७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! महाराणी ताराबाई!!!
!! प्रस्तावना !!
!! प्रस्तावना !!
नमस्कार!
आतांपर्यंत ४१ रामायण,महाभारता तील व्यक्तीरेखा,संतचरित्र्ये,सम्राट अशोक,स्वामी विवेकानंद,तसेच ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधे,अहिल्यादेवी होळकर,झांशीची राणी,जिजाऊ मातोश्री गोपिकाबाई,छ.राजाराम,महाराणा प्रताप संपूर्ण पेशवाई आपल्यापुढे प्रस्तुत केलेत आपण भरभरुन कौतुक करुन माझा उत्साह वाढवला.त्याच इतिहासांतील पावणे तीनशे वर्षे उपेक्षिल्या गेलेल्या महाराणी ताराबाईच्या तेजस्वी,कर्तबगार स्रीचे,इतिहासाशी प्रामाणिक राहून त्यांचे व्यक्तिचरित्र आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.नेहमीप्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!
एखादे ऐतिहासिक चरित्र्य रेखाटने म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.महाराणी ताराबाई… एक झंझावती वादळ..
नुकताच राज्यभिषेक झालेले शंभू राजे प्रथमच सेनापती हंबीरराव मोहित्यां च्या गांवी तळबीडला गेले आणि तिथे ह्या ९-१० वर्षाच्या चुणचुणीत ताराबाई च्या दर्शनाने प्रभावित होऊन,आपले बंधू राजारामासाठी त्यांचा हात मागीतला. मोहिते घराण्यांतून भोसले कुळी येतांना, ताराबाईंनी केवढी मोठमोठी स्वप्ने रंगवुन उंबरठ्यावरील माप ओलांडून भोसल्यां ची स्नुषा म्हणून प्रवेश केला.सुरुवातीचे कांहीच दिवस नवीन कौतुकाचे जात नाही तोच,त्यांच्यावरच नाही तर,अवघ्या स्वराज्यावर दुःखाची कुर्हाड कोसळली. स्वकीयांच्याच फितूरीने शंभूराजे जेरबंद झाले आणि नंतर त्यांचे हालहाल करुन त्यांचा वध करण्यांत आला.आणि ताराबाईसह सारी दौलत,स्वराज्य पोरके झाले.
नंतर रायगड वेढला गेल्यावर, स्वराज्य हितासाठी,पहाडाएवढं दुःख बाजूला सारुन येसूबाईसाहेबांनी स्वतः गडावर राहून,त्यांना गडाबाहेर काढलं. मराठी राज्याच्या वारसदाराची पत्नी म्हणून हा उंबरठा ओलांडतांना किती सुखस्वप्ने रेखाटली असतील,जे वय कोड कौतुक करुन घ्यायच,स्वतःच्या हौसमजा पुरवून घ्यायच्या,ऐश्वर्य उपभोगायच, त्याच वयात हे सारं सोडून वणवण भटकणं नशीबी आलं.ज्याच्याशी जीवन बांधल्या गेल त्याने वनवासात सोडून शेकडो योजनं दूर जाऊन चंदीला नाटक शाळा खोलून स्वतःच शरीर व मन तृप्त करुं लागला.
ताराबाई मोहिते घराण्यांतील कन्या,भोसले कुळाची स्वामीनी,त्यांना पतीचं हे वर्तन कधीच सहन होऊ शकले नाही.आपली जिम्मेदारी विसरुन नाटक शाळेतील बटकीनीच्या करपाशात गुंतून राहणार्या,नी भांग,मदिरेच्या बेहोशीत आपले कर्तव्य बुडवलेल्या आपल्या पती ला ताळ्यावर आणण्यासाठी अनेक संकटाचा सामना करुन त्या चंदीत पोहच ल्या.आणि रामराजेंच्या चुकीचे,अपराधा चे माप त्यांच्या पदरांत टाकून,त्यांना ताळ्यावर आणण्याची फार मोठी अवघड कामगिरी ताराबाईंंनी पार पाडली नंतर सुधारलेले रामराजे चंदीवरुन निसटल्यावर आपली राजधानी सातारा करुन,हाती समशेर घेऊन मर्दुमकी गाजवूं लागले,पण नियतीला ताराबाईचे हेही सुख पाहवले नाही.त्यांचेवर वैधव्या ची कुर्हाड कोसळली.
पण सरसेनापती हंबीररावांची कन्या,व शिवाजीमहाराजांच्या भोसले कुळाची सून आपले वैयक्तिक दुःख बाजूला सारुन,स्वतःला बजावले,तूं सामान्य स्री नाहीस.येसूबाईसाहेब व स्वराज्याचे स्वामी बाळराजे शिवाजीराजे (शाहूराजे) औरंग्याच्या कैदेत,पतीचं नुकतच निधन झालेले,अशा स्थितीत पोरकी झालेली दौलत,स्वराज्य वार्यावर सोडून देऊन चालणार नाही.उठ..तारा.. उठ..स्वराज्याच्या रक्षणार्थ वैयक्तिक सार्या भावनांची होळी करुन धैर्याने आल्या संकटाचा मुकाबला कर!आणि मग ताराबाईंने मागे वळून बघीतले नाही.
स्वतः घोड्यावर मांड टाकून दौलत भर संचार करीत,माणसं जुळवीत,मराठा तितूका मेळावा या न्यायाने माणसं… माणसं जोडीत गेल्या.लाखाच्यावर फौज तयार केली.दुरावलेल्या सरदारांना एकत्रीत केले.अनेक मोठमोठ्या योजनां चे नियोजन करुन स्वराज्यात भरभराट आणली. सेनापती जाधव व गिरजोंजींचा तंटा मिटवून त्यांच्यात दिलजमाई केली. तसेच संताजीपुत्र व धनाजी जाधवांत असलेली तेढ मिटवली.अनेक युक्त्या, प्रयुक्त्या करुन स्वराज्याची भरभराट केली.गेलेले कित्येक गडकोट परत स्वराज्यात आणण्यांत यश मिळवले.
स्वतःचा मुलगा भ्रांतीच्या आजाराने आजारी असूनही त्याच्या दुःखात रडत न बसतां,त्याच्यावर अनेक उपायाबरोबरच,स्वराज्याच्या कर्तव्याकडे किंचितही दुर्लक्ष होऊ दिले नाही.शाहू राजे व येसूबाईसाहेबांना रिहा करण्याची ऐनवेळी मसलत फसल्यावर गलितगात्र न होतां पुन्हा जिद्दीने उभ्या राहून मोठ्या जोमाने गनिमांशी झुंज घेऊ लागल्या. अश्या या झुंझार,रणरागिनी चे चरित्र आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे नेहमी प्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत….
क्रमशः
मिनाक्षी देशमुख १७-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – १.
मराठी दौलतीत तळबीड हे ६०० –
७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन मुर्तूजाने रतोजी ला “बागी” खिताब प्रदान केला होता.या रतोजी मोहितेचा सुपुत्र तुकोजी याने सुध्दा तळबीडच्या उन्मत्त डोमगुडे मुतालिकाला उचित शासन देऊन, तळबीडची पाटीलकी हासिल केली होती तुकोजीला तीन अपत्ये – संभाजी,धरोजी आणि तुकाबाई.ज्यावेळी शहाजीराजांना सालण्याच्या घाटात कोंडले होते,त्यावेळी अदिलशहाच्या चाकरीत असलेल्या संभाजी-धरोजी या बंधूंनी मोठा पराक्रम करुन निजामशाहीची लष्करी फळी फोडून,शहाजीराजांना शर्थीची मदत केली होती.राजे प्रसन्न होऊन,संभाजी- धरोजीच्या प्रस्तावानुसार त्यांची भगिनी तुकाबाईशी विवाह केला.
आतांपर्यंत त्यांचेकडे पाटीलकीच असल्यामुळे तसे सामान्यच!पण संभाजी धरोजीचा पराक्रम व प्रत्यक्ष शहाजीराजें ची मर्जी,शहाजीराजेंनी आदिलशहाकडे त्यांचेसाठी केलेली रदबदली यामुळ त्यांना देशमुखी प्राप्त झाली.आणि पाटील मोहितेचे ते देशमुख मोहिते झाले. आदिलशाहीत त्यांना शूर सेनानी म्हणून मानाचं स्थान स्थान प्राप्त झालं होतं.संभाजीचे सुपुत्र हंबीरराव मोहिते.
शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मराठी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी हंबीरराव मराठी दौलतीच्या पागेत मामुली जुमलेदार होते.ते स्वकर्तृत्वाने व पराक्रमाणे शिवाजीमहाराजांच्या डोळ्यात भरले.हिर्याची पारख असले ल्या शिवाजींनी हंसाजी मोहितेला हंबीरराव हा किताब देऊन स्वराज्याचे सरनौबत केले.
रामजीकाका मोहित्यांच्या भावकितले.गावांबाहेर त्यांच छोटसं घर!
निपूत्रिकाच्या दुःखापेक्षा स्वराज्यकामी आपलं कुणीच नाही हीच त्यांची व्यथा! तरी निराश न होता,स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीपासूनचा इतिहास…जस केवळ श्रींच्या इच्छेने बाल शिबाजींनी रोहिडेश्वरावर घेतलेल्या आणाशपथा, सुराज्याचा केलला संकल्प,गोळा केलेले मावळे,मारामार्या,झगडे,घातलेल्या धाडी,दौलतीत सामील केलेले गडकोट, हासिल केलेला विजय हे सर्व माहित असल्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग,नवीन पिढीच्या मनांत दौलतीबद्दलचे प्रेम उत्पन्न करण्यात केला.आणि नव्या पिढीने अन्यायी यवन जुलुमशाही विरुध्द खळवळून उठावं इतपत त्यांना तयार केलं.त्याचा परिणाम,त्यांच्या प्रेरणेने तळबीडमधील तरुण पोरं शिर तळहाता वर घेऊन स्वराज्यात शिलेदारी पत्करली. वृध्दत्वामुळे आपण आतां स्वराज्य कामा साठी निरुपयोगी आहोत,पोटी संतान नाही ह्याच विचारांत बेचैन असतांना, आज नागपंचमी…येवढ्यात काकाऽऽ म्हणून हाक कानावर आली.ताराक्का त्यांचेसाठी सणाची पुरणपोळी घेऊन आली.त्यांचा विषन्न चेहरा बघून,कारण विचारल्यावर,म्हणाले, ताराक्का!जशी तलवार गंजली की,तीचा उपयोग नसतो तसं आमचं झालय बघा.नुसता धरणीला भार!
रामजीकाकांच्या तोंडी इतके निराश उद्गार व विव्हल अवस्था ती आज पहिल्यांदाच बघत होती.त्यांना मुळपदा वर आणण्यासाठी पूर्वस्मृतीतील जुन्या गोष्टींची आठवण करुन दिली.त्यावेळी आम्ही ६-७ वर्षाचे असू.एक दिवस हेराने दौलतीचे स्वामी धाकले महाराज येत असल्याची वार्ता आणली होती.रामजी काकांच्या चेहर्यावरच्या विषादाच्या रेषा पुसल्या जाऊन,पूर्वस्मृतीच्या सुखद आठवणीने चेहरा उजळला.म्हणाले, ताराक्का ज्या घटनेने तळबीडच्या माती चे सोने झाले,दौलतीच्या स्वामींच्या पावलांनी ही भूमी पावन झाली ती घटना कसा विसरेन?काका त्या दिवशी नुसतं तळबीडच पावन झालं नाही तर आणखी ही कांही घडलं होतं…
महाराजांची वाट बघत असणार्या गावकर्यांच्या गर्दीत रामजीकाकांच्या खांद्यावर छोटी ताराही होती.महाराज जवळ आल्याची खूण म्हणून तोफ वाजली तेव्हा ती केव्हढ्यांदा दचकली होती.थोड्याच वेळात मराठी दौलतीचे स्वामी धाकले महाराज छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या मागे अदब राखुन सरनौबत हंबीरराव मोहिते होते,
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
१७-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – २.
प्रत्यक्ष स्वराज्याच्या स्वामींच्या दर्शनाने रयतेला आनंद झाला.सुवासिनीं नी त्यांचे औक्षण केले.तेवढ्यात त्यांची नजर थोट्या हाताच्या रामजीकाकांकडे गेली.राजेंच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या काय घडते हे कळायच्या आंत,मराठी दौलतीचा राजा खाली झुकुन त्या अपंग थोट्याअसलेल्या रामजीकाकाच्या पायाला स्पर्श करुन म्हणाले,काका तुम्ही आम्हाला पिताजींच्या ठायी!पिताजींनी दौलत उभी केली त्यात आपल्यासारख्यां चा सिंहाचा वाटा आहे.तुमच्या सारख्या निष्ठावान,अतुल त्यागावरच हे स्वराज्य उभे राहिले.गदगदल्या स्वरांत रामजी म्हणाले,धाकले धनी,आज या फाटक्या मामुली रामजीला बोलावून कौतीकाचे दोन शब्द बोललात,वडिलकीचा मान दिला,सारं सारं भरुन पावलो.आतां सुखा
नं डोळे मिटायला मोकळा…नाही काका, अजुन तुमची स्वराज्याला गरज आहे.
ताराक्काने पूर्वी घडलेल्या प्रसंगा ची अठवण करुन दिल्यामुळे त्यांचा उदासपणा कुठल्याकुठे पळून गेला.
शंभूराजे आपल्या महालात अस्वस्थपणन येरझारा घालीत होते. त्यांना राहून राहून एकाच गोष्टीची खंत वाटत होती.आबासाहेबांच्या मृत्युची खबर आपल्यापासून कां गुप्त ठेवली? धाकटे बंधू राजारामाच्या विवाहास कां नाही बोलावले?आम्ही आबासाहेबांचे कुणीच नव्हतो कां?त्यांना आठवले, सरनौबत हंबीररावांच्या स्वामी निष्ठेमुळे पन्हाळगडावरुन दौलतीचा स्वामी म्हणून रायरीवर आलो.मतलबी व षडयंत्रकारी राजकारणी जेरबंद झाले.कांही आपल्या पापाचं प्रायश्चित घेऊन पंचत्वात विलिन झाले.स्वतः छत्रपती होऊनही उदास होते.याच मनःस्थितीत ते राजारामांच्या महाली पोहोचले,तेव्हा१० वर्षाचे राजाराम भितिने थरथरत एका कोयर्या त केविलवाणे उभे होते.शंभूराजे आलेले पाहतांच रिवाजाप्रमाणे मुजरा घातला पण अपराध्यासारखे मान झुकवून तसेच उभे होते.
त्यांची ती केविलवाणी स्थिती बघून शंभूराजेंना भडभडून आले.दाटल्या कंठाने हाक मारली रामराजेऽऽ!जी..जी दा..दादासाहेब!त्याची भित्री अवस्था बघून भावनावेगाने मिठीत घेत विचारले, एवढा दुरावा का?आमच्या बद्दल यवढं भय?शंभूराजेंच्या या अनपेक्षित वामगण्याने रामराजे चकित झाले,भीती नाहीशी झाली आणि अपल्या अश्रूंनी आपल्या दादाची छाती भिजवली.दोघांना ही भावनावेग आवरणे कठीण झाले.
रामराजेंनी आपल्या एवढ्याशा वयात खूप सोसले.रामराजेऽऽ आपले परमपूज्य पिताजी असे तडकाफडकी… आपल्या अश्रूंना वाट करुन देत उत्तरले, आमच्यावर विश्वास ठेवा,पण हे सारं कसं नी काय झालं हे कळलचं नाही. आमच्या नशीबी तेही नव्हतं.आम्ही पन्हाळगडावर…आबासाहेब मृत्युशय्ये वर…रामराजेऽऽ आबासाहेबांचे क्रीया कर्म साबाजी भोसलेंनी केले,पण कां? आम्ही दुर्दैवी,नियतीने आम्हाला दूर ठेवले,पण तुम्ही तर होतात ना इथे?मग तुमचा अधिकार साबाजी भोसल्यांना दिला कुणी?आणि कां?शंभूराजेंचा संतापयुक्त आवाज ऐकून घाबरलेले रामराजे म्हणाले,दादामहाराज आम्ही सान..माॅंसाहेबांपासून सगळेचजण आम्हाला प्रत्येक गोष्टीपासून दूर ठेवत होते.आम्ही मजबूर….खरच मजबूर होतो
बरं!रामराजे! तुमच्या लग्नात मिरवायची,तुमच्या सार्या हौसी पुरवाय ची केवढी आस होती!पण तुम्ही..मात्र आपल्या लग्नाला….दादामहाराज यांत आमची कांहीही चुक नाही.मग आबा साहेबांनी मना केले होते?त्यांनी तुम्हाला आवतन धाडण्याची आज्ञा आम्ही स्वतः च्या कानाने ऐकली होती.तरीही पण कां मांसाहेबांची इच्छा…आबासाहेबांना माणूस धाडले म्हणून सांगीतले,पण आवतन पाठवलेच नव्हते.हे सर्व आठवत असतांनाच विश्वनाथने येऊन मुजरा केल्यामुळे शंभू राजेंची विचारश्रृंखला तुटून ते भानावर आले.
महाराज!सरनौबत हंबीरराव मोहिते आलेत.आपल्या अनुमतीची वाट बघत आहेत.चेहर्यावरच्या विषादाच्या रेषा जाऊन स्मित उमटले.खरचं मामासाहेब आलेत?त्यांना भेटायला जातां जातां, कविजींना म्हणाले,जेध्यांना विनाविलंब पत्र रवाना करा.आणि सर्जाभाऊ जेध्यां च्या हालचाली आम्हाला कळण्यासाठी एखाद्या विश्वासू माणसाची नेमणूक करा.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – ३.
महालाबाहेर दरवाज्यात अनुज्ञेच्या इंतजारीत उभे असलेल्या सरनौबतांना भेटायला स्वतः जातीने राजे आलेले बघून,त्यांचा उर भरुन आला.राजे आपण कशाला तसदी घेतली?आज आम्हाला सरनौबतांना भेटायचे नव्हते तर,आमच्या मामासाहेबांना भेटायचय म्हणून आलोय जवळच उभ्या असलेल्या विश्वनाथला म्हणाले,मामासाहेब आल्याची वर्दी राणी साहेबांना दे व कुणाला आंत नको सोडूस
महालांत प्रवेशून राजेंनी स्वतः मामासाहेबांच्या हाताला धरुन बैठकीवर बसवून स्वतः त्यांच्या समोरच्या आसना वर बसले.मामासाहेब आज आम्ही युध्दा च्या,राजकारणाच्या गोष्टी नाही करणार. मामासाहेब!आपण जाणताच,आम्ही चारही बाजूने घेरल्या गेलोय.दिल्लीपती आलमगीर आमचं पारिपत्य करण्यास जातीनं दक्षिणेत उतरला आहे.शिवाय सिद्दीही “श्री” ची दौलत बुडवण्याचा मौका शोधत आहे.विरजई,म्लेच्छ आहेच एवढ्यानेच आमचे दुर्देव संपले नाही तर आमच्या अस्तिनितही निखारे पैदा झाले आहेत.आम्हीही त्यांच्या परिपत्यार्थ तयार आहोत.पण मामासाहेब…राजे अडखळले.त्याचवेळी येसूबाईंनी प्रवेश केला.क्षणभर कुणीच बोलले नाही.मामा साहेब!आपल्याच लोकांनी फितूरी करुन स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मसलत उभी करुन आम्हाला नेस्तनाबूत केलेली त्यांची कोशीस आपण मोडून दौलतीची हिफाजत केली.हे आपले उपकार आम्ही व दौलत कधीच विसरणार नाही.नाही राजे हे त्या जगदीश्वराने घडविले.आम्ही केवळ निमित्यमात्र…
पण मामासाहेबऽऽ,राजे पुन्हा अडखळलेले बघून,आमच्याकडून कांही आगळीक झाली कां?नाही मामासाहेब! आगळीक आमचीच झाली असावी. त्याचेच प्रायश्चित भोगतो आहोत. कालौघात वर्षे उलटली,पण आमचं प्रायश्चित अजुन संपलेलं नाही.काय अपराध होता आमचा?रामराजे आमचे बंधू नव्हते सावत्र असले तरीही,कां राम लक्ष्मण सावत्र बंधू नव्हते?आम्ही काय कमी केलं होतं त्यांना?कोणती उणीव भासू दिली?आम्हाला तख्ताचा मोह कधीच नव्हता.त्यांना मिळालं काय नी आम्हाला सारखेच,पण हेच तख्त दोन भावांमधे विष कालवणार असेल,राम राजेंच्या प्रेमाला पारखं करणार असेल तर,आम्हाला नाही सहन होणार.रामराजें नाही याची पूर्ण जाणीव होती म्हणूनच त्यांनी राजपद नाकारले ना?पण त्यापूर्वी आम्हाला एका सुखापासून वंचित केले गेले.आम्हाला नाही कळले राजे!मामा साहेब!त्यावेळी आम्ही येसूबाईसह पन्हाळगडावर होतो,आणि इथे या राय गडावर आमच्या परमप्रिय बंधूचा राजा रामाचा विवाह मोठ्या थाटात आम्हाला डावलून करण्यांत आला.आणि आम्ही? सांगा मामासाहेब,सांगा..कां?कशासाठी आमचा हा आनंद हिरावून घेतला?मृदु स्वरांत हंबीरराव म्हणाले,आपलं दुःख जाणतो राजे,पण सोयराबाईच्या हट्टी स्वभावापुढे कुणाचच चाललं नाही.स्वतः थोरले महाराज मजबूर होते.
मामासाहेब जे झालं ते आमचं दुर्देव,पण आतां… बोला राजे,बोला मोकळ्या मनाने…मामासाहेब आजही आम्हाला आमच्या बंधूंच्या विवाहात मिरवण्याची हौस आहे,राणीसाहेबांचीही तीच इच्छा आहे.त्यासाठी आपली मदत हवी आहे.मदतीचा प्रश्नच नाही,आपण आज्ञा करावी,आणि आम्ही ती पाळावी.. मामासाहेब! आज आम्ही दौलतीचे स्वामी म्हणून नाही तर,तुम्ही आमचे मामासाहेब म्हणून आमची इच्छा पूर्ण करावी.बोला राजे,आपल्याला वचन देतो मग आपली तारा आमच्या रामराजांना द्या.येसूबाईंनाही ती पसंत आहे.
क्षणभर रांगड्या हंबीररावांना अर्थबोध झाला नाही.विस्फारल्या नेत्रांनी नुसते राजेंकडे पाहत राहिले..मामासाहेब भोसले आणि मोहिते दोन्हीही तोडीची घराणी!तुकोजी मोहित्यांची कन्या तर शहाजीमहाराजांच्या धर्मपत्नी,शिवाय सोयरामासाहेबही…हे संबंन आणखी घट्ट व्हावे,दृढ प्रेमाणे आणखी जखडली जावीत म्हणून हा प्रस्ताव मांडून आपल्या मदतीची,सहकार्याची इच्छा करतोय.. राजे!त्यांच्या भावना उचंबळून आल्यात. ते गप्प पाहून,मामासाहेब आपल्याला हा प्रस्ताव मान्य नसेल तर स्पष्ट सांगावे. आम्हाला राग नाही येणार!
राजेऽऽ या सोयरीकेने मोहित्यांची मान उंचावणार आहे.आमच्या लाडक्या कन्येचं,ताराच्या जीवनाचं सोनं होईल. राजे आम्ही धन्य झालो.सारे पावले.मग
मामासाहेब!तातडीने तळबीडला जाऊन विवाहाच्या तयारीला लागा.निरोपाचे विडे देण्यांत आले.मुजरा करुन हंबीरराव बाहेर पडले.राजे प्रसन्नपणे हसल्यावर, येसूबाईंनी कारण विचारल्यावर म्हणाले, पन्हाळगडावर सगळीकडून एकटे पडलो त्यावेळी आमच्या संकटसमयी,याच मामासाहेबांनी मदतीचा हात देऊन आमची बाजू बळकट केली होती.त्यांची च तडफदार,अनुचित अन्याय न करणारी तारा आम्ही मागीतली,आमच्या भोळ्या बंधूचा सांभाळ नीट करेल ना….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – ४.
तळबीडवरुन मेण्यात बसून पन्हाळगडाकडे येत असतांना तारांच्या डोळ्यासमोर कांही पूर्वस्मृती साकार झाल्या.त्यादिवशी नेहमीप्रमाणे रामजी काका ताराला समशेर कशी चालवावी, वार कसे करावे याचा सराव घेत असतां, कसे काय माहित,ताराच्या तलवारीचा निसटता वार रामजीकाकांना लागला व रक्ताची धार लागलेली बघून,तीच्या हातातील तलवार गळून पडली.ताराने त्यांची जखम बांधली.ताराक्का तुम्ही कां रडताय?गंभीर स्वरांत काका म्हणाले, ताराक्का! समशेर हाती घेणार्याचा दिल एवढा कच्चा,नाजूक असून चालत नाही. लढतांना समोर कोण आहे हा विचार न करतां,समोरचा शत्रू समजून,त्याचे शिर धडावेगळे कसे होईल याचाच विचार शिलेदाराने करायला हवा!
लढतांना समोरची माणसं हिंदु असले तर…तरी यवनाच्या चाकरीत असले तर तर ते शत्रूच ना? माणसांची पारख करण्याची संवय लावून घ्या.काका निश्चयी स्वरांत तारा म्हणाली,आमचे आबासाहेब ज्या निष्ठेने दौलतीच्यामागे उभे राहिलेत,तसेच आम्हीही राहू!तशीच दुसरी स्मृती नजरेसमोर साकार झाली. सुराज्यात स्थिरस्थावर झाल्यावर,शंभू राजेंचे मंचकारोहन झाल्यावर प्रथमच ते
तळबीडला केवळ एका मुक्कामासाठी आले होते.हंबीरराव मोहित्याच्या वाड्या त बैठक बसली होती.सारे प्रतिष्ठीत जातीनं या बैठकीला उपस्थित होते.तारा ही तीच्या आबासाहेबांशेजारी बसून सर्व अवलोकन करीत होती.
बैठकीत कुणीतरी हंबीररावांना प्रश्न केला,अमात्यांच्या मसलतीत राजाराम सहभागी होते का?मुळीच नाही.पण आम्ही ऐकलं की,ते स्वतः आणि त्यांच्या मातोश्री सोयराबाई अमात्यांच्या कटात सामील होत्या.थोरले महाराज गेले आणि रामराजे स्वामी झाल्याचे आमच्या काना वर आले.शंभूराजे आणि रामराजे यांच्या त जमीन अस्मानाची तफावत!शंभूराजे स्वतंत्र विचारांचे,कांहीसे तापट प्रवृत्तीचे, स्वसामर्थ्यावर अन्यायाचे परिपात्य करण्याची खंबीरता असलेले,याउलट रामराजे स्वभावाने मवाळ,त्यातच आमच्या ताईसाहेबांच्या वर्चस्वाखाली वाढलेले,थोड्या दुबळ्या प्रवृत्तीचे,शिवाय दौलतीच्या स्वार्थी,मतलबी अधिकार्यांनी ताईसाहेबांच्या कांहीश्या भोळ्या स्वभावाचा फायदा उठवून,पुत्राला सत्ते ची लालूच दाखवून त्यांचे कान फुंकले, शंभूराजेंविषयी अनेक न घडलेल्या गोष्टी सांगून त्यांच्या मनांत विष कालवले.उग्र प्रवृत्तीचे शंभूराजे दौलतीची हिफाजत करुच शकणार नाही असा आभास निर्माण केल्याने त्या कटकारस्थानांना बळी पडल्या.पण रामराजे…नाही..नाही त्यांनी स्वतःला सत्तेचा मोह कधीच निर्माण होऊ दिला नाही.पण मातोश्रींच्या धाकात असलेले,मनाने कमकुवत रामराजे अनिच्छेने मंचकारोहन करुन घ्यावे लागले.दौलतराव चव्हाणांनी विचारले,पण हंबीरराव,तुम्ही पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणीला विरोध करुन शंभूराजेंची बाजू घेण्याचे साहस कसे केले?
गंभीर स्वरात हंबीरराव म्हणाले,
“नात्यापेक्षा दौलत मोठी” हा मंत्र प्रत्यक्ष स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांचा होता.त्यांनी स्वेच्छेने शंभूराजेंना युवराज पद बहाल केले होते.दौलतीच्या स्वामीत्वाचा तंटा स्वार्थी अधिकार्यांच्या संगतीने आमच्या ताईसाहेबांनी उभा केला होता.प्रत्यक्ष थोरले महाराजसुध्दा या कलहाने बेचैन झाले होते.रामराजे जरी आमचे सख्खे भाचे असले तरी, त्यांना स्वामीत्व बहाल करणे म्हणजे थोरल्या महाराजांच्या विचारांशी,तत्वाशी, खुद्द त्यांच्याशी गद्दारी करणे हे आम्हास कदापी मान्य नव्हते व नाही.
आणखी एक प्रश्न! विचारा.. थोरल्या महाराजांचा मृत्यु…?सत्य आम्हालाही माहित नाही,त्यांच्या मृत्यु समयी राजधानीबाहेर सातार्यास होतो, जिथं २-४ मैलावर पाचाडला असणार्या पुतळाबाईसाहेबांना राजधानीत काय घडलं, कळलं नाही,तिथे आम्हाला कसं कळणार?पण एक खरं,माणूस सत्ते साठी कांहीही करुं शकतो…क्षणभर बैठकीत स्मशान शांतता पसरली.त्या शांततेचा भंग करत,रामजीकाकांनी विचारले,अलिकडे रामराजें नजरकैदेत आहे…साफ खोटे,निदान रामराजेंच्या बाबतीत असलं कठोर वर्तन,अशक्य! शिवाय येसूबाईसाहेब त्यांचेवर पुत्रवत् प्रेम करतात.फक्त मतलबी अधिकार्यां च्या कुटील नीतीला बळी पडू नये म्हणून शंभूराजे काळजी घेत होते,आतां त्यांची मतलबी मसलत ढासळल्यामुळे,रामराजें वर नजर ठेवण्याचं कारणचं उरलं नाही.
त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसले ल्या तारावर रामजींची नजर गेली, म्हणाले,एवढी रात्र झाली तरी,ना कंटाळली कि,ना झोप आली.सरनौबत ! तुमच्यासारखीच तुमची लेकही जिद्दी..हे का त्यांचे वय आहे,अशा मोठ्यांच्या गोष्टी ऐकण्याचं?पण,ताराक्काचं सारचं जगावेगळं!अहो घोड्यावरुन डोंगर चढणे भल्याभल्यांना जमत नाही,पण ह्या मात्र आपल्या छोट्या घोड्यावरुन चढल्यात.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१२-२०२१.


