“२ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 June
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक 2 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १८२५ ते १८३६ चे पारायण आपण करणार आहोत.
2 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ६५१ ते ६७५,
651-11
हो का जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥651॥
असे वाटते की, मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाच्या आकारात जी व्यापक विश्ववस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या प्रेमाकरिता उकलून दाखविली.
652-11
तव परिमाणा रंगु । तेणे देखिले साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥652॥
तेव्हा अर्जुनाने तिचा विस्तार व रंग चांगले लक्ष देऊन पाहिले, पण गिर्हाईकीचा संबंध झाला नाही – ग्राहकाला आवडले नाही – म्हणून परत त्याची भगवंताने घडी केली.
653-11
तैसे वाढीचेनि बहुवसपणे । रूपे विश्व जिंतिले जेणे । ते सौम्य कोडिसवाणे । साकार जाहले ॥653॥
त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अपार विस्तारामुळे, संपूर्ण विश्व व्यापिले गेले, तेच सौम्य व गोजिरवाणे असे मर्यादित साकार झाले.
(विश्वरूप व श्रीकृष्णस्वरूप हे दोन्ही खरोखर एकरूपच आहेत; म्हणून त्यांचा दोनपणा किंवा भिन्नपणा मानणे, हा भ्रम होय. हेच तत्व माउलींनी वरील ओव्यात निरनिराळे दृष्टांत देऊन प्रतिपादिले आहे. )
654-11
किंबहुना अनंते । धरिले धाकुटपण मागुते । परि आश्वासिले पार्थाते । बिहालियासी ॥654॥
किंबहुना भगवान श्रीकृष्णांनी पुनः लहानसे रूप घेतले, पण विश्वरूपाला पाहून भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला.
655-11
जो स्वप्नी स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥655॥
तेव्हा स्वप्नात ” मी स्वर्गाला गेलो ” असे पाहणारा पुरुष, जसा अकस्मात जागा होऊन आश्चर्यचकित व्हावा, त्याप्रमाणे अर्जुन आश्चर्यचकित झाला.
656-11
नातरी गुरुकृपेसवे । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवे । स्फुरे तत्त्व तेवी पांडवे । श्रीमूर्ति देखिली ॥656॥
किंवा गुरुची कृपा झाल्याबरोबर, ज्याप्रमाणे संपूर्ण प्रपंचज्ञान मावळून आत्मतत्व अनुभवाला येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपानंतर भगवंताची सगुण साकार श्रीकृष्णमूर्ती पाहिली.
657-11
तया पांडवा ऐसे चित्ती । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हे भले जाहले ॥657॥
ती श्रीकृष्णमूर्ती पाहिल्यावर, अर्जुनाच्या मनात असे वाटले की, श्रीकृष्ण व माझ्यामध्ये जो विश्वरूपाचा पडदा आड होता, तो बाजूला सारला गेला, हे फार बरे झाले.
658-11
काय काळाते जिणोनि आला । की महावातु मागा सांडिला । आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥658॥
जणू काय काळाला जिंकून परत आला किंवा भयंकर सोसाट्याच्या वार्याला मागे हटविले अथवा सातही समुद्र आपल्या हाताने तरून जाऊन काठास लागला.
659-11
ऐसा संतोष बहु चित्ते । घेइजत असे पंडुसुते । विश्वरूपापाठी कृष्णाते । देखोनिया ॥659॥
अशा प्रकारचा अत्यंत संतोष, विश्वरूपानंतर श्रीकृष्णमूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनाला वाटला.
660-11
मग सूर्याचिया अस्तमानी । मागुती तारा उगवती गगनी । तैसी देखो लागला अवनी । लोकासहित ॥660॥
मग सूर्य अस्तास गेला असता, ज्याप्रमाणे आकाशात नक्षत्रे चमकू लागतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णमूर्तीबरोबर अर्जुन व सर्व भूतसृष्टीसहित पृथ्वी पाहू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
661-11
पाहे तव तेचि कुरुक्षेत्र । तैसेचि देखे दोही भागी गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥661॥
अर्जुन पाहतो तो तेच पूर्वीचे कुरुक्षेत्र, तसेच दोन्ही दळांना गोत्रज उभे असून, दळांतील वीर परस्परावर शस्त्रास्त्रांच्या समुदायांचा वर्षाव करीत आहेत.
662-11
तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळी ॥662॥
आणि त्या बाणांच्या मांडवात रथ स्थिर असून, रथाच्या धुरेवर भगवान श्रीकृष्ण बसले आहेत आणि आपण त्याच्या खाली बसलो आहोत, असे तो पाहू लागला.
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः॥11. 51॥
अर्थ अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानवरूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झालो आहे. ॥11-51॥
663-11
एवं मागील जैसे तैसे । तेणे देखिले वीरविलासे । मग म्हणे जियालो ऐसे । जाहले आता ॥663॥
याप्रमाणे पराक्रमाचा खेळ करणार्या अर्जुनाने जसे मागितले, तसे पाहिले व मग मनात म्हणाला आता माझ्या कुडीत प्राण आला असे वाटते.
664-11
बुद्धीते सांडोनि ज्ञान । भेणे वळघले रान । अहंकारेसी मन । देशोधडी जाहले ॥664॥
आतापर्यंत माझे ज्ञान बुध्दीला सोडून विश्वरूपाच्या भीतीने जंगलात पळाले होते व अहंकारासहित मन देशोधडीस लागले होते.
665-11
इंद्रिये प्रवृत्ती भुलली । वाचा प्राणा चुकली । ऐसे आपांपरी होती जाली । शरीरग्रामी ॥665॥
इंद्रियांना कर्म करण्याचे भान राहिले नाही, वाचेचे ठिकाणी शब्द उच्चारण्याची शक्ती राहिली नाही, अशी शरीराचे ठिकाणी सर्वाची दुर्दशा झाली होती.
666-11
तिये आघवीचि मागुती । जिवंत भेटली प्रकृती । आता जिताणे श्रीमूर्ती । जाहले मिया ॥666॥
अर्जुन मनात म्हणतो, या श्रीमूर्तीच्या योगाने ही संपूर्ण इंद्रिये पुनः जिवंत प्रकृतीला भेटली म्हणजे सजीव झाली आणि या मूर्तीमुळेच आता मी वांचलो असे मला वाटत आहे.
667-11
ऐसे सुख जीवी घेतले । मग श्रीकृष्णाते म्हणितले । मिया तुमचे रूप देखिले । मानुष हे ॥667॥
याप्रमाणे अर्जुन मनात अत्यंत समाधान पावून, मग श्रीकृष्णाला म्हणाला, मी तुमचे मनुष्यासारखे असलेले हे रूप पाहिले.
668-11
हे रूप दाखवणे देवराया । की मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवा माया । स्तनपान दिधले ॥668 ।
देवराया ! मला तुम्ही हे रूप दाखविणे म्हणजे आईशी चुकामूक झालेल्या मज लेकराचे सांत्वन करून आईने स्तनपानच दिले आहे.
669-11
जी विश्वरूपाचिया सागरी । होतो तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरी । निगालो आता ॥669॥
जी देवा ! जो मी या विश्वरूप सागरात दोन हातांनी लाटा मोजीत होतो, तो आता मी श्रीकृष्णमूर्तीरूपी तीरास लागलो आहे.
670-11
आइके द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥670॥
हे द्वारकापुरातील मित्रा ! ऐक. मला तू या रूपाने पुनः भेट दिलीस, ती भेट नसून, सुकू लागलेल्या मज झाडावर मेघांचा वर्षाव केलास.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
671-11
जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आता जिणयाचा जाहला । भरवसा मज । 671॥
खरोखर तृषेने पीडलेल्या मला, कृष्णमूर्तीचे दर्शन झाले म्हणजे जणू अमृताच्या समुद्राचीच प्राप्ती झाली आहे. आणि आता जगण्याचा भरवसा वाटू लागला आहे.
672-11
माझिया हृदयरंगणी । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेसी बुझावणी । जाहली मज ॥672॥
माझ्या ह्रदयदेशात हर्षरूपी वेली लावल्या जात असून आता माझी व सुखाची फारकत नाहीशी होऊन ऐक्य झाले आहे. (ज्याप्रमाणे झाडाची फांदी वाकविता वाकविता काही कालाने ती, स्वाभाविक वाकल्याप्रमाणे होऊन राहते किंवा संसारात सर्व प्राण्यांचे, आपल्या अपत्याविषयी जसे स्वाभाविक प्रेम असते, तेथे प्रेमकरणरूप क्रिया करावी लागत नाही, त्याप्रमाणेच, प्रेमळ भक्तांचे, आपल्या सगुण भगवंताचे ठिकाणीही असलेले प्रेम स्वाभाविक होऊन जाते. तेथेही प्रेम करण्याची क्रिया राहत नाही, असा भक्तांचा अनुभव असतो, हेच या ओव्यातून दाखविले आहे. श्रीज्ञानेश्वर माऊलींनी पुढे अठराव्या अध्यायात ” तैसी क्रिया किर न साहे । परी अद्वैती भक्ति आहे । हे अनुभवाचि जोगे नोहे । बोला ऐसे ॥या ओवीने हाच भाव दाखविला आहे. ” )
श्रीभगवानुवाच
। सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः॥11-52॥
अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासाने दिसण्याला कठिण असे जे माझे हे रूप तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील उत्सुक आहेत. ॥11-52॥
विश्वरूप दुर्लभ
673-11
यया पार्थाचिया बोलासवे । हे काय म्हणितले देवे । तुवा प्रेम ठेवूनि यावे । विश्वरूपी की ॥673॥
याप्रमाणे अर्जुन बोलला असता, देव म्हणाले, बा अर्जुना ! हे काय बोलतोस ? तू माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी प्रेम ठेवून ये.
674-11
मग इये श्रीमूर्ती । भेटावे सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥674॥
आणि मग तू एकट्याने म्हणजे नुसत्या देहाने या माझ्या श्रीकृष्णमूर्तीला भेटावे, ही जी मी तुला शिकवण दिली, ती तू सुभद्रापती अर्जुना ! विसरलास ना.
675-11
अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥675॥
हे आंधळ्या अर्जुना ! अनायासे प्राप्त झालेल्या सुवर्णमेरूचाही विशेष आदर वाटत नाही, असा हा मनाचा विपरीत स्वभाव आहे.
दिवस १५३ वा, २, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १८२५ ते १८३६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १८२५
नेघें तुझे नाम । न करी सांगितले काम ॥१॥
वाढे वचने वचन । दोष उच्चारिता गुण ॥धृपद॥
आता तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२॥
तुका म्हणे ठायी । मजपाशी काय नाही ॥३॥
अर्थ
देवा मी आता मुक्त झालो आहे त्यामुळे मी तुझे नाम ही घेणार नाही व कोणतेही तुझे काम ही करणार नाही. देवा तूझे दोष आणि तुझे गुण जर तुझ्यासमोर सागितले तर उगाच आपले बोलण्याने बोलणे वाढेल दुसरे काही होणार नाही. आता तुझ्या घरी कोण येरझारा करणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी बसल्या जागी काय करू शकत नाही माझ्याजवळ काय म्हणून नाही ?
अभंग क्र. १८२६
रज्जु धरूनिया हाती । भेडसाविली नेणती । कळो येता चित्ती । दोरी दोघा सारिखी ॥१॥
तुम्हा आम्हा मध्ये हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरी । ठाव पाहो तरावया ॥धृपद॥
सरी चिताकभोवरी । अळंकाराचिया परी । नामे जाली दुरी । एक सोने आटिता ॥२॥
पिसांची पारवी । करोनि बाजेगिरी दावी । तुका म्हणे तेवी । मज नको चाळवू ॥३॥
अर्थ
एखाद्या मनुष्याने हातामध्ये दोरी धरली आणि लहान मुलांना सांगितले की हा साप आहे, आणि त्या लहान मुलांना नंतर समजले की ही दोरी आहे तर ती दोरी दोघानाही सारखीच असते. त्याप्रमाणे हे हरी तुमच्या व आमच्यामध्ये ही असाच काही एक प्रकार निर्माण झाला होता. आणि आम्ही या भवसागराच्या मृगजळाच्या पुरातून कसे तरून जावे याविषयी विचार करीत बसलो होतो. ज्याप्रमाणे सोन्याचे सरी, चित्तांक आणि बुगडी असे अलंकार केले व नंतर ते सर्व अलंकार एका भांड्यात ठेवून त्योचे आळवण केले तर खाली केवळ सोने हाच धातू राहतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा जसा एखादा गारोडी पिसांचा पारवा तयार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो, त्याप्रमाणे तुम्ही मला फसवू नका.
अभंग क्र. १८२७
व्यवहार तो खोटा । आता न वजो तुझ्या वाटा ॥१॥
एका नामा नाही ताळा । केली सहस्रांची माळा ॥धृपद॥
पाहो जाता ठायी । खेळसील लपंडायी ॥२॥
तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥
अर्थ
देवा तुझे सर्व प्रकारचे व्यवहार खोटे आहेत आता आम्ही तुझ्या वाटेला केव्हाच जाणार नाहीत. देवा तुला एक देखील निश्चिंत नांव नाही त्यामुळे तुझ्या नावाचा ताळमेळ लागत नाही हजारो नावांची माळ तू तुझ्या गळ्यात घातली आहे. तुला पाहण्यास जर गेलो तर तु आमच्याशीच लपंडाव खेळतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या विषयी फार चेष्टा करतोस.
अभंग क्र. १८२८
लटिकाचि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥
अवघा बुडालासी ॠणे । बहुतांचे देणे घेणे ॥धृपद॥
लावियेली चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥
तुका म्हणे हात । आह्मी आवरीली मात ॥३॥
अर्थ
देवा तु आजपर्यंत जी तुझी पतितपावन, दीनानाथ वगैरे अशी ब्रीदे आहेत, ती सर्व तु खोटे करून दाखवले आहेत. देवा तु भक्तांकडून सेवा रूपी कर्ज घेतले आहेस आणि त्या ऋणानेच तु बुडाला आहेस बऱ्याचश्या भक्तांचे देणे घेणे तुझ्याकडे आहे. देवा तु अनेक प्रकारची रूपे धारण केलेली आहेस आणि तुझ्या रूपाचा चाळा भक्तांना लावला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुझ्याशी कोणताही व्यवहार करण्याविषयी आमचा हात आवरला आहे आणि तुझ्याशी बोलणे ही कमी केले आहे.
अभंग क्र. १८२९
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥
थोटा झोंडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥धृपद॥
सुखाचे उत्तर । नाही मुदलासी थार ॥२॥
तुका म्हणे काय । तुझे घ्यावे उरे हाय ॥३॥
अर्थ
देवा भरपूर भक्तांना तु तुझ्या प्राप्तीची आशा दाखवली परंतु शेवटी त्यांचा नाश केलास. देवा तु असा थोटा आहे, झोंडा आहे असा आम्हाला नागवा करणारा तु भेटला आहेस की सर्व लबाडांचाचाही तु शिरोमणी आहेस. देवा आमचे सेवा रूपी ऋण तुझ्याकडे आहे आणि त्याची मुद्दल देण्याचे तर जाऊ दे परंतु तु आमच्याशी सुखाचे दोन शब्दही बोलत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तुझ्या नागव्या कडून आम्ही काय घ्यावे आम्हा भक्तांना केवळ हाय हाय करणे शिल्लक आहे.
अभंग क्र. १८३०
ठाव नाही बुड । घरे वसविसी कुड ॥१॥
भलते ठायी तुझा वास । सदा एरवी उदास ॥धृपद॥
जागा ना निजला । होसी धाला ना भुकेला ॥२॥
न पुसता भले । तुका म्हणे तुझे बोले ॥३॥
अर्थ
देवा तू अनेक ठिकाणी अनेक घर बसविले आहेत परंतु तुझा शोध घेण्यास गेले तर तुझा कोठेही ठावठिकाणा लागत नाही. देवा तू कुठे ही राहतो परंतु कायमस्वरूपी त्या ठिकाणा विषयी तु उदास असतोस. तु जागाही नाहीस आणि झोपलेला ही नाहीस तू जेवलेलाही नाहीस आणि भुकेलाही नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला कोणी काही जरी विचारले नाही तरी तु त्या भक्तांचे सर्व दुःख जाणतो आणि तु जे वेद गीतामध्ये तुझे वचन सांगितलेले आहे त्या बोलण्याने लोकांचे कल्याण होत आहे.
अभंग क्र. १८३१
लाज ना विचार । बाजारी तू भांडखोर ॥१॥
ऐसे ज्याणे व्हावे । त्याची गाठी तुजसवे ॥धृपद॥
फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥
तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥
अर्थ
देवा तुला कोणत्याही प्रकारची लाज नाही कोणत्याही गोष्टीचा तु विचार करत नाहीस भर बाजारात तु भांडतोस. आणि देवा जो तुझ्या सारखाच झाला आहे बरोबर त्याच्या सोबत तुझी गाठ पडत असते. तु स्वतःची लंगोटी देखील फेडून देण्यास तयार होतोस परंतु दुसऱ्याचे सर्वस्व घेतो. तुकाराम महाराज म्हणतात हे चोरा तुला आपले आणि दुसरे असे काहीच नाही.
अभंग क्र. १८३२
श्वाना दिली सवे । पायाभोवते ते भोवे ॥१॥
तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारी ॥धृपद॥
जेविता जवळी । येऊनिया पुंस घोळी ॥२॥
कोपेल तो धणी । तुका म्हणे नेणे मनी ॥३॥
अर्थ
एखाद्या कुत्र्याला जर खुप लळा लावला तर ते नेहमी आपल्या पायाभोवती घोटाळत असतो. त्याप्रमाणे हे देवा तू मला लळा लावला आहेस आणि त्या कुत्र्याप्रमाणेच मी तुझ्या पायाजवळ राहत आहे. लळा लावलेला कुत्रा आपण जेवत असलो की आपल्या शेजारी येऊन त्याची शेपटी घोळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मालक जेवत असताना आपण तेथे गेलो तर मालक आपल्यावर रागवेल असे कुत्र्याच्या मनात सुद्धा येत नाही.
अभंग क्र. १८३३
वटवट केली । न विचारिता मना आली ॥१॥
मज कराल ते क्षमा । कैसे नेणो पुरुषोत्तमा ॥धृपद॥
उचित न कळे । जिव्हा भलतेचि बरळे ॥२॥
तुका म्हणे काही । लौकिकाची चाड नाही ॥३॥
अर्थ
देवा मी मनात कोणत्याही प्रकारचा विचार न करता जसे मनाला येईल तसे तुमच्यासमोर बडबड केली आहे. आणि हे पुरुषोत्तमा मी केलेल्या अपराधाबद्दल तुम्ही मला कशाप्रकारे क्षमा कराल ते मला काहीच कळत नाही. माझ्या जिभेला उचित काय अनुचित काय हे काहीच कळत नाही ती भलतेच काहीतरी बडबड करत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मला लौकिकाची चाड किंवा लाज अजिबात राहिलेली नाही.
अभंग क्र. १८३४
जीवे व्हावे साटी । पडे संवसारे तुटी ॥१॥
ऐशी बोलिलो वचने । सवे घेउनि नारायणे ॥धृपद॥
येणे नाही जाणे । केले कोणा न मागणे ॥२॥
नाही जन्मा आलो । करील ऐसे नेदी बोलो ॥३॥
ठाव पुसी सेणे । तुका म्हणे खुंटी येणे ॥४॥
अर्थ
परमार्थ करण्यासाठी जीवावर उदार व्हावे तरच जन्ममरण रुपी संसारातून आपली सुटका होत असते. नारायणाने गीते मध्ये जो उपदेश सांगितला आहे तोच मी उपदेश, वचन बोलत आहे आणि तोच माझ्या सोबत घेऊन मी सर्वाना सांगत आहे. यापुढे मी जन्मालाच आलो नाही असेच नारायण करील आणि हे पुन्हापुन्हा देखील तो मला सांगायला लावणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान रुपी ठिकाण ज्ञानरूपी शेणाने पुसून टाकलं त्यामुळे जन्म-मरण खुंटले आहे.
अभंग क्र. १८३५
आता पंढरीराया । माझ्या निरसावे भया ॥१॥
मनी राहिली आशंका । स्वामी भयाची सेवका ॥धृपद॥
ठेवा माथा हात । काही बोला अभयमात ॥२॥
तुका म्हणे लाडे । खेळे ऐसे करा पुढे ॥३॥
अर्थ
पंढरीराया, माझ्या संसारभयाचे निरसन करा. हे स्वामी, तुमच्या या सेवकाच्या मनामध्ये जी भयाची शंका राहिली आहे ; तिचे निरसन करा. देवा, माझ्या डोक्यावर अभयहस्त ठेवा ; व माझ्याशी काहीतरी अभयदानाच्या गोष्टी बोलून माझ्या मनाचे समाधान करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यापुढे मला लेकराला निर्भय करून ते लडिवाळपणाने या संसारात हसत खेळत राहील, असे करा.
अभंग क्र. १८३६
कवतुकवाणे । बोलो बोबड्या वचने ॥१॥
हे तो नसावे अंतरी । आम्हा धरायाचे दुरी ॥धृपद॥
स्तुति तैसी निंदा । माना समचि गोविंदा ॥२॥
तुका म्हणे बोले । मज तुह्मी शिकविले ॥३॥
अर्थ
अर्थ : – देवा, मी तुमच्याशी कौतुकाने व बोबड्या शब्दाने बोलत आहे. तरी माझ्यावर रागावून मला पायापासून दूर करण्याचे तुमच्या मनात येऊ देऊ नये ; हीच माझी विनंती आहे. गोविंदा, माझ्या बोलण्यात स्तुती अथवा निंदा जरी घडली, तरी ती तुम्ही सारखीच माना. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तरी आपल्या पदरचे कोठे बोलतो ! तुम्ही जसे शिकविले तसे मी बोलत आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

