केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य अप्रतिम …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ६.
असेच एकदा शंकर पूर्णेवर गेले असता, त्यांना नदीतून ध्वनी संकेत येत असल्याचा भास झाला. काही वेळाने आवाज स्पष्ट आला.
” मी नदी प्रवाहात आहे. मला काढ व योग्य ठिकाणी स्थापना कर.”. दोन तीनदा तोच आवाज ऐकल्यावर त्यांनी माणसे जमवून नदीच्या पात्रात शोध घेतला. काही वेळाने कृष्णाची एक सुंदर मूर्ती हाती लागली. ती मूर्ती म्हणे काही वर्षांपूर्वी स्थान भ्रष्ट होऊन नदीपात्रात पडली होती.
बाल आचार्यांनी मोठ्या श्रद्धेने मूर्ती घरी आणली. आईच्या संमतीने घराजवळच मंदिराची उभारणी केली. मंदिर उभारणीसाठी लोकांनी सढळ हाताने द्रव्य सहाय्य केले. त्या मंदिरात विधीपूर्वक कृष्णमूर्तीची स्थापना करून नित्य पूजाअर्चेची व्यवस्थाही लावली.
आर्याबाला शंकराचा एक विशेष पैलू प्रकर्षाने जाणवला. आपला मुलगा कोणत्याही मोहाला बळी पडणारा नाही. राजा चंद्रशेखरने याला राजपुरोहित पद बहाल केले असते तरी, याने स्वीकारली नसते. एवढ्या लहान वयात केवढा हा मनोनिग्रह?
अलीकडे शेजारची छोटीशी गौरम्मा पाहिली की, तिला सून करून घेण्याची इच्छा तीव्र होत असे. एरवी पांडित्याच्या गोष्टी बोलणार्या शंकरासमोर लग्नाचा विषय काढला की तो गप्प बसत असे ; किंवा निघून जात असे. आर्याबा म्हणाली,
” अरे शंकर, अलीकडे मी शक्तीहीन झाले आहे. माझ्याच्याने सगळे काम होत नाही. पण हाताखाली सून आली तर मला थोडा आराम मिळेल.”.
यावर शंकर काहीच बोलत नसत. त्यांचे आपल्या आईवर निरतिशय प्रेम होते. तिचा कोणताही शब्द ते खाली पडू देत नसत. परंतु लग्नाचा विषय काढला की ते मूग गिळून बसत. ते स्पष्टपणे काही सांगत नव्हते.
शंकर वरून शांत दिसत असले तरी, त्यांच्या मनात अखंड विचार मंथन चालू असे. ते गुरुगृही असताना कित्येक विद्वान पंडित तसेच भारतभर यात्रा केलेले यात्रेकरू येत. त्यांच्या तोंडून भारतातील धर्म, राज्यस्थितीची समग्र माहिती शंकरला समजत असे. ती ऐकून आपला आर्य सनातन वैदिक धर्म अधोगतीला जात आहे. धर्माबद्दल अतिशय अनास्था वाढत चालली आहे. उलट बौद्ध, जैन धर्माचे अवडंबर मात्र माजले आहे. या धर्मांना बहुसंख्येने राजाश्रय मिळत असल्यामुळे त्या धर्माबद्दल लोकांच्या मनात आकर्षण वाढत आहे. कर्मकांडांच्या अतिरेकाला लोक कंटाळल्यामुळे भराभर धर्मांतर करीत होते.
सम्राट हर्षवर्धनने बौद्ध धर्माला उत्तेजन दिल्यापासून या धर्माचे प्राबल्य फारच वाढले होते. बौद्ध धर्मातही अनेक पंथ निर्माण झाल्याने तेही आपापसात झगडत असत. भिख्खु आणि भिख्खुणीमध्येही अनाचार वाढू लागला.
आपल्या हिंदू धर्मातही अनेक पंथ निर्माण झाले. शैव, वैष्णव ; शाक्त, गाणपत्य इत्यादी. त्यांचा आपापसातला वैरभाव वाढून ते हीन पातळीवर येत होते. धर्म व्यवस्थेच्या आणि धर्मसंवर्धनाच्या दृष्टीने हा फार मोठा धोका होता. ही सगळी देशकाल परिस्थिती ऐकल्यापासून बाल शंकराच्या मनात खळबळ सुरू झाली. काय करावे? कोणता मार्ग अनुसरावा? त्यासंबंधी शंकरांचे विचार चालू असत.
गुरुकुलातील शिक्षण संपवून कालटीला परत आल्यावर शंकरांच्या विचारांची दिशा बदलली. नुसते महापंडित होऊन मानसन्मान ; किंवा फक्त विद्याविभूषित होऊन कीर्तीचे शिखर गाठण्यापेक्षा वैदिक धर्मातील अनागोंदी कारभार दूर करून सार्थ सनातन वैदिक धर्माचे पुनरुत्थान करायला हवे. हे सोपे नव्हते. त्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणे, भारतभर भ्रमण करून लोकमानसात परिवर्तन करणे आवश्यक होते. आणि हे काम एकट्याचे नव्हते. त्यासाठी आपल्या विचारांशी समरस होणारी माणसे संघटित व्हायला हवी होती. देशकालीन समाजात अशी भीषण परिस्थिती असताना त्यांना लग्न संबंधात गुंतवून घेणे शक्यच नव्हते. त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग ठरवला होता.
मातेचा विवाहासाठीचा सततचा आग्रह पाहून तिला कसे समजावे? आपला जीवन मार्ग तिला पटेल अशा शब्दात सांगितल्या शिवाय गत्यंतर नव्हते.
वैदिक धर्माच्या उत्थापनास नुसती भ्रमंती, बुद्धी, उद्योगशीलता पुरेशी नव्हती. त्यासाठी परमार्थिक पाठिंबाचीही नितांत आवश्यकता होती. पारमार्थिक उंची वाढवण्यासाठी जप जाप्य, ध्यानधारणा करून भागणार नव्हते. त्यासाठी योग्य सद्गुरुला शरण जाऊन त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वादाची आवश्यकता होती. मोक्षगुरुच्या शोधार्थ गृहत्याग करणे भाग होते. माता अनुज्ञा देणे शक्यच नव्हते.
आर्याबाचा सूर्योदयापूर्वी पूर्णेवर जाऊन स्नान करण्याचा नियम होता. आज सूर्योदय होऊन बराच वेळ झाला तरी, माता परतली नाहीसे पाहून व्याकुळ शंकर तिचा शोध घ्यायला पूर्णेकडे निघाले. वय झालेले, शरीर थकलेली आर्याबा परत येताना रस्त्यात बेशुद्ध पडली होती. त्या भागात सहसा कोणी जात नसल्याने आर्याबाकडे कोणाचे लक्ष गेले नव्हते. शंकर तिचा शोध घेत असताना कण्हण्याचा आवाज ऐकून शंकर तिकडे गेले.
तिच्या चेहऱ्यावर जल शिंपडून तिला शुद्धीवर आणले.आणि आधार देऊन घरी आणून निजवल्यावर ते बाहेर जायला निघाले असता, आर्याबाने विचारले,
” शंकरा, कुठे निघालास?”
शंकर म्हणाले,– ” तुला विनासायास पूर्णास्नान घडविण्याची व्यवस्था करायला निघालोय!”
आणि शंकरने जलदेवतेची प्रार्थना सुरू केली.
जलदेवतेने शंकराची केलेली प्रार्थना ऐकली. रात्रभर धुवांधार पाऊस पडला. असे वाटत होते सारा कालटी गाव वाहून जातो की काय? दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला. आणि अघटित घडले. पूर्णा नदीने पात्र बदलले. ती शंकर नंबुद्रीच्या घराजवळून वाहू लागली. हा निसर्ग चमत्कार बघण्यास लोकांची गर्दी झाली.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ७.
शंकरांची मातृभक्ती व चमत्कार पाहून लोकांमधील चर्चा रंगतच चालली. सर्वजण शांकरची स्तुती करू लागले. काही वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले म्हणत, असे निसर्ग चमत्कार, घडामोडी चालूच असतात. हा निसर्ग ज्वालामुखी, महापूर, हिम वादळे, वादळवारे उत्पन्न करून इकडची दुनिया तिकडे करून टाकतच असते. पण जी वरिष्ठ ज्ञानी मंडळी होती, ज्यांना योग सिद्धीचे सामर्थ्य माहीत होते, ते म्हणाले, पूर्णाने पात्र बदलले ते केवळ त्या बाल आचार्यांच्या सामर्थ्यानेच. शंकर हा केवळ शास्त्र संपन्नच नव्हे तर योगी सुद्धा आहे. आर्याबाला पण याची खात्री केव्हाच पटली होती.
काही दिवसांनी त्रिपुरचे चार प्रख्यात ज्योतिषी शंकरच्या दर्शनासाठी आले. त्यांना या बाल ब्रम्हचार्याच्या कुंडलीमध्ये विशेष रस होता. आर्याबा कडून त्यांनी कुंडली मागवली. चौघेही पत्रिका पाहून अचानक गंभीर झाले. त्यांच्या मुद्रेवर शोककळा पसरलेली पाहून आर्याबा मनी चरकली. थरथरत्या आवाजात विचारले,
” काय आहे पत्रिकेत? काही अशुभ आहे का? काय लपवाताहात माझ्यापासून?”
” तसं काही नाही. हा पुत्र संपूर्ण विश्वात प्रसिद्धी पावेल. याचे सहस्त्रावधी अनुयायी असतील. पण.. पण…?”
” पण काय? ” आणि •••••
संभाषण चालू असतानाच शंकर तिथे आले व म्हणाले,
” पत्रिकेत मी अल्पायुषी असल्याचे सांगितले ना? “
शंकरला सर्व माहिती असल्याचे त्या ज्योतिषांच्या लक्षात आले. त्यातील एक जण म्हणाला,
” यांचा आठव्या, सोळाव्या आणि ३२ व्या वर्षी मृत्यू योग आहे. “.
आर्याबा म्हणाली,
” यावर काही उपाय नाही कां?”
” नाही देवी! तपश्चर्येने आठव्या वर्षीचा आणि दैवयोगाने १६ व्या वर्षीचा मृत्यू टळेल.”
आर्याबाने विचारले,
” ३२ व्या वर्षीचा? “
शंकर म्हणाले,
” नाही माते, तो कशानेही टाळणार नाही. वृषाद्री नाथांचा ‘वर’ आठव.”
शंकरचा निरोप घेऊन ते ज्योतिषी निघून गेले.
शंकराला आठवे वर्षे लागले. एक दिवस म्हणाले, ” माते, मला संन्यास धर्म स्वीकारण्याची अनुमती दे.”
हे ऐकताच आर्यबाच्या मस्तकावर जणू वज्राघात झाला.
” वृद्धापकाळात मला सोडून कुठे निघालास?” ” माते शोक आवर. माझे जीवन कार्य सामान्यांसारखे गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी नाही. आजची परिस्थिती पाहता, सनातन वैदिक धर्म वाचवण्यासाठी मला कार्य करायचे आहे. नाही माते, संसार बंधन मला संकल्पित कार्यात अडथळा निर्माण करेल. माझे आयुष्य कमी असल्यामुळे माझ्याकडे वेळ फार कमी आहे.”
” शंकरा, या उतार वयात संपूर्ण आर्यावर्तातल्या तीर्थांचे व देवांचे दर्शन घेण्याची माझी इच्छा कशी पूर्ण होईल? माझ्या मृत्यूनंतर माझे अंतिम संस्कार कोण करेल? अग्नि कोण देईल?”
” माते तू कोणत्याही वेळी माझे भावस्मरण केलेस की मी योग बळाने तात्काळ तुझ्याकडे येईल. त्याचवेळी तुझ्या इच्छेप्रमाणे प्रत्यक्ष देवतांचे दर्शन घडवून आणीन. तुझे अंतिम संस्कार मी स्वत: करेन.”
” पण संन्यास्याना नातीगोती नसतात ना?”
” तसं नाही माते. संन्यासाला त्याचे माता-पिता सदैव वंद्यच असतात. त्यांच्या संबधानातील कर्तव्य त्याला करावीच लागतात. माते संन्याशामुळे आत्मज्ञान मिळते. आत्मज्ञानाने मुक्ती मिळते. मुक्तीशिवाय जीवन व्यर्थ आहे. संन्यास घ्यायलाच हवा. जनहिताचे अभियान सुरू करायलाच हवे.”
आर्याबा म्हणाली,
” माझा निर्णय नंतर सांगते.”
तिला शंकरचे बोलणे पटत तर होते पण पुत्र प्रेम आडवे येत होते. शंकरांना आता जास्त वेळ गमावणे शक्य नव्हते. गृहत्याग करण्यासाठी मातेला न दुखवता संन्यास घेण्याची अनुमती कशी मिळवावी याचा विचार करू लागले. आणि त्यांना युक्ती सुचली….
प्रातःकाळी मातेबरोबर स्नानाला पूर्णवर गेले. स्नान करताना त्यांना पाण्यात मगर दिसली. योग बलाने आपला उजवा पाय पकडण्याची तिला प्रेरणा दिली. तिने शंकराचा पाय अगदी हलक्या पकडीने पकडून पाण्यात खेचले. शंकर मोठ्याने ओरडला. माते, मला वाचव. मगरीने माझा पाय पकडला आहे. शंकरांना अठव्या वर्षी मृत्युयोग असल्याचे माहित असल्याने तिने पाण्यात उडी मारायला निघाली. तोच इतर बायकांनी तिला घट्ट धरून ठेवले. ती आक्रोश करू लागली… अरे वाचवा… कोणीतरी माझ्या शंकरला वाचवा… त्याला मगरीने धरले आहे. पूर्णेच्या काठावर जनसमुदाय जमा झाला. परंतु पाण्यात उतरण्याची कोणी हिंमत करत नव्हते. शंकरांच्या प्रेरणांनी मगर त्याला पाण्यात घुसळत होती. मध्येच खेचून घेई, तर मधेच पृष्ठ भागावर आणीत असे. शंकर ओरडून म्हणाले, ” माते, मी काही आता वाचत नाही. तूं मला संन्यास घेण्याची अनुमती दिली तर कदाचित ही मगर मिठी सुटू शकेल.”
पुन्हा आर्ततेने म्हणाले,
” माते, लवकर अनुमती दे. नाहीतर मी काही वाचत नाही.”
” ठीक आहे बेटा. घे संन्यास.”
असे म्हणून ती मूर्च्छित झाली.
संन्यास घेण्याची अनुमती मिळताच मगरीने शंकरांचा पाय सोडला आणि ती निघून गेली. शंकर पूर्णातीरी आले. मांडीवर हलक्या जखमा झाल्या होत्या. आर्याबा हळूहळू शुद्धीवर आल्यावर शंकरांना जिवंत पाहून तिला आनंदावेग आवरेनासा झाला. भानावर आल्यावर म्हणाली …
” चल पोरा, आपण घरी जाऊ.”
” नाही माते, आता हे विश्वच माझे घर आहे. तू संमती दिल्यामुळे मी संन्यास घेतला. आणि संन्यासाला घर नसते. मी सर्वप्रथम पूर्णातीरी नव्याने कृष्ण मंदिर बांधणार. नंतर कालटीचा त्याग करणार.”
आर्याबा एकटीच घराकडे निघाली.
कालटी ग्रामवासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग देऊन श्रीकृष्ण मंदिर बांधले. मंदिर बांधून झाल्यावर मूर्ती पुढे हात जोडून डोळे मिटून शंकर उभे राहिले. अचानक त्यांच्या तोंडून काव्यरचना स्रवू लागली….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ८.
नवीन बांधलेल्या कृष्ण मंदिरातील मूर्तीसमोर बाल शंकर नेत्र मिटून उभे राहिले आणि त्यांना काव्य स्फुरले…..
” अच्युतं केशवं रामनारायणं।
कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि।
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं
जानकी नायकं रामचंद्र भजे।।”
अशा काव्यांद्वारे शंकरांनी अष्टके रचली.
संन्यास ग्रहण करण्यासाठी योग्य मुहूर्त काढण्यात आला. संन्यास ग्रहण करण्यापूर्वी या बाल आचार्याने स्वतःचा श्राद्धविधी केला . कारण सन्यास घेताना स्वतः चे श्राद्ध स्वतः च करावे लागते. …… त्यामुळे नातेसंबंध तुटले. आता त्यांना कोणते सुतक अगर सोयर पाळण्याचे बंधन राहिले नव्हते.
सर्वसंगपरित्याग कायमचा असल्यामुळे, ब्राह्मण्यदर्शक शिखा व जानवे याचाही त्यांनी त्याग केला. भगवी छाटी परिधान केली. हाती दंड, कमंडलू घेऊन अत्यंत शुचिर्भूत वातावरणात मंत्राच्या जयघोषणात या बाल आचार्याने सन्यासामात प्रवेश केला. हा आश्रम स्वीकारल्या बरोबर क्षणही वाया न घालवता ; आयुष्य अल्प व कामाची व्याप्ती विशाल असल्यामुळे अखंड कार्यात झोकून द्यायला हवे त्याचे भान कुमार संन्यासाला होते.
नियमाप्रमाणे तीन घरी भिक्षा मागून कालटीचा मुक्काम हलवायचे ठरवले. भिक्षापात्र घेऊन ते नंबुद्रीच्या दारासमोर आले. आणि “ॐ भवति भिक्षां देही ” उच्चारले. साश्रू नयनाने माता आर्याबा भिक्षा घेऊन बाहेर आली. आज तिच्या जीवनातला केवढा कठोर व कठीण क्षण होता? घरच्या मालकाला, कुलदीपकाला ज्याने भरभरून लोकांना द्यावे, तोच आज झोळी पसरुन उभा होता. सारेच विलक्षण, अघटीत होते. तिचा ऊर अनंत भावनांनी भरून आला. अत्यंत संयमाने म्हणाली,
” माझा मातृभाव तुला सुख भिक्षा वाढत आहे. तू सदैव सुखात राहावा हा माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील. पण वत्सा, तू दिलेले वचन विसरू नकोस. माझे अंत्यसंस्कार तुलाच करायचे आहेत. “
बाल संन्याशांनी नतमस्तक होऊन मातृदेवतेच्या चरण कमलाचे दर्शन घेतले. मातेच्या मुखाकडे पाहण्याचे त्यांना धाडस नव्हते. माया, मोह, ममतांचा उद्रेक मनात कल्लोळ निर्माण होण्यापूर्वी कुमार संन्यास्यांनी घराकडे पाठ फिरवून संथ पावलांनी आपले ध्येय गाठण्यासाठी कालटी सोडून भ्रमंतीस निघाले. त्यांच्या पाठमोरा आकृतीकडे डोळे भरून पाहत होती हळूहळू दूर जाणारी शंकराची आकृती लहान लहान दिसण्याऐवजी ती मोठी विशाल भासत होती.
माझा बाळ मोठा होणार, अलौकिक होणार, द्विग्विजय गाजवणार. तिने धन्यतेने डोळे मिटले. माझा पुत्र देवपुत्र तर होताच आता धर्मपुत्र होणार या भावनेने ऊर भरून आला.
कुमार संन्याशाची मार्गक्रमणा सुरू झाली. कुठे जायचे ठरले नव्हते. अंतःप्रेरणेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांच्या हृदयात अंगिकारलेल्या कार्याबद्दल जाणीव आणि जिद्द ; व भगवंतावर अढळ श्रद्धा हेच त्यांचे बळ होते. आंतरिक शक्तीचा अनुभव ते घेत होते. त्यांची दृष्टी डोळस, विशाल होती. वाटेत लागणारी गावे, लोक, लोकांच्या मनाचा गोंधळ, त्यांचे झालेले अस्थिर जीवन ते अवलोकन करीत होते. खरा वैदिक धर्म इतर पंथियाच्या प्राबल्यामुळे धुरकटला होता. जनसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. वैदिक धर्माबद्दल लोकांच्या मनात आस्था निर्माण करणे आजच्या काळाची गरज होती. इथे आलेले ख्रिस्ती, यहुदी, मुसलमान हे धर्माचार्य आपला धर्म महान व इतर धर्म विशेषतः हिंदू धर्म वाईट कसा आहे याचा प्रचार मोठ्या अट्टाहासाने करीत होते. हे सर्व लवकरच बदलायला हवे असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले.
भ्रमंती करत हे बालस्वामी कावेरीतील तीरावरच्या श्रीरंगपट्टणमला आल्यावर कावेरी मध्ये स्नान केले. मंदिरात जाऊन श्रीरंगाचे दर्शन घेतले. अंतःप्रेरणेने ते तिथेच पद्मासन घालून ध्यानास बसले. प्रत्यक्ष भगवान अच्च्युत त्यांचे समोर प्रगट झाले. त्यांनी या कुमार संन्याशाच्या देहाचा कण न् कण ईश्वरी शक्तीने व्यापून टाकला.
अधून मधून प्रवासात अडचणी येत होत्या. पण ईश्वरनिष्ठा, देश बांधवांच्या उन्नतीचा विचार, वैदिक धर्माबद्दलची आस्था हे त्यांच्या सोबतीला असल्यामुळे यात्रा सुकर होत होती.
गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र आल्यावर शिवलिंगा पुढे उभे राहून या कुमार संन्याशाने मनोमन प्रार्थना केली.
” हे सांब सदाशिवा! मी ज्या हेतूने घराबाहेर पडलो, त्याचे साफल्य तुझ्याच हाती आहे. हे उमावल्लभा, मी केवळ विद्या संपादन केली म्हणून तज्ञ आहे असे नाही. मार्गदर्शनाची गरज असते. हे उमावल्लभा, सद्गुरु भेटीसाठी तळमळत आहे. गुरुमाऊलीला भेटल्याशिवाय मला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. माझ्या धर्मकार्यात यश येणार नाही. आता आणखी अंत पाहू नकोस. मला सांग, माझे सद्गुरु मला कुठे भेटतील ? “
ऊन, वारा, पाऊस, तहानभूक कशाचाच विचार न करता या बाल संन्याशाचा प्रवास अथक पुढे पुढे चालला होता. गावाबाहेरच्या देवळात रात्री मुक्काम करावा. तीन घरी “ॐ भवति भिक्षां देही” करावी. भोवतालचा परिसर अवलोकन करावा. शक्य झाल्यास तिथल्या विद्वानांची भेट घेऊन त्यांचे बरोबर थोडेफार शास्त्राबद्दल बोलावे. पुढील प्रवासचे मार्गदर्शन घ्यावे. असाच दिनक्रम सुरू होता. गावातल्या काही लोकांना या कुमार संन्यासाला पाहून कौतुक वाटे ; तर काही कुत्सिपणे वाटेल तसे बोलत. कधी कोणी म्हणे, हा कोणी तरी बालयोगी असावासा वाटतो.
त्यांचा मुक्काम गोकर्णात असताना रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. एक दिव्य पुरुष त्यांच्या समोर येऊन म्हणाले,
” तुझे गुरु भगवन् गोविंद पूज्यपाद आहेत. त्यांचा निवास नर्मदातटी आहे.”
आणि ती दिव्य आकृती अंतर्धान पावली.
शंकरांना त्यांचे आश्रयस्थान समजले होते. ही दिव्य मूर्ती महादेव असेल का? की श्रीरंगपट्टणमचा भगवान अच्युत असेल? पुन्हा मनात आलं हा हरिहर भेद मनी आलाच कसा? त्यांनी तडक नर्मदा तीर गाठण्याचे ठरविले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ९.
हा बालस्वामी गोकर्णाच्या राजरस्त्यावरून जात असताना त्यांच्या कानी मागून हाक आली. वळून बघितले तर, कालटीतला त्यांचा सहाध्यायी मित्र विष्णू शर्मा होता. म्हणाला,
” अरे शंकर, तू अशा पोशाखात इकडे कसा?” आचार्य शंकर शांतपणे म्हणाले,
” मी संन्यास घेतला आहे. “
” काऽय? तू माझी चेष्टा तर करीत नाहीस ना? ध्रुवासारखे अरण्यात जाऊन तपश्चर्या करणार आहेस का? “
दोघे बोलत बोलत गावाबाहेरील मोकळ्या जागेवरील एका शिलाखंडावर बसले. आचार्य म्हणाले,
” संन्यासाचा अर्थ वनात जाऊन तप करणे एवढा संकुचित नाही. मी कर्मफलसंन्यास घेतला आहे. याचा अर्थ कर्मत्याग नव्हे, तर सतत कार्यरत राहणे आहे. देव ; देश, आणि धर्मासाठी कार्यरत राहिल्याने अशा संन्यासामुळे त्याला कर्म व कर्मफळ बाधक होत नाही.”
विष्णू शर्मा म्हणाला,
” अरे शंकर, तुझे वय तरी काय?”
” शुभ कार्य करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. जेव्हा प्रेरणा प्रबळ होते, विचार भावना प्रबळ होतात त्याच क्षणी पुण्यकार्यार्थ सिद्ध व्हावे. झोकून द्यावे.”
विष्णू शर्मा म्हणाला.
” पण माझ्या माहिती प्रमाणे आधी गृहस्थाश्रम, नंतरच संन्यासाश्रम स्वीकारता येतो.”
आचार्य म्हणाले,
” तुझं म्हणणं बरोबर आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थानंतरच संन्याश्रम असे क्रमवार आश्रम आहेत.. विष्णू शर्मा, वर्णव्यवस्था समाजाच्या कल्याणासाठी समाजाने केलेली निर्मिलेली व्यवस्था आहे. आम्हीच तयार केलेले नियम कसे पाळायचे हे ठरवण्याचा अधिकारही आपलाच आहे.”
” आणि मर्यादा उलंघण्याची जिथे आवश्यकता असेल तिथे योगेश्वर कृष्णाप्रमाणे मर्यादा तोडता येतात. समाज संघटन, समाजाच्या अस्तित्वाची जपणूक व व्यवस्था आणि नियम ही केवळ साधने आहेत
. विष्णू शर्मा म्हणाला,
” मग तू गृहस्थाश्रम स्वीकारणार नाहीस?”
” अरे, त्यात अडकण्यास सवडच कुठे आहे? अरे विष्णू, कार्याची व्याप्ती मोठी आणि आयुष्य कमी. शिवाय या बौद्धांनी संन्यासांचे स्वरूप विकृत केले आहे. ते मला सुधारायचे आहे. आज बौद्धांचे अंधानुकरण पुष्कळसे हिंदू करत आहेत. त्यांच्यापुढे सन्यास धर्माचा खरा आदर्श प्रत्यक्ष आचरण करून परखडपणे मला दाखवायचा आहे.”
विष्णू शर्मा भारावल्या स्वरात म्हणाला,
” शंकर, तू खरच फार मोठे कार्य आरंभले आहेस. आता तुला या संन्याश्रमात नातेबंधन नाही की, कोणी जवळचे किंवा परके नाहीत. तू आमच्यापासून दूर झालास.”
शंकर म्हणाले,
” मी दूर झालेलो नाही. ह्या संन्यास धर्मात वेगळेपणा नाही, तर सर्वांना आपलंसं करून घेण्याचा धर्म आहे. इथे विरक्ती नाही तर अनुरक्ती आहे. ह्यात आसक्ती बंधन आहे. संकुचितपणा नाही तर विशालता आहे. व्यक्तीसाठी समाजाचा त्याग नाही तर समाजासाठी व्यक्तीचा अनुराग आहे.”
विष्णू शर्मा विचार करत होता,
” हा शंकर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण याचे विचार किती प्रौढ आहेत. याचे ज्ञान, धाडस सारेच अलौकिक आहे.”
शंकरांचे ते ज्ञानगर्भ बोलणे, ठरवलेला जीवनमार्ग आणि त्या अनुषंगाने होत असलेली वाटचाल पाहता, विष्णू शर्माने ठरवले आपणही शंकराची सोबत धरायची. त्याचे सहप्रवासी व्हायचे.
तो म्हणाला,
” शंकर, मीही तुझ्या मार्गाने येणार.”
विष्णू शर्मात झालेले परिवर्तन पाहून कुमार संन्यासांना आनंद झाला. तरी त्याला टटोलण्यासाठी ते म्हणाले,
” विष्णू माझी गोष्ट वेगळी आहे. माझे जीवन “अग्रे वन्हिः पृष्ठे नानुः” असे आहे. मला यातच निरातिशय आनंद प्राप्ती होते. मला वारंवार साक्षात्कार जाणवतो……”
” अहं निर्विकल्पौ निराकाररुपो।
विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेद्रिंयांणि।”
माझे ठिकाणी विकल्प नाही. निरपेक्ष व्यापकता असल्याने मी सर्वत्र समान आहे. मुक्त स्वरूप असल्यामुळे माझ्या बाबतीत ; बंधन किंवा मुक्तता यांना अवसरच नाही. मी चैतन्य, आनंद स्वरूप शंकर आहे.”
” हे खडतर जीवन तुला झेपेल का? याचा पूर्ण विचार कर. नाहीतर तुझी फटफजिती त्रिशंकू सारखी होईल. ना अरत्र ना परत्र.”
विष्णू शर्माचा निश्चय दृढ झाला होता. त्यामुळे मनाची चलबिचल होण्याचा प्रश्नच नव्हता. शंकराचार्यांना वाटले, मी स्वीकारलेल्या जीवनपथावर असेच प्रवासी येऊन मिळाले तर पुरातन वैदिक धर्म उजळून निघाला वेळ लागायचा नाही.
त्यांचा प्रवास उत्तरेकडे सुरू झाला. भार्गवभूमी सोडून कोल्हापूर जवळ येत होते. हिंदू धर्मात अनेक पंथ निर्माण झाल्याने एकमेकांशी कट्टर शत्रू सारखे लोक वागत होते. वैष्णव व शैव यांचे मधून तर विस्तव जात नव्हता. आदिशक्तीपीठात तर शाक्त पंथीयांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्रत्यक्ष आदिमातेचे सामर्थ्य विसरून ग्राम्यदेवता आवई जोखाई, मरीआई असल्या उपदैवतांच्या अघोरी रुढीमुळे पशुबळी, नरबळी देण्यात लोक धन्यता मानू लागले होते.
ही परिस्थिती पाहून आचार्यांचे मन अतिशय कष्टी झाले. आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या वरद लक्ष्मी अंबाबाईच्या परिसरातच ही स्थिती ; तर अन्यत्र कशी असेल? हा विचार न केलेलाच बरा.
अशा वातावरणात परकीय धर्माचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. हे होऊ नये यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा. त्यांनी अंबाबाईंला या कार्यासाठी बळ देण्याची याचना केली. पंचगंगेचे स्नान करून शंकर आणि विष्णू शर्मा — कृष्णा काठच्या नृसिंह वाडीस ( नरसोबाच्या वाडीत ) आले. गुरु दत्तात्रयांच्या स्मरणाने त्यांचे अंत:करण आनंदाने मोहरले गेले. त्यांनी प्रार्थना केली.. “अवधूत पर ब्रम्ह संसारार्णवतारकम्।
दत्तात्रेयमहं वंदे भक्त्याऽऽन्द विवर्धनम्।।”
नंतर दोघे नाशिकला पंचवटीत प्रभू रामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आले. गोदावरीचे स्नान करताना मनी विचार, सिहालोकन करू लागले….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – १०.
बालसंन्याशाची जी भ्रमंती कालटीच्या पूर्णेपासून सुरू झाली. त्यानंतर श्रीरंगपट्टणची कावेरी ; गोकर्णाची तुंगभद्रा, कोल्हापूरची पंचगंगा, नृसिंहवाडीची कृष्णा आणि आता ब्रह्मगिरी कन्या गोदावरी. या सर्व पवित्र नद्यांचे स्नान झाले. सारे जलतत्त्व एकच. त्र्यंबकेश्वरी ज्योतिर्लिंगाचे दर्शन करताना त्यांना अलौकिक दर्शन झाले.
” सह्याद्रीशिर्शे विमले वसन्तं गोदावरीती पवित्र देशे।
सद्दर्शनात्पातकमांशु नाश प्रयाति तं त्रंबकमीश मीडे”
अर्थात यात भगवान श्रीशंकर त्र्यंबकेश्वर महादेवाची स्तुती होती. पुढे वेरूळची अप्रतिम लेणी पाहताना पाषाणाला सजीवत्व देणाऱ्या अज्ञात कलावंतांना मनोमनी नमस्कार केला. तिथे ज्योतिर्लिंग श्रीघृष्णेश्वराचे दर्शन घेऊन प्रार्थना म्हटली…
” एलापुरी रम्य शिवालयेऽ स्मिन समुल्लसन्तं
त्रजगद्वरेण्यम्
वन्दे महोदार-तर स्वभावं सदाशिवं तं धीषणेश्वराख्यं”
इथल्या महादेवाची प्रेरणा घेऊन वेगाने प्रवास सुरू झाला. विष्णू शर्मा शंकराचार्याच्या दिनक्रमात चांगलाच रुळला होता. आपण या शंकरा बरोबर आल्याने आपली दृष्टी किती विशाल, व्यापक बनत चालली आहे ; आपल्याला तर वैदिक धर्म लयाला जात असल्याची जाणीवही नव्हती. माझे अहोभाग्य म्हणून गोकर्ण क्षेत्री शंकराची गाठ पडली. त्यामुळे माझे जीवनाचे सार्थक तरी झाले.
प्रांता मागून प्रांत मागे पडत होते. ही जोडी आता नर्मदा जवळ करीत होती. गुरुदर्शनासाठी व्याकुळलेला कुमार संन्यासी अच्युत नारायणाचे स्मरण करत मार्गक्रमण करीत होता. अखेर दोघेही पतीत पावन नर्मदा मैयाजवळ पोहोचले.
दोघेही मेकल कन्या नर्मदेत स्नानास उतरले. शंकरांना या नर्मदा स्पर्शाने वेगळीच आत्मीयता, अनुभती जाणवली. तो जल स्पर्श जणू पूर्वजन्मीच्या स्मृति देत आहे असे त्यांना वाटले. स्वयंभू ज्योतिर्लिंग श्री ओंकारेश्वरांचे दर्शन घेत असताना, त्यांचे कानी गंभीर ध्वनी निनादला. आता तू योग्य ठिकाणी आला आहेस. या नर्मदा तीरी एका अनुपम्य अरण्यातील गुहेत ब्रह्मवेत्ता गोविंदयतीचे वास्तव्य आहे. तेच तुझे परम सद्गुरु आहेत.. ही देववाणी ऐकल्यावर शंकरांना आनंदाचे भरते आले. त्यांनी पुन्हा ओंकारेश्वरला नमस्कार करून स्तुती श्लोक म्हणायला सुरुवात केली
” कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जन तारणाय। सदैव मांधातृपुरे वसंत मोडःकारीमीरांम शिवमेकमीडे”
अमरकंटक पर्वतातून ही मेघलकन्या उगम पावून ओंकारेश्वर पर्यंत येते. या नर्मदातीरी माधांता बेटावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले शिवस्थान. या बेटाच्या एका बाजूने नर्मदा नदी तर हिचाच एक प्रवाह कावेरी नावाने दुसऱ्या बाजूने वाहते. या माधांता डोंगराच्या शेवटी दोन्ही प्रवाह एक होऊन अत्यंत रमणीय असलेले हे संगम स्थान. अशा या पवित्र स्थानी कुमार संन्यासी व विष्णू शर्मा गोविंदयतींच्या शोधार्थ हिंडत होते.
सारा निसर्गरम्य नर्मदा परिसर फिरत असताना एके ठिकाणी त्यांना निसर्ग चमत्कार पाहायला मिळाला. जन्मजात हार्डवैर असलेले पशुपक्षी निर्भयपणे वावरत होते. एकमेकांशी खेळत होते. कुमार संन्यासांना वाटले इथे नक्कीच कुणीतरी पुण्यपुरुषाचा वास असला पाहिजे. त्यांच्याच पुण्याईचाच हा प्रताप असावा. त्याशिवाय का हे प्राणी वैरभाव विसरुन खेळत आहेत? इथेच तर माझ्या सद्गुरूंचा निवास नसेल ना? त्यांनी चौफेर नजर फिरवली. जवळच उंचवटेवजा एका लहान डोंगर पायथ्याशी आश्रम असल्याचा भास झाल्याने शंकर विष्णू वर्मासह तिथे गेले. तिथे गुहा होती. गुहेच्या अरुंद दाराशी कुटीवजा आश्रम असून सभोवताली अनेक ऋषीमुनी बसलेले होते.
कुमार संन्याशांस अंतःप्रेरणा झाली…. हे स्थान माझ्या सद्गुरूचेच आहे. शंकराचार्य गुहेकडे जाताना बघून तिथला एक ऋषी म्हणाले ,
” हमारे गुरुदेव समाधिस्थ है। तुम नही जा सकते। “.
गुरुकडे पाहून शंकराचार्यांनी वंदन केले. व त्या गुफेला म्हणजेच पर्यायाने डोंगराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. अत्यंत भावपूर्ण शब्दात सद्गुरुची स्तुती करू लागले..
” नारायण। जय गोविंद हरे। नारायण। जय गोपाल हरे करुणा पारावर वरुणालय गंभीर।
नारायण नारायण जय गोविंद हरे।।”
प्रार्थनेचा हा आर्त गंभीर ध्वनी ऐकून समाधीस्थ असलेले गोविंदयती हर्षातिरेकाने म्हणाले,
” आला रे आला. माझे शिष्यत्व पत्करणारा आला.”
तिथे त्यांचे जवळ काही शिष्य व गोविंद यतींचा पुत्र भर्तृहरि होते. गोविंदयतींचे बोलणे ऐकून, ते सर्व शाशंकित आणि चकित झाले. ते पाहून गोविंदयती म्हणाले,
” प्रत्यक्ष भगवान अच्युताने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, तुझ्याकडे एक तेजस्वी ; ज्ञानगर्भ कुमार संन्यासी येणार आहे त्याला अनुग्रह दे. तेव्हापासून मी त्याची मोठ्या उत्कंठेने वाट पाहतो आहे .आता जो श्लोकध्वनी आला होता, नक्कीच कुमार संन्याशाचा असावा.”
असे म्हणून ते त्वरेने बाहेर आले.
बाहेर बसलेल्यांना अत्यंत आश्चर्य वाटले की, गुरुदेवांची ही समाधीची वेळ असताना अवेळी बाहेर कसे आलेत?
कुमार संन्यासी आणि यतींची दृष्टादृष्ट होताच एकमेकांना एकमेकांचे हृदय स्पंदन जाणवल्याबरोबर शंकराचार्यांनी त्यांच्या पायावर झोकून दिले. व नेत्रातून त्यांचे पायावर अश्रू अभिषेक केला.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.

