Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

पेशवा बाजीरावची दुर्भागी ” मस्तानी ” भाग ८, (२९ ते ३३)

BAJIRAO CHI MASTANI 8 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

BAJIRAO CHI MASTANI 8 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI


       पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !! बाजीराव मस्तानी !!!

!!!  मस्तानी  !!!

                      भाग – २९.

            एवढा वयोवृध्द वडिलधारा माणूस पायावर डोके आपटत असलेले पाहून बाजीराव म्हणाले, काका हे काय करताहात? त्यांना उठवत मिठी मारुन भिजल्या स्वरात म्हणाले, होऊ द्या तुमच्या मनाप्रमाणे. माझा काळजाचा तुकडा  तुम्हा सर्वाच्या भरोश्यावर सोपवतो.नशीबात असेल तसे घडेल.

दुसर्‍या दिवशी एकटेच पाटसच्या दिशेने निघाले. आणि मस्तानी पहाटे गोड स्वप्न पाहत राऊंना म्हणत होती ही मस्तानी तुम्हाला क्षणभरही दूर जाऊं देणार नाही.

             बाजीराव पाटसला निघून गेल्याबरोबर नानासाहेबांनी मस्तानीच्या महालाभोवती चौकी बसवली. ती राऊंच्या मागे जाणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला. महालाच्या आंतल्या पहार्‍यावर सुब्बाराव जेठी भीक राऊतचे मोजके मांग स्वार होते. अतल्या चौकातही नानांचे स्वार पहार्‍यावर होते. मस्तानी अडकुन पडली. मस्तानीने सुब्बारावाकरवी निरोप पाठवून नानांना बोलावणे पाठवले. तिसर्‍या दिवशी नाना आले.दिवाळी ची सजावट महालात तशीच होती.

            नाना, राऊ आमच्यावर रुसुन गेले,पण तुम्ही या आठ दिवसात आमची साधी चौकशीही केली नाही.तिचे अनुपम सौंदर्य न्याहाळत होते. त्यांमा वाटले आतां ही आपल्या कब्ज्यात आहे, ती आपल्या प्रत्येक म्हणण्यास कबूल होईल. त्या अनुरोधाने , अलंकार विरहित, साध्या पांढर्‍या पातळात बघून नाना म्हणाले, तुम्ही या साध्या वेशातही सुंदर दिसताहात. उगीच नाही राऊ तुमच्यावर भाळले… मस्तानी चमकली. आश्चर्याने नानाकडे बघीतल्यावर नको ती जाणीव झाली व अंतर्बाह्य थरारली. नाना म्हणाले, आमची याद कश्यासाठी केली?

           आजपर्यंत प्रेमाने वागणार्‍या नानांनी आमच्या महाला भोवती चौकी पहारे बसवण्या इतका आमच्याकडून असा कोणता अपराध घडला? तो घडू नये म्हणून. काय? नानांचा आमच्यावर एवढाही विश्वास नाही? तीच्या डोळ्यातील आर्त भावांचा नानांनी वेगळाच अर्थ लावला. म्हणाले, यापुर्वी अशी निवांत गाठ पडतच नव्हती. कधी मोहिम त कधी राऊ असायचे.आतां मिळेल थोडा निवांतपणा. व्याकुळतेने म्हणाली नाना आम्ही वचन देतो, तुमच्या परवानगीशिवाय महालाबाहेर पाऊल टाकणार नाही.

          नाना चटकण उठून तीच्या समोर येऊन उभे राहिले. डोळ्यात वेगळेच भाव होते. द्या वचन म्हणत तिच्या नजरेला नजर भिडवत आपला हात तिच्या हातावर ठेवला. तिचा कोमल हात दाबत म्हणाले, वचन पाळा म्हणजे झालं. आतल्या चौक्या उठवु  पण बाहेरच्या मात्र तशाच राहतील. थोडे घुटमळून नाना निघून गेले.

‌           पाटसला पेशव्याचा मोठा चौसपी वाड्यात त्यांनी

 मुक्काम केला. पाटसला बाजीराव आले खरे पण ते फार बेचैन झाले. फडाचे जुजबी कामे पाहत होते. दिवस कसातरी जात होता पण रात्र खायला उठत होती. ते पाटसकडे मस्तानीचा निरोप न घेताच आले होते. हवेलीत सारे तिचा किती राग, दुस्साह करतात याची पूर्ण जाणीव त्यांना होती.तिचे काय होईल या काळजीने त्यांचा जीव व्याकुळला होता.सरदारांना वचन दिल्यामुळे तिला जेवढ विसरण्याचा प्रयत्न करीत तेवढ्याच ताकदीने आठणी येत होत्या. अखेर त्यांनी कुंवरला आवाज देऊन पागेतून घोडा काढायला सांगीतला. त्यांची ती अस्वस्थ भयंकर मुद्रा पाहून त्यांना सांगण्याचा धीर होत नव्हता पण पेशव्यांना माहित नसलेल्या बर्‍याच गोष्टी त्याला माहित असल्यामुळे धीर एकवटून म्हणाला, सरकार, पुण्याकडची वाट बंद झाली आहे. कोणी बंद केली? आपण पुण्याकडे परतू नये म्हणून कडक बंदोबस्तात पुण्याच्या रस्त्यावर चौकी पहारे बसले आहेत.

ही हिंमत? कुणाचे दिवस भरलेत? आमचा घोडा तयार ठेव सोबत दोन मशालजी घे.आम्ही पुण्यास परतत असल्याची वर्दी पुढे पाठव. थोड्याच वेळात पेशवेंनी पाटसची शिव ओलांडली तोच मशालधारी पहारेकरी पेशव्यांची वाट अडवून उभे होते.. त्यांना बाजूला व्हायला सांगीले तरी ते तसूभरही हलले नाही. पहारेकर्‍यांनी तलवारीला स्पर्शही केला नाही. तेवढ्यात पेशव्यांचेः सारे साथीदार,सरदार  पेशव्यांची वाट अडवून उभे राहिले.आमची वाट सोडा कडाडले पेशवे. नाही श्रीमंत, ते शक्य नाही. मग परिणामाला तयार व्हा. पोतणीस म्हणाले, धनी, आतापर्यत गनिमांच्या तलवारीचे घाव तुमच्याबरोबर झेललेत.आता धन्याची तलवार चालली तरी आम्ही हटणार नाही.या सर्वांबरोबर रणांगणात रक्ता ताचे सडे शिंपले होते.ते हे बालपणीचे खेळण्यातले सवंगडी, तारुण्यात रणांगणात बरोबरीने झुंजलेले सवंगडी हात बांधून त्यांच्यासमोर उभे होते.

              क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
               दि. २४-५-२०२२

!!!  मस्तानी  !!!

                        भाग – ३०.

              आपल्या जिवाभावाचे सवंगडी चेहर्‍यावर दुःखाच्या यातना घेऊन हात बांधून उभे होते.आजपर्यंत अनेक विकट संकटांना तोंड देणारे पेशवे आपल्या या वीरांपुढे हतप्रभ झाले. तलवार म्यान करुन पाटसच्या दिशेने निघून गेले.

          मुक्कामावर येताच मद्यात स्वतःला झोकून दिले.

            रात्री निरवता झाल्यावर नाना मस्तानीच्या दालनी आले.आतल्या दालनात मस्तानी कृष्णमूर्तीसमोर पुजा करत असलेली बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.दालनात दोघांशिवाय कुणीच नव्हते.ज्या विचाराने नाना इतके दिवस आडवळनाने प्रयत्न करीत होते, तो क्षण जवळ आला असे वाटल्याने त्यांनी पुढे येऊन मस्तानीचा हात हातात घेतला. म्हणाले, हाच हात हातात घेऊन तुम्ही आम्हाला वचन दिले की, राऊंची भेट घेणार नाही.

आपल्या काळ्याभोर डोळ्यांची विभ्रम हालचाल करीत, नानांच्या हातावरुन आपला मऊ हात फिरवत म्हणाली,आताच  तुम्हाला आठवण कशी झाली? नाना अधिकच जवळ येत घोगर्‍या कंपीत आवाजात शब्द निघाले… मस्तानीऽऽ… काय नाना? मस्तानी तुझा हात किती मऊ व सुंदर आहे? क्षणभर मस्तानीला ब्रम्हांड आठवले. तिच्यातील सावध,चतूर स्रीला नाना कोणता उद्देश धरुन खेळ खेळत आहे याची जाणीव तिला क्षणार्धात झाली. लगेच आवाजात मार्दव आणत म्हणाली, आमचा हात तुम्हाला आवडला पण तुमचाही हात कांही कमी सुंदर आहे थेट आमच्या समशेरसारखा. पुत्राच्या हाताच्या स्पर्शाचं सुख कांही अवर्णियच असते नाही का?

         अंगावर वीज पडावी तसा नानांनी आपला हात चटकण मागे घेतला.एक पाऊल मागे होऊन मस्तानीकडे रोखून पाहत म्हणाले, याचा अर्थ काय?

           पुत्राला याचा अर्थ कां सांगायचा असतो? नाना तुमच्या दर्शनाने आमच्यातील मातृत्वाचं वात्सल्य एकदम उफाळून येते बघा. नाना बसा ना. ब्राम्हणाने केलेली मिठाई खा. पुजेतील फुलं देते, ती आमच्या मातृप्रेमाची आठवण म्हणून जवळ बाळगा.बसा तिथे. मस्तानीचे शब्द ऐकुन नानांच्या पायाखाल ची जमीनच सरकली. कपाळावर धर्मबिंदु जमा झाले. हातापायास कंप सुटला. तिने दोनतीनदा आग्रह केल्यावर श्रीकृष्ण मूर्तीसमोरच्या पाटावर मस्तानीची नजर टाळत बसले. मस्तानी दूरुन त्यांची भांबावलेली स्थिती न्याहळत होती. गालावर तेच हसू, नजरेत तेच भाव होते. मग हलकेच म्हणाली नाना, तुमचे मन, विचार न समजण्याइतकी ही मस्तानी अजाण खुळी वाटली की काय? स्रीला पुरुषाची नजर ओळखण्याची शक्ती उपजतच असते नाना.

           मान वर न करताच नाना म्हणाले, आम्ही चुकलो माफ करा.नाना आगीत पाऊल टाकण्याआधी दहादा विचार करायला हवा होता. तुम्ही आमचे पुत्र आहात म्हणून मातेच्या नात्याने उपदेश करणे आमचं कर्तव्य समजतो. नाना, राऊ बिघडवल्याचा, नको ते छंद लावल्याचा दोष तुम्ही सर्वानी लावून त्यांचे जीणे नकोशे केले. आणि नाना, आतां चुकुन हो चुकुनच म्हणते, तुमच्याकडून कोणता दोष घडणार होता याची जाणीव आहे तुम्हाला? नाना, मी तुमच्या धर्मशास्राचा थोडा फार अभ्यास केला आहे. नाना, मात्रागमनाच्या पातक्याला रौरवचा नर्कसुध्दा अपूरा आहे अस वाचण्यात आलं आहे. नानांनी खाली घातलेली मान वर करण्याचा धीर झाला नाही. मातोश्री, चुक झाली, पदरात घ्यावे. नाना, तुमची ही एकच चुक तुम्हाला आयुष्यातून उठवले असते. तुमचं हे कृत्य आम्ही राऊंना कळवलं किंवा आम्ही न कळवतांही त्यांच्या कानावर गेलं तर नाना, पित्याने आपल्या सुनेचं कुंकु पुसलं असा डंका जगभर होईल याची कल्पना आहे?

              मेल्याहून मेल्यासारखं झालं नानांना. भावनावेगाने त्यांच्या नाकपुड्या थरथरत होत्या. पाटावरुन उठून मस्तानीचे पाय धरुन म्हणाले, माते, क्षमा करेपर्यंत हे पाय सोडणार नाही. डवडबलेल्या डोळ्यांनी नानांना उठवत म्हणाली, नाना, अरेऽ मातेच्या ह्रदयात क्षमेशिवाय पुत्रासाठी दुसरं काय असतं? तिच्या शरीरातला कण न् कण  पुत्र कल्याणासाठी टाहो फोडत असतो. पुत्राचे अपराध पोटात घालण्यासाठीच तर ती नऊ महीने उदरात वागवत असते. जसा समशेर आमचा पुत्र तसेच तुम्हाला समजून मोकळेपणे तुमच्याशी  बोलत होतो, याचा अर्थ तुम्ही विपरित घेतला.आत्मग्लानीने नाना म्हणाले,

 पुत्रधर्म आम्ही विसरलो पण मातृधर्म तुम्ही विसरला नाही.क्षणिक  मोहाला आम्ही बळी पडलो. पुन्हा अशी चूक होणार नाही. मस्तानींच्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेल्या नानांच्या डोळ्यातील धूंदी उतरली.त्यांच्या पाठीवर ममतेने,आईच्या मायेने हात फिरवत मस्तानी म्हणाली,  तुम्हाला आम्ही जास्त दोषी मानत नाही.तुम्ही तुमच्या पोरबुध्दीने या कारस्थानात सामील झालात. नानांनी चमकुन तिच्याकडे बघितले.

                      क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                दि. २५-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                        भाग – ३१.

            मस्तानी पुढे म्हणाली, तुम्हा लोकांना वाटले, मस्तानीला नानांच्या मिठीत होती हे समजल्यावर राऊ आमचा त्याग करतील, नाना, किती हा कोता विचार? मस्तानी आणि राऊ दोन नाहीच. चौकी पहार्‍यांच्या अडथळ्याने आम्ही शरीराने जरी दूर असलो तरी मनाने दूर करणे परमेश्वरालाही शक्य नाही.नाना, प्रत्यक्ष राऊंनी जरी मस्तानीला तुमच्या मिठीत बघीतले असते तरी त्यांचा विश्वास बसला नसता. त्यांच्या मस्तानीला ते चांगले अंतर्बाह्य ओळखतात.

          देवदर्शन आटोपून आलेल्या आप्पांना घाईघाईने येत महोदबा पुरंदरे म्हणाले, श्रीमंत घात झाला. आमच्या तोंडाला काळोखी फासल्या गेली. अरे पण झाले काय? श्रीमंत, मस्तानी पळाली. पळाली? मस्तानी पळाली? केव्हा? रात्रीच! त्रिपुरा पोर्णिमेच्पा एवढ्या चांदण्याच्या उजेडात? आमच्या चौक्या काय करीत होत्या? आप्पांचा विश्वासच बसत नव्हता. एका नाजुक कलावंतीणीने पेशव्यांच्या एवढ्या कडेकोट बंदोबस्ताला सुरुंग लावला होता.चुटकीसरशी नामोहरम केले होते. डोळ्यांत धूळ झोकून जणूं आसमानातल्या बिजलीगत अदृष्य झाली होती.

             मस्तानी महालात आप्पांनी पहिल्यांदाच प्रवेश केला होता.चौकी पहार्‍यावरचे स्वार खाली माना घालून उभे होते. आप्पा संतापल्यावर काय करतील याचा नेम नाही. भीतीने गर्भगळीत होऊन त्यांचे चेहरे काळवंडले होते. महालात फिरता फिरता त्यांना एका दालनात श्रीकृष्णाची मूर्ती दिसली. मूर्तीच्या गळ्यातील हार अजून सुकला नव्हता. एवढ्या बंदोबस्ताला छेद देऊन,नजरा चुकवून ही बया गेली तरी कशी? नाना कुठे आहेत? ते कोथरुडच्या बागेकडे सकाळीच गेल्याचे कळले.

            आप्पा महालाच्या आजुबाजुच्या भागाचेही बारकाईने निरिक्षण करीत असतां, महालाच्या बाजूला दोन पुरुष उंच भिंत होती. त्या भिंतीवर लोंबकळत असलेला दोर पाहून त्यांच्या लक्षात सारा प्रकार आला. महादोबा म्हणाले, बाई अत्यंत नाजुक आहे असं ऐकलं आणि दोन पुरुष उंच भींत चढून कशी गेली आश्चर्यच आहे.

              आप्पा दोराकडे टक लावून पाहत असतांना अचानक त्यांच्या स्वरात मार्दव आलं, म्हणाले, परमेश्वराने हीला ब्राम्हणकुळात जन्मास घातले असते तर आम्ही स्वतः राऊचे लग्न लावून दिले असते आणि सार्‍या कटकटीतून मुक्त झालो असतो. मस्तानीला एवढे चौकीपहारे अडवू शकले नाही ही बातमी एव्हाना सार्‍या पुणे शहरात वार्‍यासारखी पसरली.

         आप्पांच्या दालनात महोदबा पुरदरे व आप्पा खलबत करीत होते.  बाजीरावांपासून मस्तानीला अलग केल्याचे  समाधान पुरते पंधरा दिवसही लाभले नाही. ती बाजीरावां जवळ पाटसला पोहचली असेल हे सांगायला कोण्या ज्योतीष्याची गरज नव्हती. आतां पुढे काय?

           महादोबा म्हणाला, श्रीमंत एक विचार सुचतो बघा पटते का? आपण आतांपर्यंत मस्तानीला  श्रीमंतांची संगत सोडण्यासाठी कमी का प्रयत्न केलेत? तिला या जगातूनच नाहीसे केले तर  सार्‍याच कटकटी संपतील. नाही महादोबा आम्ही मुख्त्यार नाही.छत्रपतींच्या कानावर घालून त्यांनी आज्ञा दिली तरच! तुम्ही सर्व हकीकतीचे पत्र लिहून खास जासुदा करवी रवाना करा. त्यांचे उत्तर आल्यावरच कांही करता येईल.

         पाटसमधल्या वाड्यात मस्तानी-बाजीराव क्षणभरही दूर होत नव्हते. मद्याचे कुंभ रिते होत होते. दोघेही जगाचं अस्तित्व विसरले होते. स्वर्गसुखाचा आनंद उपभोगत होते दोन जीव. पंधरा दिवस कसे भर्रकन उडून गेले कळलेही नाही.त्यांच्या त्या दिव्य प्रेमाला ना सीमा होती ना बंध!

          एक दिवस राऊ म्हणाले, मस्तानी, या स्वप्नांची अखेर जवळ आली आहे. आतां तुला परत जायला हवय! परत जाऊ? कुठे? आपल्या हवेलीत.तिथूनच तर जिवाची कुरवंडी करुन राऊजवळ आले. परत तिथे जाऊ थरथरत मस्तानीने विचारले. होय मस्तानी, तुझी जागा तिथेच आहे.

              मस्तानीच्या डोळ्यातील धुंदी खाडकण उतरली.राऊ आतां हे पाय सोडून कुठेच नका पाठवू. मृत्यु यायचाच असेल तर या पायाजवळच येऊ देत. मस्तानी स्वप्न हे नेहमीच अल्प जीवी असतात.माणसाला वस्तुस्थितीला तोंड द्यावेच लागते. मस्तानी तुझ्या सानिध्यात हे धुंदीचे क्षण घालवत असतांना सुध्दा आम्हाला वस्तुस्थितीचा विसर पडला नव्हता.

               क्रमशः
  संकलन व © ®   मिनाक्षी देशमुख
                दि. २५-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                          भाग – ३२.

             त्यांनी परत पुण्याला परत जा म्हटल्यावर मस्तानी काकुळते म्हणाली, मी हवेलीत परत गेल्यावर मस्तानीसमोर  काय वाढून ठेवले याची कल्पना नाही. आम्हाला माहित नाही? त्यांच्या आवाजाला न कळत धार चढली. मस्तानी  मद्याच्या धुंदीत असलो तरी आम्ही पेशवा आहो. कुणाला समजत नसले तरी याला समजत,जे कुणाला ऐकू येत नसेल ते या पेशव्याला ऐकू येते. पेशवेपद आम्ही नुसतच मिरवत नाही. चहुबाजुंची खडा न् खडा माहिती असते.

             आणि तरीही आम्ही हवेलीत जावं?  होय! पण कां? आम्ही वचनाने बांधील आहो. तू पहारा चुकवून इथे आलीस पण जग म्हणेल बाजीरावनेच मस्तानीला काढून नेले.पण आपली पर्वा न करणार्‍या जगाची फिकीर कां करावी?मस्तानी कांही  प्रश्नांना उत्तर नसते. वाटेतले चौकीपहारे मारुन पुण्याला येणं आम्हाला कठीण होत का? मातोश्री,बंधूंना एकीकडे सारुन कुणाची पर्वा न करतां आम्हाला हवेलीत राहता आलं नसतं कां? पण मस्तानी, नियतीपुढे कुणाचचं कांही चालत नाही. तूं आलीस आणि इथं स्वर्ग अवतरला.जणूं वाटलं विरह संपला.पण मिलन आणि विरह दिवसरात्री सारखं असतं. एक संपलं की, दुसरं सुरु होते. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच! 

बाजीरावांचा उष्ण निःश्वास मस्तानीला जाणवला.तुम्ही मोहीमेवर गेल्यावर या मस्तानीचे काय होईल? कांही होणार नाही.माझी माणसं भरोश्याची आहेत.

              राऊ तुम्हाला बरच कांही माहित नसल्यामुळे असं बोलता.तुम्ही कल्पना करणार नाही इतकं या मस्तानीने सोसलं आहे.या ओठातून कांही गोष्टी उच्चारता येणार नाही असं सोसलं आहे. ते माहित असतं तर परत  पुण्याला पाठवलं नसतं.त्यांच्या छातीवर डोकं ठेऊन हुंदकै देत मस्तानी म्हणाली. मस्तानी, आम्ही पेशवे आहोत, आम्हाला सारं ठाऊक आहे. कांहीही लपलेलं नाही.आमचा राग करणार्‍या मातोश्रींना त्यांची चुक उमगून या पुत्राला क्षमा करतील. पुत्रासाठी क्षमेशिवाय मातेच्या ह्रदयात दुसरं काय असत? चमकून मस्तानी त्यांच्या पासून दूर झाली. सारी काया निर्जिव झाल्यागत तिला वाटले. आवाजात कंप आला. म्हणजे…. म्हणजे आणि डोळ्यातुन अश्रूधारा वाहू लागल्या. होय मस्तानी, आम्ही म्हटले की, आम्हाला सारं माहित आहे हे म्हटलं तेव्हाच तुझया लक्षात यायला हव होतं. तरीही आम्ही म्हणतो तुझे स्थान हवेलीतच आहे. आर्त स्वरात मस्तानी म्हणाली, पण कां अम्हाला ही  शिक्षा? राऊ-मस्तानीचं चिरंतर मिलन व्हाव म्हाणून.

             इतक्या दूर राहून मिलन कसं होणार? मस्तानी कधी तरी आमच्या माणसांना चुक उमगून तुला आमच्याकडे सन्मानाने पाठवतील त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहूं. ही मोहिम आटोपून आम्ही नर्मदातीरी जाऊ, तिथेच तुझी वाट बघु

              मस्तानीचा आतल्या आत आकांत सुरु होता. आर्त स्वरात म्हणाली, राऊंची इच्छा प्रमाण मानून पुण्यात मरण आले तरी तेही झेलू आणि एकदम बाध फुटुन भावनावेगाने राऊऽऽ राऊऽऽ म्हणत गळ्याला मिठी मारली.

            पुण्याकडे जाण्यास मेणे सज्ज झाले. दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांनी निरोप घेतला. फिर मिलेंगे म्हणून मेण्याचा पडदा सोडला व मेणा पुण्याच्पा दिशेने रवाना झाला.

तिसर्‍या प्रहरी पेशव्यांची फौज गोदावरीच्या रोखाने निघाली. अहमदनगर जवळ चिमाजीअप्पा आपल्या फौजेसह पेशव्यांना येऊन मिळाले. नासरजंग व मराठ्यांची मोठी अटीतटीची मातब्बर लढाई झाली. शेवटी पडाव झालेला नासरजंग नामुष्कीचा तह पदरात घेऊन परतला.

           दुसर्‍या दिवशी पेशव्यांचा खास जासूद पुण्याहुन तातडीचा खलिता घेऊन त्यांच्या डेर्‍यात आला. खलिता वाचताच निसरजंगवर मिळवलेला विजयाचा आनंद क्षणात धुळीस मिळाला.२-३ महिन्यापासुन मनाला घातलेला आवर नष्ट झाला.थरथरत्या हाताने खलिता गादीखाली ठेवून आप्पांना बोलावणे पाठविले. विजयाची वार्ता दक्षिणेत पोहचली होती. छत्रपती शाहु महाराज  परमहंसबाबांकडून आलेली आशिर्वाद व अभिनंदनाची पत्रे घेऊन , मोठ्या उत्साहाने बंधुच्या डेर्‍यात पोहचले.पण राऊंच्या चेहर्‍यावर नजर जाताच त्यांच्या काळजात चर्रऽऽ झाले.कांही तरी विपरित घडल्याची त्यांना जाणीव झाली.उसने अवसान आणून म्हणाले, राऊंच्या विजयाची वार्ता सातार्‍या पर्यंत पोहचली. आणि आमच्या पराभवाची वार्ता इथे गंगातीरी आमच्यापर्यंत आली.

                        क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. २५-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                     अंतिम भाग – ३३.

               इतक्या लवकर ती खबर राऊपर्यंत पोहचेल असं आप्पांना वाटले नव्हते. गादीखालचा खलिता आप्पांना देत म्हणाले, वाचा आणि या अभागी राऊचा पराभव कसा झाला पहा. खलित्यावर एक नजर टाकून उसणं बळ आणून आप्पा म्हणाले, नानांचा तरी काय दोष? दोष कुणाचाच नाही, असलाच तर आमच्या दैवाचा. असलं करंट नशीब घेऊन बाजीराव जन्माला आला हाच त्याचा दोष! राऊ अशा पवित्र ठीकाणी अशी अभद्र भाषा कां? आप्पा मस्तानीला फसवून पर्वतीच्या पायथ्याशी कैद करुन ठेवली ही खबर अभद्र नाही आप्पा? आप्पाऽऽ आप्पाऽऽ कां असं केलं तुम्ही? त्या गरीब बिचारीने तुमचे काय बिघडवले होते?

             राऊ, आमचा नाईलाज होता. नाईलाज? आप्पा नाईलाज आणि तुमचा? चौदा चौकड्यांच्या रावणासारखी सत्ता तुमच्या हाती असतांना तुमचा नाईलाज? एकदा चौकी पहारे ओलांडून मस्तानी निसटून गेली होती म्हणून आमच्याच सल्ल्याने नानांनी तिला पर्वतीच्या बागेत प्रतिबंधात ठेवले. बाजीरावांच्या चेहर्‍यावर आलेलं हास्य अधिकच विकृत व भेसूर दिसत होता.चिमाजीपंतासारखा शूर बलाढ्य लढावू एका स्रीला घाबरतात यावर आम्ही विश्वास ठेवावा? तुमच्या पहार्‍यात एक निराधार स्री एकवेळ निसटुन गेली म्हणून तुम्ही सारी शक्ती पणाला लावून तिला प्रतिबंधात ठेवता? आप्पा तिने पुण्याला पाठवू नये म्हणून किती काकुळत केल्यावरही आम्ही केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मोठ्या आशेने पाटस वरुन पाठवले होते. वाटलं होतं, माणसाच्या मनात अजुन थोडी तरी माणुसकी, कोमल भावना, कणव शिल्लक असेल पण आमचा अंदाज पार धुळीला मिळाला. जिवाच्या आकांताने पळणार्‍या एका गायीविरुध्द सारी मराठी सत्ता आज दंड थोपटुन आहे. तिला चिरडायला तुम्हाला एवढी ताकद खर्चावी लागते याची आम्हाला कल्पना नव्हती.

             आप्पा, मुद्दाम आमच्या माघारी चिरंजीवाची मुंज केली, पण आमचा रक्तामासाचा, आमच्या काळजाचा तुकडा समशेर दिसला नाही.तुमच्या पुत्राचे लग्न केले, आमच्या मनाला किती घरे पडले असतील याचा जराही विचार केला नाही. आणि ह्या डागण्या कमी पडल्या म्हणून, राऊत पाठवून  मस्तानीला एखाद्या गुन्हेगार स्री सारखं कैद करुन ठेवलत. आप्पा, बंधूप्रेमाचा उच्च नमुना जगात शोधून सांपडणार नाही. आतांपर्यंत दुःखारितेकाने मृदु बोलणार्‍या बाजीरावांचा वडवानल एकदम उसळला. शब्दातून ठीणग्या उडू लागल्या. आप्पा, आमच्या ह्रदयात मस्तानीचे काय स्थान आहे याचा थोडा तरी विचार करायला हवा होता. मस्तानी आणि राऊ दोन नाहीत. अरेऽऽ!तुमच्या  सर्वांच्या भावनेचा विचार आणि विश्वास करुन आम्ही फार मोठी चुक केली. तुम्ही सारी माणुसकी वेशीवर टांगली. तुम्ही विचार करायला हवा होता, मी मनात आणलं असतं तर, मस्तानी एका निमिषात आणू शकलो  असतो. तुमच्या सार्‍यांचा  विचार  करुन तिला पुण्यात पाठवण्याची भयंकर चुक केली त्याचे फळ मिळाले आम्हाला.

            आतां आम्हाला कोणाचीही सोबत नको. उद्या तुम्ही पुण्याकडे निघा. आम्ही दूर नर्मदेकडे जातो, जिथे  कुजबुज, कटकारस्थाने ऐकू येणार नाही. राऊ, तुमची आधीच तब्बेत ठीक नाही.असा अविचार नका करु. बस्स बस, कळलं तुमचं बंधुप्रेम. एवढ्या हौसेने  आम्ही ती वास्तु बांधली पण तिच्यात राहण्याचा आमचा योग नाही. तुम्ही,नाना व मातोश्री त्या वास्तुत सुखाने खुशाल रहा.

            मातोश्रींना सांगा, आम्हाला उगीच वाटले होते, मातेच्या ह्रदयात क्षमेशिवाय दुसरं काही नसते पण आमची समजण्यात चुकच झाली.सर्वच माता सारख्या नसतात हे समजायला हवं होत आम्ही!  आप्पा  या.. आम्हाला एकटं सोडा

           दोन दिवसांनी पेशव्यांचा तळ हलला. आप्पांनी २-३ वेळा राऊंची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण, राऊंनी भेट दिली नाही. हिरमुसल्या मनाने आप्पा पुण्याकडे रवाना झाले. इथली सारी व्यवस्था लावून पेशव्यांची छावणी नर्मदेच्या उत्तरतीरावर रावेरखेडीला पडली.

          अंगात ज्वर असूनही ते दौलतीची कामे पहातच होते. बाहेर उष्मा भयंकर असतांना पेशव्यांच्या अंगात थंडी भरुन येत होती. कुंवर त्यांची सेवा निष्ठेने करीत होता. २-३ दिवसां पासून पोटात अन्नाचा कण नाही की, वैद्याने दिलेली औषधे घेतली नाही. शेवटी मनाचा हिय्या करुन म्हणाला, श्रींंमंत, आपण अन्न, औषध घेत नाही, अशाने पार कसा लागेल? आतां पार लागेल तो अखेरचाच!

           कुंवरने खुपच आग्रह केल्यावर बळेबळे  दोन घास व औषध घेतल्याने त्यांना संध्याकाळी थोडे बरे वाटल्यावर उद्या अक्षयतृतीयेचा दरबार भरवण्याच्या सुचना सरदारांना दिल्या. अक्षयतृतीयेला सकाळीच खबर आली, आप्पांनी मस्तानीची कैदेतून सुटका केली, पण त्यांना आनंद वाटण्याऐवजी  खिन्नताच वाटली. दरबार आटोपून पेशवे डेर्‍यात आले ते तापाने फणफणतच. वैद्यांची धावपळ झाली. सर्वांचा धीर सुटला. त्यांच्या न कळत पत्रे पुण्याला रवाना झाले.

            दुपारी असह्य तलखी होत असल्यामुळे कोणाला न जुमानता शरीराचा दाह शांत करण्याकरीता नर्मदेच्या डोहात उडी मारली.अर्ध्या घटकेने बाहेर आल्यावर त्यांच्या अंगात भयंकर थंडी भरली. त्यांना पालखीत घालूनच डेर्‍यात आणून बिछान्यावर झोपवले. अर्धवट ग्लानित असतांना मस्तानीची काय खबर म्हणून विचारल्यावर सर्वांनी माना फिरवल्या. समजलो असे म्हणून डोळे मिटून घेतले. सार्‍यांनी रात्र जागून काढली. दुसर्‍या दिवशी ज्वर आणखी वाढला,शुध्द हरपली. वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. भ्रम हटत नव्हता,ज्वर वाढतच होता. सार्‍यांच्याच तोंडचे पाणी पळाले. खबर आली, खुद्द काशीबाई जनार्दनसह येत आहेत. मोहिनी एकादशीला काशीबाईचा मेणा रावेरीला आला. लटपटत्या पायाने त्या डेर्‍यात आल्या व पतीची अशी अवस्था पाहून, अनावर हुंदका देत पतीच्या पायावर झोकून  देत म्हणाल्या, ही काय अवस्था करुन घेतली?

              ग्लानीत असलेल्या राऊंनी कातरवेळी डोळे उघडले.

डेर्‍यात होते फक्त पती-पत्नी. कोण? मस्तानी? आलीस तू?  कुंवर त्यांच्या कानात पुटपुटला, धनी, काशीबाई आल्या आहेत. कुंवरचे शब्द त्यांच्या पर्यत पोहोचलेच नाही. ते आपल्याच धुंदीत होते, आम्हाला माहीत होतं, अखेर राऊ जवळ मस्तानीच येणार!अशी दूर का?

            मृत्युंजयाचा जप सुरु होता. काशीबाईंनी त्यांचा हातात घेतलेला हात सुटला. श्रीमंत बाजीराव पेशवे अनंतात विलीन झाले. मस्तानीची सुटका झाल्याबरोबर तिने रावेरकडे धाव घेतली. पण वाटेत पाबेळलाच राऊंच्या मृत्युची खबर मिळताच, खंजर पोटात खुपसून घेतला.

         अशा तर्‍हेने दोन प्रेमी जीवांचा करुण अंत झाला. एक पर्व संपले.एक राजकन्या, मराठी दौलतीच्या पेशव्यांची पत्नी असूनही पुण्यात तिला कंचनी,यवनी, कलावंतीण म्हणून हिनवतच तिचा शेवट झाला.

            अशा या अभागी दोन प्रेमवीरांसाठी अश्रू ढाळून शेवट करते.मस्तानीने केलेल्या प्रेमाला व त्यागाला शतशत प्रणाम!

                      समाप्त
      संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                    दि. २६-५-२०२२.

मस्तानी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version