Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

११ जून, दिवस १६२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १९३३ ते १९४४

11 june NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

11 june NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“११ जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 11 jun
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ११ जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १९३३ ते १९४४ चे पारायण आपण करणार आहोत.
११ जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १७६ ते २००,

176-12
खोलिये पारु नेणिजे । तरी भक्ती न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरता मोक्षु ॥176॥
ज्ञानभक्तीने संतांना जे पावित्र्य येते, या पवित्रतेच्या खोलीला पारच नाही; तरी भक्त त्यात बुडत नाही आणि न मरता — म्हणजे जिवंतपणीच, रोकडाचि — म्हणजे प्रत्यक्ष — त्यांना मोक्षाचा लाभ होतो.
177-12
संताचेनि अंगलगे । पापाते जिणणे गंगे । तेणे संतसंगे । शुचित्व कैसे ॥177॥
पाप्याचे पाप आपण घेऊन, त्याला निष्पाप करणारी गंगा, ज्या संतांच्या अंगस्पर्शाने शेवटी निष्पाप होते; त्या संतांच्या संगाने जो पवित्रपणा येतो, तो किती अगाध म्हणावा !
178-12
म्हणौनि असो जो ऐसा । शुचित्वे तीर्था कुवासा । जेणे उल्लंघविले दिशा । मनोमळ ॥178॥
म्हणून हे पुरे. जो सत्पुरुष असा थोर पवित्र असल्यामुळे सर्व तीर्थांना आश्रय झाला, ज्याने आपल्या मनाचे दोष दिशांच्या पलीकडे पळवून लावले,
179-12
आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळु । आणि तत्त्वार्थीचा पायाळु । देखणा जो ॥179॥
ज्याप्रमाणे सूर्य, आतबाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे जो पुरुष आत म्हणजे अंतःकरणात व बाहेर म्हणजे शरीराच्या ठिकाणी अत्यंत शुचिर्भूत असतो आणि पायाळू माणसाप्रमाणे सर्वत्र तो ब्रह्मतत्वरूपी अर्थच पाहात असतो.
180-12
व्यापक आणि उदास । जैसे का आकाश । तैसे जयाचे मानस । सर्वत्र गा ॥180॥
ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापक असून सर्वापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे ज्याचे मन व्यापक असून सर्वत्र अलिप्त असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


181-12
संसारव्यथे फिटला । जो नैराश्ये विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥181॥
तसेच पारध्याच्या हातातून सुटलेल्या पक्ष्याची जशी दुःखातून सुटका होते, त्याप्रमाणे अंतःकरणात तीव्र विषयवैराग्य बाणल्यामुळे जो विषयसुखाची निःशेष आशा सोडून संसार दुःखापासून मुक्त झाला.
182-12
तैसा सतत जो सुखे । कोणीही टवंच न देखे । नेणिजे गतायुषे । लज्जा जेवी ॥182॥
ज्याप्रमाणे मेलेल्या पुरुषाला मुळीच लज्जा नसते, त्याप्रमाणे आत्म्याचे सतत सुख प्राप्त झाल्यामुळे ज्याला काहीच दुःख भासत नाही.
183-12
आणि कर्मारंभालागी । जया अहंकृती नाही आंगी । जैसे निरिंधन आगी । विझोनि जाय ॥183॥
कर्म करण्याकरिता लागणारा देहाहंकारच ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही—म्हणजे ज्याच्या ठिकाणी ” मी ब्रह्म आहे ” ही वृत्ती इतकी दृढ झाली आहे की ज्याला ” मी ब्रह्म आहे ” चिंतनच करावे लागत नाही. ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे घातली नाहीत, तर अग्नी जसा विझून जातो,
184-12
तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पै गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥184॥
त्याप्रमाणे मोक्षाचे अंग म्हणून जो उपशम सांगितला आहे, तो उपशमच पूर्णपणे ज्यांच्या वाटेला आला आहे.
185-12
अर्जुना हा ठावोवरी । जो सोऽहंभावो सरोभरी । द्वैताच्या पैलतीरी । निगो सरला ॥185॥
अर्जुना ! हा ठाववरी म्हणजे पूर्ण अहंकृतीरहित होऊन व उपशम साधून जो ” मी ब्रह्म आहे ” अशा अखंड निदिध्यासनाच्या बळावर द्वैताच्या पलीकडील तीराला म्हणजे अद्वैतरूप तीरावर जावयाला निघाला.


186-12
की भक्तिसुखालागी । पापियाचा आपणपेचि दोही भागी । वांटूनिया आंगी । सेवकै बाणी ॥186॥
किंवा भक्तिसुख भोगण्याकरिता जो आपणच आपल्याला दोन भागात वाटून घेऊन एका अंगाने सेवक किंवा भक्त होतो.
187-12
येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो ॥187॥
दुसर्‍या भागाला मी म्हणजे देव, हे नाव ठेवतो व मग माझ्या सगुण स्वरूपाचे भजन न करणार्‍या ज्ञान्यादि योग्यांना, अद्वैतातही होणार्‍या सगुण भक्तीचे श्रेष्ठ स्वरूप दाखवितो.
188-12
तयाचे आम्हा व्यसन । आमुचे तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तै ॥188॥
असा जो ज्ञानी भक्त असतो, त्याचे आम्हाला वेडच लागते, तोच आमच्या अखंड ध्यानाचा विषय असतो. किंबहुना त्याच्याच भेटीत आम्हाला समाधान होते.
189-12
तयालागी मज रूपा येणे । तयाचेनि मज येथे असणे । तया लोण कीजे जीवे प्राणे । ऐसा पढिये ॥189॥
अशा प्रेमळ भक्ताकरिता मी सगुणस्वरूप होतो, त्याच्याकरिताच मी या जगात असतो आणि तो मला इतका प्रिय असतो की, त्याच्यावरून आम्ही आपले जीव, प्राण ओवाळून टाकावे असे वाटते,

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥12. 17॥

अर्थ जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा नाही व चांगले व वाईट या दोन्हीविरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. ॥12-17॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
190-12
जो आत्मलाभासारिखे । गोमटे काहीचि न देखे । म्हणौनि भोगविशेखे । हरिखेजेना ॥190॥
ज्याला आत्मप्राप्तीवाचून काहीच गोड वाटत नाही, म्हणूनच विशेष विषयभोग त्याला प्राप्त झाले, तरी आनंद होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


191-12
आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला । म्हणौनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥191॥
संपूर्ण विश्वात आत्मस्वरूपाने मीच एक भरलेला आहे, या दृढ ज्ञानाने सहजच ज्याला, आपल्याहून दुसरी वस्तूच दिसत नाही आणि म्हणूनच ज्याला कोठेही द्वेष नसतो.
192-12
पै आपुले जे साचे । ते कल्पांतीही न वचे । हे जाणोनि गताचे । न शोची जो ॥192॥
मी खरोखर आत्मस्वरूप आहे व ते आत्मस्वरूप कधीही नाश पावत नाही, या दृढ विचाराने जो नाश झालेल्या वस्तूबद्दल कधी दुःख करीत नाही.
193-12
आणि जयापरौते काही नाही । ते पापियाचा आपणपेचि आपुल्या ठायी । जाहला यालागी जो काही । आकांक्षी ना ॥193॥
आणि ज्या अद्वैत आत्मवस्तूहून दुसरी वस्तूच नाही, ती आत्मवस्तू मीच आहे, असे कळून आल्यामुळे जो कशाचीही इच्छा करीत नाही.
194-12
वोखटे का गोमटे । हे काहीचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवी ॥194॥
ज्याप्रमाणे सूर्याला रात्री व दिवस यांचा अनुभव येत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणात हे चांगले, हे वाईट असे भावच उत्पन्न होत नाहीत.
195-12
ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु । त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायी ॥195॥
याप्रमाणे कशाचीही जाणीव न होता जो देहासह संपूर्ण केवळ जाणीवरहित चिन्मात्रस्वरूप होऊन राहिला आणि त्यातही माझ्या सगुणस्वरूपाच्या ठिकाणी प्रेमभक्ती करणे हा ज्याचा स्वभावच बनला.


196-12
तरी तया ऐसे दुसरे । आम्हा पढियंते सोयरे । नाही गा साचोकारे । तुझी आण ॥196॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! अशा ज्ञानभक्तीसारखा खरोखर दुसरा आमचा प्रिय सोयराच नाही, हे मी तुझी शपथ घेऊन सांगतो.

समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥12. 18॥

अर्थ शत्रू व मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख व दु:ख यांचे ठिकाणी समान असणारा, (अंतर्बाह्य) संगरहित, ॥12-18॥
(भक्तलक्षणे पुढे चालू)
197-12
पार्था जयाचिया ठायी । वैषम्याची वार्ता नाही । रिपुमित्रा दोही । सरिसा पाडु ॥197॥
अर्जुना ! ज्याच्या ठिकाणी आपपर अशा विषमभावांचा स्पर्श नसतो व जो शत्रू-मित्र दोघांनाही सारखेच लेखतो.
198-12
का घरीचिया उजियेडु करावा । पारखिया आंधारु पाडावा । हे नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥198॥
अर्जुना ! त्याप्रमाणे, दिवा जे नेहमी घरात राहणारे आहेत त्यांना प्रकाश द्यावा व बाहेरून आलेल्या परक्यांना अंधार द्यावा, असे कधी करीत नाही.
199-12
जो खांडावया घावो घाली । का लावणी जयाने केली । दोघा एकचि साउली । वृक्षु दे जैसा ॥199॥
किंवा तुकडे करण्याकरिता कुर्‍हाडीने प्रहार करू इच्छिणार्‍याला व झाड लावून त्याची वाढ करणार्‍याला झाड एकसारखीच सावलीच देते.
200-12
नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेचि जेवी ॥200॥
किंवा ज्याप्रमाणे ऊस पाणी घालून वाढविणार्‍याला गोड व चरक्यात घालून पिळणार्‍याला कडू असा कधीच होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १६२ वा, ११, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १९३३ ते १९४४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १९३३
न्यावयासी मूळ पाठवील कधी । मज कृपानिधी पांडुरंग ॥१॥
प्राण फुठे माझा त्याचिये वियोगे । घडी जाय युगे एकी एकी ॥धृपद॥
त्याचिये गावीची आवड ती जीवा । जीव हा सांडावा वोवाळूनी ॥२॥
दिनो दिन चिंता वाढते बहुत । नावडे संचित करावेसे ॥३॥
तुका म्हणे आता आहे तोची सरो । कोण करी भरोवरी मग ॥४॥
अर्थ

हा कृपानिधी पांडुरंग मला नेण्यासाठी कधी मूळ पाठवील ? या पांडुरंगाच्या वियोगाने माझा प्राण फुटून पाहत आहे एक एक क्षण देखील मला त्याच्या वियोगा़मध्ये युगासारखा वाटत आहे. माझ्या जीवाला त्या पंढरीत राहणाऱ्या संतांची फार आवड आहे आणि त्यांच्या वरून हा जीव ओवाळून टाकावा असे मला वाटते. मला पांडुरंगाच्या भेटीविषयी दिवसेंदिवस फारच चिंता वाटत आहे आणि आता यापुढे कोणतेही संचित कर्म करण्याची ही आवड मला राहिली नाही. तुकाराम महाराजांचा आता जे पूर्व संचित कर्म आहेत त्याचेच भोग असतील ते सरून जावोत, मग यामध्ये अधिक भर कोण घालीत बसेल. (म्हणजे माझ्या संचितात भर घालण्याचे काम मी तरी करणार नाही आणि माझ्याव्यतिरिक्त ते इतर कोणी करू शकत नाही म्हणजे ते का एकदाचे संपले की तुला मला न्यायलाच लागेल. )
3

अभंग क्र. १९३४
पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा हा कळला साच भाव ॥१॥
नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठविता सुख वाटे ॥धृपद॥
धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवासा ॥२॥
तुका म्हणे लाभ झाला एक सरे आणिक दुसरे नाही आता ॥३॥
अर्थ

आजवर मी नेमाने जो विधी पाळला, पांडुरंगाची जी सेवा केली ती आज खऱ्या अर्थाने फळास आली. त्यामुळे मला जो खरा भाव गवसला आहे, माझ्या मनात विठुरायासाठी जी ओढ निर्माण झाली आहे ती याच विधीचा परिणाम आहे. त्यामुळे माझ्या चित्ताला नामाची आवड निर्माण झाली असून विठोबाचे पाय आठवताच सुख प्राप्त झाल्याचे अनुभवास येते. त्याप्रमाणे नरदेह लाभल्याचे कारण आता मला उमगले असून त्यानिमित्ताने आता पुढील गर्भवासाच्या दुःखातून म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात असा हा लाभ इतक्या सहज आणि सरळ कळून आला की आता दुसरे काहीही कारण मला दिसत नाही आणि इतर कशातच माझे मन आता अडकत नाही.
3

अभंग क्र. १९३५
हित तेचि एक राम कंठी राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥
हाचि एक धर्म निज बीजवर्म । हेचि जाळी कर्मे केली महा ॥धृपद॥
चित्त राहे पायी रूप बैसे डोळा । जीवे कळवळा आवडीचा ॥२॥
अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका म्हणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥
अर्थ

राम हे नाम आपल्या कंठामध्ये सदैव असावे त्यामध्येच आपले हित आहे देहाला देहभावाची आठवण देखिल येऊ देऊ नये. हेच खरे धर्म आहे आणि सर्व साधनांचे बीज देखील हेच आहे व सर्व गोष्टीचे वर्म देखील हेच आहे. राम हे नाम कंठात धारण केल्याने काय होते तर चित्त हरीच्या पायी स्थिर होते आणि डोळ्यात त्याचेच रूप वसते आणि जीवाला हरी विषयी आवडीचा कळवळा निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात गंगा समुद्राला तरी जाऊन मिळाली तरीही तिचा पाठीमागील प्रवाह थांबत नाही तो पण अखंड राहतो खंडत नाही भंग पावत नाही त्याप्रमाणे रामनाम कंठात धारण केले तर हरी विषयी प्रेम हे भंगत नाही खंडित होत नाही.
3

अभंग क्र. १९३६
माझिये जातीचे मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥
आवडे ज्या हरी अंतरापासूनि । ऐसियाचे मनी आर्त माझे ॥धृपद॥
तयालागी जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥
सुफळ हा जन्म होईल तेथून । देता आलिंगन वैष्णवांसी ॥३॥
तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा । गाऊ या गोपाळा धणीवरी ॥४॥
अर्थ

माझ्या आवडीची इच्छा पूर्ण करण्याकरता माझ्या जातीचा म्हणजे माझ्यासारखाच हरिभक्त वैष्णव मला कोणीतरी भेटो. ज्यांना हरी विषयी अंतकरणापासून प्रेम आहे अंतकरणापासून ज्यांना हरी आवडतो अशा हरिभक्तांची भेट मला व्हावी अशी आर्त इच्छा माझ्या मनात आहे देवा. त्यांच्यासाठीच माझा जीव कासावीस होतो आणि त्यांना पाहण्यासाठी माझे डोळे त्यांची वाट पाहत आहेत. वैष्णवांना एकदा की आलिंगन दिले त्यावेळेपासून माझा जन्म सुफळ होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला आमची आणि वैष्णवांची गाठ होईल तो सुदिन सोहळा असेल आणि आम्ही मिळून या गोपाळाचे नांव तृप्ती होईपर्यंत गात राहू.
3

अभंग क्र. १९३७
आमुचे जीवन हे कथाअमृत्त । आणिक ही संतसमागम ॥१॥
सारू एके ठायी भोजन परवडी । स्वादरसे गोडी पदोपदी ॥धृपद॥
धालिया ढेकरे येती आनंदाचे । वोसंडले वाचे प्रमेसुख ॥२॥
पिकले स्वरूप आलया घुमरि । रासी ते अंबरी न समाये ॥३॥
मोजिता तयाचा अंत नाही पार । खुंटला व्यापार तुका म्हणे ॥४॥
अर्थ

आमचे जीवन म्हणजे हरी कथामृत आणि संत समागम हेच आहे. संत आणि आम्ही एका ठिकाणी बसून हरिनाम कथा अमृताचे भोजन करू आणि त्यामधील स्वाद रस हा पदोपदी आवडीने गोडीने सेवन करू. त्यामुळे आम्ही तृप्त होऊन आनंदाने ढेकर देत आहोत आणि हरिकथा आमृत विषयी प्रेमसुख आमच्या वाचेतून ओसंडत आहे. त्यामुळे स्वस्वरूपाचे पीक भरघोस प्रमाणात आलेले असून त्याची रास आकाशात देखील नाही मावत. तुकाराम महाराज म्हणतात या स्वस्वरूपाचे मोजमाप करण्यात गेलो तर ते मोजता येत नाही व त्याचा अंतपार ही लागत नाही त्यामुळे सर्व व्यापार खुंटला आहे.
3

अभंग क्र. १९३८
जोडिले ते आता न सरे सारिता । जीव बळी देता हाता आले ॥१॥
संचित सारूनि बांधिले धरणे । तुंबिले जीवन आक्षेपे हे ॥धृपद॥
शीत उष्ण तेथे सुखदुःख नाही । अंतर सबाही एक जाले ॥२॥
बीज तो अंकुर पत्र शाखा फळे । प्राप्तबीज मुळ अवघे नासे ॥३॥
तुका म्हणे नामी राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥४॥
अर्थ

आता जे मला साध्य झाले आहे, जीव अक्षरशः बळी देऊन मी जे काही हे प्रेमरूपी धन जोडले आहे ते आता काहीही केले तरी सरत नाही, त्याला अंत नाही. माझ्याकडील असलेले सर्व संचित बाजूला सारून मी तुझ्या पुढे माझ्या मागण्यांचे धरणे बांधून बसलो आहे एवढे की त्यात माझा प्राण कंठाशी आला आहे, माझे प्राणरुपी जीवन तेथे तुंबून त्याला मोकळे पणाने वाहण्यास आता सोय नाही. मी अशा अवस्थेला पोचलो आहे की जेथे मला शीत उष्ण, सुख दुःख ह्याची चाड राहिलेली नाही किंबहुना त्याची जाणीवच राहिली नाही, माझे अंतरमन आणि बाह्यदशा एकच झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे एखादे बीज जेव्हा अंकुरावयास सुरुवात होते तेव्हा त्याच्यातून पाने, शाखा, फळे असे रूप घेऊ लागतात आणि मूळ बीजाचा नास होतो. त्याप्रमाणेच जेव्हा फक्त आणि फक्त नामातच गोडी मिळायला लागते आणि त्यामुळे देहभावाचा लय होत जातो तेव्हा अशा वासनेतून निर्माण झालेल्या कित्येक बीजांचा नास होत जातो.
3

अभंग क्र. १९३९
भक्तीभावे आह्मी बांधिलासे गाठी । सादावितो हाटी घ्या रे कोणी ॥१॥
सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥धृपद॥
सुखाचे फुकाचे सकळाचे सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥
मागे भाग्यवंत जाले थोर थोर । तिही केला फार हाचि साटा ॥३॥
खोटे कुडे तेथे नाही घातपात । तुका म्हणे चित्त शुद्ध करी ॥४॥
अर्थ

आम्ही भक्ती भाव आमच्या पदरात बांधला आहे आणि संसाराच्या बाजारांमध्ये कोणी भक्तिभाव घेतो का असे हाक देत सुटलो आहे. आम्ही सुखाच्या बाजारपेठेमध्ये परमार्थिक दुकान टाकले आहे आणि या दुकानांमध्ये रामनामाचा माल ठेवलेला आहे. हे राम नाम साधन म्हणजे सुखाचे फुकटचे आणि सगळ्या साराचे चे ही सार व भवसिंधु पार तरून जाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. मागे झालेले थोर भगवद् भक्त ते भाग्यवंत आहेत व त्यांनीही याच रामनाम मालाचा फार मोठ्या प्रमाणात साठा केला होता. तुकाराम महाराज म्हणतात या माला मध्ये कोणत्याही प्रकारचे खोटेपणा वाईटपणा आणि घातपात होण्याची संभावना तर नाहीच आणि तुमचे चित्त शुद्ध असेल तर हा माल तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही भरा.
3

अभंग क्र. १९४०
पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे । आपुलाल्या दैवे पिके भूमि ॥१॥
बीज तेचि फळ येईल शेवटी । लाभहानितुटी ज्याची तया ॥धृपद॥
दीपाचिये अंगी नाही दुजाभाव । धणी चोर साव सारिखेचि ॥२॥
काउळे ढोंपरा कंकर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळे ॥३॥
तुका म्हणे येथे आवडी कारण । पिकला नारायण जया तैसा ॥४॥
अर्थ

पर्जन्य आपल्या स्वभावानुसार सर्वत्र पडत असतो परंतु ज्याचे जसे दैव असेल तशा प्रकारचे पीक भूमी देत असते. जसे बीज असेल तशा प्रकारचे फळ किंवा धान्य शेवटी येते आणि ज्याच्या त्याच्या भोगा नुसारच लाभ हानी होत असते. दिव्याच्या अंगी दुजा भाव नसतो धनी असो चोर असो किंवा साव असो त्याला सर्व सारखेच आहेत. कावळ्याला जनावराच्या ढोपरा वरचे किडे खाण्यास आवडते तित्तर पक्षाला खडे खाण्यास आवडते आणि राजहंस पक्षाचा चारा म्हणजे मोतीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये परमार्थाची आवड असणे खरे कारण आहे मग ज्याच्या त्याच्या आवडीनुसार नारायण त्याला फळ देतो.
3

अभंग क्र. १९४१
धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावे ॥१॥
चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥धृपद॥
सूर्यविकासीनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥२॥
धेनु येऊ नेदी जवळी आणिका । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥३॥
तुका म्हणे नेम प्राणांसवसाटी । तरीच या गोष्टी विठोबाची ॥४॥
अर्थ

हरी च्या ठिकाणी एकविध भक्तिभाव ठेवण्याकरता मुख्य कारण म्हणजे सहन शक्ती आहे जसे पतिव्रतेला सर्वकाही म्हणजे तिचा पती असतो त्याच्याच ठिकाणी तिची श्रद्धा असते अगदी त्याप्रमाणे आपली हरीच्या ठिकाणी पाहिजे. चातक हा पक्षाला कितीही तहाण जरी लागली तरी शेजारील कोणत्याही पाण्याकडे आपल्या डोळ्यांनी तो पाहतही नाही अगदी प्राण कंठात आला तरी तो पावसाच्याच पाण्याची वाट पाहतो. सूर्यकिरणात विकसित होणारे कमळ हे चंद्रकिरणांची अपेक्षा करीत नाही तर ते केवळ सूर्‍यास्ताची व सुर्योदयाची वाट पाहत असते. गाय आपल्या वासरा शिवाय इतर कोणालाही आपल्या जवळ येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी वरील सांगितलेले उदाहरणाप्रमाणे नियम पालन करावे अगदी आपला प्राण गेला तरी ही नियम मोडू नये नाहीतर विठोबाच्या गोष्टी करू नयेत.
3

अभंग क्र. १९४२
देहबुद्धी वसे जयाचिये अंगी । पूज्यता त्या जगी सुख मानी ॥१॥
थोर असे दगा जाला त्यासी हाटी । सोडोनिया गाठी चोरी नेली ॥धृपद॥
गाठीचे जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभे ॥२॥
पुढिल्या उदिमा जालेसे खंडण । दिसे नागवण पडे गाठी ॥३॥
तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनिया घात कोण करी ॥४॥
अर्थ

ज्याच्या अंगामध्ये देहबुद्धी आहे म्हणजे देहा विषयी आसक्ती आहे त्याला आपल्याला सर्वानी पुज्य मानावे मग तेच खरे सुख आहे असे त्याला वाटते. या संसार बाजारांमध्ये त्याला फार मोठ्या प्रमाणाचा दगा झाला आहे असे समजावे कारण त्याच्या पदरामध्ये जे पुण्याचे धन होते ते केवळ या मान्यतेच्या सुखाने चोरून नेले असेच म्हणावे. पदरच्या पुण्याचे धन जाऊन तो मोकळा होतो असे नाही तर त्याचा गळा दंभ आणि लोभाणे बांधला जातो. असे झाल्यामुळे पुढे होणार्‍या परमार्थिक कर्माविषयी त्याचा खंड पडतो व त्यानंतर परमार्थही नाही व संसार ही नाही अशा प्रकारची फजिती त्याच्या पदरात पडलेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मानापानाच्या बंधनात अडकू नये दंभ लोभाच्या बंधनात गुंतू नये असे संत नेहमी सांगतात आणि ज्याला संतांचे हे बोलणे समजले मग सर्व जाणून देखील स्वतःचा घात स्वतः कोण करून घेईल ?
3 3

अभंग क्र. १९४३
जिकडे जाय तिकडे सवे । आता यावे यावरी ॥१॥
माझ्या अवघ्या भांडवला । तू एकला जालासी ॥धृपद॥
आता दुजे धरा झणी । पाया हुनी वेगळे ॥२॥
तुका म्हणे आता देवा । नका गोवायावरी ॥३॥
अर्थ

देवा मी जिकडे जाईल तिकडे तु माझ्या मागे यावे. माझे सर्व भांडवल म्हणजे तु एकटाच झाला आहेस. देवा आता तु मला तुझ्या पाया वरून वेगळे ठेवू नको बरे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मला यापुढे कोठेही गुंतवून ठेवू नकोस बरे.
3 3

अभंग क्र. १९४४
स्मराता का घडे नास । विष्णुदास यावरी ॥१॥
ऐसी सीमा जाली जगी । तरी मी वेगी अनुसरलो ॥धृपद॥
धरिले ते निवडे आता । न घडे चित्ता वेगळे ॥२॥
तुका म्हणे नाश नाही । पुराणे ही गर्जती ॥३॥
अर्थ

विष्णुदासांनी विष्णूचे स्मरण केले आणि त्यांचा नाश घडेल, असे होणे शक्य तरी आहे काय ? विष्णुची कीर्ती संपूर्ण जगामध्ये झाली आहे त्यामुळे तर मी वेगाने त्याला शरण गेलो आहे. आता आम्ही जो भक्ति मार्ग आमच्या चित्त धारण केला आहे, निवडला आहे तो आमच्या चित्तातून वेगळे होणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात विष्णुदासांचा कधीही नाश होत नाही असे पुराणे देखील ग‍रजुन सांगतात.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version