Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

 संत गाडगेबाबा संपुर्ण भाग ३, (११ ते १५)

SANT GADGE BABA CHARITRA 3 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

SANT GADGE BABA CHARITRA 3 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! संत गाडगेबाबा  !!!                 

 भाग – ११.

          शेवटी निर्णायक स्वरांत बाबा म्हणाले,आतांपर्यंत एका लहान घराला माझं समजत होतो.लहानश्या कुटुंबा साठी,शेतासाठी भांडत होतो.पण आतां जागा झालोय!आतां हे अवघे शेत,पृथ्वी माझे घर आहे.मी ठरवले यापुढे अडल्या नडल्यांना मदत,दिनदुबळ्या,अनाथांची सेवा करुन त्यांचे आशिर्वाद घ्यावा आणि हे करतां करतां देवाचे नांव घ्यावे, हा एवढा मोठा आनंद सोडून,एवढे अफाट घर सोडून त्या छोट्या बंदिस्त घरांत यायला सांगता?यावर कोण काय बोलणार?

           लोकांना कळून चुकले,डेबूजींचे डोके फिरले नाही तर ते निस्वार्थ भावनेने करताहेत.त्यांची उंची लोकांच्या लक्षात येऊ लागली.दापूरे तिथून जवळच असल्यामुळे,तेथील त्यांच्या कामाचा झपाटा माहित असल्याने लोकांच्या मनांत आदर निर्मान झाला होता. सावकाराच्या दाढेखालून शेत काढल्या पासून तर आदर द्विगुणित झाला होता. आजचे बाबांचे विचार ऐकून लोकांचे मन उचंबळून आले.आणि कांही लोकांनी दरड खणण्यास बाबांना उत्स्फुर्त मदत करुं लागले.माती उचलण्यात,पायर्‍या करण्यांत,मैदान झाडण्यांत मदत करुं लागले.सत्कार्याची ज्योत कुणीतरी पेटवली की,मग सारा अंधार नाहीसा होतो.एकाचे बघून दुसरा,चौथा,दहावा भराभर अनुकरण करुं लागले.दिवसभर काम करावे आणि रात्री बाबांच्या सुरेल आवाजांत भजने ऐकावे.मग हरिदासबुवा चे कीर्तन व्हायचे त्यात हरिश्चंद्र,चिलिया बाळ,सत्यवान सावित्री,द्रौपदीवस्राहरणा चं रसाळ वाणीत आख्यान व्हायचे. निरुपण ऐकल्यावर भक्तीने गहिवरुन हरिदासांच्या पायी पैशाचा ढीग पडत. भजन करतां करतां अचानक बाबा म्हणत… ” नाम घ्या फुका।न लागे दमडी अथवा रुका।।” समारंभ करा पण कर्ज काढून नाही.कर्ज काढून यात्रा नका करुं परमेश्वर गरीबांसोबत नेहमीच असतो.

         दारात कुणी लंगडा लुला याचना करत उभा असतो तेव्हा तुमच्या हातून कोरतुकडा सुटत नाही.त्याच्या अंगावर कुत्रा सोडता,हाकलून देता.शिक्षणाने साक्षर होते.तुम्ही निरक्षर म्हणून सावकार फसवतो.हे सारं बाबांनी भटकंतीत अनुभवलेले अनुभवाचे बोल सांगत होते.

          बाबांच्या कीर्तनाचा पहिला प्रयोग झाला.यात्रा संपली अन् बाबांचे परीभ्रमण सुरु झाले.ऋणमोचनला झालेल्या त्यांच्या पहिल्या कीर्तनाची खबर चहूबाजूस पसरली.अगदी नाविण्य पूर्ण स्वतः अक्षरशून्य असून,अफाट निरिक्षणाने खेडूतांना समजेल अशा वर्‍हाडी सोप्या भाषेत रोजच्या व्यवहारा तील दृष्टांत देत बाबा कीर्तन करुं लागले. एकाच घरची भीक्षा न घेता चार घरची भिक्षा घेऊन खावी.कोणाच्या घरी न राहतां रानांत राहावे.दिवसभर अतिशय कष्ट,लोकांची कामे केल्यावर मोबदला देऊ केला तर अव्हेरुन निघून जावे. काट्याकुट्या,धुळभरल्या वाटा अनवाणी पायाने तुडवीत पायी हिंडावे.

         एखाद्या गावातील देवळासमोरचे पटांगण झाडतांना दिसले व कुणी विचार पुस केली की म्हणावे,कुणा बुवाचं रात्री कीर्तन आहे.मग रात्री लोक जमा झाले की,अचानक अंधारातून हाती एकतारी घेऊन उभे राहावे.त्यांचा अवतार बघून अवहेलना,टिंगलटवाळी करुन फसगत केली म्हणून लोकांनी घरचा रस्ता धरला की,बाबांनी एकतारीवर सूरेल आवाजांत भजन सुरु केले की,परत येऊन लोकांनी बसावे.भजनीमंडळींनी टाळमृदुंगा सहित देवळाकडे धाव घ्यावी.

          जमाव जमला की,बाबांनी बोलण्यास सुरवात करावी..मी अडाणी, शिक्षणाचा गंध नसलेला,लोकांचे कपडे धुवावं,भाकरी मागून पोट भराव!पण तुम्ही मंडळी…मग त्यांची स्तुती करुन हळुहळु त्यांचे मते अनुकुल करुन,त्यांना न बोचेल,न जाणवेल अशा रीतेने त्यांच्या वैगुण्यावर बोट ठेवावे.आणि मग प्रश्नोत्तर रुपी कीर्तन करुन सगळ्यांना कीर्तनाचा घटक करुन घेत.सगळा समुदाय त्यांच्या प्रश्नाला उत्तरे देऊ लागले की,अचानक बाबा त्यांच्यावर कोसळत.अरे!ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली तो देव इतका लालची,लाचखाऊ आहे कां?

“असा कसा तुमचा देव।घेतो बकर्‍याचा जीव!” तो काय साहेबांचा चपराशी आहे?की,पैसे दिले न् साहेबांची गाठ घालून दिली.अरे! ज्यानं हे जग पैदा केलं त्यालाच लाच देता,लालुच दाखवता?बरं देवाला बकरा कबूल केलेच तर त्याला देवाच्या नांवाने सोडून द्यावे का कापून खावे?त्याला कापतांना होणार्‍या यातनेने जीवांच्या आकांताने ओरडतो तेव्हा तुम्हाला जराही दया येत नाही,अंतःकरण पसीजत नाही.देव जर जीवात आहे तर, अशा यातना दिल्यावर देव तुमचे कल्याण करेल की सत्यानाश?बाबांचा चढलेला आवाज  व तळमळून बोलण्या ने श्रोत्यांंच्या मनी चर्र होई….राम राम राम सिताराम राम राम….चकीत आणि लज्जित श्रोते मुकाट्याने भजन करु लागत…..राम राम राम सिताराम राम…

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! संत गाडगेबाबा  !!!

भाग -१२.

          बाबांच्या साध्या सोप्या बोली भाषेतील दिलेल्या दाखल्यांनी सर्व जमाव ताब्यात येई.श्रोत्यांना आपले म्हणणे पटत आहेसे बघून बाबा पुढे बोलू लागत.अरे!आजारी लेकरु ठीक व्हावं म्हणून तुम्ही देवापुढे कोंबडे बकरे कापतां!आणि तो परत आजारी होत नाही का?अंगारे धुपारे करावे की,डाॅक्टर कडे न्यावे?आजाराचे निदान डाॅक्टरला कळते की भगताला?बरं भगत तरी स्वच्छता राखतो का?महिना महिना त्याच्या अंगाला पाणी लागत नाही,अंगा वर,कपड्यांवर दरादरा उवांचे बोचकेच्या बोचके असतात.आणि अंगात देव आला म्हणून घुमतो.बाबा अंगात देव आल्याची हुबेहुब नक्कल करुन दाखवली की,हसून हसून लोकांच्या मुरकंड्या वळत.खेडे गावात कुणी किंवा लेकरु मेलं की,बाया जशा त्याचे एक एक गुण आठवु आठवु रडतात ती जशीच्या तशी नक्कल केली की.हास्याचा कल्लोळ उठत.लोकांना पटत,आपण खरोखरच फार मोठा मुर्ख पणा करतोय!त्यानंतर सामुहिक भजन होत असे.

        बाबांची अशा रीतीने कीर्तनें रंगु लागत.लोकांचे थवेच्या थवे कीर्तनाला लोटत.पध्दतीप्रमाणे कीर्तनकाराच्या पाया पडायला लोक येऊ लागले की, हळूच गर्दीतून निसटून कुठेतरी आडोश्याला अंधारांत लपून बसत.

        रोज नवीन गावे!तिकीटतपासनीना ने उतरवून दिले की,परत दुसर्‍या गाडीत बसावे.स्टेशनबाहेर पडतांना तिकिटचेकर त्यांची थट्टा करीत,टपल्या मारत,कान धरुन उठाबश्या काढायला लावीत.बाबा हे सर्व शब्दही न बोलतां मुकाट्याने सोसात.जातां येतां कुणी ओळखले की, अरे हे तर गाडगेबाबा!नवलाने लोक पाया पडायला धावली की,पाहतां पाहतां नाहीसे होत.परत रात्री एखाद्या देवळात एकतारी वाजु लागली की,हजारोंच्या संख्येने लोकं जमु लागत.बाबांच्या वाणी चा प्रवाह सुरु होई!दारु कशी बनते? दोन आण्याची पिऊन चार आण्याची कशी अंगात आणतात?आणि दारुड्याच्या आवाजाची,ओरडण्याची हुबेहुब नक्कल बाबा करुन दाखवीत.असे अनेक विषयां वरचे कीर्तन एकून लोकांचे मन गलबलुन डोळे पाझरु लागत.बाबांच्या स्वरांतील  कारुण्यभरल्या आवाजाने योग्य परिणाम होऊन व्यसन त्यागनाचा निश्चय,संकल्प करीत.

          कधीकधी बाबा कठोर स्वरांत शब्दांच्या आसुड्याचे फटकारे ओढले की  लोकांची मान लज्जेने खाली झुकत व मनपरिवर्तन होत.अशा प्रकारे कीर्तना द्वारे जनजागृती करुन सगळीकडे चैतन्य निर्माण होत असे.रोज नवे गांव,नवे स्थान,नवा अनुभव….दिवसभर विरक्त वृत्तीने हिंडावे,लोकांच्या शिव्याशाप खाव्या,मानहानी सोसावी,भाकरी मागून खावी बदल्यात दामदुप्पट श्रम करावे, मोबदला न घेता चालू लागावे.

          बाबांचा सर्वत्र संचार सुरु होता. पुन्हा ऋणमोचन त्यांची वाट पाहत होते. सर्व स्तरातील लोकं कीर्तन ऐकायला उत्सुक होते.प्रत्येक जातीत कुणी ना कुणी संत निर्माण झाले होते.परीट जातच तेवढी सुटली होती.याही जातीत गाडगेमहाराजांच्या रुपाने एका महान संताची निर्मिती झाली.कुळाबरोबरच सगळ्या जातीचा उध्दार केला.ऋणमोच न यात्रेची संधी साधून बाबांचे स्वागत व नवनवीन उपक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी  गावोगावच्या अनेक मंडळींनी पुढाकार घेतला.पौष महिन्यांत सुरु झालेल्या यात्रे साठी बाबांनी नेहमी प्रमाणे दरड खणण्याचा उपक्रम सुरु करतांच यावेळी साहित्यासहित लोकांची उत्स्फुर्त साथ मिळाली.दरड्या खणून झाल्यात.बाबां च्या लक्षात आले,हे काम दरवर्षीच करावे लागेल.पूर आला की,सारं पूरांत वाहून जाणार.तेव्हा पक्के बांधकाम करुन दगडी घाटच बांधायला हवाय!

         कीर्तनाद्वारे यात्रेत वेगवेगळ्या चुली मांडण्यापेक्षा सर्वांणी वर्गणी करुन एकत्रीत स्वयंपाक व जेवणाची बाबांची कल्पना लोकांनी उचलून धरली.स्वतः बाबा उष्ट्या पत्रावळी उचलून दूरवर नेऊन टाकताहेत बघून बाकीचेही त्यांच्या  नीटनेटकेपणाचे अनुकरण करुं लागले. पण या अन्नातील कणालाही स्पर्श न करतां मागून आणलेली भाकरी हातात घेऊन खात होते.खाणे आटोपले की, लांब एखाद्या झाडाखाली जाऊन बसले  की,त्यांच्या भोवती लोकं जमा होऊन आपापली गार्‍हाणी मांडत.मग बाबांनी  दिलेला योग्य निर्णय दोन्ही पक्षांना मान्य होऊन समझौता होत असे.रात्री कीर्तना ला झाडून सारे लोक जमा होत.अंगावर चिंध्यांचा वेश,हाती एकतारी,मधूर सुरेल  कारुण्याने ओथंबलेल्या आवाजात बाबांचे कीर्तन सुरु होई!

                क्रमशः
संकलन व ®© मिनाक्षी देशमुख.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – १३

        लोकांच्या मनांत आणखी जागृती होण्याच्या दृष्टीने नरदेहाची महती पटवून देत,बाबा सांगु लागले,अरे ज्या पत्नी बरोबर संसार करुन पूर्ण जीवन व्यतीत केले,तीच पत्नी म्हातारपणी तुमच्या पडत्या काळात घालूनपाडून बोलते. स्वतः अभाव सोसून ज्या मुलांची हौस मौज,गरजा पूर्ण केल्यात,तेच मुलं शेवटच्या काळात हिडीसफिडिस करतात ज्या सग्यासोयर्‍यांची मदत केली ते तोंड फिरवतात.म्हणून आपल्या हातून जे कांही सत्कर्म केले असेल,तेच कामी येते. आपल्या हातून असे कार्य घडावे की, आपल्यानंतर आपल्या मरणाने ते दुःखी व्हावे.”मरावे परि कीर्ती रुपे उरावे” अशा आशयाचे कीर्तन रात्रभर सुरु असले तरी लोकं कंटाळत नसत.वेळेचे भान राहत नसे.वास्तविक हे सर्व बाबांनी कुठे ऐकले किंवा कुणी त्यांना शिकवले नव्हते.त्यांनी केलेल्या प्रवासात आलेल्या अनुभवातुन जे प्रत्ययास आले तेच कीर्तनात सांगत होते.बाबा कांही पोथ्यापुराणातील स्वर्ग नरकाच्या कल्पना न सांगता चहुकडे जे घडते,दिसते तेच कळकळीने,तळमळीने सांगत असल्यामुळे लोकांच्या मनाला स्पर्श होत, भिडत व बाबांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा दृढ निश्चय  करीत.

           दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा ऋणमोचनला आले.नेहमीप्रमाने दरड खणणे,मैदान झाडणे,यात्रेत स्वच्छता राखणे अशी कामे अनेकांच्या मदतीने करणे सुरु असतांनाच एके दिवशी ज्या तिडके सावकारांना त्यांच्या माणसां सहित शेतातून पिटाळून लावले होते,खुन पडेपर्यंत पाळी येऊन प्रकरण गाजले होते,तेच सावकार बाबांकडे येऊन हात जोडत म्हणाले,डेबूजी!हे दरवर्षी नदीचे दरड खणण्याचे काम किती वर्षे करणार   मी घाट बांधायला पैसा देतो,आणि म्हटल्याप्रमाणे घाट बांधणीस सुरुवात झाली.बाबांच्या देखरेखीखाली घाटाची एक एक पायरी चढू लागली.

        याच गडबडीत बांबांची मोठी कन्या आलोकाचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगांवचे बकसाजीचे सुपुत्र फकीराजीशी ठरले.लग्नासाठी बाबांचा शोध सुरु झाला,पण  एके ठिकाणी त्यांचा पत्ता कुठे मिळणार?आज सोलापूर तर उद्या कोल्हापूर तिथे  जावे की ते वर्धेला गेलेले.अखेर बाबांचा मामेभाऊ बळीरामने दापोर्‍याला कन्या दान केले.त्यामुळे घरांत धुसफुस वाढली. बाबांनी गृहत्याग केल्यामुळे मागे सखु बाई,कुंताबाई,कलावती,गोविंद यांची जबाबदारी घरावर पडली.बळीरामला कांही वाटत नव्हते पण त्यांच्या पत्नीची कुरबुर चालायची.शेवटी सखुबाईंनी सून नातवंडांना सोबत घेऊन ऋणमोचनला बाबासमोर आल्यावर येण्याचे प्रयोजन विचारल्यावर सखुबाई म्हणाल्या,तुझ्या सोबत राहायला आलोय!बाबांनी त्यांना एका झाडाखाली झोपडी उभारुन दिली. मात्र त्या झोपडीत ते कधीच राहिले नाही कुठेही एखाद्या झाडाखाली झोपत असे.

 दुसर्‍या दिवसापासून इतर मजूरांबरोबर  यांनीही दगडचुना वाहावा.इतर मजूरांना जी मजूरी मिळे तीच यानांही मिळे.वेगळी वागणूक नाही.

          बाबांचे निःस्पृह वागणे बघून लोक अंचबित झाले.तिडके सावकाराने थैलीभर पैसे बाबांना आणून दिले पण स्वतः हातही न लावतां त्यांच्यावरच जबाबदारि सोपवली.बाबांच्या उंचीवर कोणी पोहचूच शकत नव्हते.बाबांना कुणी कांही द्यायचे साहस करीत नव्हते पण त्यांच्या कुटुबाला कुणी कांही दिले व बाबांच्या लक्षात आले की,काम संपल्या वर मजूरांना झोपडी बाहेर बोलावून आंत लपवून ठेवलेल्या सर्व वस्तू वाटून टाकत. चिडून सखुबाई म्हणायच्या आम्ही कुणा ला कांही मागत नाही.लेकरांना दिलेलेही घेऊ नये का?नाही.ही पण तुझीच लेकरं नाही का? मग त्या गप्प बसत.घाटाच्या कामासाठी चहुकडून द्रव्याचा ओघ सुरु झाला.पूर्णेच्या दक्षिण तीरावरील घाटाचे काम पूर्ण झाल्यावर उरलेल्या रकमेत घाटाशेजारी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले.

       अकोला जिल्ह्यातील उंबर्ड्याच्या पारुबाईची बाबांवर नितांत श्रध्दा असल्यामुळे त्या ऋणमोचण यात्रेला येत. दुसरा घाट बांधण्यासाठी त्यांनी ५००० रु दिले.त्या पैशातून याच घाटाच्या शेजारी पूर्वेकडे दुसरा घाट बांधला.पूर्वी मुदगलेश्वरासमोर प्रिथमजी राघोजी तिडक्यांनी घाट बांधला होता तो महापूरात खचून गेला.तेव्हा बाबांच्या आदेशानुसार प्रिथमजीचे नातू व्यंकट बनाजी व आडगांवचे काशिनाथ धाके या दोघांनी पुढाकार घेऊन प्रशस्त मजबूत घाट बांधला.दाढीचे दोन बंधु नारायणजी व माणिकलाल यांनीही एक घाट बांधला.  असे दक्षिणेकडे तीन व पूर्वेकडे एक असे चार घाट बांधून झाले.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

भाग – १४.

‌          श्रीक्षेत्र पंढरपूर हे उभ्या महाराष्र्टा चे आदिपीठ.दर आषाढी कार्तिकीला चारही बाजूंनी हजारों भक्तांचा थवा रेल्वे, मोटार,पायी मिळेल त्या साधनाने हाती टाळ,खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरल येतात.यात्रेच्या दिवसांत तीन लाखापर्यंत यात्रेकरुंची संख्या असायची.स्पृष्य लोकांची कशी तरी बडव्यांच्या जुनाट घरांत,छपरीत, जिन्याखाली,कोठीत,मठात एकच शौचकुप असलेल्या जागी सोय व्हायची,पण अस्पृश्यांच्या हालाला पारावार नसायचा.सध्याचा बौध्दवाडा पूर्वीचे दुर्गंधीचे साम्राज्य असलेले, केंबळी घरे,महिनोनीमहिने सारवण नाही,कोपर्‍यात जाते,कोंबड्या बकर्‍या,त्यांच्या लेंड्या,कोंबड्यांची शिट,उखडलेल्या जमीनी,मुलांनी केलेली घाण,सर्वीकडून वाहणारे दुर्घंधीयुक्त पाणी अश्या अडचणीच्या जागेत निष्ठावंत अस्पृश्य वारकरींचे वास्तव्य असायचे.एवढे हाल सोसून ही त्यांना मंदिरांत प्रवेश वर्ज्य,दुरुनच कळसाच्या दर्शनावर समाधान मानावे लागत.

” तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस ।

  तात्काळ हा नाश अहंकाराचा ।।”

त्यांच्या कष्टांना,हालअपेष्टांना सीमा नसायची,तरी पण अमर्याद सहनशक्ती व धैर्याने ते वारीस यायचेच!

        गाडगेबाबांच्या लक्षात त्यांची ही होत असलेली परवड,स्वतः बाबांनीसुध्दा ही सारी दुःखे अनुभवली होती.तेव्हा या दलितांसाठी एखादी सर्वसोईयुक्त धर्मशाळा बांधण्याचा त्यांनी निश्चय केला चारही बाजूंनी बाबांची प्रसिध्दी पसरल्या मुळे,त्यांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने सर्वच स्तरांतील लोक जमत. त्यांत अनेक धार्मिकसुध्दा असत.बाबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारीस येणार्‍या अस्पृश्यांच्या हालाचे चित्रण उभे करुन त्यांच्यासाठी कांही व्यवस्था करण्याचे आव्हान केले.मग बाबांवर अपरंपार निष्ठा असलेले लोक पुढे आले. त्यांच्या मदतीने बाबांनी पंढरपूरच्या पूर्वेस गोपाळपूर रस्त्यावरील मोकळी जागा खरेदी केली.कामावर देखरेख करण्यासाठी निःस्पृह,निरिच्छ,त्यागी,नम्र निष्ठावंत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील दाभे गावचे जागोबा बोरकर चोखामेळा आणि नागपूर जिल्ह्यातिल अड्याळचे तुळशीराम फुलझेले चोखामेळा यांची नियुक्ती केली.तसेच या अडाणी लोकां साठी कुणीतरी प्रज्ञावंत शिक्षित माणसा चा शोध घेत असतांं त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचा रहवाशी हरिभाऊ गांगणेचा विरक्त वृत्तीचा,मॅट्रीक पर्यंत शिकलेला मुलगा गणपत,बाबांच्या किर्तनाने भारावलेला बाबांसोबत राहण्या  साठी बाबांना भेटून नम्रपणे आपला मनोदय व्यक्त केल्यावर,त्याच्या अंगावरी ल कपडे बघून बाबा म्हणाले,तुमचे आमचे कसे जमावे?तत्क्षणी गणपतरावां नी अंगावरचे सर्व कपडे त्यागून फक्त धोतर व साधे उपरणे एवढी दोनच वस्रे ठेवली.व जन्मभर दोनच वस्रे बाळगली. सुरुवातीला बाबांनी त्याची मोठी कठोर परीक्षा घेतली,बिनातिकिट रेल्वे प्रवास, तिकिटतपासनींचे तडाखे,अपमान,भीक मागायला पाठवणे,कुठे तरी बसायला सांगून,स्वतः निघून गेले की संध्याकाळ पर्यंत गायब,कधी हाकलून द्यावे,अमुक ठीकाणी भेटायला यालला सांगत,जवळ पैका,कपडे नाहीत,भरीला काम केल्या शिवाय फुकटचे खायचे नाही,कुणाच्या घरी न राहतां रानांत राहावे अश्या तर्‍हेच्या बाबांनी घेतलेल्या कठोर परीक्षे त गणपतराव गांगण उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

         वाण्याघरी जन्मलेले गणपतराव हिशेब ठेवणे,जमाखर्च लिहिणे,खतवाणी तयार करणें यांत तरबेज असल्यामुळे खूप झपाट्याने वाढलेल्या धर्मशाळेचा सारा व्यवहार त्यांच्या सुपुर्द केला.स्वतः बाबा उभे राहून कामें करवून घेत.एके दिवशी गुजरातमधील सस्तु साहित्य मंडळाचे स्वामी अखण्डानंद बांबाची किर्ती ऐकून त्यांना भेटायला आले.त्या वेळी बाबा एका झाडाखाली आपल्या पारंपारिक वेशभूषेत एका झाडाखाली हाती भाकरी खात असलेले बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले.बाबांनी त्यांना अस्पृश्यांच्या होत असलेल्या हालाचे वर्णन ऐकून ते प्रभावित झाले व तिथल्या तीथे त्यांनी १५,००० चा चेक लिहून बाबांच्या स्वाधीन केला.   

        मूर्तीजापूरला गुरे म्हातारी झाली की, कसायाला विकतात याचे बाबांना अतिशय वाईट वाटायचे,त्यांची कांहीतरी व्यवस्था करण्याचे त्यांनी ठरविले. निरुपायाने गरीब शेतकरी आपली गुरे कसायास विकावी लागत.एका कीर्तनात मूर्तिजापूरचे धनिक जामदार बाबांना भेटले असतां,बाबांनी अनाथ गुरांसाठी कांहीतरी करायचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी अनाथ गुरांची संस्था काढण्यास ५६ एकर जमीन अर्पन केली.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. २७-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – १५.

       गुरांसाठी संस्थेच्या बांधकामाची सुरुवात तर झाली पण पाण्याची अडचण निर्माण झाल्याचे कळतांच, तिडके,भडशिवणीकर,ऊदय पाटील, तुळशीराम भैय्या,लक्कडगंजवाले असे अनेकांनी मदतीचा हात देऊन गोरक्षणचा गोवर्धन उचलला.विहिर बनून तयार झाली.जमादाराच्या छप्पन एकर शेतात गुरांचा गोठा,त्याना कोंडण्यासाठी चारही बाजूने बंदिस्त आवार,पाणी पिण्यासाठी हौद,सुरेख बाग,सेवकांसाठी इमारती, कडब्याची व्यवस्था अशी कामे होऊ लागली.आपल्या हातून कांही तरी चांगले घडावे या भावनेने माणसांचा ओघही बाबांकडे वाहू लागला.

         पारंपारिक पारमार्थिक वाटा न स्विकारता बाबांनी वेगळा यातनामय मार्ग शोधून काढला.या देशाला बाबांचे हे महान दान होते.त्यांची इच्छा नसतांही अनुयायी गोळा होतच होते.ऋणमोचन यात्रे प्रमाणेच वर्‍हाडातील कौण्डण्यपूर, माहूर,धानोरे,सोनगांव,पिंजर इथेही यात्रा भरत असे.या यात्रांमधे प्रसिध्दीस आलेल्या बाबांच्या कीर्तनाची मोठ्या आस्थेने, उस्तुकतेने वाट बघत.बाबा प्रथम कीर्तना चे पटांगण झाडून लख्ख करणे,आलेल्या बैलगाड्या ओळीने लावणे अशी कामें बाबांचे उत्साही स्वयंसेवक उस्त्फुर्त करीत.

      कांही श्रीमंत व्यक्तींना विरक्ती प्राप्त झाल्यामुळे ते बाबांकडे आलेत.बाबांनी त्यांची कठोर परीक्षा घेऊन,पारखून निरनिराळ्या ठीकाणी कामासाठी त्यांची योजना केली.

      गणपतराव गांगणांसारखाच एक निस्पृह शिरसो गावच्या विधवा भिकुबाई चा मुलगा अच्युतराव देशमुख नावांचा हिरा बाबांना गवसला.बाबांनी हरप्रकारे घेतलेल्या कठोर परीक्षेच्या कसास ते उतरले.बाबांचा व्याप वाढतच होता. ऋणमोचनचे घाट,मंदिरें,धर्मशाळा, पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा, मूर्तिजापूरचे गोरक्षण….आतां बाबांना पंढरपुरी मराठा धर्मशाळा बांधण्याचे वेध लागले.निर्लोभ,निर्व्यसनी झटून कामे करणारी,ज्यांच्या भरवश्यावर हजारों रुपयांचे व्यवहार निर्धोकपणे टाकावेत अशी उत्तम माणसें बाबांना मिळत गेली.

स्वतः बाबा मात्र जलातील कमलपात्रा प्रमाणे,कोणताही लोभ न ठेवतां,हजारो रुपयांची आवक असूनही एक तनसडीही स्वतःवर खर्च न करतां भीक मागून खात होते.फाटक्या चटईवर झोपत.बिना तिकिट रेल्वे प्रवास करीत.

       मधून मधून बाबांना कुटुंबियांचा प्रश्न सोडवावा लागे.त्यांच्यासाठी बांधलेल्या झोपडीत बाबा कधी राहिले नाही की,स्वयपाकांत वाटेकरी झाले नाहीत.जसे स्वतः जगले,तसेच कुटुंबाला जगायला भाग पाडले.ऋणमोचनवरुन कुटुंब आमल्याला आणले.आई आणि पत्नीने शेतमजूरी करुन कसेतरी पोट भरावे.धाकटी मुलगी कलावती लग्नाची म्हणजे ९-१० वर्षाची झाली होती.कधी दापूर्‍याहून बळीराम भेटीस आला की, सखूबाई त्याच्याजवळ कलावतीच्या लग्नाचा विषय काढी.बाबांविषयी घरच्यां च्या मनी जरी दुरावा असला तरी,जमाती त त्यांचेविषयी गर्व होता.जमातीत बळीरामने गोष्ट काढतांच,नक्षापूरचे शिवरामजी परीटांनी आपल्या मुलासाठी कलावती निश्चित केले.बाबांच्या कानी वार्ता गेल्यावर,त्यांनी सक्त ताकीद दिली, वरपक्षाकडून तनसडीही घ्यायची नाही आणि बळीरामनेही खर्च करायचा नाही. चकीत होऊन बळीरामने विचारले मग लग्न कसं होईल?मुलीच्या आईने भिक्षा मागून लग्न करावं!नाईलाजाने कुंताबाई ने दारोदार भीक्षा मागून ७-८ पायल्या ज्वारी गोळा केली.लग्नाचा दिवस उजाडला.आमल्यास वर्‍हाड गोळा झाले. लग्नाच्या दिवशी सकाळीच बाबा पोहोचले.नवरा नवरीला ऋणमोचनला नेऊन पूर्णेत आंघोळ घातली.खापरांत जेवण वाढलं.जेवणांत भाजी भाकरी. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्न होते. तुम्ही लग्न उरकवून घ्या असे सांगून बाबा कीर्तनास निघून गेले.

        शेवटी बाबांशिवाय लग्न उरकले. जेवणांत चूण भाकरीचा बेत!सकाळी वर्‍हाड जाण्यास निघाले असतां बाबा हजर!कुठे निघालात?अन् ही झालेली घाण तशीच टाकून?बाबांनी स्वतः हाती खराटा घेतल्याबरोबर सोयर्‍यांनीही भाग घेतला.झाडून,सडे टाकून मैदान स्वच्छ झाल्यावर,बाबांनी अहेरापोटी रोख रकम मागताच लोकांनी वर्गणी जमा केली.त्या रकमेची बाबांनी सरकी ढेप आणवुन गाड्या ओढणार्‍या बैलांनाही लग्नाची मेजवानी दिली.

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २७-९-२०२१.

संत गाडगेबाबा संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version