ्या आणि प्रपंचाचा भार भगवंताच्या चरणावर अर्पण करा. तो तुमचा योगक्षेम सांभाळील. आपल्या प्रारब्धात असेल ते काही बदलत नाही. त्यामुळे धनाची एकसारखी लालसा व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचे नाम श्रवण करून तेच धन जतन करा व तेच धन आपल्या जवळ राहणार आहे.
अभंग क्र. 544
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपत्तीसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥धृपद॥
रांधू नेणे तया पुढील आइते । केले ते सोइते वाया जाय ॥२॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥
अर्थ
अलंकार चांगले असेल आणि परीधन करणारा मनुष्य निस्तेज असेल, तर तो चांगला दिसत नाही कारण तो मनुष्य अलंकार परिधान करण्यास सुशोभित नाही म्हणून. हे कृपेच्या सागरा पांडुरंगा, जगा मध्ये एकवाचून एक शोभत नाही म्हणजे उत्कृष्ट दिसण्यासाठी दोन्ही गोष्टी योग्यतेच्या लागतात. ज्याला स्वयंपाकच जमत नाही त्यांच्या पुढे स्वयंपाक बनवण्याची सामग्री ठेऊन वाया जाईल. तुकाराम महाराज म्हणतात शेळीच्या गळ्यात चिंतामणी बांधला तर तिला त्याचा काय उपयोग.
अभंग क्र. 545
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसे तव ठावे सकळांसी ॥१॥
काही न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥धृपद॥
भोगे कळो येती मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥
तुका म्हणे येथे झाकितील डोळे । भोग देते वेळे येईल कळो ॥३॥
अर्थ
दुःख डोगरा एवढे आहे हे माहित असून हि लोक आपल्या हिताचा विचार का करत बरे करत नाही देवाच्या नामाचा घोष का करत नाही ? या जन्मात आपल्याला जे सुःख दुःख भोगावे लागते त्यावरून मागील जन्म उत्तम, मध्यम, कनिष्ट कोणता होता हे समजून येते. तुकाराम महाराज म्हणतात वर्तमान काळात जर आपण चांगले वागण्या बद्दल डोळे झाक केली, तर आपणास त्याचे प्रायश्चित्त हे भोगावे लागेल आणि त्यावेळी आपल्या वागण्याची चूक कळून येईल.
अभंग क्र. 546
सदैव तुम्हा अवघे आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखी वाणी कानी कीर्ती । डोळे मूर्ती देखावया ॥धृपद॥
अंध बहिर ठकली किती । मुकी होती पागुळ ॥२॥
घरा आंगी लावुनि जागा । न पळे तो गा वाचे ना ॥३॥
तुका म्हणे जागा हिता । काही आता आपुल्या ॥४॥
अर्थ
तुमचे भाग्य आहे की, तुम्हाला सदैव भागवंताचे भजन करण्यासाठी टाळ्या वाजविण्यासाठी हात दिले आहे, स्न्मार्गावरून चालण्यासाठी पाय दिले आहे. भगवंताचे नाम घेण्यासाठी मुखी वाणी दिली, कीर्ती ऐकण्यासाठी कान दिले, विश्वात भरलेल्या भगवंताला पाहण्यासाठी डोळे दिले. परंतु किती तरी लोक आंधळे, बाहीर, मुके, पागळे आहेत कि, यांना भगवंताची सेवा करता येत नाही म्हणून भवसागरात फसले गेले आहे. स्वतःच्या घराला आग लावून तो जर स्वतःच घरात बसला तर तो कसा बरे वाचू शकेल ? तुकाराम महाराज म्हणतात आता तरी जागे व्हा आपले खरे हित कशात आहे ते जाणून घ्या.
अभंग क्र. 547
ऐसे पुढती मिळता आता । नाही सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावले ते घ्यावे । नाम गावे आवडी ॥धृपद॥
संचित प्रारब्ध गाढे । धावे पुढे क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥३॥
अर्थ
अनमोल असा उत्तम नर देह लाभलेला आहे. पुढे तोच जन्म लाभेल याची काहीच शाश्वती नाही. म्हणून नर देहाचे सार्थक करण्यासाठी थोडाही वेळ रिकामा न घालता हरीचे आवडीने नाम घ्यावे. संचित आणि प्रारब्ध हे फारच गाढे (बलवान) असते. आणि आपल्या क्रियमाण कर्माची गती सदैव पुढे वाटचाल करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात आत्ताच सावध व्हा आणि प्रेमाने हरी भजन करा. नाही तर पुढे जन्म घुबडाचे किंवा डुकराचे मिळेल.
अभंग क्र. 548
सर्वविशी माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडू एक ॥१॥
संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणता माझे कोणी ॥धृपद॥
देहसुख काही बोलिले उपचार । विष ते आदर बंद वाटे ॥२॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे काही आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवाचे ॥२॥
अर्थ
लौकीक व संसारिक गोष्टी विषयी माझा जीव त्रासून गेला आहे. त्रास होईल अश्या भवसंसारातील कोणत्याही प्रकारची गोष्ट मला सहन होत नाही. कोणी मला आपले म्हणले तरी मला सहन होत नाही देहाला सुखी करण्या संबंधी कोणी काही बोलले, तर मला ते आवडत नाही. इंद्रिय सुख हे तर मला विषा प्रमाणे वाटते त्याचे मोठे दडपण माझ्या मनावर आहे. कोणी माझा गौरव केला उपाधी दिली, माझी प्रतिष्ठा वर्णन केली तरी त्या स्तुतीने माझा जीव कासावीस होतो. तुकाराम महाराज म्हणतात मला आता नाशवंत प्रपंचातील खोटे पणाच्या गोष्टी आवडत नाही, सहन होत नाही वैष्णावाचे चरण वंदावेत, एवढेच आवडते.
अभंग क्र. 549
आणीक काही या उत्तराचे काज । नाही आता मज बोलावया ॥१॥
भिन्न भेद हे भावना स्वभाव । नव्हे काही देव एकविध ॥धृपद॥
गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म ते ॥२॥
तरि भले आता न करावा संग । दुःखाचे प्रसंग तोडावया ॥३॥
तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हेचि धणी ॥४॥
अर्थ
भगवंताच्या प्रेम भक्ती शिवाय आता माझ्या कडे दुसरे काहीच बोलावायास नाहि. भिन्न भिन्न भेद भावने प्रमाणे स्वभाव वेगवेगळे असले, तरी देव हा सर्व विविधतेमध्ये एक्तात्वाने भरलेला आहे. गुण व दोषाची निवड कोणत्या धर्मा वरून करावी ? कर्म व अकर्म यांची देखील निवड कशी करावी ? यांना कशा तऱ्हेने जाणावे ? आता कोणाचीच संगती धरू नये. यातच आपले भले आहे. त्यामुळे दुखाचे प्रसंग तुटले जातात. तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी या देवाचेच गुणगाण गात राहील यातच माझे समाधान आहे.
अभंग क्र. 550
आपुला विचार करीन जीवाशी । काय या जनाशी चाड मज ॥१॥
आपुले स्वहित जाणती सकळ । निरोधिता बळे दुःख वाटे ॥धृपद॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनिया घरी निजो सुखे ॥२॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनिया वाट आणिका लागे ॥३॥
तुका म्हणे भाकु आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥४॥
अर्थ
मी माझ्या जीवाला विचारून परमार्थाचा विचार करीन. लोकांना विचारून त्याचा काय उपयोग. आपल्या हिताच विचार प्रत्येक मनुष्य जाणतो. त्यांना त्यांच्या कर्मा पासून परावृत्त केले तर त्यांना दुख होते. कोणी माझी कथा प्रेमाने ऐकोत अथवा नाईको किंवा घरी सुखाने झोपी जावोत, परमार्थाचे मी तरी अगदी शेवटचे टोक कुठे गाठले आहे. की, ते पाहून माणसे परमार्थाच्या मार्गाला लागतील. तुकाराम महाराज म्हणतात मी आपली देवाची करूणा भाकेल जशी ज्याची वासना आहे तशी त्याला तो फळ देईल.
अभंग क्र. 551
ध्याई अंतरिच्या सुखे । काय बडबड वाचा मुखे ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जव नाही अनुभवगोडी ॥धृपद॥
वाढे तळमळ उभयता । नाही देखिले अनुभविता ॥२॥
अपुलाल्या मते पिसे । परि ते आहे जैसेतैसे ॥३॥
साधनाची सिद्धी । मौन करा स्थिर बुद्धी ॥४॥
तुका म्हणे वादे । वाया गेली ब्रम्हवृंदे ॥५॥
अर्थ
हृदयातील (अंतरातील) हरीचे ध्यान करा. मुखाने व्यर्थ बडबड करण्यात काय अर्थ आहे. हरीचे सतचिदआनंदाची जो पर्यंत अनुभूती येत नाही, तो पर्यंत विधिनिषेधांच्या चक्रात फिरून डोक्याला फार त्रास होत असतो. अंतरंगात हरी प्रेमाची बासरी वाजवीत आहे ती जो पर्यंत ऐकू येत नाहि, तो पर्यंत हृदयाची तळमळ वाढत असते. मनुष्य आपल्याचं विचाराने भारलेला असतो, त्याच प्रमाणे वागतो. त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. तो आहे त्या स्थितीत राहतो. तुम्ही मौन धारणा करा हरीचे चिंतन करा. बुद्धी स्थिर करा. यातच सर्व साधनाची सिद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात विविध तऱ्हेचे व्यर्थ वाद करून काही ब्रम्‍हवृंद वाया गेले आहेत.
अभंग क्र. 552
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥
कैसी ठकली बापुडी । दंभविषयांचे सांकडी ॥धृपद॥
भुस उपणुनि केले काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥
तुका म्हणे लागे हाता । काय मंथिले घुसिळता ॥३॥
अर्थ
शब्दशः अर्थ करण्यात मीमांसक गुंतले आहे, ते विधीनिषेधाच्या फेरात सापडतात. सांख्यवादी आहेत ते नेहमी खंडन मंडनाच्या वादात गुंतलेले असतात. दंभाच्या संकटामध्ये बापुडे फसलेले असतात. धान्य पाखडताना धान्य टाकून दिले आणि भुसा तर वाऱ्यावर उडून गेला तर मग दोन्हीचे नुसकान. तुकाराम महाराज म्हणतात लोणी कढल्या नंतर ताक घुसळण्यात काय अर्थ आहे ?

फेब्रुवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version