Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२५ जून, दिवस १७६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २१०१ ते २११२

25 june NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

25 june NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“25 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 25 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 25 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २१०१ ते २११२ चे पारायण आपण करणार आहोत.
25 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २७६ ते ३००,

276-13
तरी चंद्रबिंबौनि धारा । निघता नव्हती गोचरा । परि एकसरे चकोरा । निघती दोंदे ॥13-276॥
तर चंद्रबिंबातून निघणार्‍या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षांना एकसारखी दोंदे निघतात, (चकोर पक्षी पुष्ट होतात).
277-13
तैसे प्राणियासि होये । जरी तो कही वासु पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मीही नेणे ॥13-277॥
त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते. त्या पहाण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही.
278-13
किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी । करही देखसी । तैसेचि ते ॥13-278॥
फार काय सांगावे ? याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल
279-13
तरी होऊनिया कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ । तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥13-279॥
अहिंसकाची कृती = सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन रहातात. (म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते) त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात. (व्यापाररहित असतात).
280-13
अक्षमे आणि संन्यासिले । की निरिंधन आणि विझाले । मुकेनि घेतले । मौन जैसे ॥13-280॥
अगोदरच आंधळा, आणखी त्याने पहाण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नि, आणि पुन्हा तो विझलेला किंवा मुळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले. .
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


281-13
तयापरी काही । जया करा करणे नाही । जे अकर्तयाच्या ठायी । बैसो येती ॥13-281॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाचे ठिकाणी ते राहावयास येतात.
282-13
आसुडैल वारा । नख लागेल अंबरा । इया बुद्धी करा । चळो नेदी ॥13-282॥
वार्‍याला झटका बसेल वआकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही
283-13
तेथ आंगावरिली उडवावी । का डोळा रिगते झाडावी । पशुपक्ष्या दावावी । त्रासमुद्रा ॥13-283॥
(अशी जेथे स्थिती आहे) तेथे अंगावर बसलेले (माशा, डास वगैरे प्राणी) उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा.
284-13
इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचे किरीटी । बोलणे के ? ॥13-284॥
या गोष्टी कोठल्या ? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे, तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचे बोलणे कोठले ?
285-13
लीलाकमळे खेळणे । का पुष्पमाळा झेलणे । न करी म्हणे गोफणे । ऐसे होईल ॥13-285॥
सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या (हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना) गोफणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही.


286-13
हालवतील रोमावळी । यालागी आंग न कुरवाळी । नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥13-286॥
अंगावर केसांच्या रांगा हलतील (व त्यायोगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल) याकरता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात.
287-13
तव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे प्रस्तावो । तरी हाता हाचि सरावो । जे जोडिजती ॥13-287॥
आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत.
288-13
का नाभिकारा उचलिजे । हातु पडिलिया देइजे । नातरी आर्ताते स्पर्शिजे । अळुमाळु ॥13-288॥
अथवा ‘भिऊ नकोस ” असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा.
289-13
हेही उपरोधे करणे । तरी आर्तभय हरणे । नेणती चंद्रकिरणे । जिव्हाळा तो ॥13-289॥
तरी दु:खाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे, हे देखील तो मोठ्या जुलुमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो.
290-13
पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु । तेणे माने पशु । कुरवाळणे ॥13-290॥
त्याच्या ह्स्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍याचा स्पर्श कडक भासेल. इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदु व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते.


291-13
जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगे निसळे । न फळतांही निर्फळे । होतीचिना ॥13-291॥
जे हात नेहेमी रिकामे व मोकळे असतात (परंतु) ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही.
292-13
आता असो हे वाग्जाळ । जाणे ते करतळ । सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे ॥13-292॥
आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज.
293-13
आता मन तयाचे । सांगो म्हणो जरी साचे । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ? ॥13-293॥
अहिंसकाचे मन =
आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे ?
294-13
काइ शाखा नव्हे तरु ? । जळेवीण असे सागरु ? । तेज आणि तेजाकारु । आन काई ? ॥13-294॥
फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय ? समुद्र हा जलाशिवाय आहे काय ? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय ?
295-13
अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर ? । की रसु आणि नीर । सिनानी आथी ? ॥13-295॥
शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय ? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय ?


296-13
म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव । ते मनचि गा सावयव । ऐसे जाणे ॥13-296॥
म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. (वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत).
297-13
जे बीज भुई खोंविले । तेचि वरी रुख जाहले । तैसे इंद्रियाद्वारी फाकले । अंतरचि की ॥13-297॥
ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी, तेच तर पुढे वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे.
298-13
पै मानसीचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी कैची बाहेरी । वोसंडेल ? ॥13-298॥
परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल ?
299-13
आवडे ते वृत्ती किरीटी । आधी मनौनीचि उठी । मग ते वाचे दिठी । करासि ये ॥13-299॥
अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते.
300-13
वाचूनि मनीचि नाही । ते वाचेसि उमटेल काई ? । बीजे वीण भुई । अंकुर असे ? ॥13-300॥
याशिवाय जे मनातच नाही, ते वाचेत प्रगट होईल काय ? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १७६ वा, २५, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २१०१ ते २११२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २१०१
असोत हे बोल । अवघे तू चि भांडवल ॥१॥
माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥धृपद॥
गाळियेले भेद । सारियेले वादावाद ॥२॥
तुका म्हणे मधी । आता न पडे उपाधि ॥३॥
अर्थ

देवा आता तुझ्यासंबंधी हे बोलणे पुरे झाले. माझ्या परमार्थाचे सर्व भांडवल तूच आहेस. हे केशवा देवा माझे मायबाप सज्जन सोयरा सर्व काही तूच आहेस. जीवब्रह्मातील जीवजडांतील जीवजीवातील जडजडांतील व ब्रम्‍हजडांतील हे सर्व भेद तूच माझ्या मनातून नाहीसे केले ; व जगत सत्य का असत्य ? ब्रम्‍ह सगुण का निर्गुण ? जीवब्रह्मात वास्तव भेद आहे का कल्पित ? हे सर्व वादविवाद सारून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात आता मी संसाराच्या उपाधीत पडणार नाही.

अभंग क्र. २१०२
करीन कोल्हाळ । आता हाचि सर्वकाळ ॥१॥
आता ये वो माझे आई । देई भातुके विठाई ॥धृपद॥
उपायासी नाम । दिले याचे पुढे क्षेम ॥२॥
बीज आणि फळ । तुका म्हणे हे चि मूळ ॥३॥
अर्थ

देवा मी आता सर्वकाळ हाच घोष करेल, हे माझे आई विठाबाई तू यावे आणि मला काहीतरी खाऊ द्यावे. पुढे आमचे कल्याण व्हावे व आमच्या योगक्षेमासाठी एक उपाय नेमला ते म्हणजे आमच्या हाती तू तुझे नाम दिले आहे. देवा बीज आणि फळ म्हणजे साध्य आणि साधन याचे मूळ म्हणजे तुझे नामच आहे.

अभंग क्र. २१०३
धनासींच धन । करी आपणा जतन ॥१॥
तुज आळविता गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥धृपद॥
जेविल्याचे खरे । वरी उमटे ढेकरे ॥२॥
तुका म्हणे धाय । तेथे कोठे उरे हाय ॥३॥
अर्थ

धनाचे रक्षण धनच करत असते म्हणजे धनाचे रक्षण करण्याकरता धनाचा वापर करावा लागतो. त्याप्रमाणे हे पांडुरंगा तुला जर गोडीने आळविले तर तुझी प्राप्ती खरोखर होत असते. एखाद्याने जेवण केले आहे की नाही हे त्याने ढेकर दिले की लगेच समजते. तुकाराम महाराज म्हणतात देवा जो तुझ्या भक्तीने तृप्त झाला त्याच्या मुखाद्वारे लगेच समजते की हा आता तृप्त झालेला आहे.

अभंग क्र. २१०४
अनुभवा आले । माझे चित्तीचे क्षरले ॥१॥
असे जवळी अंतरे । फिरे आवडीच्या फेरे ॥धृपद॥
खादले चि वाटे । खावे भेटले चि भेटे ॥२॥
तुका म्हणे उभे । आम्ही राखियेले लोभे ॥३॥
अर्थ

आता माझ्या चित्ताला ब्रम्‍ह रसाचा अनुभव आला आहे. तो ब्रम्‍ह रस माझ्या अंतकरणात अगदी जवळ आहे आणि त्याच्याभोवती आवडीचे चक्र सारखी फिरत आहे. जसे एखादा पदार्थ खाल्ला की तो पुन्हा पुन्हा खावासा वाटतो, आणि एखाद्या आवडीच्या मनुष्याला भेटले ती पुन्हा पुन्हा त्याला भेटावेसे वाटते अगदी तसेच झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला सारखा सारखा ब्रम्‍ह रस चाखता यावा या लोभानेच तुम्हाला आम्ही विटेवर उभा केले आहे.

अभंग क्र. २१०५
पोटी शूळ अंगी उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥
तैसे मज का गा केले पंढरिराया । लौकिक हा वाया वाढविला ॥धृपद॥
ज्वरिलियापुढे वाढिली मिष्टान्ने । काय चवी तेणे घ्यावी त्याची ॥२॥
तुका म्हणे मढे शृंगारिले वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥
अर्थ

अंगाला चंदनाची उटी लावने खूप चांगली गोष्ट आहे परंतु ज्याचे पोट दुखते त्याच्या अंगाला जरी चंदनाची उटी लावली तरी त्याला त्या सुखाची काय आवड राहणार आह ? हे पंढरीराया तसे तुम्ही माझ्या बाबतीत का केले विनाकारण माझा लौकिक तुम्ही वाढविला. ताप आलेल्या मनुष्याच्या पुढे अनेक प्रकारचे मीष्टांन्न वाढले तरी तापीने त्याची आधीच जीभ कोरडी पडल्यामुळे त्याला त्या पदार्थांची काय चव कळणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा एखाद्या मढयाला वर वर शुंगार केला तर काही उपयोग होतो का ? तशीच अवस्था माझी झाली आहे.

अभंग क्र. २१०६
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंग हे पितळ न देखता ॥१॥
माझे चित्त मज जवळीच ग्वही । तुझी मज नाही भेटी ऐसे ॥धृपद॥
दासीसुता नाही पितियाचा ठाव । अवघे चि वाव सोंग त्याचे ॥२॥
तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवे जना येईल कळो ॥३॥
अर्थ

बेगडाचा रंग हा किती काळ टिकतो आणि पितळाला वरवर केवळ सोन्याचा मुलामा दिला तर ते तरी किती दिवस टिकणार आहे ते सोने नसुन पितळ आहे केव्हा कळते जेव्हा आपल्या डोळ्याला ते पितळ दिसायला लागते. देवा माझी आणि तुझी भेट झाली की नाही याची साक्ष देण्याकरता माझे चित्तच माझ्याजवळ आहे. दासी पुत्राला आपला पिता कोण आहे याची माहिती नसते आणि मग त्याने कोणत्याही जातीची जरी स्वीकार केला तरी ते फक्त सोंग ठरते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे तू माझी विटंबना केली आहेस कारण माझा लौकिक वाढवून मी तुझा खरा भक्त नाही असा अनुभव लोकांना कधीतरी कळून येईलच.

अभंग क्र. २१०७
मजपुढे नाही आणीक बोलता । ऐसे काही चित्ता वाटतसे ॥१॥
याचा काही तुह्मी देखावा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥धृपद॥
काम क्रोध नाही सांडिले आसन । राहिले वसोन देहामध्ये ॥२॥
तुका म्हणे आता जालो उतराई । कळो यावे पायी निरोपिले ॥३॥
अर्थ

माझ्यापुढे बोलणारा एकही व्यक्ती नाही असेच माझ्या चित्ताला वाटत आहे. व्यर्थ अभिमान माझ्या चित्तात दृढ होऊन बसला आहे तरी हा अभिमान माझ्या चित्तातुन घालवण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. कारण तुम्ही तर सर्वज्ञ आहात उदार आहात पांडुरंगा. काम क्रोधाने अजूनही माझ्या देहा मधून आसन सोडले नाहीत ते अजूनही माझ्या देहा मध्ये च बसून आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता तुमच्या पायाजवळ माझ्या सर्व व्यथा निरूपण केलेल्या आहेत तरी आता मी मोकळा झालो आहे.

अभंग क्र. २१०८
सावित्रीची विटंबना । रांडपण करीतसे ॥१॥
काय जाळावे ते नांव । अवघे वाव असे ते ॥धृपद॥
कुबेर नांव मोळी वाहे । कैसी पाहे फजिती ॥२॥
तुका म्हणे ठुणगुण देखे । उगी मुखे का फुंदता ॥३॥
अर्थ

एका स्त्रीचे नांव सावित्री होते परंतु काही दिवसांनी ती विधवा झाली त्यामुळे ति विधवा झाल्यामुळे सावित्री या नावाला काहीच अर्थ राहिला नाही. त्या नावाला काय जाळावे नांव कोणतेही असो परंतु त्याप्रमाणे जर वस्तुस्थिती नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. एखाद्याचे नांव कुबेर आहे आणि तो काम काय करतो तर मोळी वाहतो मग पहा त्या नावाची कशी फजिती झाली आहे कारण कुबेरा जवळ धनाची काहीच कमतरता नसते. तुकाराम महाराज म्हणतात नांव काहीही असो परंतु मनुष्याच्या अंतरंगातील सद्गुण पाहिले पाहिजे नाहीतर काही मनुष्य उगाचच मी हुशार आहे मी तत्त्वज्ञानी आहे असे फुंदत बसतात.

अभंग क्र. २१०९
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलो लाजोनि न बोलवे ॥१॥
रुचिविण काय शब्द वाऱ्या माप । अनादरे कोप येत असे ॥धृपद॥
आपुलिया रडे आपुले चि मन । दाटे समाधान पावतसें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करू रिते वादावाद ॥३॥
अर्थ

हे हरी तुझ्या वाचून मला दिवस आणि रात्र कसे जाईन असे झाले आहे परंतु काहीच न बोलता मी लाजून शांत राहिलो आहे. आपण जर काही शब्द बोललो आणि समोरच्याला ते रुचले नाही तर ते शब्द वाऱ्याचे माप केल्या प्रमाणे ठरते त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि त्यामुळे समोरच्याचा अनादर होतो व त्यामुळे समोरच्याला आपला राग येतो. आपले मन आपल्यासाठी आतल्या आत रडत असते तरीही सुख मिळाले नाही तरी काहीतरी विचार करून ते आतल्या आतच समाधानी पावत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही सर्व जाणते आहात मग मी व्यर्थ वादावाद का बरे करत बसु ?

अभंग क्र. २११०
मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हा ॥१॥
वागवीत संदेह राहो कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥धृपद॥
गाणे गीत आम्हा नाचणे आनंदे । प्रेम कोठे भेदे अंगा येते ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसता तू अनंत सानुकुळ ॥३॥
अर्थ

देवा आम्ही मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार की आमचा संसार संबंध तसाच राहणार हे आम्ही कसे समजून घ्यावे ? अहो देवा अशा प्रकारचा संदेह मी तरी मनात कुठपर्यंत वागवीत राहू. मग असे संदेह मनात राहिले तर तुमच्या सेवकाचे काय महत्त्व राहिले ? देवा आम्हाला तर तुझे गीत गावून तुझ्या आनंदात नाचणे आवडते परंतु जर आमच्या अंगामध्ये भेद राहिला तर त्या भेदा ने प्रेम कोठे उत्पन्न होईल काय ते तुम्ही सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जर अनुकूल नसेल तर आम्हाला कितीही दृष्टांत सांगितले तरीही ते व्यर्थच ठरणार आहेत.

अभंग क्र. २१११
एकाएकी आता असावेसे वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥
वाजवूनि तोंड घातलो बाहेरी । कुल्प करुनी दारी माजी वसा ॥धृपद॥
उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवे हुद्देदार चेष्टाविला ॥२॥
तुका म्हणे भय होते तो चि वरी । होती काही उरी स्वामिसेवा ॥३॥
अर्थ

देवा तुम्हाला आपण दोघेही एकटे असावे असेच वाटते तर मग तुम्ही हे द्वैतच निर्माण करण्याचे खोटे चाळे का केले ? देवा तुम्ही वेदाचे तोंड वाजवून तुम्ही आम्हाला स्वरूपस्थितीच्या बाहेर घालविले परंतु तुम्ही आज्ञावरणाचे कुलूप घालून आत मध्ये लपून बसला आहात. देवा तुमच्या ठिकाणी स्वरूपस्थितीचा प्रकाश असूनही तुम्ही जाणून-बुजून अंधार करून ठेवला आणि आमच्यासाठी वेद आणि संत हे मुद्देदार नेमुन ठेवले. तुकाराम महाराज म्हणतात देवा जोपर्यंत तुमच्यात व आमच्यात सेवक व स्वामी असा भेद होता तोपर्यंत आम्हाला तुमचे भय होते आता तुम्ही आणि आम्ही एक झालो त्यामुळे तुम्हाला भिण्याचे काहीच कारण नाही.

अभंग क्र. २११२
काय नेव्हेसी तू एक । देखो कासया पृथक ॥१॥
मुंग्या कैचे मुंगळे । नट नाट्य तुझे चाळे ॥धृपद॥
जाली तरी मर्यादा । किंवा त्रासावे गोविंदा ॥२॥
तुका म्हणे साचा । कोठे जासी हृदयींचा ॥३॥
अर्थ

देवा तू कशात व्यापून उरला नाहीस मग मी व्यर्थच तू आणि मी वेगळा आहे असे का पाहत बसू ? देवा मुंग्या काय आणि मुंगळे काय हे तुझेच नटनाट्य असून सर्वच तुझेच चाळे आहेत. हे गोविंदा आता आम्हाला त्रास देण्याचे मर्यादा खूप झाली आहे. तुकाराम महाराज देवा आता तू आमच्या हृदयामध्ये मधे खरोखर चा साठला गेलेला आहे तेथून तू कोठे जाणार आहेस ?

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version