अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! संत गाडगेबाबा !!!
!! प्रस्तावना !!
नमस्कार!
आतांपर्यंत आपल्यासमोर रामायण महाभारतातील व्यक्तीरेखा,संत चरीत्रें ऐतिहासिक चरित्रें तसेच इतरही व्यक्तीरेखा जसे..सम्राट अशोक,स्वामी विवेकानंद इत्यादी व्यक्तीरेखा सादर केलेल्या आहेत.आतां १८ व्या शतकांतील एका निःस्पृह महान संताची व्यक्तीरेखा आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे.
ज्यांचे जिवन म्हणजे धगधगते अग्निकुंड!पूर्ण परिस्थिती प्रतिकुल! या प्रतिकुल परिस्थितीशी आपल्या अफाट कर्तुत्वाने झुंज दिली.काम केल्याशिवाय भाकरीला स्पर्श केला नाही,सर्व प्रकारचा छळ,उपहास,निंदा,बाभळीच्या फांदोर्या चा मार सारे मुकाट्याने सोसत शांतपणे तोंड देत आपल्या अमोघ वाणीने जन्म भर झुंज दिली.धर्मशाळा,पाणपोया, सदावर्ते,गोरक्षणे,निरिक्षरांसाठी शाळा प्रशाळा,वृध्दाश्रमें सुरु केलेत.मद्यपींना व्यसनमुक्त करुन त्यांचे संसार मार्गी लावले,अस्पृश्यतेविरुध्द कडाडून प्रचार, देवाच्या नांवाखाली होत असलेल्या पशुहत्येविरुध्द निकराची झुंज,हुंडा विरोध,रुपयांच्या प्रवाहात रात्रंदिवस असून साधी एक कर्दपी स्वतःसाठी किंवा कुटुंब,नातलगासाठी खर्चली नाही. मंत्रीमंडळातील कित्येंकांची अपार निष्ठा पण कधीही अनुचित लाभ घेतला नाही. हाती जळता दीप घेऊन सतत धावत राहिले पण कधी विझु दिला नाही की, त्यावर काजळी चढू दिली नाही. अशा या महान पुरुषाचा जन्म मूर्तिजापुर तालुक्यातील शेणगांव येथे झाला. वडिल झिंगराजी यांनी दारुपायी असलेला सर्व जमीन जुमल्याची वासलात लावली. आश्रयासाठी पत्नी व कुटुंबासह मावस भावाकडे आले. कांही दिवसांनी तिथेच त्यांचा देहान्त झाला.सखु बाईच्या भावाने बहिणीला व डेबुला कायमचे माहेरी घेऊन आले.आश्रित म्हणून दोघा मायलेकाने अतिशय हालाखीत दिवस काढले.गुरे चारणे दिवसभर शेतात राबराब राबावे आणि रात्री आईच्या कुशीत अश्रूंना वाट मोकळी करुन द्यावी.अशातच लग्न झाले मुलंबाळं झाली आणि एक दिवस डेबूजीं चे संचित पेटवून नव्या चैतन्याचा सूर्य उगवला.
एके रात्री पत्नी व मुली झोपल्या असतां,व पत्नीच्या उदरी तीन महिन्याचा गर्भ!अशा रात्री विचारमग्न डेबुजी पहाटे ताडकन उठले.सारे घर गाढ झोपेत! डेबुंनी जुने फाटके कुडते व धोतर नेसले. अंगणातील एक गाडगे व बाजुलाच पडलेली काठी घेऊन बाहेर पडले ते परत न येण्यासाठीच…एक मुक्तात्मा पिंजरा तोडुन समाजोध्दरासाठी मुक्त संचारासाठी निघाला….
हातात गाडगे,अंगावर गोधडी म्हणून गाडगेबुवा,गोधडीबुवा म्हणवल्या गेलेले हे संत महाराष्र्टभर भटकंती करुन आपल्या भजन कीर्तनातून मानवसेवा, भूतदया,शिक्षणाचे महत्व,जातीभेद,बळी प्रथाविरोध अश्या अनेक विषयांवर जन जागृती केली.स्वच्छतेचे महत्व स्वतः हाती झाडु घेऊन कृतीतून लोकांना धडे दिले.देव मूर्तीत नसून दिनदुबळ्या,अनाथ अपंगाच्या सेवेत आहे हे स्वकृतीने पटवून जनसामान्याच्या मनात रुजवले. स्वतः निरिक्षर असून शिक्षणाचे महत्व समजावून मोठमोठ्या शिक्षणसंस्थांना जन्म दिला.
अश्या या महान संताच्या आगळ्या वेगळ्या आचारविचारांचे,कार्याचे जीवन कार्य शब्दबध्द करण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.
चुकल्यास मोठ्या मनाने क्षमा करावी.नेहमी प्रमाणेच क्रीयाप्रतिक्रीया अपेक्षित!
मिनाक्षी देशमुख.
दि. २६-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – १.
अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,कांही सुतार,महार,टाकणकर ची परीटांच्या घरांची संख्याही बरीच होती.परीटास वठ्ठी म्हणूनही संबोधतात. त्यांची कामे बलुतेदारी पध्दतीने होत.या शेणगांवच्या मध्यभागी जानोजी जानोर करांचे घर होते.त्यांच्या मनमिळावु स्वभावाने ते अवघ्या गांवचे आवडते होते त्यांच्या नागोजी नांवाच्या पुत्राला तीन मुले! रानोजी,कराजी आणि जानोजी. जानोजी मुळातच हुशार.पुढे काटकसर करुन थोडा जमीन जुमला,गुरे ढोरे वाढविले.पण पोटी संतान मात्र झाले नाही.
रानोजी व पत्नी झिप्राबाई गरीब व सुस्वभावी दांपत्य.जानोजींनी शेती केल्यामुळे ते पंरपारिक धंद्यात जास्त लक्ष देऊ शकत नसल्यामुळे,त्याचाही धंदा रानोजीने सांभाळला.रानोजीला झिंगराजी नांवाचा एकुलता एक मुलगा! जाणोजीस मुलबाळ नसल्यामुळे पुतण्या वरच आपले सारे प्रेम व माया केली. वडिल व चुलत्याच्या कोडकौतुकाने झिंगराजी थोडे मनस्वी झाले.
१८५७ मधे स्वातंत्र्याचा वणवा पेटला पण खेड्यांमधे फारशी धग पोहचली नाही.देशमुख,इनामदार, सावकार इत्यांदींचे मनमानी शासन पूर्वी प्रमाणेच चालत राहिले.नंतर इंग्रज शासन आले.पूर्वी दारुचा प्रसार मराठी व मुसलमान अमंलामधे विशेष नव्हता.पण इंग्रज आले तेच मुळी इतर आधुनिक वस्तुंबरोबर दारुचे शिसे घेऊनच!इंग्रज राजवटीत मदीरापान हा राज्यकर्त्याचा शिष्टाचार मानला जाऊं लागला.हा वणवा चहुं बाजूने पेटला.गावोगावी दारुचे गुत्ते उघडले गेले.या दारुने खेडोपाडी घरांघरात प्रवेश करुन कित्येक कुटुंब देशोधडीला लागले.
अशिक्षित झिंगराजी,वडिल व चुलत्याचा एकुलता एक असल्यामुळे फारच लाडाकोडात वाढत असल्यामुळे गावातील उनाड पोरांबरोबर मनमानी वागु लागले.गावात होणार्या उत्सवामधे पूर्वी शंकरपट( बैलांची शर्यत) मधे भाग घेणे,अगदी स्वच्छंदी,मनस्वी वागणे, अशातच त्याकाळच्या रितीनुसार झिंगराजी ७-८ वर्षाचे असतांनाच शेण गावाजवळील दापूरे गावच्या हंबीरराव कोळसकरांची सुस्वभावी कन्या सखुबाई शी मोठ्या धुमधड्याक्याने विवाह झाला.
चुलता जाणोजीचे त्यांचेवर फार प्रेम!मरतेवेळी आपली सारी संपती झिंगराजींच्या हाती सोपवली शिवाय बलुतेदारी होतीच.त्यामुळे त्यांचे समाजात स्थान उंचावले.मानसन्मान प्राप्त झाला.गावकीच्या भांडण,तंट्याचे निर्णय,लग्न सोयरीत मान मिळू लागला. कांही दिवसांतच वडिल रानोजींचेही निधन झाले.आणि ते निर्भय झाले.
तरुण वय,संपत्ती,वडीलकी,आणि अविवेक,दडपण कुणाचेच नाही.भरीस घालणारे व फुकट खाणारे सगेसोयरे, मित्र!मग काय आनंदकल्लोळच!लेकरु व्हावे म्हणून देवदेवतांना कोंबडे बकर्यां चे बळी,पाठोपाठ तीर्थ म्हणून दारु आलीच.मुलगी झाल्यावर तिच्यासाठी केलेले नवस फेडण्यासाठी पुन्हा पशु बळी.मुलगी होऊन लगेच दगावल्याचे दुःख विसरण्यासाठी आणि कोण्या देवा च्या कोपाने मुलगी दगावली म्हणून कोप शांत करण्यासाठी पुनः बळी,तीर्थ म्हणून दारु!अशा प्रकारे दारुचा घरांत प्रवेश झाला.मुलाचे लक्षण बघून आई झिप्रा बाईने थोडी कानउघडी करुन सौम्य शब्दात आई झिप्राबाईने कांही सांगण्या चा प्रयत्न केलाच तर,घर सोडून निघून जाण्याची धमकी दिली की बिचारी झिंग्राबाई गप्प बसायची.
शेवटी व्हायचा तो परीणाम झालाच दारुपायी घरदार,शेतीवाडी सावकाराच्या घशात गेली.प्रपंच्याची झालेली धुळधान पाहून आई खचत गेली.आणि एक दिवस हाय खाऊन प्राण सोडला.आतां तर झिंगराजीला रानच मोकळे झाले. अश्या स्थितीतच झिंगराजी-सखुबाईस गोरेगोमटे,देखणे मुल झाले.अशा दुर्दशेत जन्मलेले हे डेबू नावाचे मूल पुढे श्रीसंत गाडगेमहाराज या नावाने सार्या महाराष्र्टात सुविख्यात होईल,आपल्या कर्तुत्वाने जनसामान्यांना सन्मार्गास लावेल हे कोणाच्या स्वप्नातही आले नाही शेती,गुरे,दागदागिने अगदी नांदते घर सारं सावकाराच्या घशात गेल्यावर लहान डेबूला घेऊन सखुबाई मोलमजुरीला जाऊ लागली.मिळालेली मजुरी सुध्दा हिसकावून गुत्यावर जावे,भरीस भर बायको मुलाला मारझोडही सुरु झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. २३-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – २.
शेवटी घरांतील शेवटचे भांडे व राहते घर विकल्या गेले. गावांत छी थू होऊ लागली.कुणी दारांत उभे करेनासे झाले.दारुने पोखरलेल्या व रोगाचे भक्ष झालेल्या शरीराने झिंगराजी गांव सोडून पलिकडे असलेल्या कोतगांवी यादवजी व बळीरामजी या दोघा मावसभावाकडे पत्नी व मुलास घेऊन त्यांच्या दारी आश्रयाला गेले.वास्तविक सखुबाईचे माहेर श्रीमंत,सर्वात धाकटी असल्याने अतिशय लाडकी,पण नवरा हेच सर्वस्व मानून निष्ठेने त्याच्यासवे दुर्दशा भोगत राहिली.मावस दिराच्या घरी लहानग्या डेबूला सांभाळत,घरांतील भरपुर कामे करत,आजारी नवर्याची सेवा करीत दिवस कंठू लागली.जन्मभर केलेली दुष्कृते शेवटच्या क्षणी झिंगराजी समोर उभी राहिली.डेबूला जवळ घेत पत्नीला म्हणाले,सखु! जवळ पैका होता तोपर्यत अवघे सगे सोयरे,मित्र गळ्यात गळा घालीत होते.आतां मुखात गंगाजळ घालायला एकजण नाही.तुला व डेबूला दुःखाच्या खाईत लोटले.आतां पश्चाताप करुन कांही उपयोग नाही.फक्त एक कर, पुढे डेबू काय करेल?कुठे राहील माहित नाही,पण त्याला देवदेवतांच्या नादी लागू देऊ नकोस.दारुच्या थेंबालाही स्पर्श करु देऊ नकोस.एवढे बोलले अन् प्राणज्योत मावळली.सखुबाई बेशुध्द होऊन नवर्या च्या प्रेतावर कोसळली.
झिंगराजीच्या मृत्युचे वृत्त सखुबाई चा भाऊ चंद्रभानजीस कळल्याबरोबर कोतेगावी येऊन बहिण व भाच्यास नेहमीसाठी दापूर्यास घेऊन आला. त्या वेळी डेबूचे वय ६-७ वर्षाचे होते.चंद्रभान जीचा मुलगा बळीराम त्यावेळी रांगत होता.त्याला सांभाळण्याची जबाबदारी डेबूवर आली.चंद्रभानची पत्नी कौतिक ला ही दोघे मायलेकरे जन्मभर इथेच राहतील म्हणून कपाळावर आठ्या पडले ल्या सखुबाईपासून लपून राहिल्या नाही. सखुबाई समंजस होत्या.त्या कामाला झडझडून कामाला लागल्या.त्यावेळी गिरण्या नसल्यामुळे भल्या पहाटे उठून जात्यावर दळण दळावे लागायचे.एवढ्या मोठ्या खटल्यासाठी किमान दोन पायली (४ किलो) दळण दळावे लागत.गोठ्याती ल शेण काढून गोठा स्वच्छ करणे,गाडा भर भांडी घासणें,एवढ्या मोठ्या घरा दाराचे सडा सारवण,सगळ्यांची कपडे नदीवर नेऊन धुणे,दुध दुपते बघणे, स्वयंपाक,शेतीचा बारदाना,ज्वारीची कापणी,मळणी,खळ्याचे काम,नंतर साठवणी,ही सारी कामे त्या निगुतीने मान मोडून करीत होत्या.विचार एकच की,आपला व मुलाचा भार वाटू नये.सखु बाई वाघीणीसारख्या कामाला भिडल्या. दळण दळीत असतांना सखुबाई सुरेल आवाजात ओव्या गात तेव्हा डेबू मांडीवर डोके ठेवून लक्षपूर्वक ऐकत असल्यामुळे सहजच पाठ होत असे,डेबूचे कपडे घरीच शिवत.जेवतांना मामी पक्षपात करतेसे पाहुन खुप वाईट वाटायचे.आईने समजावले की शांत होत.दुसर्या दिवसा पासून डेबू गुरे चारायला अनवानी पायाने रानांत जाऊ लागले.सवंगड्यासोबत दुपारी शिदोरी खावी,नदीत डुंबावे,सुरेल आवाजात भजने म्हणावीत.नाठाळ गुरांना वळवण्यासाठी गुरांमागे पळतांना पायात खोलवर काटे रुतत.लंगडत घरी आल्यावर आईने बीबा घालावा.दुसर्या दिवशी पुन्हा दुखर्या पायाने गुरे घेऊन जावे.आपल्या नवर्याच्या दुर्वतनाने लेका च्या नशीबी ही दुर्दशा आली म्हणून मुकाश्रू गाळीत राही.एवढ्या सकाळी गुरे नेतांना कोण भाजी भाकरी करुन देईल? रात्रीचीच उरलेली शिळी भाकरी सोबत बांधून घेऊन जाई.तिथे नाना जातींची मुले असत.त्याकाळी उचनीच असा समज बळावलेला,पण डेबूंनी सर्वांनी एका पंगतीत बसवून एकमेकांची भाजी ठेचा वाटून खात.शिवाशिव पाळू नये हा पाठ अगदी लहानपणीच पूर्णामायीच्या साक्षीने अजाणतां गुराख्यांमधे रुजवले.
डेबू सुरेल आवाजात भजने म्हणतो ही गोष्ट गुराख्यांकडून गावकर्यांना कळल्यावर दर शनिवारी व एकादशीस देवळात होत असलेल्या भजनांसाठी डेबू ला बोलावल्या जाऊं लागले.खेड्यात कुणाकडे कांही समारंभ असला की, परगावावरुन भजनी मंडळ बोलावल्या जात असे.डेबूंची भजनातील प्रगती पाहून त्यांनाही सोबत घेऊन जात.ऋणमोचनची पौष महिन्यातील यात्रेस भजनी मंडळींच्या फडामधे आवर्जुन डेबूंची उपस्थिती हमखास असायचीच.बाहेर गावी भजनाला गेल्यामुळे घरच्या कामा चा खोळंबा झाला की,मामीची कुरबूर चाले.आईने समजावल्यावर कामाचा खोळंबा न होता,भजने करुं लागले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ३.
डेबूजी नुसते गुरे चारणे,भजन म्हणण्यांतच प्रविण नव्हते तर,दुपारी गुरे थोडी विसावली की,विटीदांडू,सूरपारंब्या, गोट्या,कुस्त्या,हुतूतू,गोट्याकड्याही ते उत्तमप्रकारे खेळत असत.१२-१३ वर्षा च्या डेबूची कामसी वृत्ती बघून घरांत सर्वानांच ते हवेहवेसे वाटू लागले.थोरली बहिण म्हणून चंद्रभान सखुबाईचाही मान ठेवू लागला.एके दिवशी चंद्रभान बहिणी ला म्हणाला,डेबू किती दिवस ढोरे चारेल उद्यापासून आऊत हाकण्यास शेतात नेतो.खेड्यांमधे आऊतकर्यास मोठा मान असे.नांगरणे,पेरणे,कापणी यांत तरबेज झाले की,त्याला चांगला कसबी शेतकरी समज.रात्री आईने सांगीतल्या वर नविन काम शिकायला मिळेल म्हणून डेबूंना खुप आनंद झाला,हुरुप आला.
दुसर्या दिवशीपासून डेबू खांद्या वर आऊत घेऊन मामाबरोबर शेतात जाऊ लागले.नांगरण्या,वखरण्यातील खाचाखुणा शिकून कसब हासील केले. त्याचबरोबर पेरण्याचे ज्ञानही आत्मसात केले.त्यांचे सर्व काम अगदी शिस्त व साचेबंद असायचे.खळे उरकून धान्य घरी आले की,डेबू गावोगावी भजनाला जायला मोकळे.शेती व भजनाशिवाय त्यांना दुसरा कोणताच छंद नव्हता.
एका रात्री २-३ मित्रांसह डेबू शेतात असतांना कांही कापूसचोर भराभर कापूस वेचतांना दिसतांच संताप अनावर होऊन त्यांच्यावर धावून जाणार तोच मित्रांनी त्यांना आवरुन धरले कारण २०-२५ माणसांसमोर टिकाव नसतां लागला.चोर गेल्यावर खिन्न मनाने घरी येऊन घडलेली वार्ता सांगीतली.जीव धोक्यात घालणार होते म्हणून सारेच त्यांना रागावले.खंतावलेले डेबूजी पहाटे उठून स्मशानातील चिंचेझाडाखालच्या महादेवाजवळ जाऊन मनांतील व्यथा त्या तारणहाराला कथन केली.हा त्यांचा नेहमीचाच छंद!
डेबूजी शेतकामांत तरबेज झाल्या वर चंद्रभानने भाच्याच्या खांद्यावर सारा भार टाकून गावकीच्या कामात लक्ष घालू लागला.दापूर्याजवळ सांगवी दुर्गडे नावा च्या गावात तिडके सावकार अनेक पिढ्यांपासून धनाढ्य म्हणून प्रसिध्द!त्या काळी नोटांचे चलन फार कमी,सुरती रुपये वापरत असे,कर्जापोटी शेतातील आलेली पिके सावकाराच्या घरात गेले की,थोडी फार रक्कम शेतकर्यास मिळे. सावकार म्हणजे रस पिळून घेणारा उसाचा जणूं चरकच!एकदाका त्यात बोट जरी सांपडले की,रक्ताचा थेंब न् थेंब शोसून घेईपर्यंत सोडायचा नाही.बाहेर फक्त चिपाडच पडायचे.चंद्रभानचा सावकारावर फार विश्वास.सावकाराच्या गोड बोलण्याने तो सावकाराच्या पाशात कधी अडकला कळलेच नाही.
अंगपिंडाने भरलेले मुळचे तेजस्वी रुप,शरीराने सुदृढ डेबूजी १५-१६ वर्षाचे झाल्यावर आईला त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली.चंद्रभानच्या काना वर गोष्ट गेल्यावर तो म्हणाला,मी इतरां च्या सोयरीकी जुळवतो,भाच्यासाठी मुलगी बघणार नाही का?पण प्रत्यक्षात ही गोष्ट वाटली तेवढी सोपी नव्हती.स्वतः डेबूजी कशातच कमी नव्हते,पण होते तर मामाचे आश्रितच!हक्काचं स्वतःचं कांहीच नव्हते.कोणता बाप मुलगी देईल शेवटी कमालपूरच्या धनाजी खल्लारकर वठ्ठीने डेबूंजींचे कर्तुत्व बघून आपली ७-८ वर्षाची कन्या कुंताबाईचा विवाह बायकोच्या विरोधास न जुमानता लावून दिला.कर्त्यासवरत्या मुलाचे दोनाचे चार हात होऊन सून घरी आलेली बघून सखु बाईला आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान वाटले.घरचा सर्व भार डेबूजीं वर आला.मामेभाऊ बळीराम त्यांच्या हाताखाली तयार होत होता.
डेबूजींच्या लग्नासाठी चंद्रभानने सावकाराकडून नवीन कर्ज घेतले.ते फेडण्यासाठी दोन गोर्हे विकावे लागणार होते.पण हिम्मत होत नसल्याने वडिल हंबीररावांकरवी सागयला सांगीतले. दुसर्या दिवशी डेबूजी शेतावर निघाले असतां आजाने कर्ज फेडण्याची गोष्ट काढल्यावर डेबू उसळून म्हणाले,शेती कशी करायची?आधीच एक बैल आजारी आहे.मग त्याला कसायला वीक संतापाने म्हणाले,त्यापेक्षा मलाच बाजारांत उभे करा,नाहीतरी मी खायला काळच आहे ना?असं कसं बोलतोस?मग काय म्हणू?ज्या बैलाच्या जीवावर इतकी वर्षे शेती केली ते उपकार विसरुन कसायाच्या स्वाधीन करायचे तुमच्या मनांत आले तरी कसे? आपण कमी खाऊ,खुप कष्ट करुन सावकाराचे कर्ज फेडून मोकळे होऊ या!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग – ४.
तिडके सावकार कर्ज देऊन उपकार करत नव्हते तर,चक्रवाढ व्याजा ने पै न् पै जराही दयामाया न दाखवता वसूल करत होते.चंद्रभानजीस त्यांनी नाना निमित्याने भरमसाट व्याजावर कर्ज दिले होते.एकदाही हिशोब दाखवला नव्हता.कर्ज अगदी गळ्यापर्यंत आल्या वर चंद्रभानला बोलावणे पाठवले.तो आल्यावर समोर कर्जाचा डोंगर उभा केल्यावर,दोघेही मूर्तिजापूरला जाऊन दापूर्याची जमीन तीन वर्षाच्या फेड गहाण करारावर लिहून दिली.ही गोष्ट कुणाला कळू नये म्हणून चंद्रभानने बरीच दक्षता घेतली होती.पण कोर्टात चौघांच्या साक्षीने झालेला व्यवहार दापूरे करांच्या कानी आलेच.डेबूजींना कळले मात्र,संतापाने मामास म्हणाले,आम्हा कोणाला न विचारता,सागतां लिहून दिलेच कसे?दिले लिहून करा काय करायचे ते!
त्या दिवसापासून डेबूजीने अतिशय कठोरपणे सर्व खर्चावर आळा घातला. गुरांचे खाणे वगळतां,घरांतील खाण्यावर तेला,तुपावर बंदी आणली.कपड्यावरही आळा घातला.जुने बांधुन ठेवलेल्या कपड्यांनाच थिगळ लावून वापरायला लावले.सणावाराला गोडधोड करणे बंद केले.सावकाराचे कर्ज अंगावर असतांना सण साजरा करणे योग्य नाही.घरातील सर्वांच्या खाण्यापिण्याचे होत असलेले हाल बघून चंद्रभानच्या उरी बाण रुतल्या सारखे होत असे.त्याने मनाला फारच लावुन घेतले.हिंडणे फिरणे बंद केले.घरी अंथरुणावर पडून राहत.पश्चातापाने खंत करत खचत गेल्याने चेहर्यावर अवकळा आली.बारीक ताप येऊ लागला.खाणे पिणे वर्ज झाले.शक्य तेवढे औषधोपचार
केले पण उतार पडत नव्हता.एके दिवशी बळीराम,डेबूजी शेतात काम करीत असतांना मामा गेल्याचा निरोप आला.सावकाराच्या कर्जापायी मामाचा बळी गेला ही गोष्ट डेबूजींच्या मनाला फार लागली.ते खिन्न,उदास राहु लागले. प्रपंचातून मन विरक्त होऊ लागले.काट कसर म्हणून गुराखी कमी करुन स्वतःच भल्या पहाटे गुर रानात चरायला सोडून एकटेच बांधावर उदास बसून अभंग गुणगुणत.अक्षरओळख नव्हती पण बुध्दी तीव्र असल्याने ऐकून ऐकून अभंग भजनें मुखोद्गत झाले होते.एखादा अभंग त्यांच्या जिव्हारी लागला की चिंतनमग्न होत.सुर्योदय झाला की,पाखरांच्या चिव चिवाटाने चिंतनातून जागृत होत.बैल व गुरें घेऊन घरी परतत.वावरातील खुरपणी घरच्या सगळ्या मिळून मजुर न लावता करत.खाण्यापिण्यात होत असलेल्या आबाळाचा ताण सर्वांनाच जाणवू लागला.
अनवानी पायाने शेतात राबल्याने पायात काटे मोडत.कांही निघत,कांहीचे कुरुप होत.शेवटी शरीर किती तग धरणार?अति श्रमाने सडकुन अंगात ताप भरला.कसेबसे झोकांड्या खात घरी आले तर घरचे सारे शेतावर गेलेले,तहाने ने जीव व्याकुळलेला,दाराबाहेर पाखरां साठी खापरांत ठेवलेले पाणी,त्यांत पाखरांची विष्टा,नाइलाजाने ते खापर तोंडाला लावून त्यातील पाणी घटाघटा प्याले व तिथेच वळचणीखाली ग्लानीत पडून राहिले.संध्याकाळी घरची माणसें आल्यावर डेबूंची स्थिती बघून सारे धास्तावले.सखुबाईच्या तर तोंडचे पाणी पळाले.कातावून म्हणाल्या,हा पोरगा स्वतः खात नाही व दुसर्याला सावकारा च्या कर्जापायी सुखाने खाऊ देत नाही. एकच ध्यास सावकाराचे देणी लवकरात लवकर फेडून जमीन मोकळी करावी.
शेतातील आलेले पीक कापूस,तूर, ज्वारी सावकाराच्या स्वाधीन केल्यावर पावती मागतली तर,आश्चर्याने त्यांच्या कडे पाहत विचारले पावती कशाची?आजपर्यत पावती देण्याचा प्रघातच नव्हता का? नाही,आमच्यावर विश्वास नाही का? विश्वासाचा प्रश्नच नाही. गहाणाच्या कागदावर मामाचा अंगठा घेतलाच ना?मनी चरकलेले सावकार समजून चुकले,हे प्रकरण वाटते इतके सरळ नाही.हा कायद्यावर बोट ठेवून वागणारा आहे.वरकरणी दिवानजीला म्हणाले,याच्याकडून माल घेऊन सावकाशीने पावत द्या.प्रत्येक वर्षी डेबूंनी माल दिल्यावर पावती मागावी आणि सावकाराने पुढला वायदा करुन टाळावे. शेवटी एके वर्षी डेबूंनी माल न दिल्यामुळे सावकाराची माणसे खळ्यावर माल मागायला आले असतां पावती मिळाल्या शिवाय माल मिळणार नाही असे स्पष्ट सांगुन माणसे परत पाठवली. डेबूला नमवण्याचा उपाय सावकार शोधत होता.सांपडला रामबाण उपाय! पुर्णाकाठचे शेत वठ्यांच्या वहिवाटीत होते.त्याचा अद्याप कागद झाला नसल्या ने कायदेशीर मालकी सावकाराकडेच होती.डेबूंना बोलावून सावकार म्हणाला, पूर्णाकाठचा तुकडा…तो तर मामाने माझ्या नांवे केलेला आहे.पण ८-१० वर्षा पासून आमचीच वहीवाट आहे.असेल. त्याचा कागद माझे नांवावर आहे.यंदा माझा ताबा असेल.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-९-२०२१.
!!! संत गाडगेबाबा !!!
भाग -५.
सावकाराच्या या दुष्ट चालीने डेबूं च्या डोळ्यासमोर काजवे चमकले. गयावया करत सावकाराला म्हणाले,असं नका हो करु!तुमच्या कर्जापायी मामाने हाय खाऊन मामाने जीव गमावला आणि आतां हे ऐकून माझा म्हातारा आजा या घावाने मरुनच जाईल.काय करु मी?मी कांही पानपोई उघडून बसलेलो नाहीय! व्यवहार तर पहावाच लागेल ना?
भकास मुद्रेने डेबूजींनी घरी येऊन ही खबर सांगतांच सार्या घरावर जणूं आकाश कोसळले.आई,आजी, बायकोने रडून आकांत करुं लागल्या. वाघासारखे डरकाळत डेबूजी पर्वता सारखे उभे राहिले,पण घरचे सारे विरोधा त.त्यांना माहित होते,सार्या नाड्या सावकाराच्या हाती असल्यामुळे तो जसं नाचवेल तसं नाचावे लागेल.सगळे तहसीलदार,पोलीस सुपरिंटेंडेंट सगळ्यां शी जवळीक,इतकेच काय खुद्द कमिशनर सुध्दा हुरडापार्टीला त्याच्या घरी येत.अश्या या तिडक्याविरुध्द उभे राहणे म्हणजे थेट मरणाला आमंत्रणच!
आणि डेबूच्या बाजूने काय होते? सगळीच वैगुण्यें,परीटासारख्या नगण्य जातीत जन्म!गावांतील लोकांची कपडे धूवुन त्यांनी फेकलेला भाकर तुकडा गोळा करणें,लग्नकार्यात पायघड्या अंथरणें,अशा या पायीच्या वाहणेने पायातच राहावे,तीच त्यांची जागा. शिवाय ज्या शेतीसाठी भांडावे तेही स्वतःचे नव्हते.मामाने खरेदीखत न केल्यामुळे कायदेशीर शेताचा धनी सावकारच ठरत होता.डेबूजी कोण?तर मामाच्या अन्नावर पोसलेला,त्याच्या कृपेने जगणारा एक अनाथ मुलगा! शेजारी पाजार्यांनी समजावले,सावकारा शी झुंज म्हणजे वादळाशी कुस्ती खेळण्यासारखेच!सखुबाईने अन्नत्याग केला,आजा बेशुध्द,बायको फास घ्यायला निघालेली.डेबूजी शब्दही न बोलतां घराबाहेर पडून आपले आवडते स्थान स्मशानातील महादेवाजवळ वादळात सांपडलेल्या अवस्थेत मनीचे दुःख सांगत असतां त्यांना एक अभंग आठवला.
” जरी हे आकाश वर पडो पाहे।
ब्रम्हगोळ भंगा जाये।
वडवानळ त्रिभुवन खाये।
तरी मी तुझीच वास पाहे गा विठोबा।।
डेबूजी शांत झाले.देवाला शरण जाण्याचा निश्चय पक्का केला.देव पाठी असल्यावर कुणालाही भ्यायचे कारण नाही.आपण न्यायासाठी भांडायला निघालोय.आपला पक्ष सत्याचा आहे. इतकी वर्षे ती शेती आपण कसतोय, वहिवाटीचा आपला हक्क आहे.त्या शेता वर सावकाराचा काडीचाही संबंध नाही. हक्क नाही सोडायचा.खंबीरपणे उभे राहून तोंड द्यायचेय.घरच्यांचा,बायकोचा सुध्दा संपूर्ण असहकार!सगळे विरोधात. सर्वांनी मुर्खात काढले.डेबूजींचे मन उदास होऊन विरक्तीने भरुन आले.पण या विरोधानेच त्यांचा निश्चय अधिक दृढ झाला.रात्रभर महादेवाजवळ स्मशानात पडून राहिले.तांबडे फुटल्यावर उठले. नदीवर जाऊन स्नान केले.महादेवावर पाण्याचा अभिषेक करुन घरी परतले.
पावसाळा दारी उभा ठाकला. सावकाराचे आऊत शेतात पेरा करायला येण्याआधीच,मोठ्या पहाटे डेबू एकटेच आऊत घेऊन शेतात आले असतां, गावकरी हादरुन आपापसात कुजबुजले याचे काही खरे नाही.खुनाखुनी होऊन नक्की याचा मुडदा पडतो.डेबूजी शेतात गेल्याचे घरी कळताच सगळी शेताकडे धांवली.गळी पडू लागली,पण त्यांनी अश्या कांही जरबेने त्यांचेकडे बघीतले की, ते सारे एका बाजूने बसून टुकुटुक पाहू लागले.गावकरीही गोळा झाले.डेबूं नी वखर जुंपुन पाळी देणे सुरु केले.वार्ता कळतांच घोड्यावर बसून स्वतः तिडके सावकार,लाठ्याकाठ्या घेतलेली माणसें बैल,आऊत,आऊतकरी असा लवाजमा घेऊन शेताच्या बांधावर येऊन उभा राहिला.
अरे,ओ डेबूsss अबे ओs वठ्ठीs ! सावकाराने आपल्या दोन लठैतांना इशारा केल्याबरोबर दोघे तगडे गडी धावुन दोन बाजूंनी डेबूजींना धरले.जमले ल्या लोकांचा ठाव सुटून पुढे काय होते ते श्वास रोखून बघू लागले.सखुबाईच्या मुखे तर रडूही फुटेना.डेबूजी क्षणभर थांबले, हिसडा देऊन एकाला पालथे पाडले, दुसर्याच्या पोटात जोरदार लाथ घातल्या ने तोही कोसळला.आणि आऊत हाकण्याची मोठी काठी घेऊन वादळा सारखे सावकाराकडे धावले.चकित होऊन सारे कांड बघत असलेल्या सावकाराने रागरंग ओळखून घोड्याचे तोंड वळवतो,तोवर तीरासारखे डेबू त्याच्या जवळ पोहचून काठीचा जोरदार प्रहार घोड्याच्या पुठ्यावर हाणल्या बरोबर उधळलेल्या घोड्याने सावकारास घेऊन दिसेनासा झाला.सावकाराची दशा पाहून त्याच्याबरोबरचे लोक आल्या दिशेने शेताबाहेर पडले.माघारी वळून डेबूजी शांतपणे शेतात आऊत चालवू लागले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


