“१२ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १२ jun
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १२ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९४५ ते १९५६ चे पारायण आपण करणार आहोत.
१२ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी २०१ ते २२५,
201-12
अरिमित्री तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानी सरिसा । होतु जाये ॥201॥
त्याप्रमाणे अर्जुना ! जो शत्रू-मित्र, मान-अपमान यांचे ठिकाणी एकसारखी समबुद्धी ठेवतो
202-12
तिही ऋतू समान । जैसे का गगन । तैसा एकचि मान । शीतोष्णी जया ॥202॥
ज्याप्रमाणे आकाश तिन्ही ऋतूंमध्ये एकसारखे समानच असते, त्याप्रमाणे थंडी व ऊन या दोहोंना जो सारखाच लेखतो,
203-12
दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता । तैसा सुखदुःखप्राप्ता । मध्यस्थु जो ॥203॥
हे अर्जुना ! मेरुपर्वत, ज्याप्रमाणे दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून येणार्या वार्याला सारखेच मानतो, त्याप्रमाणे प्राप्त होणार्या सुखदुःखांना जो सारखे लेखून निर्विकार राहतो.
204-12
माधुर्ये चंद्रिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिका । भूता समु ॥204॥
ज्याप्रमाणे चांदणे, दरिद्र्याला व राजाला सारखेच आल्हाददायक वाटते, त्याप्रमाणे जो पुरुष सर्व भूतमात्राचे ठिकाणी एक दयाबुद्धीच ठेवतो.
205-12
आघविया जगा एक । सेव्य जैसे उदक । तैसे जयाते तिन्ही लोक । आकांक्षिती ॥205॥
एक पाणी, जसे सर्व जगाला प्यावेसे वाटते, तसे तिन्ही लोक कृपा व्हावी म्हणून ज्याची इच्छा करतात.
206-12
जो सबाह्यसंग । सांडोनिया लाग । एकाकी असे आंग । आंगी सूनी ॥206॥
अंतर्बाह्य संगरूप विषयांचा संबंध सोडल्यामुळे, शरीराच्या ठिकाणीच शरीर घालून जो एकटा आहे.
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥12. 19॥
अर्थ निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही होईल त्यामधे संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय आहे. ॥12-19॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
207-12
जो निंदेते नेघे । स्तुति न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥207॥
ज्याप्रमाणे आकाशाला कशाचाही लेप लागत नाही, त्याप्रमाणे जो निंदा झाली असे समजून खेद मानित नाही व स्तुती झाली म्हणूम हर्षही असे मानित नाही,
208-12
तैसे निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनी वनी ॥208॥
त्याप्रमाणे निंदा आणि स्तुती या दोघांनाही एका पंक्तीस बसवून म्हणजे दोघांनाही सारखेच समजून, प्राणाप्रमाणे लोकात व वनात सारखाच वावरतो,
209-12
साच लटिके दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी । जो भोगिता उन्मनी । आरायेना ॥209॥
खरे किंवा खोटे असे दोन्ही प्रकारचे बोलणे सोडून देऊन जो मौन धारण करतो व ज्याला उन्मनी अवस्था भोगताना पुरे म्हणवत नाही.
210-12
जो यथालाभे न तोखे । अलाभे न पारुखे । पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा ॥210॥
प्रारब्धानुसार मिळणार्या सुखलाभाने देखील ज्याला आनंद होत नाही व पाऊस न पडला तरी समुद्र जसा सुकत नाही, तसा सुखलाभ न झाला असताही जो खिन्न होत नाही,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-12
आणि वायूसि एके ठायी । बिढार जैसे नाही । तैसा न धरीच कही । आश्रयो जो ॥211॥
आणि ज्याप्रमाणे वायू एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जो एकाच ठिकाणाचा आश्रय करीत नाही.
212-12
आघवाची आकाशस्थिति । जेवी वायूसि नित्य वसती । तेवी जगचि विश्रांती- । स्थान जया ॥212॥
ज्याप्रमाणे वायू अखंड आकाशात, आकाशस्वरूपच होऊन राहतो. त्याप्रमाणे संपूर्ण जगत् ज्याचे राहण्याचे स्थान असते,
213-12
हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥213॥
या संपूर्ण चराचरात ” मी मी ” म्हणून स्फुरणारा मीच एक आहे असे केवळ व्यतिरेकज्ञानच नाही, तर सर्व चराचर रूपाने मीच एक भासतो असे अन्वयज्ञानही ज्याच्या बुद्धीत दृढ झाले आहे.
214-12
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनी आस्था । तरी तयाते मी माथा । मुकुट करी ॥214॥
अर्जुना ! मग मी ‘यावरीही’ – म्हणजे व्यतिरेक व अन्वयज्ञान दृढ झाल्यावरही – माझ्या सगुणस्वरूपाचे प्रेमाने भजन करण्याची ज्याला गोडी व श्रध्दा आहे, त्याला मी आपल्या शिरावरील मुकुटच करतो- म्हणजे आपल्या शिरावर मुकुटाप्रमाणे धारण करतो.
215-12
उत्तमासि मस्तक । खालविजे हे काय कौतुक । परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणिया ॥215॥
अशा थोर भक्तापुढे माझ्यासारख्या एखाद्याने मस्तक लववावे यात काही आश्चर्य नाही, पण माझ्या या उत्तम भक्ताच्या चरणतीर्थाचा तिन्ही भुवनातील लोक आदर करतात.
216-12
तरी श्रद्धावस्तूसी आदरु । करिता जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥216॥
जर भगवान शंकर सद्गुरु प्राप्त झाले, तरच श्रध्दावस्तूचा-म्हणजे माझ्यावरील परमप्रेमवस्तूचा- आदर म्हणजे जपणूक -कशाप्रकारे केली पाहिजे, हे जाणता येते.
217-12
परी हे असो आता । महेशाते वानिता । आत्मस्तुति होता । संचारु असे ॥217॥
पण आता पुरे. भगवान शंकराच्या थोर प्रेमाचे वर्णन करू लागलो, तर आत्मस्तुतीचा संचार होईल, म्हणजे पर्यायाने आत्मस्तुतीच केल्यासारखे होईल.
218-12
ययालागी हे नोहे । म्हणितले रमानाहे । अर्जुना मी वाहे । शिरी तयाते ॥218॥
म्हणून रमापती श्रीकृष्ण म्हणाले, शंकराच्या प्रेमाची थोरवी गात नाही, पण अर्जुना ! (एवढेच सांगतो की) अशा भक्ताला मी शिरावर धारण करतो.
219-12
जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हाती । रिगाला भक्तिपंथी । जगा देतु ॥219॥
(कारण) असा हा माझा भक्त, सगुण सायुज्यारूपी चौथ्या पुरुषार्थाची सिध्दी आपल्या हाती घेऊन ती, भक्तिमार्गाने जगाला देत निघाला.
220-12
कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । की जळाचिये परी । तळवटु घे ॥220॥
कैवल्याचा-म्हणजे जीवब्रह्मैक्यरूप अद्वैतब्रह्मज्ञानाचा – जो अधिकारी असेल, त्याला स्वसामर्थ्याने मोक्ष देतो. इतके सामर्थ्य असूनही पाणी ज्याप्रमाणे नेहमी सखोल जमिनीकडे वाहते, त्याप्रमाणे तो आपण सर्वापेक्षा कनिष्ठ होऊन सर्वाना आपल्यापेक्षा परमेश्वरस्वरूप समजतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-12
म्हणौनि गा नमस्कारू । तयाते आम्ही माथा मुगुट करू । तयाची टांच धरू । हृदयी आम्ही ॥221॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! म्हणून आम्ही त्यांनाच नमस्कार करू. त्यांना आपल्या शिरावर मुकुट करू व त्यांचे चरण आम्ही आपल्या ह्रदयात धरू.
222-12
तयाचिया गुणांची लेणी । लेववू अपुलिये वाणी । तयाची कीर्ति श्रवणी । आम्ही लेवू ॥222॥
त्यांच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाणीवर घालू- म्हणजे त्यांच्या गुणांचे अखंड वर्णन करू व त्यांची कीर्ती हाच कोणी अलंकार आपल्या कानाचे ठिकाणी घालू-म्हणजे त्यांची कीर्तीच आपल्या कानाने श्रवण करू.
223-12
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे । हातीचेनि लीलाकमळे । पुजू तयाते ॥223॥
मी नेत्ररहित असताही त्यांना पाहावे या उत्कट इच्छेने नेत्र धारण केले व मी लीलेकरिता घेतलेल्या हातातील कमळाने त्यांची पूजा करीत असतो.
223-12
दोवरी दोनी । भुजा आलो घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचे आंग ॥224॥
त्यांच्या शरीराला अलिंगन देण्याकरीताच दोन भुजांवर आणखी दोन भुजा घेऊन आलो म्हणजे चतुर्भुज झालो. (दोन भुजांनी आलिंगन देऊन पूर्ण सुख भोगता येणार नाही, असे वाटून चतुर्भुज झालो, असा अर्थ)
225-12
तया संगाचेनि सुरवाडे । मज विदेहा देह धरणे घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ॥225॥
भक्ताच्या संगतीत देखील ब्रह्मसुख असते, म्हणूनच मी विदेही असूनही त्यांची संगती करण्याकरीता देह धारण करतो. फार काय सांगू ! अशा ज्ञानीभक्तांचे मला जे प्रेम असते, ते कशाचीही उपमा देऊन सांगता येण्याजोगे नाही.
दिवस १६३ वा, १२, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९४५ ते १९५६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १९४५
आधी नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती ॥१॥
घालितो पायासी मिठी एकसरे । नेदी तो दुसरे आड येऊ ॥ध्रु॥
कासया पडितो लटिक्याचे भरी । नव्हता का शिरी भार घेतो ॥२॥
संसाराचा हाटक फिरतो दुकानी । भरोवरी धन मेळवीतो ॥३॥
तुका म्हणे का हे घेतो गर्भवास । का या होतो दास कुटुंबाचा ॥४॥
अर्थ
देवा मला तुझ्या प्राप्तीचा उपाय आधी समजलाच नाही नाहीतर तुझी प्राप्ती करून घेण्यात माझ्याकडून चूक झाली असती काय ? देवा आता मी तुझ्या पायाला एकनिष्ठ भावनेने मिठी मारतो त्यामध्ये दुसरे काहीही आड येऊ देत नाही. देवा मला जर सुरुवातीलाच तुझ्या प्राप्तीचा उपाय माहित असता तर या खोट्या संसाराच्या भरीला मी कशाला पडलो असतो आणि या संसारातील स्त्रि पुत्र धन इष्टा आपतेष्टा सर्व नातेवाईक यांचा भार मी माझ्या माथ्यावर का घेतला असता ? देवा संसाराच्या या बाजारांमध्ये मी अनेक देहरूपी दुकाने का फिरत बसलो असतो आणि नको ते धन का मिळवीत बसलो असतो ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या प्रातीचा उपाय समजला असता तर मी अनेक जन्ममरण रुपी गर्भवास का सोसला असता, का बरे या प्रपंचाचा दास झालो असतो ?
3
अभंग क्र. १९४६
आता बरे झाले । माझे मज कळो आले ॥१॥
खोटा ऐसा संसार । मजि पायी द्यावा थार ॥ध्रु॥
उघडल्या डोळे । भोग देता कळी काळे ॥२॥
तुका म्हणे जीवा । होता तडामोडी देवा ॥३॥
अर्थ
देवा आता माझे मला चांगले समजले आहे हे फार बरे झाले. माझी चुक अशी मला समजली की हा संसार खोटा आहे त्यामुळे आता मला तुमच्या पायाच्या जागी थारा द्यावा. मी विचार केला आणि मला असे समजले की आपल्याला सुख दुःख प्राप्त होते ते केवळ आपल्या संचित कर्मामुळेच. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा जेव्हा या जिवाची फजिती झाली तेव्हाच मला हे समजले.
3
अभंग क्र. १९४७
बोलिलो ते धर्म अनुभव अंगे । काय पांडुरंगे उणे केले ॥१॥
सर्व सिद्धी पायी वोळगती दासी । इच्छा नाही ऐसी व्हावे काही ॥धृपद॥
संतसमागमे अळंकारू वाणी । करू हे पेरणी शुद्ध बीजे ॥२॥
तुका म्हणे रामकृष्णनामे गोड । आवडीचे कोड माळ ओवू ॥३॥
अर्थ
मी जे काही धर्माचरणाविषयी बोललो आहे ते मला आलेल्या अनुभवानेच बोललो आहे आणि धर्माचरणाणे वागणाऱ्याला पांडुरंगाने कधी काय कमी केले आहे काय ? आणि त्या धर्माचरणानुसार तुम्ही जर वागलात तर सर्व रिद्धी सिद्धी तुमच्या पायी लोटांगण घेतात व तुमच्या दासी होतात परंतु त्या रिद्धी सिद्धी विषयी कोणत्याही प्रकारची ईच्छा होऊ नये असे व्हावे. संतांच्या संगतीत राहून वाणीला नाम रुपी अलंकार परिधान करून आणि त्याच नामरूपी शुद्ध बिज्याची पेरणी सर्वाच्या ठिकाणी करू. तुकाराम महाराज म्हणतात रामकृष्ण हे नाम अतिशय गोड आहे आणि आवडीने व प्रेमाने त्या नामाची माळा आपण वोऊया.
3
अभंग क्र. १९४८
ज्याचे माथा जो जो भार । तोची फार तयासी ॥१॥
मागे पुढे अवघे रिते । कळो येते अनुभवे ॥धृपद॥
परिसा अंगी अमूप सोने । पोटी हीन धातूचे ॥२॥
आपुला तो करी धर्म । जाणे वर्म तुका ते ॥३॥
अर्थ
ज्याच्या त्याच्या विद्वत्ता सत्ता संपत्ती प्रमाणे त्याच्या माथ्यावर मोठेपणाचा भार असतो आणि तोच त्याला फार झालेला असतो. परंतु मागे पुढे हा मोठेपणाचा भार व्यर्थ आहे हे अनुभवाने कळून येते. परिसाच्या अंगी अगदी हीन जातीच्या धातूला (लोखंड) देखील सोने करण्याचे सामर्थ्य आहे परंतु परीस स्वतः सोने न होता हीनच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळेच मी माझे धर्मकार्य म्हणजे हरिनामाचे नामसंकीर्तन करण्याचे करतो आहे आणि मोठेपणाच्या भरीस मी पडत नाही त्यामुळे माझा कोणताही फायदा होणार नाही हे वर्म मी जाणतो.
3
अभंग क्र. १९४९
निंबाचिया झाडा साकरेचे आळे । आपुली ती फळे न संडीच ॥१॥
तैसे अधमाचे अमंगळ चित्त । वमन ते हित करुनि सांडा ॥धृपद॥
परिसाचे अंगी लाविले खापर । पालट अंतर नेघे त्याचे ॥२॥
तुका म्हणे वेळू चंदना संगती । काय ते असती जवळिके ॥३॥
अर्थ
कडू लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे करून त्यामध्ये पाणी सोडले तरी कडुलिंबाचे फळे गोड होणार नाहीत ती आपली गुणधर्म सोडणार नाहीत कडुलिंबाची फळे जरी साखरेचे आळे केले तरी कडूच राहणार. त्याप्रमाणे अधम व्यक्तीचे चित्त अमंगळ असते त्याला कितीही चांगल्या व हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी जसे जेवण केलेले अन्न ओकावे त्याप्रमाणे चांगले सांगितलेले सर्व तो आपल्या बुद्धीतून ओकुन टाकत असतो. परिसाच्या अंगाला खापर लावले असता त्याचे सोन्यामध्ये रूपातर होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात वेळूच्या वनांमध्ये जरी चंदनाची झाडे असले तरी त्याचा काही उपयोग ?
3
अभंग क्र. १९५०
दुबळे सदैवा । म्हणे नागवेल केव्हा ॥१॥
आपणासारिखे त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥धृपद॥
मूढ सभे आत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥
गांढे देखुनि शूर । उगीच करि बुरबुर ॥३॥
आणिकाचा हेवा । न करी शरण जाई देवा ॥४॥
तुका म्हणे किती । करू दुष्टाची फजिती ॥५॥
अर्थ
दुबळा आणि विचाराणे दुष्ट असलेला मनुष्य एखादा भाग्यवान मनुष्य पाहिला की मनात म्हणतो, याचे केव्हा वाटोळे होईल हा केव्हा नागवला जाईल याची केव्हा फजिती होईल ? त्या भाग्यवान मनुष्याला तो दुष्ट मनुष्य आपल्यासारखाच मनातल्या मनात करू पाहतो. मग अशा माणसाच्या स्वभावाला कोण काय करणार आहे ? मूढ मनुष्य भर सभेमध्ये पंडिताचा घात किंवा त्याचा अपमान केव्हा होईल याची वाट पाहत असतो. भित्रा मनुष्य शुर शिपायाला पाहून उगीचच मनामध्ये काहीतरी कुरकुर करीत असतो. दुष्ट मनुष्याने इतरांचा हेवा करण्यात काय अर्थ आहे काय त्याला मी असा उद्देश करेन की तु वेगाने देवाला शरण जा म्हणजेच चांगले होईल. तुकाराम महाराज म्हणतात अशा दुष्ट लोकांची मी किती वेळा फजिती करू ?
3
अभंग क्र. १९५१
माझी आता लोक सुखे निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥
कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करू देवा ॥धृपद॥
तुका म्हणे काय करू लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥२॥
अर्थ
आता लोक त्यांच्या सुखकरता माझी किती नींदा करायची ते करोत, ते मला म्हणतात की मी सर्व आचार विचार सोडून दिला आहे. देवा तुझी प्राप्ती कशात आहे त्याबद्दल मी विचार करीन आणि इतरांची भीड भाड धरून मी काय करू ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी लोकांना चांगले वाटावे म्हणून आता उगाच विविध प्रकारचे सोंग घेऊन काय करू कारण या लोकापासून आपल्याला होणारे सुख हे नाशवंत आहे.
3
अभंग क्र. १९५२
ढेंकणाचे संगे हिरा जो भंगला । कुसंगे नाडला साधु तैसा ॥१॥
ओढाळाच्या संगे सात्विक नासली । क्षण एक नाडली समागमे ॥धृपद॥
डांकाचे संगती सोने हीन जाले । मोला ते तुटले लक्ष कोडी ॥२॥
विषाने पक्वान्ने गोड कडू जाली । कुसंगाने केली तैसी परी ॥३॥
भावे तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौऱ्यांशीचा ॥४॥
अर्थ
कितीही घणाचे घाव घातले तरी हिरा फुटत नाही परंतु ढेकणाच्या संगतीने हिरा भंग पावतो त्याप्रमाणे साधू जरी असला तरी त्याने वाईट लोकांची संगत केली की त्याची अवस्था त्या हिर्याप्रमाणेच होते व शेवटी त्याची फाजितीच होते. ओढाळ जनावराच्या संगतीत चांगले जनावर राहिले तर त्या चांगल्या जनावराचे वर्तन ओढाऴ जनावरा प्रमाणेच होते त्याप्रमाणे सात्विक स्त्री व्यभिचारीन स्त्री बरोबर राहिली की ती सात्विक स्त्री देखील आचारभ्रष्ट होते. सोन्याची किंमत लक्षवधी कोट्यावधी असते परंतु टाकाची संगती केली की सोने हिन होते व त्याची किंमत घटते. किती ही गोड पक्वान असले तरी त्यामध्ये थोडे जरी विष मिळाले तर ते पक्वान कडू होते त्याप्रमाणे कुसंगतीच्या लोकासंगे चांगल्या मनुष्याने जरी संगती केली तरी त्याचे ही विचार बदलतात. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला अतिशय भावपूर्वक श्रद्धापूर्वक सांगतो की सत्संग हा केव्हाही चांगला परंतु कुसंग जर झाला तर चौऱ्यांशी येनीच्या फेऱ्या कराव्या लागतात.
3
अभंग क्र. १९५३
नामे स्नानसंध्या केले क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥
आणिके दुरावली करिता खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥धृपद॥
रामनामी जिंही धरिला विश्वास । तिही भवपाश तोडियेले ॥२॥
तुका म्हणे केले कळिकाळ ठेंगणे । नामसंकीर्तने भाविकांनी ॥३॥
अर्थ
केवळ एक हरिनाम घेतल्याने स्नान-संध्या नित्य क्रियाकर्म केल्यासारखेच पूर्ण होते एवढेच नाही तर त्याने जन्ममरण व्याधी दु ख देखील नाहीसे होते. हरी प्राप्तीचे खरे वर्म हे नामसंकीर्तन आहे आणि हे काही लोकांना न कळल्यामुळे ते लोक देवापासून दुरावले आहेत देवाची प्राप्ती करता ते इतर साधनाची खटपट करतात व त्याचा भोबाटा उठवितात. रामनामाच्या ठिकाणी ज्यांनी विश्वास धरला आहे त्यांनी भवपाश तोडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या भाविक भक्तांनी नामसंकीर्तनाच्या आधारावर कळिकाळाला देखील ठेंगणे केले आहे.
3
अभंग क्र. १९५४
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणी । साही अठरांजणी चहू वेदी ॥१॥
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥धृपद॥
आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाही ॥२॥
तुका म्हणे मुगुटमणी हरीभक्ती । आणीक विश्रांति आरतिया ॥३॥
अर्थ
वैष्णवांची कीर्ती पुराणांनी, सहा शास्त्रे, अठरा पुराणे आणि चार वेदांनी गायली आहे. असा कोण वैष्णवा पेक्षा श्रेष्ठ आहे तो मला दाखवा हे ग्रंथाचे वाचकहो कर्मठ आणि धार्मिक पुण्यशील हो तुम्ही मला सांगा. आदिनाथ शंकर नारद मुनिश्वर आणि शुकमुनी हे देखील वैष्णव आहेत त्यांच्या पेक्षा कोणीही मोठे नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्ती ही सर्व साधनांचे मुकुटमणी आहे इतर सर्व साधने हे गौण आहेत.
3
अभंग क्र. १९५५
बोलिलो जैसे बोलविले देवे । माझे तुम्हा ठावे जातिकुळ ॥१॥
करा क्षमा काही नका धरू कोप । संत मायबाप दीनावरी ॥धृपद॥
वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढे ॥२॥
तुका म्हणे पुढे अपराध नेणता । द्यावा मज आता ठाव पायी ॥३॥
अर्थ
मला जसे देवाने बोलविले आहे तसे मी बोललो आहे येरवी तर तुम्हाला माझी जात आणि कुळ माहीतच आहे. त्यामुळे तुम्ही संत मायबाप माझ्या दिनाकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा राग धरू नका. माझ्या वाणीचा चालक जो आहे त्या हरीनेच मला योग्य धर्म काय आहे आणि त्याचे वर्म कोणते आहे हे मला दाखविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे हे संतजन हो पुढे माझ्याकडून कोणता अपराध जरी झाला तर त्याबद्दल तुम्ही विचार न करता मला तुमच्या पायाजवळ ठाव द्यावा.
3
अभंग क्र. १९५६
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारी परोपरी लोळतसे ॥१॥
चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥धृपद॥
उच्छिष्ट हे जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥
तुका म्हणे मी आणीक विचार । नेणे हेचि सार मानीतसे ॥३॥
अर्थ
मी संतांच्या घरचा काम करणारा दास आहे मी त्यांच्या घरा दारात अंगणात सतत लोळत पडलेलो आहे. असे केल्यामुळे संतांच्या चरणाची धूळ माझ्या अंगाला लागेल व त्यामुळे माझ्या माता चे व पिताचे दोघाचेही एकवीस एकवीस कूळ असे मिळून बेचाळीस कुळ उद्दरून जातील. त्या संतांचे उच्चिष्ट ज्या पत्रवाळीत पडलेले असेल ती पत्रवाळी उचलून त्या पत्रवाळीतले उच्चिष्ट अन्न जमा करीन आणि त्याचे घास मी माझ्या मुखा मध्ये घालीत. तुकाराम महाराज म्हणतात केवळ संत सेवा करणे हाच एक विचार मी मानतो इतर कोणताही विचार मी मानत नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

