Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग ४, (१६ ते २०)

DATTATRAY PRABHU CHARITRA 4 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

DATTATRAY PRABHU CHARITRA 4 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

श्री दतात्रय

श्री  दत्तात्रय  !!!
भाग  –  १६.

          ज्या परम्यात्म्याने अत्यंत प्रेमाने कार्तवीर्याला सर्व सिध्दी दिल्यात, सप्तद्वीपचे  पृथ्वीचे अधिपत्य दिले,योग आणि ज्ञानाचा उपदेश करुन ब्रम्हज्ञानी केले तोच परमेश्वर त्याच्या वधासाठी अवतार घेणार! भगवान विष्णुंनी दिले ल्या आश्वासनाची कथा ऐकुन सदीपाक ला अनेक प्रश्न पडले. त्याचे निराकरण करण्यासाठी अत्यंत नम्रपणे गुरु वेद धर्मांना विनंती केल्यावर ते सांगु लागले!

        एकदा जीवनमुक्त अर्जुन दत्तप्रभुंच्या दर्शनाला गेला असतां प्रार्थना करीत म्हणाला, देवा! हा क्षत्रीय देह पडणे योग्य आहे, पण आपणां करवीच माझा वध व्हावा! प्रभु म्हणाले, तुझा वध करणारा वीर  ब्रम्हांडांतही शोधुन सांपडणार नाही. अरे! आपण लावलेली विषवल्ली सुध्दा तोडवत नाही, मी तर पुर्ण जीवनभर तुझा प्रतिपाळ केला! त्या तुझ्या सारख्या भक्ताचा वध कसा बरं करु शकेल? त्यावर अर्जुन म्हणाला, मला हीनतेने रुग्नाईत होईन तरी मरण येऊ नये म्हणुन!  अर्जुनाला अभिवचन देतांना त्यांनी विचार केला, अर्जुन क्षत्रिय असल्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजेच ब्राम्हणकुळातच जन्म घेऊन त्याचा वध करावा लागेल. भक्त पराधीन भगवंताला त्यांच्या इच्छेप्रमाणेच रुपे धारण करावी लागतात.लहान मुली जसा भातकुलीचा खेळ मांडावा आणि खेळ झाला की, सहजतेने मोडुन टाकतात तद्वतच देवांच्या लीला असतात, गीतावचनानानुसार जन्म मृत्यु अपरिहार्य आहे. जगाची ऊत्पत्ती तोच करतो व लय, संहार पण तोच करतो.

       मग ज्याने आत्मज्ञानाच्या बळाने

“याचि देही याचि डोळा आपले मरण पाहिले” त्या जीवन्मुक्त अर्जुनाला देहपातांचे दुःख काय असणार? जन्म, वाढ,स्थिती,परिणाम,क्षय आणि नाश अशा विकारांनी ग्रस्त देह राहला किंवा गेला तरी आत्मस्वरुपाची कांही हानी होत नाही.

         कान्यकुब्ज देशात संतानहीन धर्म परायण गाधी नांवाचा राजा राहत होता. संतान नसल्यामुळेा विरक्ती आल्याने पत्निसह वनांत राहुन शंकराची आराधना केल्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकराच्या कृपेने रुपवान, गुणवान,बुध्दीमान अशी सत्यवती नांवाची मुलगी झाली. भृगु त्रृषींचा पुत्र त्रृचिक त्याच वनांत तपाचरण करीत होता. पित्याच्या दर्शनाला गेला असतां, पितरांच्या त्रृणातुन मुक्त होण्यासाठी  गृहस्थाश्रम स्विकारण्याची त्याला आज्ञा केली. पित्रृआज्ञा शिरसावंद्य मानुन, ध्यानाद्वारे शोध घेतला असतां, त्याला अनुरुप अशी कन्या सत्यवती दिसली. ती आवडल्यामुळे राजा गाधीकडे जाऊन सत्यवतीला मागणी घातल्यावर, राजा गोंधळला, लाडाकौतुकात वाढलेली आपली एकुलती एक सुकुमार या तपस्व्यासोबत वनवासाचे कष्ट कसे सहन करील? बरं! या तपोधित मुनिला नकार दिला तर त्याचा कोप होण्याची शक्यता! कांहीतरी अश्यकप्राय अट घालुन निरोप द्यावा असे राजाने मनांत ठरविले.

        राजाने त्रृचिकाचा योग्य सन्मान करुन म्हणाला, अनेक राजे तिला मागणी घालून दबाव आणत आहेत. म्हणुन, जो पुरुष १००० हजार श्याम कर्ण घोडे देईल त्यालाच माझी कन्या देईन असा “पण” ठेवला आहे. श्याम कर्ण पांढर्‍या वर्णाचा असतो, फक्त त्याचे कान काळे असतात, असा दूर्लभ एक घोडा मिळण्याची मारामार, तिथे हजार घोडे या तपस्याला कसे मिळणार परंतु त्रृचिके चा आपल्या तपःसामर्थ्या वर विश्वास होता.त्याने मी तुमची अट पुर्ण करीन पण तुम्ही मात्र वचनपुर्ती करावी. त्रृचिकेने ध्यानाने मागोवा घेतल्यावर वरुणदेवाकडे हजार श्यामकर्ण घोडे असल्याचे दिसले.लगेच आकाशमार्गे वरुणाकडे जाऊन पिताज्ञा  नुसार गाधीकन्या सत्यवती व राजाचा “पण” बद्दल सांगुन एक हजार शामकर्ण अश्वांची मागणी केली.

            क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


!!!   श्री  दत्तात्रय  !!!

                  भाग  –  १७.

       वरुणदेवाला त्रृचिकाच्या तपःसामर्थ्याची पुर्ण कल्पना असल्या मुळे एकदम नकार देऊ धजावला नाही. मग तो त्रृचिकाला म्हणाला, शामकर्ण हजार घोडे आहेत खरं! पण भयंकर नाठाळ आहेत.परका माणुस पाहिला की, खायला अंगावर धावुन येतात, तरी सुध्दा घेऊन जाऊ शकत असलास तर खुशाल घेऊन जा. आणि इकडे त्या घोड्यांना दारु  पाजली. तपस्वी त्रृचिक त्या उन्मत्त झालेल्या शामकर्ण घोड्यां कडे आला व योगरसिध्दींचा उपयोग करुन एका दृष्टीक्षेपात त्या घोड्यांना शांत केले

        पुराणांतील या गोष्टी बिनबुडाच्या वाटण्याची शक्यता असली तरी,प,पुज्य श्री टेंबे स्मामींच्या जीवनांत घडलेली घटना, ते बहिणीकडे गेले असतां,तीच्या कडे असलेली गाय कोणालाही धार काढु देत नसे की, जवळ कुणी जवळ आल्यास लाथ मारायची. वासुदेवशास्री (पुर्वीचे नांव) कांही मंत्रप्रयोगाने मारकी  गाय एकदम गरीब झाली. शेगांवचे संत गजानन महाराजांनी नाठाळ घोड्याला नाही कां वठणीवर आणले? प्राणीमांत्रां च्या स्वभावावर सुध्दा मंत्र्यसामर्थ्याचा किंवा योगसामर्थ्याचा प्रभाव पडतो हे स्पष्ट होते. तसेच अलीकडच्या काळात होऊन गेलेले संत श्री पाचलेगांवकर यांचे सर्पावरचे प्रभुत्व तर अनेकांनी पाहिले व अनुभवले आहे.

       शांत झालेल्या हजार श्यामकर्ण घोड्यांचा कळप घेऊन वरुणदेवाला आशिर्वाद देऊन जलमार्गे पुर्वेकडील कान्यकुब्ज ( कनौज) देशांत आला.गंगा नदीतुन जिथुन अश्व घेअन बाहेर पडला ते स्थान सर्व सापांचा नाश करणारे अश्वतिर्थ म्हणुन प्राख्यात झाले.हे सहस्र मुखी गंगेजवळ आहे. हजार अश्व घेऊन त्रृचिक गाधी राजाकडे आला व वचना ची आठवण दिली. गाधीराजाने त्याचे अद्भूत योगबळ,तपोबळ पाहुन स्तंभीत व आनंदीत झाला. ज्याच्याकडे सिध्दी राबताहेत, देवतासुध्दा ज्याला अनुकुल आहेत, ज्याला अनुकूल आहेत, ज्याला आपण दरिद्री समजत होतो, तो तर देवा हुनही अधिक शक्तिशाली आहे. अश्या व्यक्तिला आपली कन्या देऊन कृतकृत्य तर होईलच पण कुळाचाही उध्दार होईल, असा विचार एका शुभ मुहुर्तावर बाह्य विधिने त्रृचिकाला आपली कन्या दिली. शास्रात विवाहाचे आठ प्रकार वर्णिली आहेतः बाह्य, दैव,आर्ष,प्राज पत्य,असुर,राक्षस, पैशाच विवाह! परंतु या सर्व विवाहात बाह्य विवाह श्रेष्ठ मानला जातो. मोठ्या उत्साहाने सत्यवती आणि त्रृचिकचा विवाह संपन्न झाल्यावर कांही दिवस तो सासुरवाडीत च राहिला. एके दिवशी संधी पाहुन गाधी राजाने त्रृचिकाला, आपण निपुत्रिक असल्याची खंत व्यक्त करुन म्हणाला, श्राध्द, पाक्षिक, पितृकर्म करण्यासाठी, तपस्वी,उदार,पुण्यवान ज्याची त्रैलोक्यात सुर्यचद्र असेस्तोवर सत्किर्ती पसरावी असा पुत्र व्हावा.मी सुध्दा पितृत्रृणातुन मुक्त होऊन सद्गती मिळेल.

       त्रृचिकमुनींना करुणा वाटुन पुत्र प्राप्तीचा वर दिला.नंतर पिता भृगुत्रृषीं च्या दर्शनासाठी सत्यवतीसह जाण्याची इच्छा प्रकट केल्यावर गाधी राजाने त्यांच्या जाण्याची व्यवस्था करुन सपत्नीक मानसन्माने निरोप दिला.त्रृचिं कांनी पिता भृगुंना सर्ववृत्तांत कथन केला, पण त्यापुर्वीच किर्ती कानावर आली होती.मुलाने आज्ञांपालन केल्याने त्यांना परम संतोष झाला. नवपरिणित दंपतीला आशिर्वाद देऊन त्यांना आपल्या जवळच राहण्यास सांगीतले.

       राजकन्या सत्यवतीने पातिव्रत्य धारण करुन आपल्या शांत,प्रेमळ,त्रजु स्वभावाने सर्वांचे मन जिंकले. भृगुंनी प्रसन्न होऊन तिला हवा तो “वर” मागण्यास सांगीतले. त्यावर सुजान राजपुत्री म्हणाली, मामंजी! धर्मावर दृढ श्रध्दा,निष्ठा आणि वाडवडिलांची सेवा घडावी! याशिवाय दुसरे कांहीही नको. तरी कांही इच्छा असेल तर सांग! सास र्‍यांचा आग्रह पाहुन अपल्या मातेला व स्वतःला पुत्रप्राप्तीची अपेक्षा व्यक्त केली. भृगुत्रृषी म्हणाले, मी सांगतो तो श्रध्दापुर्वक उपाय केल्यास दोघींनाही पुत्रप्राप्ती होईल.दोघींनीही मासिक पाळी नंतर परमेश्वराचे ध्यान करुन, तु पिपळवृक्षाची व तुझ्या मातेने औंदुबर वृक्षाची पुजा करुन दोघींनीही पुत्र कामेषठी याग करावा. यज्ञातील हवन केलेल्या भाताचा अवशेष ब्राम्हण तुला बाह्य मंत्राने अभिमंत्रुन देतील, तो भाग श्रध्देने ग्रहण केल्यास सर्व ब्राम्हणांत श्रेष्ठ, वेदसंपन्न, तिन्ही लोकांत पुज्य असा पुत्र होईल.

         क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

!!!   श्री  दत्तात्रय    !!!

भाग  –  १८.

             तसेच क्षात्रमंत्राने अभिमंत्रुन दुसरा भाताचा भाग (चारु) तुझ्या आईने भक्षण केल्यावर महान शूरवीर, व पृथ्वी वर धाक गाजविणारा थोर क्षत्रिय पुत्र होईल. जवळच उभ्या असलेल्या त्रृचि काला सत्यवतीसह सासुरवाडीस जाऊन पुत्रकामेष्ठी यज्ञ करुन दोघींनाही चारुचा प्रसाद देण्यास सांगीतले.

       वडिलांच्या आज्ञेनुसार सासुरवाडी ला येऊन,त्यांच्या सांगण्याप्रमाणे यथा सांग पुत्रकामेष्ठी याग केला. यथाविधी (चरु किंवा पायस) मंत्रुन प्रसाद देतांना मात्र घोटाळा झाला. आईसाठीचा चरु सत्यवतीने  सत्यवतीचा चरु आईने खाल्ला.भृगुमूनींना अंतर्ज्ञानाने कळल्या बरोबर त्वरेने तिथे आलेत, व म्हणाले, हे  काय केलेत तुम्ही? प्रसादाची अदला बदली झाल्यामुळे मिळत असलेल्या फळांची म्हणजेच पुत्रांचीही अदला बदली होईल. सुनबाई! तुला महाशूर क्षत्रिय व तुझ्या आईच्या पोटी ब्रम्हर्षी येणार!

       हे ऐकुन सत्यवतीला अत्यंत दुःख झाले. ती म्हणाली, विप्रपत्नि होऊनही पोटी क्षत्रिय यावा हे तिच्या मनाला सहन होईना! मामंजी!  तुमच्या सारखा सुज्ञ, सर्वमान्य सर्वज्ञानी ब्राम्हणपुत्रच हवा! भृगुंनी तिला खुप समजावले,पण   ती हट्ट सोडायला तयार नव्हती.शेवटी मंत्र फिरवुन तुझा पुत्र ब्राम्हण झाला तरी नातू मात्र क्षत्रियच होईल. पुत्रकामेष्टीच्या फलस्वरुप सत्यवती व  तीच्या मातेला यथाकाळी पुत्ररत्न प्राप्त झालेत.

        गाधी राजाने राजपुरोहित व राजज्योतीष्याला बोलावले.त्यांनी दोन्ही बालकांचे जातच(भविष्य) वर्तवले.दोघे ही त्रृषी होतील. सत्यवतीच्या मुलाचे नांव जमदग्नी,जो अत्यंत बुध्दीमान म्हणुन सर्वत्र प्रसिध्द होईल.गाधीराजा चा पुत्र विश्वामित्र पुढे गायत्रीमंत्राचा द्रष्टा म्हणुन प्रसिध्द होईल. क्षत्रिय कुशीत जरी जन्म झाला तरी यज्ञाच्या प्रासादी संस्काराने ब्राम्हण्याचे जन्मजात संस्कार दृढ होतील,ब्राम्हण म्हणवुन घेण्यासाठी विश्वामित्राने साठ हजार वर्षे तपश्चर्या करुन ब्रम्हर्षिवर्त मिळाले ही गोष्ट सुप्रसिध्द आहे.

       वेदधर्मामुनी संदीपकाला पुढे सांगतात….भगवान शंकरांनी अवतार रेणु राजाच्या पोटी माता जगदंबा रेणुका नांवाने अवतरली.ती महान पुण्यवती कन्या बालपणापासुनच भगवान शंकरा च्या ध्यानात मग्न असे. जमदग्निलाच शिवशंकर माणुन त्यांचे चिंतन करीत असे. जमदाग्नीशी विवाह करण्याचा निश्चय तीने पित्याच्या कानी घातला. जगदाग्नीची किर्ती ऐकुन त्यांनी कन्येचा विधियुक्त विवाह करुन दिला. साक्षात पार्वती असलेली रेणुका पतीसह आश्रमात राहुन मनोभावे व प्रेमाने त्याची सेवा करुं लागली. जमदाग्नी अग्निहोत्र घेऊन तपश्चर्येला आरंभ केला यथावकाश त्याना तेजस्वी चार पुत्र झालेत. वसु, वसुमती, सुषेन, विश्ववसु! देवांनी दिलेल्या वरानुसार भक्तकैवारी अजन्मा परमात्मा रेणुका मातेच्या उदरात प्रकटला. वैशाख शुध्द तृतीयेला मध्यान्हकाळी भगवान विष्णुंनी भार्गव राम नांवाचा हा सहावा ( मत्स,कच्छ, वराह, नरसिंह आणि वामन या पांच अवतारानंतर) अवतार धारण केला.पुढ चे राम,कृष्ण, बौध्द आणि कल्की हे चार धरुन भगवान विष्णुंचे मुख्य दशाव तार होतात.श्रीमद् भागवतांत २४  अवतारांचे वर्णन आहे. याशिवाय अनेक अवतार क्वचित प्रकट, क्वचित गुप्त असे झाले आणि होणार आहेत. भृगु वंशातील भार्गवराम परशु धारण करतो म्हणुन परशुराम म्हणुन ओळखल्या जातो. भृगुमुनींच्या वचनानुसार सत्यवतीचा हा नातू क्षत्रिय स्वभावाचा झाला, विधिपुर्वक ब्रम्हचर्याश्रम झाल्या वर याने वेदशास्राचा  अभ्यास करुन शंकराला प्रसन्न केल्यावर त्यांच्याकडुन  गदा, तलवार,परशु इत्यादी आयुधांचे धनुर्वेद शिक्षण घेतले.

              क्रमशः
     संकलन- मिनाक्षी देशमुख.

!!!   श्री दत्तात्रय   !!!

भाग  –  १९.

           अस्रे ही मंत्रासारखी असतात. त्यांच्या प्रयोगाने शास्रात अग्नी, वायु, पर्जन्य अस्रांच्या प्रयोगाने त्या महाभुतां ची शक्ती त्या त्या अस्रात संक्रमीत होते.  पुढे द्वापार युगात गंगामातेचा पुत्र भीष्म याला परशुरामाने विद्या शिकविली.परशुरामाने शस्र विद्या ग्रहण झाल्यावर शंकराच्या आज्ञेने पित्याच्या आश्रमात येऊन आई-वडिलां ची सेवा करुं लागला,रोज वनांत जाऊन  समिधा, फळं, फुलं आणुन सदैव पित्या च्या आज्ञेत असायचा. त्याचे चारही भाऊ पितृसेवेत तत्पर असे. मुलांच्या सहकार्याने जमदग्नी आपले अग्निहोत्रा चे व्रत उत्तमप्रकारे चालवत होते.

        नित्याप्रमाणे एकदा रेणुका स्नाना साठी नदीवर गेली असतां, गंधर्वाचा राजा चित्ररथ आपल्या अनेक स्रीयांसह उत्तान कामक्रीडा करीत असलेले रेणुकाला दिसलं. दैवाची विचित्र गती पहा कशी असते, आदर्श पतीव्रता म्हणुन जीची किर्ती त्रैलोक्यात होती, जिने स्वप्नातही परपुरुषाचे चिंतन केले नाही, जी आपल्या पातिव्रताने वस्रात भरुन आणलेले पाणी गळत,झिरपत नव्हते अशा  त्या सतीला परपुरुषाचा श्रृंगार भावला,त्या दृष्याने वस्रात भरलेले पाणी गळुन गेल्याबरोबर आपल्या पातिव्रतात न्युनता आल्याचे लक्षात आल्यावर अपराध बोध झाला. आपला सर्वज्ञ पती आपला आता त्याग करेल. नशिबाला बोल लावत भयभित थरथर कापत राजकन्या आश्रमात परतली.

       रेणुका घरासमोर येतांच, आपले ब्राम्हतेज गमावुन, पातिव्रताला उणेपणा धैर्यापासुन ढळलेली तिची मुद्रा पाहुन  सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. संतापुन रेणुकेचा धिक्कार करीत यापुढे  या घराचे दरवाजे बंद! जिथे तुला सौख्य  वाटेल  तिथे मौजमजा करायला तूं खुशाल जाऊ शकतेस. आपल्या पत्नि च्या पातिव्रत्यावरचा कलंक त्यांना पुर्ण पणे पुसुन टाकायचा असल्यामुळे, तिच्या कल्याणासाठी रागाचा अविर्भाव धारण केला होता.जमदग्नी अत्यंत विवेकी, शांत, स्थिरचित्त योगी होते. प्रसंगी  ते क्रोधावश भासत असले तरी क्रोध पुर्णपणे त्यांच्या ताब्यात होता. पतीचा क्रोध पाहुन ती पुतळ्यासारखी निश्चल उभी पाहुन ते ओरडले, तू जर आतां गेली नाहीस तर मी तुझा प्राण घेईन. तीने मनांत विचार केला, पती चरण सोडुन जाण्याचा दुसरा अपराध घडण्यापेक्षा त्यांच्या हाताने मरण आले तर पुढची दुर्गती तरी टळेल, या निश्चया ने उभ्या असलेल्या पत्नीला पुनः पुनः सांगुनही ती जात नाहीसे याहुन अत्यंत क्रोधयुक्त वाणीने मोठा मुलगा वसुमंता ला तिची मान कापण्याची आज्ञा केली. पण! वडिलांना काकुळतेने विणवणी करत, आईपरते दैवत नाही मी मातेची हत्या करुं शकत नाही हे ऐकल्याबरोबर जमदाग्नींनी मुलावर एक ज्वलंत कटाक्ष टाकल्याबरोबर तो जळुन राख झाला.

     दुसरा मुलगा वसुला आज्ञा केल्यावर  त्याचाही नकार दिल्यामुळे त्यालाही भस्मसात केले. त्यानंर विश्वावसु व सुषेण हेही त्यांच्या क्रौधाचे बळी ठरले. तेवढ्यात वनांत गेलेला लाडका राम समिधा घेऊम आल्यावर त्याला म्हणाले, तुझ्या आईने महान पातक केले, तरी परशुने तिची मान कापुन टाक! पित्याची आज्ञा ऐकुन क्षणाचाही विलंब न करतां परशुने आईची मान उडवली. जो आईची हत्या करतांना थोडा सुध्दा कचरला नाही, त्याने पुढे पृथ्वी निःक्षत्रिय केली तर काय आश्चर्य?

       त्याने कोणताही विकल्प मनांत न आणतां मात्रृप्रेम,पापपुण्याचा संभ्रम, शास्रवचन कशाचाही विचार न करतां तात्काळ पितृज्ञा पाळल्यामुळे प्रसन्न होऊन जमदाग्नी म्हणाले, तू त्रैलोक्यात  सर्वमान्य होशील! हवा तो “वर” मागुन घे! साक्षात शिवरुप पित्याला अभि  वादन करुन म्हणाला, बाबा! आधी माझी आई आणि चारही भावांना जिवंत करा! तसेच मी चिरंजीव व्हावे, मातृवधाची स्मृती नसावी, मी अजिंक्य होऊन सर्वत्र माझा विजय व्हावा. तथास्तु! म्हटल्याबरोबर त्याची आई व चारही भाऊ जिवंत झाल्यामुळे परशुरामाला अत्यंत आनंद झाला.

         क्रमशः
     संकलन- मिनाक्षी देशमुख.

भाग  –  २०.

!!!  श्री दत्तात्रय  !!!               

          कठोर मनाच्या परशुरामाचे आपल्या पित्याविषयी,त्यांच्या विवेक आणि अलौकीक तपःसामर्थ्यावर पुर्ण विश्वास होता. तसेच कांही कारण असल्याशिवाय आणि परिणामांची पुर्ण कल्पना असल्याशिवाय ते अशी आज्ञा करणार नाही ही त्याला पक्की खात्री होती. हाच त्याच्या भावांमधे व त्याच्यात महत्वाचा फरक होता. परशुराम विष्णुंंचा अवतार असल्यामुळे तो भावांसारखा संभ्रमित झाला नाही.

         रेणुकामाता सजीव झाल्यावर रामाने प्रेमादाराने तीचे पाय धरुन अश्रू ढाळु लागल्यावर तीने मायेने त्याला जवळ घेऊन म्हणाली, बाळा! कसलाही खेद करुं नकोस. हा माझ्यावर अनुग्रहच झाला आणि पातिव्रत्याची जोपासना करण्याचे उदाहरण समस्त जातीसमोर ठेवल्या गेले.

      आधुनिक मानसशास्राच्या सिध्दातां नुसार काम ( सेक्सुअल इमपल्स) आपल्या न कळत ( सब काॅशन्स माइंड मनांत कार्यशील असते. तो जागृत मनांत पोहोचेपर्यंत इतका बलवान होतो की, विवेक त्याच्यापुढे टिकत नाही.मोठ  मोठ्या विद्वांंनांचे शहाणपण त्याच्यापुढे मावळते. नैतिक उंचीवरुन खाली खेचतो,

        यानंतर रेणुकेने पतीचे धरुन आपल्याकडुन दुर्वासनेने घडलेल्या पर पुरुषाचा श्रृंगार पाहिलेल्या पापाचे शालन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तीने मधुर शब्दात स्तुती केल्याने,मन प्रसन्न झाल्याने जमदाग्नीचे पुर्वीपेक्षाही  रेणुकावरचे प्रेम वाढुन आनंदाने राहु लागले.दोघांचेही मनोमिलन झाले होते. अशा या शिव-पार्वतीस्वरुप असलेल्या  माता-पित्यांची सेवा साक्षात विष्णुरुप परशुराम निष्कामपणे करीत होते. आपल्या संपुर्ण ऐश्वर्यासहित अर्जुनाला दिलेला वर सिध्द करण्यासाठी पृथ्वीवर विप्रकुलामधे अवतरलेले नारायण होते.

       संदीपकाने आपले गुरु वेदधर्मांना विचारले, कार्तवीर्य अर्जुनाजवळ सर्व सिध्दी, शिवाय ब्राम्हण, मोठा दानशूर असुन अशा या राजाला गाय तीही एका ब्राम्हणाची कां चोरावीशी वाटली?कृपया शंका निरसन करावी…गुरु वेदधर्मा म्हणाले, त्याची बुध्दी वशिष्ठां च्या शापाने भ्रष्ट झाली होती. जो वडिलोपार्जित राज्य स्विकारायला तयार नव्हता, अशा निरिज्ञ,निरिच्छ,धर्म निष्ठ राजाने दैवाच्या प्रकोपामुळेच हे निंद्य कर्म त्याच्याकडुन घडले.या दैवाच्या फेर्‍यातुन ब्रम्हदेवासारखेही सुटले नाहीत. या दैवानेच चंद्राचा गुरु पत्नीशी संग करविला. देवराज इंद्राने कपटाने गौतमपत्नी अहिल्येशी रममाण झाला.या दैवानेच स्वतःची कन्या सरस्वतीचा मोह ब्रम्हदेवाला पडला, रावणा सारख्या विद्वान,ज्ञानी,पराक्रमी असुराला सीता पळविण्याची बुध्दी होऊन रामाकरवी नाश या दैवानेच केला, या दैवानेच दक्षप्रजापतीच्या यज्ञात सतीचा अधिक्षेप करणार्‍या पूषाचे दात पाडले,भगाचे डोळे फोडले, भृगुचे दाढीमिश्या उतरवल्या,दक्षाचा शिरच्छेद करवुन बोकड्याचे डोके लावले, नारदासारख्या देवर्षीलाही दैव एका ठीकाणी राहुं दिले नाही.

        दैव कितीही बलत्तर असले तरी ज्ञानाची हानी तो करुं शकत नाही. एकदा कार्तवीर्य आपल्या चतुरंग सैन्या सह शिकारीला गेला होता. परततांना जमदग्नीचा आश्रम दिसल्यामुळे निवडक दोन मित्रांसोबत पायीच आश्रमांत दाखल झाला.जमदग्नीच्या  तपश्चर्येने निर्वेर झालेल्या आश्रमातील वातावरण पाहुन त्याचा थकवा पार जाऊन एकदम प्रसन्नचित्त वाटुन साक्षात धर्मच इथे वावरतो असे वाटले.  जमदग्नी व पत्नी रेणुकामातेच्या दर्शना ने जणुंकाही गौरीशंकरच भेटल्याचा त्याला भास झाला. हर्षोतफुल्ल चित्ताने मुनींची वारंवार स्तुती केल्यावर त्रृषींनी अज तिथे जेवायला थांबण्याचा आग्रह केला.

         क्रमशः
   संकलन – मिनाक्षी देशमुख.

                         

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version