अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ३१.
नंतर कोंडोभटाला त्याची माहीती विचारली असतां,कोंडोभटने जी संपादणी मीराजवळ केली होती तीच राजारामांना सांगुन म्हणाला,महाराज! मी एक गरीब ब्राम्हण!पूर्वी थोरल्या महाराजांनी आमचे आप्त बाळंभट चितळेंना दिलेला अग्रहार काढुन घेतला होता,तो जर परत मिळाला…त्याचा लोभीपणा त्यांच्या लक्षात आला.ते म्हणाले,तुम्ही इथेच रामदासी मठात काम करा.ठीक आहे महाराज!
चिटणीस!ह्या कोंडोभटाची व्यवस्था करा.आणि मीराला विश्वासू माणसांसह तीच्या आईकडे महाराष्र्टात रवानगी करा.
इकडे १-१॥ महिना झाला तरी मीराची किंवा तिचे बंधू रुपाजी,बाबाजी ची कांहीच खबर न मिळाल्यामुळे हरणा बाईने हाय खाऊन प्राण सोडले.पांच वर्षाची वीरा एकटी पडली.कांही दिवस गांवकर्यांनी तीचे सांत्वन केले.नेहमी प्रमाणे आजही वीरा संभाजीराजेंच्या समाधीवर फुले वाहण्यास आली असतां बादशहाच्या कैदेतील येसूबाई व बाळराजेंची खबर काढण्याकरितां राजारामांनी पाठवलेल्या बंकी गायकवाड व उध्दव चक्रदेव राजाज्ञा, छावणीत जाण्यापुर्वी महाराष्र्टात आल्या वर संभाजीराजेंच्या समाधीचे दर्शन घेण्याच्या इच्छेने तुळापुरी समाधीजवळ आले असतां समाधीपुढे शोक करीत असलेली वीरा त्यांना दिसली.तीची सर्व हकिकत ऐकल्यावर म्हणाले,तुझ्या भाऊ रायांनी महाराष्र्टात शत्रूचा बिमोड करत नुसता धुमाकुळ घातला आहे.ते नेमके कुठे आहे हे माहित नसल्याने इथे एकटी राहण्यापेक्षा आमच्या बरोबर चल.
वीराने आपल्या चीजवस्तु एकत्र करुन गाठोडे बरोबर घेतले.घरांतील बाकी सामान देवजी पाटलाच्या स्वाधीन करुन आपण कोणाबरोबर,कुठे जात आहे हे मीरा आल्यावर तीला सांगण्यास सांगुन वीरा बंकी आणि उध्दव बरोबर निघाली.बादशहाची छावणी बीडला असल्याचे कळल्यावर दौड करत रात्रीच्या मुक्कामाला नेमके त्या वृध्द जोडप्याच्या झोपडीजवळ आले.त्या वृध्द होयबा चव्हाणाने मुक्कामास जागा दिली परंतु मीराचा तोंडवळा असलेल्या वीराला पाहुन त्या जोडप्याला संशय आला.मीराला जसं फसवुन आणलं तसं या मुलीला तर आणलं नसेल ना?दोघेही हळु आवाजांत बोलण्यातील मीराचा उल्लेख आल्याबरोबर वीरा झटकन विचारले,तुम्ही माझ्या मीराआक्काला ओळखतां?तेवढ्यात आत येत असलेल्या बंकीने ऐकल्यावर,त्या वृध्दा ला माहिती विचारल्यावर,तीला सुभानजी व बाजीने,तीचे भाऊ गंभीर जखमी आहे असे खोटे सांगुन कसे फसवुन आणले, नंतर तीला कसे बेशुध्द केले,तेवढ्यात सेनापतींचे स्वार नारोबांनी मीराला ओळखुन सेनापती संताजींच्या छावणीत कसे नेले ही सर्व हकीकत ऐकल्यावर बंकी वीराला म्हणाला,मीराची काळजीचे कारण नाही.ती सुरक्षित हाती असुन सुखरुप आहे.परत येतांना तीला घेऊन येऊ.
नंतर बंकीने फकीराचा वेश धारण करुन ही एका वैराग्याची मुलगी रस्त्यात सांपडली असा बहाणा करुन बादशहा च्या छावणीत त्याचा प्रवेश झाला की, मागाहुन मुलीच्या शोधार्थ बैराग्याच्या वेशात प्रवेश त्यानेही यावे असा बेत ठरला.ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी त्या वृध्द जोडप्याचा निरोप घेऊन मजल दर मजल करीत तिसर्या दिवशी,बादशहाची छावणी दोन कोसावर असतांना आपले घोडे विश्वासू मराठ्याकडे सोपवुन वेशांतर केले.छावणीजवळ येताच वीराने आपल्या मधूर आवाजात गायला सुरुवात केली असतां,छावणीतून एक किनखाबाने मढलेला,कशिदा काढलेला, झिरझिरत पडदा असलेला मेणा येत होता.तिचे गाणे ऐकुन मेण्यातील बेगमने तीला आपल्या डेर्यात आणायचा हुकुम केला.
मेण्याच्या मागुन फकीराच्या वेशात बंकी जात असतांना आजुबाजुचे व छावणीचे पूर्ण निरिक्षण,अवलोकन करीत होता.मेणा जनाना डेर्याजवळील भव्य शृंगारलेल्या तंबुपुढे ऊभा राहिला. मेण्यातील बेगम राणीसाहेबांंच्या तंबुत येऊन म्हणाली,राणीसाहेब! तुम्हाला दाखवायला एक मुलगी आणली.शाहू राजे कुठे आहेत.ते ज्योत्याजीबरोबर कसरतखान्यात गेलेले आहेत.मेण्याच्या मागे एका फकीराशेजारी सुस्वरुप मराठ्याची मुलगी दिसली.फकीराने किंचित डोके नमवले.येसूबाईंनी बंकी गायकवाडला तुरंत ओळखले,पण चेहर्यावर तसे दिसू दिले नाही.बेगम फकीराला म्हणाली,ही मुलगी तर मराठ्याची दिसते,तुझ्याजवळ कशी?ही कुलवंताची मुलगी,आई नुकतीच निवर्तली,बहिणीला शत्रूने फसवुन नेले. ही एकटी असल्याने एका साधुवैराग्याने सांभाळले.पण चार दिवसांपासुन त्याची व हीची चुकामुक झाली.भटकत असतांना मला सांपडली.ती बेगम म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसुन झेबुन्निसा होती
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ३२.
येसूबाई वीराला म्हणाल्या,तू अशी भटकत राहण्यापेक्षा आमच्या तैनातीत राहा,तुझा तो वैरागीही राहील. बेगम म्हणाल्या,राणीसाहेब! हिचा कंठ मधुर आहे.आपली छान करमणुक होईल तेवढ्यात ज्योत्याजीसह बाळराजे शिवाजींनी प्रवेश केला.शिवाजी आंत येताच वीरा त्यांच्याकडे बघतच राहिली. शिवाजींना आतां बादशहाच्या छावणीत शिवाजी नांव बदलुन शाहू ठेवल्यामुळे सर्वजण त्यांना शाहूच म्हणत,पुढे तेच नांव कायम झाले.वीराला वाटले ज्या राजाची सेवा करण्याची आपण शपथ घेतली तोच हा राजा आपल्यापुढे ऊभा आहे.आणि उत्स्फुर्त तीच्या गळ्यातुन गाणे बाहेर पडले.
तेवढ्यात मुलीला शोधत असलेला बैरागी आल्याची खबर आली,बेगमने त्याला आंत घेऊन येण्याची आज्ञा देऊन ती तंबुतुन निघुन गेली.ती गेल्यावर राणी हळुच म्हणाल्या,बंकी! तुमचा संशय तर कुणाला आला नाही ना?नाही राणी साहेब!उद्या इथला निरोप नेण्यासाठी फकीराच्या वेशात येईन.उध्दव इथेच राहिल.राजाराम महाराजांची तशी आज्ञा आहे.बंकीने येसूबाई व शाहूराजेंना मुजरा करुन गेल्यावर,सांगा उध्दव, भावोजींची काय खबर?तेथील राज्य व्यवस्था कशी आहे?
उध्दवने क्रमाक्रमाने चंदीची सर्व हकिकत,विशाळगडची माहिती, महाराष्र्टात आपले सरदार बजावत असलेली कामगिरी सांगुन,या वीराने आपल्या बहिणीबरोबर संभाजीराजेंच्या समाधीवर घेतलेली शपथ,मीरावर आलेल संकट हे सारे राणीसाहेबांना सांगीतल्यावर त्या म्हणाल्या,स्वराज्याची अशी तळमळ लागलेले जीव संपूर्ण महाराष्र्टात पसरले असतां,मामंजींच्या या स्वराज्याला केव्हातरी धक्का लागु शकेल कां?
उध्दवने बादशहाच्या छावणीचे, तेथील सार्या परिस्थितिचे बारीक अवलोकन व राणीसाहेबांचा निरोप लिहून बंकीहस्ते चंदीला राजारामांकडे पाठवले.येसूबाईनी लिहिले,भावोजी! आम्ही इथे आल्यावर झेबुन्निसा बेगमने बाळराजेंना पुत्रवत मानतात त्यानात्याने बादशहा त्यांना आपला नातू मानतो. आणि त्याप्रमाणेच त्यांची बडदास्त ठेवतो.कैदेत जरी असले तरी छावणीत त्यांचा मुक्तसंचार आहे.आपण आम्हास टाकुन निघुन गेलात हे बादशहाला पटले नाही.आम्हास येथुन हरप्रकारे सोडवुन नंतर एकत्रीत होऊ असा मनी संकेत धरुन विशाळगडी बायका ठेवल्या, आपण चंदीला व बायका या प्रांती हे ठीक नाही,आपल्याला पुत्ररत्न झाले पण अद्याप भेट नाही.विशाळगडावरुन बायांना घेऊन जावे,यात हयगय नसावी.सर्वतोपरी इथे आम्ही जरी सुखात असलो तरी विषवत्,महान संकटात आहो.आपला सांप्रत पत्र व्यवहार सुरु राहिलच!
वहिणीसाहेबांची आज्ञा शिरसावंद्य पण शत्रूचा एवढा धुमाकुळ सुरु असतांना,आपण सडे होतो म्हणुन अनेक संकटांचा सामना करत इथपर्यंत पोहोचलो.पण ही बायकामंडळी एवढ्या दूरुन कशी आणायची?प्रश्न मोठा बिकट आहे.प्रल्हाद निराजी म्हणाले,तिकडे गोंडवण,वर्हाड हा उत्तरेकडील प्रांत शत्रूला चेपण्याचे काम परसोजी भोसले आणि हैबतराव निंबाळकर करीत आहे. कृष्णा,भीमा मधल्या प्रातांत आलेल्या शत्रूचा समाचार संताजी धनाजी घेत आहे.मावळ प्रातांतील शत्रूस शंकरजी नारायण आणि महाराष्र्टातील इतर किल्ल्यांचा बचाव परशुराम त्र्यंबक करीत आहे.स्वराज्य रक्षण करण्या करितां आपले लहान थोर सरदार रक्ताचं पाणी करीत आहे.त्यामुळे बादशहाचे सर्व लहान मोठे सरदार इकडे कर्नाटकात घुसले आहे.म्हणुनच इथपर्यंत कबिला कसा आणायचा प्रश्न पडला आहे.
महाराजांनी ही कामगिरी माझेवर सोपवल्यास हरप्रकारे खाश्या मंडळी सुरक्षित इथे घेऊन येईन.पण चिटणीस! तुमचं कुटुंब इथे आजारी असतांना…
महाराज स्वामी कार्यात घरचा विचार करायचा नसतो.शिवाय आपण इथे असल्यावर मला काळजीचे कारणच काय?चिटणीसच हे कार्य करुं शकतात प्रल्हादपंत म्हणाले.
मग चिटणीस! निघायची तयारी करा व जातांना मीराला घेऊन जा. विशाळगडावरुन कांही विश्वासू माणसां बरोबर तीची आईकडे रवानगी करा. चिटणीस मुजरा करुन निघुन गेले.
बंकी!बाळराजे शिवाजी कसे आहेत?शहजादी बेगमचा तर राजे जीव की प्राण आहेत.ज्योत्याजीजवळ बाळ राजे कसरत शाळेत दांडपट्टा,बरची, भाला शिकत आहेत.खुद्द बादशहा दरबारात आपल्याजवळ बसवतो.परंतु त्यांना शिवाजी न म्हणता शाहूराजे म्हणुनच संबोधतो.म्हणजे शिवाजी नांवाची बादशहाला दहशत बसली म्हणायची!रामराजांची आज्ञा घेऊन खंडो बल्लाळ चिटणीसांनी मीरासहित चंदी सोडली.
परंतु तीचे शत्रू बाजी सुभानजीचे काय
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ३३.
झुल्फिकारखानाने बाजी व सुभानजीच्या तोंडाला गरम राखेचे तोबरे बांधुन झाडाला दोन हिंदुंना झाडाला उलटे टांगल्याची सजा दिली ही बातमी, खानाच्या मदतीला आलेल्या नागोजी माने या मराठा सरदाराला कळताच त्याने खानाजवळ रदबदली करुन आपल्या गोटात छावणीत आणुन त्यांचा औषधोपचाराची व्यवस्था केली. कांही दिवसांनी त्यांच्या जळलेल्या तोंडाच्या जखमा बर्या होऊन ते बोलण्याच्या स्थितित आलेले पाहुन नागोजी माने सरदार त्यांच्या भेटीस आले असतां दोघांनीही उठुन मुजरा केला. तुम्ही जो गुन्हा केला तो कोणत्या हेतूने केला,पैसे मिळवण्या च्या,मानमरातब वा वतनवाडी मिळवण्या च्या हे कांहीही न लपवता खरे सांगीतले व मला पटले तर मी मदत करीन.
नागोजी सरदाराचे ऐवढे भक्कम आश्वासन मिळाल्यावर बाजी व सुभानजीने सर्व हकिकत सांगुन म्हणाले आतां फक्त संताजीचा सूड घेणे एवढीच इच्छा आहे.आज तो मराठ्यांचा सेनापती आहे,एक लक्ष सैन्य त्याच्या हाताखाली आहे.मोठमोठ्या सरदारांना तो भारी आहे.तरी त्याचा सूड उगवणे हे माझे अंतिम ध्येय आहे.असे म्हणुन कोंडो भटाची युक्ती नागोजीला सांगीतल्यावर नागोजीला पटली.तो म्हणाला,संताजी – धनाजी मधे फूट पाडून विशेषतः संताजी विरुध्द राजारामांचे मन कलुषित झाले तर काम बिनतोड होईल यात शंका नाही
या संताजीवर माझा पण फार दिवसांचा डोळा आहे.माझ्या सासर्याला या संताजीने मारले,भावाला छोट्याश्या अपराधासाठी हत्तीच्या पायी दिले.आम्ही पिढीजात बादशहाचे नोकर!माझे वडील रताजी बिन नरसिंगराव हे विजापूर बादशहाचे मोठे नामांकित सरदार होते. विजापूर दरबारात त्यांचे विशेष वर्चस्व असल्यामुळे मोठमोठे यवन सरदार त्यांना वचकुन होते.१६६५ मधे जयसिंग व दिलेरखानाने विजापूरवर स्वारी केली तेव्हा त्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. सर्जेखानसारख्या प्रतिष्ठीत वजीराने हुजुर दरबारांत रताजीरावांची तारीफ करुन अनेक किताबवंती व इनामे देवविली.त्यांच्याप्रमाणेच त्यांचा हा मुलगा नागोजीही शूर होता.त्यालाही सरदारकी मिळाली.परंतु वडिल वारल्या वर विजापूर दरबारांत बेबनाव झाल्याने विजापूरकरांची नोकरी सोडुन औरंगजेबा ची सरदारकी पत्करली.आणि त्याने दिलेल्या सेवेचा गौरव होत गेला.
आपण येवढे बलाढ्य असल्यावर अद्यापी सूड कसा उगवला नाही?या सुभानजीच्या प्रश्नाचे उत्तर त्याचे जवळ नव्हते.कारण संभाजीसारख्या योध्याशी सामना देण्याची हिंमत नागोजी मानेच्या अंगी नव्हती म्हणुन कुटील डाव रचुनच वाम मार्गाने सूड घेण्याची संधी तो शोधत होता.मीराचे केलेले वर्णनाने त्याच्या मनी लालसा निर्माण झाली.मीराला हस्तगत करण्याची कामगिरी बाजीवर सोपवली. पन्नास स्वारांचे पथक व द्रव्याची थैली त्याच्या स्वाधीन केली.आणि बाजी एक लहानसा सरदारच बनला.चंदीवरुन येणारे जेवढे मार्ग होते त्या प्रत्येक मार्गा वर आपला मनुष्य ठेवुन कोंडोभटाचा शोध चालविला.लोभी कोंडोला मोठी द्रव्याची लालूच दाखविली की,तो मदत करेल याची खात्री होती.आणि झालेही तसेच.
चिटणीस खंडो बल्लाळ बंदोबस्तात मीराला तिच्या घरी पोहचवण्यास उदईक निघणार ही वार्ता कळल्यावर,मीरेसह चिटणीसाची वाट बघत मार्ग रोखुन बाजी बसला.चंदीच्या पायथ्याशी शत्रू असल्यामुळे युक्तीने खंडो बल्लाळ प्रथम वृध्दाचलमला उतरुन कावेरी तीराने थेट म्हैसूर गाठले.सह्याद्री पठार लागतांच निर्भय झालो असे वाटुन मुक्काम करीत निघाले.
इकडे डोळ्यात तेल घालुन वाट बघत बसलेल्या बाजीला चार दिवस झाले तरी चिटणीसांचा मागमुसही न लागल्याने पुन्हा स्वार पाठवुन कोंडोभटा कडे चौकशी केली असतां,त्याने निरोप पाठवला,मीराला हस्तगत करण्यासाठी विशाळगड गाठा.त्याप्रमाणे त्याने लगेच पाठलाग सुरु केला.दुरर्या दिवशी विजापूरच्या हद्दीवर भेटलेल्या धनाजीं च्या सैन्यांना आपण संताजीच्या पथकातील असल्याची थाप ठोकुन तेथुन निसटला.अशीच वाटेतील वेगवेगळ्या पथकांच्या सैन्यांना हुल देत शेवटी चौथ्या दिवशी विशाळगडाजवळील विसुरीच्या घाटात त्याने चिटणीसाला जवळजवळ गाठलेच!
क्रमश
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ३४.
आपले ध्येय गाठण्यासाठी अर्ध्या कोसाचे अंतर राखुन बाजी चिटणीसांच्या इतक्या जवळ आला.विशाळगडी पोहचण्यापुर्वीच हल्ला करुन मीराला हस्तगत करण्याचा बाजीचा बेत होता. परंतु चिटणीस करवीरच्या हद्दीला लागताच त्यांचे सैन्य वाढत गेले आणि बाजीचे स्वार त्याला सोडुन गेल्यामुळे त्याच्या सैन्याची संख्या कमी होत गेली. आतां फक्त ८-१० स्वारच त्याच्या जवळ राहिले.त्यामुळे उघडा हल्ला करण्याची हिंमत त्याच्यात नव्हती.चिटणीस मीरा सह सुरक्षित विशाळगडला पोहोचले. रामचंद्रांची भेट झाल्यावर खाश्या कबिला चंदीला कोणत्या मार्गे न्यावे या बद्दल खल झाला.इथुन खाश्या कबिला नेणं धोकादायकच नव्हे तर जिवावरचं आहे.
मी इथे येत असतांना वाटेत ज्या बातम्या मिळाल्या त्यानुसार बादशहाची बहुतेक फौज महाराष्र्ट सोडुन चंदीकडे वळली आहे.मराठेशाही मोडत नाही असे वाटुन तो वरचेवर कर्नाटकात फौजा रवाना करीत आहे.मराठी फौज हिंडती फिरती राहुन लढाया करुन खंडण्या घ्याव्या,बादशहाची ठाणी उठवावी, आपले नाके,किल्ले कोट सुरक्षित करुन बादशहाचा मुक्काम असेल तेथे छापे मारावे,मुलुख मारावा,सामानसुमान,हत्ती उंट न्यावे असा मराठ्यांनी चौफेर धुमाकुळ घातल्यामुळे एका ठीकाणी राहुन लढाई सुध्दा करतां येत नव्हती. यवन फौज जिंजीकडे रवाना झाली की, लुटत,छापे,हल्ले चढवुन रोखत होते. एकंदरीत मराठ्यांनी बादशहाला पळती भूमी थोडी केली होती.मराठ्यांनी प्राणां ची पर्वा न करतां स्वराज्यासाठी झटावे, आणि महाराजांकडुन सरंजामाच्या सनदा घ्याव्यात,शिपाईगिरीची शर्थ करावी,खाण्यापिण्याची,थंडी,ऊन,
पाऊस,अंधार,अडचणी कांही न पाहतां चालत्या घोड्यावरच हरभरे,भाकरी, चटणी खाऊन रहावे,अशास जिंकावे तरी कसे?हे आदमी नसुन भूतं आहेत असे बादशहाला वाटत असे.
आपल्या सरदारांचा बेफाणपणा मलाही आवरेनासा झाला.संताजी तर बेगुमानपणे वागु लागले.पंत ही सूडाची भडकलेली आग आहे.बादशहाचा पुरता बिमोड झाल्याशिवाय ही आग शमणार नाही.शेवटी खाश्या कबिला जलमार्गाने नेण्याच्या चिटणीसांच्या बेताला सर्वांनी संमती दिली.त्याप्रमाणे चिटणीसांनी आपले मामा लिंगो शंकर व विसाजी शंकर यांच्या मदतीने जलमार्गे जाण्याचा बेत निश्चित झाल्यावर,रामचंद्रपंत तारा बाईंना सुचना आणि मीराबरोबर दिलेल्या चार स्वारांची चौकशी करायला आले. मीराने वाटेत घडलेली हकिकत सांगुन म्हणाली,त्या चौघांना बाजीने यमसदनास पाठवले.ताराबाई म्हणाल्या,पंत! ते चार स्वार सरकारकामी आलेत,त्यांच्या कुटुंबा ची व्यवस्था करुन बालपरवेशी(लढाईत कामी आलेल्या शिपायाच्या कुटुंबाला दिलेला पगार किंवा पेंशन किंवा गांव जमीन) सुरु करा.
मीरालाही सुरक्षित पाठवण्याची व्यवस्था करा.तेवढ्यात बादशहाचा सांपडलेला लखोटा घेऊन एक मराठा रात्रीचा दिवस करुन गडावर आल्याची बातमी घेऊन हुजर्या आला.त्या माणसाला खलबतखान्यात नेतांना मीराला तो ओझरता दिसला व तीची चर्या खाडकन उतरली.एखाद्या दगडी पुतळ्यासारखी जागच्याजागी स्तब्ध झाली.मीराची अशी एकाएकी स्थिती कां झाली?ओळखीचा होता का?कोण होता
पंतांनी त्याच्या हातातील लखोटा उलटा सुलटा करुन पाहत खोदुन खोदुन विचारल्यावर त्याने सांगीतले,मी आडपाडीच्या पाटलाचा पुतण्या सुभानजी असून धनसिंगराव जाधव शिलेदारी पथकात आहे.चुलते आजारी म्हणुन त्यांना भेटुन परत पथकात जाण्या साठी निघालो असतां कर्हाड जवळ एक यवनस्वार मराठ्याच्या वेशात भेटला.तो सेनापतींच्या लष्करात असल्याचे सांगीतल्याने दोघे मिळुन निघालो.वाटेत कृष्णाकाठी दोघांनी न्याहारी केली. विश्रांती साठी पहुडले असता त्याच्या मुंडाशातुन हा लखोटा डोकावतांना दिसला.चुपचाप लखोटा काढुन,त्याला तिथेच सोडुन तुम्हाला देण्यासाठी अविरत दौड करुन आपल्या पर्यंत आलो मला पथकात जाण्याची आज्ञा द्या.आज च्या दिवस आराम करुन उदईक जा. पंतांनी हुजर्यास बोलावुन त्याची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. लखोट्यातील मजकुर वाचुन पंतांची चर्या काळवंडली.खोटा म्हणावा तर बादशहाचा वजीर आसदखानचा शिक्का मोर्तब होता.त्या लखोट्याची ताराबाईंना जिज्ञासा होती म्हणुन पंताला बोलावणे पाठवले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २-६-२०२१.
भाग -३५.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग -३५.
ताराबाईंच्या बोलावण्यानुसार आंत आलेल्या पंतांचा काळवंडलेला व चिंतातूर चेहरा पाहुन त्यांनी आश्चर्याने विचारले,काय झाले पंत?बादशहाच्या कैदेत असलेल्या बाई व शिवाजी ठीक आहेत ना?सर्व ठीक आहे बाईसाहेब, पण या पत्रातील मजकुराने मी हतबध्द झालोय.बादशहाने संताजीला लिहिलेल्या पत्रात सेनापतींच्या अटी मान्य करुन,त्याच्या म्हणण्यानुसार वागण्याचे मान्य केले.म्हणजे?सेनापती संताजी घोरपडे बादशहाला फितूर झाले या पत्रातुन असाच अर्थ निघतो.पंत म्हणाले हे जर खरे असेल तर मग कारभार आटोपलाच!त्यांनी स्वराज्या साठी गाजवलेली मर्दुमकी बद्दल स्वप्नातही शंका येऊ शकत नाही.पण हा लखोटा?मन थोडे शंकीत झाले खरे!त्यात अलिकडे त्यांचं बेपर्वाईचं वर्तन, फौजेतील अति कडक शिस्त,त्यामुळे सैन्यही नाराज असल्याच्या कागाळ्या आल्या आहेत.आज ते सेनापती असल्या मुळे त्याचेजवळ लाखभर फौज आहे तेव्हा..
पंत तुम्हाला जर शंका असेल तर, त्यांच सेनापतीपद काढुन धनाजी जाधवांच्या हवाली करा.तेही संताजीच्या तोडीचे आहेत.पण बाईसाहेब!पद बदलण्याची एकदम घाई करुं शकत नाही.संताजीचं सेनापतीपद काढल्यास विपरित परिणाम होण्याचा संभव आहे. त्यांचे एक लक्ष सैन्य उलटले तर स्वराज्याच्या ठीकर्या उडायला वेळ लागणार नाही.या गोष्टीची पूर्ण खात्री, चौकशी व शहानिशा करुनच विचार करावा लागेल.
बाहेर ऊभी असलेल्या मीराने हा सारा संवाद ऐकला.संताजी आणि फितूर? शक्यच नाही.हा सुभानजीचा कांही तरी कुटील डाव आहे.सुभानजी किती कुटील आहे हे तीला चांगलेच माहित असल्याने याचा पर्दाफाश करण्या साठी ती रामचंद्रपंतांच्या वाड्याकडे निघाली.चिटणीस आणि रामचंद्रपंत खलबत करीत असतांना ती तिथे पोहचली.नम्रपणे सुभानजीने आणलेल्या पत्राबद्दल बोलण्याची अनुमती मागीतली त्याचे नांव सुभानजी आहे हे तुला कसं कळल?महाराज आतांपर्यंत जेवढी संकटे आलीत ती या दोन दुष्टांमुळेच!एक हा सुभानजी व दुसरा त्याचा साथीदार बाजी कदम!आतांपर्यंत तीच्याबरोबर घडलेली विपत्ती कथन करुन म्हणाली, महाराज संताजी कधीही स्वराज्यद्रोही होऊ शकत नाही.त्यांची शिस्त असेल कडक,थोरल्या महाराजांची शिस्त का कमी कडक होती?या पत्रात नक्की कांही तरी काळंबेरं आहे.सुभानजीला बोलावुन साम,दाम,दंडा ने त्याच्याकडुन खरं वदवुन घ्या.मीराचे म्हणणे पटल्याने त्यांनी लगेच हुजर्याला पाठवुन बोलावुन आणण्याची आज्ञा केली.त्याला हुजर्या बोलावण्यास गेला असतां,पंतांच्या कामाने जायचे कारण सांगुन पागेतील नव्या दमाचा घोडा मागुन तो निघुन गेल्याचा निरोप पंतांना सांगीतल्यावर,पत्र बनावट असल्याची खात्री झाली.त्याला पकडुन आणण्यास त्याच्या मागावर स्वार रवाना केले.तरी देखील या पत्राने ताराबाई,इतर राजस्रीया व खुद्द पंताच्या मनांत शंका तर निर्माण झालीच.
इकडे सुभानजी विश्रांतीकरितां पागेत जातांना त्याला ओझरती मीरा दिसल्यामुळे ती आपला नक्की भांडा फोड करेल,या विचाराने तात्काळ तिथुन पलायण केले.राजरस्त्याने न जातां घणसळीच्या जंगल मार्गाने लागुन निबिड अरण्यात घुसला.एवढ्यात कोणीतरी आपल्या मागावर आले आहे असे वाटले. तो मनुष्य सुभानजी,सुभानजी म्हणुन मारलेल्या हाका बाजीच्या आहे हे ओळखले.जवळ आल्यावर गडावर पत्र पोहोचवल्यावर मीरा दिसल्यामुळे कसा पळ काढला हे बाजीला सांगीतले. जंजीर्याचा हबशी कासम हा ऐषारामी व रंगेल आहे,मीराला हस्तगत करुन त्याच्या स्वाधीन करण्याचा कुटील डाव रचुन तिथल्या गुहेसारख्या कपारीत बाजीच्या उरलेल्या स्वारांसहित मुक्काम करण्याचे ठरविले.
दुसर्या दिवशी चंदीस जाण्यासाठी खाश्या स्रीयांचे मेणे खंडो बल्लाळ व रक्षणार्थ २००-२५० सशस्र स्वार निघाले. मध्यानसमयी सर्व कबिला घाट उतरुन सालपे गांवी आले.खबर मिळतांच चिटणीसांचे मामे लिंगो शंकर व विसाजी शंकर येऊन यशवंतगडाच्या बंदरांत तयार असलेल्या जहाजातुन पूर्व किनार्याहुन चंदीस सुरक्षित पोहचवण्या साठी स्वतः लिंगो शंकर आला.
खंडो बल्लाळ एकांतात मामाला म्हणाले,मामा! एका स्रीला तिच्या घरी तुळापुरी सुखरुप पोहोचवण्याची माझेवर जबाबदारी आहे.मामाने एक विश्वासू वाटाड्या व दोन सशस्र स्वारासह मीराला रवाना केले.तिला वाटले आतां आपण निर्विघ्न घरी पोहचु,पण तिचा शत्रू बाजी त्याच्याजवळ फक्त राहिलेल्या दोन स्वारांनिशी तिच्या मागुन येत आहे हे बिचारीला कुठे माहित होते?तिसर्या दिवशी कुंभारली घाटमाथ्याशी असल्याने शिरगांवात मीराची अडचण आल्याने चार दिवस मुक्काम करणे भाग पडले. बाजीही तीच्या मागावर थांबला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ३-६-२०२१.

