Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

पेशवा बाजीरावची दुर्भागी ” मस्तानी ” भाग ५, (१७ ते २०)

BAJIRAO CHI MASTANI 5 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

BAJIRAO CHI MASTANI 5 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI


       पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्‍यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !! बाजीराव मस्तानी !!!

!!!  मस्तानी  !!!

                      भाग -१७.

              काशीबाईचे बोलणे ऐकून आप्पांच्या जिव्हारी जखम झाली. दोन महिन्यापासून त्यांची तब्बेत ठीक नव्हती तरी त्याकडे दुर्लक्ष करुन दौलतीची कामे रेटीतच होते याच उमेदीने की, छत्रपतींनी आपल्या बंधूच्या खांद्यावर टाकलेली धूरा समर्थपणे वाहण्यात आपल्या बंधूस साह्य करणे आपला धर्म आहे. पण आता एकाएकी बळ संपल्यासारख झाल त्यांना कोसळतो आहोत असं वाटू लागलं, पण लगेच स्वतःला सावरत वहिनीची समजूत घालत म्हणाले, एखादेवेळी होते चुक आपणच सांभाळून घ्यायला हवय! भाऊजी, तेवढच असत तर आम्ही एवढं मनाला लावून घेतलं नसतं,पण त्या अडखळल्या….

                दिवसभर  राजकारणासंबधी महाराणांच्या महालात इकडच्या स्वारींचे बोलणे सुरु होते.आम्ही आमच्या डेर्‍यात एकटेच बसलो होतो. उशीरारात्री स्वारींना आमच्या डेर्‍यात कुंवरने आणून सोडले. पाय लटपटत होते.डोळे लालबुंद,डोक्यावरचा मंदिल एकीकडे कललेला.आम्ही हात धरुन त्यांना पलंगावर बसवले.घाबरल्या स्वरात आम्ही म्हटले, आपण दुसर्‍या मुलखात आणि हे काय चालवल? भानावर याव! आम्हाला याची कुणकुण सेवकाकडून लागली होती. पण आम्हाला खरं नव्हत वाटलं. आज प्रत्यक्ष बघितलं तरी एवढ वाटलं नव्हतं. होते एखादे वेळी. पण भाऊजी, आमच्या तोंडून ती शरमेची गोष्ट उच्चारल्या जात नाही. सांगा वहिनी आम्ही तुम्हाला नेहमी मातोश्रीच्या ठायीच मानलं आहे.सांगा..

आम्ही एवढ बोलल्यावर स्वारी म्हणाली,माहित आहे मस्तानी, तुझ्या शराबी डोळ्यांची धुंदी आमच्यावर चढली आहे.भाउजी, त्यावेळी धरणी दुभंगून आम्हाला पोटात घेतलं असतं तर बर झाल असतं. राऊंचा एवढा तोल सुटला? त्यानंतर जे घडलं ते तर आमचा प्राण गेला तरी ओठातुन बाहेर पडणार नाही. भाऊजी, त्याचक्षणी जाणीव झाली,आमचा संसार धुळीस मिळाला आणि हुंदक्यांनी त्यांचे शरीर गदगदु लागले. वहिनी, यातून  नक्की मार्ग काढू एवढा भरोसा माझ्यावर ठेवा. एवढं मात्र खरं, राऊंना कब्ज्यात घेणार्‍या मस्तानीकडे आमचं दुर्लक्ष झालंय!

             आप्पा स्वस्थ बसले नाही.विश्वासू कारकुनाला बोलावून आप्पांनी भराभर आज्ञा लिहून वाड्यावरचे कारभारी बापू श्रीपतींच्या हवाली करुनच ते फडावर आले. कामाच्या गडबडीच दोन तीन दिवस राऊंचे कोथरुडच्या बागेकडे जाणे झाले नाही. चौथ्या दिवशी कुंवरला घेऊन कोथरुडकडे निघाले असतां, कुवंर म्हणाला, हुजूर कोथरुडच्या बागेत मस्तानीसाहेब नाहीत. नाहीत? कुठे गेली? कुठे गेल्या ते माहित नाही पण त्या तिथे नाहीत, पाव घटकेत ते मस्तानीच्या महालाजवळ आले. हवेली रिकामी बघून चौकशी केल्यावर त्या दोन दिवसांपूर्वीच कुणाला न सांगतां अचानक समशेर, दासी व सरंजामासह निघून गेल्या. जातांना एवढच म्हणाल्या आमचं इथलं अन्नोदक संपलं. चौकशी करायला कुणी आल तर आमची काळजी करुं नका म्हणून सांग.

              पेशव्यांचा क्षोम अनावर झाला. हातातला कोरडा समोरच्या सेवकाच्या पाठीवर ओढत  संतापाने ओरडत विचारले, सांग मस्तानी कुठे गेली? मारापेक्षा त्यांच रौद्ररुप पाहूनच तो गर्भगळित झाला. त..त..प..प करीत म्हणाला,त्या पाबळच्या दिशेने गेल्या एवढच माहित आहे. घोडा चौखूर पाबळच्या दिशेने ऊधळला.त्यांच्या वेगापुढे कुंवरला घोडा फेकणे अशक्य होत होते.कांही वेळाने दोघांतील अंतर वाढून घोडा दिसेनासा झाला.तिसर्‍या प्रहरी पेशव्यांचा घोडा पाबळच्या वेशीजवळ आला.चौकशी केल्यावर तिथे ऊभ्या असलेल्या राऊतने मस्तानी मुक्कामाला असलेल्या बागेकडे बोट दाखवून म्हणाला आज मुक्कामाला आहेत, उद्या पुढे निघणार म्हणाल्या.

            बगीच्यात एका राहुटीत मस्तानी एका छोट्या चौपाई वर समशेरला घेऊन बसली होती. बाजीराव घोड्यावरुन उतरुन सरळ राहुटीत घुसले. आप? आपको हमारा पत्ता कैसा मालूम हुआ? एकदम तिला मिठी मारत म्हणाले, प्यारी मस्तानी, आम्हाला न सांगता कां निघून आलीस? घाबरुन रडायला लागलेल्या समशेरला घेऊन बसंती बाहेर गेली. मस्तानीकडे पाहत ते चौपाईवर टेकले. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. ओढणीने त्यांचा घाम पुसत मस्तानी म्हणाली, राऊ एवढ्या दूरवर एकटे धावत येतील असे वाटले नव्हते.  श्वासात श्वास मिळाले, शब्दांचे उपचार थिटे पडले. दृष्टीला जे गवसलं ते ह्रदयाच्या कप्यात कधीच बंदिस्त झाले. आतां उरली होती फक्त उत्सुकता. मस्तानी एवढ्या दूरच काय पण दुनियाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेली असतीस तरी या बाजीरावाने तुला हुडकुन काढले असते.अचानक कांहीही न सांगता,कळवता  कां निघून गेलीस? परवा पर्यत राऊत समावणारी, देहभान विसरणारी मस्तानी आम्हाला अशी सोडून जाईल, स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. असं काय झालं म्हणून तूं पुणे सोडलेस? काय बोलावे मस्तानीला पेच पडला. सरळ जबाब देण्याचं टाळत म्हणाली, तिकडे पुण्यात शोधाशोध सुरु झाली असेल, आधी पुण्याला वर्दी तरी पाठवावी. मग सांगु आमची कर्मकहाणी. ताडकण उठत म्हणाले, आमची एवढी चिंता, फिकर असती तर, मस्तानी आम्हाला एका शब्दाने न सांगता पुण्यातून बाहेर पडलीच नसती.

                       क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
              दि. २०-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                       भाग – १८.

             बाजीरावांचा अनिवार संताप पाहून अजिजीने मस्तानी म्हणाली, राऊ ही दासी स्वतःच्या मनाने पुण्यातून बाहेर पडलेली नाही.राऊंच्या सावलीत राहण्याची शपथ घेऊन पुरते चार प्रहरसुध्दा उलटले नव्हते तोच हा प्रसंग आला. आम्ही खुशीने पुणं सोडलेलं नाही. तुझ्यावर हा प्रसंग आणणार्‍या माणसाचे नाव सांग. राऊंनी आग्रह करु नये.असं समजा आम्हीच आमच्या मनाने बाहेर पडलो. अशक्य.एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवला असं सांगीतल तरी एखादेवेळी विश्वास ठेवू पण मस्तानी स्वतःहून निघून गेली यावर आमचा यकीन होणार नाही. सांग मस्तानी आम्हाला न कळवतां कां बाहेर पडलीस? आम्हाला  हुकुम झाला राऊ!कोणी केला? वचन मिळेल तर सांगते. असं कोड्यात नको बोलूस.त्याच नांव सांग  म्हणजे,बाजीरावाचा रोष काय असतो ते त्याला समजेल. म्हणूनच आम्हाला वचन हव आहे. मस्तानी तुझ्या मनातील न जाणण्याईतके आम्ही दुधखुळे नाही.तरी ठीक आहे. दिले वचन. आतां तरी बोल. नांव सांगेन पण त्यांना अभय द्यावे. राऊंनी आम्हाला वचन दिले आहे. निःश्वास टाकून म्हणाले, ठीक आहे. सांग कुणी दिला हुकुम? आप्पास्वामींनी. काय? अप्पांनी? होय त्यांच्या कारकुनाने सांगीतले, सूर्योदयापूर्वी मस्तानीने बुंदेलखंडाच्या रोखाने कुणाला कांहीही न सांगता निघून जावे. बाजीरावांना मनात वाटलेच होते हे धाडस  आप्पा शिवाय कुणी करणार नाही. मस्तानीने त्यांचे नांव घेतल्यावर ते हादरले. स्वतःला सावरुन निःश्वास टाकत म्हणाले, वचन दिलं नसतं तरी आम्ही कांही करुं शकलो नसतो अशी ती जागा आहे.त्यांनी आम्हाला अवाक्षरानेही न विचारतां परस्पर हुकुम कां दिला हेच समजत नाही.

             सारी तयारी करुनच आम्हाला आप्पास्वामींनी हूकुम दिला होता. आणि आम्ही तो मानला.कारण त्यांच्या मर्जी विरुध्द पुण्यात राहणे शक्य नव्हते. बाजीरावांच्या मनी विषाद दाटला. दुःखाने निःश्वास टाकत म्हणाले, आप्पांनी हुकुम दिला आणि तो तू पाळलास इथपर्यत ठीक आहे. आप्पाची कशी समजूत काढायची ते आम्ही पाहून घेऊ. तुला परत नेण्यास आलो आहे.पटकण तयारी कर. एक विनंती ऐकावी…मी पुण्यात राहणं आतां योग्य होणार नाही.बाजीराव ताडकन् म्हणाले, बाजीरावाला दुसर्‍याच ऐकायची संवय नाही.एकदा तोंडातून निघालेला शब्द अखेरचा. अर्ध्या घटकेत मस्तानीचा मेणा पुण्याच्या दिशेने निघायला हवाच!

               मस्तानीने परोपरीने विनवलं पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर म्हणाली, मी आतां पुण्यात येण्याचा एकच अर्थ आहे, लोक म्हणतील राम लक्ष्मणा सारख्या भावांमधे मस्तानीमुळे वितुष्ट आलं. विषारी शब्दांनी लोकं मला घायाळ करतील. आमचा नाईलाज आहे.प्रत्यक्ष मृत्यु तुला न्यायला आला तर प्रथम त्याला आमच्याशी मुकाबला करावा लागेल.

              बाहेर मस्तानीच्या खाजगीतल्या सेवकांना पुण्याकडे कूच करण्याच्या आज्ञा दिल्या.रात्री दोघांनीही सोबत भोजन केले तोवर बाजीरावांच्या शोधार्थ पुण्याहून खाजगी पागेतील स्वारांची तुकडी येऊन पोहचली,ते राहूटीत आहे कळल्यावर समोर जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही, गावच्या वेशीजवळ मुक्काम ठोकून वाट बघत राहिले.

             स्वारांची हालचाल राऊंच्या कानाने टिपली. जेवण झाल्यावर दोघेही बोलत बसले मनं मोकळी होऊन दडपण नाहीसं झालं.कितीतरी विषय निघत होते. रात्र चढत होती. त्यांना बिलगुन बसलेली मस्तानी म्हणाली, आम्हा बायकांना माहेर किती प्रिय असते, पण आज तीच वाट आम्हाला वैरीणी सारखी वाटत होती. दोन दिवस चालत असतांना आतून एकच विचार डंख मारत होता, कोणता मस्तानी? सार्‍यांनी वार्‍यावर सोडलं तरी कोणत्याही कठीण प्रसंगी स्रीला माहेरचा आसरा आधार असतो. पण आमचं कोण आहे तिथं? आम्ही कांही मनातलं बोललो तर आपल्याला वाटेल आम्ही स्वार्थी आहो शेवटी ही पण आपल्या जातीवर गेली. इतकी वर्षे आमच्या सोबत राहूनही आम्हाला ओळखले नाहीस?  बोल मस्तानी मनातल बोल.ती म्हणाली, असं वाटतं की, आपल्यालाही कुठे तरी माहेर असावं. जेव्हा आयुष्यात पराभवाचा क्षण येईल तेव्हा कुशीत दडायला माती असावी. लग्न झालेल्या बाईला माहेर कडून साडीचोळी मिळते. आम्हाला कोण देणार? कुणाच्या कुशीत तोंड खुपसून मन मोकळं करावं? मस्तानीचा स्वर भावनेने ओला झाला.ओठ थरथरत होते. राऊ मृदु स्वरात म्हणाले, तुला आजच असं एकाएकी कां वाटतय? आम्ही आहोत ना? सांग काय पाहिजे?

            इतक्या दूर माझ्या सारख्या एकाकी शुल्लक कंचनीसाठी येणं झालं आणि पुण्याला परत नेत आहात, राऊंना सोडून माहेरच्या दिशेने मी तुडवलेली वाट इथेच संपली ही वाट जिथं संपली तेच गाव चोळी बांगडी म्हणून या मस्तानी ला द्यावं. पहाटेचं तांबड फुटलं. मेणे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

                       क्रमशः
  संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                  दि.  २०-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                         भाग – १९.

                तिसर्‍या दिवशी तयार झालेल्या सनदा मान्यते साठी आप्पाच्या समोर आल्या. केंदूर आणि पाबळ ही दोन गांवे पेशव्यांनी मस्तानीला चोळीबांगडी साठीं दिली. अप्पांनी सनदांवर ओझरती नजर टाकून बाजूला ठेवून दिल्या.

               फडावरचे काम नियमित सुरु होते जसं कांही घडलंच नाही.दिल्लीच्या मोहिमेचे तपशील ठरत होते.वरकरणी व्यवस्थित चालू होते परंतु असंतोष घुसमसत होता. मस्तानी कोथरुडच्या बागेत परत आल्याचे आप्पांना समजले होते. आप्पा स्वस्थ होते. कांही घडलेच नाही असेच दोघे बंधू वागत असले तरी दुरावा दोघांनाही जाणवत होता.आणि एके दिवशी स्फोट झालाच. दोघे बंधू कचेरीत कामकाज करीत बसले होते. कागदं पाहता पाहता मधेच आप्पांनी विचारले राऊ तो दुसरा महाल बांधला तो कशासाठी? बाजीरावांचा इतके दिवसांचा दबलेला संताप एकदम उफाळून आला. तरी संयमाने म्हणाले, तो महाल मस्तानीसाठी बांधला. मस्तानीसाठी? त्या कलावंतीणीसाठी? होय. ती कलावंतीण आमच्यासाठी खास आहे हे मागेच आम्ही स्पष्ट केले होते.पण ती सध्या ती कोथरुड च्या बागेत राहत आहेच ना? ती जागा सोईस्कर वाटत नसेल तर पर्वतीच्या पायथ्याशी असलेली इमारत देता येईल किंवा शहरातील दुसरी जागा देता येईल. नाही.. तिला आमच्या नजरेच्या टप्पात ठेवायचीय म्हणून तीला हवेलीत आणून ठेवणार आहे. पण इतक्या जवळ आणण्याचं कारणच काय?

             आप्पा, कारण आमच्या तोंडूनच ऐकायचे का? पुण्यातून मस्तानीला कोणी घालवले? कोणी हुकुम दिला? कां घालवले याचे कारण आम्हाला समजावे म्हणून तिला आमच्या जवळ ठेवणार आहे. बंधूच्या शब्दातील धार अप्पांचे काळीज कापत गेले. एवढी एक गोष्ट सोडली तर आजपर्यंत त्यांना आवडणार नाही अशी एकही गोष्ट आप्पांकडून घडली नव्हती. राऊ आपल्यावर रुष्ट झाले ही गोष्ट लक्षात आल्यावरही आप्पा शांतपणे म्हणाले, राऊ, तुम्ही आमचे नुसते वडिल बंधूच नाही तर, या मराठी दौलतीचे पेशवे आहात म्हणून म्हणतो रखेली हवेलीत ठेवली तर लोक काय म्हणतील?

           रखेली? संतापाने बाजीराव कडाडले. आप्पाऽ एकदा बोललात तेवढं पुरे! तिच्या बाबतीतल्या भावना आतांपर्यंत तुमच्या लक्षात यायला पाहिजे होत्या.आणि म्हणूनच महाल बांधून घेतला. पण वहिणींचा विचार? त्यांचा विचार करुन विचारपूर्वकच आम्ही निर्णय घेतला.याबाबतीत तुमचा सल्ला नकोय आवाज चढवून बाजीराव म्हणाले. यापुढे आमच्या खाजगीत लक्ष घालू नये.वाटल्यास हा आमचा हूकूम समजा. आप्पांचा चेहरा दुःखातिशयाने काळवंडला.हलकी पावले टाकत ते आपल्या महाली आणि कारभारी बापूजी श्रीपतींना बोलावून सांगीतले, तुम्ही तयार केलेल्या सनदांना आमची मंजूरी असून केंदुर आणि पाबळ ही दोन गावे इनाम म्हणून दिल्याच्या मंजूरीचा आमचा शिक्का सनदीवर उठवा.

             काशीबाईंच्या पायाचं दुखणं पुन्हा उमळलं,त्याच्या जोडीला दुसर्‍या तक्रारीही सुरु झाल्यात. अन्न पचत नव्हते. तोंडाला पाणी सुटत होते. अन्न जात नसल्याने नुसतं दुध घेऊन पडून राहत होत्या. मधून अधून बाजीराव त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आले की, ओढून ताढून चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न ठेवत मनातलं व शरीराचं दुःख लपवित होत्या.

             तीन दिवसांपासून काशीबाईंनी जेवण घेतले नसल्याचे कळल्यावर आप्पा त्यांच्या समाचाराला येऊन म्हणाले, वहिनीसाहेब, आपण गेल्या तीन दिवसांपासून अन्न घेतले नाही. भाऊजी, अन्नावर वासनाच नाही. असं म्हणून कसं चालेल? शरीर आहे तर अन्न, औषधपाणी घ्यायला हवच! 

‌           विषय बदलवण्या साठी त्यांची पत्नी

 अन्नपूर्णावरुन थोडी चेष्टा केली.आप्पा म्हणाले, वहिनी तुम्ही कितीही हसलात दुःख लपवण्याचा प्रयत्न केलात तरी आम्हाला दुधखुळे समजता की काय? सारं लक्षात आल. तुमच्यासाठी जीव तीळतीळ तुटतो, पण राऊंनी   

  आम्हाला खाजगीत लक्ष न घालण्याबद्दल सक्त मना केली आहे.आम्ही ऐकले, त्या नवीन महालात मस्तानीला आणून ठेवणार तरीही तुम्ही खाजगीत लक्ष घालणार नाही? दोन्ही कडून आमचा कोंडमारा होतोय.एक करा भाऊजी, एखादं जालिम विष बोलावून द्या म्हणजे ती कलावंतीण हवेलीत येण्यापूर्वी आमचे डोळे मिटलेले असतील.

        काशीबाईंचे शब्द ऐकून आप्पा एकदम स्तब्ध झाले. वहिनीचे दुःख,अगतिकता दिसत होती मार्ग काढावासा वाटत होता, पण राऊंनी पेशवा म्हणून दिलेला हूकूम? आप्पा त्यांची समजूत काढत म्हणाले, आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करु मस्तानी हवेलीत येणार नाही याची.चिंता करु नका.

                 क्रमशः
     संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. २०-५-२०२२.

!!!  मस्तानी  !!!

                       भाग – २०.

                 बाजीरावांसमोर कुलोपध्याय कृष्णंभट पंचाग घेऊन उभे होते.कृष्णंभट, गृहप्रवेशासाठी उत्तम मुहूर्त कोणता  आठ दिवसांनी चांगला मुहूर्त आहे श्रीमंत! बाजुलाच असलेल्या खाजगीकडचे बापूजी श्रीपती होते त्यांना म्हणाले, कृष्णंभटांनी सांगीतलेल्या मुहूर्तावर मस्तानी गृहप्रवेश करेल, त्या तयारीला लागा. होय श्रीमंत, मुजरा करुन निघून गेले.

                        थोड्या वेळाने बाजीराव कोथरुडच्या बागेत मस्तानीकडे येऊन म्हणाले, तुझ्यासाठी एक खूषखबर आहे. मागे तू आम्हाला एक वचन मागीतले होते, मनांत येईल तेव्हा  आमची भेट घेता यावी.आणि आम्ही दिलेही होते. त्यानंतर  आमच्या जवळ यायच तर दूर, तुलाच अचानक पुण्यातून बाहेर पडावं लागलं. पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही बंदोबस्त केला. लवकरच आम्ही दिल्ली मोहिमेवर जात आहोत.किती दिवस लागतील सांगता येत नाही. आमच्या माघारी पुन्हा त्या प्रसंगाची पुनराृत्ती होऊ नये म्हणून आमच्या हवेलीत आमच्या महालाशेजारी तुझ्यासाठी महाल बांधून घेतला.तिथे तू राहिलीस की, आमच्याकडे येण्यास तुला कोणाच्या परवानगी ची गरज पडणार नाही.आणि आपली ताटातूट होणार नाही.

पण मातोश्रींना काय वाटेल याचा विचार करायला पाहिजे. विचार? या लोकांनी आमच्या मनाचा विचार केला?मस्तानी  आमचा दुसरा प्राण आहे.हे  परवा आम्ही खुद्द पाबळपर्यत जाऊन मस्तानीला आणली यावरुनच सगळ्यांना समजायला हवय! कुलोपध्यायांनी काढलेल्या मुहूर्तावर आमची प्यारी मस्तानी खास तिच्यासाठी बांधलेल्या महालात गृह प्रवेश करेल राऊ आम्हाला एक अर्जी करायची होती. मागच्या मोहिमेवर बाईसाहेब बरोबर होत्या, यावेळी आम्हाला न्यावं.मस्तानी या वेळची मोहिम फार धावपळीची आहे. प्रत्यक्ष बादशहाच्या गूहेत शिरुन त्याला आव्हान देणार आहोत. अशावेळी तू बरोबर असलीस तर तुला बर्‍याच तकलफीचा सामना करावा लागेल. ज्याक्षणी या मस्तानीने हा देह राऊंच्या स्वाधीन के त्याचक्षणी येणार्‍या संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवली आहे  आम्हाला मोहिमेवर नेणार हे नक्की समजायच ना? होय!!

           बाजीराव मातोश्री राधाबाईच्या नमस्काराला आले तेव्हा तिथे कृष्णंभट २-३ ब्राम्हण बसले होते. त्यांच्या चेहर्‍या वरचे भाव पाहून सारा प्रकार पेशव्यांच्या लक्षात आला. वरकड गोष्टी झाल्या.दाभाड्यांनी बंद केलेला देकार पेशव्यांनी पुन्हा पुण्यात सुरु केल्याने ब्राम्हण संतुष्ट झाले. पण दौलतीवर भरमसाट कर्ज असतांंना सर्वांच्या आग्रहाने हजारो रुपयाच्या दक्षिणा ब्राम्हणांना दिल्या पण श्रीमंतांना पटले नाही. त्यावर राधाबाई म्हणाल्या, राऊ, दौलतीच्या कर्जाची एवढी काळजी आहे तर तुमच्या विलासावर किती खर्च होतो याची फिकिर केली का कधी? त्यांचे बोलण्याचे उगमस्थान कृष्णंभट आहे हे उमगल्यावर ते शांतपणे म्हणाले, आमचा खर्च आमच्या खाजगीतून करतो.दौलतीचे आणि आमचे हिशोब अगदी वेगळे आहेत.थोरल्या महाराजांपासून नियम आहे, दौलत अडचणीत असेल तर देकारासारखा खर्च आवरता घेतला पाहिजे.

           राधाबाई म्हणाल्या, आम्ही दानधर्म करतो ते पेशवे मोहिमेवर जातात त्यावेळी त्यांचेकडून धर्माला सोडून आचरण होते ते निवारण्यासाठी.मधेच कृष्णंभट म्हणाले, धर्माचं रक्षण करण आमचं कर्तव्य आहे तेव्हा मोहिमेवरुन परत आल्यावर पेशव्यांनी प्रायश्चित घ्यावं म्हणजे पुण्यातील ब्राम्हणांसमोर उजळ माथ्याने सांगता येईल आमचे धनी निष्कलंक आहेत

असं कांही ऐकायची पेशव्यांना संवय नसल्यामुळे एकदम भडका उडाला.

         कृष्णंभट, इथं पुण्यात  बसून धर्माचाराच्या गोष्टी बोलायला ठीक आहे, पण आमची तिर्थक्षेत्रे यवनांच्या ताब्यात आहेत, रोज गो-वध होतो, ब्राम्हणांच्या शेंड्या कापून सुंता होत आहे. ती तीर्थक्षेत्रे सोडवण्यासाठी आम्ही मोहिम आखतो,  प्राण पणाला लावतो तेव्हा इथे आरामात बसून पापपुण्याच्या, धर्माच्या बाता करुं शकतां. आणि राहिली गोष्ट प्रायश्चित घेण्याची, ती आमच्या पध्दतीने घेऊ. हवेवीत नवीन बांधलेल्या महालात मस्तानीला आणून करु,आणि ताडताड पावलं टाकीत पेशवे निघून गेलेत.

                     क्रमशः
  संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.
                  दि.२१-५-२०२२.

मस्तानी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

Exit mobile version