आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी !
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
झाशीची राणी
! ! प्रस्तावना ! !
! ! नमस्कार ! !
आतांपर्यंतच्या माझ्या सर्व लिखानाला आपण सर्वांनी भरभरुन कौतुक करुन प्रोत्साहित केले. सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद ! क्रिया प्रतिक्रिया अपेक्षित !
आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी ! मुलाला पाठीशी बांधुन युध्दात उडी घेणारी समूर्त साहस ! प्राणांवर तुळशीपत्र ठेवुन स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर अवघ्या २६ व्या वर्षाचं आयुष्य झोकुन देणारी अग्निशिखा, रणचंडी ! इंग्रज सैन्यावर कडाडुन कोसळणारी, स्वातंत्र्याची आग खेडोपाडी पोहचविणारं ठिणग्यांचं झाड, विद्युल्लता ! ही तेजशलाका मोरोपंत तांब्यांची कन्या !
ब्रम्हवर्त येथे शेवटचे पेशवे श्रीमंत बाजीरावांकडे त्यांचे धर्मकार्य करणारे मोरोपंत त्यांचे आश्रित ! पोरवयातच आईच्या अपमृत्युने मातृविहिन झालेली मोरोपंताची कन्या मनुला बाजीराव पेशव्यांनी मानसकन्या मानुन तीला श्रेष्ठ स्थान दिले होते. तालिमखान्यातील तात्या आणि बाळागुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बाजीरावांचे दत्तकपुत्र नानासाहेब, राव साहेब, बाळासाहेब या धर्मबंधुबरोबर कुस्ती, मलखांब, घोडसवारी, तलवारबाजी या मर्दानी खेळाची आवड असलेली मनु सार्या विद्येत पारंगत झाली. पेशवे तीला लाडाने छबेली म्हणत. ही छबेली अत्यंत स्पष्टवक्ती, फटकळ, अपार बुध्दी व संस्कारक्षम होती. तीचा आदर्श अहिल्या बाई होळकर होत्या. ज्ञानेश्वरांची अपार सहनशीलता असलेली तेजस्वी मनकर्णिका. . . मनू. . . छबेली पुढे झाशीची राणी झाली. लग्नानंतर या मर्दानीला पती चे विकृत वागण्याचा अतिशय मानसिक क्लेष होत होते. तरीही नंतर आलेल्या अनेक आपत्ती, स्वातंत्र्यसंग्रामाच्या कठीण परीक्षेच्या काळात ही कणखर राणी अगदी निर्धोक लढत राहिली. सागर सिंह डाकुस वेढा घालुन पकडणारी ही शूर राणी, नत्थे खान बरोबर झालेल्या घनघोर युध्दात सपासप तलवार चालवली. स्वतः तोफेला बत्ती देत असे. बहादूरपूरला जयाजी शिंद्यांच्या सैन्यावर अचानक छापा घालुन ते सैन्यच आपल्या कडे वळवुन घेतले. यात तिचा मुत्सद्दीपणा, शूरत्व दिसुन येते. तिचं आयुष्य म्हणजे एक तेजस्वी वाटचाल ! तीचा बुध्दीवाद, देशाभिमान, देशप्रेम, यांचा गरगरणारा जणुं आकाशपाळणाच !
कटाई सराईचं युध्द लढतां लढतां राणीला विरमरण आलं. रणांगणात प्रत्यक्ष लढाईत उतरलेली ही तेजस्वी तेज शलाका ! तीच्या आयुष्यात केवळ रणांचा योग असलेल्या ह्या रणयोगीनी, अवघ्या २६ वर्षाच्या आयुष्याचं रक्तदान देणार्या रणचंडीकीला कोटी कोटी प्रणाम !
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – १.
ब्रम्हवर्ताचं भूषण असणार्या गंगा नदीकाठी बागडणारी नानासाहेब, राव साहेब, दादासाहेब ही द्वितिय बाजीराव पेशव्यांची दत्तकपुत्र. . . आणि त्यांच्या सोबत बागडणारी मनू. . . हे दृष्य पेशवे रोजच डोळांभरुन पाहत होते. त्यांना कन्या नसल्यामुळे, त्यांचे आश्रित असलेल्या मोरोपंत तांब्यांच्या कन्येला मानस कन्या मानुन आपली लेकीची भूक भागवुन घेतली. कन्येची सर कुळपुत्रांना ही नसते. पण आज ती न दिसल्याने ते थोडे अस्वस्थ झाले. काल संध्याकाळी रावसाहेबांनी तीचा केलेला अपमान की, नानाने मुद्दाम केलेले भांडण याचा तर तीला राग आला नसेल ना?मोरोपंत होम शाळेत दिवसभर धर्मकार्यात मग्न असल्यामुळे ही आईवेगळे पोर आपल्या वाड्यात रुणझुणते, नाचते, बागडते, ती होमशाळेत असेलसे वाटुन सेवकाला तीला आणायला पाठविले आणि आतुरतेने वाट पाहु लागले.
तिला कश्यापाई बोलावले?या फटकळ पोरीने आणखी काय केले या धास्तीने मोरोपंत घाबरुन तीच्या सोबतच आले. आपण आश्रित ! आश्रितासारखे वागावे ना? पण ही स्वतःस बाजीरावांची दुहिता अन् नाना, रावसाहेबांची भगिनिच मानुन बसली. कसे आणि काय सांगावे? बाजीराव तीला कन्याच मानत असल्याने तिचं शिक्षण, घोडसवारी, सुर्यनमस्कार, मल्लखांब, कुस्ती, तलवारबाजी हे सर्व पेशव्यांच्या मुलाबरोबरीने शिकत आहे. कसं आवराव?बरं बोलणं अति जहाल. मातृविहिन पोरीस कसं सांभाळाव?दिनपणे तांबे पेशव्यांना म्हणाले, पोरीकडुन कांही आगळीक झाली असल्यास क्षमा करावी. ती फुरंगटुन बाजीरावांजवळ येत म्हणाली, काकासाहेब ! आमचे बंधु नुसता हुंदडा घालतात, तालिमीत पण नीट शिकत नाही म्हणुन रागावले तर, आम्हास भटाची पोर म्हणुन चिडवले. हे आमचे आणबंधु. . . काल हत्तीवर आम्हाला न घेता एकटेच फेरी मारायला गेले. मोरोपंत तिच्या बेलगाम बोलण्यावर ओरडले तर बाजीरावांनी त्यांनाच सुनावले. श्रीमंत ! आम्ही आपले आश्रित, दरिद्री, हिने हत्ती साठी हट्ट करावा?हिच्या दैवी कुठला हत्ती? नाही मोरोपंत ! नाही. . तुम्ही दरीद्री नाही. या कन्येने आपणांस बहुत श्रीमंत केले. हिच्या बुध्दीवादाने आमचेही पुत्र शिकतील, यश मिळवतील. नऊ वर्षाची असुनसुध्दा किती परिपक्व बोलते. हिला जिवापाड सांभाळा. मोरोपंत ! ही कुणीतरी थोर होईल.
मनूचा सांभाळ करणारी तानु मावशी पुर्वजांच्या, थोरामोठ्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या गोष्टी सांगतल्याने मनुचे ज्ञान सर्वांगीन वाढत होते. बाजीराव म्हणाले, तुमची तानुमावशी आमच्याबद्दल काय म्हणतात?ते आपण विचारु नये. आपणास वाईट वाटेल, राग येईल. नाही मनू सांग ! आम्ही मन घट्ट करुन ऐकु. त्या म्हणतात, या बाजीरावांनी २० वर्षापुर्वीच आंग्रजांना आत्मसमर्पण करुन स्वतःचं राज्य इंग्रजास . . . . . बाजीराव मनातच बोलत राहिले. . . इतिहास आम्हास दोष देणारच. . . शेवटचा पेशवा पळपुटा निघाला. . . पण आमच्या स्थितीचा विचार कुणीही करणार नाही. बालपणापासुन कोणत्या वातावरणात वाढलो, किती बंधने, अशात पेशवेपद प्राप्त झाल्यावर, तिजोरी खाली, फंदफितूरी, कुणाचा पायपोस कुणाच्या पायी नाही, स्वजनांची साथ नाही, सगळे स्वार्थाने बरबटलेले, इंग्रजांकडे मातब्बर आसामी, मातब्बर फौज, अवघ्यांना पैशाचा मोह, तरी मुठभर सच्च्या लोकांसह जेवढे जमेल तेवढे करायचा आटोकाट प्रयत्न केला, पण तेवढे पुरी पडले नाही. मालकन हात धुवुन मागे लागलेला, माणसे जाया होऊं लागली. खणाखणीस सुरुवात, प्रजेचे अतिशय हाल, प्रजेचे मरण देखवे ना, म्हणुन प्रजेच्या
आत्मसमर्पण करावे लागले. मिळत असलेल्या आठ लक्ष तनख्यामधुन दानधर्म, अडल्या नडल्यास मदत, परिवाराची देखभाल, मुलांचे शिक्षण, जसं जमेल तेवढं करतोय तरी इतिहास आम्हाला गुन्हेगारच समजणार. पैशासाठी मुलुख इंग्रजांच्या घशात घातला असे आरोप आमचे रक्त जळव्यासारखे पितात.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – २.
मनूचे विवाहाचे वय झालेले, त्यात फटकळ, सारे मर्दानी खेळ, कसा होईल हिचा विवाह या चिंतेने मोरोपंत ताब्यांना रात्ररात्र झोप येत नव्हती. आज सकाळी ते होमशाळेत असतांना कारभारी म्हणाले, मोरोपंत ! झाशीचे राजे गंगाधर रावांसाठी योग्य कन्येचा शोध घेत, झाशीचे प्रतिनिधी तात्या दिक्षित इथे पोहोचले आहेत. तुम्ही मनूची पत्रिका त्यांना दाखवा. तात्या दिक्षितांनी मनकर्णिकाची कुंडली व पत्रिका बघीतल्यावर म्हणाले, महान राजयोग ! मुलगी राणी होणार ! लगेच मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला.
मनू थोडी भयभीत, अस्वस्थ झाल्याने तनुमावशी तीची तयारी करतां करतां समजावुन सांगु लागल्या. मनू ! भाग्य तुझ्या दारी आलय, त्याचं सोनं कर. अहिल्यादेवींच्या कथा सार्थ कर ! नुसती राणी न होता प्रजेची आई हो ! महाराजां ची उमर तुझ्यापेक्षा अधिक, पहिली पत्नी नुकतीच निवर्तली. राणीपद म्हणजे सुवर्ण संधी ! या पदामुळे सर्वाधिकार. . . त्याचा उपयोग दिनदुबळ्यांसाठी कर ! बायकांना प्रशिक्षित करुन त्यांना धीट कर ! तुझा संसार फक्त तुझ्यापुरताच न ठेवतां प्रजा हिताचे रक्षण करण्यापर्यत जाऊ दे. .
अत्यंत धीटाईने मंद पावले टाकीत मनू दिवानखाण्यात प्रवेशली. तिथे उपस्थित असलेल्या थोर्यामोठ्यांना तीने वाकुन नमस्कार केला. तात्या दिक्षितांनी तीच्या हातावरच्या हस्तरेषा व पत्रिकेती ल राजयोग पाहुन आपण योग्य ठीकाणी आलो याची त्यांना खात्री पटली. तिच्या वाचनाचा दांडगा व्यासंग, शौर्याच्या खेळा तील प्राविण्य, उतुंग विचारसरणी, आणि मातेसमान असणार्या व योग्य संस्कार, मार्गदर्शन करणार्या तानुबाईबद्दलचा आदर हे सर्व पाहुन तात्या म्हणाले, गंगाधर महाराजांचे दोष सारण्याचे कसब या तेजस्वी मुलीत आम्हाला दिसताहेत. सर्वांच्या संमतीने लगेच साडी चोळी देऊन मनूबाईचा वाडःनिश्चय आणि तानुमावशीचा सत्कार केला. लग्न तिथि निश्चित झाल्यावर मनूबाईसाठी पालखी पाठवु. नानासाहेबांनी तिला थोडं चिडवल्याने वातावरण हलकेफुलके झाले. भविष्य आणि भाग्य मनूची वाट बघत होते. सर्व ठरवुन तात्या दिक्षितांनी झाशीची वाट धरली.
अत्यंत प्रमुदित मनाने राजे गंगाधरांना मुजरा करत दिक्षित म्हणाले, महाराज ! ब्रम्हवर्तास मोरोपंत तांब्याची कन्या व श्रीमंत पेशवे बाजीरावांची मानसकन्या मनूबाई, सर्वगुण सपन्न, महालक्ष्मीचे रुपतेज असलेली आपल्या साठी निश्चित करुन आलोय. वैशाख पोर्णिमेचा विवाहमुहुर्त निघाल्यावर ब्रबम्हवर्तास आमंत्रणे गेलीत. अवघी झाशी नववधुसारखी सजली. काकुबाई च्या प्रशस्त वाड्यात तांबे कुटुंबाच्या राहण्याची ऊत्तम व्यवस्था करण्यात आली. जागोजागी, तोरणे, अत्तराचे सडे, फुलापाणांच्या माळा. . हे सर्व पाहुन मनू बाई अचंबित झाली.
विवाहसोहळ्यास सुरुवात झाली. महाराजांकडील महिला मनूला दागिण्यां नी सजवु लागल्या. तानुमावशीकडे घाबरुन बघत म्हणाली, मावशी ! मी इतके दागिणे घालुन घोड्यावर कशी बरे बसणार?या सुवर्णकैदेची तर आम्हाला शिक्षाच वाटते.
आपला प्रिय हत्ती सिध्दबध्दावर स्वार होऊन गंगाधर महाराज मनूच्या वाड्यावरुनच देवळात जातांना मनूने त्यांना झरोक्यातुन पाहिल्यावर तिच्या मनांत आदर दाटुन आला. यांच्यामुळेच आपल्याला राज्ञीपद लाभले. मनोमन ठरवलं, या संधीचं सोनं करीन. इथे कुणी दासदासी न राहतां सार्या मदतनीस असतील. श्रेष्ठ कनिष्ठ भेद असणार नाही.
विवाहासाठी निश्चित झालेले गणेश मंदिर वस्रालंकारांनी सजलेल्या प्रजेने भरुन गेले. सभामंडपाच्या मध्यभागी ऊंच बोहोलं बांधण्यात आलं. हळदीकुंकवाची तयारी, पाणसुपारी, हारगजर्याच्या दुरड्या, खणानारळाच्या ओट्या सर्व सज्ज होते. ठीकठीकाणी मोठमोठ्या समयातील ज्योती प्रकाश फेकत होत्या. दाराशी गणवेशातील इंग्रज वादकपथकां सह सज्ज होते. मनूबाई लग्नस्थळी आल्यावर उंचबोहोल्यावर वधुवर बसल्यामुळे ते सर्वांना स्पष्ट दिसत होते. सगळे मंत्रमुग्ध होऊन सालंककृत भावी राणीकडे टकमका बघत होते. मंगलाष्टक, वधूवरांवर अक्षतांचा वर्षाव. . . लग्नघटिका भरली. सावधानचा गजर. . . वाजंत्री. . इतर वाद्ये, तुतार्या. . . त्याचवेळी किल्यावरच्या बुरुजावरुन तोफांची सलामी. . . त्या आवाजातच मंगळसुत्र बांधल्या गेले. वधू वरांच्या शेल्याची गाठ बांधल्या गेली. सप्तपदीनंतर वरात वाजतगाजत महा लक्ष्मी मंदिरात आली. महालक्ष्मीची ओटी भरुन तीला साडी चोळी नेसवण्यात आली. सुवर्णथाळीत महाराजांनी अंगठी ने नांव कोरले “लक्ष्मी” मनूबाईची झाली लक्ष्मीबाई. . . .
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – ३.
मनुबाई आतां महाराणी लक्ष्मीबाई झाल्यात. आणि तानुमावशीची जबाब दारी वाढली. राजगृहातले रितीरिवाज, पाकगृहाकडे लक्ष पुरवणे, पुजाविधी, अनुष्ठान, पत्री फुलं, कुळधर्म, कुळरिती, पतीच्या आवडीचे पदार्थ यांत जरी त्या गुंतल्या असल्या तरी, दुपारचा वेळ मात्र ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी राखुन ठेवला होता. राणीस अजुन ऋतु प्राप्ती न झाल्यामुळे दोघांचे मिलन झाले नव्हते. त्या ग्रंथालयात असतांना महाराज तिथे येऊन “राणीसाहेब”अशी हाक मारल्यावर, लक्ष्मीबाई विनम्रपणे हरकत घेत म्हणाल्या, आम्ही आपली अर्धांगिनी लक्ष्मीच ! आम्ही सर्व रितीरिवाज शिकुन आपल्या लायक होण्याचा प्रयत्न करुन आपले कुळ, नाव नमुदास आणण्याचा प्रयत्न करु. ठीक आहे. एकांतात आम्ही लक्ष्मी म्हणु ! परंतु जगासमोर मात्र राणीसाहेबच म्हणायला हवय ! तुमचा पायगुण महाभाग्याचा, शकुनाचा ठरला. ब्रिटिश सरकारने झाशीची पुर्ण सत्ता आपल्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
स्वामी आपल्याच देशात आपल्याला या फिरंग्यांनी लज्जात्मक रितीने अधिकारापासुन वंचित केले. आतां झाशीचे अधिकार मिळते म्हणजे, आपण केलेल्या राजव्यवस्थेचा सन्मान आहे. पण त्यांच्या अटी नक्कीच असतील राणीसाहेबा ! आपलं वय केवळ १२-१३ वर्षाचं ! महाराष्र्टातील एका ज्ञानेश्वरां बद्दल ऐकुन होतो. आपणही. . . आपले तेजही. . . स्वामी व्यर्थ संकोचात लोटु नये अटी सांगाव्या. .
बुंदेले आणि ठाकुरांचे दमन करण्या स्तव ब्रिटिशांची एक तुकडी इथे राहील. त्यांच्या खर्चासाठी दुलिया, तालगंज, आणि आणखी दोन जिल्हे त्यांना द्यायचे. शिवरामभाऊ पासुन मोस आणि जलौन आधीच त्यांच्या अधिन आहेतच.
म्हणजे प्रत्येक ठीकाणावर फिरंगी आपले पाय रोवुन पाश आवळतात हे तानुमावशीचे म्हणणे खरे आहे तर? उदईक दरबारात होणार्या समारंभात सिंहासनावर आपण आमच्या शेजारी असाल. समारंभाची तयारी सुरु झाली. खांबाखांबावर फुलांपाणांच्या माळांची तोरणे, उंची समया, उंची गालिचे, दरबारा तील झुंबरे लखलखत होते. ललकारी झाली आणि गंगाधर राजे, महाराणी लक्ष्मीबाईसह प्रवेशुन सिंहसनारुढ झाले. कॅप्टन डनलाॅप मोठ्या मिजाशीत आसनावर बसला होता. लक्ष्मीबाईंच्या मनांत कल्होळ उसळला. सत्तापिपासू जळव्या इंग्रजांनी दोन अडीच लाखाचा मुलुख गिळला. आमच्याच गोष्टी आम्हाला दान करतात. मोरोपंत आणि तानुमावशी अत्यंत कौतुकाने सोहळा बघत होते. राणीच्या चेहर्यावर जरी वरवर हास्य विलसत असले तरी, त्यांच्या अंतःकरणात पेटलेला वणवा कुणालाच कळणारा नव्हता.
यानंतर राजे गंगाधरांनी अंतर्गत शासन व्यवस्थेकडे जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली. कॅप्टन डलहौसीच्या अटी अन्यायकारक व कठीण होत्या, पण स्विकारण्याखेरीज पर्यायच नव्हता. राधारामचंद्राची प्रधानमत्री म्हणुन नेमणुक केली. नरसिंह कोप्रा व नाना भोपटकर यांचीही योग्यपदी नेमणुक करण्यात आली. ओरछाच्या आजुबाजुस मळईखोर लोकं होती, जिथे विद्रोहाची शक्यता होती तिथे राजेंनी सैनिक तैनात केले.
आणखी चार वर्षे लोटली. आतां राणीसाहेब चौफेर लक्ष घालु लागल्या. त्याचबरोबर तारुण्यसुलभ भावनेने स्री पुरुष संबंधाचे अनेक पैलु लक्षात येऊ लागले. ऋतुशांतीचा कार्यक्रम झाल्यावर, पतीविषयीचा आदर, प्रेम, विश्वास या सार्या भावनासहित गंगाधर राजेंच्या महालाकडे निघाल्या असतां त्यांच्याहुन मोठी असलेल्या सुंदरी नावांच्या सखी कडुन जे महाराजांविषयी कळलं ते अतिशय घृणीत होतं. त्यांच्या मनातील प्रेम, समर्पणाची आस, मिलनाची आतुरता मांगल्याची भावना, भेटीची ओढ हे सारं अर्पन करण्याची, रितं करण्याची वेळ आलीच नाही. आणि आली ती फारच क्वचित ! गंगाधरांच्या पदरांत इश्वराने मनू रुपी सुंदर गाणं टाकलं पण ते बाजारु गाणे ऐकण्यातच मग्न असत. आणि एके दिवशी त्यांची सोशीकता, सहनशक्ती संपल्याने मनाच्या क्षोमावस्थेत वर्दी न देता गंगाधरांच्या महालात प्रवेशल्या मात्र. . . . .
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. १७-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! ! !
भाग – ४.
महालात पाय ठेवताच तिथे नटुन थटुन बसलेल्या स्रीस लक्ष्मीबाईंनी स्वामी कुठे आहेत विचारल्यावर, ८-१० जण असलेल्यांच्या जीभा टाळुला चिकटल्या. त्यांनी संतापुन त्या स्रीस पुन्हा विचारले, पण ती पाठमोरी असल्यामुळे त्यांनी त्या स्रीला खसकन हात धरुन समोर उभे केले आणि क्षणभर सारं विश्वच गरगरतं आहेस वाटलं, स्वप्नातही कल्पना केली नाही असं दृष्य समोर दिसलं. ती स्री दुसरी तिसरी कोणी नसुन स्रीवेश धारण केलेले महाराज गंगाधरराव होते. राणी डोळे फाडुन बघतच राहिल्या. हे आपले स्वामी?ज्यांच्यासाठी आपण रात्र रात्र तळमळतो झुरतो?
स्वामी हा काय प्रकार आहे?इंग्रजां नी आपल्याला बांगड्या भरायला भाग पाडल की आपणच स्रीरुप घेतल? अहो ! ही वेळ पुरुषार्थ गाजवायची, हा डोलारा सावरायचा, अशा वागण्याने डेर्याचे दोडे उतरण्यास वेळ नाही लागायचा ! हे राज्य नमुदास आणणे आहे. . . आम्ही नाही सहन करु शकत. . . जातो आम्ही. . गंगाधर ओरडुन म्हणाले, बोलावल कुणी?राज घराण्यात वर्दीशिवाय कुणी येत का?पण तुम्हाला कस कळणार?महाराणी खिन्न होऊन परतल्या. तानुमावशी त्याची समजुत घालत म्हणाल्या, मनुबाई ! महाराज रसिक, कलावंत आहेत. नाटकाची त्यांना आवड आहे.
आणि नाटकशाळांचीही ! मावशी हे दैवाने काय दिलय?तेवढ्यात राजे गंगाधर येत असल्याची वर्दी आली. लक्ष्मी बाईंच्या मनी घृणा दाटुन आली. मावशी आंत निघुन गेल्या. गंगाधरराव स्रीवेशातच तणफणत आले. राणीसाहेब संतापुन उभ्या राहिल्या. स्वामी या वेशात आपणाशी बोलणे अशक्य ! आम्हास नाही सहन होत. आम्ही आपला पुरुषवेश सहन करतोच ना? आपला मल्लखांब, कुस्ती सहन करतो ना?महालात तर आपण आखाडाच उभा केलाय ! महालात नाटकशाळा आणण्यापेक्षा अधिक चांगले. आपल्यासारख्या अरसिक पुरुषी स्रीला काव्य, कविता काय कळणार?कुस्ती, घोडदौड. . . छी. . . ! इंग्रज स्री पुरुष बघा कसा कलेचा आनंद घेतात. नाच गाण्यात गुंतवुनच तर इंग्रजांनी सारा हिंदुस्थान घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. आपण सुध्दा झाशीचा पांचवा हिस्सा किती सहजपणे देऊन टाकला. नाटके, गाणी ऐकुन सारं कसं परत मिळवणार?त्यासाठी आमचे आखाडेच कामी येतील, नाटकशाळेतील गणिका नाही. आपणास या वेशात बघणे अशक्य. . . अशक्य. . .
आम्हाला आवडतं हे सारं. . . नाटक दिग्दर्शन, अभिनय. . . रोज आठाचाराचा प्रसंग नको वाटते. आम्ही महिन्यातुन तीन दिवस अस्पर्श बसतो. चौथ्या दिवशी नहाण्याचा सोहळा. . पुरे पुरे. . . या विकृत कथा कानी आल्याच होत्या. अभिनंदन आपलं. . . इंग्रजांशी लढण्यासाठी फारच उत्तम शस्रे निर्माण केलीत. इंग्रजांनी बांगड्या नाही का दिल्या?बांगड्या घाला स्रीवेश घ्या नी नाचत नाचत इंग्रजफौजेस सामोरे जा. . . घोड्यांच्या पायात घुंगरं. . . खामोशsss आमची ही बेअदबी? जबान आवरा. . . मनमानी बोलण्याचे अधिकार, स्वातंत्र्य आम्ही दिलेले नाही.
ते स्वातंत्र्य आणि अधिकार आम्हास या मंगळसुत्राने दिले. मी आपली अर्धांगी ! आपल्यातल्या दडलेल्या लढवय्याला आव्हान करा. नाटकगृहांच्या जागी आखाडे येऊ द्या. फिरंगी अतिशय मातला आहे. चारही बाजुने पाश आवळत आहे. हे छंद बंद करुन दूरंदेशी येऊ द्या. स्वामी ! ओरछा, दतिया, आजुबाजु चे सारे स्वार्थाने बरबटलेले. अवतीभवती वणवा घुमसू लागलाय ! स्वामी देशाटन करा. चौफेर नजरबाज पाठवा. ऊपद्रव देतात त्यांना अविलंब समज द्या. सध्या सावध राहण्याची निकड असतांना स्वामी हे काय करीत आहात?फौजांना प्रशिक्षित करा. शस्रागारे उघडा. प्रधानमंत्री नेमुन अंतर्गत व्यवस्था बळकट करा. आणि सर्वात आधी स्रीवेशाचा त्याग करा आम्ही बंद डोळ्यांनीच आपल्याशी बोलतोय. . . बघणे अशक्य आहे.
गंगाधरराजे लुगड्याचा घोळ सावरत उठत म्हणाले, राणीसाहेब आपले बोलणे जरी जहाल असले तरी तथ्य आहे हे आम्हीही जाणतो. इंग्रजांकडे ससज्ज शस्रे असल्यामुळे आपला निभाव लागणे कठीण. . . . कोण म्हणतो?इथले शासक आपण इंग्रज बरे इथे येऊन पाय घट्ट रोवतात आणि आपले पाय उखडतात हे घडतेच कसे?
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-२-२०२१.
! ! ! झाशीची राणी ! !
भाग – ५.
फितुरी ! राणीसाहेब फितुरी, स्वार्थी मतलबी, पैशासाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्यामुळे राजकारण बिघडत आहे. फिरंग्यांची हाजी हुजरी. . . .
आणि फिरंगी वरवर राज्य नको म्हणत, पण त्याच्यात शिस्त असल्यामुळे आपला मुलुख घशात घालत आहे. वीरांच्या रक्तमोलानं, बलिदानानं मिळवलेलं राज्य आयतच त्यांच्या घशात जात आहे. आपण विश्वासु लोकांची एकजुट करुन बुध्दीचातुर्याने बंडावे, कार्य करुन राज्याचे पाय भक्कम करावे. फिरंग्यास उखडावे.
मोतीबाई, जूहीबाई या गणिकांचा ऊपयोग नजरबाज, हेर म्हणुन करावा.
राजे त्यांचे बोलणे ऐकुन थक्क झाले. त्यांना आपल्या स्रीवेशाची लाज वाटु लागली. स्वामी खुप कटु पण पोटतिडकेने सत्य तेच बोलले. स्वामी ! मनी रोष न धरावा. आपला बदनक्षा नाही सहन होत. आपले शौर्य व्यर्थ जातसे पाहुन उरात वेदना ठसठसतात, कळ उठते स्वामी !
महाराणी ! हाती तलवार व बेलभंडार घेऊन आपल्याला वचन देतो की, यापुढे स्रीवेश धारण करणार नाही. या पाप क्षालनासाठी काशीयात्रेस जाऊन, त्या निमित्याने देशाटन व मातब्बर आसामीं ची भेट होईल. यापुढील क्षण व कण फक्त राज्यासाठीच ! आज आपण झणझणीत अंजन घातलं. मी आपला. . .
पुरे स्वामी ! आपण क्षमा करावी. महाराज निघुन जाताच तानुमावशी धडधडत्या ह्रदयाने बाहेर आल्या कसे निभावले असेल माझ्या मनुने?हीच्या सारख्या शूर लढाऊ मुलीस स्रीवेश धारण करणारा पती मिळाला. दुर्देवाची बाब असली तरी राज्ञीपद मिळाले ही दुर्मिळ संधीच ! कच न खाता खुप कर्तव्य करायचेत मनुला. . .
मनु काय झाले ग?महाराज खुप रागावुन गेले का?मावशी ! आमच्या स्पष्ट व परखड बोलण्याने स्रीवेश व विकृतीचा त्याग करण्याची आण घेऊन गेलेत स्वामी ! मावशी राजाची मनगटे प्रजेच्या रक्षणासाठी, सुखसुविधेसाठी असतात, गजरे बांधण्यासाठी नाही याची स्पष्ट जाणीव करुन दिली स्वामींना. . .
महालक्ष्मी नवरात्रोत्साहाची तयारी सुरु झाली. विजयादशमीच्या उत्सवा साठी चौघडे, हत्तीवरचा चांदीचा हौदा, छत्र चामरे, हत्तीचे चांदीचे तोडे, उजळवणे मंदिर रंगवणे, तुतार्या चकचकीत करणे, घोड्याच्या गळ्यातील घुंगरे, माळा, कपाळावरचे बिजोरे, मुकुट सारे शोभीवंत होऊ लागले. महालक्ष्मीसाठी सुंदर सुंदर लुगडी, मूर्तीचे पोषाख, किनखापी वस्रे, सर्व तयारी केल्या गेली. रिवाजाप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या बॅंडपथकालाही आमंत्रीत केले. नवरात्राचा नऊ व अष्टमीचा निर्जळी उपवास महारीणींनी केला. त्यांचा सुंदर चेहरा अधिकच तेजाळला. गेले ७-८ महिन्यापासुन राजे नाटकशाळेऐवजी तालिम आखाड्यात मेहनत करु लागले. दर महिन्याला न्हाण्याचा सोहळा तर लोकं विसरुनही गेले. गाणे बजावणे थांबले. मोतीबाई, जूही बाई यांच्या फेर्या नबाब, ब्रिटिश अंमलदाराकडे होऊ लागल्या.
लोकं ऊत्सुकतेने दसरा मिरवणुकी ची वाट बघत होते. दसरा रविवारी येत असल्यामुळे इंग्रजांचा प्रार्थना दिवस असल्यामुळे, ब्रिटिश अधिकारी व बॅड पथक शोभायात्रेत सहभागी होण्यास असमर्थ असल्याने दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र व नजराणा आल्याचे पाहतांच, महाराज संतापाने पेटुन उठले. धर्म हा राजकर्तव्या आड कधीही येऊ देऊ नये. सिमाल्लोघंनाच्या मिरवणुकीत सामील होणं राज कर्तव्य आहे. प्रधानमंत्री ! त्याचा नजराणा परत पाठवुन त्यांना लिहा आपली अनुपस्थिति झाशी राज्याची बेअदबी आहे. आम्ही सहन करणार नाही. बॅंड पथकासह शोभायात्रेत सामील न झाल्यास पुढील गंभीर परिणामास तयार असावे. खलिता व नाकारलेला नजराणा इंग्रजांकडे रवाना झाला. महाराजांनी गमावलेला सन्मान महाराणीच्या सानिध्याने परत आला. महाराणींनी पडदासंस्कृतीला पायबंद घालुन स्रीयांचे लढाऊ पथक तयार केले. स्रीयांमधे आत्मविश्वास निर्माण होऊ लागला. लाल तोंड्या माकडं, ब्रिटिशांची चिड येऊ लागली. राणीसाहेबांबद्दलचा आदर, प्रेम, विश्वास निर्माण होऊन त्यांच्या बरोबर घोडसवारी, शस्रविद्या शिकण्यास त्यांना आनंद वाटु लागला. दसर्याची मिरवणुक वेळेवर निघाली. इंग्रजांचे बॅंडपथक व अधिकारी वर्ग आधीच हजर होते.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-२-२०२१.


