Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

सती सावित्री चरीत्र भाग २, (६ते १०)

SATI SAVITRI CHARITRA 2 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

SATI SAVITRI CHARITRA 2 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI


           सावित्री यज्ञकार्यास सात वर्षे पुर्ण झालीत. यमुना सुध्दा चौदा वर्षाची झाली. तिच्या चुणचुणीत व कामसू स्वभावाने सर्वांची आवडती होती. अश्वपती महाराजांच्या तपस्येला बारा वर्षे पुर्ण झाली परंतु फलप्राप्ती दिसेना म्हणुन प्रजाजन, मंत्रीगण थोडे अस्वस्थ झालेत, पण त्यांची महाराजांवरची निष्ठा अढळ होती.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सती सावित्री चरित्र !!!

!! सावित्री  !!

भाग   ६.

         सावित्री यज्ञकार्यास सात वर्षे पुर्ण झालीत. यमुना सुध्दा चौदा वर्षाची झाली. तिच्या चुणचुणीत व कामसू स्वभावाने सर्वांची आवडती होती. अश्वपती महाराजांच्या तपस्येला बारा वर्षे पुर्ण झाली परंतु फलप्राप्ती दिसेना म्हणुन प्रजाजन, मंत्रीगण थोडे अस्वस्थ झालेत, पण त्यांची महाराजांवरची निष्ठा अढळ होती. महाराज मात्र अत्यंत शांत आणि निश्चिंत होते. त्यांना  फलप्राप्ती होईलच याचा पुर्ण विश्वास होता कारण त्रृषीमुनि, तपस्वी, विद्तजन, दशग्रंथी यांनी धर्मग्रंथाचे संशोधन करुनच सावित्री हवन सांगीतले. परिणाम नक्कीच अनुकुल होणारच!

      तेवढ्यात यमुना सर्वाच्या कामात मदत करण्यासाठी आली. धान्यगारात आल्यावर बल्लव महेश्वर ह्या नवीन सेवकाच्या चोरट्या हालचाली १९ वर्षाच्या यमुनाच्या डोळ्यातुन सुटल्या नाहीत. तीने त्याला काय करतां म्हणुन विचारल्यावर तो म्हणाला, काल प्रसाद म्हणुन इथली साखर नेली होती, ती  घरुन आणलेली साखरेच्या गोणीत टाकत होतो. धुर्त यमुनेला त्याचे चाचरत बोलणे, वागणे विचित्र वाटले. धूर्तपणे ती म्हणाली, पाकशाळेत तुम्हाला त्वरीत बोलावले. ही साखर मी टाकते गोणीत! महेश्वर बल्लव गडबडला, पण नाइलाजाने निघुन गेल्यावर तीने पोटलीतली साखर उपरण्यात बांधुन घेतली व गोणीतील साखर त्याच्या पोटलीत बांधुन गोणीच्या बाजुने ठेवुन उपरण्याचे मोटले घेऊन निघाली.

     घरी आल्यावर तीने घडलेली घटना  भाऊ शेखरला सांगीतली. तो साखर घेऊन परिक्षणासाठी रसायनशाळेत गेला. रात्री उशीरा घरी आल्यावर यमुनेला बाजुला नेऊन म्हणाला, यमु! तु आज फार मोठ्या संकटातुन सर्वांना  व यज्ञालाही सुखरुप केलेस. कारण त्या साखरेत एवढे जालीम विष होते की, चिमूटभर जरी साखर पोटात गेली असती तरी मृत्यु निश्चित होता आणि यज्ञ बंद पडला असता. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच दोघे बहिण भाऊ  यज्ञपाकशाळेत पोहचले. कोणीही धान्यागारात जाऊ नये अशी कडक सुचना करुन भराभर महामंत्री,सेनापती, गुप्तचर प्रमूख यांना पाचारण करुन  घडलेली हकीकत सांगीतली आणि महेश्वरला बंदी बनविण्यासाठी गुप्तचरांना रवाना केले. यमुनेने तर त्याचे हुबेहुब चित्रच काढुन दिले. त्या चित्राच्या प्रति सर्वीकडे लगेच पाठवण्यात आल्यात.

         वारिंग देशाच्या सीमेजवळ रात्रभर केलेल्या प्रवासाने थकल्यामुळे व सोपवलेले काम चोख केल्याच्या आनंदात वेश पालटुन एका झाडाखाली निवांत बसला होता. संध्याकाळपर्यत यज्ञमंडपात हाःहाकार माजेल असे स्वप्न पाहत छद्मी हसत पुढच्या प्रवासासाठी ऊभा राहिला तोच एका गुप्तचराने त्याला अचुक ओळखुन त्याची गठडी वळवुन घोड्यावर टाकुन राजधानीकडे वेगाने निघाला.

       यज्ञस्थानावर खुपच अस्वस्थता निर्माण झाली होती. महामंत्रीनी मोठ्या खुबीने सर्व परिस्थीती हाताळली. रसायनशास्र तंज्ञांनी धान्यगारातील प्रत्येक गोणीतील धान्याचे परिक्षण केले.हे सर्व  इतके गुप्तपणे  व व्यवस्थीत हाताळले की, कोणाला  कांहीच शंका  नाही आली. यज्ञ संपल्यावर महाराजांना सांगीतले. सेवक वर्गाला एवढेच कळले की, महेश्वर बल्लवने कांहीतरी गंभीर अपराध केला असुन यमुनाच्या चातुर्याने उघडकीस आला.त्यामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत होते. महाराणींना सुध्दा ही वार्ता कळल्यामुळे यमुनेचे खुपच कौतुक वाटले. त्यांनी छानसा रत्नहार भेट केला.पण त्या हारापेक्षा यमुनेचे मुखच अधिक लखलखत होते.

                           क्रमशः
                            मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!  सावित्री  !!

भाग – ७.

     शाल्वदेशाधिपती द्युमत्सेनच्या आराधनेला तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटुन गेला परंतु अद्याप फलप्राप्ती झाली नाही म्हणुन थोडेसे संचित झाले होते. पण तेवढ्यात महाराणी शैब्यादेवींना दिवस गेल्या बद्दलची आनंददायक बातमी मिळाली. स्वतःचा आनंद सावरुन ब्रम्हदेवाला म्हणाले, “प्रभू सर्वक्षेम झाल्यावरच ऊपासनेचे उद्यापन व सांगता करीन”. महाराजांची स्थैर्यबुध्दी पाहुन सर्व लोकं चकीत झाले.

           गर्भावर उत्तम संस्कार व्हावे म्हणुन महाराणी तिन्ही त्रिकाळ उत्तम ग्रंथवाचन, सायंकाळी मधुर संगीतश्रवण, ज्ञानी व विद्वत् जनांचे प्रवचन, उपदेश या सर्व गोष्टीत भराभर दिवस जात होते. त्यांचे डोहाळे सात्विक होते. सातव्या महिण्यात डोहाळ जेवणाचा कार्यक्रम खुप थाटामातात पार पडला.

        श्रीब्रम्हदेव आराधनेला चौदा वर्षे आणि महाराणीला नऊ मास पुर्ण झाले.अक्षयतृतीया या शुभमंगलदिनी महाराणींना पुत्ररत्न झाले. राज ज्योतीषींनी पंचाग पाहुन कुंडली मांडली. कांही आकडेमोड केली.आणि सांगायला सुरुवात केली, हे बाळ अक्षयतृतियाच्या उत्तम समयी शुभ मुहुर्तावर व रोहीणी नक्षत्रावर जन्म अतिशय शुभ लक्षण आहे. हा पुत्र म्हणजे ब्रम्हदेवाचा अंश आहे. हा बालक अत्यंत बुध्दीमान, सर्वगुणसंपन्न आणि सर्वविद्यापारंगत होणार, रुपवान, गुणवान असुन याचे बालपण त्रृषीजन, सज्जन यांच्यासमवेत वनात असेल,बालपण जरी कष्टमय असले तरी स्वसामर्थ्याने पुढील जीवन व राज्यकारभार उत्तम करेल. पण….. वयाच्या २५ व्या वर्षी जीवावर बेतणारे  अत्यंत मोठे संकट, धोका संभवतो. याच बरोबर असे दिसते की, याच्या भार्याची किर्ती त्र्यैलोकात पसरेल. तिच्यामुळेच येणार्‍या संकटावर मात होईल. २५ व्या वर्षाचे हे संकट टळले की, पुढे क्षेमच क्षेम आहे,मग यासारखा पुत्र हाच!

              हे सर्वच ऐकुत कुटील कुमारसेन तेथेच होता. मनांत म्हणाला, या ज्योतीष्याचे भविष्य खोटे ठरुन, लवककरच या तिघांनाही राजभ्रष्ट होऊन कारावासात खितपत पडावे लागेल. त्रृषींच्या सहवासा ऐवजी श्रृंखलाच जन्मभर मिळणार! त्याचा विकृत झालेला चेहरा पाहुन महाराज म्हणाले, कितीही मोठे संकट जरी आले तरी ब्रम्हदेव आणि कुलदेवता निवारण कलतील हा आमचा दृढ विश्वास आहे.

         महेश्वर वल्लवाचा कुटील बेत उघडकीस आल्याचा समाचार देशोदेशी वार्‍यासारखा पसरला. कलिंग आणि वाशिंग देशाचे दुष्ट राजे थोडे बावरले. त्यांनी लगेच गुप्त बैठक बोलावुन कांही काळ शांतता राखुन नंतर शाल्वदेशाकड लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले, लोभी कुटील अमात्य कुमारसेन मदतीला आहेच.

          अश्वपतींच्या तपश्चर्येला १४ वर्षे पुर्ण झालीत. महाराजांसोबत भोजन करीत असतांना महामंत्री म्हणाला, महाराज! माझा मुलगा यशवर्धन लग्नाच्या वयाचा लग्नाचा झालेला आहे, यमुना त्याच्यासाठी अनुरुप असुन ते दोघे एकमेकांना पसंद पण करतात परंतु आपल्या यज्ञाची कार्यसिध्दी व फलप्राप्ती झाल्याशिवाय दोघेही लग्नास तयार नाहीत. ठीक आहे!  कार्यसिध्दी झाल्याबरोबर लगेच लग्नकार्य उरकुन घेऊया.

     तेवढ्यात एका सेवकाने अत्यंत शुभ समाचार आणला. शाल्वदेशाधिपती द्युमत्सेन आणि महाराणी शैब्यादेवी यांना पुत्ररत्न झाले. त्यांनीही चौदा वर्षे ब्रम्हदेवाची आराधना केली होती. महाराज म्हणाले, बाळाच्या नामकरणाच्या वेळी यथोच्चित सत्कार करण्यात यावा. महाराज द्युमत्सेन व महाराणी दोघेही अत्यंत धर्मपरायण व सत्यवचनी आहेत. त्यांना अभिनंदन संदेश पाठवण्यात यावा.

                           क्रमशः
                      मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!!  सावित्री  !!!

भाग – ८.

       शाल्वदेशाच्या राजधानीत आज नवीन युवराजाच्या नामकरणविधी निमित्य महर्षी गौतममुनींना विशेष आमंत्रीत केले होते. सोबतच अनेक विद्वतजन,पंडीत, आणि देशोदेशीचे प्रतीनिधी विपुल  उपहार घेऊन उपस्थीत होते.

         प्रत्येकांनी आपपल्या परीने अनेक नांवे सुचविली. शेवटी गौतममुनीच म्हणाले, द्युमत्सेन व महाराणी शैब्यादेवी यांच्या मनात, बुध्दीत, वाणीत नेहमी सत्यच असते म्हणुन म्हणुन बालकाचे नांव “सत्यवान” ठेवावे, सार्थ नांव सुचवल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. सनई-चौघड्याच्या गजरांत “सत्यवान” बाळाचा नामकरण विधी सपन्न झाला.

          सत्यवान सहा महिण्याचा झाल्यावर “अन्नप्राशन”  संस्कार मामाच्या हस्ते संपन्न झाला. एक वर्षाचा झाल्यावर “चौलकर्म” विधी करण्यात आला. अडीच वर्षाचा झाला नाही तोच आपल्या बोबड्या बोलात “गणेशस्तोस्र” म्हणु लागला. अत्यंत बुध्दीमान असल्याची चुनुक त्याच्यात दिसली.बरेच दिवसांपासुन द्युमत्सेनांना दृष्टीदोषाचा त्रास सुरु होता. आणि एके दिवशी सकाळी त्यांना कांहीच दिसेनासे झाले. देशोदेशींचे तज्ञ नेत्र वेद्यांनी उपचार करुनही फरक पडला नाही.

          अमात्य कुमारसेन, वारिंग व कलींग देशांच्या राजांच्या कुटील कटांना वेग आला. पुढील महिण्याच्या द्वादशीला शाल्वदेशावर आक्रमण करायचा कट निश्चित झाला. श्रीपती आणि श्रीधर या प्रामाणिक सेवकांना या कटाची चाहुल लागली. त्याने अत्यंत प्रामाणिक असलेल्या शशिवर्मा, रविवर्मा, शरदवर्मा या तीन मंत्रांना माहिती दिल्यानंतर महाराजांच्या असह्य स्थितीत,  त्यांचे, महाराणी व युवराजांचे प्राण वाचवण्यासाठी एका गुप्त भूयारातुन ज्याचे दुसरे टोक एका निबिड अरण्यातील भव्य वृक्षाच्या ढोलीत निघते.रविवर्मांनी गौतमत्रृषींच्या तपोवनात जाऊन सर्व घटना विदित केली. त्यांना आधीच काही तरी विपरीत घडेल अशी कल्पना होतीच, पण सरळ स्वभावाच्या महाराजांनी तेवढे मनावर घेतले नव्हते. द्वादशीला आक्रमण झाले की, गडबडीचा फायदा घेऊन त्याच संध्याकाळी तीघांनाही तपोवनातील गौतमांच्या आश्रमात भूयारामार्गे सुखरुप पोहचविण्याचे व तीन्ही मंत्र्यांच्या कुटुंबासहित मद्रदेशी प्रयान करण्याचे ठरले.

           एक दिवस संधी साधुन श्रीपतीने महाराजांना कुमारसेन, वारिंग व कलींग नरेशाच्या कटकारस्थानाची माहिती देऊन भूयारमार्गे प्रयान करण्याची योजना सांगीतली. द्वादशीचा दिवस उजाडला. कलिंग आणि वारिंग देशांच्या राजांनी बेसावध असलेल्या शाल्वदेशावर अचानक आक्रमण केले. द्युमत्सेन राजांवर त्यांच्या सेनेचे अलोट प्रेम व आदर असल्याने कसेबसे युध्दास सज्ज झाले. पण कुटील सेनापतीच्या चुकीच्या आदेशाने व अचानक आक्रमणाने भांबावली आणि संध्याकाळच्या आधीच द्युमत्सेनांची सेना पराजीत झाली.

             देशद्रोही मात्र सुरापानात दंग होती. तो फायदा घेऊन महाराणी, महाराज व सत्यवान यांना मध्यरात्री श्रीपती, श्रीधरने सावधपणे भूयारमार्गे गौतमत्रृषींच्या तपोवनाकडे निघाले.

              दूसर्‍या दिवशी वातावरणांत व राजवाड्यात  विचित्र शांतता भरुन राहिली. कुमारसेन व दोन्ही जेते राजे निवडक सैन्यासह द्युमत्सेन राजाला बंधक करण्यासाठी साखळदंडधारी सैनिक राजवाड्यात गेले असतां रिकामा राजवाडा पाहुन सैनिक भयभित झालेत. कलींगाधिपती अतिव क्रोधाने गर्जन करीत म्हणाले, हे कृत्य त्या घातकी कुमारसेन व मंत्र्यांचे असावे,  असे वाटुन त्यांची अंधारकोठडीत रवानगी केली, त्यांना केलेल्या पापाचा पश्चाताप झाला पण वेळ निघुन गेली होती.

                       क्रमशः
                            मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!!   सावित्री   !!!

भाग  –  ९.

         अश्वपतींच्या यज्ञतपाला आज १८ वर्षे पुर्ण होणार म्हणुन यज्ञस्थानावर  गडबड सुरु होती. आज सारखे शुभ शकुन होत होते. त्रृतु नसुन सुध्दा मोर पिसारा फुलवुन सुंदर नृत्य करीत होते. त्यांच्याभोवती दोन भारद्वाज नर मादीच्या जोड्याही सामील होते. तेवीस वर्षाच्या यमुनेने सर्वांचे लक्ष आकृष्ट केले हे सर्व यज्ञमंडपी पोहचत असतांना कांही ग्रामवासी सुहासनी दुधाचे हंडे प्रवेशीत होत्या हा आणखी शुभ शकुन!

            यज्ञवेदी पुजन आणि सावित्री मंत्राने हवनांत धृत,समिधा अर्पन केल्या जाऊं लागल्या. आचार्यांच्या वाणीतुन ‘प्रणव’ मंत्राचे स्वर सर्वीकडे घूमू लागलेत. सर्व लोक चित्रासारखे स्तब्ध होते.

        तेवढ्यात….. आकाशातुन एक प्रचंड मंगलमयी ध्वनी ऐकु आला. आणि….. आणि दुसर्‍याच क्षणी यज्ञकुंडातुन प्रसन्नवदना, अभयहस्त दर्शवित महादेवी सावित्री प्रकट झाली. सर्वजन उठुन भक्तीभावाने विभोर होऊन ती तेजस्वी, सुंदर, कल्याणमयी, क्षेमदात्री लखलखत्या मूर्तीला पाहुन आश्चर्याने व आनंदाने नतमस्तक झालेत.

            तोच सावित्रीमातेच्या मुखातुन शब्द ऐकु आलेत, ” हे पृथ्वीपती, अश्वपती तुझे शुध्द ब्रम्हश्चर्य, सर्व प्रकारचे कठोर नियमपालन आणि भक्ती पाहुन संतुष्ट झाले. हे मद्राधिपते! धर्माकडे दुर्लक्ष न करतां, इष्ट वाटेल असा वर माग!

          क्षणभर देहभान हरपलेले महाराज स्थीरबुध्दीने म्हणाले, ” हे देवी! धर्म प्राप्तीच्या इच्छेनेच अर्थात संतती प्राप्तीसाठीच तपश्चर्या केलेली आहे. यास्तव कुलाचा उध्दार करणारे पुत्र व्हावेत. यावर देवी म्हणाली, ब्रम्हदेवांच्या आज्ञेने व प्रसादाने एक अत्यंत तेजस्वी कन्या प्राप्त होईल! आणि तथास्तु… तथास्तु म्हणत अंतर्धान पावली. तदनंतर पुर्णाहुती देऊन यथासांग, सशास्र यज्ञाची सांगता झाली. महाराजांना अंगारा लावुन शेवटी अग्निची प्रार्थना करुन विसर्जनाचा मंत्र म्हटला.

     “गच्छ! गच्छ! सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर। यत्र ब्रम्हदयो देव, तत्र गच्छ हुताशन”!  अशाप्रकारे यज्ञाची सांगता झाल्यावर सर्व वातावरण आनंदमय सद्गतीत झाले होते.

        सर्व मंत्री, ज्यांनी यज्ञात सेवा दिली त्या लहान थोरांचा महाराजांनी यथोच्चित सत्कार तसेच महर्षी नित्यानंद आणि ब्रम्हवृंदांचे मनोभावे यथासांग पुजन व सन्मान केला. आचार्य नित्यानंदानी मंगल आशिर्वाद देऊन वायुवेगाने महाद्वारातुन बाहेर पडले व क्षणांत अदृष्य झालेत. ब्रम्हर्षी नित्यानंद मुनींचा जयजयकार गर्जला.

            अठरा वर्षापुर्वी काढुन ठेवलेले अलंकार लेवुन राजा राजदरबारात प्रवेशलेत व राज्यकारभाराची धुरा सांभाळली. सिंहासनावर बसल्यावर पहिली घोषना कोणती केली असेल तर  यमुना व यशवर्धन यांच्या विवाहाची, ज्याबद्दल फार पुर्वीच महामंत्र्याशी बोलणी झालेली होती. सर्वांना मान्यतापुर्वक आनंद झाला. दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे, यशवर्धनची ऊपमहामंत्रीपदावर रितसर नेमणूक! महाराणींनींनी यमुना व यशवर्धन यांना जवळ बोलावुन रत्नजडीत मुद्रिका दिली.

            महाराज महामंत्रीसह राजकार्यालयात पोहोचले. सर्व कारभारावर महाराजांनी धावती नजर टाकुन चाणाक्ष दृष्टीने सर्व मुद्दे अचुक टिपत होते. अठरा वर्षे सर्वांनीच राज्यकारभार व्यवस्थीत चालवल्या बद्दल समाधान व्यक्त केले. तेवढ्यात एका दुताने बातमी आणली की, शेजारच्या शाल्वदेशावर आक्रमण होऊन महाराज द्युमत्सेन, महाराणी व चार वर्षाचे सत्यवान पुत्रासहित राज्यातुन नाहिसे झालेत. अमात्य कुमारसेन, काही मंत्री व सेनापती यांनी द्रोह करुन वारिंग व कलींग देशाच्या राज्यांना सहाय्य करुन आक्रमणाने राज्य जिंकुन घेतले. ही वाईट बातमी ऐकुन अश्वपती महाराज अतिशय गंभीर झाले. यज्ञात मग्न असल्यामुळे आपण त्यांना सहाय्य करुं शकलो नाही याची त्यांना अतिशय खंत वाटली.

                        क्रमशः
                मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!!   सावित्री   !!!

भाग  –  १०.

             गौतममुनींनी तपोवनात आधीच तयार करुन ठेवलेल्या कुटीत महारांजाचे विश्वासु सेवक श्रीपत व श्रीधर ने  द्युमत्सेन, शैब्यादेवी व सत्यवानाला रथातुन सावकाश उतरवुन कुटीच्या उंबरठ्याचे पुजन करुन कुटीत प्रवेश केला. तेवढ्यात छोट्या सत्यवानाला जाग आल्यावर  राजमहाला ऐवजी बावचळल्यासारखे पाहत कुठे आहे म्हणुन विचारल्यावर महाराणी म्हणाल्या, बाळा तु समजदार व शहाणा आहेस. इथुन पुढे गतवैभावाचा उल्लेख न करतां ही कुटीच आपले घर समजून वागायचे. श्रीपती व श्रीधरने सर्व व्यवस्था लावुन अश्रुपुर्ण नेत्राने त्यांचा निरोप घेऊन, अश्वारुढ होऊन मद्रदेशाकडे प्रस्थान केले.

          इकडे दोन महिण्यांनी यमुना व यशवर्धनचा राजवैभवी थाटात विवाह सोहळा पार पडला. हा आनंदोत्सव संपत नाही तोच प्रजाजन ज्या वार्तेची आतुरतेने वाट पाहत होती ती दुसरी आंनदवार्ता मालवीदेवीला दिवस गेल्याची कळल्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. महाराणींना हास्यविनोद करुन आनंदात ठेवत दिवस आनंदात जात होते.सातव्या महिन्यात दौह्रद समारंभ करुन वेगवेगळ्या प्रकारचे दौह्रद ( डोहाळ जेवण ) वनांतील, चांदण्यातील, नौकाविहार इत्यादी प्रकारचे आयोजन सुरु होते. महाराणी तृप्त व आनंदी दिसत असुन त्यांची अंगकांती व मुख तेजोमय दिसु लागले.

       नऊ मास पुर्ण झाले आणि भाद्रपदातील गौरीपुजनाच्या शुभ मुहुर्तावर कन्यारत्न जन्मास आल्याची आनंदवार्ता सगळीकडे पसरली व प्रजाजनात उत्साहाचे वातावरण  पसरले. राजपुरोहितांनी जातक विधी केल्यानंतर नवजात बालीकेची नाडी परिक्षण व सर्व तपासणी करुन तीचे वर्नन करुन म्हणाले, हीचे कर्ण इतके तिक्ष्ण आहेत की, कुठचेही दिशाज्ञान होईल. कमलनयन दलासारख्या  नेत्राने अंधारात सुध्दा दिसु शकेल. चाफेकळीसारख्या नासिकेतुन श्वास सुध्दा हव्या त्या गतीत चालु आहे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. राजवैद्य  तीचे नखशिखांत वर्णन करीत होते. हसु दाबीत महाराज म्हणाले, अहो वैद्यराज! तुम्ही इतके मीतभाषी असुन आज अगदी कविताच करुं लागलात, चांगलेच रसिक व बोलके केले की, या बालीकेने! विनयाने वैद्यराज म्हणाले, महाराज! ही कन्या देवीचे बालस्वरुप असुन मुक्यालाही बोलके करील. महाराजांनी दिलेला उपहार स्विकारुन व प्रणाम करुन वैद्याने गमन केले.

    महाराज व महाराणी  बालिकेचे भविष्य ऐकण्यास उत्सुक होते, तोच पंचाग, भूजपत्र, लेखणी वगैरे साहित्य घेऊन राजज्योतिष्याने प्रवेश केला. जन्मवेळ, ग्रह, नक्षत्रानुसार कुंडली, मांडुन तीचा डावा हात बघुन आश्चर्यचकित होत म्हणाले, महाराज! एवढ्या तान्ह्या बाळाच्या हस्तरेषा, चिन्हे कधीच स्पष्ट नसतात, परंतु या कन्येच्या हातावर सर्व शुभलक्षणांनी ठाण मांडलेले असुन अत्यंत बुध्दीमान, कलापारंगत व परमार्थात अत्युच्च स्थान आहे. पती सुध्दा विद्या पारंगत, गुणसंपन्न, सात्विक, धार्मिक असेल, परंतु हीच्या विसाव्या वर्षी हिच्या पतीवर फार मोठे संकट दिसत आहे, पण त्यातुनही मार्ग निघेल, ही कन्या विलक्षण असुन देवांशसंभूत आहे.

      सर्वानुमते परामर्श होऊन, ही कन्या सावित्रीहवनाने जन्मली म्हणुन “सावित्री” नांव ठेवावे असे ठरले.

          बाराव्या दिवशी “कर्णवेध” संस्कार पार पडला पण तीने साधा हुंकारही भरहा नाही, रडणे तर दुरच!नामकरणाच्या दिवशी तीला नाना प्रकारच्या बाललेण्यांनी सजविले. सनई चौघड्याच्या गजरांत सावित्रीदेवीच्या वराने हे प्रसादमय कन्यारत्न म्हणून “सावित्री”  नांव ठेवले. देशोदेशींचे प्रतिनिधी व इतर मान्यवरांनी उपहाराचे आदानप्रदान झाले. सर्वत्र आनंदलहरी पसरल्यात.

                           क्रमशः
                मिनाक्षी देशमुख.

!!! सती सावित्री !!!

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे

सती सावित्री चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version