कलियुगाचे वर्णन अशा प्रकारे केल्या गेले की कलियुगाच्या शेवटी मानव ज्ञानहीन होऊन परमेश्वराला विसरेल. पापाचरण वाढेल. मानवाची आकृती लहान व आयुष्य कमी होईल. धूर्तता, कपट सारख्या नीच प्रवृत्ती त्याच्या अंगोपांगी असेल. भ्रष्टाचार माजेल. दृष्ट ………..
दशावतार १० ( कल्की ) भाग १०, (२६ ते २७)
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! दशावतार ( कल्की ) !!!
भाग – २६.
कलियुगाचे वर्णन अशा प्रकारे केल्या गेले की कलियुगाच्या शेवटी मानव ज्ञानहीन होऊन परमेश्वराला विसरेल. पापाचरण वाढेल. मानवाची आकृती लहान व आयुष्य कमी होईल. धूर्तता, कपट सारख्या नीच प्रवृत्ती त्याच्या अंगोपांगी असेल. भ्रष्टाचार माजेल. दृष्ट लोक साधु वेश धारण करून लोकांची फसवणूक करतील. भाऊ भावाला मानणार नाही. झगडा फसाद नित्य कर्म ठरेल. तोकडे कपडे घालणार्यांना सभ्यताचे प्रतीक मानले जाईल. सर्वांचा सार म्हणजे मनुष्याच्या मनात बुद्धी विवेकाचा लोप पावेल.
दानवी प्रवृत्तीचे लोक कपटकारस्थान करून राज्यकारभार करतील आणि प्रजेचे अर्थ शोषण करतील. अशा राज्याची चापलुशी, त्यांचे पाय चाटून स्वतःचा स्वार्थ साधतील. रोग, महामारी, अतिवृष्टी, भूकंप, दुष्काळ अशा प्राकृतिक आपत्तीने लोकक्षय होईल.
सम्भल नावाच्या गावात विष्णूयशा नावाच्या ब्राह्मणाचा सुमती नावाच्या कन्येशी विवाह होईल. दोघेही धर्मपरायण असतील. कली त्यांच्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेईल. हा कली छोट्या वयातच वेदशास्त्राची शिक्षा ग्रहण करून महापंडित होईल. परंतु लोकांचे दुःख पाहून त्याच्या निवारणार्थ महादेवाची उपासना करून अस्त्र विद्या प्राप्त करून घेईल.
त्याच देशाचा राजा विशाखयुप कली देवाच्या महात्म्याने प्रभावित होऊन त्यांचे शिष्यत्व पत्करेल. आणि त्यांच्याच उपदेशानुसार राज्यकारभार चालवतील. कलीदेवाच्या कृपेने त्याची प्रजा धर्मपरायण होईल.
सिंहालदीप मध्ये बृहद्रथ नावाचा राजा होईल. त्याची पत्नी राणी कौमुदी पासून अपूर्व लावणवती पद्मा नावाच्या मुलीचा जन्म होईल. पद्मा लहानपणा पासूनच श्रीहरीची परमभक्त असेल. आणि श्रीहरीला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवाची उपासना करेल. महादेव पार्वती प्रसन्न होऊन तिला वर देईल की, श्रीहरी तिला पतीच्या रूपात प्राप्त होईल. परंतु दुसरा पुरुष तिचा पत्नीच्या भावनेने अभिलाषा करेल त्याचे तात्काळ स्री रुपात परिवर्तन होईल.
पद्मादेवी विवाहयोग्य झाल्यावर राजा बृहद्रथने तिच्या विवाहासाठी स्वयंवराचे आयोजन करेल. स्वयंवराला आलेल राजे, महाराजे पद्मावतीचे असाधारण लावण्य पाहून पद्माला पत्नीच्या रूपात अपेक्षा करतील, ते तात्काळ तरुणींच्या रूपात परिवर्तित होतील. आणि लज्जेने ते आपल्या राज्यात परत न जाता पद्मादेवी सोबत सख्यांच्या रूपात राहतील.
ही हकीगत कळताच कलीदेव अश्वारूढ होऊन सिंहलद्वीपला पोहोचतील. त्यावेळी पद्मादेवी जलविहार करीत असलेली पाहून तिला ओळखून तिच्यावर अनुरक्त होतील. बृहद्रथाकडे तिची मागणी करतील.
राजा बृहद्रथ मोठ्या प्रसन्नतेने आपली कन्या पद्माचे सालंकृत धनसंपत्ती देऊन कली देवाशी तिचा विवाह करून देतील. जे राजे लोक स्री रूपात परिवर्तन झाले होते ते सर्वजण कली देवांच्या दर्शनाने व त्यांच्या कृपेने पूर्व रूपात येतील. कली देवांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपापल्या राज्यात परत जातील.
इकडे इंद्रदेवाचे आज्ञेनुसार वास्तुशिल्पकार विश्वकर्माला सम्बल गावात सुंदर महाल बांधतील. आजूबाजूला उद्यान, मोठी तटबंदी करतील. तिथे कली देव आपल्या पत्नी बरोबर धनसंपत्ती, लवाजमा घेऊन वास्तव्य करतील. काही काळानंतर जय विजय नावाचे महाबलशाली दोन पुत्र जन्म घेतील.
विष्णूयशा ब्राह्मण अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प करतील. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुत्र दिग्विज्यासाठी बाहेर पडतील. कारण चक्रवर्ती राजा बनल्याशिवाय अश्वमेध यज्ञ होऊ शकत नव्हता.
भगवान कल्की सर्वप्रथम कीटक देशात नामधारण केलेल्या बौद्ध असुरांच्या राज्यावर हमला करून बौद्धगणांचा पराभव झाल्यावर,बौध्दगण मिळेल त्या प्रकारे आश्रय घ्यायचा प्रयत्न करतील. पण कल्कीदेव त्यांच्या सगळा प्रयत्न विफल करतील. त्यानंतर बौद्ध असुर, म्लेच्छ सेनेची मदत घेऊन कल्की सेनेवर आक्रमण करतील. भीषण युध्द होऊन बौद्ध सेना व म्लेच्छ सेना समाप्त होईल. रक्तमासांचा चिखल होईल. मृत सैन्य, हत्ती, घोडे, रथ ,युद्ध सामग्री सर्व नष्ट होऊन त्याचा ढीग साचेल.
पती- पुत्रांच्या निधनामुळे बौद्ध व म्लेच्छ स्त्रिया क्रोधीत होऊन युद्धास सज्ज होतील.व कल्की सेनेवर आक्रमण करतील. या युद्धात स्त्रियांना मारणे किंवा त्यांचा पराभव करणे कल्कीला अनुचित वाटल्याने कल्की मायावी अस्त्रांचा उपयोग करून स्त्रियांचे शस्त्र त्यांच्याकडेच परत जातील. त्यामुळे स्त्रियांना कलकीची योग्यता लक्षात येऊन त्या कलकी देवाला परमेश्वर समजून त्यांना शरण जातील. कल्की त्यांना उपदेश करून मुक्ती प्रदान करतील.
त्याचवेळी चक्रतीर्था मधील बालखिल्य नावाचा ऋषी कल्की देवांना मदत मागेल. कुथांदर नावाची एक राक्षसीन ऋषीच्या तपासाधने मध्ये उपद्रव देत असल्यामुळे मोठे विघ्न निर्माण होते आहे, त्यांच्या अनुरोधावरुन कल्की देवता राक्षसांचा नाश करण्या साठी हिमालयाकडे प्रस्थान करतील.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१०-२०२३.
!!! दशावतार !!! अंतिम भाग – २७.
कुथोदरी नावाची राक्षसीन आपला पुत्र विकेजनला हिमालय पर्वतावर डोके आणि निषध पर्वतावर पाय ठेवून, अनेक योजने दूर झोपून स्तनपान करेल. तिच्या स्तनातून निघालेल्या दुधापासून नद्यांची उत्पत्ती होईल. तिच्या श्वासाने वाघ हत्ती दूर फेकल्या जातील. तिच्या कानांना गुफा समजून सिंह निवास करतील. तिच्या अंगातील रोमांमध्ये हरणी सारखे प्राणी राहतील. या अद्भुत राक्षसीनीला बघून कली देवाचे सैन्य मुर्च्छित होतील. कलीदेवांनी तिच्यावर आक्रमण केल्यावर त्यांच्या सह सर्व सैन्यांना गिळून टाकेल. कलीजवळ असलेल्या तलवारीने तिचे पोट फाडून बाहेर येतील. पोट फाडल्यामुळे सगळीकडे रक्ताच्या नद्या वाहतील. आणि कोथोदरी आपले प्राण त्यागेल.
मरू आणि देवपि नावाचे दोन भक्त कली देवाचे शिष्य बनतील. हे दोन शिष्य आणखी विशाखायूप शिष्यांसह आपल्या विराट सैन्यासह कली देव विशासण नावाच्या प्रदेशावर आक्रमण करतील. या भीषण युद्धात अधर्मी नष्ट होतील. कोक आणि विकोक नावाचे दोन राक्षस अनेक प्रकारे आपल्या मायेचा अवलंब करतील. परंतु कलि देवा पुढे त्यांचे प्रयत्न व्यर्थ होतील. आणि त्यांचा वध होईल.
त्यानंतर कल्की देव भल्लारनगरावर आक्रमण करतील भल्लार नगरीचे हरिभक्त राजा शशीध्वजआणि त्यांची धार्मिक वृत्तीची पत्नी सुशांता आपल्या योगबळाणे कलीदेवाला ओळखेल. ती आपल्या पतीला परोपरीने शत्रू भावना त्यागून श्रीहरीच्या चरणी शरण जाण्याबद्दल समजावेल. पण राजा शशीध्वज न ऐकता पुत्र, जवळचे संबंधी व सैन्यासह कलीदेवावर आक्रमण करेल. शशीध्वजाच्या पराक्रमाने कल्कीदेवांचे शिष्य पराजित होतील. आणि मार्मिक शस्त्रघाने कल्कीदेव मुर्च्छित होतील. राजा शशीध्वज त्यांना राजमलात नेतील.
राणी सुशान्ता आणि तिच्या सख्या इतक्या आनंदविभोर होतील की अत्यांनांदाने त्यांच्या भोवती नृत्य करू लागतील. कल्की शुद्धीवर आल्यावर त्या सर्वांचा भक्तिभाव पाहून संतुष्ट होऊन आत्मसमर्पण करतील.
राजा शशीध्वज आपली कन्या रमाचा विवाह कल्कींशी करतील. त्या निमित्ताने मोठा उत्सव होईल.
भगवान कल्की भारतातील सर्व अत्याचारी राजांचा संहार करतील. दुष्ट लोक त्यांच्या भीतीने सन्मार्गाने वागतील. कल्कीदेव द्विग्विजय करून संपूर्ण भारताचे चक्रवर्ती राजा होतील. आणि त्यांच्या वडिलांनी अश्वमेध यज्ञाचा केलेला संकल्प पूर्ण करतील. अश्वमेध आणि इतर प्रकारचे यज्ञ करून वैदिक धर्माचे पुनरुध्दार करतील. त्यांचे असाधारण कर्तृत्व पाहून त्यांचा सौजन्यपूर्वक स्वभाव, प्रजेच्या हिताच्या सदैव विचार करणे पाहून लोक त्यांचे अनुकरण करू लागतील.
त्यांची सच्छिल वागणूक, आदर्श, धर्म कर्माचे लोक आचरण करून लोकांना परम शांतीचे अनुभूती प्राप्त होईल. वेळेवर पाऊस पाणी आल्यामुळे धनधान्य चांगले पिकेल. रोगराई, शोक कुठेच राहणार नाही.
या प्रकारे परत सत्युगाची सुरुवात होईल. आणि कल्कीदेव आपला अवतार संपवून देहत्याग करून पुन्हा देवलकात परत जातील.
“म्लेच्छनिवहनिधते कलयसी करवालं।
भूमकेतूमिय किमपि करालम्।
केशव धृतकल्की शरीर।
जय जगदीश हरे !!”
!! समाप्त !!
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१०-२०२३.

