Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

 रूख्मिणी चरित्र भाग २, (६ ते १०)

RUKHMINI CHARITRA 2 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

RUKHMINI CHARITRA 2 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

!!!रूख्मिणी भाग-६!!!

                रुख्मिणी सुदेवकाकांच्या येण्याची आतुरतेने प्रतिक्षा करुं लागली. आचार्य सुदेव आल्याबरोबर त्यांना चरण स्पर्श केला. उठ मुली! अगऽ मध्यान्ही तिसरे प्रहरी श्रीकृष्ण  कौंडण्यपूर सीमेवर पोहचतील. काका, तुमचे उपकार कसे फेडू? अगऽ काका-पुतणीचे नाते जोडतेस.पुतणी म्हणजे दुसरी मुलगी असते. पित्याचे कसले ऋण? आतां प्रसन्न मनाने मनातल्या मनात श्रीकृष्णाचे स्वागत कर. धैर्याने उद्या अंबिका मातेच्या दर्शनाला जाऊन, मन घट्ट करुन श्रीकृष्णाच्या हातात हात दे.असे सांगून निघून गेले.

               रुख्मिणीच्या हातावर मेंहदी काढायला सख्या आल्या तोच एका दासीने शिलवंतीच्या कानात हळूच बातमी सांगीतल्याबरोबर आनंदविभोर होउन म्हणाली, कौंडण्यपूरच्पा सीमेवर निवडक लोकांनिशी रितीप्रमाणे अनेक उपहार घेऊन श्रीकृष्णाने तळ ठोकला. नगरातील सर्व नर, नारी त्यांना बघण्यासाठी तिकडे धाव घेत आहे. बातमी ऐकताच शिलवती  सोडून बाकीच्या सख्याही घाईघाईने निघून गेल्यात. थोड्या गुजगोष्टी, हास परिहास करुन शिलवतीही निघून गेली.

             एकांत मिळताच रुख्मिणी श्रीविष्णूच्या मूर्तीसमोर डोळे मिटून बसली. थोड्या वेळातच ती आजूबाजूचे भान विसरली. नजरेसमोर साक्षात पार्वती तपस्वीनीच्या वेषात समोर उभी राहिली. म्हणाली, अग! मी पार्वती, जगदंबा माझेच रुप! मी सुध्दा भगवान श्रीशंकराशी विवाह करण्यासाठी तुझ्या सारखाच ध्यास घेतला होता. माझ्याप्रमाणेच तुझेही मनोरथ पूर्ण होईल.तथास्तु म्हणून अंतर्धान पावली. डोळे उघडले तर विष्णूच्या जागी श्रीकृष्ण तिच्याकडे आश्वासक हसत बघत असल्याचा भास झाला. मन आतां निश्चिंत झाले. तरी सर्वांना सोडून जाण्याचा विरह कल्पनेने ती अस्वस्थ झाली. शिशूपालाशी विवाहाचा डाव उधळल्या गेल्यावर, पर्यायाने जरासंध दुखवल्या जाणार, म्हणजेच रुख्मी ही चवताळणार. याची परिणीति कोणत्या संकटात  होईल याची कल्पनाही करवल्या जात नव्हती. नकळत अश्रूंचा पूर वाहू लागला. विवाहाचा निख्खळ आनंद नशीबात नाही हेच खरे, स्वतःला नियतीवर सोपवून शांतपणे मंचकावर विसावली.जाग आली तिच मुळी पहाटेच्या मधूर वाद्यांच्या गजरानेच!

                थोड्याच वेळात हळद लावायला सख्या आल्यात. हे विधींचे उपचार करुन घेतांना  एकीकडे मन सुखावत होते, कारण श्रीकृष्णाचे वेशीवर आगमण झाले होते. तर दुसरीकडे या भूमीच्या, आपल्या मायेच्या माणसांच्या विरह कल्पनेने मनात कल्लोळ माजला होता. हळद लावून झाल्यावर मंगल स्नानाचा कार्यक्रम झाला. निलवर्णी महावस्र तिला नेसवण्यात आले.

रुख्मिणीला तो शुभ शकुनच वाटला.प्रकर्षाने श्रीकृष्णाची आठवण झाली. भोजने आटोपल्यावर, माता रुख्मिणीला म्हणाली, संध्याकाळी कुलदेवीच्या दर्शनाला जायची तयारी करायची आहे. आतां थोडा आराम कर!

               मध्यान्हानंतर रुख्मिणीला नखशीखांत सजवण्यात आले. देवदर्शन गमनाची पूर्ण सिध्दता झाली. हुरहुरत्या दाटल्या ह्रदयाने राजवाड्याच्या पायर्‍या उतरुन खाली आली. शेवटच्या पायरीला, या विदर्भभूमीला अखेरचा नमस्कार केला आणि त्वरेने डोळ्यातील अश्रू लपवून हळव्या मनाने रथाकडे वळली. मार्गावर दोन्ही बाजूंनी  लोकांची गर्दी होती. सीमा जसजशी जवळ येऊ लागली तसा रथाने वेग घेतला त्याच बरोबर तिच्या ह्रदयानेही.

             रुख्मिणी अंबिकामातेच्या मूर्तीसमोर उभी राहिली. विधिवत पुजेला आरंभ झाला. रुख्मिणीने डोळे मिटून मनोभावे देवीचे स्मरण करुं लागली त्याचवेळी मुरलीचे स्वर ऐकू आले. शेजारी कुणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव, भास झाला. राजपुरोहिताच्या आवाजाने तिची समाधी उतरली. तीर्थप्रसाद ग्रहण केला. पुन्हा देवीला वंदन केले. तात व मातेचे स्मरण केले.प्रदक्षिणा घालून मंदिराच्या महाद्वाराबाहेर सख्यांच्या घेर्‍यात बाहेर आली.

            पुढच्या घटना फारच वेगाने घडल्या. समोर चार शुभ्र अश्वांचा रथापुढे वर्षोनुवर्षै साठवलेली स्वप्नमूर्ती उभी होती. जणू साक्षात श्रीविष्णूच! काय घडले हे कळायच्या आत त्या नीलवर्णी हाताने तिला रथात ओढले. क्षणभर दृष्टादृष्ट झाली. जन्मजन्मांतरीची खूण ह्रदयाला पटली. रथाने वेग घेतला. रुख्मिणी खाली मान घालून आपल्याच विश्वात हरवलेली बसून राहिली. थोड्या वेळाने रथ थांबला. उध्वने तिला खाली उतरायला सांगीतले. श्रीकृष्ण, रुख्मिणी व उध्वव एका भव्य रथाकडे गेलेत. त्या रथाजवळ बलदंड व्यक्तीमत्व उभे होते. श्रीकृष्ण धावतच त्यांच्या कुशीत शिरले.

                     क्रमशः

  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.

                  दि.  ३-६-२०२२

7

!!!रूख्मिणी भाग-७!!!

               काय! झाले ना तुझ्या मनासारखे? इतके दिवस द्वारकावासियांना वाट पहायला लावून, शेवटी मिळाली द्वारकाधीशाला पट्टराणी! ते गालातल्या गालात मिस्किल हसत म्हणाले. रुख्मिणी लाजेने चूर होऊन त्यांना नमस्कार करण्यास खाली वाकली. तिच्या मस्तकावर हात ठेवत बलरामदादा म्हणाले, तूं त्रिखंडाची रांणी, तुला काय आशिर्वाद देणार मी? उध्ववनेही त्यांना वाकून नमस्कार केल्यावर आशिर्वाद देऊन म्हणाले, त्वरा करा. रथ वेगाने पुढे जाऊ द्या. कुणी शत्रु आला तर त्याला अडवण्यासाठी ससैन्य मी इथेच थांबतो. तिघेही रथारुढ होऊन गरुडध्वज वेगाने निघाला. रुख्मिणीही थोडी स्थिरावली. उध्ववजी तिला त्यांच्या कुलाविषयी, अठरा शाखां विषयी, कुलपुरुष, कुलदेवतांविषयी माहिती देत होते. श्रीकृष्ण जन्म, गोकुळ, वृंदावन मथुरा, बालपण, मथुरेत प्रवेश, कंसवध अशा अनेक प्रसंगाचे वर्णन करुन सांगत होते. मधे अवंती नगरीत असलेल्या सांदीपनींच्या अंकपाद आश्रमात जाऊन, उध्वव व रुख्मिणीने गुरु व गुरुमातेचे दर्शन घेतले. श्रीकृष्ण रथाजवळच थांबून त्यांना लवकर यायला सांगीतले.

             द्वारकेचे वेध सर्वानाच लागले होते. त्वरेने द्वारकेस जाण्यासाठी निघण्याची घाई सुरु झाली. रथ निघणार तोच  घोड्यांच्या टापांचा व विदर्भ युवराज रुख्मिच्या जयजयकाराचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि चारही बाजूने रथाला घेरले. रथात बसलेली रुख्मिणी भयभीत होऊन समोरचे दृष्य पाहत होती.  शिघ्रकोपी रुख्मी हाती गदा घेऊन गर्जना करत श्रीकृष्णाकडे येऊ लागला.

             बराच वेळ दोघांमधे गदायुध्द सुरु होते. रुख्मीची गदा वाकल्याने  खडःग् युध्द सुरु झाले. अखेर रुख्मीच्या खडगाचे दोन तुकडे झाल्यावर तो भयभीत झाला. श्रीकृष्ण त्याचेवर वार करणार तोच स्वयंप्रेरणेने  रुख्मिणीने त्यांचा हात वरचेवर धरुन म्हणाली, स्वामी, माझ्या भावाला जीवदान द्या. आपल्या या आनंद सोहळ्याला माझ्या माता-पित्यांच्या अश्रूंनी गालबोट नको लागायला. श्रीकृष्णाचा हात खाली आला. गर्विष्ठ रुख्मी आज पराजित होऊन परत जात होता. त्याचे हे रुप तिला पाहवत नव्हते. त्याने रुख्मिणीला घेतल्याशिवाय कौंडण्यपुरी परत येणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली असल्यामुळे तो आतां कुठे जाणार? या विचारात असतानाच, श्रीकृष्ण म्हणाले, रुख्मिणी, तुझा भाऊ आज पराजित  झाला असला तरी तो खरा क्षत्रिय असून पराक्रमी योध्दा आहे. तो लवकरच दुसरी राजधानी वसवून आपली सत्ता प्रस्थापित करेल. व्यक्तिच्या गुणांबरोबरच त्याच्यातील सद्गुण ओळखण्याची श्रीकृष्णाची दृष्टी तिच्या लक्षात आल्याने आनंद व कौतुक वाटले.

             उध्वव म्हणाला, वहिनी, श्रीकृष्णदादा विधिवत पदसिध्द राजा नसला तरी, तो जनमानसातील त्रिखंडाचा राजा आहे. पर्यायाने तूं महाराणी आहेस. आतां तिलाही द्वारकेचे वेध लागले होते. समुद्र, रत्नाकर, अर्णव, आरव अशा कितीतरी नावांनी ओळखल्या जाणार्‍या जलनीधी बद्दल आतांपर्यत तीने फक्त ऐकले होते, आतातर समुद्रातच असलेल्या सुवर्णनगरीत कायमचे राहायला मिळणार!

               एवढ्यात प्रचंड आवाज आला, कांहीतरी एकमेकां वर आपटल्याच्या आवाजाने एखादे नवे संकट आले की काय ही भिती तिच्या चेहर्‍यावर दिसल्याने, उध्ववजी म्हणाले, वहिनी काय झाले? हा एवढा प्रचंड आवाज कसला?दोघेही बंधू एकमेकांकडे बघून हसले. वहिनी, हा सागर लाटांचा आवाज आहे. याला दर्याची गाज म्हणतात. इथे हा आवाज रात्रंदिवस तुम्हाला साथ देणार आहे आणि आपण द्वारकेजवळ आल्याची ग्वाही देतोय! आपल्याला म्हणतोय, या लवकर, नव्या महाराणीचं पदक्षालण करण्यास आतुरलोय जणू असं तो सुचवतोय!

          थोड्या वेळाने सागर लाटांबरोबरच लोकांनी श्रीकृष्ण, उध्वव व बलरामदादांच्या नावाचा जयघोष ऐकू येऊ लागला. ज्या नगरीची कीर्ती त्रिखंडात दुमदुमत होती ती सुवर्णनगरी आता तिची झाली होती. “शुध्दाक्ष महाद्वार” डोळे दिपवणारे सोन्याने लखलखणारे सुवर्णद्वार बघून ती स्तिमितच झाली. तिथे प्रचंड जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी जमला होता. आतां ती केवळ श्रीकृष्णाची पत्नी किंवा उध्ववजींची वहिनी नव्हती तर यादवकुलाची नववधू होती. पृथ्वीवरच्या ह्रदय सम्राटाची सम्राज्ञी व विदर्भ राजाची राजकन्या होती. आणि दोन्हीही कुळांची कीर्ती वृध्दींगत करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. जयघोषाने वातावरण  भरुन गेले होते. तिचा उर अभिमानाने भरुन आला.

                       क्रमशः

   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.

                   दि. ३-६-२०२२

8

!!!रूख्मिणी भाग-८!!!

            श्रीकृष्णाची राणी होण्याचे रुख्मिणीचे स्वप्न साकार झाल्यामुळे ती  तृप्त, समाधानी होती. नौकेत सजलेल्या आसनावर दोघेही बसले. ती सागराचे विशालरुप व सृष्टीसौंदर्य न्याहाळत असतांनाच नौका महाद्वाराजवळ पोहोचली. महाद्वारातच जलाने भरलेले सुवर्ण कलश घेऊन पांच सुहासिनी उभ्या होत्या.त्यांच्या मागे रेवतीताई, बलरामदादा व उध्ववभावोजी आधी लवकर जाऊन स्वागतासाठी हसतमुखाने उभे होते.त्यांच्या मागे दोन तपसावी आणि इतर जेष्ठ मंडळी ,व त्यांच्यामधे महाराज वसुदेव व देवकीमाता, रोहिणीमाता असाव्यात, अन्य सामंत मंडळी त्यांच्या मानाप्रमाणे उभी होती.

          महाद्वाराच्या पायर्‍या चढून वर आल्यावर रेवतीताईंनी दोघांना औक्षण केले.त्यावेळी गवाक्षातून पुष्पवृष्टी होत होती. मंगलवाद्यांच्या ध्वनीने सर्व परिसर मंगलमय झाला होता. श्रीकृष्णाने सर्वांचा परिचय करुन दिल्यावर रुख्मिणीने सर्वांचे पदस्पर्श करुन वंदन केले. देवकीमाता म्हणाल्या, तू आमची सून नसून मुलगीच आहेसे म्हटल्यावर तिला मातेची तिव्रतेने आठवण झाली व नकळत ती देवकीमातेच्या कुशीत शिरली. त्या रेवतीला म्हणाल्या, युवराज्ञी, ही दीर्घ प्रवासाने थकली असेल हीला विश्रामगृहात घेऊन जा. उद्या विवाहाचा मंगल विधी संपन्न होईल. विश्रामकक्षेतील मऊ शय्येवर असीम तृप्तीने ती निद्रादेवीच्या कुशीत कधी शिरली कळलेही नाही.

            दुसर्‍या दिवशी मंगल वाद्यांच्या मधूर स्वरांनी तीला जाग आली. आज त्यांचा थाटात विवाह संपन्न होणार होता. ते इथे पोहचण्याआधीच विवाहाची संपुर्ण सज्जता झाली होती. देशोदेशीचे सम्राट प्रतिनिधींसह अमुल्य उपहार घेऊन हजर झाले होते. संपूर्ण द्वारकानगरी गुढ्या तोरणे लावून सजली होती. सर्वांच्या आनंदाला नुसते उधान आले होते. ती विचारात मग्न असतांनाच कांही स्रीयांसह रेवती आल्या व म्हणाल्या, चल लवकर मुहूर्ताच्या वेळपर्यंत सार्‍या विधी उरकायच्या आहेत. मंगलविधी सुरु होते. सुवासिक जलाने सुस्नान झाल्या वर बहुमुल्य वस्रालकाराने सजल्यावर तिने स्वतःला आरशात बघीतल्यावर तिलाच ती वेगळी वाटत होती. आतां ती प्रत्यक्ष श्रीकृष्णाची स्वामिनी होती. कृष्ण कोणत्याही पदाचे अभिकारी नसून सुध्दा सर्वेसर्वा होते. तेच स्थान तिलाही जनमानसात व  राजकुलात निर्माण करायचे होते.

               सर्व विवाहविधी थाटात संपन्न झाले. सप्तपदीच्या प्रत्येक पावलागणिक ती मनाने पतीच्या मनाजवळ जात होती.

सातव्या पावलाने तर ती पूर्ण समर्पित झाली. विवाहविधीची सांगता झाल्यावर यादव कुळाची कुलदेवता इडादेवीच्या दर्शनाला सुंदर सजलेल्या गरुडध्वज रथात आसनस्थ होऊन वाजत गाजत सुवर्ण नगरीच्या मुख्य रस्त्यावरुन प्रजाजनांचे  ऊत्स्फुर्त जयजयकार आणि पुष्पवृष्टीच्या आनंदोत्सवात  रथ इडामातेच्या मंदिरात पोहोचला. तेथील सौंदर्यावर दृष्टी ठरत नव्हती, पण रुख्मिणीला ओढ लागली होती आदीमातेच्या दर्शनाची, डोळाभरुन पाहण्याची, मनोमन तिचे आशिर्वाद मागण्याची.

          पतीच्या मागोमाग गाभार्‍यात पाऊल टाकले आणि समोर आदीमाया अष्टभूजा इडादेवी उभी होती. त्या मूर्तीत तिला एकाचवेळी दोन रुपे दिसत होती. कधी इडामाता, तर कधी कौंडण्यपूरची अंबामाता..जणू सांगत होती आम्ही एकच असून, सदैव तुझ्या पाठीशी आहोत. नंतर कुलाचाराचे विधी पार पडले. रुख्मिणीने देवीची ओटी भरली. तीर्थप्रसाद ग्रहण करुन, आचार्यांना वंदन करुन गरुडध्वजरथ राजप्रासादाकडे धावू लागला.त्याच वेगात तिचे मनोरथही धावू लागले महाराणी पदांच्या कर्तव्याकडे.

           दोन महिने कसे निघून गेले कळलेही नाही. सार्‍या गोष्टी स्वप्नवत वायुवेगाने घडल्या. आज राणीद्वीपवर आल्यावर थोडा निवांत वेळ मिळाला. त्या भव्य रुख्मिणी प्रासादात होते फक्त ती आणि तिचे स्वामी. प्रारंभीचे दिवस फार सौख्यात जात होते. बालपणापासून ज्यांचा ध्यास ध्यानी मनी स्वप्नी घेतला होता त्यांचा मधूर सहवास घडत होता. घरातीलही सर्व जेष्ठ मंडळींची ती लाडकी बनली होती. वेळ मिळेल तसा दोघां मधे सुसंवाद होत होता. दोघेही एकरुप झाले होते.वेगळं अस्तित्व असं उरलच नव्हतं. दासदासी असून सुध्दा ती पतीचे प्रत्येक काम स्वतः तत्परतेने करीत असे. राजप्रासादातील सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवत असतांनाच राजकारणातल्या अनेक घटनांची, योजनांची माहिती करुन घेत होती. श्रीकृष्णाचा कटाक्ष असे की, राजस्रीयांनाही राज्यकारभाराची माहिती असायला हवी.कधी जर राजपुरुषांना राज्याबाहेर राहावे लागले आणि अचानक पेचप्रसंग  उद्भवला तर, राजस्रीयांनाही  तात्काळ निर्णय घेता यायला हवा. कधी कधी तिला वाटे महाराणी होणे एवढे सोपे नाही, पण  जगदंबेच्या कृपेने सारं ठीक होईल यावर तिचा अढळ विश्वासाने मन शांत होई!

                     क्रमशः

   संकलन  व © ®   मिनाक्षी देशमुख.

                दि. ३-६-२०२२

9

!!!रूख्मिणी भाग-९!!!

                बघता बघता वर्षाऋतु आला. नवीन महाराणीच्या पायगुणाने यावर्षी कृषीवलाला तृप्त करणार्‍या जलधारा बरसल्या. श्रीकृष्ण जन्माष्टमीला धुवाधार पाऊस असल्यामुळे या वर्षी रासक्रीडा होऊ शकली नाही त्यामुळे अश्विनी पोर्णिमेची उत्सुकतेने सारेच वाट पाहत होते. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे द्वारकाधीश नव्या महाराणीसह रासक्रीडा खेळणार होते.

         अखेर अश्विनी पोर्णिमेचा दिवस उजाडला. प्रासादात पहाटेपासूनच गडबड सुरु झाली. तिकडे द्वारकेच्या मुख्य द्वीपातही उत्सव मनावल्या जाणार होता. दोन्ही द्वीपांवर, राजमार्गावर, आपापल्या घरांसमोर सडा शिंपून सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. सर्वाच्याच उत्साहाला उधाण आले होते.  संधाकाळपासूनच रासक्रीडा स्थळावर सज्जता सुरु झाली होती. रासक्रीडा स्थळ द्वारकेच्या मुख्य द्वीपावर होते. रासक्रीडे साठी भूमी समतल करण्यात आली. एका बाजुला भलीमोठी चुल्हाणी तयार करुन प्रचंड कढया ठेवल्या होत्या. गोरसाच्या घागरी रित्या होत होत्या. रेवतीताई प्रत्येक विभागात नेऊन रुख्मीणीला बारकावे शिकवित होत्या.

            रासक्रीडास्थळ असंख्य दीपांनी व दुधाळ चंद्रप्रकाशा ने उजळून निघाले होते. सर्व स्री-पुरुष, युवक-युवतीनी पारंपारिक वस्र परीधान केले होते. श्रीकृष्णाचा रथ दिसल्याबरोबर त्यांच्या स्वागतार्थ जयजयकाराचा नाद झंकार गगनाला भिडला. सर्वांच्या अलोट प्रेमाने भारावून गेले.

               मुहूर्ताची घटका भरली व लहान थोर हा भेदभाव विसरुन सर्वजणं मनमोकळेपणाने उन्मत्त होऊन रासक्रीडा खेळू लागले. टीपर्‍या हाती घेऊन रुख्मिणी नुसतीच बघत उभी होती. तिला हा सारा अनुभव नवीन होता. कृष्ण भान हरपून नृत्य करीत होते. आणि रुख्मिणी त्यांचेकडे एकटक बघत होती. एवढ्यात तिला कुणी तरी त्या प्रवाहात ढकलले. नंतर मात्र ती तिची राहिलीच नाही.धुंद होऊन ती वेगळ्याच जगात शिरली. वाद्यांचा नादमय आवाज, टीपर्‍यांचे ठोके, घुंगराचा झंकार सारे एकदम ठप्प झाले. रुख्मिणी भानावर आली तसे सारेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. ती विचार करत होती व हातातील टिपर्‍याकडे पाहत, मी सुध्दा रास खेळले? कशी खेळले असेल? चुकले असेल का? तेवढ्यात छोटी सुभद्रा येऊन म्हणाली, अग वहिनी, किती छान रास खेळलीस  तूं तर म्हणत होती तुला रास खेळता येत नाही. कसे घडले हे अघटित? कुणी करवून घेतले? स्वामीच! दुसरं कोण असणार?

            रुख्मिणी द्वारकेत सासरी चांगलीच रुळली. चारही बाजूंनी प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघत होती. अनभिषिक्त द्वारकाधीशाच्या महारानीचे पद लाभले होते. ते पद सार्थ ठरवण्यासाठी अनेक भूमिका पार पाडाव्या लागत होत्या. नित्यकर्मे पार पाडण्यात सकाळ कधी उगवत होती व दिवस कधी मावळत होता हे कळतही नव्हते. या वाटचालीत तीला अपूर्व साथ होती तिच्या स्वामींची. ते पती तर होतेच त्याच बरोबर मार्गदर्शक व आधारस्तंभही होते. इथे तिचा प्रिय सखा होता सागर. गवाक्षातून किंवा सौंधातुन त्याची विविध रुपे बघण्यात घटका नी घटका निघून जात असे.

            एक दिवस तिला फारच अस्वस्थ वाटल्यामुळे ती मंचकावर पहुडली व सेविकेला रेवतीताईंना बोलवण्यास सांगीतले  व बेशुध्दीच्या गर्तेत गेली. डोळे उघडले तर मंचका भोवती राजस्रीया, रेवतीताई व राजवैद्य उभे होते. त्यांच्या मुखा वर चिंतेऐवजी आनंद दिसत होता. आश्चर्याने उठून बसताच वैद्य रेवतीताईंना म्हणाले, युवराज्ञी! देवींना नीट समजावून सांगा.ते निघून गेले. इतरही राजस्रीया अभिनंदन करुन हसत हसत निघून गेल्या. मात्र रुख्मिणीच्या मनातील प्रश्नचिन्ह तसेच होते. तिची प्रश्नार्थक मुद्रा बघून रेवतीताई म्हणाल्या, अग, अशी काय बघतेस? तूं माता होणार आहेस. क्षणभर तिला अर्थबोध झाला नाही आणि लक्षात आले तेव्हा लज्जेने त्यांच्या कुशीत शिरली.  पाठीवरुन मायेने हात फिरवत तिला सांगु लागल्या, यापुढे नऊ महिने कसे जपायचे? काय खायचे वगैरे समजावून सांगीतले. त्यावेळी तिला प्रकर्षाने तात- माताची आठवण येऊन डोळ्यात अश्रू आलेले बघून रेवतीताई म्हणाल्या, माहेरची आठवण आली ना? चल आपण मातांच्या आशिर्वाद घ्यायला जाऊ. कृष्णभाऊजी व त्यांच्या  थोरल्या बंधूंना अतिशय आनंद होईल बघ!  तिच्या नजरेसमोर स्वामी, दादा आणि उध्ववभाऊजी तिघांचीही प्रसन्न मूर्ती ऊभ्या राहिल्या. जणूं शांती,शक्ती, विरक्तीची तीन प्रतिके! हि तिन्ही रुपे तिला तिच्या स्वामीमधे एकवटलेली भासायची. नेहमी तिला श्रीविष्णू आणि स्वामींमधे विलक्षण साम्य वाटायचे.

                    क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि.  ३-६-२०२२

10

!!!रूख्मिणी भाग-१०!!!

               त्या दिवशी रुख्मिणी मंचकावर विश्रांती घेत स्वामींची आतुरतेने वाट बघत होती. तोच थोरले बाबा वसुदेव, देवकीमाता, रोहिणीमाता राणीद्वीपावर आलेत. देवकीमाता तिच्या मस्तकावर प्रेमाणे हात फिरविला असतां तिच्या डोळ्यात अश्रू पाहून त्या म्हणाल्या, चिंता करुं नकोस. तुझ्या तात-मातांना गुप्तपणे ही आनंदवार्ता कळवण्यात येईल. राज वैद्याच्या सुचनांचे योग्य पालन कर. कांही वेगळे वाटले तर त्वरेने रेवतीला कळव. तिच्याजवळ मनमोकळे करत जा.तिला भास झाला, जणूं त्यांच्या मुखातून माता शुध्दमतीच बोलतेय! त्या दिवशी स्वामी जरा विलंबानेच आले म्हणून जरा रागवल्याचे नाटक करत सागराकडे बघत राहिली. ते जवळ येऊन थट्टेने म्हणाले, महाराणी रागावल्यात? हेतुपुरस्परच उशीरा आलोय! या मोठ्या मंडळीसमोर आपल्याला या आनंदी क्षणाचा मुक्तपणे उपभोग घेता आला असतां का? तिचा राग क्षणात पळाला व लज्जेने चूर झाली.

             तीन महिने झाल्यावर, जवळच्या मोजक्या स्रीयांच्या उपस्थितीत त्रैयमासपुर्तीचा सोहळा पार पडला. षष्ठमास सरले तसं तिच्या देहाला जडत्व आले. गर्भही उदरात हालचाल करुं लागला. कसा असेल? माझ्यासारखा ताम्रवर्णी की, स्वामीं सारखा नीलवर्णी अशा विचारात कितीतरी वेळ मिघून जाई. कौंडण्यपूरची आठवण आली की, मन उदासून जाई.

            सातव्या महिन्यात डोहाळजेवणांना सुरुवात झाली. चांदण्यातील, नौकाविहारातील अशा अनेक प्रकारे डोहाळ जेवणे साजरी होत होती. रोज कुलदेवतांच्या दर्शनाला जाऊन आचार्याकडून वेद, रुचा, इतिहासातील थोर व्यक्तिंच्या जीवन कथा ऐकत असे. नऊ मास पूर्ण झाले. राजवैद्य लक्ष ठेवून होतेच.एका शुभ प्रहरी रेखाताईंना बोलावून कांही सूचना केल्यात. प्रासादात वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या. मुख्य राजद्वीपावर संदेश गेले.  दोन्ही माता आल्या. राजकुलाचे आचार्य गर्गमुनी मुहूर्ताची प्रतिक्षा करु लागले.

            अखेर तो क्षण आला. वेदनेच्या अत्युच्च जीवघेण्या कळांबरोबरच आनंदाचा क्षणही अवतरला. बाळाचा जन्म होताच रुख्मिणी विलक्षण सुखाच्या तृप्तीच्या ग्लानीत गेली. डोळे उघडले तेव्हा सुईनीने तलम वस्रात गुंडाळलेले, न्हाऊ माखू घातलेले ते राजस तान्हुले तिच्या जवळ दिल्यावर असिम मायेने बाळाला ह्रदयाशी धरले. बाळाकडे बघतांना तिला स्वामीं  च्या जन्माचा क्षण तिच्या मनाला स्पर्शून गेला. त्यांचा बंदी शाळेतील जन्म, रातोरात गोकुळात केलली पाठवणी, त्याच बरोबर देवकीमातेची आठवण झाली.कसं सहन केले असेल आधीच्या अपत्यांचा मृत्यु? आणि स्वामींचा विरह? मनात आले, या आनंदीक्षणी ह्या गोष्टी का आठवल्या? माझे बाळ थोडेच कुणी हिरावणार आहे?

‌               रेवतीताई आल्यावर स्वामी अजून कां आले  नाही याचा उलगडा झाला. अपत्य जन्मानंतर दहा दिवस रिध्दीचे पाळण्याची परंपरा असल्यामुळे यादवकुळातील पुरुष नव बालकाला पाहू शकत नाही. म्हणजे मलाही दहा दिवस स्वामींचे दर्शन होणार नाही तर? पांचवा दिवस उजाडला. त्या दिवशी नियतीदेवीची पुजा असते.त्याच दिवशी सटवाई शिशूचे भविष्य त्याच्या जीवनपाटीवर लिहिते. सर्व पुजाविधी आणि सोपस्कार परंपरेनुसार पार पडले. दिवसभर थोडी दगदग झाल्याने, वेत्रा सुईन म्हणाली, मी बाळाकडे बघते, तुम्ही निश्चिंतपणे विश्रांती घ्या .आज तिला कितीतरी दिवसांनी गाढ झोप  लागली.

अचानक पहाटे तिला भयानक स्वप्नाने दचकुन उठली. वेत्रा कक्षात दिसली नाही म्हणून वेत्रा… वेत्रा हाका मारल्या. धावत येऊन विचारले काय झाले महाराणी? कुठे गेली होतीस? बाळा ला दे माझेकडे. बाळ गाढ झोपलेला असल्यामुळे मी प्रातःर्विधीला कक्षाबाहेर गेले होते. देते लगेच आणून. तिला वेळ लागल्यामुळे ओरडुन बाळाला आणण्यास सांगीतले. त्या नंतर थोडा आरडाओरडा ऐकू आला. नक्कीच कांहीतरी अघटीत घडले होते. ती मंचकावरुन उठणार तोच स्वामी, रेवती ताई दादा येत कुणीतरी म्हणाले, बाळाचे अपहरण झाले. उकळते तेल कानात ओतल्याचा भास झाला व तिची शुध्द हरपली. शुध्दीवर आल्यावर मंचकाभोवती घरचे सारे लोक व राजवैद्य उभे असलेले दिसले. ती उठणार तोच देवकीमाता म्हणाल्या, बाळे उठण्याचे कष्ट नको घेऊस. चिंता करु नकोस. आपले महापराक्रमी यादव आपल्या बाळाला पाताळातून शोधून आणतील. शब्द ऐकुन रुख्मिणीच्या ह्रदयाचा बांध फुटला व त्यांच्या कुशीत शिरुन हमसुन हमसुन रडु लागली.

थोड्या वेळाने गर्जना करत बलरामदादा म्हणाले, कोणाचे एवढे धाडस झाले? कोणाचे दिवस भरले? बाळाला कुठेही नेले असले तरी मी नक्की शोधून काढीन, तूं धीर धर! दादांच्या आश्वासनाने तिला धीर आला.

                          क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ३-६-२०२२

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version