Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

 संत गाडगेबाबा संपुर्ण भाग २, (६ ते १०)

SANT GADGE BABA CHARITRA 2 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

SANT GADGE BABA CHARITRA 2 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! संत गाडगेबाबा  !!!                 

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग -६.

           अघटीत घडले होते.एका अनाथ दरिद्री,कुणाचाही पाठींबा नसलेल्या परीटाच्या पोराने राहाळातल्या राजाला शेतातून हुसकावून लावले,इवल्याशा सशाने प्रचंड वाघाचा पराभव केला. गावात चर्चेला दुसरा विषय नव्हता. प्रत्येक जण आपले तर्क लढवित होते. त्याला तिडके सावकार म्हणतात,त्याची पोच कमिशनर पर्यंत!उद्याच पोलीस आणवून डेबूला बेड्या पडतील.डेबूंच्या घरचेही सारे धास्तावले होते.एवढ्या मोठ्या नावाजलेल्या सावकाराचा खून  करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन डेबूला नक्की फाशी जरी नाही तरी जन्म ठेप नक्की होणार!अश्यावेळी डेबूजींना मायेच्या उबेची शाब्दीक आधाराची गरज होती,त्यावेळी घरच्यांनी जणूं त्यांना वाळीत टाकले. अबोला धरला.सारा उन्हाळाच!

        धूर्त,चतूर सावकाराने आपली आब राखण्याच्या दृष्टीने गावातील सज्जन सोनाजी राऊत सोबत चार दोन शहाणे माणसें देऊन,डेबूजी घरी नाहीसे पाहून हंबीररावाककडे पाठवले.सोनाजीने सावकाराची स्तुती करत,सावकार किती मोठ्या मनाचा आहे,त्याने मनात आणले असते तर…. पण एवढा त्याचा झालेला अपमान विसरुन १५ एकर जमीन देऊन आतां कांही देणे घेणे नाही अशी पावती द्यायचे ठरवले, ते डेबूजी मुळे नाही तर, इतक्या वर्षाचा तुमचा व्यवहार बघून आणि सखुबाईच्या अंगावरचे फाटके वस्रे पहावल्या न गेल्याने हा उदार निर्णय घेतला.डेबूजी घरी येईस्तोवर कागदपत्रें तयार करुन हंबीरराव मोकळेही झाले.डेबूजी घरी आल्यावर या व्यवहार कळल्यावर चिडून म्हणाले,कां एवढी घाई केली?आणखी थोडी कळ काढली असती तर अवघी जमीन त्याला परत करावीच लागली असती.

          जमीन मिळाल्याने घरची परिस्थिती सुधारली.त्यातच आलोका नावाची कन्या झाली.प्रथेनुसार परीटांमधे मुल जन्मले की,बकरे कापून दारु पिऊन प्रसंग साजरा करायची ही जनरीत मोडू नये असे सर्वांचे मत होते.सखुबाई मात्र तटस्थ होत्या.गावात व आजुबाजुच्या परिसरात डेबूंविषयी आदर वाढला.गावो गावच्या भजनीमंडळींचे आवतन येऊ लागले.घरी मात्र त्यांना विरोधाला तोंड द्यावे लागत होते.सर्वच जुन्या चालीरीती बरोबर असतातच असे नाही हे त्यांनी स्पष्ट सांगीतले.सुधारणा करायची असेल तर स्वतःपासून करायची असते.शेवटी डेबूजीने आपल्या मनाप्रमाणेच केले. बकर्‍याच्या जागी लाडवाचा बेत केलेला बघून सगेसोयरे नाराज झाले.बरीच हुज्जत झाली,पण डेबूजी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.शेवटी संतापून म्हणाले,ज्यांना जेवायचे त्याने जेवावे बाकीच्यांना रामराम!कांही जेवले,कांही न जेवतां उठून चालते झाले.अशा गोंधळात बारसे साजरे झाले.हंबीररावा ना भिती वाटू लागली,याच्या नादाने आपला नातू बळीराम वाया जाईल की काय!घरांतील धूसफूस वाढू लागली.डेबू पहाटे उठून सगळे घर व आजुबाजुचा परिसर झाडून लख्ख करीत.

          वर्‍हाडात चिकणमाती असल्या मुळे पावसाळ्यातील चिखलामुळे बैल गाड्या फसत.बैलांना आर्‍या टोचून टोचून रक्तबंबाळ करीत पलिकडे नेत.फावल्या वेळांत डेबूजींनी रानातून मुरुम आणून त्या वाटेवर टाकावे.कोणी टोकलेच तर म्हणावे,बैलांचे दुःख,कष्ट मला पाहवल्या जात नाही.वास्तविक ही जबाबदारी सर्व गावाची होती.शेकोटी पेटवून चकाट्या पिटीत बसणार्‍या लोकांना गांव,गोठे, कसे स्वच्छ ठेवायचे,मुतार्‍या बांधणे,रस्ते बांधणे इतरही अनेक बाबींकडे त्यांचे लक्ष वेधावे.क्षणाची फुरसत नसायची.

          जवळच असलेल्या ऋणमोचनला  वाटेने भजने म्हणत जावे.पूर्णेत स्नान करुन मुद् गलेश्वराला ओलेत्याने पाणी घालून देवाजवळ थोडावेळ ध्यानस्थ बसावे.परतून कामाला लागावे.रस्त्याने मग विचार करीत,देवाने सुख दुःख का निर्माण केले?हे वृक्ष,वनस्पती,आकाश, मेघ,पर्वत,नद्या सगळे रचण्यामागे देवाचा काय हेतू असेल?कुठे राहून हे सगळे करतो?मूर्ती हे काय त्याचे राहण्याचे ठीकाण आहे?हा सगळा पसारा मोकळा सोडून एकाच मूर्तीत काय म्हणून राहिला खरच बकरे कापून तो संतुष्ट होतो का? नवसाच्या लालूचाने जर तो प्रसन्न होत असेल तर लाचखोरात व याच्यात फरक तो काय?असे अनेक प्रश्नांची गर्दी त्यांच्या मनी दाटत असे.घरच्याची व त्यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली होती.

        दापूर्‍यात एक दौलतगीर नावाचा गोसावी लोकांना गुरुमंत्र देऊन हवं ते गुरु दक्षिणेच्या रुपाने मागत असे.एक दिवस डेबूजी त्याच्याकडे जाऊन मंत्र मागीतला. दौलतगीर म्हणाला,मंत्र देतो,पण कांही नियम पाळावे लागतील.एकदा गुरुमंत्र घेतल्यावर दुसरा गुरु करायचा नाही,या मठाशी एकनिष्ठ राहायचे,आपले सर्व गुरु चरणी अर्पण करायचे,नेहमी गुरुला प्रसन्न ठेवावे.डेबूजींनी सर्व मान्य करुन गुरुमंत्र घेतला.पण त्याच दिवशी त्यांना कळले की,गुरुदक्षिणा म्हणून दारु द्यावी लागते.दुसर्‍याच दिवशी डेबूजींनी मंत्र त्याग केला.परत त्या दिशेने कधी वळले नाही. 

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि. २४-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – ७.

           निसर्गाचे ऋतुचक्र चालूच होते. शेतातील कष्ट सुरुच होते.आलोकाच्या नंतर दोन वर्षाने कलावतीचा जन्म झाला पाठोपाठ दोन वर्षाने मुलगा झाला.हौसेने मुद् गल नांव ठेवले.घरी कधी पाय न ठहरणारे डेबूजी मुलाच्या कोडकौतुकात रमु लागले.पण नियतीच्या मनी वेगळेच होते.छोटेसे निमित्य होऊन मुद् गल देवाघरी गेला.सगेसोयरे म्हणू लागले,पोरा च्या जन्माच्यावेळी देवीला बकरा बळी दिला नाही म्हणून मुल गेले.पुत्र निधनाने ते आधीच दुःखी त्यात या लोकांचे टोचणें समाज इतका अडाणी की,मुदगलच्या मृत्युचे कारण बळीशी जोडले.उदास डेबूजी अधिकाधिक विरक्त होऊ लागले.

‌           १९०५ साल उजाडले.पाऊस पाणी व्यवस्थित झाल्यामुळे सुबत्ता नांदु लागली.पण डेबूजीचे मन प्रपंचातुन उचाट होऊ लागले.कष्ट सुरुच होते.शेतीची त्यांना इतकी माहिती झाली की, भोवतालचे शेतकरी त्यांचा सल्ला घेऊ लागले.मार्गशीर्ष महिना,ज्वारी हुरड्यावर आलेली.डेबूजी पहाटेच शिदोरी बांधून रानांत आले.चहूकडे पिके डोलत होती. पण आज त्यांचेमनी अनामिक हुरहुर लागली.सूर्य माथ्यावर आला.आणि खैरी गावाकडून शेताकडे येत असलेला एक माणूस दिसला.उंच बांधा,गौर वर्ण,अंगात कफणी,माथ्यावर अस्ताव्यस्त जटा, वाढलेली दाढी,मुद्रेवर तेज,दृष्टी अर्धोन्मी लिन,अनवाणी अशा त्या विभूतीला बघून डेबूजींच्या मनांत अननुभूत भावनांचा कल्लोळ उसळला.लगबगीने त्यांच्या जवळ जाऊन साष्टांग नमस्कार घातला व विचारले,आपको क्या चाहिये?क्या दोगे? हमारेपास सबकुछ है।आजपर्यंत कित्येक भेटलेल्या महात्म्यांना कांही ना काही हवे असायचे,हा पहिलाच महात्मा हमारे पास सबकुछ है सांगणारा भेटला. बराच वेळ दोघेही एकमेकांचा ठाव घेत उभे होते.शेवटी महात्मा म्हणाले,चलोगे हमारे साथ?जैसी आपकी आज्ञा! दोघेही पूर्णेच्या काठी नदीत पाय सोडून बसून राहिले.बर्‍याच वेळाने डेबूजींनी भोजना चा आग्रह केल्यावर त्यांचा होकार मिळाला. डेबूजींनी खैरी गावातून भोजन साहित्य आणून रान  

शेण्या गोळा केल्या.जगरे पेटवले.महात्मा ने खाना तयार झाल्यावर, नदी ओलांडून दोघेही दापूर्‍या शिवरातील महादेवापाशी आले.दिवसभर तिथे राहिले.माघ शुध्द दशमी गुरुवारला “रामकृष्णहरि” हा मंत्र देऊन त्यांचा अनुग्रह झाला.या एकाच दिवसात डेबूजींचे संपूर्ण जीवनच बदलून गेले.

        दुसरे दिवशी महात्म्यांच्या आदेशा नुसार दीड दिवसानंतर डेबूजी घरी परतले.घरी नुसतां आकांत झाला होता. दुपारी परतलेल्या डेबूजींच्या मुखावरचे विलक्षण तेज पाहून ते कुठे होते?काय केले विचारण्याचे साहस कुणाला झाले नाही.दुसर्‍या दिवशी कांही कामानिमित्य  डेबूजी दर्यापूरला गेले आणि महात्मा दापूर्‍यात दाखल होऊन गल्लीबोळात देवीदासss देवीदासs म्हणत हाकारुं लागला.डेबूजीचे  त्याने “देवीदास” असे नामकरण केले होते.गावच्या पाटलाच्या कानी गेल्यावर त्याने नोकराकरवी त्या महात्म्यास हाकलून लावले. संध्याकाळी डेबूजी घरी आल्या वर कोणी साधू देविदास म्हणून हाकारत होता हे कळताच ते उपाशी तापाशी वेड्यासारखे गावांत व आजुबाजुच्या खेड्यात शोधले पण कोणीच कांही सांगू शकले नाही.शेवटी निराश होऊन घरी परतले.न खातापिता तसेच बसले असतां रात्री देवळासमोर किर्तन असल्याची दवंडी ऐकली.डेबूजी किर्तनात जाऊन बसले.किर्तनकाराची मधूर वाणी,उत्तम वकृत्वाने अनेक उदाहरणे देऊन नरदेहा ची महती पटवली.डेबूजींच्या नेत्रातून अश्रू गळू लागले.एकएक शब्द त्यांच्या ह्रदयात बाणासारखा घुसत होता. प्रांपचिक बंध गळून पडत होते.शुध्द ज्ञानाचा उदय होत होता.एक युग परिवर्तन झाले होते.किर्तन संपल्यावर ते घरी आले.

          रात्री पत्नी कुंताबाई व मुली झोपल्या होत्या.तीन महिन्याचा गर्भ कुंताबाईच्या उदरी वाढत होता.बराच वेळ विचारमग्न स्थितीत डेबूजी खांबाला टेकून बसले होते.रात्र संपली,पूर्वेस तांबडे फुटु लागले आणि निश्चय पक्का झाला.सगळे गाढ झोपेलेले होते.त्यांनी असलेले अंगावरचे कपडे उतरवून एक जुने फाटके कुडते व जुनेरे धोतर नेसून अंगणांत असलेले एक गाडगे व पलिकडे पडलेली काठी उचलून हाती घेतली व घराबाहेर पडले ते पुन्हा परत न येण्या साठी!एक मुक्तात्मा पिंजरा तोडून मुक्त संचारासाठी निघाला….

           क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – ८.

            परीट म्हणजे मागासलेली जमात.लोकांची कपडे धुवून,भाकरी गोळा करुन जगणारी!त्या जातीत जन्मलेले डेबूजी- हाती गाडगे घेतलेले गाडगेबाबा तपश्चर्येसाठी बाहेर पडले. भजनानिमित्य गावोगावी गेले की,तिथे  होणार्‍या प्रवचनेद्वारा ज्ञानोबाची अमृत वाणी कानी पडे.गीतेच्या १३ व्या अध्यायातील अमानित्व पदावर टीका करतांना ज्ञानोबांनी पाण्याहुन पातळ व्हायला सांगीतले होते.ज्ञातापुरुष आपल्या मोठेपणाचा पत्ता न लागूं देता मुद्दाम पांघरलेले खुळेपण जगीं प्रगट करतो.त्याच्या मनावर मानापमानाचे तडाखे,सुखदुःख,निंदास्तुती,कडक उन्ह, थंडी कोणतेहि कितीही मोठे संकट आले तरी या सर्वांचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही.या सर्व प्रवचनाचा परिणाम गाडगेबाबांच्या मनावर होऊन त्याच मार्गा ने जायचे निश्चित केले.

          त्यांचे शरीर कष्टाला सरावले होते.

कित्येक वर्षापासून पायात पायताणे नव्हतेच.अंथरुण पांघरुणाचाही आनंद होता.अजुन आपण तरुण आहोत,सुख दुःखांचे आघात सहज पचवू शकतो. ज्ञानोबांची वचने प्रत्यक्षात उतरावयाचीय आपले शरीर एक प्रयोगभूमी करायचीय!

          त्यादिवशी आकाशी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून गाडगेबाबांनी तपश्चर्येला प्रारंभ केला.जास्तीत जास्त चालून दापूरे बरेच मागे टाकले.शरीर म्हणजे काय? तर भाड्याने घेतलेले घोडे शरीर किती कष्ट सहन करुं शकते?थंडी, उन,वारा, पाऊस,भय,वेदना,दया,ममता, क्षमा,सहनशक्ती,थकवा हे सारं कशाला हवा?अश्या अनेक प्रकारचे विचार करीत  परमेश्वराचा शोध घ्यायचाय!कुठे असेल तो?देवळात?तीर्थात?क्षेत्रात?कबिराच्या म्हणण्यानुसार

” जत्रिमें फतरा बिठाया।तीरथ बनाया पाणी ।।” हे जर खरे,तर मग लोक कशाला तीर्थी जातात?देवभक्तीचा बडेजाव कशास?इतकी अपार तीर्थे, तपोभूमी,तपश्चर्यास्थाने हे सारे निरर्थक आहेत का?तुकाराम म्हणतात…

” जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुलें।तोचि साधू ओळखावा। देव तेथेंचि जाणावा।। देव तीर्थात नसून दिन दुबळ्यांच्या सेवेत आहे का? त्यांचा एक अश्रू पुसला तर,देवाला एक अभिषेक घडतो का?या सर्वांचा शोध घेतच शरीर झिझवायचेय!भ्रमणासाठी बाहेर पडल्या वर सहाजिकच डोक्यावरील केस दाढी वाढल्या.अंगात एकच फाटके कुडते,ते फाटले की,रस्त्यावरच्या चिंध्या गोळा करुन कोणाकडून सुईदोरा मागावा न मिळाल्यास,बाभळीच्या काट्याची सुई करुन सदर्‍यावर त्या चिंध्या शिवाव्यात. नेसूचे धोतर फाटले,ते पुरेनासे झाल्यावर त्याची लुंगी करुन कमरेभोवती गुंडाळावी एखादी चिंधी सांपडली तर ती मस्तका भोवती लपेटावी.

           गाडगे फुटले तर,कुंभाराच्या दारी उभे राहून गाडगे मागावे,मग त्यासाठी त्याची कामे करावी- लिद फोडून मातीत कालवावी,माती भिजवून तुडवावी,असे भरपूर कष्ट करुन गाडगे घेऊन त्या गावा त न थांबता पुढे चालू लागावे.फारच भूक लागली तर, निंब,चिंचाचा पाला खावा किंवा कुणाच्या शेतातील कणस्यांच्या बदल्यात राबराब राबावे.कुणा विहीरीला शिवले म्हणून यथेच्छ मार खावा.हरी स्मरण करीत मार सोसावा व चालू लागे.

          कधी कापणीला मजुरांसोबत आपणही भिडावे.कापणी करीत असतां सुरेल आवाजांत भजने म्हणावीत….

” विठोबा तुझा मला छंद।कपाळी केशरी गंध।।” लोकं नवल करीत चौकशी केली हे म्हणायचे,मला कुणीच नाही.आकाशा तून पडलो,धरित्रीने झेलले.कधी कधी मात्र एवढ्यावरच संपत नसे.

        एकदा चांदूरच्या सधन पाटलाच्या भल्या मोठ्या वाड्याच्या दारात आपल्या नेहमीच्या वेशात उभे राहून भाकर वाढा म्हणून हाकारल्यावर,बाईने भाकर आणली असता,म्हणाले,सुवास तर पुरण पोळीचा येतो आणि भाकरी आणली. बाई माघारी फिरली आणि आसूड घेऊन क्रोधीत पाटील येऊन म्हणाले,काय पाहीजे?पुरण पोळी!आसुडाचा फटका बाबांच्या पाठीवर काढत पाटील गरजले, काय पाहिजे?पुरणपोळी!परत परत तोच प्रश्न,तसाच आसुडाचा फटका,तेच उत्तर. अगदी थकेस्तोवर पाटील मारत राहिले, पण बाबांचे उत्तर बदलले नाही.चिक्कार गर्दी जमलेली,अगदी चिडून बाहेर असलेला बाभळीचा काटेरी फांदोरा आणून दोन तडाखे बाबांच्या अंगावर ओढले.बाबांच्या शरीरात कित्येक काटे मोडले.मग त्यांना ओढत बाहेर ढकलून दिले.गर्दीतील कुणी हळहळले,तर कुणी माजोरा म्हणून व्यंग कसत होते.बाबा एका पडक्या वाड्याच्या ओसरीवर अंधारात बसून अंगातील काटे काढू लागले.चेहर्‍यावर ना खंत,दुःख, ना पश्चाताप.हरिस्मरण करीत सारे सहन करीत होते.

                   क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

भाग – ९.  

!!!  संत गाडगेबाबा  !!!

                      भाग – ९.

         हरिभजन करीत कण्हत बाबा काटे काढीत असतांना तिथून जाणारा पांडुरंग गुमळे सोनाराने बाबांना ओळखून कां कण्हत आहांत,विचारल्या वर म्हणाले,पुरणपोळ्या खातोय! पुढे बाबा प्रसिध्दीस आल्यावर पांडुरंगाने या गोष्टीची आठवण दिल्यावर हसून म्हणाले असेल…असेल…अशा नाना प्रकारच्या साधना बाबांनी केल्यात.

          कुणाची लाकडे फोडून द्यावी, कुणाच्या शेतात नांगर धरावा,कुणा म्हातारीचे ओझे उचलून द्यावे,कुणा देवळात घाण,कचरा दिसला की,बाबांनी कुणाला खराटा मागावा,न मिळाल्यास रानातून तुराट्या पराट्याचा तयार करुन सारा परिसर स्वच्छ करावा सोबतच आजुबाजुच्या गल्ल्या बोळाही झाडून टाकाव्यात.कुणी भाकर देऊ लागला की, अर्धीच घ्यावी,पुढील दारी जाऊन चटणी किंवा कोरड्यास मागून,एखाद्या दगडावर बसून खावे व जवळच्या गाडग्यात पाणी मागून प्यावे.रानातील एखाद्या झाडा खाली दिवस काढावा.रात्र झाली की, हाती दोन दगड घेऊन त्याच्या तालावर एखाद्या देवळात बसून भजनास सुरुवात करावी.मग कुणी भाविक मंडळी सूर धरीत बांबाच्या मागोमाग म्हणावे.लोकां ना कळून चुकले,हा साधा भीकमाग्या नसून याच्यात काहीतरी विशेष आहे. चौकशीस सुरुवात झाली की,कांहीही न बोलता रानांत निघून जावे.एखाद्या झाडा खाली रात्र काढून लोकं जागे व्हायच्या आंत पुढल्या प्रवासास निघून जावे.

कुठेही गुंतू नये,कुठलाही मोह,पाश,गुंता निर्माण होत आहे हे लक्षात आले की ते स्थळ सोडावे.मनात म्हणावे,आपल्याला घरदार,स्वकर्तुत्वाने मिळवलेली शेती, लौकिक,प्रतिष्ठा,आदरसत्कार सर्व लाभले होते.एका परीटाच्या घरी जन्मले ल्या एका पुरुषाला हवे ते सारे प्राप्त असतांना सर्व त्यागून अंतिम सत्याच्या शोधास्तव,कश्यासाठी जगावे या शोधार्थ आपण घराबाहेर पडलो.आतां कुठेही अडकायचे नाही.ज्ञानेश्वरांनी म्हटल्या प्रमाणे ” व्यापक आणि उदास। जैसे कां आकाश।तैसे ज्याचे मानस।सर्वत्र गा ।।”

असे मुक्त होऊन लोकोपयोगी पडत गंगे च्या पाण्यासारखे भटकायचे!

“गंगा बहती भली।साधू चालता भला ।।”

त्यांची भटकंती सुरु असतांना ज्ञानोबा, तुकोबांविषयी ऐकून एक अनामिक ओढ निर्माण झाल्यामुळे ते पंढरपूरकडे निघाले.देश,विदेश,लोकं त्यांचे आचार विचार,खेडी,शेती,मळे,पिके,नद्या,पर्वत, वने,रानं या सर्वाचं निरिक्षण करत चालत राहावे.त्यांना इश्वरीय सृष्टीचे नवल वाटे. मानव सर्वत्र सारखेच,फक्त स्री पुरुष एवढाच भेद!मग लहान मोठा फरक कां? कुणी निर्माण केल्या?इतक्या नाना प्रकार च्या जाती- ब्राम्हण,मराठा,वाणी,महार, मांग,चांभार ह्या भिंती,तट कुणी उभारले दरिद्र-श्रीमंत भेद कां?गरीब हा गरीबच राहतो,तो कां श्रीमंत होत नाही?बरं श्रीमंत तरी सुखी आहेत कां?खायला भरपूर,इतर सुखेही हात जोडून उभे असं असतांना ते असमाधानी कां?मानसाची तृप्ती कधीच कां होत नाही?अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधत प्रवास चालू असायचा.

          शेवटी पोहचले पंढरीस!पांडुरंगा ला देण्यासाठी जवळ कांहीच नसल्या मुळे बडव्यांचे धक्के खावे लागले.पांडुरंग इथे कशासाठी उभा?संत म्हणतात…

” कटी ठेवोनिया कर।वाट पाहे भक्ताची।” तर मग भक्त त्याला भेटायला आल्यावर बाकीचे कां भेटू देत नाही.हांकून कां लावतात?खरंच तो इथे उभा आहे कां की बडव्यांनी उठवलेली आवई आहे?तो सर्वत्र,सर्वांभूती आहे,देवळात आहे तसा इतरत्रही आहे.असा प्रत्यय बाबांना येऊ लागला.तो सर्वत्र आहे याची खात्री पटली

एकाला सर्व सुविधा उपलब्द,तर दुसरा नाडला पिडला जातो हा दाहक भेद बाबां ना सगळ्या प्रवासात तिव्रतेने जाणवला. देशातील खालच्या थराची त्यांना चांगली माहिती झाली.त्यांच्यातच ते हिंडत, भाकरी मागत,त्यांची दैन्य दुःखे पाहत!

         बाप दारु पिऊन बायकोला झोडपे शिक्षणाचा,संस्काराचा,स्वच्छतेचा,नीति मत्तेचा अभाव!बर्‍यावाईटाची खंत नाही. कसे तरी जगत दिवस कंंठावे अशा दुर्गणी माणसांचा बांबाना संताप येई.पण अनुकंपाही वाटे.कोणत्याही झाडाखाली शेंदूर  मांडलेले धोंडे,बोलले जाणारे नवस त्या नवसापायी बळी देणारे हजारों कोंबडे,बकरे,अंगात आले अहे भासवून घुमणारे भगत,त्यांना नाना व्यसने,८-८ दिवस पाण्याचा स्पर्शही नसतांना त्यांचे अंगी दैवतांचे वारे कसे संचारते?

               क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २५-९-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

भाग – १०.

        समाजातील अशी विषमता बघून, आपण जरी ईश्वरीय सृष्टीतील केवळ एक लहान जीव असलो,सामर्थ्य नसले तरी सर्व बळ पणाला लावून,प्रयत्नाची शिकस्त करुन हे सारे बदलायला हवे. प्रथम प्रतिकार,उपहास,टिंगल टवाळीही करतील,तिकडे दुर्लक्ष करुन झटून कामास लागले की,आपोआप समाज मागे येईल.ठरले!प्रथम आपल्या घरा पासून ऋणमोचनपासून सुरुवात करायचाय!

            पौष महिन्यात दर रविवारी ऋणमोचनला यात्रा भरते.तिथे पूर्णा नदी काठी मुदगलेश्वराचे देऊळ!प्रथा अशी की पूर्णेत स्नान करुन ओलेत्याने त्याच्यावर पाणी वाहावे.पण दोन्ही थड्या चिकण मातीच्या असल्यामुळे व पूर्वी घाट  व पायर्‍या नसल्यामुळे दरड चढतांना म्हातारे,बाया,माणसे घसरुन पडायचे. स्रीयांचे तर फार हाल व्हायचे.लज्जेने त्यांची मने काळोखायची.पौष महीण्या च्या पहिल्या रविवारी बाबा ऋणमोचण ला पोहोचले.

         ते घर सोडून गेल्यापासून घरी नुसता आकांत माजला होता.सर्वीकडे अगदी कसोशीने शोध घेऊनही कुठेच बाबांचा पत्ता लागेना.नदीचे डोह,राने,वने सासरे धनाजी खल्लारकरनीही प्रयत्नां ची शिकस्त केली पण व्यर्थ!सखुबाईच्या तर आसवांना खळ नव्हता,तीच गत कुंताबाईची,शिवाय गर्भारपण!सारेच शोकमग्न!आजा-आजी दोघेही पिकले पानें!झुरुन झुरुन शेवटी आजोबांनी डोळे  मिटले.कांही दिवसांतच आजीही पतीच्या पाठोपाठ गेली.अशा दुःखी कुटुंबाचे सांत्वन तरी कसे करावे?दुःखाने सगळी सुन्न झालेली.

          डेबूजींनी देवदेवतांना बळीला बंदी केली म्हणूनच कुटुंबावर अशी आपत्ती कोसळली.सगेसोयरे देवदेवतांना बळी देऊन देणे फेडण्याचा आग्रह बळीरामास करुं लागले.पण डेबूजींच्या तालमीत तयार झालेल्या बळीरामास पटणे शक्य नव्हते.अशातच एक सुखद घटना घडली.कुंताबाईला चांगला धुष्टपुष्ट बाळसेदार मुलगा झाला.जणूं दुसरा डेबूजीच!नांव गोविंद ठेवले.त्याला बघून सखुबाई त्याच्या बाललिलेत सारे दुःख विसरली.एके दिवशी बळीरामने दादाचा तपास लागल्याची बातमी सांगीतल्यावर क्षणभर कोणाला आकलन झाले नाही. डेबू साधू होऊन तीर्थयात्रा करीत हिंडतो कळल्यावर घरच्यांच्या आशेला पालवी फुटली.मुदगलेश्वरावर मोठी भक्ती!मग ऋणमोचन यात्रेला आल्याशिवाय आल्या शिवाय राहणार नाही.पौष महीना उजाडला.पहिल्या रविवारी पहाटेच घरची सारी मंडळी गाडी जोडून ऋणमोच ला पोहोचले.तिथे डेबूजी आहे कळतांच वणवण यात्रेभर शोधू लागले.सखुबाई मुदलेश्वराला अभिषेक करायचा म्हणून स्नान करण्यास पूर्णेत उतरली तोच डेबूजी दरड खणून पायर्‍या करीत असलेले दिसले.

          सखुबाईने जवळ जाऊन विव्हल स्वरांत हाक मारली.डेबूss अरे ओ डेबूs बाबांचे काम अविरत सुरुच!सखुबाई तिथेच दरडीवर बसून अगदी लहानपणा पासूनच्या आठवणींना उजाळा देऊ लागली.सगळे कुटुंब,नातलग, मित्र,गर्दी जमा झाली.पण कुणाकडेही लक्ष न देतां त्यांचे खणण्याचे काम सुरुच!कुंताबाई लहानगा गोवींद व दोन मुलींना जवळ घेऊन रडत होत्या.सखुबाईने गोविॅदाला त्यांचेसमोर धरुन म्हणाल्या,अरे!तुझ्या या मुलाकडे एकदातरी बघ!एक नाही ना दोन नाही,एवढासा चिमुकला मुलगाही त्यांचे मन विचलित करुं शकले नाही.दृढ अभंग,अचल,खणण्याचे काम सायंकाळ पर्यंत अखंड चालूच राहिले.

         संध्याकाळी यात्रेकरु जेवण करत असतां त्यांचेकडून अर्धी भाकरी मागून नदीतीरी बसून खाऊ लागले.भोवती गर्दी

जमली होती.प्रत्येकाचे त्यांच्याबाबतीत वेगवेगळे तर्क वितर्क सुरु होते.त्यांचे वागणे बघून ही व्यक्ती सामान्य नाही. आदर केला पाहिजे,तेवढ्यात सखुबाई मुलांबाळांसह येऊन गार्‍हाणे मांडले. बाबा मात्र शांतपणे भाकरी खात होते. सखुबाईने किती विनवले पण परीणाम शुन्य!भाकर खाऊन झाल्यावर निघाले तसं सखुबाई तळमळून म्हणाल्या, तूं निघालास?आम्हाला कोण?आतां बाबा बोलले…तुम्हाला देव आहे.कुणाचच कुणावाचून राहत नाही.तुम्ही घरी सुखात रहा.तूं कधी व कुठे भेटशील?महिनाभर मी इथेच आहे.

       पुढच्या रविवारी सर्व तयारीनीशी मोर्चे बांधून सर्वांना बरोबर घेऊन सखु बाई आल्या त्यावेळी बाबा यात्रेचे मैदान स्वच्छ करण्याचे काम सुरु होते सकाळ पासून दुपार टळेपर्यंत.सखुबाई व गोतावळा बांबांच्या मागेमागे हिंडत होते पण बाबांच्या तोंडून चकार शब्द नाही. सर्व झाडून बाबा एका झाडाखाली मागून आणलेली भाकरी खात बसले.नातलगां नी त्यांना घेरले.नाना युक्तीवादाने त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न झाले,पण ते बधले नाही.शेवटी ते म्हणाले….

           क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत गाडगेबाबा संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version