Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

जनक नंदिनी सीता चरित्र भाग ४, (१६ ते २०)

JANAK NANDINI SITA CHARITRA 4 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

JANAK NANDINI SITA CHARITRA 4 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI


            आज *मंदोदरी* मंचकावर पहुडली होती. सकाळपासुनच तीला फार अस्वस्थ वाटत होते. बाहेर वातावरण सुध्दा कुंद होते. सगळीकडे उदासीनता व्यापुन आहे अस तीला वाटत होते. सारखी तगमग होत होती तीच्या जीवाची.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सीता चरित्र !!!

सीता*

*भागः-१६*

सीतेला अशोक वनात येऊन एक मास उलटुन गेला. इतर सेविकांना ती दाद देत नसे, पण त्रीजटा तीला मायेने गोंजारुन तीचे सांत्वन करी, तीला थोडे थोडे जेवायला लावी.

सीतेला अशोक वनात आणल्याच्या दुसर्‍या दिवशी रावण मंदोदरीसह तीला भेटायला आला. सीता संतापाने एवढी बेभान झाली की तीला करुणामय दृष्टीने बघणार्‍या मंदोदरीची दखलही घेतली नाही. तीने रावणावर अफाट तोंडसुख घेतले. त्याला दूषणे देत खल प्रवृत्तीच्या पुरुषाची निर्भत्सना करणारे सारे वाक् प्रचार वापरले. हे ऐकतांना विचलीत झालेल्या मंदोदरीला रावण म्हणाला “मंदोदरी! या आर्य स्रीने पुत्रवत असलेल्या दिराविषयीही संशय घेतला. त्याच्या मनात आपल्या विषयी कामवासना आहे असे गृहित धरुन नाही नाही ते दुषणे दिलीत, तिथे माझ्यासारख्या अपहरण कर्त्याविषयी दुसरा काय विचार करणार ? या आर्य स्रीचे शील फार नाजुक असते. परपुरुषाच्या ओझरत्या स्पर्शाने सुध्दा त्याच्या ठीकर्‍या ठीकर्‍या होतात.

रावणाकडुन लक्ष्मणाशी झालेल्या गैरवर्तणुकीचे वाभाडे रावणाच्या तोंडुन ऐकल्यावर ती शरमेने काळवंडुन गेली. त्यानंतर एक महिना रावण फिरकलाही नाही. पण मंदोदरीची अवस्था मोठी अवघड झाली होती. रावणाविषयीची अनामिक भीतीने तिच्या मनात घर केले होते. पित्याकडुन काही अनर्थ घडु नये. स्वतःच्या कन्येविषयी अनुंकपा व भीती ही वाटणारच ना!

त्यानंतर मात्र दोघेही सीतेला भेटायला गेले नाहीत पण त्रिजटेकडुन मात्र नियमित माहिती घेत होती. काळाच्या कप्यात खौलवर दडलेली एक गुप्त घटनेची साक्षीदार फक्त ती एकटीच होती. गुणम्बिका आणि उर्जयन इहलोक सोडुन गेले होते. विस्मृतित गेलेला भूतकाळ एका कठोर वास्तव्याच्या रुपाने सामोरा आला होता.

एक दिवस सीतेच्या जन्मकथेची रावणाने आठवण काढल्यावर मंदोदरीला म्हणाला ती आपली आश्रीत आहे. तीच्याविषयी कोणतीही हीन भावना माझे मनात नाही. तीच्या नवर्‍याने शूर्पणखेचा पर्यायाने आपल्या सर्वांचा अक्षम्य अपराध केला, त्याची जाणीव करुन देण्यासाठी तीचे अपहरण केले. तीची व्यवस्थीत काळजी घे.

रावणाची थोडी सौम्य मनःस्थीती पाहुन मंदोदरीने मोठी हिम्मत करुन त्याला म्हणाली त्या जनककन्येला आपण अगस्तींच्या आश्रमात पाठवावी. मंदोदरीचे बोलणे ऐकुन रावण कडाडला. प्रथम हिच्या नवर्‍याने इथे येऊन माझ्या बहिणीची क्षमायाचना करुन त्याने आपल्या पत्नीला घेऊन जावे.

इकडे सीतेच्या शोधार्थ गृधांचा जत्था निघाला. परंतु त्यांना मानवी नरभक्षक कबंध आणि अयोमुखीला टाळता येणे शक्य नव्हते. शेवटी याच मार्गाने जाऊन त्या नरभक्षकांचा पुरता बिमोड करायचे हे एकमताने ठरले आणि त्याप्रमाणे मार्गक्रमणा सुरु झाली.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता*

*भागः-१७*

मार्गक्रमण करीत करीत सर्वजण अयोमुखीच्या परिसराजवळ आलेत. तिथे बलीप्रदान विधि सुरु होती. रामाच्या सुचनेनुसार लक्ष्मण बलीस्थानाकडे निघाला. सर्वप्रथम तो अयोमुखीच्या दृष्टीस पडला. त्याच्या पासुन कन्यारत्न प्राप्त व्हावा या दृष्टीने अयोमुखी लक्ष्मणाचा अनुनय करु लागली. संतापाने लक्ष्मणाने तीच्यावर वार केला, त्याच्या मागे असलेल्या सेनेने बाणवर्षाव करुन अयोमुखीचा पराभव केला. प्रसंग पडल्यास स्रीवरही शस्र उगारण्यास मागेपुढे न पाहणारा, जेव्हा सीतेने त्याचेवर हीन आरोप केले, तेव्हा तिच्यावर सुध्दा शस्र उगारण्यास हात शिवशिवत होते.

अशा या लक्ष्मणाच्या मनांत विचार आला की, शूर्पणखा, अयोमुखी या निलाजर्‍या स्रिया कुठे ? आणि आपल्याकडील शालीन मर्यादशील स्री कुठे ?

लक्ष्मण रामाला विचारतो आपल्याकडील स्रियांवर इतकी बंधने का लादली गेली. दुर्बल, असहाय्य अबला म्हणुनच आपण स्रीचा कां विचार करतो ? राम उत्तरले, वास्तविक निसर्गाने नेतृत्वाची जबाबदारी स्रीलाच दिली होती आणि तीनेही ती समर्थपणे पेलली होती. पण अतिप्रबल झालेला कोणताही वर्ग समाजाला तापदायक होतो. प्रचंड आत्मबल असलेल्या स्रीला तिच्या बलस्थानाचा विसर पडला आणि तीने निर्धन भौतिकता धारण केली व पुरुषी अहंकार नेस्तबुस्त करावासा वाटला. त्यामुळे पुरुषाने गरजप्रमाणे आवश्यक साधन सामुग्री कक्षेत घेऊन हळुहळु सत्तेची मुलभूत सुत्रे हस्तगत केली. अशा रितीने पुरुष प्रधान संस्कृती रुजु झाली.

अयोमुखीचा अडसर दुर झाला पण कबंध? त्याचा माग घेत कबंधच्या परिसराजवळ पोहचले. तिथे घणघोर युध्द झाले, पुर्ण वस्तीला पेटवण्यात आले आणि त्याच आगीत जखमी कबंधला फेकण्यात आले.

उत्तरेकडुन आलेले आर्य पुरुष नरभक्षकांच्या व राक्षसांच्या टोळ्यांचा विध्वंश करीत असल्याच्या वार्ता ऐकुन दक्षिण खोर्‍यात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले. त्यांना निर्भय वाटु लागले.

जवळच गणनायिका शबरीची वस्ती होती. ती राम लक्ष्मणाच्या स्वागतासाठी सज्ज झाली. वनातुन तोडुन आणलेली बोरे दाताने कुरतडुन गोड बोरे एकीकडे जमा करुं लागली. एवढ्यात राम लक्ष्मण तीच्या कुटीत येऊन दाखल झालेत. त्यांनी तीचे खाली वाकुन पदवंदन केले. शबरीने ऊष्टावलेली गोडबोरे त्यांच्या पुढ्यात ठेवलीत. रामाने आनंदाने आस्वाद घेतला.

इकडे रामाचा भक्त दूत म्हणुन वनराज हनुमानाने लंकेत उड्डान केले आणि सीतेचा शोध घेतला. ज्या झाडाखाली सीता बसली होती त्या झाडावर हनुमान बसले. त्यांनी रामाची खुणेची अंगठी तीच्या पुढ्यात टाकली. अंगठी पाहुन तीला आश्चर्य वाटले. वर बघीतले तर वानर! पण त्याने मनुष्य वाणीत बोलुन स्वतःची रामाची संपुर्ण हकीकत तीला कथन केली. कसा नरभक्षकांचा, राक्षसांचा नायनाट करुन कसं सैन्याची जमवा जमवी करीत आहेत! कसे तीच्या सुटकेसाठी प्रयत्नशील आहे हा सर्व साग्रसंगीत वृतांत कथन केला.

जेव्हा शबरीच्या उष्ट्या बोरांबाबत हनुमानाने सीतेला सांगीतले तेव्हा ती म्हणाली मीही शबरीच्या बोरासारखीच आहे. मी रामाची आहे पण रावणाने अपहरण केल्यामुळे राम माझा स्विकार करेल का? तीचे मन अनेक शंका कुशंकांनी भरुन निघाले, कारण रामाला जरी विश्वास असला तरी तो एक राजा आहे, ऋषि नाही. त्याच्या संस्कृतीत अपवित्रांना बाहेर टाकतात.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-१८*

हनूमानाने सीतेला सांगीतले की, मी साधुच्या रुपात श्रीरामाला भेटलो. त्यांना माझी ओळख दिली, आणि तुला सुद्धा सांगतो की मी अहिल्येची मुलगी *अंजना* व *वायुदेव केसरी* या दोघांचा मुलगा आणि रिक्षपुत्र *सुग्रीव* याचा सेवक आहे.

राम लक्ष्मणाला खांद्यावर बसवुन ऋष्यमुख पर्वतावर रिक्षपुत्र सुग्रीवाकडे घेऊन गेलो.

तिथे त्यांची भेट झाल्यावर सुग्रीवाने एक गाठोडे रामासमोर उघडले. सुग्रीवाने सांगीतले की, ज्यावेळी रावण आकाशयानातुन एका स्रीला नेत होता तेव्हा ती स्री रामाच्या नावाने आक्रोश करीत होती आणि एक एक दागीना खाली टाकत होती. *रामाने सर्व दागीने सीतेचे* म्हणुन ओळखले आणि *पैंजण फक्त लक्ष्मणाने ओळखले.*

रामाने सुग्रीवाला स्वतःचे राज्य असतांना निर्वासीत का झालात म्हणुन विचारले असता सुग्रीवाने रामाला सांगितले की, त्याचा भाऊ *वाली* याच्यासोबत गैरसमजाने निर्माण झालेला दुःखद प्रसंग विशद केला.

वालीचा जन्म अरुणि आणि इंद्रापासुन व सुग्रीवाचा जन्म आरुणि व सुर्यापासुन झाला. या दोघांनाही गौतम आणि अहिल्याकडे ठेवले. त्याना आधीच अंजना नावाची मुलगी होती. इंद्र आल्याचे अंजनाने वडील गौतमाला सांगीतले म्हणुन अहिल्येने अंजनाला वानरी, आणि मुलांनी हे सांगीतले नाही म्हणुन गौतमाने मुलांना वानर व अहिल्येला शीळेसमान होण्याचा शाप दिला. आईविना पोरक्या झालेल्या तीन वानरांबद्दल गौतमांना वाईट वाटले. शाप मागेही घेता येत नव्हता. म्हणुन त्यांनी त्या तिघांनाही किष्मिंधेचा निपुत्रिक वानर राजा रिक्ष यांचेकडे सोपवले. मुलं मोठी झाल्यावर अंजनाचा विवाह केशरीशी, वालीचा ताराशी, आणि सुग्रीवाचा रुमाशी करुन देऊन वाली आणि सुग्रीवाला अर्धे अर्धे राज्य वाटुन दिले.

किष्किंधेत सर्व कुशल होते, पण वालीने दुंदुभि राक्षसाचा वध केला. दुंदुभिंचा मुलगा मायावी वडिलांचा सुड घेण्यासाठी वालीला द्वंदाचे आव्हान केले. भयंकर युध्द झाले. शेवटी मायावी एका गुहेत पळुन गेला. त्याला मारुन टाकण्याच्या निश्चयाने वाली सुध्दा गुहेत शिरला आणि वालीने त्याचा वध केला. वाली खुप थकल्यामुळे तीथेच झोपुन गेला. त्या गुहेच्या तोंडाशी उभ्या असलेल्या सुग्रीवाला वाली मेला असे वाटुन गुहेचे तोंड बंद केले. बराच प्रयत्न करुन वाली बाहेर आल्यावर वालीने सुग्रीवाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग केला. शेवटी सुग्रीवाने ऋष्यमुख पर्वतावर मातंग ऋषिंच्या आश्रयाला गेला. दुदुंभी राक्षसाला मारल्यावर वालीने त्याच्या प्रेताला लाथेने उडविले, ते प्रेत मातंग ऋषिच्या आश्रमात जाऊन पडले. संतप्त ऋषिनी शाप दिला की, ज्याच्यामुळे प्रेत आश्रमात टाकले गेले त्याने जर या आश्रमात पाऊल टाकले तर त्याचा मृत्यु होईल. म्हणुन वाली तीथे जाऊ शकत नव्हता.

वालीने परत येऊन राज्याचा ताबा घेतला. ही सर्व हकीकत सुग्रीवाने रामाला सांगीतल्यावर तो रामाला म्हणाला, तुझी बायको रावणाने पळविली व माझी वालीने. त्यामुळे आपण दोघेही एकमेकांना मदत करुन समस्या सोडवु. रामाने त्याला आश्वस्त केले.

हे सर्व ऐकुन सीतेच्या मनात आल, सुग्रीवाला अधिक दुःख कशाच झालं? राज्य गमावल्याचं की पत्नी गमावल्याचं? पण रामाच्या बाबतीत तसं नव्हत. शेवटी दुर्दैव भोगणे हे स्रीलाच!

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

*सीता*

*भागः-१९*

रामाने सुग्रीवाची कथा आणि सुग्रीवाने रामाची व्यथा एकमेकांना ऐकवल्यावर राम सुग्रीवाला म्हणाले की, “तुमच्या दोघा भावात समेट घडवुन आणू.”

त्यावर सुग्रीव म्हणाला की, “वाली खुपच कोपीष्ट आहे त्याचा उच्छेद झाल्याशिवाय माझा मार्ग निष्कलंक होऊ शकत नाही.”

विचारांती रामाने वालीला द्वंदयुध्दाचे आव्हान द्यायला सांगीतले. दोघा भावांमधे घनघोर युध्द झाले. सुग्रीव असहाय्य अवस्थेत खाली कोसळला, वाली आता त्याच्यावर वार करणार एवढ्यात साल वृक्षाच्या बुंध्याआड लपलेल्या रामाने वालीवर बाण सोडला. काय घडले हे कळायच्या आत वालीचा प्रचंड देह धरणीवर कोसळला. सुग्रीव पाणावल्या डोळ्याने ते दृष्य पाहत होता.

दशरथ पुत्र राम लक्ष्मणाच्या शौर्याच्या कथा चोहोबाजुने पसरल्या होत्या. ज्या तर्‍हेने शूर्पणखाची विटंबना करुन जनस्थानाची वासलात लावली. ताटीका वध, कबंध, अयोमुखीचा शेवट अशा अनेक प्रकारच्या वार्ता ऐकुन शांत, संयमी आणि मुग्धमधूर व्यक्तीमत्व असलेला राम एवढा क्रुर आणि आक्रमक बनु शकतो याची रावणाने कल्पनाही केली नव्हती.

वाली वधाने कुंभकर्ण व इंद्रजीत सावध झाले. त्यांनी रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला पण हट्टी व दुराग्रही रावणाला त्यांचे विचार पटले नाही. तरी पण तयारीच्या दृष्टीने आपल्या सैनिकांचे युध्दप्रशिक्षण सुरु केले.

इकडे वालीच्याच तोडीचे *नल आणि नील* यांचेवर युध्दविद्येच्या सरावाची, शिस्तबध्द सुसज्ज सैन्य तयार करण्याची जबाबदारी सोपवली. अशाच एका संध्याकाळी रावणाचा भाऊ *बिभिषण* अचानक त्यांचेसमोर आला. त्याने स्पष्ट केले की, “लंकेचा दूत म्हणुन आलेला नसुन *मित्र* म्हणुन मदत करण्याच्या उद्देशाने आलो आहो. त्यामुळे कदाचचित *घरभेदी व राजद्रोहाचा* शिक्का माझेवर नेहमीसाठी लागेल, पण *रावणाचे निष्क्रिय वागणे, सीतेला पळवुन आणणे* त्यामुळे रावणाचे उच्चाटन व्हावे आणि दण्डकारण्यासारखी भूमी रावणाच्या जोखडातुन मुक्त व्हावी हा माझा उद्देश आहे.

नंतर लंका स्वारीसंबंधी बोलणी विचार विनिमय, आराखडा तयार करुन युध्दाला सिध्द झाले आणि थोड्याच दिवसानी पंपा सरोवरापासुन लंका मोहिमेवर बिभिषण, सुग्रीव, हनुमान यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्य निघाले. सैन्याचे वेगवेगळ्या नेतृत्वाखाली गट पाडुन दक्षिणेकडे असलेल्या लंकेकडे निघाले.

दक्षिणेकडे निघालेल्या अंगदच्या गटाला वारुळात एका द्रोणात घट्ट बसलेले शिवलिंग दिसले. हे शिवलिंग शिवाने रावणाला लंकेत प्रतिष्ठापना करण्यासाठी एका अटीवर दिले होते की, कोणत्याही परिस्थितीत जमीनीवर ठेवायचे नाही, जर ठेवले गेले तर तिथेच जमीनीत घट्ट रुतुन बसेल.

इकडे इंद्र अस्वस्थ झाला. कारण रावण जर लिंग नेण्यात यशस्वी झाला तर रावणाची लंका अजिंक्य झाली असती आणि सार्‍या जगाला धोकादायक ठरले असते म्हणुन गणेशाला विनंती केली. त्याच्या मार्गात गुराख्याचा वेश घेऊन गणेशाने शक्ती वापरुन रावणाला लघुशंकेची घाई होईल अशी योजना केली. त्याप्रमाणे रावणाला इतकी असह्य झाली की, गुराख्याच्या रुपात असलेल्या गणेशाजवळ ते लिंग दिले.

रावणाला इतकी लघुशंका झाली की, बराच वेळ उलटल्यावर न संपल्यामुळे ते शिवलिंग गणेशाने जमीनीवर ठेवल्याबरोबर रावणाची लघुशंका आटोपले. पोट रिकाम झालेल्या रावणाने संतापाने सर्वशक्तीसह ते शिवलिंग उचकटण्याचा प्रयत्न केला पण गाईच्या कानासारखी द्रोणाची दोन टोके त्याच्या हाती आली. जे सध्या *कर्नाटक मधे गोकर्ण क्षेत्र* म्हणुन प्रसिध्द आहे. शेवटी शिवलिंग कैलासावरुन लंकेत पोहोचलेच नाही.

क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता*

*भागः-२०*

सर्वांनी शिवलिंगाचे पुजन केले आणि मार्गक्रमणा सुरु केली. पुढे *स्वयंप्रभा* नावाची तपस्वी साधक भेटली. तीने सिध्दिच्या शक्तिने सर्वांना दक्षिण तटावर समुद्राजवळ आणून सोडले. त्या समुद्रातच कुठे तरी लंका बेट होते. काही अंतरावर *जटायूचा* मोठा भाऊ *संपाती* भेटला. त्याला क्षितिज्याच्या आणि समुद्राच्या क्षितिजा पार बघण्याची शक्ती असते. त्यानुसार एका बेटावर सुवर्णमय नगरी दिसत असल्याचे त्याने सांगीतले. तिथे *दुःखी अवस्थेत एक स्रीही* बसली असल्याचे सांगीतले.

दिशाज्ञान झालेवर हनुमानाने समुद्रोलंघनाला सुरुवात केली. कांही तासाच्या प्रवासानंतर पर्वतराज हिमवनाचा पुत्र *मैनाक* नावाच्या पर्वताची भेट झाली. थोड्या अंतरावर सुसरेच्या जबड्यातुन मधमाशीचे रुप घेऊन हनुमान बाहेर पडला. मग *सिंहिका* राक्षसीनीने त्याला गिळले, तेव्हा मोठा आकार होऊन तिचे पोट फाडुन तो एकदाचा लंकेच्या किनार्‍यावर उतरला. तिथे त्याचा सामना लंकेचा रक्षक *लंकिनी* सोबत झाला. तीला पराभूत करुन लंकेत सीतेचा शोध घेतला.

सीता सापडल्याचा पुरावा म्हणुन तीने हनुमानाला *केसांचा चाप* दिला पण येवढा पुरावा पुरेसा नाही. म्हणुन दुसरा पुरावा मागीतल्यावर तीने एक गुपीत त्याला सांगीतले. इंद्राचा मुलगा *जयंत* याने कावळ्याचे रुप घेऊन ती झोपली असतांना तिच्या कानाला चावला. तीच्या वेदनांनी रामाला जाग आल्यावर रागाने त्याचा एक डोळा फोडला. हे फक्त *राम आणि सीतेलाच माहित होते.*

परत निघतांना हनुमानाने *सुंदरराज* उद्यानाची नासधुस करीत पोटभर फळं खात असतांनाच रावणाचा मुलगा *अक्षय* याने फेकलेला बाण उलट त्याचेवरच फेकल्यामुळे तो तात्काळ गतप्राण झाला. रावणाने इंद्रजीतला पकडण्याची आज्ञा केली. आणि जाणुनबुजुन हनुमान बंदिस्त झाला. त्याला रावणासमोर उभे केले. हनुमानाने मागीतल्यावरही आसन न दिल्यामुळे त्याने आपल्या शेपटीचा उंच मनोरा तयार करुन त्यावर बसला. दूत म्हणुन त्याने राम सीतेची शिष्टाई केली पण रावणाला पटले नाही. बिभिषनाने सुध्दा रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला पण रावणाने त्याची सुध्दा निर्भत्सना केली.

ज्या शेपटीचा हनुमानाला अभिमान आहे तीलाच जाळण्याची रावणांने आज्ञा केली. पण ती शेपटी लांबतच राहिली. त्रस्त झालेल्या राक्षसांना रावण म्हणाला अशोकवनातल्या सीतेकडुन तीछे अंगवस्र आणुन त्या चिंध्यामधे याची शेपटी गुंडाळुन पेटवुन द्या. सीता संकटात पडते आहे असे पाहुन हनुमंताने शेपटीची लांबी कमी केली आणि राक्षसांना पकडु दिली. तेलात बुडवलेल्या चिंध्या गुंडाळुन शेपटी पेटवुन दिली. परंतु हनुमंताला धग जाणवली नाही. त्याला माहीत होते की, पतिव्रता स्रियांमधे सिध्द तपस्यांसारखी शक्ती असते. तीला पंचमहाभूते काबुत ठेवता येतात.

सीतेचे पवित्र आणि पातिव्रत्यामुळे तो आगीच्या धगीपासुन वाचवत होते. जीला मदतीची गरज होती तीच त्याला वाचवत होती. त्याच्या शेपटीने चांगलाच पेट घेतला. त्याने वाटेत आलेली प्रत्येक गोष्ट भस्मसात करत सर्वीकडे आग पसरवत होता. सर्वीकडे आगीने नुसता धुमाकुळ घातला फक्त सीता जीथे होती ती जागा सोडुन.

क्रमशः संकलन-मिनाक्षी देशमुख

सीता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version