41. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके भाग ३, (११ ते १५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

पनवेल पासून आठ किलोमीटर वर शिरढोण गाव आहे. शिरढोणचा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार अनंत रामचंद्र फडके होते. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला. आणि इंग्रजांची वक्रदृष्टी कर्नाळा किल्ल्याकडे वळली. हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता.
कर्नल प्रोथेरने आपल्या सैन्यसह किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्यावर निरोप………………………….

भाग 11
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – ११.
वासुदेवराव जरा जरबेच्या आवाजात म्हणाले, गोपिकाऽऽ, बाहेर लोक उपासाने पटापट मरताहेत. आणि तुम्ही फक्त आपल्या घराची काळजी करता, हे योग्य नाही.
ओशाळून त्या म्हणाल्या, होय! चुकलेच माझं. थोडा आवाज मऊ करून वासुदेव म्हणाले, गोपिका, यानंतर आम्ही घराची जबाबदारी तुमच्यावर सोपवणार आणि आम्ही संकटग्रस्त देश बांधवांना मदत करण्यासाठी बाहेर पडणार.
अहोऽ पण, सरकारची मदत असल्याशिवाय तुम्ही एकटे कुठवर आणि किती पुरणार?
गोपिका तुम्हाला परिस्थिती कल्पना नाही. मी स्वतः पाहून आलोय. खेड्यातील लोक बाहेर पडले. खेडी ओस पडली. त्या उजाड भागात गुरांचे सांगाडे आणि माणसांची हाडे पसरली आहेत. सरकारने दुर्लक्ष केले आहे. फक्त स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याकडे त्यांचे सगळे लक्ष आहे. अशावेळी कोणीतरी पुढाकार घेऊन सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायलाच हवे ना? मी तेच काम करणार आहे.
पतीच्या शब्दातील कळकळ आणि दृनिढश्चय बघून बाईचे मन अभिमानाने भरून आले. त्याच बरोबर स्वतः वरच्या जबाबदारीची जाणीवही झाली.
दोन-चार दिवसाने स्वतः जवळची पुंजी खेड्या पाड्यातल्या लोकांमध्ये वाटून वासुदेवराव रिक्तहस्ते संध्याकाळी घरी परत आले. त्यांच्या भेटीसाठी त्यांचा भाऊ कृष्णराव दोन दिवसापासून खोळंबलेले होते. त्यांना पाहून आश्चर्याने वासुदेवरावांनी विचारले, अरे कृष्णा, तू कधी आलास? दोन दिवस झाले. तुझ्या भेटीसाठीच थांबलो आहे.
काही विशेष?
होय! जेवण झाल्यावर सांगतो.
बरेच वर्षानंतर चौघेही भाऊ एकत्र जेवले.
जेवणं आटोपल्यावर सगळे निवांत बसले. कृष्णराव सुपारी कातरीत म्हणाले, भाऊ, तुला घराकडे लक्ष घालायला वेळ नसल्यामुळे, दादांनी मथुच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. दादांच्या आज्ञेनुसार शिरढोण पासून जवळच असलेल्या पळस्पेच्या रामभाऊ कर्वेशी मथूचा विवाह निश्चित केला. भाऊ समाधानाने म्हणाले, आमच्यामुळे विघ्न येऊ नये, म्हणून तुम्हीच सगळं पहा.
कृष्णाजींनी जास्त आग्रह न धरता देण्या घेण्याच्या व्यवहार बद्दल चर्चा केली. चर्चा करून झाल्यावर म्हणाले, मथूला आणि वहिनीला घेऊन निघातो म्हणतो.
ठीक आहे. मथू सासरी गेली की, आम्हाला कशाचाच पाश उरणार नाही. आम्ही मुक्तपणे आपल्या कार्यात झोकून देऊ शकू.
गोपिकाबाईंना आपल्या भविष्यकाळ दिसून आला. डोळ्यात आलेले अश्रू त्यांनी काळोखातच पुसून टाकले.
सुट्टीच्या दिवशी शिरढोण, पळस्पे, तासगाव, नरसोबाची वाडी इत्यादी ठिकाणी व्याख्याने दिली. पण निष्पन्न काहीच निघत नव्हते.
नेमके याच सुमारास अशा काही घटना घडल्या की, वासुदेवरावांच्या मनातला इंग्रज द्वेष आणखी भडकला. त्यांचे जाज्वल्य देशाभिमान स्वस्त बसू देईना.
त्यांच्या लक्षात आले की, नुसते व्याख्यान देऊन काहीच निष्पन्न निघत नाही. त्यासाठी बंडाची तयारी करणे गरजेचे आहे. यासाठी पैसा आणि माणसांची गरज आहे. ते सुट्टीमध्ये दूरवर जाऊन अंदाज घेऊ लागले. बडोद्यालाही जाऊन आले. परंतु इंग्रज सरकारने मल्हाररावांना पदच्यूत केल्यामुळे काहीच उपयोग झाला नाही. अशातच दुष्काळाने हाहाकार माजवला. तसा दुष्काळ नवीन नव्हता. तो नेहमीच पडायचा. पण या वेळेच्या दुष्काळ काही वेगळाच होता. विहिरी, नद्या, नाले सुकून गेले होते. गावचे गाव ओस पडले होते. शेतकऱ्यांनी जनावरे मोकळे सोडून दिले होते. काहींनी विक्रीला काढले होते. काही लोक निजामशाहीत जाऊ लागले. कित्येक लोक वाटेतच मरून पडू लागले. छोटी छोटी मुलं भुकेने तडफडून गतप्राण होऊ लागली. अंत्यविधी कोणी करायचा? प्रेते गिधाडांसाठी ठेवून तसेच पुढे जाऊ लागले. जनावरही चारा पाण्यावाचून मरु लागले. सगळीकडे मार्गा मार्गावर कुजलेली प्रेते, हाडांचे सापळे विखुरले होते. याचा परिणाम पटकी आणि देवीची साथ पसरली. एकट्या सोलापूर विजापूर पुरात सात सहस्त्र माणसे मेली. हे भारतीय लोकांना कमी झाले म्हणून की काय, दुसरे भयानक आक्रमण ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सुरू झाले.
अनाथ, दिन दुबळ्या गरीब लाचार यांना प्रलोभन दाखवून बस्तीमा दिल्या जाऊ लागला. बाटवाबाटवीची मोहीम तीव्र झाली.
याचवेळी पुण्यातील धर्मसभा पुढे सरसावली. पत्रके काढून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. केवळ पोटासाठी धर्म त्याग करणे योग्य नाही. तुमची मुले आमच्या संस्थाकडे पाठवा. ते कोणत्याही जाती धर्माचे असले तरी त्यांचे पालन पोषण योग्य रीतीने होईल. त्यांना त्यांच्या धर्मानुसार वाढवू.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 12
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – १२.
इंग्रज सरकारला हिंदुस्थानी लोक मरत होते याची फिकर नव्हती. त्यांचे सगळे व्यवस्थित चालू होते. शेवटी इंग्रज सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी धान्य आयात केले. माणसे अर्धा शेर धान्य प्रतीदिन वाटले जाऊ लागले. आणि दुष्काळी कामे काढली. इतके तुटपुंजे अन्न खाऊन त्यांना कामावर यावे लागत होते. ते भुकेची जाणीव होऊ नये म्हणून पोटावर पट्टी करकचून बांधून काम करत होते. पण भूक लागणारच. पुन्हा पट्टी घट्ट करून काम करायचे. अशात अनेक लोक उपासाने मेले. काही अतिस्रावाने मेले. दुष्काळाच्या आगीत हिंदुस्तान होरपळून निघाला. ही सर्व परिस्थिती ऐकून पाहून वासुदेवरावांच्या काळजातला घरे पडत होती. अस्वस्थ वासुदेवरावांनी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून रजा घेतली. संकटग्रस्त व दुर्दैवी देश बांधवांची परिस्थिती जवळून बघण्यासाठी ते पायीच निघाले. त्यांनी दाढीमिशन वाढवून बैरागी वेश धारण केला. खाद्याला एक झोळी घेऊन निघाले….
बडोदा, इंदोर, उज्जैन, अकोला, नागपूर, नगर, नाशिक, कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर या सर्व भागातून जनतेची प्रत्यक्ष दुःखी बघितली. लोकांशी संवाद साधला. सरकारी ढिलाई अनुभवली. इंग्रज राजवटी बद्दलचा संताप अधिक प्रखर झाला. दुष्काळग्रस्तांचे हाल बघून प्रतिशोधनाच्या भावनेला अधिक बळ मिळाले.
जागोजागी मृतदेह, हाडांचे सापळे, रोगराई, कुबट दर्प, रोगट वातावरण बघून त्यांच्या हृदयात कालवा कालव झाली. आपण या असाह्य लोकांना मदत करण्यास अपुरे पडत असल्याची, आपल्या दुर्बलतेची चीड आली.
विपन्न मनःस्थीती, संतापदग्ध अंतःकरण आणि थकलेले शरीर घेऊन ते पुण्याला घरी परत आले. स्नान संध्या आटवून ते बसले. गोपिकाबाई व गंगाधर त्यांच्याजवळ येऊन बसले. त्यांनी प्रवासाबद्दल विचारपूस केल्यावर त्यांचा संताप उफाळूण आला. आपले देश बांधव अन्न करत मरताहेत. आणि इंग्रज सरकार दयेचा खोटा आव आणत व्यर्थ योजना राबवीत आहे. दुष्काळाचे नवे कारण देऊन नवे कर लादित आहे. म्हणजे आपल्या भारतातून पैसा गोळा करायचा, या देशाची वाताहत करून देशातील धर्म नष्ट करायचा हा डाव आहे.
वासुदेवरावांच्या लक्षात आले, भाषणबाजी करून लोकसंग्रह होत नाही. शस्त्र उचलल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजेच मरणाची तयारी हवी. त्यांना शस्त्र शिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणीव झाली. वासुदेवरायांचे घर पुण्याच्या मध्यभागी असल्यामुळे त्यांच्या घरापासून जवळच बाणेकरांचा आखाडा, लहुजी वस्तादांची तालीम जवळच होती. वासुदेवरावांचे पिळदार शरीर, भरपूर उंची, लख्ख गोरा रंग, सरळ तरतरीत नाक, पाणीदार निरसर डोळे, त्यामुळे त्यांची छाप समोरच्यावर पडत असे. ते लहुजींच्या तालीमीत आले. आणि नम्रपणे लहुजींना विचारले, गुरुवर्य, मला आपल्या तालमीत प्रवेश हवा आहे. त्यावेळी ते इंग्रज सरकारच्या नोकरीत होते. लहुजी म्हणाले, वासुदेव, तू कंपनी सरकारच्या नोकरीत आहे. आणि माझ्या तालमीत तर शस्त्रास्त्र शिक्षणाबरोबरच इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे धडे दिल्या जातात. हे त्यांना जर कळले तर तुझी नोकरी जाईल. त्यामुळे तुमचे न आलेले ठीक राहील. विचार कर.
त्यावेळी धर्मांतरावर ख्रिस्ती मिशनर्‍यांचा फार जोर होता. वासुदेवराव हिंदूंचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला की, इंग्रजांना इथून हाकलल्याशिवाय, त्यांची सत्ता नष्ट केल्याशिवाय, हिंदू धर्माचे रक्षण करणे शक्य नाही. इंग्रजांना इथून हाकलने हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी इंग्रजांना ठार करणे, त्यांच्याशी युद्ध करणे, मारामारी, शिवाय दुसरा पर्याय नाही.
हा विचार करूनच लष्करी शिक्षण घेणे, लष्कर उभारणे आवश्यक आहे. म्हणूनच ते लहुजींच्या तालीमीत आले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लष्करी शिक्षण घेणे, शरीर सक्षम बनवणे आवश्यक होते. म्हणून लहुजींना विनंती करत म्हणाले, गुरुवर्य! मला नोकरीची फिकीर नाही. आज माझा धर्म धोक्यात आला आहे. माझी मातृभूमी गुलामगिरीच्या श्रृखंलेत जखडली आहे. स्वराज्याची होत असलेली दुर्दशा मला पहावत नाही. माझ्या प्राण्याचे मोल देऊनही मला माझ्या मातृभूमीला मुक्त करायचे आहे. आता माघार नाही. आपण मला आपला शिष्य करून घ्या.
वासुदेवरावांचे बाणेदार उत्तर एकून लहूजींना अत्यानंद झाला. त्यांनी त्यांची विनंती मान्य केली. म्हणाले, प्रवेश देण्याआधी तुला शपथ घ्यावी लागेल. जोपर्यंत इंग्रजी या देशातून जाणार नाही तोवर तुला फिरंग्यांशी लढावे लागेल. प्राणावर बेतले तरी माघार घेता येणार नाही.
मी शपथ घेतो की, माझ्या देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, माझ्या मातृभूमीसाठी लढत राहीन. वासुदेवरावाने शपथ घेतल्यावर म्हणाले, गुरुवर्य, आपण आदेश द्या, मी फौज उभी करतो. ऐकून लहुजींना फार आनंद झाला. ते उठायच्या तयारीला लागले. त्यांनी वासुदेवरावांच्या नेतृत्वात बंड उभारण्याचे ठरवले.
लहुजी वासुदेवरावांना सोबत घेऊन डोंगर दर्‍या, खोरे, लपण्याच्या जागा दाखवल्या. वेगवेगळे डावपेच शिकवले. ते लष्करात नोकरीवर असल्यामुळे त्यांना लष्करी शिस्तीची जाण होतीच. बंडाची जय्यत तयारी सुरू झाली. वासुदेवराव बंदूक चालवणे, पट्टा, तलवार, बोथाटी, भाला, बरची, ही सर्व शस्रे चालवण्याची विद्या लहुजी वस्ताद कडून शिकले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 13
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – १३.
वासुदेवरावांचे आवडते शस्त्र होते दांडपट्टा. लवचिक, सळसळते, दुधारी असणारे शस्त्र खास कसबाने चालवावी लागायचे. त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले. त्यांच्या हातात पट्टा असला की, एकटेच अनेकांना भारी जात. दोन हातात पट्टा असला की, मग विचारायलाच नको. विलक्षण वेगाने पट्टे चालवत. समोरचा सशस्त्र घेराव तोडून निघून जात. शिवाय दातात शस्त्र धरून भिंत चढणे, धावत्या घोड्यावरुन निशाण बाजी करणे हे सर्व प्रकार ते लीलया करीत असत. रानावनातून पळणे, डोंगरांचे चढण वेगाने चढणे, तुटक्या कड्यावरून उड्या मारणे, भरपुरात उडी मारून पाण्याखालून वेगात पोहत दूर जाणे, ढाल तलवारीचे हात करणे आणि भालाफेक या गोष्टीत ते लहुजी वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली तरबेज झालेत.
त्यांना हत्याराचा शौक असल्यामुळे त्यांच्याकडे दोन-चार बंदुका, चार-पाच तलवारी व पट्टे असत. पुढे शस्त्रबंदी कायम झाल्यावर त्यांनी दंडाधिकार्‍या कडून दोन बंदूका आणि तलवारीचा परवाना काढून घेतला.
त्यांनी पत्नी गोपिकाबाईंनाही बंदूक चालवायला शिकवले. गोपिका बाईंनी संस्कृत मध्येही चांगली प्रगती केली होती. आता पतीच्या सांगण्यानुसार त्या शस्त्र शिक्षण घेण्यासही तयार झाल्यात.
नरसिंह मंदिरा पलीकडे दाट झाडी होती. तिथे वासुदेवरावांनी बाईंना बंदूक चालवण्यास शिकवले. आणि बाईंनी अल्पकाळातच बंदूक चालवण्यात तरबेज झाल्यात. त्यानंतर त्यांना घोडदौडीचेही शिक्षण दिले.
लोकांमध्ये स्वदेश प्रेमाचा प्रचार होण्यासाठी वासुदेवरावांनी शाळांमधून सभा घेणे चालू केले. या सभांची जबाबदारी भिकाजी पंत हर्डीकरवर सोपवली. या सभांचा बाहेर बभ्रा होऊ नये म्हणून शिक्षकांच्या नकळत एखाद्या संकेतस्थळी घेतल्या जाऊ लागल्या. या सभांमधून मुलांपर्यंत स्वदेश प्रेम व्यवस्थित पोहोचू लागले. याचबरोबर वासुदेवराव प्रभात फेरीच्या माध्यमातून आपला संदेश पोहोचू लागले. पुण्यातून वेगवेगळ्या पेठांमधून प्रभात फेरी काढल्या जात. अनेक सम विचारी तरुण वासुदेवरावांना येऊन मिळत होते. त्यांना फेरीचे काम वाटून दिले. या फेऱ्यांमध्ये समर्थांचे श्लोक खड्या आवाजात म्हटल्या जात…..
” देवद्रोही तितुके कुत्ते। मारुनी घालावे परते। देवदास पावती फत्ते। यदर्थे संदय नाही!”
जयजयकार रघुवीर समर्थ!
शिवाजी महाराज की जय!!
हा आवाज ऐकला की माणसे जमा होत. मग वक्तव्य सुरू होई. या फेऱ्यांमध्ये काही तरुण मुलेही सामील होऊ लागली. भाषण संपले की पुढच्या पेठीत जावे. अशा प्रकारे प्रसार काम सुरू होई.
वासुदेवराव आपल्या जहाल भाषणातून उघड उघड प्रचार करीत असे. यातच त्यांना काही सहकारी मिळाले. तर काही लोक त्यांना भ्रमिष्ट अथवा वेडा समजत.
वासुदेवराव कित्येक वेळा आपल्या सहकाऱ्यां सोबत खुन्या मुरलीच्या मंदिरात बैठक घेत असत. यात ते शाळेतील मुलांना सुद्धा सामील करून घेत असत. त्यांना ते स्वतः तलवारबाजी, पट्टा, नेमबाजी शिकवीत. फर्ग्युसन टेकडीला किल्ला समजून दोन बाजूंनी दोन टेकड्यांची चढाई करत सर करणे, चढाई व बचावायची लढाईचे हे प्रशिक्षण स्वतः वासूदेवराव देत असत.
याच काळात वासुदेवरावांनी तयार केलेले काही सहकारी…. गणपतराव घोखडेकर, बाळकृष्ण तथा आप्पा वैद्य, यांनी वासुदेवरावांना उठावाच्या वेळी साथ दिली तशीच पुढे टिळकांना सुद्धा दिली होती. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, भिकाजीपंत हर्डीकर, पशुराम नारायण, पाटणकर, माधवराव नामजोशी, विष्णू आणि सितारामपंत गोडबोले, मोरो बळवंत खेर, नारायण जोगळेकर, सदाशिव नारायण उर्फ बाळूकाका जोशी, बाळ गंगाधर टिळक या प्रमुख सहकाऱ्यांबरोबरच पत्नी गोपिकाबाई फडके याही त्यांच्या शिष्य होत्या.
याचवेळी वासुदेवराव आपल्या बंडाच्या योजनेस सत्पुरुषाचा आशीर्वाद मिळावा या हेतूने ते काळबोवांकडे गेले. वासुदेव येताच काळबोवांनी सर्वांना बाहेर पाठवले. वासुदेवरावांनी त्यांना साष्टांग नमस्कार करून म्हणाले, बोवा, शिवरायांसारखाच सध्याचा काळ आहे. अशावेळी स्वराज्य मिळण्यासाठी बंडाचा उठाव करायचा विचार आहे त्याला आपला आशीर्वाद हवा. म्हणून आपल्याकडे आलोय!
काळबोवांनी हसून त्यांचा हात हाती घेतला. म्हणाले, वासुदेव तुझी तळमळ मला जाणवते. परंतु सध्याचा काळ अनुकूल नाही. हट्टला पेटून करशील तर विनाकारण मरशील. त्यापेक्षा काही काळ थांब. ऐकून वासुदेवरावांना धक्काच बसला. काही न बोलता ते चालू लागले.
वासुदेवराव विचारातच घरी आले. ते विचार करू लागले, शिवरायांनी सामान्य मावळ्यातून सैन्य निर्माण केले. ब्रिटिशांना टक्कर द्यायची तर आपण मनुष्यबळ कसे मिळवावे? आपल्याकडे मूठभरच माणसे आहेत. तेवढ्यांना सोबत घेऊन एवढ्या मोठ्या इंग्रजांना झुंज त्यांनी शक्य नाही. यासाठी पांढरा पेशा तरुणांपेक्षा अशिक्षित समाजच चांगला राहील. हे आपल्या आधी सुचायला हवे होते. त्या दृष्टीने वासुदेवरायांची भटकंती सुरू झाली. ते राना वनातून हिंडू लागले. गडकोट पालथे घालू लागले. या भ्रमंती त्यांना….
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 14
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – १४.
या भटकंतीतून वासुदेवरावांना रामोशी लोक भेटले. अत्यंत एकनिष्ठ, बेडर आणि खाल्ल्या अन्नाला जागणारी ही जात. या त्यांच्या गुणामुळेच पूर्वी त्यांच्याकडे गडरक्षणाचे काम होते. इंग्रजांनी गड किल्ले खालसा केल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. तशात कुठेही चोरी, खून, दरोडा पडला की आधी या लोकांना अटक केली जाई. त्यांचा अनन्वित छळ केल्या जात असे. गरिबीमुळे दारूच्या व्यसनाधीन झाले.
अशीच काहीशी परिस्थिती खानदेश, नाशिक, वऱ्हाडातील कोळी, धनगर आणि भिल्ल जमातीची झाली.
वासुदेवराव शनिवारी रविवारी या लोकांकडे जाऊन संपर्क साधू लागले. या लोकांना एक ब्राह्मण माणूस आपल्यात येऊन मिसळतो याचेच अप्रूप वाटू लागले. हळूहळू वासुदेवरावांनी त्यांचेशी जवळीक साधून मने जिंकली. एक दिवस त्या सर्वांना जमवून वासुदेवराव म्हणाले, मी तुमच्याकडे मदत मागायला आलोय. ते सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यांना वाटले जिथे आपल्याच खाण्याची भ्रांत आहे तिथे यांना काय मदत करणार? त्यांची मनःस्थिती जाणून वासुदेव म्हणाले, घाबरू नका. मला तुमच्याकडून पैसा नको आहे. तुमचे फक्त इनाम हवे आहे.
मित्रांनो! हे गोरे लोक आपल्याच राज्यात येऊन आपल्याला गुलाम बनवून आपल्यावर राज्य करत आहेत. तुमच्याकडे परंपरागत असलेले काम या लोकांमुळे गेले. जंगल कायदा आल्यामुळे तुम्ही लाकडं गोळा करून विकून आपला उदरनिर्वाह करत होता तेही करता येत नाही. वरून कुठलीही चोरी, खून, दरोडा पडला तर तुम्हाला पकडून बेदम मारहाण करतात.
हे सर्व बंद करायचे असेल तर आपल्याला यांच्याशी लढा द्यायला हवा. आपण शिवाजी महाराजांच्या नीतीने जर लढलो तर यांना हाकलणे कठीण नाही. यांच्यामुळे तुम्ही लोक शूर असूनही देशोधडीला लागावेत हे मला पहावत नाही. तुम्ही मला साथ द्या.
म्हणजे आम्ही काय करायचे?
जसे शिवरायांनी एवढा बलाढ्य शत्रू असून मावळ्यांच्या मदतीने युद्धे जिंकले. तसेच आपण प्रयत्न करू. त्यासाठी आपल्याला माणसे, पैसा, शस्त्रांची जमवा जमव करावी लागेल. त्यातला एक जण म्हणाला…
हे जर साहेबाला कळले तर आम्हाला पकडून नेतील आणि बेदम मारतील.
वासुदेव म्हणाले, मला कारणे सांगणारे लोक नको आहेत. यात माझा कोणताही स्वार्थ नाही. हे सर्व तुमची झालेली दयनीय परिस्थिती पाहवल्या जात नाही म्हणून तुमच्यासाठी व माझ्या देश बांधवांसाठी करायचे आहे. इतकेच नाही तर प्रत्येक मोहिमेत मी तुमच्याबरोबर आघाडीवर राहील. मी तुम्हाला शूरवीर समजून आलो होतो. बोला..कोण कोण तयार आहे?
वासुदेवरावांच्या बोलल्याने योग्य परिणाम झाला. सर्वजण एका स्वरात म्हणाले, महाराज, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एका जणांने शंका विचारली, म्हणाला, तुम्ही बामन असून आमच्यात येता….
सर्वप्रथम आपण सर्व हिंदुस्तानी आहोत. नंतर ब्राह्मण आणि तुम्ही रामोशी!
तयार आहात सगळे?
होय महाराज! ठरले तर!
उद्यापासून तुम्ही सर्वजण पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहायला या. तिथेच मी तुम्हाला नेमबाजी व इतरही काही शिकवेन. वेळ आणि संधी पाहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू.
होय महाराज!
दुसऱ्या दिवशीपासून गुलटेकडीच्या परिसरात रामोशी लोक राहायला आले. गुलटेकडी जंगलात प्रशिक्षणाला सुरुवात झाली. काहींना नरसोबाच्या देवळा मागे प्रशिक्षण देणे सुरू केले.
वासुदेवरावांनी आधी तयार केलेले काही ब्राह्मण तरुण या कार्यात साथ देण्यासाठी येऊ लागले.
सुट्टीच्या दिवशी वासुदेवराव लांबच्या गावी जाऊन प्रशिक्षण देत असत. बाकीचे लोक थकत. पण यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यांना इंग्रजांचा नाश करण्याशिवाय, बंडा शिवाय काही दुसरे सुचत नव्हते. रात्रं दिवस त्यांच्या मनात हेच विचार घोळत राही.
एक दिवस रात्रीचे गोपिकाबाईंनी पतीला वाढले. व जवळच बसल्या. म्हणाल्या, अहोऽ एक गोष्ट कानावर घालायची होती.
बोल की! संकोच कशाला!
त्या म्हणाल्या आपल्या आळीत ती विधवा राधाक्का आहे ना? ती देवदर्शनाला निघाली की दोन-तीन तरुण मुलं तिला छेडतात. टिंकल करतात.
काऽऽय? होय! ती मुले देवळा समोरच असतात. ठीक आहे तू राधाक्कांना सांग, मी उद्याच त्यांच्या बंदोबस्त करतो.हे मी आधीच सांगितले आहे.
दुसऱ्या दिवशी राधाक्का सकाळी देवळात जायला निघाली. काही अंतर राखून तिच्या मागून वासुदेवराव निघाले. देवळा बाहेर तीन तरुण मुले उभी होती. राधाक्का जवळ येताना दिसताच एकाने गाणे म्हणायला सुरुवात केली….
” वारी याने कुंडले हाले। डोळे मोडीत राधा चाले।” तीच ओळ पुन्हा पुन्हा म्हणू लागले. राधाक्का खालमानेने देवळात शिरली आणि….
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 15
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – १५.
राधाक्का खाली मान घालून देवळात शिरली. आणि इकडे फाडकण आवाज झाला. ओरडून वासुदेवराव म्हणाले, अरेऽऽ, इंग्रज तुमच्या छाताडावर नाचत आहे. तिथे दाखवा ना तुमचा पराक्रम. तुमची आई मातृभूमी गुलामगीरीच्या श्रृखंलेत जेरबंद आहे. तिथं दाखवाना तुमची थेरं. हिंम्मत असेल तर, तर लढाना साहेबा बरोबर. अरेऽऽ तुम्ही काय लढणार? आयुष्य असेच वाया घालवणार. गर्दी जमा होऊ लागली. तिघेही खाली मान घालून थरथरत उभे होते. राधाक्का दर्शन घेऊन बाहेर येताच, वासुदेवराव म्हणाले, चलाऽ तुमच्या बहिणीचे पाय धरून क्षमा मागा. आणि लक्षात ठेवा, आजच्या नंतर या देवळाच्या आसपास जरी दिसलात तर स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही. चला व्हा पुढे. पाया पडा.
तिघेही चटकन पुढे होऊन राधाक्काच्या पाया पडले. हंऽ निघा आता. लगेच तिघांनीही धूम ठोकली. राधाक्काला मोठा आधार वाटला. तिनेही घराची वाट धरली.
वासुदेवांकडे १८ पगड जातीची लोकं जमा होऊं लागली. बनेश्वर मंदिरात सर्वजण एक निष्ठेची शपथ वाहून कामाला लागू लागले.
वासूदेवरावांनी १५ अध्यायाचे ७११४ ओव्यांचे दशमहात्म्ये लिहून पूर्ण केले. ५१८ पृष्ठांवर हे ओवीबध्द लेखन पूर्ण झाले. शेवटच्या पानावर त्यांनी लिहिले….” हे पुस्तक धर्म स्थापना व्हावी. एतदर्य वासुदेवराव बळवंत फडके, शिरढोण, तालुका पनवेल, जिल्हा ठाणे यांनी लिहिले आहे. १६ नोव्हेंबर १८९८ ला हे ग्रंथ लेखन पूर्ण झाले. मात्र नंतरच्या त्यांच्या व्यस्ततेमुळे हा ग्रंथ प्रसिद्ध होऊ शकला नाही.
हे ग्रंथ लेखन पूर्ण झाल्यामुळे त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली. त्यांनी तीन महिन्याची दीर्घ रजा घेतली. या रजा काळात त्यांनी अनेक संस्थानिकांच्या भेटी घेतल्या. कित्येकांना इंग्रजांबद्दल राग होता पण वासुदेवारांना आपण उघड उघड पाठिंबा दिला तर आपले पद व संपत्ती जाईल या भीतीने त्यांनी पाठिंबा देण्याचे नाकारले. काहींनी नुसतीच सहानुभूती दाखवली. काही म्हणाले, तुमचे प्रयत्नांना यश येत आहेसे दिसताच आम्ही नक्की सहाय्य करू. पण कोणीही आपले धन आणि सेना देण्यास तयार नव्हते. तरी वासुदेवरावांनी हिंमत हारली नाही. आपले प्रयत्न चालूच ठेवले. याच काळात त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची भेट घेतली. दोघेही समवयस्क, पूर्वपरिचित होते. क्षेम कुशल विचारल्यावर महाराजांनी त्यांना आपल्या घरी नेले. जेवणे झाल्यावर वासुदेवरावांनी सांगितले, महाराज दत्त महात्मा लिहून पूर्ण झाले. आणि आता मोठे कार्य हाती घ्यायचे आहे.
कोणते कार्य?
इंग्रजांना हाकलून द्यायचे.
शस्त्र आणि माणसांची जुळवाजवळ चालू आहे. योग्य वेळी बंड करण्याचा मानस आहे. महाराज म्हणाले,
वासुदेवराव अजून हा विषय डोक्यातून जात नाही का? तुम्ही देशप्रेमाचा, स्वदेशीचा प्रचार करीत असतात हेच फार मोलाचे कार्य आहे. पुढे राम समर्थ आहे. वासुदेवराव म्हणाले, प्रचाराचे काम प्राथमिक स्तरावरचेच होते. आता पाया मजबूत झाला आहे. आता मुख्य कामाला सुरुवात करायची आहे.
वासुदेवराव सध्याचा काळ अनुकूल नाही. जरा धीराने घ्या. भगवंतांची उपासना करा. शक्ती वाया घालवू नका. वासुदेवराव म्हणाले….
महाराज, मी सतत बेचैन असतो. माझ्या देश बांधवांचे दुःख, दैन्य पाहू शकत नाही. तरीही माझे ऐका. योग्य वेळी रामराया तुम्हाला सुबुध्दी देईन. वासुदेव म्हणाले, मी सर्व तयारी केली आहे. माणसे देखील तयार आहे. मला आशीर्वाद द्या. महाराजांनी त्यांना रात्रभर परावृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु वासुदेवराव आपल्या निश्चयावर ठाम होते. अस्वस्थ मनाने सकाळी निघाले. ते गेले तेव्हा महाराज खिन्न झाले. कदाचित त्यांना भविष्याची चाहूल लागली असावी.
स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयाने वासुदेवराव पुरते झपाटलं होते. कोणी सबुरीचा सल्ला दिला तर ते म्हणत, आता थांबणे शक्य नाही.
माणसे तयारीची असली तरी ते तेवढी शस्त्रं, माणसांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, त्यासाठी धनाची आवश्यकता होती. धन कुठून मिळणार? विचारांती त्यांच्या लक्षात आले की, धनप्राप्ती आणि बंडासाठी एकदमच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी बाहेर पडावे लागेल. पण आपण बाहेर पडलो तर पत्नीला एकटे माघारी ठेवणे योग्य नाही.
वासुदेवरावांचा भटकंती व रामोशांवर खर्च होत असल्यामुळे त्यांना घरात चणचण भासू लागली. त्यांनी आपले दोन्ही भाऊ गंगाधर व पांडुरंगाला शिरढोणला पाठवून दिले. दरमहा काही पैसे ते वडिलांना पाठवत असत. आता वाढत्या खर्चामुळे तेही पाठवणे बंद झाले. त्यांना मुलांकडून येणाऱ्या पैशाचा मोठा आधार होता. बळवंतरावाने मुलाला स्पष्ट विचारले, त्यावर त्यांनी खरे कारण सांगून म्हणाले, घरापेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यावर खर्च होत आहे.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 896

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading