“५ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 5 jun
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ५ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८६१ ते १८७२ चे पारायण आपण करणार आहोत.
५ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २६ ते ५०,
26-12
अमृताचिया सागरी । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळी घेतलेया ॥26॥
अमृताच्या समुद्रात अमर करण्याचे जे थोर सामर्थ्य असते, तेच त्याच्या एका लहरीतून निघालेल्या चूळभर अमृतातही असते.
27-12
हे कीर माझ्या चित्ती । प्रतीति आथि जी निरुती । परि पुसणे योगपती । ते याचिलागी ॥27॥
अर्जुन म्हणतो, भगवंता ! त्याप्रमाणेच तुझी व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही स्वरूपे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत, असाच माझ्या चित्ताचा निश्चित अनुभव आहे; पण योगपती देवा ! तुम्ही जे थोडा वेळ व्यापकरूप धारण केले, तेच तुमचे खरे स्वरूप होय,
28-12
जे देवा तुम्ही नावेक । अंगिकारिले व्यापक । ते साच की कवतिक । हे जाणावया ॥28॥
की क्षणभर त्या स्वरूपाचे लीला कौतुक मला दाखविले, हे जाणून घेण्याकरिता मी पुढील प्रश्न विचारीत आहे.
29-12
तरी तुजलागी कर्म । तूचि जयांचे परम भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥29॥
ज्यांची सर्व कर्मे तुझ्याकरिता होतात, ते तुलाच आपली परमगती समजतात, त्यांचे सर्व मनोविकार देखील तुझ्या एक प्रेमाकरिताच उठतात.
30-12
इत्यादि सर्वी परी । जे भक्त तूते श्रीहरी । बांधोनिया जिव्हारी । उपासिती ॥30॥
हे भगवंता ! याप्रमाणे तुझ्या ठिकाणी सर्वभाव समर्पण करून व तुला अंतःकरणात साठवून, जे भक्त तुझ्या एकदेशीय साकारस्वरूपाची उपासना करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-12
आणि जे प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जे कानडे । कायिसयाहि सांगडे । नव्हेचि जे ॥31॥
आणि जे ज्ञानी पुरुष प्रणवाच्या पलिकडे असलेल्या, शब्दाचा विषय न होणार्या, किंवा जे कशासारखे आहे असे दाखविता न येणार्या-
32-12
ते अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित । सोहंभावे उपासित । ज्ञानिये जे ॥32॥
अविनाशी, ईंद्रियातित, संपूर्ण दोषरहित-म्हणजे शुध्द- देशांनी मर्यादित नसलेल्या, तुझ्या व्यापक स्वरूपाची सोहंभावाने ” मी तै ब्रह्म आहे ” अशा ध्यानाने उपासना करतात.
33-12
तया आणि जी भक्ता । येरयेरांमाजी अनंता । कवणे योगु तत्त्वता । जाणितला सांगा ॥33॥
असे जे ज्ञानी भक्त या दोहोंमध्ये, अनंता ! खरे ऐक्याचे स्वरूप कोण जाणतो, हे मला सांग.
34-12
इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करू ॥34॥
असे अर्जुनाचे भाषण ऐकून तो जगद्बंधु परमात्मा श्रीकृष्ण अत्यंत संतुष्ट झाला व म्हणाला अर्जुना ! उत्तम प्रश्न कसा करावा हे तूच जाणतोस.
श्री भगवानुवाच
। मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥12. 2॥
श्रीकृष्ण म्हणाले माझे ठिकाणी मन ठेऊन नित्य युक्त होवून अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. ॥12-2॥
35-12
तरी अस्तुगिरीचिया उपकंठी । रिगालिया रविबिंबापाठी । रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥35॥
सूर्यबिंब अस्ताचलाच्या आड झाले असता, सूर्यबिंबाच्यामागून ज्याप्रमाणे अर्जुना ! त्याची किरणेही जातात,
36-12
का वर्षाकाळी सरिता । जैसी चढो लागे पंडुसुता । तैसी नीच नवी भजता । श्रद्धा दिसे ॥36॥
किंवा अर्जुना ! पावसाळ्यात जसा नदीला पूर येतो, त्याप्रमाणे माझे भजन करीत असतांना ज्याचे ठिकाणी नित्य नवी श्रध्दा किंवा वाढते प्रेम दिसून येते.
37-12
परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु । तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥37॥
ज्याप्रमाणे गंगा समुद्रास मिळाल्यानंतरहि तिच्या मागच्या प्रवाहाचे वेग सारखे वाहतच असतात, त्याप्रमाणे ज्याच्या प्रेमभावाचा भगवंताकडे अखंड सारखा वेग असतो,
38-12
तैसे सर्वेंद्रियांसहित । मजमाजी सूनि चित्त । जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥38॥
त्याप्रमाणे सर्व इंद्रियांसह माझ्या ठिकाणी चित्त ठेऊन – म्हणजे एक मलाच आपल्या सर्व इंद्रियांसह मनाचा विषय करून – जे अहोरात्र न पाहता माझी उपासना करतात.
39-12
इयापरी जे भक्त । आपणपे मज देत । तेचि मी योगयुक्त । परम मानी ॥39॥
याप्रमाणे ज्या भक्तांनी आपल्याला माझ्या ठिकाणी संपूर्ण समर्पण केले, तेच माझ्याशी अत्यंत ऐक्य पावले, असे मी समजतो.
ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥12. 3॥
अर्थ तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य. अविकारी, अचल, ध्रुव, ॥12-3॥
40-12
आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥40॥
अर्जुना ! आणि दुसरे जे ” ब्रह्म मी आहे ” अशा वृत्तीचा अभिमान धरून निरवयव व अविनाशी अशा ब्रह्मस्वरूपाला कवटाळतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-12
मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । ते इंद्रिया कीर जोगे । कायि होईल ? ॥41॥
ज्या अव्यक्त परब्रह्मवस्तूचे ठिकाणी मनाचा स्पर्श देखील होऊ शकत नाही व बुध्दीची दृष्टी प्रवेश करू शकत नाही, मग इंद्रियांनी ग्रहण करण्याजोगे होईल काय ?
42-12
परी ध्यानाही कुवाडे । म्हणौनि एके ठायी न संपडे । व्यक्तीसि माजिवडे । कवणेही नोहे ॥42॥
इतकेच नाही, तर ती एखाद्या मर्यादित वस्तू प्राप्त करून घेण्याजोगी नसल्यामुळे, त्याचे ध्यानही होणे शक्य नाही.
43-12
जया सर्वत्र सर्वपणे । सर्वाही काळी असणे । जे पावूनि चिंतवणे । हिंपुटी जाहले ॥43॥
जी वस्तू सर्वत्र, सर्वभावाने व सर्वकाळी आहे असे पाहून, चिंतनही अत्यंत कष्टी होते – म्हणजे चिंतनही करता येत नाही.
44-12
जे होय ना नोहे । जे नाही ना आहे । ऐसे म्हणौनि उपाये । उपजतीचि ना ॥44॥
जी उत्पन्न होत नाही किंवा नाहीशी होत नाही, जी नाही किंवा आहे म्हणता येत नाही. असे असल्यामुळे जिच्या प्राप्तीचे उपायच उत्पन्न होत नाहीत,
45-12
जे चळे ना ढळे । सरे ना मैळे । ते आपुलेनीचि बळे । आंगविले जिही ॥45
जी इकडे क्षुब्ध पावत नाही किंवा हालत नाही आणि जी संपत नाही व मलीनही होत नाही, अशी परब्रह्मवस्तू ज्यांनी ” तेच मी आहे ” या वृत्तीच्या अभ्यासबळाने आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतली
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥12. 4॥
अर्थ अशा ब्रह्माची, इंद्रियसमुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्वभूतांचे हित त्यामध्ये रत असणारे, उपासना करतात ते देखील माझ्याप्रतच येतात. ॥12-4॥
46-12
पै वैराग्यमहापावके । जाळूनि विषयांची कटके । अधपली तवके । इंद्रिये धरिली ॥46॥
ज्यांनी वैराग्यरूपी अत्यंत प्रखर अग्नीत पंचविषयांचे समूह जाळून, त्या अग्नीने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून ठेवली.
47-12
मग संयमाची धाटी । सूनि मुरडिली उफराटी । इंद्रिये कोंडिली कपाटी । हृदयाचिया ॥47॥
आणि ज्यांनी मग त्यांना संयमाच्या (धारणा, ध्यान व समाधी यांच्या) मार्गात घालून म्हणजे त्यांना त्यांचा (संयमाचा) अभ्यास लावून ह्रदयाकडे मुरडवून ह्रदयाच्या पोकळीत कोंडले.
48-12
अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा । मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥48॥
ज्यांनी अपानवायूच्या तोंडाशी वज्रासनाची दृढमुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला बांधला.
49-12
आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचे शोधिले । काळवखे ॥49॥
ज्यांनी आशेचे संबंध तोडून टाकले, अधीरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा केला. आणि तिचा काळोख नाहीसा केला- म्हणजे
50-12
वज्राग्नीचिया ज्वाळी । करूनि सप्तधातूंची होळी । व्याधींच्या सिसाळी । पूजिली यंत्रे ॥50॥
वज्रासनाच्या योगाने पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळेत सप्त धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व रेत) यांची होळी करून व्याधींच्या मुंडक्यांचे यंत्रांना बळी देऊन त्यांचे पूजन केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १५६ वा, ५, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८६१ ते १८७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १८६१
जाय परते काय आणिला काटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥
का हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितो ते ॥धृपद॥
भाग्यवंता त्यासी सांगितल्या गोष्टी । ते नाही अदृष्टी आमुचिया ॥२॥
तुका म्हणे तुम्हा पासूनि अंतर । न पडे नाही स्थिर बुध्दी माझी ॥३॥
अर्थ
देवा, तुम्ही माझा कंटाळा का धरला आहे ? खरेच तुम्हाला माझा कंटाळा आला असेल, तर ” तू येथून चालता हो ” असे तरी एकदाचे सांगा. पण देवा, माझ्याविषयी इतकी निष्ठुरता का केली आहे ? मी जी सेवा करतो ; ती तुम्हाला पटत नाही काय ? जे भाग्यवान भक्त होते, त्यांच्याशी तुम्ही गोड गोड बोलला ; व त्यांना उपदेश केला ; पण माझ्या अदृष्टात ते सुख दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची माझ्यावर कृपा होत नाही, याला कारण, तुमच्याकडून माझ्यामध्ये अंतर पडले असे नाही, तर माझी बुध्दी स्थिर होत नाही ; यात तुमचा तरी काय दोष आहे ?
, :
अभंग क्र. १८६२
अनुभवे कळो येते पांडुरंगा । रुसावे ते का गा तुम्हावरी ॥१॥
आवरीता चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझे मज ॥२॥
अंतरी संसार भक्ति बाह्यात्कार । म्हणोनी अंतर तुझ्या पायी ॥३॥
तुका म्हणे काय करू नेणे वर्म । आले तैसे कर्म सोसू पुढे ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा आम्हाला तुमची प्राप्ती का होत नाही आता हे मला चांगले अनुभवाने कळून आले आहे उगाच तुमच्यावर आम्ही का रुसावे ? माझे चित्त दुर्जन झाले आहे त्याला कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी तर ते आवरत नाही आणि माझे मनच माझा घात करण्याचा प्रयत्न करीत आहे. देवा माझ्या अंतरंगामध्ये संसार आहे आणि वरवर फक्त मी बाह्य अंगाने भक्ती करतो असे दाखवतो आहे म्हणूनच तुझ्या भक्तीमध्ये माझे अंतर पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी काय करू मला तुझी भक्ती कशी करावी याचे वर्म काही कळत नाही त्यामुळे आता जसे कर्म होईल तसे चांगले कर्म करू आणि यापुढे त्याचे भोग ही आम्ही सोसु.
, :
अभंग क्र. १८६३
तुजकरिता होते आनाचे आन । तारिले पाषाण उदकी देवा ॥१॥
का नये कैवार करू अंगीकार । माझा बहु भार जड जाला ॥धृपद॥
चुकलासी म्हणो तरी जीवाचाही जीव । रिता नाही ठाव उरो दिला ॥२॥
तुका म्हणे ऐसे काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहा तुह्मी ॥३॥
अर्थ
देवा, तू सर्वशक्तीमान असल्यामुळे मनात आणले तर तुला एका वस्तूला दुस-या वस्तूचे रूप किंवा त्यात वाटेल तसा बदल करता येणे शक्य आहे ; म्हणून तर तू पाण्यावर दगड तारले, देवा, तू एवढा शक्तिमान असताना माझा कैवार का घेत नाहीस ! माझा अंगीकार का करीत नाहीस ; ते सांग ? तुला वाटेल ते करता येते ; आणि माझेच तेवढे ओझे तुला फार जड झाले काय ? बरे, मला विसरलास म्हणावे, तर तू माझ्या जीवाचाही अधिष्ठानभूत जीव आहेस ; आणि तुझी एवढी व्याप्ती आहे की, जगातील कोणतेही ठिकाण तू आपल्यावाचून रिकामे ठेवले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही माझा अंगीकार केलाच पाहिजे, अशी सत्ता गाजविण्यासारखे माझ्याजवळ कोणते असे बळ आहे ? पण तुम्ही कृपाळू आहात त्यामुळे अंगीकार करालच, यात संशय नाही.
, :
अभंग क्र. १८६४
फळ देंठींहून झडे । मग मागुते न जोडे ॥१॥
म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटी ॥धृपद॥
पुढे चढे जरी हात । त्याग मागिलां उचित ॥२॥
तुका म्हणे रणी । नये पाहो परतोनि ॥३॥
अर्थ
एकदा फळ देठापासून तुटले तर ते पुन्हा झाडाला जोडले जात नाही. त्यामुळे अध्यात्म करताना तातडी करणे हे चुकीचे आहे कोणतेही योग्य कर्म करण्यासाठी पुर्ण विचार केल्यानंतरच ते योग्य कर्म जन्मला येते. जर पुढे चांगल्या प्रकारचा लाभ होत असेल व त्या लाभा करता हात पुढे सरकत असेल तर मग मागे झालेल्या कनिष्ठ लाभाचा त्याग करणे उचित ठरते म्हणजे एखादे साधनाचे आपल्याला पूर्णपणे ज्ञान झाले की मग त्याला सोडून पुढील साधनाकडे सरकावे. तुकाराम महाराज म्हणतात रणांगणा मध्ये युद्ध करण्यासाठी योद्धा गेला तर त्याने मागे वळून पाहू नये त्याचप्रमाणे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण आलो की पुन्हा मागे केलेले साधने पाहू नये तर अध्यात्मामध्ये नवीन साधने प्राप्त करून घ्यावे यामुळे आपला फायदा होईल.
, :
अभंग क्र. १८६५
अगी देखोनिया सती । अंगी रोमांच उठती ॥१॥
हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरी उल्हास ॥धृपद॥
वित्त गोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥२॥
आठवूनि एका । उडी घाली म्हणे तुका ॥३॥
अर्थ
सती सारखी खरी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची चीता अग्नी पाहून आनंदित होते व तिच्या अंगावर त्या आनंदाने रोमांच उठतात. अशी निष्ठा असे धैर्य केवळ उपदेश केल्याने प्राप्त होत नाही तर त्यासाठी अंतकरणातून सुख आणि उल्हास तयार झाला पाहिजे. ती सती जाणारी स्री आपले चित्त धनाकडे व गणगोताकडे जाऊ देत नाही आणि सती जाणार आहे म्हणून रडत ही नाही. तुकाराम महाराज म्हणतात ती सती जाणारी स्त्री केवळ आपल्या पतीची आठवण करून त्या चितेत उडी मारते त्याप्रमाणेच भक्ताने ही अध्यात्मामध्ये भगवंतासाठी असे प्रेम ठेवले पाहिजे.
, :
अभंग क्र. १८६६
फळ पिके देठी । निमित्य वारियाची भेटी ॥१॥
हा तो अनुभव रोकडा । कळो येतो खरा कुडा ॥धृपद॥
तोडिलिया बळे । वाया जाती काची फळे ॥२॥
तुका म्हणे मन । तेथे सकळ कारण ॥३॥
अर्थ
पूर्णपणे पिकलेले फळ त्याला केवळ वाऱ्याची एक झुळुक लागली तर ते खाली पडते. हा अनुभव तर प्रत्यक्ष कोणीही पाहू शकेल आणि जो पाहील त्यालाच त्याचा अनुभव येईल. आणि जर कच्चे फळ आपण बळाने तोडले तर ते वाया जाते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपले मनही त्या फळाप्रमाणे आहे ते परिपूर्ण झाले की परमार्थाची केवळ एक जरी झुळुक लागली तरी ते परमार्थामध्ये टपकन पडते आणि तेच आपण बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न केला तर वाया जाते म्हणूनच आपले मन सर्व कार्य सिद्धीस मुख्य कारण आहे.
, :
अभंग क्र. १८६७
हालवूनि खुंट । आधी करावा बळकट ॥१॥
मग तयाच्या आधारे । करणे ते अवघेचि बरे ॥धृपद॥
सुखदुःख साहे । हर्षोमर्षी भंगा नये ॥२॥
तुका म्हणे जीवे । आधी मरोनि राहावे ॥३॥
अर्थ
ज्या खुंटा च्या आधारे आपल्याला काम करायचा आहे तो अगोदर हलवून पहावा आणि हलत असेल तर त्याला ठोकून ठोकून बळकट करावा. मग तो खुंट बळकट झाला तर त्यावर कार्य करणे चांगले होईल. त्या खुंटा प्रमाणेच आपले मन आहे ते मन इतके बळकट असावे एखाद्या सुखापासून होणारा आनंद आणि दुःख झाल्यावर होणारा क्रोध यांनी आपले मन भंग पावले नाही पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असेच आपले मन बळकट झाले तर आपण जीव दशेने आधी मरून जावे मग या जगामध्ये ब्रम्हरूपानेच राहावे.
अभंग क्र. १८६८
धावे माते सोई । बाळ न विचारिता काही ॥१॥
मग त्याचे जाणे निके । अंग वोडवी कौतुके ॥धृपद॥
नेणे सर्प दोरी । अगी भलते हाती धरी ॥२॥
ताविणे ते नेणे । आणीक काही तुका म्हणे ॥३॥
अर्थ
लहान बाळ ज्याप्रमाणे इकडे तिकडे पळते, त्याच्या सोबत आई आहे हे जाणून आणि बाकी कसलाही विचार न करता चोहोकडे धाव घेते आणि मग त्याची आईदेखील त्याच्यासाठी काय योग्य आहे ते पाहते आणि त्याने केलेल्या लहान अंग चाळ्यांचे आणि तोंड वेडावण्याचे देखील कौतुक करते, तसेच असे हा लहानगा सर्प आणि दोरी ह्यातला फरक न कळल्यामुळे ते हाती धरण्याचा प्रयत्न करतो, इतकेच काय परंतु आगीला देखील मुठीत घ्येण्याचा प्रयत्न करतो, परंतु ह्या सर्वातून आई त्याचा पदोपदी सांभाळ करते, त्याला वाढविते. तुकाराम महाराज म्हणतात कारण एका आपल्या आईशिवाय त्याला इतर काहीही कळत नसते, तो आई व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही, हे पांडुरंगा तुम्ही देखील माझा असाच अंगीकार करा कारण आता मी तुमच्या शिवाय इतर काहीही जाणत नाही, एवढेच काय स्वतःची काळजी घेणे देखील मला आता अवघड होऊन बसले आहे त्यामुळे तुम्हीच काय तो माझा आता योग्य तो सांभाळ करा.
अभंग क्र. १८६९
भोग द्यावे देवा । त्याग भोगींच बरवा ॥१॥
आपण व्हावे एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥धृपद॥
योजे यथाकाळे । उत्तम पाला कंदे मूळे ॥२॥
वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥
अर्थ
अर्थ:–कोणतेही भोग प्रथम देवाला समर्पण करावेत, नंतर आपण भोगावेत ; म्हणजे त्या भोगातच उत्तम रीतीने त्याग घडतो, आपण त्या भोगापासून अलिप्त राहावे आणि देवाला त्याचा भोक्ता करावे. म्हणजे या देहातच देवाची प्राप्ती होते. ज्या ऋतूमध्ये जी कंदमुळे आणि जो पाला आपल्याला मिळत असेल, ते सर्व उत्तम मानून त्याचा देवाला समर्पण करण्याकडे विनियोग करावा. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य देवाला समर्पण न करता भोग भोगतो, तो वंचक असून त्याला पाप लागते ; म्हणून त्याचा देवाला समर्पण न करण्याचा आग्रह वाईट आहे.
अभंग क्र. १८७०
पायाच्या प्रसादे । काही बोलिलो विनोदे ॥१॥
मज क्षमा करणे संती । नव्हे अंगभूत युक्ती ॥धृपद॥
नव्हे हा उपदेश । तुमचे बडबडिलो शेष ॥२॥
तुमचे कृपेचे पोसणे । जन्मोजन्मी तुका म्हणे ॥३॥
अर्थ
अर्थ:–संत हो, तुमच्या पायाच्या कृपेने मी जे काही लडिवाळपणाने बोललो आहे ; याबद्दल तुम्ही संतांनी मला क्षमा करावी. मी जे काही बोललो, त्यात माझ्या अंगचा शहाणपणा नाही, तर तो तुमचा आहे. हा माझा उपदेश नसून तुमच्यापासून जे काही ऐकिले ; तेच उच्छिष्ट शब्द मी कसेतरी बडबडलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतहो, मी जन्मोजन्मी तुमच्या कृपेचे पोसले जाणारे मूल आहे.
अभंग क्र. १८७१
जयांचे अंगले लेता नाही मान । शोभा नेदी जन हांसविले ॥१॥
घुसिळता ताक कांडिता भूस । साध्य नाही क्लेश जाती वाया ॥२॥
तुका म्हणे नाही स्व:ता भांडवल । भिकेचे ते फोल बीज नव्हे ॥३॥
अर्थ
दुसऱ्याचे तात्पुरते मागून आणलेले दागिने चढवून कितीही मिरविले तरी मान मिळत नाही, उलट लोकांमध्ये शोभा होऊन ते हसतात. कारण ते म्हणतात कितीही ताक घुसळिले किंवा भूस कांडीला तरीही त्याचा काहीएक फायदा नाही कारण ताकातून लोणी मिळत नाही आणि भुसातून धान्य, त्यामुळे शेवटी साध्य काहीच न होता घेतलेले श्रम देखील वाया जातात आणि जीवाला उगीच क्लेश होतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच स्वतःचे हित साधायचे असल्यास भक्तीचे भांडवल स्वतःचेच हवे, दुसऱ्याच्या जीवावर ते साधता येत नाही आणि भीक देखील मागून आणता येत नाही किंबहुना कितीही तसा प्रयत्न केला तरी ते फोल ठरते कारण त्याने आपल्या मनात काही भक्तीचे बीज निर्माण होत नाही.
अभंग क्र. १८७२
न बोलावे परी पडिला प्रसंग । हाकलिते जग तुझ्या नामे ॥१॥
लटिकेंचि सोंग मांडिला पसारा । भिकारी तू खरा कळो आले ॥धृपद॥
निलाजिरी आह्मी करोनिया धीर । राहिलो आधार धरूनिया ॥२॥
कैसा नेणो आता करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढे ॥३॥
तुका म्हणे काही न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥
अर्थ
मी कितीही स्वतःला आवरले तरी आता गप्प बसवत नाही, कारण प्रसंगच असा आला आहे त्यामुळे बोलावेच लागत आहे. हे नारायणा, हे पांडुरंगा हे जग तुझ्या नावाने हाकलत आहे, तू आहेस आणि कधीतरी येशील या भरवशावर सगळेजण विसंबून आहेत परंतु आम्हाला मात्र कळून चुकले आहे की तू काही तसा नाहीस, तू तर भिकारी आहेस आणि उगीचच तू तुझ्या नावाचा गवगवा करून ठेवला आहेस, तू कोणीतरी मोठा आहेस आणि विलक्षण शक्ती तुझ्याकडे असून तू काहीही करू शकतोस असा खोट्याचा पसारा मांडून ठेवला आहे. त्यात भर म्हणजे हे सर्व ठाऊक असून देखील आम्ही निर्लज्जपणे तुझाच आधार असल्यासारखे वागत राहतो, तुझ्यावर श्रद्धा आणि अजूनही धीर धरून आहोत. परंतु मनात एक धाकधूक कायम असते की एवढे करून सुद्धा म्हणजेच तुझ्या पुढ्यात एवढी कटकट करून सुद्धा तू आम्हाला साथ देशील की नाही आणि कसा आमचा शेवट घडवून आणशील किंबहुना शेवटच्या क्षणी आमच्याजवळ असशील की नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा कितीही काही केले तरी तू बोलत काहीच नाही, एक शब्द मुखातून काढत नाहीस परंतु आमच्याकडून तुला हवी तशी, पाहिजे तशी आणि पाहिजे तेव्हा सेवा मात्र करवून घेतोस.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

