41. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके भाग १, (१ ते ५)
पनवेल पासून आठ किलोमीटर वर शिरढोण गाव आहे. शिरढोणचा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार अनंत रामचंद्र फडके होते. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला. आणि इंग्रजांची वक्रदृष्टी कर्नाळा किल्ल्याकडे वळली. हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता.
कर्नल प्रोथेरने आपल्या सैन्यसह किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्यावर निरोप………………………….
==================== भाग – १ ====================
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!
भाग – १.
पनवेल पासून आठ किलोमीटर वर शिरढोण गाव आहे. शिरढोणचा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार अनंत रामचंद्र फडके होते. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला. आणि इंग्रजांची वक्रदृष्टी कर्नाळा किल्ल्याकडे वळली. हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता.
कर्नल प्रोथेरने आपल्या सैन्यसह किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्यावर निरोप पाठवला, पांढरे निशाण घेऊन खाली या. किल्ला खाली करा. निरोप ऐकताच अनंतरावांचा संताप संताप झाला. त्यांनी किल्ला लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु सशस्त्र आणि आधुनिक सैन्यकांपुढे मूठभर अनंतरावांच्या सैनिकांचा निभाव लागला नाही. तीन दिवसातच युद्ध संपले. पराभूत अनंतरावांना हात बांधून खाली उतरावे लागले. हा पराभव त्यांच्या फार जिव्हारी लागला.
अनंतराव शिरढोणला आपल्या घरी आले. त्यांची सांपत्तीक स्थिती उत्तम होती. त्यांनी बसून खाल्ले असते तरी कमी पडणार नव्हते. परंतु स्वस्थ बसणे त्यांना शक्य नव्हते. फावल्या वेळात ते बुद्धिबळ खेळत. त्यांना वृक्षारोपणाची फार हौस. ते नुसते रोपण करूनच थांबत नसत, तर त्यांची व्यवस्थित निगा पण ठेवीत असत. अनेक फळबागांची त्यांनी निर्मिती केली होती.
१८२१ मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. नाव बळवंत ठेवले. यथा योग्य समयी बळवंतरावांचा विवाह कल्याण मधील सधन गृहस्थ विश्वनाथपंत बोरगावकरांची मुलगी भिकूताई बरोबर झाला. सासरी आल्यावर भीकूताईचे नाव बदलून सरस्वती ठेवण्यात आले. बळवंतराव आणि सरस्वतीबाई दोघेही एकमेकांना अनुरूप होते. या दाम्पत्याला कार्तीक शुद्ध पंचमी शके १७६७, ४ नोव्हेंबर १८४५ ला पुत्ररत्न प्राप्त झाले. बाळ खूपच गोंडस, गोरे पान, भरपूर जावळ, निळे तेजस्वी डोळे असलेले होते.
बाळाचे नाव “वासुदेव” ठेवण्यात आले. वासुदेव कले कलेने वाढत होते. आपल्या बाललीलांनी ते सर्वांचे मनोरंजन करीत होते. नातवाच्या बाललीला पहात अनंतरावांचे दिवस कुठे मावळतो हे कळत नव्हते. ते लाडाने वासुदेवला “छकड्या” म्हणत. कारण वासुदेवना छकड्यावर बसायला आवडत असे. त्यांची प्रकृतीही निकोप, निरोगी, उत्तम होती. चार वर्षाच्या वयात ते पाऊण शेर दुध सहज पित असत. त्यांच्या बाललीला आणि अवखळ चुलबुला स्वभावामुळे तो सर्वांचाच लाडका झाला होता. वाढत्या वयाबरोबर त्याचा हूडपणाही वाढू लागला. काही दिवसांनी आईबरोबर कल्याणला आजोळी आले. स्वतःची आई व मामाची आई असल्यामुळे नुसती आई म्हणून हाक मारली की, कोणत्या आईला हाक मारली हे कळायचे नाही. त्यामुळे वासुदेवने त्यावर तोडगा शोधून काढला. आपल्या आईला भिकूताई किंवा सरस्वती व मामाच्या आईला, मामाची आई म्हणून हाका मारू लागला. त्याच्या हाका ऐकून आजोबा विश्वनाथपंताची हसून हसून पुरेवाट होत असे.
एकदा मुसळधार पाऊस सुरू होता. उल्हास नदीला मोठा पूर आला होता. कल्याणात पाणी शिरले होते. वाड्यापर्यंत पाणी आले. अशातच वासुदेवचा पत्ता नव्हता. त्याची आई सरस्वती बाईंनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. काय करावे सुचत नव्हते. त्यांनी आपल्या वडिलांकडे चौकशी केली. ते म्हणाले, कुठे जाईल असेल इथेच कुठेतरी. दिवसभर खोडकरपणा करीत असतो. रडवेली सरस्वतीबाई त्याला शोधायला म्हणून बाहेर निघणार, तोच मागून आऽईऽ म्हणून हाक आली. तिने मागे वळून बघितले तर वासुदेव हसत उभा होता. सरस्वती बाईने त्याला आपल्या मिठीत घेतले. अरेऽ छकड्या, कुठे गेला होतास रे? का माझा जीव खातोस? अंत पाहतोस?
अगं आई! मी कुठेच गेलो नव्हतो. इथेच हंड्या मागे लपून बसलो. जरा तुझी गंमत केली. त्याला कवटाळून सरस्वतीबाई म्हणाल्या, छकड्या, यानंतर अशा प्रकारची जीवघेणी गंमत करत जाऊ नकोस.
कल्याणहून आपल्या घरी शिरढोणला आल्यावर आजोबा अनंतरावांनी आपल्या नातवाला बोकडाची नवी गाडी करून दिली. गाडीला बोकड जुंपून वासुदेव गावभर हिंडत असे. छकड्या नाव स्वार्थ केले.
वयाच्या सहाव्या वर्षी वासुदेवरावांची मुंज झाली. सातव्या वर्षी त्यांनी धूळपाटीवर अक्षरे गिरवली. वासुदेवचे लक्ष अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत व व्यायामात जास्त असे. त्यावेळी शिरढोणमध्ये शिक्षणाची सोय नसल्यामुळे वासुदेवला मामाकडे कल्याणला ठेवण्यात आले. कल्याण मधील सरकारी शाळेत नाव घालण्यात आले. शिरढोणला जाण्यासाठी सुट्टीची अगदी आतुरतेने वाट पाहत असे.
९२ वर्षाचे अनंतराव वृक्षारोपण करतेवेळी पडले. मांडीचे हाड मोडले. काही दिवसांनी बरे झाल्यावर पायी चालणे शक्य नसल्यामुळे, त्यांच्यासाठी डोली बनवून घेतली. डोलीत बसून ते आपली वृक्षारोपणाची हौस पुरवून घेत होते.
क्रमाशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – २ ====================
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!
भाग – २.
सकाळ झाली की, पूजेसाठी फुल आणण्याचे काम वासुदेवरावच. देवाचे फुल तोडून होताच वासुदेव आईला म्हणाला, सरस्वती, आम्ही आता आमच्या गाडीने फेर फटका मारून येतो. आई म्हणाली, आता बाहेर जायचे नाही. अक्षर गिरवत बैस. आज फिरून येतो. उद्या बसतो.
आजोबांच्या सतत सोबत असलेल्या अण्णांना चालता येत नसल्यामुळे वासुदेवबा फार वाईट वाटत असे. कसातरी दोन-तीन दिवस घरात थांबला. परंतु पाचव्या दिवशी बैलगाडीत बसून निघाला. घरातील मोठी माणसे पनवेलला गेली होती. सदाशिवराव काकांची पत्नी माहेरी गेली होती. कल्याणहून अण्णा ची विचारपूस करण्याकरता आलेला सरस्वतीचा भाऊ महेशच फक्त घरात होता. पूर्ण दिवस संपला. संध्याकाळ झाली तरी वासुदेव घरी आला नव्हता. वासुदेवाच्या काळजीने देवघरात बसून सरस्वतीदबके हुंदके देऊ लागली. मामा मोरेश्वरने सगळीकडे शोध घेतला पण वासुदेवाचा पत्ता नव्हता. तेवढ्यात वासुदेव मागच्या दाराने आला. आई रडत असलेली बघून त्याला कसंसचं झालं. तो धावत येऊन आईच्या गळ्यात पडला. आईने त्याला जवळ ओढून घेतले. म्हणाली, किती छळतोस रेऽ वासुदेवाऽ?
वासुदेव दहा वर्षाचा झाला. वयाबरोबर उनाडपणाही वाढला. झाडावर चढणे, घोड्यावरून रपेट मारणे, गाडी पळवणे करू लागला त्याचे शिक्षणात अजिबात लक्ष नव्हते. त्यामुळे वडील बळवंतराव त्याच्यावर फार रुष्ट होते. अण्णांना वाईट वाईट वाटेल म्हणून ते वासुदेवाला कडक शिक्षा करीत नसे. वडिलांना चुकवण्यासाठी वासुदेव नेहमी अण्णांच्या बरोबर राहत. अण्णा पायाने अधू झाले असले तरी डोलीतून ते आमराई, काजूचे वन, माड पोकळीच्या रांगा, पाहायला जात. वासुदेव त्यांच्या सोबत असत.
दुपारी सगळी मंडळी जेवायला बसली. वासुदेवही होता. बळवंतराव वडिलांना म्हणाले, अण्णा, तुम्ही वासुदेवला पाठीशी घालता म्हणून तो जास्त शेफारला आहे. अण्णा, वैभवाचा काळ गेला. आता फक्त नाव राहिले. हा शिकला नाही तर उदरनिर्वाहाचं काय?
अण्णा, म्हणाले वासुदेव, तुझे वडील बरोबर बोलत आहेत. ते सांगतात तसे वाग. माझे काय? मी पिकले पान. आज आहे उद्या नाही. तेवढ्यात भाजी वाढायला आलेल्या सरस्वतीबाई संकोच सोडून म्हणाल्या, मामंजी, भरल्या ताटावर बसून असे अभद्र बोलू नये. पतीकडे वळून म्हणाली, स्वारींनी जेवताना असे विषय काढू नये. बळवंतराव चिडून म्हणाले, वाऽ छाऽन! असेच लाड करून त्याला डोक्यावर चढवा म्हणजे, आम्हाला शरमेने मान खाली घालायला लागेल.
अण्णा कळवळून म्हणाले, नको रे असे बोलूस. वासुदेव कुळाचे नाव उज्वल करेल. माझे शब्द लक्षात ठेव.
जेवणं झाल्यावर बळवंतराव माडीवर गेले. वासुदेव धाकटा भाऊ कृष्णाला घेऊन अण्णांच्या खोलीत प्रवेशला. कृष्णा बोबड्या स्वरात म्हणाला, अण्णा छान छान गोष्ट सांगा. अण्णा म्हणाले, थोड्या वेळ खेळ. मग सांगतो. कृष्ण खेळात रमूनन गेला. अण्णांनी वासुदेवाला आपल्याजवळ बसून म्हणाले..
पोराऽ, तू बुद्धिमान आहेस. तुझ्याजवळ ताकद आहे .असे उनाडपणे आयुष्य घालवू नकोस. आयुष्यात खूप कामे करायची असतात. आपल्यासाठी काळ थांबत नसतो. वासुदेवा, संकटातही मान ताठ ठेव. इमानदारीने वाग. कुणासमोर झुकू नकोस.
अण्णांचे गंभीर शब्द ऐकून वासुदेवने मनाशी मनाशी निश्चय केला. त्यांच्या पायाला हात लावून म्हणाला, अण्णा, शपथ घेऊन सांगतो यानंतर वावगे वागणार नाही. उद्यापासून जोमाने अभ्यासाला लागतो. ऐकून अण्णांना आनंद झाला. म्हणाले, शाब्बास छकड्याऽऽ! जा खेळायला. वासुदेव कृष्णाला घेऊन बाहेर पडला.
अण्णांनी डोळे मिटले. थोड्यावेळाने त्यांच्या छातीत एकदम धडधडायला लागले. पायात पेटके येऊ लागले. जीवाच्या अंकाताने त्यांनी हाक मारली.. सरस्वतीऽऽ,
सरस्वतीबाई हाक ऐकताच धावतच आल्या. दारातूनच त्यांना सासऱ्यांची मान बाजूला कळलेली दिसली. त्यांनी जोराने मामाजींना बघावं म्हणून पतीला आवाज दिला. पत्नीच्या घाबरलेला स्वर ऐकून बळवंतराव धावतच खाली आले. पित्याकडे नजर जाताच त्यांनी ओळखले, आपले वडील आता आपल्याला पोरके करून या नश्वर देहाचा त्याग करून निघून गेले.
शेजारीबाजारी जमा झाले. वासुदेव थरथत आपल्या प्रिय आजोबाला स्थिर नजरेने बघत होता. अण्णांनी सन्यास घेतला असल्यामुळे त्यांचे पार्थिव तळ्याजवळ जमिनीत पुरून त्यावर समाधी बांधण्यात आली.
अण्णा गेल्यानंतर वासुदेव एकदम समंजस झाला. त्याच्यात आमुलाग्र बदल घडून आला. मन लावून अभ्यास करू लागला. घरातील कामेही करू लागला.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ३ ====================
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!
भाग – ३.
वासुदेव सुधारलेला बघून बळवंतराव म्हणाले, वासुदेवऽ, आपल्या शिरढोणला शाळा नसल्यामुळे शाळा शिकण्यासाठी मामांकडे कल्याणला राहायचे बरे का! दोन दिवसांनी वासुदेवने सर्वांना नमस्कार करून पिता-पुत्र कल्याणकडे निघाले. पिता-पुत्र कल्याणला पोहोचले तेव्हा रात्र झाली होती. वासुदेव सर्वांचाच लाडका असल्यामुळे तो आल्याचा आनंद सर्वांनाच झाला होता. आप्पांनी आपल्या नातवाला पोटाशी धरले. कल्याणच्या प्रायमरी शाळेत वासुदेवाचे नाव दाखल करून बळवंतराव शिरढोणला परतले.
वासुदेव नियमित शाळेत जाऊ लागला. अभ्यासात त्याचे मन रमले. गणित, भूमिती आवडू लागली. इंग्रजी भाषा बदलही त्याला प्रेम वाटू लागले.
बोरगावकर म्हणजे मोठे प्रस्थ! इमानदारी सोबतच पिढीजात श्रीमंती. वासुदेवाला कशाचीच कमतरता नव्हती. आजी आजोबांचा लाडका. व्यायाम सूर्यनमस्काराने शारीरयष्टी चांगलीच तगडी झाली. बुद्धिमत्तेचे तेज चेहऱ्यावर पसरले होते. त्याची भूमितीतील व गणितातील प्रगती पाहून त्यांचे शिक्षण केळकर त्याच्यावर खूश होते. त्यांनी विल्सन शाळेतील श्रीधर शास्त्री जांभेकरकडे त्याची फारच स्तुती केल्यामुळे वासुदेवाला इंग्रजी शिकवायला त्यांना संधी मिळाली.
ऑक्टोबर मध्ये शाळेला सुट्ट्या लागल्यावर वासुदेव शिरढोणला आला. वडील बळवंतरावांनी त्याच्या अभ्यासाची कसून चौकशी केली. त्यांचे समाधान केल्यावर वासुदेव म्हणाला, दादा, मी इंग्रजी शिकणार आहे. वडिलांनी बराच विरोध केला. परंतु वासुदेव आपल्या निश्चयावर कायम होता.
अशातच १८५७ साल उजाडले. उत्तर हिंदुस्थानात १० मे पासून खळबळ माजली. वासुदेव नुकताच शिरढोणला आला होता. संध्याकाळच्या वेळी गावात जेष्ठ मंडळी गप्पागोष्टी करायला वाड्यावर येत असत. उत्तर हिंदुस्थानातील वार्ता त्यांच्या चर्चेत असत. त्या गप्पा वासुदेवाच्या कानी पडत. राणी लक्ष्मी कशाप्रकारे लढते आहे? मंगल पांडेने दोन गोऱ्यांना गोळ्या घातल्यात, नानासाहेब पेशव्यांनी कानपूर घेतले. रावसाहेबांनी ग्वाल्हेर जिंकले.
एका गोऱ्याने राणी लक्ष्मीबाई वर मागून वार केला. पण लक्ष्मीबाईंनी त्याला मारूनचस्वतः मेली. तात्याला दुसरा नेपोलियन म्हणतात. अशा प्रकारच्या सर्व गप्पा वासुदेव लक्षपूर्वक ऐकायचा. हळूहळू उत्तरेकडचे वादळ शमू लागले.
१८५९ मध्ये तात्या टोपेंना फाशी देण्यात आली. नानासाहेब पेशवे बेपत्ता झाले. बाहादूरशहाला मंडालेला पाठवण्यात आले. अनेक संस्थांनीक मारले गेले. त्यांच्या संस्थानावरून गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता. वासुदेव कल्याणला शिकत असतानाच या गोष्टींचा त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होत होता. तो सरकारी शाळेत असतानाच मधल्या वेळात डॉक्टर विल्सन शाळेचे शिक्षक श्रीधर शास्त्री जांभेकर यांकडून इंग्रजीचे दोन बुक शिकला. वडील बळवंतरावांना इंग्रजी बद्दल तिरस्कार असल्यामुळे त्यांच्या अपरोक्ष वासुदेवने हे शिक्षण घेतले. मॅट्रिक परीक्षेचा निकाल लागला. उत्तम मार्कांनी पहिल्या श्रेणीत पास झाला. आनंदाने धावतच घरी आला.
बाहेरून ओरडतच मामाची आईऽऽ, मामाची आईऽऽ, अग माझा पहिला नंबर आला. इतकी मोठी वार्ता ऐकूनही आजीला आनंद झालं नसत्याचे बघून त्याचे बालमन नाराज झाले. विचारले, तुला आनंद झाला नाही?
अरेऽ आनंद झाला. पण वश्याऽऽ आता तूं इथे राहणार नाही म्हणून वाईट वाटते. अगंऽ! काळजी करू नकोस. इथून गेलो तरी तुला व अप्पांना भेटायला सरस्वती बरोबर येईलच.
वासुदेवाऽ अरेऽ, स्वरस्वतीला आई म्हणावं! अगंऽ! आई म्हणायची सवय नाही. आई म्हटले की कसेतरीच वाटते. मी सरस्वती किंवा भिकूताईच म्हणणार.
दुसऱ्या दिवशी वासुदेव शिरढोणला आपल्या घरी आला. लहान भाऊ कृष्णा, पांडुरंग, ताई आणि येसूही आपल्या दादाभोवती राहू लागल्या. आई सरस्वतीने त्याला प्रेमाने कवटाळले. आईच्या प्रेमळ स्पर्शाने वासुदेव भारावून तिला विचारले, मी तुला आई न म्हणता सरस्वती म्हणतो म्हणून माझा राग येतो का गऽ? नाही तू सरस्वतीच म्हणत जा. छान वाटते ऐकायला.
संध्याकाळी नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सर्व मुलांनी मोठ्यांना नमस्कार घातला. वासुदेव थोडा वेळ तिथेच रेंगाळला. ते पाहून वडिलांनी विचारले, का रेऽ, काही पाहिजे का? भीत भीत वासुदेवने विचारले, दादा, मला मुंबईला शिकायला ठेवाल? ठीक आहे. पण राहशील कुठे? दादा, तुम्ही फक्त हो म्हणा. होईलच काहीतरी सोय. ठीक आहे होऊ दे तुझ्या इच्छेप्रमाणे.
पित्याची परवानगी मिळताच धावतच तो आईला येऊन बिलगला. म्हणाला, मला दादांनी मुंबईला शिकायला जाण्याची परवानगी दिली. अरेऽ पण राहणार कुठे? तूच विचार कर की!
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ४ ====================
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!
भाग – ४.
सरस्वतीबाई काही वेळ स्तब्ध राहून विचार करत उभ्या राहिल्या. अनेक नावे, चेहरे डोळ्यासमोरून सरकले. आणि एका चेहऱ्यावर स्थीर झाले. म्हणाल्या, अरेऽ वासु तुझ्या राहण्याचे जमले बघ!
संध्याकाळची जेवणं झाल्यावर सरस्वतीबाई बैठकीच्यादाराआड येउन ऊभ्या राहिल्या. बळवंतरावांच्या लक्षात आले, पत्नीला काही बोलायचे आहे. विचारले, बोलाऽऽ! त्या हळूच म्हणाल्या, वासुदेवला आपण मुंबईला शिकण्याची परवानगी दिली ना? तर त्याची व्यवस्था फणसवाडीतील गोविंदराव करमरकरांकडे जमू शकेल.
अरेऽ, खरंच की! तो नाही म्हणणार नाही. उद्याच पत्र लिहून विचारतो. १८५९ मध्ये वासुदेवने नाना शंकर शेठच्या शाळेत प्रवेश घेतला. गिर गावातील जगन्नाथ चाळीतील १२६ सी क्रमांकाच्या खोलीत करमरकर कुटुंबासोबत राहू लागला. पण त्यांनी चारच महिन्यात शाळा सोडली. आणि पुण्याला जायचे ठरवले. पुण्यात पुना हायस्कूल मध्ये नाव घातले. तिथे पावणे दोन वर्षे इंग्रजीत प्राविण्य मिळवले. त्याची खूप प्रगती झाली. दादा त्याची चौकशी करण्याकरता वारंवार येऊ लागले. वासुदेवने व्यायाम, शिक्षणात लक्ष घातले. शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनाने त्याच्या बुद्धीचे पहलू चमकू लागले. परंतु फायनल परीक्षा न देताच शाळा सोडली. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले.
वासुदेव घरी शिरढोणला परत आला.
वासुदेवाऽ, परीक्षा न देताच का आलास? संतापून दादांनी विचारले. दादा, ज्या परीक्षेत मुलं वशिल्याने पास होतात त्या परीक्षेत मी लिहिणार नाही. अरेऽ मूर्खा, यामुळे तू स्वतःचे नुकसान करून घेतोस हे कसे तुला समजत नाही. दादा, मला तसा फायदा घ्यायचा नाही.
त्याचे निश्चयात्मक बोलणे ऐकून दादांना संताप तर खूप आला. पण त्याचा स्वभाव लक्षात घेता ते काहीच बोलले नाही. राग गिळून म्हणाले, आलाच आहेस तर घरचे येशूचे लग्न, कृष्णाची मुंज उरकल्यावर तुझ्या नोकरीचे बघू.
फडक्यांच्या इतमामाला शोभेल अशा थाटात समारंभ पार पडले. देणे घेणे मान पान यात बराच पैसा खर्च झाला. जमलेली नातलग मंडळी निघून गेली. घरचे व्यवहार सुरळीत सुरू झाले. बळवंतरावांची तिन्ही मुलं शिकत होती. घरातील कार्य आटोपताच फडके घराणे दुभंगले. बळवंतराव व सदाशिवराव दोघेही भाऊ विभक्त झाले. घरात पैशाची चणचण जाणवू लागली. एकत्र कुटुंब असेपर्यंत लक्षात येत नव्हते.
आर्थिक परिस्थिती पाहता बळवंतरावांना वाटायचे हातभार लावण्यासाठी वासुदेवने नोकरी करावी. ती सुद्धा जवळच. या विचाराने त्यांनी पनवेल मधील श्रीमंत व्यापारी विनप्पा खंडप्पा गुळव्याच्या पेटीवर नोकरी करण्याचे सुचवले.
वासुदेव स्पष्ट नाकार देत म्हणाला, दादा, मला नोकरी करायची नाही. आणि अशा एखाद्या पेठीवर जन्म काढण्याची माझी तयारी नाही. म्हणजे तू नोकरीच करणार नाहीस? करीनही. परंतु मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात. या छोट्या शहरात नोकरी केली तर लोक तुम्हालाच नावे ठेवतील. आणि मी नोकरी करता करता अस्तित्वहीन होऊन जाईल.
दादांना भयंकर संताप आला. पण आपला राग गिळून म्हणाले, ठीक आहे. तुझ्या मर्जीप्रमाणे होऊ दे. हा विषय इथे संपला.
बरं मुली सांगून येत आहेत. त्या तरी पाहणार आहेस का नाही? नंतर उगाच हसे व्हायला नको. ठीक आहे दादा. पाहिन मुली.
लवकरच मुली सांगून येऊ लागल्या. त्यावेळी मुलींचे वडील मुलगा पाहायला आले की. पुस्ती काढून दाखवायला सांगत. पुस्ती काढून काढून वासुदेव अगदी कंटाळून गेला. त्याकाळी त्याने तब्बल ३०० मुली बघितल्या. अखेर शिरढोण जवळील पाले गावच्या त्र्यंबक गणेश उर्फ दाजीबा सोमाणांची मुलगी त्याला पसंत पडली. सोमाणांची आर्थिक परिस्थिती फडके कुटुंबापुढे डावीच होती. परंतु वासुदेवला सुयोग्य पत्नी हवी होती. श्रीमंत नाही. या सई नावाच्या मुलीतील सौजन्य, शालीनता, व्यक्तित्व गुण पाहून त्याने सईला होकार दिला.
वयाच्या पंधराव्या वर्षी १० फेब्रुवारी १८६० मध्ये वासुदेवाचे लग्न झाले. आता ते वासुदेवराव झाले. विवाह झाल्यावर वासुदेवरावांनी मुंबईत जाऊन नोकरी करण्याचे ठरविणले. आई वडील म्हणाले वासुदेवा तुझे लग्न झाले इथेच राहिला तर घराला आधार होईल. घराची परिस्थिती लक्षात घे. वासुदेव म्हणाले, परवानगी दिली नाही तर निघून जाईल.
जा बाबाऽऽ, जा.. कुठेही खुशाल रहा. सरस्वतीबाई भरल्या गळ्याने म्हणाल्या. हीच परवानगी समजून वासुदेव मुंबईस निघाले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ५ ====================
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!
भाग – ५.
वासुदेव मुंबईला आले रेल्वे ऑफिसमध्ये वीस रुपये महिन्याने कारकुनाची जागा मिळाली. त्यांनी काम आत्मसात केले. परंतु तिथला हेडक्लर्क बळवंत येता जाता हाताखालच्या लोकांना सतत टोमणे मारत राही. हे वातावरण त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला सहन होणे शक्यच नव्हते. अशा वातावरणात त्यांना नोकरी करणे अपमानास्पद वाटत होते.
त्यांनी दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न सुरू केले. आणि त्यांना ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये लेखनिकाच्या जागेवर महिना तीस रुपयावर नियुक्ती मिळाली.
नियुक्तीपत्र घेऊनच वासुदेवराव ताठ मानेने कार्यालयात आले. सहकाऱ्यांशी बोलून ते आपल्या जागेवर येऊन बसले. हेडक्लर्क समोर असलेल्या हजेरीपटार सही न केल्यामुळे ते चिडले. शिपायला पाठवून वासुदेवरावांना बोलावले. समोर येताच कठोरतेने म्हणाले, फडके, ऑफिसमध्ये नियमाने वागायला हवे. तुमची नोकरी माझ्या कृपेवर टिकणार आहे हे लक्षात ठेवा.
बस… बस… जास्त बोलू नका. तुम्ही नेहमी म्हणता ना इथे माझी पाच रुपये मिळण्याचीही लायकी नाही. परंतु माझी बाहेर ३० रुपये किंमत आहे. बळवंतराव अतिशय चिडले. गेट आउट.. नॉन सेन्स… वासुदेवराव त्यांच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत म्हणाले, धमक्या कुणाला देता? सर्वजण तुमच्यासारखे खुशामद करणारे नसतात.
घाव अगदी वर्मी बसल्यामुळे, बळवंतरावांचा तोल गेला. त्यांनी वासुदेवरावांवर हात उचलला. म्हणाले, तुला नोकरीचे सर्टिफिकेट देणार नाही.
वासुदेवराव स्वाभिमानाने म्हणाले, मलाही तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. बळवंतराव म्हणाले, फडके, तुझा या महिन्याचा पगार मिळायचा आहे.
तो तुमच्या हाती असल्यामुळे बुडाला असे मी गृहीतच धरले आहे. असे म्हणून वासुदेवराव गर्कन वळले. आणि दमदार पावले टाकत ऑफिस बाहेर पडले.
वासुदेवराव ६० रुपये बुडले याची पर्वा न करता नवीन नोकरीवर रुजु झाले. सगळं सुरळीत चालू होते. परंतु त्यांना मुंबईची दमट हवा मानवली नाही. कधी त्यांना सर्दी पडसा झाला नव्हता तिथे दोन वर्षानंतर त्यांना अचानक ज्वर अंगात भरू लागला. कित्येक वेळा ज्वराने ते बेशुद्ध होऊ लागले. कित्येक तास बेशुध्दीतच जात असे. डॉक्टरांनाही निदान होत नव्हते. औषधे सुरू होती. मध्यंतरी शिरढोणला घरी गेले. थोडा तब्येतीत आराम पडल्यावर पुन्हा ते आपल्या कामावर रुजू झाले. पुन्हा ज्वर बळावला. औषधोपचाराने अखेर तीन महिन्याने ताप उतरला. अंगात अतिशय अशक्तपणा आला.
डॉक्टरांनी हवा पालटण्याचा सल्ला दिला. त्यांनी ऑफिसमधून दीर्घ रजा घेतली. व ते वाई, सातारा आणि पंढरपूर या ठिकाणी बराच काळ राहिले. मुंबईचे हवामान मानवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरीकड कडे कोरडे हवेच्या ठिकाणी नवी नोकरी शोधणे भाग होते. मुंबईत विनायकराव पराडकर नावाचे गृहस्थ वासुदेवरावांचे जवळचे वडीलधारे होते. ते एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांच्या ओळखीने पुण्याच्या काॅमिसरियट एक्सामिनरच्या कार्यालयात तीस रुपये पगारावर नोकरी मिळाली. वासुदेवरावांनी ग्रॅंट मेडीकल कॉलेजमधली नोकरी सोडली. मुंबईला कायमचा राम राम ठोकला. आणि १८६५ मध्ये पुण्याला आले. त्यावेळी पुण्यात जागा मिळण्याची फारच अडचण असायची. बऱ्याच प्रयत्नानंतर भिकारदास मारुती जवळ भट गुरुच्या वाड्यात त्यांना दोन खोल्या मिळाल्या. वासुदेवरावांनी शिरढोणला पत्र पाठवून जागा मिळाल्याचे वडिलांना कळविले.
एका आठवड्याने बळवंतरावांनी आवश्यक सामान व सून सईबाईला बैलगाडीने घेऊन आले. त्यावेळी वासुदेवराव ऑफिसमध्ये गेले होते. किल्ली भट गुरुजींकडे होतीच. त्यांना किल्ली दिली. बळवंतरावांनी गाडीवानच्या मदतीने सामान बिर्हाडात ठेवले. सईबाईंनी जवळच असलेल्या विहिरीवरून पाणी आणले. स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर प्रवासाने थकलेले बळवंतराव बाहेरच्या खोलीत झोपले. सईबाईही आतल्या खोलीत पाटाची उशी करून झोपल्या. त्यांनाही रात्रीचे जागरण व प्रवासाचा शीण आल्याने चांगली गाढ झोप लागली.
संध्याकाळी वासुदेवराव घरी आले. वडिलांना बघून आनंद झाला. औपचारिक बोलणे, ख्याली खुशाली विचारून झाल्यावर बळवंतराव म्हणाले, मी रात्री निघेन. परंतु एक गोष्ट बोलायची आहे. दादा, आपल्या मुलाजवळ बोलण्याचा कसला संकोच? अगदी मोकळेपणाने बोला. बळवंतराव म्हणाले,…
वासुदेवा आता घर पूर्वीसारखे राहिले नाही. सदाशिव वेगळा झाला. आतापर्यंत झालेल्या कार्यामध्ये भरपूर खर्च झाला. उत्पन्न अगदी बेताचेच. तू आपल्या भावंडांना शिकवावे अशी इच्छा आहे. दादा, ते माझे कर्तव्यच आहे. तुम्ही काळजी करू नका.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.












