Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

 29. पेशवाई संपुर्ण भाग १, (१ ते ५)

PESHWAI BHAG 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

PESHWAI BHAG 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! पेशवाई  !!!

!!  प्रस्तावना  !!

               नमस्कार !!

    आतांपर्यंत आपल्यासमोर रामायण,महाभारतातील व्यक्तीरेखा संतचरित्रे,ऐतिहासिक व्यक्तीरेखा आणि इतरही चरित्रे सादर केलेत.आणि आपण सर्वांनी उत्स्फुर्तपणे मला प्रोत्साहित केल्याने एक प्रकारची उर्जा मिळत गेली आणि मी लिहित गेले.

       आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे “पेशवाई”! पेशवाई म्हटले की, थोरले बाजीराव,नानासाहेब,थोरले माधवराव यांची शौर्यपुर्ण धडाडीची कारकिर्द डोळ्यासमोर उभी राहते. मी यांत पेशवाईच्या आरंभापासुन अंतापर्यंत चा आराखडा घ्यायचा प्रयत्न केला आहे.

इतिहास म्हटले की,मतेमतांतरी आलीच. तरी मी शक्य तेवढे जास्तीस जास्त इतिहासाशी प्रामाणिक राहुन लिहिण्या चा प्रयत्न केला आहे.

        नेहमीप्रमाणे आपल्या क्रीया प्रति क्रीया अपेक्षित!

         वास्तविक पेशवाईची खरी सुरुवात झाली शाहूमहारांजापासुन. शिवाजी महाराजांच्या वेळीही पेशवेपद होते.नंतर राजाराम महाराजांनी निळकंठ पिंगळेंना पेशवाई बहाल केली होती आणि ही परंपरा शेवटच्या दुसर्या बाजीराव पेशव्यांपर्यत सुरु राहिली. इतिहासाने या भारतभूमीला अनेक राजा महाराजांच्या वंशावळी दिल्या.पुलुमायी, शालीवाहन,द्रविड,चालुक्य,मौर्य,यादव राजे,होयसळ आणि बहामणी!पुढे याच बहामणी राजसत्तेतून आदिलशाही,कुतुब शाही,इमादशाही आणि बारीदशाही जन्माला आली.पुढे या शाह्यांनी मृत्युचा नंगा नाच सुरु केला.विजयनगरचं साम्राज्य खालसा करुन मराठी मातीला रक्ताचा अभिषेक घातला.यात कमी होती म्हणुन की काय,आणखी एक वादळी राजसत्ता या भारतभूमीवर उदयास आली.मोगल राजसत्ता!यवनी राजसत्ता!

        ही यवनी राजसत्ता बहामनी राज सत्तेपेक्षा हजारो पटींनी अत्यंत क्रूर आणि घातक होती.या वादळाला टक्कर देण्यासाठी बहामणीच्या राजसत्तेतील शाह्या एकत्र येऊन मराठ्यांना ढाल बनवुन बदल्यात वतने,जहागिर्या,धन दौलत मिळाली.व या दौलतीच्या जोरावर मराठ्यांची कर्तबगार सैन्याची जबरदस्त फळी उभी राहिली.आणि याच वंशावळीतुन जन्माला आले एक झंजावती वादळ…शिवाजी राजे!श्रीमंत मराठा! जाणता राजा!

        या राजाने शून्यातुन साम्राज्य निर्माण केलं आणि सुरु झालं एक झंझावती रणसंग्राम!याच राज्याच्या पोटी जन्म झाला संभाजीराजाचा!जणूं तळपती तलवार,आसमंतात सळसळणा री वीजच!औरंगजेब बादशहाशी तब्बल आठ वर्षे झुंज देत असतांना स्वकीयाच्या फितूरीने,गद्दारीने हा जखमी वाघ व कवि कलश औरंगजेबच्या तावडीत सांपडले. आणि त्याने अतिशय क्रूरपणे हालहाल करुन त्यांचा वध केला.

        पुढे रामराजांची कारकिर्द सुरु झाली.त्यावेळच्या परिस्थितीनुसार,वतने इनामदार्या,जहागिर्या वाटुन आपल्या कडे वळवले.याचवेळी निळकंठ पिंगळें ना पेशवाई दिली आणि इथुनच पेशवाई  ची सुरुवात झाली.नंतर शाहू महाराजांचे बस्तान बसविण्यांत बाळाजी विश्वनाथां नी खुपच मेहनत,त्यांची कार्यतत्परता, शौर्य हे गुण हेरुन ते प्रथम पेशवे नियुक्त झाले.त्यांना चार अपत्यें…बाजीराव, चिमाजीआप्पा,भिऊबाई आणि अनुबाई!

 बाजीराव! धाडसी कर्तृत्वाचाl धगधगता अविष्कार!नंतर त्यांचे पुत्र नानासाहेब, रघुनाथराव आणि नानासाहेबांचे पुत्र.. माधवराव,नारायणराव आणि कांही काळ रघुनाथराव,सवाई माधवराव, रघुनाथरावांचे दत्तक पुत्र अमृतराव,अल्प काळ,चिमणराव आणि शेवटचा पेशवा ज्यांना पळपुटा किंवा पेशवाई बुडवली म्हणतात,पण वास्तविक विपरीत परिस्थितित सगळे स्वार्थी,फितूर,पैशाची कमतरता असे असुनही त्यांनी अखेर पर्यंत स्वराज्य व पेशवेपद वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला ते शेवटचे दुसरे बाजीराव!इथेच पेशवाईचा अंत झाला.

              क्रमशः
       मिनाक्षी देशमुख.
        दि. २४-६-२०२१.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १.

“आकाशगंगेतुन शब्द निनादू लागले.

“हरीः ॐ! हरि ॐ!! हरि ॐ!!!”

          हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून गेले.पुढे इतिहासात भारतभूमीला अनेक राजा महाराजांच्या वंशावळी आल्यात.त्यात पुलयामी,शालिवाहन,द्रविड,चालुक्य, मौर्य,यादवराजे,होयसळ आणि बहामणी राजसत्ता निर्माण झाली.पुढे याच बहामणी राजसत्तेतून आदिलशाही, कुतुबशाही,इमादशाही,बारिदशाहींचा उगम झाला.पुढे यांनी मृत्युचा नंगानाच सुरु केला.विजयनगरच साम्राज्य खालसा करुन लोकांच्या कत्तली, अश्वा च्या पायाखाली तुडवुन मराठी मातीला रक्ताचा अभिषेक घातला.धरित्रीही हवाल दिल झाली. यातच कमी होती म्हणून की काय,एक मोगली यवनी सत्ता उदयास आली.

         संपूर्ण भारतभूमी  यवनी अख्त्यारीत आणण्यासाठी मोगलांनी अत्यंत क्रूर अन्याय,अत्याचार,जुलुम करायला सुरुवात केली.या भिषण वादळाला टक्कर देण्यासाठी शिवाजी महाराजांचा अवतार झाला.सुरुवातीला शिवाजींनी बालसवंगड्यांना हाताशी धरुन तोरणा किल्ला हस्तगत केला आणि स्वातंत्र्याचे बाशिंग बांधले.वयात आल्यावर क्रूरअफझलखानाच्या पोटातील कोथळा बाहेर काढला.सिद्दी जौहरसारख्या बलाढ्य घातकी सेनापती च्या डोळ्यांत धुळ फेकून पन्हाळगड वरुन विशाळगडी पोहोचले.औरंगजेब च्या कैदेतुन मिठाईच्या पेटार्यातुन निसटले.

          शून्यातून स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या पाठी अनेकांचे हात व आशिर्वाद होते.जिजाबाईंनी साहसाचं,संघर्षाचं,धाडसाचं बीज त्यांच्या मनी रुजवलं.शहाजीराजेंनी अप्रत्यक्षपणे संस्काराचं सिंचन केले. दादोजी कोंडदेवांनी गुरुस्थानी होऊन राजकारणांतील,आखाड्यातील सर्व प्रकारचे डावपेच शिकवले आणि सुरु झाला एक झंझावती रणसंग्राम!मराठ्यां नी,मावळ्यांनी,ब्राम्हणांनी नंगानाच करणार्या नराधामांच्या रक्तानं आपल्या तलवारी न्हाऊन अखंड हिंदवी स्वराज्या ची मुहूर्तमेढ रोवली.यामागे प्रेरणा,साहस धाडस होते फक्त शिवाजी महाराजांची!

       याच छत्रपती शिवाजींच्या पोटी सुंदर फुल उमललं… संभाजी राजे! औरंगजेबाच्या तब्बल पांच लाख सैनिकां शी सलग आठ वर्षे झुंज देणारा महानायक!या आठ वर्षात त्याला मराठी मातीचा तुकडाही मिळूं दिला नाही.परंतु एके दिवशी घात झाला.आपल्याच स्वकियाने गद्दारी केली आणि या ढाण्या वाघाला व कवि कलशला जेरबंद केलं.

        मरणयातनांची ती कैद!डोळे काढले,जीभ काढली,बकर्यासारखी चामडी सोलली.संभाजी राजेंना स्वतःच्याच रक्ताचा महाअभिषेक घडूं लागला.रक्ताच्या चिळकांड्या भीमेच्या पात्रात उडू लागल्या.शेवटचा वार त्यांच्या मानेवर घातला.शिर धडावेगळे झाले.ती भयान रात्र होती ३मार्च १६८९ ची!

          रायगडावर राजांच्या क्रूर वधाची बातमी येऊन धडकली.त्यांची पत्नी येसू बाईंने आपले आभाळाएवढे दुःख मनात जिरवून चिंता केली ती मराठी मातीची, स्वराज्याची.राजारामांना शपथ देऊन अनेक मने एकत्रीत केली.प्रल्हाद,निराजी खंडोबल्लाळ,धनाजी जाधव,संताजी घोरपडे सारखी माणसे जवळ केली आणि सुरु झाला महासंग्राम!औरंगजेबचे मोगली सैन्य चळाचळा कापूं लागली.पण या आणिबाणीच्या काळांत राजारामाचं आसन मात्र स्थिर नव्हतं.शेवटी सर्वाच्या मतानुसार जिंजीचा किल्ला,यालाच चंदीचा किल्ला म्हणुनही ओळखल्या जात होते.त्या अभेद्य किल्ल्यात राहुन तिथून राज्यकारभार पाहूं लागले.

         इकडे औरंगजेबाने इतिकदखान, कुठे कुठे मुकर्रबखान म्हणूनही उल्लेख आहे

रायगडाशी टक्कर द्यायला पाठवले,पण रायगड एक इंचही हलत नाहीसे पाहुन घरभेदी,गद्दार सुर्याजी पिसाळाच्या सहाय्याने रायगडाचा पडाव केला.आणि राणी येसूबाई व बाळराजे शिवाजींना कैद करुन औरंगजेबकडे घेऊन आला.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. २५-६-२०२१.

!!!  पेशवाई  !!!

भाग – २.

       मराठी मातीची इभ्रतच चालत आलेली पाहुन क्रूर पातशहा खुश होऊन इतिकदखान  (मुकर्रबखान)ला झुल्फिकार ही पदवी देऊन म्हणाला, कांहीही करुन राजारामास कैद करुन आण.यावेळी राजाराम जिंजीच्या(चंदी) किल्ल्यात होते.खानाने प्रचंड सैन्यानिशी किल्ल्याला वेढा घातला.राजाराम जिंजी च्या किल्ल्यात तब्बल सात वर्षे अडकुन पडले.खानांच्या सैन्यात गणोजी शिर्के सरदार होता.शिर्के घराण्याने फितूरी केली म्हणून संभाजीराजेंनी शिर्के घराण्याची कत्तल केली होती.त्यामुळे शिर्के व भोसले घराण्यांत हाडवैर झाले होते.परंतु खंडो बल्लाळ चिटणीसांनी आपले बुध्दीचातुर्य वापरुन त्याच्या मागणीनुसार स्वतःचे थोरल्या महाराजां नी त्यांना दिलेले दाभोळचे वतन देऊ केल्यावर राणोजी शिर्केच्या मदतीने राजारामांची सात वर्षानंतर सुटका झाली

        छ.राजाराम महाराष्र्टात आल्यावर त्यांनी सातारा राजधानी बनवली. गैर समजाने संताजीचा खून झाल्यामुळे धनाजी जाधवला सेनापतीपद दिले.या आठ वर्षात ज्यांनी उत्तम कामगिरी केली त्यांना जहागिर्या,वतने,इनामे,बक्षिसे देऊन सन्मानित केले. १७०० मधे मोहिम  संपवुन येत असतांना राजारामांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना सिंहगडी आणण्यांत आले.नवज्वर होऊन त्यातच सिंहगडी राजारामांचा अंत झाला.आतां स्वराज्याची धुरा कुणाकडे सोपवावी?हे वादळ कोण खांद्यावर घेणार?

       एका ब्राम्हणवाड्यात वेदमंत्र घुमत होता.

“हरिः ॐ सहस्रशीर्षापुरुषः सहस्राक्ष सहस्रापात्! यज्ञेन यज्ञमय जनात देवाः तानिधर्माणि प्रथमान्यासन्! तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः!सन्ति देवाः! ॐ शांती! शांतीः!! शांतीः!!!

    हा वाडा होता सासवडमधल्या पेशव्यांचा श्रीमंत बाळाजी विश्वनाथांचा!

हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करणारा पहिला धाडसी पेशवा योध्दा.पत्नी राधाबाई! संसारवेलीवर उमलेली चार गोजिरीफुलं. बाजीराव,चिमाजीआप्पा,भिऊबाई, व अनुबाई. बाजीराव म्हणजे धाडसी कर्तुत्वाचा धगधगता,रक्तरंजित स्वराज्या ची मशाल तेवती ठेवणारा महानायक!

अटकेपार झेंडा फडकवणारे बाजीराव त्यावेळी केवळ १७-१८ वर्षाचे होते. दुसरा पुत्र चिमाजीआप्पा!यांचेही कर्तुत्व कमी नव्हते.तिसरे अपत्य भिऊबाई.यांचा विवाह आबुजी नाईक बारामतीकर जोशींशी लावून दिला.चौथी कन्या अनु बाई अवघ्या सहाव्यावर्षी इचलकरंजी घराण्यांतील व्यंकटराव नारायणराव घोरपडेंशी विवाह करुन दिला.

         बाळाजींची पुजा आटोपली, तेवढ्यात काकरव ऐकु आल्याने त्यांनी पत्नी राधाबाईंना आवाज दिला.राधाबाई म्हणजे एक निखळ व्यक्तीमत्व!बाळाजीं च्या पाठी सह्यांद्रीसारख्या सुखदुःखात, बाळाजी हताश झाले तेव्हा त्यांना साथ देऊन मार्गस्थ केलं होतं.आणि आज  पेशवाईची वस्रे मिळाली.राधाबाईंना आपल्या पतीच्या कर्तुत्वाचा सार्थ अभिमानन,कौतुक होते.आणि दोघेही भूतकाळात हरवून गेले.बाळाजी पेशव्यां नी गतकाळाची पानं उलगडत त्यांना सांगायला सुरुवात केली…

        राधा सुरुवातीचा काळ तुम्हाला आठवतो?आमचे आजोबा परशुराम व पिताश्री विश्वनाथ दोघेही,झंझावती वादळ,मराठी मातीला स्वराज्याची माळ अर्पण करणार्या महान तपस्वी छत्रपती शिवाजी महाराजाच्या चाकरीत होते.तेच पिताश्रींचे दैवत!या दैवतासाठी प्राणार्पण करण्याचीही त्यांची तयारी!

          पिताश्रींचा कोकणात मोठा वाडा!  मोठी आसामी म्हणून फार नांव लौकिक होता.या वाड्याच्या मागच्या परसदारांत छान बाग होती.सुपारी,फणस,नाराळाची झाडं होती.त्या बागेत आम्ही तिघे भाऊ जानोजी,विठ्ठल आणि आम्ही मनसोक्त धिंगाणा घालायचो,पण पिताजी नसतील तेव्हाच!ते अतिशय कडक स्वभावाचे! पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर त्यांची जास्त भिस्त होती.त्यावेळी श्रीवर्धनवर हबशांचा अंमल होता.हबशे व शिंदे हे मराठी मातीचं न सुटणारं काळ ग्रहणच होतं!

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – ३.

         पुढे वडील बंधू जानोजीराव  श्रीवर्धनला वडिलोपार्जित कामं पाहू लागलले.धाकटे बंधू विठ्ठल महाडला कारखानीस झाले.आणि आम्ही मिठबंदरचा हवाला आणि चिपळूनच्या जकातीचे नाके घेऊन चिपळूनलाच घर घेतले.एके दिवशी मिठबंदरवरच्या मिठाच्या उत्पन्नात कुठेतरी हिशोब चुकला.शिद्दीचे पैसे चुकते झाले नाही म्हणून त्याने तगादा लावला.शेवटी आमचा जिवलग संभाजीपंत मोकाशी जामीन राहिला.तोही वेळेवर पैशाचा भरणा करुं न शकल्याने,या हरामखोर शिद्द्याने इतरांवर दहशत बसावी म्हणून संभाजीपंत मोकाशींना गोण्यात बांधून समुद्रात जलसमाधी दिली.

          आम्ही जिवाच्या भितीने वेळास गांवी जाऊन तिथे असलेले आमचे जिवलग हरि,बाळाजी,रामजी नातूच्या सहाय्याने तिवरा घाटाने देशावर यायला निघालो असतां,हबश्यांच्या सैनिकांनी आम्हाला पकडून अंजनवेलीच्या किल्ल्यात २५ दिवस कैदेत ठेवले.शेवटी नातू कुटुंबाने अंजनवेलीच्या किल्लेदारा ला लाच देऊन आमची सुटका केली.

       त्या नीच हबश्यांनी क्रोधापाई १६७८ ला आमची देशमुखी जप्त केल्या मुळे डोक्यावरचे छप्पर गेले.माधुकरी मागण्याची वेळ आली.अनाथासारखं हिंडत,दाभोळ,चिपळूनला कांही काळ आश्रय घेतला.शेवटी घाटावर सासवडला अंबाजी पुरंदरे या सद्गृहस्थाच्या आश्रया ला आलो.ते सासवडची देशमुखी आणि कुळकर्णी साभाळत.त्यांचं आणि शाहू महाराजांचं चांगलं सख्य होतं.ते म्हणाले, बाळाजी चिंता नका करु.इथे आलात ना, सर्व ठीक होईल.आणि त्यांनी आम्हाला सातार्याला महादजी कृष्ण जोशींकडे पाठवले.त्यांना आम्ही कश्या कश्या संकटांना सामोरी गेलो हे कथन केल्या वर त्यांनाही अतिशय वाईट वाटले.

          महादजी जोशींनी बाळाजींना शंकरजी नारायणपंत सचिवांकडे नेले. राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात असतांना,त्यावेळी स्वराज्याचं संरक्षण या पंतसचिवांनीच केलं होतं.बाळाजी विश्वनाथ भटाची ओळख करुन देत जोशी म्हणाले, हा चांगला इनामदार, कष्टाळू आहे.या हिर्याला पैलू पाडा. स्वराज्याचं चांगलं नांव काढेल.

        राजारामांच्या मृत्युनंतर ताराबाई राज्याचा कारभार हाकू लागल्या.तारा बाईच्या गोटात शंकरजी नारायण सचिव म्हणून काम बघत होते.सचिवाकडे काम करत असलेल्या बाळाजीचे काम पाहून एक दिवस धनाजींनी त्यांना मागून घेतले धनाजी जाधव म्हणजे स्वराज्यातील झंझावती वादळ!धनाजी आणि संताजी या इतिहासप्रसिध्द जोडीने मोगल सैन्यांना जेरीस आणले होते.आतां बाळाजी विश्वनाथ भट, शंभूसिंग जाधवांचा पुत्र धनाजींच्या गटात सूर्य ओंजळीत घेऊन दाखल झाल्यावर, बाळाजींवर वसूलीचा कारभार सोपवला याच काळात बाळाजी आणि ताराबाईची ओळख झाली.ताराबाईंच्या हुकमी स्वभावाकडे कांही काळ दुर्लक्ष करुन रणांगणातील सगळे डावपेच शिकून घेतले.लहान मोठ्या लढायाही केल्यात. बाळाजींची हुशारी पाहुन १६९९ मधे बाळाजींना पूणे प्रांताची सूभेदारी मिळाली.बाळाजींच्या आयुष्यातील ही सूभेदारी पहिली दरवळे!पुढे १७०७ मधे दौलताबादची सूभेदारी सोपवली.

          तरुणांच्या नसानसात स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे व उत्साहाची झळाळी आणणारे ब्रम्हेंद्रस्वामींनी निरिक्षण केलं. राजक्रांती जोर धरुं पाहत होती.यवनां च्या तलवारी स्वराज्यांत रक्त सांडवत होते.आपापसातील मतभेदांना उत आला होता.ब्रम्हेंद्रस्वामी कोकणात पेठे गांवी आले असतां इथेच त्यांची व बाळाजीची ओळख झाली होती.ते म्हणाले,

          बाळाजी,संभाजीराजे नुसतां धगधगता निखारा!परंतु तो निखारा औरंगजेबाने विझवुन टाकला.रायगडा वरची लक्ष्मी येसूबाई व संभाजीपुत्र लहानग्या शिवाजीस  त्याने कैद केले. त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा.

          रावणाने सीतेला पळवून जी चूक केली तीच चूक औरंगजेबाने केली. रायगडच नव्हे तर स्वराज्याची महालक्ष्मी औरंगजेबाने कैद केली.परंतु ब्रम्हेंद्रस्वामीं च्या इच्छेनुसार येसूबाईना आणि बाळ राजेंना सोडवणे कितपत शक्य आहे?कसं सोडवावं?औरंगजेब म्हणजे काळसर्प.केव्हा फणा उगारेल सांगता यायचं नाही.त्याच्या तावडीतून सोडवणं सोपी गोष्ट नव्हती.

             क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख

!!!  पेशवाई  !!!

भाग – ४.

        त्यावेळी औरंगजेबाची छावणी भीमेकाठी होती.१५-१६ वर्षाचे बाळ शिवाजी छावणीमधे संचित मुद्रेने एकटेच  बसले असतां,वेशांतर केलेले बाळाजी त्यांच्या छावणीत दाखल झाले तेव्हा त्यांना दिसले,तळपणारं तेज,हुबेहुब संभाजीराजेंची वादळी भावमुद्रा त्यांच्या चेहर्यावर दिसत होती,परंतु जेरबंद वादळाला भरारी मारण्याची मुभा नसते.

बाळाजींनी आंत येऊन त्यांना मानाचा मुजरा करीत म्हणाले,मराठी मातीचा मुजरा घ्यावा राजे!बाळाजींनी स्वतःची ओळख सांगुन ब्रम्हेंद्रस्वामींचा विचार ऐकवला.राजांना आनंद झाला पण क्षणभरच!त्यांच्या चेहर्यावर आलेली उदासी पाहुन  बाळाजी म्हणाले,राजे! चिंता करुं नका.स्वराज्याचा कण नी कण आपल्यासाठी तळमळतो आहे.खुद्द आपले चुलते राजाराम महाराजही धडपड करीत आहे.थोड्याच दिवसांत आपल्या सुटकेचे प्रयत्न होतील.

          तेवढ्यांत झेबुन्निसा बेगम पालात

प्रवेश करीत असतांना त्यांनी ओझरते बोलणे ऐकलेले पाहुन बाळाजींचा उतरले ला पाहून राजे म्हणाले,बाळाजी काळजी नका करु,यांचा आमच्यावर खुप जीव आहे.धीर येऊन बाळाजीं बेगमला मुजरा करीत म्हणाले,दीदीजी,ही स्वराज्याची दिव्य ज्योत वादळांत वीझू देऊं नका! राजेंची अजिबात चिंता करुं नका.हे आमच्याही काळजाचा  तुकडा बनले आहे.आज पर्यंत यांना आम्ही शत्रूचं पोर म्हणुन  कधीच बघीतलं नाही.निश्चिंत असावं.

फक्त एकच करा गडबड करुं नका.यावर काळ हेच औषध आहे.बाळाजी बाळराजेंना हात जोडत म्हणाले, राजे! सांभाळून रहा.आईसाहेबांची काळजी घ्या.बाळाजींचा गहिवरलेला स्वर ऐकून  राजेंनी त्यांचा खांदा थोपटत म्हणाले, वादळाला दिशा नसते.पण कुठे तरी किनारा गवसेलच.यदाकदाचित आम्हाला राज्यस्थापनेचा योग आलाच तर आपणास विसरणार नाही हे वचन आहे आमचे!

           औरंगजेबने मात्र मराठी मातीची आब राखली.राजे कैदेत असुनही त्यांना कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही.कैदेत असतांना उध्दव चक्रदेव आणि ज्योत्याजी केसकरांनी राजेंना सर्व प्रकारच्या शिक्षण कलेत तरबेज केले.ओरंगजेबने राजेंची लग्नेही थाटामाटात करुन दिली. सावित्रीबाई,सकवारबाई,सगुणाबाई आणि विरुबाई(दासी) शिवाय पांच परगाणे जहागिरीही दिली.यवढं सर्व असूनही बाळराजे शिवाजींची मराठी मातीची ओढ कमी नाही झाली.

        राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर हळूहळू स्वराज्याला उतरती कळा लागली.औरंगजेबाने १७०५ पर्यंत एका पाठोपाठ एक पन्हाळा,वर्धनगड, चंदनवान,खेळणा,सिंहगड,राजगड, तोरणा आणि इतर स्वराज्यातील किल्ले जिंकले.परंतु औरंगजेब विजापूरकडे वळताच,मराठ्यांनी धाडी टाकून पंत सचिवांनी सिंहगड,तोरणा,राजगड जिंकले.परशुराम त्रिंबकांनी सातारा, वसंतगड आणि चंद्रकांतनी पन्हाळा पावनगड घेतला.औरंगजेबाची सगळी खटाटोप व्यर्थ गेली.मुगल सैन्यांना मराठ्यांनी अक्षरशः झोडपून काढले. मुगल सम्राजाचा र्हास स्पष्टपणे दिसूं लागला.हा घाव औरंगजेबला सोसवला नाही.जिद्दीचा बुरुज कोसळला.खचलेला औरंगजेब २१ फेब्रुवारी १७०७ ला निराशेत मृत्यु पावला.एक भयानक वादळ संपले.स्वराज्याने दीर्घ श्वास टाकला.

         औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा आजमशहाने मराठ्यांत दुफळी निर्माण करण्याच्या दृष्टीने,शाहूंना प्यादी बनवुन मराठ्यांचा बिमोड करण्याचा डाव आखला.त्याप्रमाणे मोगलांचं मांडलिकत्व देऊन स्वराज्यात पाठवण्या च्या त्याच्या विचाराला शाहूंनी मान्यता दिली.सतरा वर्षाच्या कैदेनंतर शाहूराजें ना स्वराज्यात बर्हाणपुरच्यापुढे सोडण्यात आले.सतरा वर्षाच्या वनवासा नंतर शाहूमहाराजांनी आपल्या मराठी मातीत स्वातंत्र्याचा श्वास घेतला.

           परंतु इकडे?इकडे मराठी मातीत वेगळाच डाव रंगला.

        राजारामाच्या मृत्युसमयी ताराबाईं  ना झालेला पुत्र शिवाजीचे वय केवळ १०  वर्षाचे होते.शंकरजी नारायण पंतसचिव, धनाजी जाधव,अमात्य रामचंद्र,बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मदतीने बाळ शिवाजीस गादीवर बसवले.आणि सवत राजसबाईला व त्यांचा पुत्र संभाजीला कैदेत टाकले.परशुराम त्रिंबकांना प्रतिनिधीपद देऊन किल्ल्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – ५.

        ताराबाईच्या हुकुमानुसार धनाजी, भोसले,निंबाळकर,दाभाडे,चव्हाण व इतरांनी मोगल  साम्राज्यात धुमाकुळ घालुन चौथाई,सरदेशमुखी व दाणागोट्यां च्या नांवाखाली लूट आरंभली होती.

           इकडे शाहू महाराजांनी आम्ही संभाजीपूत्र शाहूराजे,वडीलपुत्र या नात्याने राजगादीचा अधिकार बहाल करावा.अशा आशयाचा लखोटा पाठविला.एवढ्या कष्टाने उभ्या केलेल्या ऐश्वर्यावर पाणी फिरेल म्हणुन ताराबाई संतापाने बेफान होऊन खलिता फेकुन देत म्हणाल्या,हा शाहू बहुरुपी आहे. त्याचा बिमोड करा.ताराबाईच्या आज्ञेने घोड्यांच्या टापा शाहूकडे दौडत निघाल्या

         कोकणातील परशुरामक्षेत्री राम मंदिरातील सायं आरती झाल्यावर, बाळाजी भटांनी ब्रम्हेंद्रस्वामींच्या चरणा वर मस्तक ठेवले.विचारपूस झाल्यावर बाळाजींना स्वामी आपल्या कुटीत घेऊन आले.बाळाजी म्हणाले, स्वामी!शाहूराजें चा काटा काढण्यासाठी खाशा मंडळींची रवानगी करण्यात आली आहे.बाळाजी! शाहूराजेंचं आसन स्वराज्यात स्थिर होणं गरजेचं आहे आणि हे काम फक्त तुम्हीच करुं शकतां.

         बाळाजी!ही वेळ आणिबाणीची आहे.सामान्य जनतेचा आक्रोश ऐका. भगव्या पताका मोडुन पडल्या. यवनांच्या अत्याचाराखाली मराठी माणसांचे श्वास कोंडल्या गेले.खुप सहन केलं लोकांनी. बास झाली मोगलाई!आतां गरज आहे धडाडी नेतृत्वाची,तरच अटकेपार भगवा फडकवतां येईल.ब्रम्हेंद्रस्वामींची नव्या क्रांतीची वाणी ऐकून बाळाजी विश्वनाथ भारावुन गेले.परंतु त्यांना मार्ग सांपडेना!

         बाळाजी!तुम्हाला शाहूराजेंच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्यासाठी तारा बाईच्या खास माणसांना तोडून,मुळावर घाव घातला की,विषवल्ली सळसळणार नाही.स्वामी! मनातील वादळ संपलं. निघण्याची अनुमती द्यावी.बाळाजींच्या भाळावर स्वातंत्र्याचा सूर्य चमकतांना दिसला.स्वामींनी बाळाजींच्या मस्तकावर हात मस्तकावर हात ठेवून तथास्तु! कल्याणमस्तु!असा आशिर्वाद दिला.

         कृष्णकाठावर पडलेल्या छावणीत, कैदेतुन मुक्त झालेले शाहूराजे,परसोजी नाईक,नेमाजी शिंदे,हैबतराव निंबाळकर, आणि शिदनाक महार हे सर्व रात्रीच्या वेळी बसले होते.गुप्तहेरांनी आणलेल्या बातम्यांनी शाहूराजे अस्वस्थ झाले होते. परसोजी!ही घरची भांडणे कधीच संपणार नाही कां?या भांडणापायीच सोयराआजीसाहेबांना विष खाऊन जीव गमवावा लागला.

       संपतील महाराज!अचानक समोरुन आवाज आला.आपण आतां आलात ना तर नक्की इतिहास बदलेल.बाळाजी आंत प्रवेशत म्हणाले.त्यांना बघून मिठीच मारली.ह्रदयाची भाषा उमगली. आत्मियतेची जाणीव झाली.शाहूराजेंनी बाळाजींना आदराने जवळ बसवुन घेतले बाळाजी!तुम्ही आल्याने आम्हाला दिलासा मिळाला,परंतु मनांतील वादळ क्षमायला तयार नाही.आम्ही मोगलांचे मांडलिक म्हणुन जरी स्वराज्यात आलो असलो तरी आमचं काळीज,आमच्या पिताश्रींचा अमानुष वध आजही आमच्या मनाच्या चिंधड्या होत आहेत. तरीही मराठी मुलूखाने आमचा राग धरावा?ताराबाई तर आम्हास बहुरुपी ठरवुन आमचा निःपात करण्यासाठी खाशा मंडळी आमच्यावर पाठवली असल्याचे कळले.

          महाराज आपण निश्चिंत असावं. आपण स्वराज्यात आलात,आपले आसन स्थिर करण्यासाठी आम्हास जे जे करावे लागेल ते करु.लवकरच स्वराज्या ची पहाट उजाडेल,असं आश्वासन देऊन बाळाजी विश्वनाथांनी त्यांना मुजरा केला व घोड्यावर टांच मारुन सुसाट वेगाने अंधारात विलिन झाले.

         खेडकडूसच्या शिवरात बाळाजी विश्वनाथांनी धनाजी जाधव,खंडो बल्लाळ,परशुराम त्रिंबकच्या गाठी घेतल्या.मसलत करुन तिघांनीही शाहू राजेंच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला. परशुराम त्रिंबक मात्र ताराबाईचा पक्ष सोडण्यास तयार नाही झाले.नाही उलट  शाहूमहाराजां विरुध्द  तलवार उपसली. शाहूराजेंच्या आणि परशुराम त्रिंबकच्या सैन्यात खेडकडूस इथे निकराची लढाई झाली,त्यात त्रंबकरावांचा दारुण पराभव झाल्याने सातार्याला पळून गेले.ताराबाई च्या ताब्यातील तीन किल्ले जिंकले आणि एकदाचे शाहूमहाराजांचे पाऊल सातार्यात पडले.ताराबाईने कोल्हापुरला पन्हाळगडाकडे पलायन केले.शाहूराजेंनी  त्यांचा पाठलाग करुन पन्हाळगडही जिंकला.ताराबाई कोकणात मालवणास पळुन गेल्या.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

पेशवाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version